व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ७

नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा

नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा

“देशांतील सर्व नम्र जनांनो, परमेश्‍वराच्या न्यायानुसार चालणाऱ्‍यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा.”​—सफ. २:२, ३.

गीत १ यहोवाचे गुण

सारांश *

१-२. (क) मोशेबद्दल बायबल काय म्हणतं आणि त्याने काय केलं? (ख) नम्रता विकसित करण्यासाठी आपल्याजवळ कोणतं महत्त्वाचं कारण आहे?

बायबलमध्ये मोशेबद्दल असं म्हटलं आहे की तो, “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गण. १२:३) पण याचा अर्थ असा होतो का की त्याच्यात आत्मविश्‍वासाची कमी होती, तो निर्णय घ्यायला कचरायचा आणि इतरांनी विरोध केल्यावर घाबरून जायचा? एक नम्र व्यक्‍ती अशीच असते असं काही लोकांना वाटू शकतं. पण हे मुळीच खरं नाही. मोशे हा खूप धाडसी, योग्य निर्णय घेणारा आणि धैर्यवान सेवक होता. यहोवाच्या मदतीने त्याने इजिप्तच्या शक्‍तिशाली सम्राटाचा सामना केला आणि अरण्यात जवळपास ३० लाख लोकांचं नेतृत्व केलं. तसंच, त्याने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंवर मात करण्यासाठी मदत केली.

मोशेला ज्या समस्यांचा सामना करावा लागला, तशा समस्या आज आपल्यासमोर नाहीत. पण दररोज आपल्याला अशा लोकांसोबत राहावं लागतं किंवा परिस्थितींचा सामना करावा लागतो ज्यात नम्रता दाखवणं कठीण जाऊ शकतं. असं असलं तरीही हा गुण विकसित करत राहण्यासाठी आपल्याजवळ एक महत्त्वाचं कारण आहे. यहोवाने अभिवचन दिलं आहे की नम्र किंवा “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तो. ३७:११) तुम्ही नम्र आहात असं तुम्ही स्वतःबद्दल म्हणू शकता का? इतरांचंही तुमच्याबद्दल असंच मत आहे का? या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्याआधी, आपण नम्रतेचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे.

नम्रता म्हणजे काय?

३-४. (क) नम्रतेची तुलना कशासोबत केली जाऊ शकते? (ख) नम्र बनण्यासाठी कोणते चार गुण विकसित करणं महत्त्वाचं आहे आणि का?

नम्रतेची * तुलना एका सुंदर चित्रासोबत केली जाऊ शकते. एक कलाकार जसं वेगवेगळे रंग वापरून एक सुंदर चित्र काढतो, तसंच आपल्याला नम्र बनण्यासाठी वेगवेगळे गुण विकसित करण्याची गरज आहे. या गुणांमधील काही महत्त्वाचे गुण म्हणजे लीनता, आज्ञाधारकता, सौम्यता आणि धैर्य. पण यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी हे गुण विकसित करणं गरजेचं का आहे?

फक्‍त नम्र व्यक्‍तीच यहोवाची इच्छा पूर्ण करू शकते. आणि यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण सौम्य असावं. (मत्त. ५:५; गलती. ५:२३) पण आपण जेव्हा यहोवाची इच्छा पूर्ण करतो तेव्हा ते पाहून सैतानाला खूप राग येतो. यामुळेच आपण जरी इतरांशी नम्रतेने आणि सौम्यतेने वागत असलो, तरी सैतानाच्या जगातील बरेच लोक आपला द्वेष करतात. (योहा. १५:१८, १९) म्हणून सैतानाचा विरोध करण्यासाठी आपल्याला धैर्य उत्पन्‍न करण्याची गरज आहे.

५-६. (क) सैतान नम्र लोकांचा द्वेष का करतो? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

नम्रतेच्या अगदी उलट गर्व आहे. एक गर्विष्ठ व्यक्‍ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवत नाही आणि यहोवाची आज्ञा पाळत नाही. ही परिभाषा सैतानावर तंतोतंत लागू होते. सैतान नम्र लोकांचा द्वेष करतो कारण ते दाखवत असलेले चांगले गुण त्याच्यात नाहीत आणि इतरांना हे दिसून येतं की तो खूप वाईट आहे. तसंच, हे लोक आपल्या चांगल्या वागणुकीतून दाखवून देतात की सैतान खोटं बोलतो. ते कसं? कारण सैतानाने कोणतेही दावे केले किंवा काहीही केलं, तरी तो नम्र लोकांना यहोवाची सेवा करण्यापासून थांबवू शकत नाही.​—ईयो. २:३-५.

पण कोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याला नम्रता दाखवणं कठीण जाऊ शकतं? आणि आपण नम्रता विकसित करत राहणं गरजेचं का आहे? या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण मोशे, बाबेलच्या बंदिवासात असलेले तीन इब्री आणि येशू यांच्या उदाहरणावर चर्चा करू या.

नम्र राहणं केव्हा कठीण जातं?

७-८. मोशेचा अनादर करण्यात आला तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी होती?

जबाबदारी देण्यात येते तेव्हा: एखाद्या व्यक्‍तीला जबाबदारी देण्यात येते तेव्हा तिला नम्र राहणं कठीण जाऊ शकतं. खासकरून तिच्या अधिकाराखाली असलेले लोक तिच्याशी आदराने वागत नाहीत किंवा तिच्या निर्णयांवर प्रश्‍न उचलतात तेव्हा. तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का? कुटुंबातला एखादा सदस्य तुमच्याशी असा वागला तर? अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असणार? अशाच एका परिस्थितीत मोशेने काय केलं त्यावर विचार करा.

यहोवाने मोशेवर इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली. तसंच, त्याने त्या राष्ट्रासाठी नियम देताना त्यांची नोंद करण्याची जबाबदारी मोशेला दिली. यावरून हे स्पष्ट होतं की यहोवा मोशेचा त्याच्या सेवेसाठी उपयोग करत आहे. असं असलं तरी, मोशेची बहीण मिर्याम आणि त्याचा भाऊ अहरोन हे दोघंही मोशेविरुद्ध बोलले आणि मोशेने ज्या स्त्रीशी लग्न केलं होतं त्याबद्दलही त्यांनी त्याची टीका केली. मोशेच्या जागी जर इतर कोणी असतं तर साहजिकच त्या व्यक्‍तीला राग आला असता आणि बदला घेण्याचा विचार तिच्या मनात आला असता. पण मोशेच्या मनात अशा भावना आल्या नाहीत. त्याने या गोष्टीला मनाला लावून घेतलं नाही. उलट त्याने यहोवाकडे विनवणी केली की त्याने मिर्यामचा कोड बरा करावा. (गण. १२:१-१३) अशा परिस्थितीतही मोशे नम्रता का दाखवू शकला?

मिर्यामचा कोड बरा करण्यासाठी मोशेने यहोवाला विनवणी केली (परिच्छेद ८ पाहा)

९-१०. (क) यहोवाने मोशेला कोणती गोष्ट समजण्यासाठी मदत केली? (ख) कुटुंबप्रमुख आणि मंडळीतील वडील मोशेच्या उदाहरणावरून काय शिकू शकतात?

मोशेने यहोवाकडून प्रशिक्षण घेतलं होतं. जवळपास ४० वर्षांआधी इजिप्तच्या राजघराण्यात असताना मोशे नम्र नव्हता. त्या वेळी त्याला लगेच राग यायचा, इतका की एका प्रसंगी त्याने अन्याय करणाऱ्‍या एका व्यक्‍तीला ठार मारलं. त्या वेळी मोशेला असं वाटलं की यहोवाला ते मान्य आहे. पण नंतर जवळपास ४० वर्षं यहोवाने मोशेला हे समजण्यासाठी मदत केली की इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्यासाठी फक्‍त धैर्य असणंच पुरेसं नाही. तर त्याला नम्रता विकसित करणं जास्त गरजेचं होतं. आणि नम्रता विकसित करण्यासाठी त्याला आज्ञाधारकता, लीनता आणि सौम्यता विकसित करणं गरजेचं होतं. पण त्याने हे गुण विकसित केले आणि तो एक खूप चांगला नेतृत्व करणारा बनला.​—निर्ग. २:११, १२; प्रे. कार्ये ७:२१-३०, ३६.

१० आज कुटुंबप्रमुखांनी आणि मंडळीतील वडिलांनी मोशेच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. तुमचा कोणी अनादर केला तर लगेच मनाला लावून घेऊ नका. तुमच्यात काही कमतरता असतील तर त्या नम्रतापूर्वक स्वीकारा. (उप. ७:९, २०) समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल यहोवा जे मार्गदर्शन देतो त्याचं स्वीकार करा. आणि इतरांशी बोलताना नेहमी सौम्यतेने बोला. (नीति. १५:१) कुटुंबप्रमुख आणि जबाबदाऱ्‍या सांभाळणारे बांधव जेव्हा यहोवाच्या इच्छेनुसार इतरांशी वागतात, तेव्हा ते शांती टिकवून ठेवतात आणि नम्रता दाखवण्याच्या बाबतीत इतरांसाठी उत्तम उदाहरण मांडतात.

११-१३. तीन इब्री तरुणांनी आपल्यासाठी कोणतं उत्तम उदाहरण मांडलं?

११ आपला छळ होतो तेव्हा: मानवजातीच्या संपूर्ण इतिहासात अनेक शासकांनी यहोवाच्या लोकांचा छळ केला आहे. ते आपल्यावर कदाचित अनेक “आरोप” लावतील, पण त्याचं मूळ कारण हे आहे की आपण “माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा” पाळतो. (प्रे. कार्ये ५:२९) आपला छळ होऊ शकतो, आपल्याला मारहाण केली जाऊ शकते किंवा तुरुंगातही टाकण्यात येऊ शकतं. अशा परिस्थितीत आपण कधीच हिंसा करणार नाही, तर यहोवाच्या मदतीने शांत राहण्याचा प्रयत्न करू.

१२ बाबेलच्या बंदीवासात असणाऱ्‍या तीन इब्री तरुणांनी, म्हणजेच हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या यांनी आपल्यासाठी उत्तम उदाहरण मांडलं. * बाबेलच्या राजाने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी सोन्याच्या मूर्तीला नमन करावं. त्यांनी नमन न करण्याचं कारण राजाला आदराने समजावून सांगितलं. आज्ञेचं पालन न केल्यास त्यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात येईल हे माहीत असूनही, ते यहोवा देवाला आज्ञाधारक राहिले. यहोवाने त्यांना लगेच त्या परिस्थितीतून वाचवलं. पण त्यांनी असं गृहीत धरलं नव्हतं की यहोवा त्यांचा जीव वाचवेलच. याउलट यहोवाची जी काही इच्छा असेल ती स्वीकारायला ते तयार होते. (दानी. ३:१, ८-२८) त्यांनी त्यांच्या कार्यांतून दाखवून दिलं की नम्र लोक धैर्यवान असतात. त्यांनी फक्‍त यहोवाचीच उपासना करण्याचा निर्धार केला होता आणि हा निर्धार कोणताही राजा, कोणतीही धमकी किंवा शिक्षा तोडू शकत नव्हती.​—निर्ग. २०:४, ५.

१३ आपल्या एकनिष्ठेची परीक्षा होते, तेव्हा आपण या तीन इब्री तरुणांचं अनुकरण कसं करू शकतो? अशा परिस्थितीत आपण नम्र राहिलं पाहिजे आणि यहोवा आपली काळजी घेईल असा पूर्ण भरवसा बाळगला पाहिजे. (स्तो. ११८:६, ७) आपल्यावर चुकीचे आरोप लावणाऱ्‍यांना आपण आदरपूर्वक उत्तर दिलं पाहिजे. (१ पेत्र ३:१५) यहोवासोबतची आपली मैत्री धोक्यात येईल अशी कोणतीही गोष्ट करायला आपण साफ नकार दिला पाहिजे.

इतरांनी आपला विरोध केला, तरी आपण त्यांच्याशी आदरपूर्वक बोलतो (परिच्छेद १३ पाहा)

१४-१५. (क) तणावात असताना आपल्यासोबत काय होऊ शकतं? (ख)  यशया ५३:७, १० या वचनांनुसार, तणावात असतानाही नम्रता दाखवण्याच्या बाबतीत येशू सर्वोत्तम उदाहरण का आहे?

१४ तणावाचा सामना करतो तेव्हा: आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या गोष्टींमुळे तणावाचा सामना करावा लागतो. कदाचित शाळेची परीक्षा देण्याआधी आपण तणावात असू किंवा नोकरीवर एखाद्या कामामुळे आपण तणावात असू. किंवा मग एखादी वैद्यकिय चाचणी किंवा शस्त्रक्रिया करण्याआधी आपल्याला तणाव वाटत असेल. तणावात असताना नम्र राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. इतर वेळी ज्या गोष्टींमुळे आपल्याला इतका फरक पडत नाही, त्याच गोष्टींमुळे कदाचित आता आपली चिडचिड होऊ शकते. आपण कदाचित इतरांशी कठोरपणे बोलू किंवा वागू. तुम्हाला कधी तणावाचा सामना करावा लागला असेल, तर येशूच्या उदाहरणातून तुम्ही बरंच काही शिकू शकता.

१५ येशू आपल्या मृत्यूच्या काही महिन्यांआधीपासून खूप तणावात होता. त्याला माहीत होतं की त्याचा खूप छळ करण्यात येईल आणि त्याला जिवे मारलं जाईल. (योहा. ३:१४, १५; गलती. ३:१३) मृत्यूच्या काही महिन्यांआधी त्याने म्हटलं होतं की तो खूप अस्वस्थ आहे. (लूक १२:५०) आणि मृत्यूच्या काही दिवसांआधी येशूने म्हटलं की “आता मी फार खिन्‍न झालो आहे.” त्याने आपल्या पित्याला केलेल्या प्रार्थनेत आपलं मन मोकळं केलं. त्यातून आपल्याला त्याचा आज्ञाधारकपणा आणि नम्रता दिसून येते. त्याने प्रार्थनेत म्हटलं: “बापा, ही वेळ टळून जाऊ दे. तरीपण, यासाठीच मी या वेळेपर्यंत आलो आहे. बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” (योहा. १२:२७, २८) येशूच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा तो धैर्याने स्वतःहून शत्रूंसमोर गेला. आणि शत्रूंनी त्याला खूप लाजिरवाण्या पद्धतीने वागणूक दिली आणि त्याचा खूप छळ केला. येशू खूप तणावात होता आणि त्याला खूप वेदना होत होत्या, तरीही त्याने नम्र राहून देवाची इच्छा पूर्ण केली. तणावात असतानाही नम्रता दाखवण्याच्या बाबतीत येशू सर्वोत्तम उदाहरण आहे, यात काहीच शंका नाही!​—यशया ५३:७, १० वाचा.

येशू नम्रता दाखवण्याच्या बाबतीत सर्वोत्तम उदाहरण आहे (परिच्छेद १६-१७ पाहा) *

१६-१७. (क) येशूच्या नम्रतेची कशामुळे परीक्षा झाली? (ख) आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

१६ येशूच्या जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याच्या सर्वात जवळचे मित्र अशा प्रकारे वागले ज्यामुळे त्याच्या नम्रतेची परीक्षा झाली. त्या रात्री येशूला किती ताण असेल याची कल्पना करा. कोट्यवधी लोकांचं भविष्य त्याच्या एकनिष्ठेवर अवलंबून होतं. त्यामुळे शेवटपर्यंत यहोवाला एकनिष्ठ राहणं त्याला खूप गरजेचं होतं. (रोम. ५:१८, १९) याहूनही महत्त्वाचं म्हणजे येशूच्या निर्णयामुळे एकतर त्याच्या पित्याच्या नावाचा गौरव झाला असता किंवा त्यावर कलंक लागला असता. (ईयो. २:४) अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेवटचं भोजन करताना “आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणाला मानले जाते, यावरून [प्रेषितांमध्ये] मोठा वाद सुरू झाला.” याआधी येशूने प्रेषितांना याविषयावर बऱ्‍याच वेळा सल्ला दिला होता. हा वाद सुरू झाला त्या दिवशीही येशूने याच गोष्टीबद्दल त्यांची चूक सुधारली होती. पण इतकं सर्व होऊनही येशू त्या परिस्थितीत चिडला नाही. याऐवजी तो त्यांच्याशी शांतपणे बोलला. येशूने दयेने पण स्पष्टपणे प्रेषितांना हे समजवलं की त्यांनी कशा प्रकारची मनोवृत्ती बाळगली पाहिजे. आणि यानंतर येशूने प्रेषितांची प्रशंसा केली कारण ते त्याला एकनिष्ठ राहिले.​—लूक २२:२४-२८; योहा. १३:१-५, १२-१५.

१७ तुम्ही जर येशूच्या जागी असता तर तुमची प्रतिक्रिया काय असती? आपण येशूचं अनुकरण करू शकतो आणि तणावात असतानाही नेहमी नम्रता दाखवू शकतो. “एकमेकांचे सहन करत राहा” या यहोवाने दिलेल्या आज्ञेचं आपण मनापासून पालन करत राहू शकतो. (कलस्सै. ३:१३) आपणही कधीकधी अशा गोष्टी बोलतो किंवा करतो ज्यामुळे इतरांना राग येतो. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला यहोवाने दिलेली आज्ञा पाळणं सोपं जाईल. (नीति. १२:१८; याको. ३:२, ५) इतरांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांसाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे.​—इफिस. ४:२९.

नम्रता विकसित करत राहण्याचे फायदे

१८. यहोवा नम्र लोकांना चांगले निर्णय घेण्यासाठी कशी मदत करतो? आपण काय करणं गरजेचं आहे?

१८ आपण योग्य निर्णय घेऊ. आपण नम्र राहिलो तर जीवनात कठीण निर्णय घेण्याची वेळ आल्यावर यहोवा आपल्याला चांगले निर्णय घेण्यासाठी मदत करेल. तो आपल्याला अभिवचन देतो की तो “दीनांच्या याचना” ऐकेल. (स्तो. १०:१७, मराठी कॉमन लँग्वेज ) आणि तो फक्‍त आपल्या याचना किंवा विनंत्या ऐकणारच नाही, तर बायबल आपल्याला सांगतं: “तो नम्र जनांस न्यायपथाला लावतो. तो दीनांस आपला मार्ग शिकवतो.” (स्तो. २५:९) यहोवा आपल्याला बायबलमधून मार्गदर्शन देतो. तसंच, तो आपल्याला “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” पुरवत असलेल्या प्रकाशनांमधून * व कार्यक्रमांमधूनही मार्गदर्शन देतो. (मत्त. २४:४५-४७) आपल्याला मदतीची गरज आहे हे आपण नम्रतेने मान्य केलं पाहिजे आणि यहोवा पुरवत असलेली मदत घेतली पाहिजे. असं आपण प्रकाशनांचा अभ्यास करून आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करून करू शकतो.

१९-२१. मोशेने कादेशमध्ये असताना कोणती चूक केली आणि त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो?

१९ आपण चुका करण्याचं टाळू. मोशेचा विचार करा. तो बराच काळ नम्र बनून राहिला आणि त्याने यहोवाचं मन आनंदित केलं. पण ४० वर्षांच्या कठीण प्रवासाच्या शेवटी, एका प्रसंगी मोशे नम्रता दाखवण्यापासून चुकला. त्याच्या बहिणीचा काही वेळापूर्वीच मृत्यू झाला होता आणि तिला कादेशमध्ये पुरण्यात आलं होतं. या बहिणीनेच इजिप्तमध्ये असताना त्याचा जीव वाचवला असावा. आता इस्राएली लोक पुन्हा एकदा कुरकुर करू लागले की त्यांच्या गरजांकडे कोणीच लक्ष देत नाही. या प्रसंगी पुरेसं पाणी नसल्यामुळे ते लोक “मोशेशी भांडू लागले.” यहोवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांसाठी अनेक चमत्कार केले होते आणि मोशेनेही या लोकांचं निःस्वार्थपणे नेतृत्व केलं होतं, तरीदेखील लोक कुरकुर करू लागले. त्यांनी फक्‍त पुरेसं पाणी नसल्याचीच तक्रार केली नाही, तर ते मोशेविरुद्ध बोलू लागले आणि या परिस्थितीसाठी त्यालाच जबाबदार ठरवू लागले.​—गण. २०:१-५, ९-११.

२० यामुळे मोशेला खूप राग आला आणि रागाच्या भरात तो नम्रता दाखवण्यात चुकला. यहोवाने त्याला आज्ञा दिली होती की त्याने खडकाशी बोलावं, पण याउलट मोशे लोकांशी कठोरतेने बोलला आणि तो स्वतः चमत्कार करेल असं त्याने लोकांना सांगितलं. मग त्याने खडकावर दोन वेळा काठी मारली आणि त्यातून पाणी वाहू लागलं. गर्व आणि राग यांमुळे त्याच्या हातून ही गंभीर चूक घडली. (स्तो. १०६:३२, ३३) या प्रसंगात त्याने नम्रता दाखवली नाही, म्हणून त्याने वचनयुक्‍त देशात जाण्याची संधी गमावली.​—गण. २०:१२.

२१ या घटनेवरून आपण बरेच धडे घेऊ शकतो. पहिला म्हणजे, आपण नेहमी नम्रता विकसित करत राहिलं पाहिजे. तसं करण्याचं आपण थोड्या वेळासाठीही थांबवलं, तर मग आपल्या मनात गर्व येऊ शकतो आणि आपल्या शब्दांतून व कार्यांतून आपण चुका करू शकतो. दुसरं म्हणजे, तणावामुळे आपल्याला नम्रता दाखवणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आपण नेहमी, अगदी तणावात असतानाही नम्र बनून राहण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहिले पाहिजेत.

२२-२३. (क) आपण नम्रता विकसित करत राहणं गरजेचं का आहे? (ख) सफन्या २:३ या वचनातून आपल्याला काय कळतं?

२२ आपलं संरक्षण होईल. लवकरच यहोवा सर्व दुष्ट लोकांचा नाश करणार आहे आणि त्यानंतर या पृथ्वीवर फक्‍त नम्र लोक राहतील. त्या वेळी पृथ्वीवर खऱ्‍या अर्थाने शांती असेल. (स्तो. ३७:१०, ११) तुम्ही त्या नम्र लोकांपैकी एक असाल का? आपल्याला जर तिथे राहायचं असेल तर आपल्याला यहोवाने सफन्या संदेष्ट्याद्वारे दिलेलं आमंत्रण स्वीकारावं लागेल.​—सफन्या २:३ वाचा.

२३ सफन्या २:३ मध्ये असं का म्हटलं आहे की, “कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल”? यहोवा त्याच्या इच्छेनुसार चालणाऱ्‍या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या सेवकांचा बचाव करू शकत नाही, असा या शब्दांचा अर्थ होत नाही. याउलट या शब्दांवरून आपल्याला कळतं की संरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला पाऊल उचलणं गरजेचं आहे. आपल्याला जर “परमेश्‍वराच्या क्रोधदिनी” आपला बचाव करायचा असेल आणि सदासर्वकाळ जगायचं असेल, तर आज नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करणं गरजेचं आहे.

गीत २१ जे दयाळू ते धन्य!

^ परि. 5 आपल्यापैकी कोणीही जन्मतःच नम्र नसतं. आपल्याला हा गुण विकसित करावा लागतो. शांतीने राहणाऱ्‍या लोकांसोबत नम्रतेने वागणं आपल्याला सोपं जाईल. पण गर्विष्ठ लोकांसोबत व्यवहार करताना कदाचित नम्रता दाखवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. या लेखात आपण अशा काही आव्हानांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांवर मात केल्यामुळे आपल्याला नम्रतेचा गुण विकसित करायला मदत होईल.

^ परि. 3 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: नम्रता. एक नम्र व्यक्‍ती इतरांशी दयेने वागते आणि इतरांनी राग आणला तरी ती शांत राहते. तसंच, नम्र व्यक्‍ती गर्वाने किंवा उद्धटपणे कधीच वागत नाही. ती इतरांना नेहमी स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजते. यहोवा नम्र आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो त्याच्या अधिकाराखाली असलेल्या लोकांशी प्रेमळपणे आणि दयेने वागतो.

^ परि. 12 बाबेलच्या लोकांनी या तीन इब्री तरुणांना शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो अशी नावं दिली.​—दानी. १:७.

^ परि. 18 उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज  १५ एप्रिल २०११च्या अंकातील “देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या” हा लेख पाहा.

^ परि. 59 चित्राचं वर्णन: आपल्यापैकी मोठा कोण यावर शिष्यांमध्ये वाद झाल्यावर येशू त्यांच्यावर चिडत नाही, तर शांतपणे त्यांची चूक सुधारतो.