व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ९

नियमशास्त्रातून यहोवाचं प्रेम आणि न्याय कसा दिसून आला?

नियमशास्त्रातून यहोवाचं प्रेम आणि न्याय कसा दिसून आला?

“त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्‍वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.”​—स्तो. ३३:५.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१-२. (क) आपल्या सर्वांचीच काय इच्छा असते? (ख) आपण कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो?

आपल्या सर्वांनाच वाटतं की इतरांनी आपल्यावर प्रेम करावं. तसंच, आपल्यासोबत कधीही अन्याय होऊ नये असंदेखील सर्वांना वाटतं. पण जर आपल्यासोबत वारंवार अन्याय झाला आणि इतरांनी आपल्यावर प्रेम केलं नाही, तर आपल्यात कमीपणाची भावना येऊ शकते आणि आपण खचून जाऊ शकतो.

आपण प्रेमासाठी आसुसलेले आहोत आणि न्याय मिळवण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत हे यहोवाला माहीत आहे. (स्तो. ३३:५) आपण खात्री बाळगू शकतो की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्याला चांगली वागणूक मिळावी अशी त्याची इच्छा आहे. ही गोष्ट यहोवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र दिलं त्याचं परीक्षण केल्यामुळे स्पष्ट होते. तुमच्यावर अन्याय झाल्यामुळे किंवा प्रेम न मिळाल्यामुळे तुम्ही जर खचून गेला असाल, तर मोशेच्या नियमशास्त्रातून * यहोवाची लोकांबद्दल काळजी कशी दिसून येते त्याचं परीक्षण करा.

३. (क) रोमकर १३:८-१० या वचनांत सांगितल्यानुसार नियमशास्त्राचं परीक्षण केल्यामुळे आपण काय शिकू शकतो? (ख) या लेखात आपल्याला कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील?

मोशेच्या नियमशास्त्राचं परीक्षण केल्यामुळे, यहोवा देवाच्या लोकांप्रती असलेल्या प्रेमळ भावना समजून घ्यायला आपल्याला मदत होते. (रोमकर १३:८-१० वाचा.) या लेखात आपण इस्राएली लोकांना दिलेल्या काही नियमांचं परीक्षण करू या आणि पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळवू या: नियमशास्त्र प्रेमावर आधारलेलं होतं असं आपण का म्हणू शकतो? नियमशास्त्राने लोकांना न्यायाने वागण्यासाठी प्रेरीत केलं असं का म्हणता येईल? अधिकाराच्या पदावर असलेल्या लोकांनी नियमशास्त्राला कशा प्रकारे लागू करायचं होतं? आणि नियमशास्त्रामुळे खासकरून कोणाचं संरक्षण झालं? या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेतल्यामुळे आपल्याला सांत्वन आणि आशा मिळू शकते. तसंच, यामुळे आपल्या प्रेमळ पित्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ होऊ शकतो.​—प्रे. कार्ये १७:२७; रोम. १५:४.

प्रेमावर आधारलेलं नियमशास्त्र

४. (क) मोशेचं नियमशास्त्र प्रेमावर आधारलेलं होतं असं का म्हणता येईल? (ख) मत्तय २२:३६-४० या वचनांमध्ये येशूने कोणत्या आज्ञांवर जोर दिला?

यहोवा जे काही करतो त्याचा आधार प्रेम असतं, त्यामुळे आपण म्हणू शकतो की नियमशास्त्र प्रेमावर आधारलेलं होतं. (१ योहा. ४:८) यहोवाने दिलेलं संपूर्ण नियमशास्त्र दोन मूलभूत आज्ञांवर आधारलेलं होतं, त्या म्हणजे देवावर प्रेम करणं आणि शेजाऱ्‍यावर प्रेम करणं. (लेवी. १९:१८; अनु. ६:५; मत्तय २२:३६-४० वाचा.) यामुळे आपण म्हणू शकतो की नियमशास्त्रात जे ६०० पेक्षा जास्त नियम देण्यात आले होते त्यातील प्रत्येक नियमातून यहोवाच्या प्रेमाचा एक पैलू आपल्याला दिसून येतो. आता आपण याची काही उदाहरणं पाहू या.

५-६. विवाहित जोडप्यांनी काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे, आणि यहोवाला कोणती गोष्ट माहीत आहे? एक उदाहरण द्या.

आपल्या विवाहसोबत्याशी एकनिष्ठ राहा आणि मुलांची काळजी घ्या. यहोवाची इच्छा आहे की विवाहसोबत्यांनी एकमेकांवर इतकं प्रेम करावं की ते प्रेम आयुष्यभर टिकून राहील. (उत्प. २:२४; मत्त. १९:३-६) विवाहित व्यक्‍तीने व्यभिचार करण्यासारखी गंभीर चूक दुसरी कोणतीच असू शकत नाही. यामुळेच दहा आज्ञांमधील सातवी आज्ञा अशी होती की तू ‘व्यभिचार करू नको.’ (अनु. ५:१८) तसं करणं “देवाच्या विरुद्ध पाप” आहे आणि विवाहसोबत्यावर केलेला निष्ठुर अन्याय आहे. (उत्प. ३९:७-९) निर्दोष जोडीदाराला विश्‍वासघाताचं दुःख बरेच वर्ष छळत राहू शकतं.

विवाहसोबती एकमेकांशी कसं वागतात याकडे यहोवाचं लक्ष असतं. त्याची इच्छा होती की इस्राएली पुरुषांनी आपआपल्या पत्नीसोबत चांगला व्यवहार करावा. एका विवाहित पुरुषाला आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करायचं होतं आणि क्षुल्लक कारणांसाठी तिला घटस्फोट देण्याचा विचार करायचा नव्हता. असं करण्याद्वारे त्याने दाखवून दिलं असतं की तो नियमशास्त्राचं पालन करतो. (अनु. २४:१-४; मत्त. १९:३, ८) पण एखाद्या गंभीर समस्येमुळे त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला, तर त्यासोबत तिला सूटपत्र देणंही गरजेचं होतं. या सूटपत्रामुळे कोणीही त्या स्त्रीवर अनैतिक असल्याचे खोटे आरोप लावू शकत नव्हतं. यासोबतच, आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याआधी त्या पुरुषाला शहरातील वडिलांचा सल्ला घेणं गरजेचं होतं. यामुळे वडील त्या जोडप्याला विवाहातील समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकत होते. हे खरं आहे की इस्राएली पुरुषांनी जेव्हा आपल्या पत्नीला स्वार्थी कारणांसाठी घटस्फोट दिला, तेव्हा प्रत्येक वेळेस यहोवाने त्यांना रोखलं नाही. पण, यहोवाने नक्कीच त्या स्त्रियांचं दुःख आणि अश्रू पाहिले आणि त्यालादेखील दुःख झालं.​—मला. २:१३-१६.

यहोवाची इच्छा होती की आईवडिलांनी मुलांना प्रेमाने शिकवताना व त्यांचं संगोपन करताना मुलांना सुरक्षित वाटावं (परिच्छेद ७-८ पाहा) *

७-८. (क) यहोवाने आईवडिलांना कोणती आज्ञा दिली? (मुखपृष्ठावरील चित्र पाहा.) (ख) आपण कोणते धडे शिकतो?

यहोवाला मुलांच्या संगोपणाचीही खूप काळजी आहे हे आपल्याला नियमशास्त्रातून दिसून येतं. यहोवाने आईवडिलांना आज्ञा दिली की त्यांनी मुलांच्या शारीरिक गरजांसोबतच, त्यांच्या आध्यात्मिक गरजाही भागवल्या पाहिजेत. आईवडिलांना प्रत्येक संधीचा उपयोग करून मुलांच्या मनात यहोवाने दिलेल्या नियमशास्त्राबद्दल प्रेम उत्पन्‍न करायचं होतं आणि त्याबद्दल त्यांना शिकवायचं होतं. (अनु. ६:६-९; ७:१३) यहोवाने इस्राएली लोकांना शिक्षा करण्याचं एक कारण हे होतं की त्यांनी काही मुलांसोबत खूप घृणास्पद कार्यं केली. (यिर्म. ७:३१, ३३) आईवडिलांना मुलांकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं, तर मुलं यहोवाने दिलेली भेट आहेत हे समजून त्यांच्याशी वागायचं होतं.​—स्तो. १२७:३.

धडे: विवाहसोबती एकमेकांशी कसं वागतात याकडे यहोवाचं लक्ष असतं. आईवडिलांनी मुलांवर प्रेम करावं अशी यहोवाची इच्छा आहे. त्यांनी जर मुलांना चांगली वागणूक दिली नाही, तर यहोवा त्यांना जबाबदार ठरवेल.

९-११. यहोवाने लोभ न करण्याबद्दल नियम का दिला होता?

लोभ करू नको. दहा आज्ञांमधील शेवटच्या आज्ञेत लोभ न करण्याबद्दल सांगितलं होतं. म्हणजेच इतरांचा हक्क असलेल्या गोष्टींबद्दल मनात चुकीच्या इच्छा बाळगणं. (अनु. ५:२१; रोम. ७:७) एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी यहोवाने हा नियम दिला होता. यहोवाची इच्छा होती की त्याच्या लोकांनी आपल्या मनाचं, म्हणजेच आपल्या विचारांचं, भावनांचं आणि तर्क करण्याच्या क्षमतेचं रक्षण करावं. यहोवाला माहीत आहे की वाईट कृत्यासाठी मनातील वाईट विचार आणि भावना कारणीभूत असतात. (नीति. ४:२३) जर एका इस्राएली व्यक्‍तीने आपल्या मनात चुकीच्या इच्छांना घर करू दिलं असतं, तर तिला इतरांशी प्रेमाने वागणं शक्य झालं नसतं. दावीद राजाच्या हातून हीच चूक घडली. तसा तो खूप चांगला मनुष्य होता, पण एका प्रसंगी दुसऱ्‍याच्या पत्नीविषयी त्याच्या मनात लोभ उत्पन्‍न झाला. त्याच्या या चुकीच्या इच्छांमुळे तो पाप करून बसला. (याको. १:१४, १५) दावीदने व्यभिचार केला, मग त्याने त्या स्त्रीच्या पतीला फसवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याला जिवे मारण्याची योजना केली.​—२ शमु. ११:२-४; १२:७-११.

१० यहोवा लोकांचं मन पाहू शकतो, त्यामुळे इस्राएली लोकांनी लोभ न करण्याची आज्ञा मोडली तेव्हा यहोवा ते पाहू शकत होता. (१ इति. २८:९) लोभ न करण्याच्या नियमाने यहोवाच्या लोकांना हे शिकवलं की त्यांनी मनात चुकीच्या विचारांना जागा देऊ नये, कारण यामुळे वाईट कार्ये घडू शकतात. या नियमावरून कळतं की यहोवा किती बुद्धिमान आणि प्रेमळ पिता आहे.

११ धडे: यहोवा एका व्यक्‍तीचं फक्‍त बाह्‍यस्वरूपच पाहत नाही, तर ती व्यक्‍ती आतून कशी आहे, तिचं मन कसं आहे हेही तो पाहतो. (१ शमु. १६:७) आपल्या मनातील कोणताही विचार, कोणतीही भावना, कोणतेही कार्य आपण यहोवापासून लपवू शकत नाही. यहोवा आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी पाहतो आणि चांगलं करत राहण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतो. पण त्याची इच्छा आहे की आपण आपल्या मनातील चुकीचे विचार ओळखावे आणि आपल्या हातून एखादी चूक घडण्याआधीच त्या विचारांवर नियंत्रण करावं.​—२ इति. १६:९; मत्त. ५:२७-३०.

न्यायीपणे वागण्याला प्रोत्साहन देणारं नियमशास्त्र

१२. मोशेच्या नियमशास्त्रातून आपल्याला कोणती गोष्ट कळते?

१२ नियमशास्त्रातून आपल्याला हेदेखील स्पष्टपणे कळतं की यहोवाला न्याय प्रिय आहे. (स्तो. ३७:२८; यश. ६१:८) इतरांशी न्यायाने कसं वागावं याबद्दल यहोवाने स्वतः उत्तम उदाहरण मांडलं आहे. त्याने दिलेल्या नियमांचं इस्राएली लोकांनी पालन केलं, तेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला. पण जेव्हा त्यांनी त्याच्या नीतिमान स्तरांकडे दुर्लक्ष केलं, तेव्हा मात्र त्यांना दुःख भोगावं लागलं. आता आपण दहा आज्ञांमधील आणखी दोन आज्ञांवर विचार करू या.

१३-१४. पहिल्या दोन आज्ञा कोणत्या होत्या, आणि त्यांचं पालन केल्यामुळे इस्राएली लोकांना कसा फायदा झाला असता?

१३ फक्‍त यहोवाचीच उपासना कर. दहा आज्ञांमधील पहिल्या दोन आज्ञांमुळे इस्राएली लोकांना समजलं की त्यांनी फक्‍त यहोवाची उपासना करावी. तसंच, त्यांना मूर्तिपूजा न करण्याबद्दलही ताकीद देण्यात आली होती. (निर्ग. २०:३-६) या आज्ञा यहोवाने स्वतःच्या फायद्यासाठी दिल्या नव्हत्या. तर या आज्ञांचं पालन केल्यामुळे त्याच्या लोकांचंच भलं होणार होतं. जोपर्यंत ते लोक यहोवाला विश्‍वासू राहिले तोपर्यंत त्यांची भरभराट झाली. पण जेव्हा त्यांनी इतर देवीदेवतांची उपासना केली, तेव्हा त्यांच्यावर अनेक संकटं आली.

१४ कनानी लोकांचा विचार करा. ते लोक खऱ्‍या देवाची नाही, तर खोट्या देवीदेवतांच्या मूर्तींची उपासना करायचे. यामुळे त्यांनी घृणास्पद कृत्यं केली. (स्तो. ११५:४-८) त्यांच्या उपासना करण्याच्या पद्धतींमध्ये, घृणास्पद लैंगिक कृत्ये करणं आणि लहान मुलांचं बलिदान देणं सामील होतं. इस्राएली लोकांनीही यहोवाला सोडून इतर देवीदेवतांची उपासना करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तेदेखील घृणित कार्ये करू लागले आणि याचा वाईट परिणाम त्यांच्या कुटुंबांवर झाला. (२ इति. २८:१-४) अधिकाराच्या पदावर असणाऱ्‍या लोकांनीही यहोवाच्या स्तरांना नाकारलं. त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि असहाय व लाचार लोकांवर जुलूम केले. (यहे. ३४:१-४) यहोवाने इस्राएली लोकांना स्पष्ट शब्दांत ताकीद दिली की त्यांनी जर विधवांवर आणि मुलांवर अन्याय केला, तर तो त्या लोकांचा न्याय करेल. (अनु. १०:१७, १८; २७:१९) पण जेव्हा-जेव्हा इस्राएली लोक यहोवाला एकनिष्ठ राहिले आणि इतरांशी न्यायाने वागले, तेव्हा-तेव्हा यहोवाने त्यांना आशीर्वादित केलं.​—१ राजे १०:४-९.

यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपल्याला अन्याय सहन करावा लागतो त्याकडे त्याचं लक्ष असतं (परिच्छेद १५ पाहा)

१५. आपण यहोवाबद्दल काय शिकतो?

१५ धडे: यहोवाची उपासना करण्याचा दावा करणारे लोक जेव्हा त्याच्या स्तरांकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्या लोकांना इजा पोहचवतात, तेव्हा त्यासाठी यहोवाला जबाबदार ठरवणं चुकीचं ठरेल. यहोवाचं आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे आणि आपण अन्याय सहन करतो तेव्हा तो पाहत असतो. एका आईला आपल्या बाळाच्या वेदना जाणवतात. पण यहोवा आपल्या लोकांचं दुःख त्यापेक्षाही जास्त समजू शकतो. (यश. ४९:१५) हे खरं आहे की ते दुःख काढून टाकण्यासाठी यहोवा लगेच पाऊल उचलत नाही, पण पश्‍चात्ताप न दाखवणाऱ्‍या या दुष्ट लोकांना तो नक्कीच योग्य वेळी शिक्षा करेल.

नियमशास्त्र कशा प्रकारे लागू करायचं होतं?

१६-१८. मोशेच्या नियमशास्त्रात जीवनातील कोणकोणत्या पैलूंबद्दल नियम होते, आणि आपण कोणते धडे शिकतो?

१६ मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएली लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंबद्दल नियम देण्यात आले होते. यामुळे नियुक्‍त केलेल्या वडीलजनांनी यहोवाच्या लोकांचा योग्य प्रकारे न्याय करणं खूप महत्त्वाचं होतं. त्यांना फक्‍त आध्यात्मिक गोष्टींबद्दलच नाही, तर लोकांमधील मतभेद आणि गुन्हेगारीचे खटले यांचाही न्याय करायचा होता. याबद्दल काही उदाहरणं पाहू या.

१७ जर एखाद्या इस्राएली व्यक्‍तीने दुसऱ्‍याचा खून केला, तर त्याला लगेच मृत्युदंडाची शिक्षा दिली जात नव्हती. तो राहत असलेल्या शहराचे वडीलजन तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला याचं आधी परीक्षण करायचे आणि मग मृत्युदंडाची शिक्षा देणं योग्य आहे की नाही हे ठरवायचे. (अनु. १९:२-७, ११-१३) हे वडीलजन जीवनातील इतर पैलूंबद्दलही न्याय करायचे, जसं की मालमत्तेबद्दल वाद आणि वैवाहिक समस्या. (निर्ग. २१:३५; अनु. २२:१३-१९) या वडीलजनांनी जेव्हा नीतीने न्याय केला आणि इस्राएली लोकांनीही नियमांना पाळलं, तेव्हा त्याचा फायदा सर्वांनाच झाला आणि यामुळे यहोवाच्या नावाला गौरव मिळाला.​—लेवी. २०:७, ८; यश. ४८:१७, १८.

१८ धडे: आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू यहोवासाठी महत्त्वाचा आहे. इतरांशी व्यवहार करताना आपण नेहमी प्रेमाने आणि न्यायाने वागावं अशी त्याची इच्छा आहे. तसंच, आपण जे काही बोलतो व करतो, मग ते एकट्यात का असेना, त्या सर्व गोष्टींकडे यहोवाचं लक्ष असतं.​—इब्री ४:१३

१९-२१. (क) वडीलजन आणि न्याय करणारे लोक यांना देवाच्या लोकांशी कसा व्यवहार करायचा होता? (ख) नियमशास्त्रामुळे लोकांचं संरक्षण कसं झालं, आणि आपण कोणते धडे शिकतो?

१९ यहोवाला इतर राष्ट्रांच्या चुकीच्या प्रभावापासून आपल्या लोकांचं संरक्षण करायचं होतं. त्यामुळे त्याची इच्छा होती की वडीलजनांनी नियमशास्त्र लागू करताना कोणताही भेदभाव करू नये. पण असं करत असताना त्यांना लोकांशी कठोरपणे व्यवहार करायचा नव्हता. याऐवजी त्यांना प्रेमाने न्याय करायचा होता.​—अनु. १:१३-१७; १६:१८-२०.

२० यहोवाला आपल्या लोकांबद्दल करुणा होती, त्यामुळेच त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्याने काही नियम दिले होते. उदाहरणार्थ, नियमांमुळे एखाद्या व्यक्‍तीवर गुन्हा करण्याचा खोटा आरोप लावण्याची शक्यता फार कमी होती. ज्या व्यक्‍तीवर आरोप लावला जायचा, त्याला हे जाणून घेण्याचा हक्क होता की तो आरोप कोण लावत आहे. (अनु. १९:१६-१९; २५:१) तसंच, त्याला दोषी ठरवण्याआधी, कमीतकमी त्या घटनेबद्दल दोन साक्षीदारांनी साक्ष देणं गरजेचं होतं. (अनु. १७:६; १९:१५) पण जर एखाद्या व्यक्‍तीला गुन्हा करताना फक्‍त एकानेच पाहिलं तेव्हा काय? अशा परिस्थितीत त्याने हा विचार करणं चुकीचं होतं की आपल्याला शिक्षा होणार नाही. कारण यहोवाने ते पाहिलं होतं. कुटुंबामध्ये वडिलांना काही प्रमाणात अधिकार देण्यात आला होता. पण काही कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी वडीलजनांना जबाबदारी देण्यात आली होती.​—अनु. २१:१८-२१.

२१ धडे: न्याय करण्याच्या बाबतीत यहोवा सर्वोत्तम उदाहरण मांडतो, तो कधीच कोणावर अन्याय करत नाही. (स्तो. ९:७) जे लोक त्याच्या नीतिमान स्तरांनुसार जगतात त्यांना तो आशीर्वाद देतो. पण जे लोक आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात, त्यांना मात्र तो शिक्षा करतो. (२ शमु. २२:२१-२३; यहे. ९:९, १०) वाईट गोष्टी करणाऱ्‍या काही लोकांना शिक्षा होत नाही, असं कदाचित आपल्याला वाटू शकतं. पण योग्य वेळ आल्यावर यहोवा त्यांना त्यांच्या वाईट कामांसाठी शिक्षा देईल. (नीति. २८:१३) आणि जर त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही, तर त्यांना याची जाणीव होईल की “जिवंत देवाच्या हातात सापडणे ही भयंकर गोष्ट आहे.”​—इब्री १०:३०, ३१.

नियमशास्त्रामुळे खासकरून कोणाचं संरक्षण झालं?

वाद सोडवताना वडीलजनांना यहोवाच्या प्रेमाचं आणि न्यायाचं अनुकरण करायचं होतं (परिच्छेद २२ पाहा) *

२२-२४. (क) नियमशास्त्रामुळे खासकरून कोणाचं संरक्षण झालं, आणि आपण यहोवाबद्दल काय शिकतो? (ख) निर्गम २२:२२-२४ या वचनांमध्ये कोणता इशारा देण्यात आला आहे?

२२ नियमशास्त्रामुळे अशा लोकांचं संरक्षण झालं जे स्वतःचं रक्षण करू शकत नव्हते, जसे की अनाथ मुलं, विधवा आणि विदेशी लोक. इस्राएलमधील न्याय करणाऱ्‍यांना सांगण्यात आलं होतं की, “उपऱ्‍याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नको; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नको.” (अनु. २४:१७) समाजातील दुर्लक्षित लोकांमध्ये यहोवाने वैयक्‍तिक आस्था घेतली. आणि अशा लोकांवर अन्याय करणाऱ्‍यांना त्याने शिक्षा दिली.​—निर्गम २२:२२-२४ वाचा.

२३ नियमशास्त्रामुळे कुटुंबातील सदस्यांचंही संरक्षण झालं. नियमशास्त्रानुसार कुटुंबातील जवळच्या सदस्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यावर सक्‍त मनाई होती. (लेवी. १८:६-३०) इस्राएलच्या शेजारी असणाऱ्‍या राष्ट्रांमध्ये असे पाप खपवून घेतले जायचे किंवा त्यांना मान्यता होती, पण यहोवाच्या लोकांनी याबद्दल त्याच्यासारखा दृष्टिकोन बाळगणं गरजेचं होतं. यहोवा त्या गोष्टीला घृणित पाप समजायचा.

२४ धडे: अधिकाराच्या पदावर असणाऱ्‍या सर्वांनी इतरांमध्ये वैयक्‍तिक आस्था घ्यावी अशी यहोवाची इच्छा आहे. मुलांचं लैंगिक शोषण, बलात्कार यांसारख्या गोष्टींचा तो द्वेष करतो आणि सर्व लोकांचं, खासकरून समाजातील दुबळ्या लोकांचं संरक्षण व्हावं व त्यांना न्याय मिळावा अशी त्याची इच्छा आहे.

नियमशास्त्र “पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची केवळ छाया आहे”

२५-२६. (क) प्रेम आणि न्याय हे श्‍वास आणि जीवन यांसारखे आहेत असं का म्हणता येईल? (ख) या शृंखलेतील पुढच्या लेखामध्ये आपण काय पाहणार आहोत?

२५ प्रेम आणि न्याय यांची तुलना आपण श्‍वास आणि जीवन यांच्याशी करू शकतो. त्यातील फक्‍त एक असून चालणार नाही, पृथ्वीवर दोन्ही गोष्टींची गरज आहे. यहोवा आपल्यासोबत न्यायाने वागत आहे या गोष्टीची खात्री मिळाल्यामुळे, त्याच्याबद्दल आपलं प्रेम वाढतं. आणि देवावर व त्याच्या नीतिमान स्तरांवर प्रेम केल्यामुळे, आपल्याला इतरांवर प्रेम करायची आणि त्यांच्याशी न्यायाने वागायची प्रेरणा मिळते.

२६ नियमशास्त्रामुळे इस्राएली लोकांना यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडणं शक्य झालं. पण येशूने नियमशास्त्र पूर्ण केल्यामुळे त्यापुढे देवाच्या लोकांना त्यातील नियम पाळण्याची गरज नव्हती. त्याच्यापेक्षाही चांगल्या गोष्टींनी नियमशास्त्राची जागा घेतली. (रोम. १०:४) प्रेषित पौलने नियमशास्त्राबद्दल असं म्हटलं की ते “पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची केवळ छाया आहे.” (इब्री १०:१) या चांगल्या गोष्टी काय आहेत याबद्दल शृंखलेतील पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल. तसंच, ख्रिस्ती मंडळीत प्रेम आणि न्याय यांची काय भूमिका आहे हेदेखील आपण पाहू या.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

^ परि. 5 यहोवाला आपली काळजी आहे याची आपण खात्री का बाळगू शकतो हे सांगणाऱ्‍या शृंखलेतील हा पहिला लेख आहे. या शृंखलेतील इतर लेख टेहळणी बुरूज  मे २०१९ या अंकात प्रकाशित करण्यात येतील. यहोवा मंडळीत प्रेम आणि न्याय कसा दाखवतो हे त्यातील पहिल्या लेखात सांगितलं जाईल. दुसऱ्‍या लेखात सांगितलं जाईल की वाईट गोष्टी घडत असतानाही यहोवा प्रेम आणि न्याय कसा दाखवतो, आणि तिसऱ्‍या लेखात सांगितलं जाईल की ज्या लोकांचं लहानपणी लैंगिक शोषण झालं आहे त्यांना आपण सांत्वन कसं देऊ शकतो.

^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: यहोवाने मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला ६०० पेक्षा जास्त नियम दिले. त्यांना “नियमशास्त्र” किंवा “मोशेचं नियमशास्त्र” असं म्हटलं जातं. यासोबतच बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांनाही (उत्पत्ति ते अनुवाद) नियमशास्त्र असं संबोधलं जातं. काही वेळा संपूर्ण इब्री शास्त्रवचनांना संबोधण्यासाठीही “नियमशास्त्र” हा शब्द वापरला जातो.

^ परि. 60 चित्राचं वर्णन: जेवण बनवताना इस्राएलमधील एक आई आपल्या मुलीसोबत बोलत आहे. वडील आपल्या मुलाला मेंढरांची काळजी घेण्याचं प्रशिक्षण देत आहेत.

^ परि. 64 चित्राचं वर्णन: एका व्यापाऱ्‍याने विधवेवर अन्याय केला आहे. पण शहरातील वडीलजन त्या विधवेला आणि तिच्या मुलाला प्रेमाने मदत करत आहेत.