व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ८

कृतज्ञता दाखवा

कृतज्ञता दाखवा

“कृतज्ञता दाखवा.”​—कलस्सै. ३:१५.

गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो

सारांश *

१. येशूने बरं केलेल्या शोमरोनी माणसाने कृतज्ञता कशी दाखवली?

दहा जण खूप त्रासलेले होते. त्यांना कुष्ठरोग झाला होता आणि ते बरे होतील याची त्यांना काहीच आशा नव्हती. पण एक दिवस त्यांनी महान शिक्षकाला, येशूला दुरून पाहिलं. येशू सर्व प्रकारचे रोग बरे करू शकत होता याबद्दल त्यांनी ऐकलं होतं आणि त्यांना खात्री होती की तो त्यांनादेखील बरं करू शकतो. म्हणून ते म्हणू लागले: “हे गुरू, येशू, आमच्यावर दया कर!” येशूने त्या दहा जणांना पूर्णपणे बरं केलं. यात काहीच शंका नाही की येशूने दाखवलेल्या दयाळूपणासाठी त्या सगळ्यांच्या मनात  येशूबद्दल कृतज्ञता होती. पण एकाने मात्र मनात असलेली कृतज्ञतेची * भावना येशूचे उपकार मानून व्यक्‍तही केली. बरा झालेला तो शोमरोनी माणूस “मोठ्याने देवाची स्तुती” करायला प्रेरित झाला.​—लूक १७:१२-१९.

२-३. (क) आपण कृतज्ञता दाखवण्यात कसे कमी पडू शकतो? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

त्या शोमरोनीसारखं आपल्यालाही दयाळू लोकांबद्दल कदर व्यक्‍त करण्याची इच्छा असते. पण कधीकधी कृतज्ञतेची भावना शब्दांद्वारे किंवा कार्यांद्वारे व्यक्‍त करायला आपण विसरून जातो.

आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून आभार व्यक्‍त करणं का महत्त्वाचं आहे हे आपण या लेखात पाहणार आहोत. आपण बायबलमध्ये दिलेल्या कृतज्ञता दाखवणाऱ्‍या आणि न दाखवणाऱ्‍या लोकांची काही उदाहरणं पाहणार आहोत. त्यांच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. त्यानंतर, आपण कृतज्ञता कशी व्यक्‍त करू शकतो याच्या काही विशिष्ट मार्गांवरही चर्चा करू या.

आपण आभार का व्यक्‍त केले पाहिजेत?

४-५. आपण कृतज्ञता का व्यक्‍त केली पाहिजे?

आभार व्यक्‍त करण्याच्या बाबतीत यहोवाचं आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे. आभार व्यक्‍त करण्याचा त्याचा एक मार्ग म्हणजे, त्याचं मन आनंदित करणाऱ्‍यांना तो आशीर्वाद देतो. (२ शमु. २२:२१; स्तो. १३:६; मत्त. १०:४०, ४१) आणि “देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करा” असं प्रोत्साहन आपल्याला शास्त्रवचनांद्वारे मिळतं. (इफिस. ५:१) यावरून आपल्याला आभार व्यक्‍त करण्याचं मुख्य कारण कळतं. ते म्हणजे आपल्याला यहोवाचं अनुकरण करायचं आहे.

आता आपण आभार व्यक्‍त करण्याचं दुसरं कारण पाहू या. कृतज्ञता हे अन्‍नासारखं आहे. आपण जेव्हा ते इतरांसोबत वाटून खातो तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. त्याच प्रकारे, आपल्याबद्दल कोणी कृतज्ञता व्यक्‍त केली  तर आपल्याला  आनंद होतो. तसंच, आपण जेव्हा इतरांचे आभार मानतो  तेव्हा त्यांनाही  आनंद होतो. आपण ज्यांचे आभार मानतो त्यांना जाणीव होते, की आपल्याला मदत करण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले किंवा आपल्याला जी मदत पुरवली त्याचं चीज झालं आहे. यामुळे आपल्यातली मैत्री आणखी घनिष्ठ होते.

६. आभार व्यक्‍त करणं आणि सोन्याची फळं यांत कोणत्या गोष्टींचं साम्य आहे?

आपण व्यक्‍त केलेली कृतज्ञता मौल्यवान असते. बायबल म्हणतं: “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” (नीति. २५:११) जरा कल्पना करा, चांदीच्या परडीत सोन्याची फळं ठेवली तर ती किती सुंदर दिसतील! इतकंच काय तर ती मौल्यवानही असतील! तुम्हाला जर अशी भेट मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला ती नक्कीच आवडेल. त्याच प्रकारे, तुम्ही शब्दांतून व्यक्‍त केलेली कृतज्ञता इतरांसाठी तितकीच मौल्यवान ठरू शकते. आणखी एका गोष्टीचा विचार करा: फळ सोन्याचं असेल तर ते खूप काळापर्यंत टिकूही शकतं. हीच गोष्ट आभार प्रदर्शित करण्याबाबतीतही लागू होते. तुम्ही एखाद्याचे आभार मानले तर त्याला त्याची आयुष्यभर आठवण राहील.

त्यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली

७. स्तोत्र ३०:१२ या वचनानुसार दावीद, आणि स्तोत्र लिहिणाऱ्‍या इतर लेखकांनी आभार कसे व्यक्‍त केले?

प्राचीन काळातल्या देवाच्या बऱ्‍याच सेवकांनी कृतज्ञता व्यक्‍त केली. त्यांपैकी एक होता दावीद. (स्तोत्र ३०:१२ वाचा.) त्याला शुद्ध उपासनेबद्दल मनापासून कदर होती आणि ती त्याने आपल्या कार्यांतून व्यक्‍त केली. त्याने आपल्या संपत्तीतून पुष्कळ मौल्यवान गोष्टी मंदिराच्या बांधकामासाठी दिल्या. आसाफच्या वंशजांनी स्तोत्र किंवा स्तुतीचे गीत लिहिण्याद्वारे आभार व्यक्‍त केले. त्यांपैकी एका गीतात त्यांनी यहोवाचे आभार मानले आणि यहोवाच्या ‘अद्‌भुत कृत्यांची’ प्रशंसा केली. (स्तो. ७५:१) यावरून स्पष्ट होतं की दावीद व आसाफचे वंशज यांना, मिळालेल्या सर्व आशीर्वादांसाठी यहोवाला कृतज्ञता व्यक्‍त करायची होती. या स्तोत्रकर्त्यांचं आपण कोणकोणत्या प्रकारे अनुकरण करू शकतो?

पौलने रोमकरांना लिहिलेल्या पत्रातून आपल्याला कृतज्ञता व्यक्‍त करण्याबद्दल काय शिकायला मिळतं? (परिच्छेद ८-९ पाहा) *

८-९. प्रेषित पौलने आपल्या बंधुभगिनींबद्दल कदर कशी व्यक्‍त केली आणि यामुळे काय परिणाम झाला असेल?

प्रेषित पौलने बंधुभगिनींबद्दल असलेली कदर आपल्या शब्दांद्वारे व्यक्‍त केली. त्याच्या वैयक्‍तिक प्रार्थनेत त्याने त्यांच्याबद्दल देवाचे आभार मानले. तसंच, त्याने जेव्हा त्यांना पत्र पाठवलं तेव्हाही त्याने कृतज्ञता व्यक्‍त केली. रोमकर १६व्या अध्यायाच्या पहिल्या १५ वचनांत, पौलने २७ सहविश्‍वासू जणांचा नावाने उल्लेख केला आहे. पौलने प्रिस्का आणि अक्विल्ला यांबद्दल म्हटलं, की त्यांनी त्याच्यासाठी “स्वतःचा जीव धोक्यात घातला.” तसंच, फीबी हिच्याबद्दल म्हटलं की ती “पुष्कळांच्या आणि माझ्यासुद्धा मदतीला धावून आली.” प्रेमळ बंधुभगिनींनी घेतलेल्या मेहनतीबद्दल पौलने त्यांची प्रशंसा केली. ​—रोम. १६:१-१५.

पौलला माहीत होतं की त्याचे बंधुभगिनी अपरिपूर्ण आहेत. पण रोमकरांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्याने त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्याची निवड केली. मंडळीत जेव्हा मोठ्याने पौलचं पत्र वाचण्यात आलं तेव्हा कल्पना करा की त्या बंधुभगिनींना ते ऐकून किती प्रोत्साहन मिळालं असेल! यामुळे पौल आणि त्या बंधुभगिनींमध्ये असलेलं मैत्रीचं नातं नक्कीच आणखी घनिष्ठ झालं असेल. तुमच्या मंडळीतले बंधुभगिनी आपल्या शब्दांद्वारे आणि कार्यांद्वारे ज्या चांगल्या गोष्टी करतात त्याबद्दल तुम्ही नियमितपणे कदर व्यक्‍त करता का?

१०. येशूने आपल्या अनुयायांबद्दल ज्या प्रकारे कदर व्यक्‍त केली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१० आशिया मायनरमधल्या विशिष्ट मंडळींसाठी असलेल्या आपल्या संदेशात येशूने त्याच्या अनुयायांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. उदाहरणार्थ, त्याने थुवतीरा मंडळीला दिलेल्या संदेशाच्या सुरुवातीला म्हटलं: “मला तुझी कार्ये, तुझं प्रेम, तुझा विश्‍वास, तुझं सेवाकार्य व धीर माहीत आहे. आणि तुझी अलीकडची कार्ये तू पूर्वी केलेल्या कार्यांपेक्षा जास्त आहेत हेही मला माहीत आहे.” (प्रकटी. २:१९) त्याने फक्‍त त्यांच्या सेवाकार्यात झालेल्या वाढीबद्दलच त्यांची प्रशंसा केली नाही, तर चांगली कार्यं करण्यासाठी ज्या गुणांमुळे त्यांना प्रेरणा मिळाली त्याबद्दलही त्याने प्रशंसा केली. त्याला थुवतीरा इथल्या काही जणांना सल्ला द्यायचा होता पण तरी त्याने आपल्या संदेशाच्या सुरुवातीला आणि शेवटी त्यांना प्रोत्साहन दिलं. (प्रकटी. २:२५-२८) विचार करा, येशू सर्व मंडळ्यांचे मस्तक असल्यामुळे त्याच्याजवळ किती अधिकार आहे! खरंतर, आपण त्याच्यासाठी जे काम करतो त्याबद्दल त्याने आपले आभार मानण्याची गरज नाही. पण तरी तो आपल्याबद्दल कदर व्यक्‍त करतो. खरंच, वडिलांसाठी त्याने किती उत्तम उदाहरण मांडलं आहे!

त्यांनी कृतज्ञता दाखवली नाही

११. इब्री लोकांना १२:१६ या वचनानुसार पवित्र गोष्टींबद्दल एसावची काय मनोवृत्ती होती?

११ दुःखाची गोष्ट म्हणजे बायबलमध्ये उल्लेख केलेल्या काही जणांनी कृतज्ञता दाखवली नाही, जसं की एसाव. त्याचे आईवडील यहोवाचा आदर करायचे आणि त्यांचं यहोवावर प्रेम होतं. पण त्याला मात्र पवित्र गोष्टींची कदर नव्हती. (इब्री लोकांना १२:१६ वाचा.) त्याची ही मनोवृत्ती कशी स्पष्टपणे दिसून आली? एसावने अविचारीपणे आपला प्रथमपुत्राचा हक्क फक्‍त वाटीभर वरणासाठी आपल्या लहान भावाला, याकोबला विकला. (उत्प. २५:३०-३४) नंतर, एसावला त्याच्या निर्णयावर पस्तावा झाला. पण मुळात त्याच्याकडे असलेल्या प्रथमपुत्राच्या हक्काची त्याला कदर नव्हती. तो हक्क मिळाला नाही म्हणून नंतर तक्रार करण्याचा त्याच्याकडे कोणताच आधार नव्हता.

१२-१३. इस्राएली लोकांनी कदर नसल्याचं कसं दाखवलं आणि याचे काय परिणाम झाले?

१२ इस्राएली लोकांकडे कृतज्ञता व्यक्‍त करण्याची अनेक कारणं होती. यहोवाने इजिप्तवर दहा पीडा आणल्या आणि त्यानंतर त्यांची गुलामगिरीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना संकटातून वाचवण्यासाठी त्याने संपूर्ण इजिप्तच्या सैन्याला तांबडा समुद्रात बुडवून टाकलं. यामुळे इस्राएली लोकांनी यहोवासाठी विजयाचं स्तुतिगीत गाऊन आपले आभार व्यक्‍त केले. पण ते नेहमी कृतज्ञ राहिले का?

१३ इस्राएली लोकांना जेव्हा आणखी समस्यांचा सामना करावा लागला तेव्हा यहोवाने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी ते लवकरच विसरून गेले. त्यांच्यात कृतज्ञतेची भावना नाही हे दिसून आलं. (स्तो. १०६:७) ते कसं? “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधाने कुरकुर केली.” खरंतर त्यांनी यहोवाविरुद्धच कुरकुर केली. (निर्ग. १६:२, ८) लोकांमध्ये कदर नसल्याची मनोवृत्ती पाहून त्याला दुःख झालं. त्याने नंतर भविष्यवाणी केली की कालेब आणि यहोशवा यांना सोडून, ही इस्राएलची पिढी ओसाड रानातच नष्ट होईल. (गण. १४:२२-२४; २६:६५) आपण या वाईट उदाहरणांचं अनुकरण करण्याचं कसं टाळू शकतो आणि चांगल्या जणांचं अनुकरण कसं करू शकतो हे आता आपण पाहू या.

आज कृतज्ञता व्यक्‍त करा

१४-१५. (क) विवाहसोबती एकमेकांविषयी असलेली कदर कशी व्यक्‍त करू शकतात? (ख) पालक आपल्या मुलांना कृतज्ञता व्यक्‍त करायला कसं शिकवू शकतात?

१४ कुटुंबात. कुटुंबातला प्रत्येक सदस्य आभार व्यक्‍त करतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो. विवाहसोबती जितकं जास्त एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करतील तितकं त्यांचं नातं आणखी घनिष्ठ होईल. तसंच, त्यांना एकमेकांना क्षमा करणंही सोपं जाईल. आपल्या पत्नीची कदर करणारा पती, फक्‍त तिच्या वागण्या-बोलण्याकडे लक्षच देत नाही, तर तो “तिची प्रशंसा” करतो. (नीति. ३१:१०, २८) आणि सुज्ञ पत्नीदेखील आपल्या पतीला सांगते की कोणत्या विशिष्ट गोष्टींसाठी ती त्याची कदर करते.

१५ पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांना कृतज्ञता दाखवायला कसं शिकवू शकता? तुम्ही जसं वागता, जसं बोलता त्याचं मुलं अनुकरण करतील हे लक्षात असू द्या. म्हणून तुमची मुलं जेव्हा तुमच्यासाठी काही करतात तेव्हा त्यांना थँक्यू बोलून त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडा. त्यासोबतच, इतर जण तुमच्या मुलांसाठी काही करतात तेव्हा तुमच्या मुलांना त्यांचे आभार मानायलाही शिकवा. कदर ही मनापासून बाळगली जाते आणि ती व्यक्‍त केल्याने खूप चांगले परिणाम होऊ शकतात हे समजण्यासाठी त्यांना मदत करा. उदाहरणार्थ, क्लॅरी नावाची एक स्त्री म्हणते: “माझी आई ३२ वर्षांची असताना माझ्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर तिला एकटीलाच तीन मुलांचा सांभाळ करावा लागला. मग जेव्हा मी ३२ वर्षांची झाले तेव्हा मला जाणीव झाली, की तिला त्या वयात परिस्थितीचा सामना करणं किती कठीण गेलं असेल. म्हणून मग मी तिला सांगितलं की मला आणि माझ्या भावांना मोठं करण्यात तिने जे काही त्याग केले आहेत, त्याबद्दल मला खूप कदर आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मला म्हटलं, की माझे शब्द तिच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. ती बऱ्‍याचदा ते शब्द आठवते आणि तिला खूप आनंद होतो.”

आपल्या मुलांना कदर व्यक्‍त करायला शिकवा (परिच्छेद १५ पाहा) *

१६. इतरांबद्दल कदर व्यक्‍त केल्यामुळे प्रोत्साहन कसं मिळू शकतं याचं एक उदाहरण द्या.

१६ मंडळीत. आपल्या बंधुभगिनींसाठी कृतज्ञता व्यक्‍त केल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं. उदाहरणार्थ, जॉर्ज नावाचा बांधव २८ वर्षांचा आहे आणि तो मंडळीत वडील आहे. एकदा तो खूप आजारी पडला. त्याला महिनाभर सभेला जाता आलं नाही. मग सभेला जायला सुरुवात केल्यावर त्याला आधीसारखं भाग हाताळणं कठीण जात होतं. जॉर्ज म्हणतो: “मंडळीतल्या जबाबदाऱ्‍या हाताळणं मला जमत नव्हतं आणि माझ्या कमतरतांमुळे मला वाटायचं की मी काहीच कामाचा नाही. पण एकदा सभा संपल्यावर एक बांधव येऊन मला म्हणाले: ‘मला तुमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबासाठी एक चांगलं उदाहरण आहात. तुम्ही मागच्या काही वर्षांत दिलेली भाषणं आम्हाला आवडली आणि यामुळे आम्हाला आध्यात्मिक रीत्या प्रगती करायला मदत झालीये.’ हे शब्द माझ्या मनाला स्पर्श करून गेले आणि माझे डोळे पाणावले. खरंच, त्या वेळी मला अशाच प्रोत्साहनाची गरज होती.”

१७. कलस्सैकर ३:१५ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाने दाखवलेल्या उदारतेसाठी आपण कृतज्ञता कशी व्यक्‍त करू शकतो?

१७ उदार देवाला कृतज्ञता दाखवा. यहोवाने आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न दिलं आहे. तो आपल्याला सभा, नियतकालिकं आणि वेबसाईट यांद्वारे मदतदायी ठरेल असं मार्गदर्शन देतो. एखादं भाषण ऐकल्यावर, लेख वाचल्यावर किंवा ब्रॉडकास्टिंग पाहिल्यावर तुम्हाला कधी असं वाटलं का की ‘हे तर माझ्यासाठीच आहे!’ आपण यहोवाला कृतज्ञता कशी दाखवू शकतो? (कलस्सैकर ३:१५ वाचा.) असं करण्याचा एक मार्ग म्हणजे या चांगल्या भेटवस्तूंसाठी प्रार्थनेत त्याचे आभार मानणे.​—याको. १:१७.

राज्य सभागृहात साफसफाईच्या कामात हातभार लावणं हा कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे (परिच्छेद १८ पाहा)

१८. आपण राज्य सभागृहांसाठी कृतज्ञता कशी दाखवू शकतो?

१८ आपल्या उपासनेची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवल्यानेही आपण यहोवाला कृतज्ञता व्यक्‍त करतो. आपण राज्य सभागृहाची साफसफाई आणि दुरुस्तीचं काम यांत नियमितपणे सहभाग घेतो. तसंच, साऊंड आणि व्हिडिओ यांसाठी असलेली साधनं बिघडू नयेत म्हणून आपण ती खूप जपून वापरतो. राज्य सभागृहाची नीट काळजी घेतल्याने ते बऱ्‍याच काळासाठी चांगल्या स्थितीत राहतील आणि दुरुस्तीची जास्त मोठी कामं निघणार नाहीत. अशा प्रकारे, आपल्याकडे जगभरात नवीन राज्य सभागृह बनवण्यासाठी आणि इतर राज्य सभागृहांचं नवीनीकरण करण्यासाठी जास्त पैसा असेल.

१९. प्रवासी कार्यात असलेल्या एका जोडप्याच्या अनुभवावरून तुम्ही काय शिकलात?

१९ आपल्यासाठी मेहनत घेणाऱ्‍यांप्रती कृतज्ञता दाखवा. आपण कृतज्ञता व्यक्‍त करतो तेव्हा परीक्षांचा सामना करत असलेल्या व्यक्‍तीला आपल्या शब्दांमुळे खूप फरक पडू शकतो. समस्येकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदलू शकतो. हे समजण्यासाठी एका विभागीय पर्यवेक्षकाचं आणि त्यांच्या पत्नीचं उदाहरण पाहू या. थंडीच्या दिवसांत एकदा ते बरेच तास सेवाकार्य करून घरी परतले. ते पार दमून गेले होते. त्यांच्या पत्नीने उबदार कोट घातला होता आणि इतकी थंडी होती की ती तशीच झोपी गेली. सकाळी उठल्यावर तिने आपल्या पतीला सांगितलं की, प्रवासी कार्य करणं तिला खूप कठीण जात आहे. मग थोड्या वेळाने शाखा कार्यालयातून एक पत्र आलं. ते तिच्यासाठी होतं. त्या पत्रात तिच्या सेवाकार्यासाठी आणि धीरासाठी तिची प्रेमळपणे प्रशंसा करण्यात आली होती. प्रत्येक आठवडी नवीन घरी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जाणं सोपं नसतं हेदेखील त्यात लिहिलं होतं. त्या विभागीय पर्यवेक्षकांनी म्हटलं: “पत्रात दिलेले ते कौतुकास्पद शब्द तिच्या मनाला भिडले. त्यानंतर प्रवासी कार्य सोडण्याचा तिने परत कधी विचारही केला नाही. इतकंच काय, तर माझ्या मनात जेव्हा प्रवासी कार्य सोडण्याचा विचार आला तेव्हा बऱ्‍याचदा तिने मला सेवेत टिकून राहण्याचं प्रोत्साहन दिलं.” आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्या जोडप्याने जवळपास ४० वर्षं प्रवासी कार्य केलं.

२०. आपण दररोज काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि का?

२० आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून आपण दररोज कृतज्ञता दाखवण्याचा प्रयत्न करू या. या जगात आपल्याला अनेक समस्यांचा व चिंतांचा सामना करावा लागतो आणि त्यात कृतज्ञता दाखवणारे लोकही फार कमी आहेत. म्हणून आपण नेहमी शब्दांद्वारे किंवा कार्यांद्वारे एखाद्याविषयी मनापासून कदर व्यक्‍त केली पाहिजे. कारण कदाचित त्या व्यक्‍तीला त्याचीच गरज असेल. कदर शब्दांतून व्यक्‍त केल्याने मैत्रीचं बंधन कायमस्वरूपी टिकून राहू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं करण्याद्वारे आपण आपल्या उदार आणि कदर बाळगणाऱ्‍या पित्याचं, यहोवाचं अनुकरण करत असू.

गीत १३ उपकारस्तुतीची प्रार्थना

^ परि. 5 यहोवा, येशू आणि शोमरोनी कुष्ठरोगी यांच्या उदाहरणांवरून आपण कृतज्ञता दाखवण्याच्या बाबतीत काय शिकू शकतो? या लेखात आपण त्यांच्याबद्दल आणि आणखी काही गोष्टींविषयी शिकणार आहोत. कृतज्ञता दाखवणं इतकं महत्त्वाचं का आहे आणि ती आपण कोणत्या काही विशिष्ट मार्गांनी दाखवू शकतो यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

^ परि. 1 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: कृतज्ञता दाखवणे किंवा कदर दाखवणे म्हणजे एखादी व्यक्‍ती किंवा वस्तू मौल्यवान आहे याची जाणीव असणे. मनापासून कदर बाळगणे असाही याचा अर्थ होऊ शकतो.

^ परि. 55 चित्राचं वर्णन: पौलचं पत्र रोमकर मंडळीत वाचून दाखवलं जातं; अक्विल्ला, प्रिस्का, फीबी आणि इतर जण आपली नावं ऐकून खूप आनंदित होतात.

^ परि. 57 चित्राचं वर्णन: एक वयस्क बहिणीच्या चांगल्या उदाहरणाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी एक आई आपल्या मुलीला मदत करते.