व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १३

सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांप्रती सहानुभूती दाखवा

सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांप्रती सहानुभूती दाखवा

“लोकांचा मोठा समुदाय पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. . . . मग तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.”​—मार्क ६:३४.

गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

सारांश *

१. येशूमध्ये असलेल्या एका गुणामुळे तो काय करू शकला? स्पष्ट करा.

येशूच्या व्यक्‍तिमत्त्वात मनाला भिडणारे अनेक गुण होते. त्यातल्या एका गुणामुळे तो मानवांना अपरिपूर्णतेमुळे सामोरे जाव्या लागणाऱ्‍या समस्यांना समजून घेऊ शकत होता. पृथ्वीवर असताना येशूने पुढील सल्याचं पालन केलं: “आनंद करणाऱ्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्‍यांबरोबर शोक करा.” (रोम. १२:१५) उदाहरणार्थ, सेवाकार्याची जबाबदारी पूर्ण करून येशूचे ७० शिष्य जेव्हा आनंदाने परत आले, तेव्हा येशू “अतिशय आनंदित” झाला. (लूक १०:१७-२१) पण जेव्हा लाजरच्या मृत्यूमुळे त्याच्या जवळच्या लोकांवर कोसळलेलं दुःख त्याने पाहिलं, तेव्हा तो “अगदी आतून कण्हला आणि खूप दुःखी झाला.”​—योहा. ११:३३.

२. येशू इतरांना प्रेम आणि सहानुभूती का दाखवू शकला?

अपरिपूर्ण मानवांनासोबत व्यवहार करताना येशू इतकी दया आणि करुणा का दाखवू शकला? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याचं लोकांवर प्रेम होतं. याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे येशूने मानवांबद्दल असं म्हटलं: “मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.” (नीति. ८:३१) लोकांवर असलेल्या प्रेमामुळेच त्याला मानवांची विचार करण्याची पद्धत समजून घेण्याची प्रेरणा मिळाली. प्रेषित योहानने येशूबद्दल म्हटलं: “माणसाच्या मनात काय असते हे त्याला माहीत होते.” (योहा. २:२५) येशूच्या मनात इतरांबद्दल खूप प्रेम आणि करुणा होती. लोकांना त्याचं प्रेम जाणवायचं आणि म्हणून त्यांनी राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला. आपणही जर येशूसारखंच इतरांप्रती प्रेम उत्पन्‍न केलं, तर आपण आणखी परिणामकारक रीत्या आपलं सेवाकार्य करू शकू.​—२ तीम. ४:५.

३-४. (क) आपल्याला इतरांप्रती सहानुभूती असली, तर सेवाकार्याबद्दल आपला दृष्टिकोन कसा असेल? (ख) आपण या लेखात काय पाहणार आहोत?

प्रेषित पौलला याची जाणीव होती की प्रचार करणं त्याचं कर्तव्य आहे आणि आपल्याबाबतीतही हेच खरं आहे. (१ करिंथ. ९:१६) पण आपल्यामध्ये इतरांप्रती सहानुभूती असली, तर आपण सेवाकार्य फक्‍त कर्तव्य म्हणून करणार नाही. याउलट, आपल्याला लोकांची काळजी वाटते आणि त्यांना मदत करण्यासाठी आपण आतुर आहोत या भावनेने आपण प्रचार करू. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्ये २०:३५) आपण जर सेवाकार्याप्रती असाच दृष्टिकोन बाळगला, तर आपल्याला त्यातून आणखी आनंद मिळेल.

सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांना आपण सहानुभूती कशी दाखवू शकतो याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहू की इतरांप्रती येशूच्या ज्या भावना होत्या त्यातून आपण काय शिकू शकतो. मग आपण असे चार मार्ग पाहू ज्यांद्वारे आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो.​—१ पेत्र २:२१.

येशूने सेवाकार्यात लोकांबद्दल सहानुभूती दाखवली

लोकांबद्दल सहानुभूती असल्यामुळे येशूला सांत्वनाचा संदेश सांगायची प्रेरणा मिळाली (परिच्छेद ५-६ पाहा)

५-६. (क) येशूने कोणाप्रती सहानुभूती दाखवली? (ख) यशया ६१:१, २ या वचनांमध्ये सांगितल्यानुसार, येशूने ज्या लोकांना प्रचार केला त्यांच्याबद्दल त्याला कळवळा का आला?

येशूने इतरांप्रती सहानुभूती कशी दाखवली याच्या एका उदाहरणावर विचार करा. एका प्रसंगी येशू आणि त्याचे शिष्य विश्रांती न घेता प्रचार करत होते. त्यांना तर “जेवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता.” “विश्रांती” मिळावी म्हणून येशू त्यांना एका “एकांत ठिकाणी” घेऊन गेला. पण येशू आणि शिष्य त्या ठिकाणी पोचण्याआधीच एक मोठा समुदाय तिथे पोचला. तिथे पोचल्यावर जेव्हा येशूने त्या लोकांना पाहिलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? “येशूला त्यांचा कळवळा * आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते होते. मग तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.”​—मार्क ६:३०-३४.

येशूला लोकांचा कळवळा आला त्यामागचं कारण काय होतं? त्याने पाहिलं की लोक “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे” होते. कदाचित येशूने पाहिलं असेल की तिथे आलेले काही लोक गरीब आहेत आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागत आहे. कदाचित इतर काही जण आपल्या प्रिय जणांच्या मृत्यूचं दुःख सहन करत असतील. असं असेल तर येशू त्यांची परिस्थिती समजू शकत होता. याआधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, कदाचित येशूलाही वरीलपैकी काही समस्यांचा सामना करावा लागला होता. येशूला इतरांबद्दल काळजी होती आणि त्यामुळे त्यांना सांत्वन देण्यासाठी त्याला प्रेरणा मिळाली.​—यशया ६१:१, २ वाचा.

७. आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

आपण येशूच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो? येशूप्रमाणेच आपल्या अवतीभोवतीही “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे” लोक आहेत. त्यांच्या जीवनात बऱ्‍याच समस्या आहेत. त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती आपल्याजवळ आहे, ती म्हणजे राज्याचा संदेश. (प्रकटी. १४:६) “दुबळा व दरिद्री” यांच्याबद्दल आपल्या मनात ‘दयेची’ भावना आहे. त्यामुळे आपल्या प्रभूचं अनुकरण करून आपण आनंदाचा संदेश सांगितला पाहिजे. (स्तो. ७२:१३) लोकांबद्दल करुणा असल्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं.

आपण सहानुभूती कशी व्यक्‍त करू शकतो

प्रत्येक व्यक्‍तीची गरज ओळखा (परिच्छेद ८-९ पाहा)

८. सेवाकार्यात सहानुभूती दाखवण्याचा एक मार्ग कोणता आहे? उदाहरण द्या.

प्रचारात भेटणाऱ्‍या लोकांप्रती आपण सहानुभूती कशी दाखवू शकतो? आपण स्वतःला इतरांच्या जागी ठेवून त्यांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. तसंच, इतरांनी आपल्याशी जसा व्यवहार करावा असं आपल्याला वाटतं, तसाच व्यवहार आपण त्यांच्याशी केला पाहिजे. * (मत्त. ७:१२) आपण हे कसं करू शकतो याचे चार मार्ग आता पाहू या. पहिला, प्रत्येक व्यक्‍तीच्या गरजा समजून घ्या. आपण इतरांना आनंदाचा संदेश सांगतो तेव्हा आपण जणू एका डॉक्टरासारखं काम करत असतो. एक डॉक्टर नेहमी त्याच्या रुग्णाच्या गरजा आणि परिस्थिती समजून घेतो. रुग्ण जेव्हा त्याला होणाऱ्‍या त्रासाबद्दल सांगतो तेव्हा डॉक्टर लक्ष देऊन ते ऐकतो आणि आजाराचे लक्षण समजून घेण्यासाठी त्याला प्रश्‍न विचारतो. तो लगेच एखादी उपचारपद्धती सुचवत नाही, तर रुग्णाच्या आजाराचे लक्षण समजून घेण्यासाठी तो काही वेळ जाऊ देतो आणि मग त्याला बरं करण्यासाठी योग्य तीच उपचारपद्धती सुचवतो. त्याच प्रकारे, प्रचारात भेटणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीशी आपण एकाच प्रकारे संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करू नये. याउलट, आपण प्रत्येक व्यक्‍तीची परिस्थिती आणि विचार समजून घेऊन तिच्याशी बोललं पाहिजे.

९. आपण कोणती गोष्ट गृहीत धरू नये? स्पष्ट करा.

प्रचारात तुम्ही एखाद्या व्यक्‍तीला भेटता तेव्हा असं गृहीत धरू नका की तुम्हाला तिची संपूर्ण परिस्थिती माहीत आहे. तसंच, तिचे विश्‍वास काय आहेत आणि ती त्यांना का मानते याबद्दलही आधीच मत बनवणं चुकीचं ठरेल. (नीति. १८:१३) असं करण्याऐवजी विचारपूर्वक प्रश्‍न विचारून तिच्या मनात काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. (नीति. २०:५) तुमच्या भागात जर सहसा लोकांची हरकत नसेल, तर तुम्ही त्या व्यक्‍तीला तिच्या कामाबद्दल, कुटुंबाबद्दल, जीवनातील तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या मतांबद्दल विचारू शकता. अर्थात असं करत असताना तिला वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. आपण प्रश्‍न विचारून इतरांना त्यांचे विचार व्यक्‍त करण्याची संधी देतो, तेव्हा त्यांना आनंदाच्या बातमीची गरज का आहे, हे आपल्याला समजतं. एकदा आपण त्यांची गरज ओळखली, तर मग त्याबद्दल आपण सहानुभूती दाखवू शकतो आणि योग्य ती मदत पुरवू शकतो. येशूनेही हीच पद्धत वापरली.​—१ करिंथकर ९:१९-२३ पडताळून पाहा.

लोकांच्या जीवनात काय समस्या असतील याचा विचार करण्याचा प्रयत्न करा (परिच्छेद १०-११ पाहा)

१०-११. २ करिंथकर ४:७, ८ या वचनांनुसार सहानुभूती दाखवण्याचा दुसरा मार्ग कोणता आहे? उदाहरण द्या.

१० दुसरा, त्यांच्या जीवनात काय समस्या असतील याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. काही प्रमाणात आपण त्यांची परिस्थिती सजमून घेऊ शकतो. कारण आपणही त्यांच्यासारखंच अपरिपूर्ण आहोत आणि आपल्यालाही त्यांच्यासारख्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. (१ करिंथ. १०:१३) आजच्या जगात जीवन जगणं खूप कठीण आहे. आपण तग धरून राहू शकतो कारण यहोवा आपल्याला मदत करतो. (२ करिंथकर ४:७, ८ वाचा.) पण अशा लोकांचा विचार करा ज्यांचा यहोवासोबत जवळचा नातेसंबंध नाही. यहोवाच्या मदतीशिवाय या जगात जीवन जगणं त्यांच्यासाठी किती कठीण असेल. येशूसारखंच आपल्यालाही अशा लोकांना पाहून कळवळा येतो आणि त्यांना शुभवर्तमान सांगण्यासाठी आपण प्रेरीत होतो.​—यश. ५२:७.

११ सरगेई नावाच्या बांधवाचं उदाहरण लक्षात घ्या. सत्य शिकण्याआधी तो खूप शांत आणि लाजाळू स्वभावाचा होता. इतरांशी बोलायला त्याला खूप कठीण जायचं. नंतर तो बायबल अभ्यास करू लागला. सरगेई म्हणतो: “बायबलमधून शिकताना माझ्या लक्षात आलं की ख्रिश्‍चन या नात्याने इतरांना आपल्या विश्‍वासाबद्दल सांगणं हे आपलं कर्तव्यच आहे. पण मला वाटायचं की मला हे करणं कधीच जमणार नाही.” पण त्याने अशा लोकांचा विचार केला ज्यांनी सत्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. यहोवाबद्दल त्यांना माहीत नसल्यामुळे त्याचं जीवन किती कठीण असेल याचा त्याने विचार केला. तो म्हणतो: “मी शिकत असलेल्या गोष्टींमुळे मला आनंद तर मिळायचाच पण त्यासोबत मनःशांतीही मिळायची. इतरांनाही सत्य शिकण्याची गरज आहे याची मला जाणीव झाली.” जसजशी सरगेईची इतरांबद्दल सहानुभूती वाढू लागली, तसतसं त्याच्यात प्रचार करण्याचं धैर्य येऊ लागलं. तो म्हणतो: “आश्‍चर्याची गोष्टी म्हणजे, इतरांना बायबलबद्दल सांगितल्यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला. तसंच, मी मानत असलेल्या शिकवणींबद्दल इतरांना सांगितल्यामुळे माझा विश्‍वासही वाढला.” *

आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी काहींना वेळ लागू शकतो (परिच्छेद १२-१३ पाहा)

१२-१३. सेवाकार्यात लोकांना बायबलबद्दल शिकवताना आपण धीर धरणं गरजेचं का आहे? उदाहरण द्या.

१२ तिसरा, तुम्ही ज्यांना बायबलबद्दल शिकवता त्यांच्याशी धीराने वागा. लक्षात असू द्या की ज्या बायबलच्या शिकवणी आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहेत, त्यांपैकी काहींबद्दल इतरांनी कधी ऐकलं किंवा विचारसुद्धा केला नसेल. आणि बऱ्‍याच लोकांना त्यांच्या धार्मिक शिकवणी खूप प्रिय असतात. त्यांना कदाचित वाटू शकतं की त्यांच्या धर्मामुळेच त्यांचं कुटुंब, संस्कृती आणि समाज यात एकता आहे. अशा लोकांना आपण कशी मदत करू शकतो?

१३ पुढील उदाहरणाचा विचार करा: जेव्हा एक पूल खूप जुना होतो तेव्हा काय केलं जातं? सहसा एक नवीन पूल बांधण्यात येतो, पण तो बांधेपर्यंत जुन्या पुलावरून वाहनांची ये-जा चालूच असते. एकदा तो नवीन पूल तयार झाला, की मग जुना पूल पाडला जातो. त्याच प्रकारे, लोकांना त्यांच्या मनाला प्रिय असलेल्या “जुन्या” शिकवणी सोडायला सांगण्याआधी, आपण “नवीन” सत्यांबद्दल त्यांच्या मनात कदर उत्पन्‍न करणं खूप गरजेचं आहे. ही नवीन सत्यं म्हणजे लोकांना माहीत नसलेल्या बायबलच्या शिकवणी. असं केल्यानंतरच लोक आपले जुने विचार बदलू शकतील. अशा प्रकारचे बदल करायला वेळ देणं गरजेचं असतं.​—रोम. १२:२.

१४-१५. नंदनवन पृथ्वीवर जीवनाच्या आशेबद्दल ज्या लोकांना काहीच माहीत नाही, त्यांना आपण कशी मदत करू शकतो? एका उदाहरण द्या.

१४ सेवाकार्यात आपण लोकांशी धीराने वागलो तर त्यांना बायबलमधली सत्यं पहिल्या भेटीतच समजली पाहिजेत किंवा त्यांनी स्वीकारली पाहिजेत अशी अपेक्षा आपण करणार नाही. याउलट, त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्यामुळे आपण घाई करणार नाही तर देवाच्या वचनातल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी आपण त्यांना वेळ देऊ. उदाहरणार्थ, नंदनवन पृथ्वीवर सर्वकाळाच्या जीवनाच्या आशेबद्दल आपण लोकांना कसं समजवणार याचा जरा विचार करा. बऱ्‍याच लोकांना या शिकवणीबद्दल एकतर फार थोडं किंवा काहीच माहीत नसतं. मृत्यू म्हणजे शेवट असं कदाचित ते मानत असतील किंवा चांगले लोक स्वर्गात जातात असं त्यांना वाटत असेल. मग अशांना आपण मदत कशी करू शकतो?

१५ नंदनवनात जगण्याच्या आशेबद्दल एक बांधव कसं समजावतो त्याकडे लक्ष द्या. सर्वात आधी तो उत्पत्ति १:२८ हे वचन वाचतो. मग तो घरमालकाला विचारतो की मानवांनी कुठे आणि कशा परिस्थितीत राहावं अशी देवाची इच्छा होती. “या पृथ्वीवर चांगल्या परिस्थितीत” असं बरेच जण उत्तर देतात. त्यानंतर बांधव यशया ५५:११ हे वचन वाचतो आणि विचारतो की देवाचा उद्देश बदलला आहे का? सहसा घरमालक ‘नाही’ असं उत्तर देतो. मग शेवटी तो स्तोत्र ३७:१०, ११ ही वचनं वाचतो आणि आपलं भविष्य कसं असणार हे घरमालकाला विचारतो. शास्त्रवचनांच्या आधारे अशा प्रकारे तर्क केल्यामुळे, चांगल्या लोकांनी नंदनवन पृथ्वीवर कायमचं राहावं या देवाच्या इच्छेबद्दल समजायला त्याने बऱ्‍याच लोकांना मदत केली आहे.

सहानुभूती दाखवल्यामुळे, मग ती एक साधं पत्र पाठवून व्यक्‍त केली असली तरी तिचे खूप चांगले परिणाम होऊ शकतात (परिच्छेद १६-१७ पाहा)

१६-१७. नीतिसूत्रे ३:२७ या वचनातील सल्ला लक्षात घेऊन आपण कोणकोणत्या व्यावहारिक मार्गांनी इतरांप्रती सहानुभूती दाखवू शकतो? उदाहरण द्या.

१६ चौथा, लोकांप्रती काळजी दाखवण्याचे व्यावहारिक मार्ग शोधा. उदाहरणार्थ, घरमालक खूप व्यस्त असताना आपण त्याच्या घरी गेलो तर? अशा वेळी आपण त्याची माफी मागू शकतो आणि त्याच्या सोईच्या वेळी परत जाऊ शकतो. एखाद्या घरमालकाला लहानसहान कामात मदत हवी असेल तर? किंवा एखादा घरमालक वृद्ध किंवा आजारी असेल आणि त्याला बाहेरून एखादी वस्तू हवी असेल तर? अशा प्रसंगात आपण त्यांना मदत करू शकतो.​—नीतिसूत्रे ३:२७ वाचा.

१७ एका बहिणीला असं करण्याचे खूप चांगले परिणाम मिळाले. एका कुटुंबात लहान बाळाचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवण्यासाठी या बहिणीने त्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात तिने शास्त्रवचनांमधून काही सांत्वन देणारी वचनंही लिहिली. ही जरी एक छोटीशी गोष्ट वाटत असली, तरी याचा त्या कुटुंबावर कसा परिणाम झाला? त्या बाळाच्या आईने म्हटलं: “कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. तुमचं पत्र वाचून आम्हाला कसं वाटलं याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मी तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत, माझ्या भावना मी शब्दांत व्यक्‍त करू शकत नाही, त्या पत्रामुळे आम्हाला खूप सांत्वन मिळालं. मी ते काल नाही म्हटलं तरी २० वेळा वाचलं असेल. ते वाचून मला खूप सांत्वन, धीर आणि दिलासा मिळाला. मी मनापासून तुमचे खूप आभार मानते.” आपण जेव्हा दुःखात असलेल्या लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना मदत करतो, तेव्हा आपल्याला नक्कीच चांगले परिणाम मिळतात.

तुमच्या जबाबदारीबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा

१८. १ करिंथकर ३:६, ७ या वचनाच्या आधारावर आपण लोकांबद्दल कोणता योग्य दृष्टिकोन बाळगायला हवा?

१८ आपल्या सर्वांनीच सेवाकार्याबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. इतरांना देवाबद्दल शिकवण्याच्या कामात आपण आपला भाग पूर्ण करतो, पण या कामात सर्वात महत्त्वाचा भाग आपला नाही. (१ करिंथकर ३:६, ७ वाचा.) यहोवा लोकांना त्याच्याजवळ आकर्षित करतो. (योहा. ६:४४) एक व्यक्‍ती सत्य स्वीकारणार की नाही हे तिच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. (मत्त. १३:४-८) येशू हा पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वोत्तम शिक्षक होता. पण तरीही बऱ्‍याच लोकांनी त्याचा संदेश स्वीकारला नाही हे नेहमी लक्षात असू द्या. त्यामुळे आपण प्रयत्न करूनही लोकांनी जर आपलं ऐकलं नाही, तर निराश होण्याची काहीच गरज नाही.

१९. सेवाकार्यात लोकांप्रती सहानुभूती दाखवल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडतात?

१९ क्षेत्रातील लोकांबद्दल आपण सहानुभूती दाखवली तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळतील. प्रचारकार्यात आपल्याला आणखी आनंद मिळेल. इतरांना देण्यातून जो आनंद मिळतो तो आपण अनुभवू शकू. तसंच, यामुळे “योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना आनंदाचा संदेश स्वीकारणं सोपं जाईल. (प्रे. कार्ये १३:४८) त्यामुळे “संधी आहे तोपर्यंत आपण सगळ्यांचे आणि विशेषकरून विश्‍वासात असलेल्या आपल्या भाऊबहिणींचे भले करू या.” (गलती. ६:१०) असं केल्यामुळे आपल्या पित्याचा गौरव होईल आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळेल.​—मत्त. ५:१६.

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

^ परि. 5 आपण सेवाकार्यात इतरांप्रती सहानुभूती दाखवतो, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो आणि सेवेत चांगले परिणाम मिळण्याची शक्यताही वाढते. असं का म्हणता येईल? प्रचारकार्यात भेटणाऱ्‍या लोकांना सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत आपण येशूकडून काय शिकू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आपण सहानुभूती कशी दाखवू शकतो याच्या चार मार्गांवरही आपण चर्चा करणार आहोत.

^ परि. 5 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: या संदर्भात वापरण्यात आलेला कळवळा या शब्दाचा अर्थ असा होतो की त्रासात असलेल्या किंवा कठोर वागणूक मिळालेल्या व्यक्‍तीप्रती मनात करुणा आणि दया असणं. अशा भावनेमुळे एक व्यक्‍ती समोरच्याला मदत करण्यासाठी शक्य ते करण्याचा प्रयत्न करते.

^ परि. 8 टेहळणी बुरूज १५ मे, २०१४ या अंकातला “सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा” हा लेख पाहा.

^ परि. 11 कधीही आशा सोडू नका!-सरगेई बोटॅन्किनहा व्हिडिओ JW लायब्ररीमध्ये पाहा. (मिडिया > प्रोग्राम्स ॲन्ड इवेन्ट्‌स > २०१७ कन्वेंशन)