व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १०

मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?

मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?

“फिलिप्प व षंढ दोघेही पाण्यात उतरले व फिलिप्पने त्याला बाप्तिस्मा दिला.”​—प्रे. कार्ये ८:३८.

गीत ७ ख्रिस्ती समर्पण

सारांश *

१. आदाम आणि हव्वा यांनी काय गमावलं आणि त्याचा काय परिणाम झाला?

तुमच्या मते बरं काय आणि वाईट काय याचे स्तर कोणी ठरवायला हवेत? आदाम आणि हव्वा यांनी बऱ्‍यावाइटाचं ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचं फळ खाल्लं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की त्यांना यहोवावर आणि त्याच्या स्तरांवर भरवसा नाही. बरं काय आणि वाईट काय याबद्दल त्यांनी स्वतः स्तर ठरवण्याची निवड केली. (उत्प. ३:२२) पण असं केल्यामुळे त्यांनी काय गमावलं याचा जरा विचार करा. त्यांनी यहोवासोबतची आपली मैत्री गमावली. इतकंच काय तर त्यांनी सर्वकाळ जगण्याची संधीदेखील गमावली. त्यासोबतच त्यांच्या मुलांच्या वाट्याला पाप आणि मृत्यूचा वारसा आला. (रोम. ५:१२) आदाम आणि हव्वा यांच्या निर्णयामुळे खरंच खूप वाईट परिणाम घडून आले.

येशूचा स्वीकार केल्यावर कूशी षंढाला लवकरात लवकर बाप्तिस्मा घ्यायचा होता (परिच्छेद २-३ पाहा)

२-३. (क) फिलिप्पने प्रचार केल्यावर कूशी षंढाने काय केलं? (ख) बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात व आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

पण आदाम आणि हव्वा यांच्या तुलनेत कूशी षंढ मात्र वेगळ्या पद्धतीने वागला. फिलिप्पने जेव्हा कूशी षंढाला प्रचार केला तेव्हा त्याने लगेच पाऊल उचललं. यहोवा आणि येशू यांनी त्याच्यासाठी जे केलं होतं त्याबद्दल त्याला इतकी कृतज्ञता वाटली की त्याने लगेच बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्ये ८:३४-३८) देवाला समर्पण करून त्या षंढासारखं आपण बाप्तिस्म्याचं पाऊल उचलतो, तेव्हा आपणही स्पष्टपणे दाखवून देतो की यहोवा आणि येशू यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला कदर आहे. तसंच, यहोवावर भरवसा असल्याचंही आपण दाखवून देतो आणि बऱ्‍यावाइटाबद्दल स्तर ठरवण्याचा अधिकार यहोवालाच आहे हेही आपण मान्य करतो.

यहोवाची सेवा केल्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा जरा विचार करा! आदाम आणि हव्वा यांनी गमावलेल्या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाऊन मिळतील. तसंच, त्यांनी गमावलेलं सर्वकाळचं जीवनही आपल्याला मिळेल. येशू ख्रिस्तावर आपला विश्‍वास असल्यामुळे यहोवा आपल्या चुका माफ करतो आणि आपल्याला एक शुद्ध विवेक देतो. (मत्त. २०:२८; प्रे. कार्ये १०:४३) आपण यहोवाची स्वीकृती असलेल्या कुटुंबाचा भाग बनतो. तसंच, आपल्यासमोर एक उज्ज्वल भविष्यही आहे. (योहा. १०:१४-१६; रोम. ८:२०, २१) हे फायदे स्पष्टपणे दिसत असूनही यहोवाबद्दल ज्ञान घेतलेल्या काही जणांना कूशी षंढाचं अनुकरण करणं कठीण वाटतं. मग बाप्तिस्मा घेण्यापासून कोणती गोष्ट त्यांना रोखत असते? आणि यावर ते कशी मात करू शकतात?

बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांसमोर असणारी आव्हानं

बाप्तिस्मा घेण्याआधी काहींना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं

आत्मविश्‍वासाची कमतरता (परिच्छेद ४-५ पाहा) *

४-५. ॲव्री आणि हॅना या तरुणांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं?

आत्मविश्‍वासाची कमतरता. ॲव्रीचे आईवडील यहोवाचे साक्षीदार आहेत. एक प्रेमळ, काळजी घेणारे पिता आणि मंडळीत एक जबाबदार वडील म्हणून त्याच्या बाबांचं चांगलं नाव आहे. असं असलं तरी ॲव्री बाप्तिस्मा घ्यायला कचरत होता. का बरं? तो म्हणतो: “मी माझ्या बाबांसारखं कधीच बनू शकणार नाही असं मला वाटायचं.” तसंच, ॲव्रीमध्ये आत्मविश्‍वासाची कमतरता होती. भविष्यात समजा त्याला जबाबदाऱ्‍या मिळाल्या तर आपल्याला त्या हाताळता येणार नाहीत असं त्याला वाटायचं. तो म्हणतो: “समजा सर्वांसमोर प्रार्थना करायला, भाषण द्यायला, क्षेत्रसेवेच्या सभा चालवायला आणि सेवेदरम्यान पुढाकार घ्यायला सांगितलं तर मला ते जमेल का, अशी मला भीती वाटायची.”

हॅना १८ वर्षांची आहे. तिच्यात आत्मविश्‍वास जणू नसल्यासारखाच होता. साक्षीदार कुटुंबात ती लहानाची मोठी झाली, पण तरीही तिला असं वाटायचं की आपल्याला यहोवाच्या स्तरांनुसार जगता येणार नाही. ती असा विचार का करायची? हॅना स्वतःला खूपच कमी लेखायची आणि या भावनेमुळे कधीकधी तर ती स्वतःला इजा करून घ्यायची. पण यामुळे परिस्थिती आणखीच बिघडायची. ती म्हणते: “ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही, आईबाबांनासुद्धा नाही. मला वाटायचं की मी स्वतःला इजा पोहोचवतेय म्हणून यहोवा मला कधीच स्वीकारणार नाही.”

मित्रमैत्रिणींचा प्रभाव (परिच्छेद ६ पाहा) *

६. वनेसाला बाप्तिस्मा घेण्यापासून कोणती गोष्ट रोखत होती?

मित्रमैत्रिणींचा प्रभाव. वनेसा २२ वर्षांची आहे. ती म्हणते: “माझी एक खूप चांगली मैत्रीण होती. आम्ही एकमेकींना जवळपास दहाएक वर्षांपासून ओळखायचो.” पण वनेसाच्या मैत्रिणीला तिच्या विश्‍वासांबद्दल आवड नव्हती आणि यामुळे वनेसाला बाप्तिस्माचं ध्येय गाठणं शक्य नव्हतं. वनेसाला खूप वाईट वाटलं कारण ती आध्यात्मिक प्रगती करू शकत नव्हती. ती म्हणते: “एकतर मला नवीन मित्र बनवणं जमत नाही आणि जर मी ही मैत्री तोडली तर मला भीती होती की पुढे मला कधीच एक जवळची मैत्रीण भेटणार नाही.”

अपयशाची भीती (परिच्छेद ७ पाहा) *

७. मकेला नावाच्या तरुण मुलीला कशाची भीती वाटत होती आणि का?

अपयशाची भीती. मकेलाच्या मोठ्या भावाला बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा ती पाच वर्षांची होती. मोठी होत असताना आपल्या भावामुळे आईवडिलांना जो त्रास झाला तो तिने पाहिला होता. ती म्हणते: “मला बाप्तिस्मा घ्यायचं धाडस होत नव्हतं. जर माझ्या हातून चूक झाली आणि मी बहिष्कृत झाले, तर माझ्या आईबाबांवर दुःखाचं डोंगरच कोसळेल.”

विरोध होईल याची भीती (परिच्छेद ८ पाहा) *

८. मायल्झ नावाच्या तरुणाला कशाची भीती होती?

विरोध होईल याची भीती. मायल्झ २२ वर्षांचा आहे. त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे. त्याचे वडील साक्षीदार आहेत पण आई साक्षीदार नाही. तो म्हणतो: “मी १८ वर्षांपासून आईसोबत राहत होतो. मला बाप्तिस्मा घ्यायचा होता. पण ही गोष्ट तिला सांगायला मी घाबरायचो, कारण माझे बाबा साक्षीदार झाले तेव्हा ती त्यांच्याशी कशी वागली होती, हे मी पाहिलं होतं. ती मलाही त्रास देईल अशी मला भीती वाटायची.”

तुम्ही आव्हानांवर कशी मात कराल?

९. यहोवा प्रेमळ आणि धीराने वागतो याबद्दल शिकत राहिल्यामुळे तुम्ही काय कराल?

आदाम आणि हव्वा यांना यहोवाबद्दल प्रेम नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी यहोवाची सेवा न करण्याचं निवडलं. असं असलं तरी यहोवाने त्यांना बरीच वर्षं जगू दिलं, मुलं होऊ दिली. तसंच, त्यांच्या मुलांसाठी स्तर ठरवण्याची अनुमतीही यहोवाने त्यांना दिली. आदाम आणि हव्वा यांनी यहोवाला सोडून स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला तो किती मूर्खपणाचा होता हे लवकरच दिसून आलं. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाने आपल्या निर्दोष भावाचा खून केला. हळूहळू हिंसा व स्वार्थीपणा मानवी कुटुंबावर राज्य करू लागलं. (उत्प. ४:८; ६:११-१३) पण यहोवाची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्‍या आदाम आणि हव्वाच्या मुलांसाठी त्याने एक तोडगा काढला. (योहा. ६:३८-४०, ५७, ५८) यहोवा किती प्रेमळ आहे आणि तो किती धीराने वागतो याबद्दल तुम्ही जितकं जास्त शिकत राहाल, तितकं तुमचं त्याच्यावरचं प्रेम वाढत जाईल. असं केल्यामुळे आदाम आणि हव्वाने निवडलेला मार्ग तुम्ही नाकाराल आणि यहोवाला समर्पण करण्याची निवड कराल.

या आव्हानांवर तुम्ही कशी मात करू शकता?

(परिच्छेद ९-१० पाहा) *

१०. स्तोत्र १९:७ वर मनन केल्यामुळे यहोवाची सेवा करण्यासाठी तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

१० यहोवाबद्दल शिकत राहा. यहोवाविषयी तुम्ही जितकं जास्त शिकत राहाल, तितका जास्त त्याची सेवा करण्याचा तुमचा आत्मविश्‍वास वाढत जाईल. आधी उल्लेख केलेला ॲव्री म्हणतो: स्तोत्र १९:७ मध्ये दिलेलं अभिवचन वाचल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला.” (वाचा.) यहोवा आपली अभिवचनं कशी पूर्ण करतो हे ॲव्रीने पाहिलं तेव्हा देवावर त्याचं प्रेम आणखी वाढलं. प्रेमामुळे फक्‍त आत्मविश्‍वासच वाढत नाही तर यहोवा आणि त्याच्या अपेक्षांवरही लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला मदत होते. हॅना म्हणते: “वैयक्‍तिक बायबल वाचन आणि अभ्यास यांमुळे मला याची जाणीव झाली, की मी जेव्हा स्वतःला इजा करून घेत असते तेव्हा मी खरंतर यहोवालाही दुखवत असते.” (१ पेत्र ५:७) हॅना देवाच्या ‘वचनावर चालणारी’ बनली. (याको. १:२२) याचा काय परिणाम झाला? ती म्हणते: “यहोवाची आज्ञा पाळल्याचे कोणते चांगले परिणाम होतात हे मी स्वतः अनुभवलं, तेव्हा त्याच्यावरचं माझं प्रेम आणखी वाढलं. आता मला खात्री आहे की जेव्हा मला मदतीची गरज असेल तेव्हा यहोवा मला नेहमी मदत करेल.” स्वतःला इजा करून घेण्याच्या वृत्तीवर हॅना मात करू शकली. तिने यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला.

(परिच्छेद ११ पाहा) *

११. चांगले मित्रमैत्रिणी बनवण्यासाठी वनेसाने काय केलं आणि आपण यातून काय शिकू शकतो?

११ सुज्ञपणे मित्र निवडा. आधी उल्लेख केलेल्या वनेसाला हळूहळू जाणीव झाली की तिची मैत्री यहोवाची सेवा करण्याच्या आड येत आहे. म्हणून मग तिने तिच्या मैत्रिणीशी नातं तोडलं. पण त्यासोबतच तिने आणखी एक पाऊल उचललं. तिने मंडळीतच नवीन मित्रमैत्रिणी बनवण्यासाठी मेहनत घेतली. तिला नोहा आणि त्याच्या कुटुंबाच्या उदाहरणामुळे मदत झाली. ती म्हणते: “यहोवावर प्रेम नसणारे लोक त्यांच्या अवतीभोवती होते. पण नोहाच्या कुटुंबातल्या सदस्यांनी एकमेकांना चांगली साथ दिली.” बाप्तिस्मा झाल्यावर वनेसा पायनियर बनली. ती आता म्हणते: “यामुळे मला फक्‍त माझ्या मंडळीतच नाही, तर इतर मंडळ्यांमध्येही चांगले मित्रमैत्रिणी बनवता आले.” यहोवाने दिलेल्या नेमणुकीत व्यस्त राहिल्याने तुम्हालाही चांगले मित्र बनवता येतील.​—मत्त. २४:१४.

(परिच्छेद १२-१५ पाहा) *

१२. आदाम आणि हव्वा यांच्यात कोणत्या प्रकारची भीती नव्हती आणि याचे काय परिणाम झाले?

१२ योग्य भीती बाळगायला शिका. काही बाबतीत भीती असणं ही चांगली गोष्ट असते. जसं की, यहोवाचं मन दुखावलं जाऊ नये अशी भीती बाळगणं योग्य आहे. (स्तो. १११:१०) आदाम आणि हव्वा यांनी जर अशी भीती बाळगली असती तर त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं नसतं. पण याउलट त्यांनी बंड केलं. आणि त्यानंतर त्यांचे डोळे उघडले आणि ते पापी असल्याची त्यांना जाणीव झाली. ते वारशाने आपल्या मुलांना फक्‍त पाप आणि मृत्यू या गोष्टीच देऊ शकले. आदाम आणि हव्वा आपली परिस्थिती पाहू शकत होते, समजू शकत होते आणि त्यामुळे त्यांना आपल्या नग्नावस्थेची लाज वाटली व त्यांनी आपलं शरीर झाकून घेतलं.​—उत्प. ३:७, २१.

१३-१४. (क) १ पेत्र ३:२१ या वचनानुसार आपल्याला मृत्यूची दहशत का नसली पाहिजे? (ख) यहोवावर प्रेम करण्याची आपल्याकडे कोणती कारणं आहेत?

१३ आपण यहोवाबद्दल योग्य भय बाळगलं पाहिजे. पण वारशाने मिळालेल्या मृत्यूची दहशत आपल्यात नसावी. कारण आपल्याला सर्वकाळ जगता यावं यासाठी यहोवाने एक योजना केली आहे. आपल्या हातून पाप घडल्यावर आपण मनापासून पश्‍चात्ताप केला तर यहोवा आपल्याला क्षमा करतो. त्याच्या पुत्राने दिलेल्या खंडणी बलिदानावर आपण विश्‍वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला माफ करतो. विश्‍वास दाखवण्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण मार्गांपैकी एक म्हणजे आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेणं.​—१ पेत्र ३:२१ वाचा.

१४ यहोवावर प्रेम करण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. तो आपल्याला अशा बऱ्‍याच गोष्टी पुरवतो ज्यांचा आपण दररोज आनंद घेत असतो. यासोबतच तो आपल्याला त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल सत्यही शिकवतो. (योहा. ८:३१, ३२) त्याने आपल्याला ख्रिस्ती मंडळीसुद्धा दिली आहे जिथे आपल्याला मार्गदर्शन आणि साहाय्य मिळतं. तो आज आपल्याला समस्येत धीर धरण्यासाठी मदत करतो आणि भविष्यात एका परिपूर्ण स्थितीत सर्वकाळ जगण्याची आशाही देतो. (स्तो. ६८:१९; प्रकटी. २१:३, ४) यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी त्याने जे काही केलं आहे, त्यावर आपण जेव्हा मनन करतो तेव्हा आपण त्याच्या आणखी जवळ येतो. यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण योग्य प्रकारची भीती बाळगण्यासाठी शिकतो आणि त्याला आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट आपण करत नाही.

१५. मकेला तिच्या भीतीवर कशा प्रकारे मात करू शकली?

१५ आधी उल्लेख करण्यात आलेल्या मकेला हिला जेव्हा कळलं की यहोवा खूप क्षमाशील आहे, तेव्हा तिला अपयशाच्या भीतीवर मात करता आली. ती म्हणते: “आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि आपल्या हातून चुका होतात याची मला जाणीव झाली. पण मला हेसुद्धा कळलं, की यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्याच्या पुत्राच्या खंडणीच्या आधारावर तो आपल्या पापांची क्षमा करतो.” यहोवावर असलेल्या प्रेमामुळे मकेला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेऊ शकली.

(परिच्छेद १६ पाहा) *

१६. विरोध होईल या भीतीवर मात करायला मायल्झला कशामुळे मदत झाली?

१६ मायल्झला भीती होती की त्याने बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला तर त्याची आई त्याचा विरोध करेल. अशा परिस्थितीत त्याने विभागीय पर्यवेक्षकांची मदत घेतली. मायल्झ म्हणतो: “विभागीय पर्यवेक्षकांची आईसुद्धा सत्यात नव्हती. तेही माझ्यासारख्याच परिस्थितीत लहानाचे मोठे झाले होते. बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय माझा आहे आणि बाबा मला तसं करण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत, हे मी माझ्या आईला कसं समजावून सांगू शकतो याबद्दल त्यांनी माझ्याशी चर्चा केली.” मायल्झ आपल्या आईशी बोलला पण तिला त्याचा निर्णय आवडला नाही. मग मायल्झला घर सोडावं लागलं. पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. तो म्हणतो: “यहोवाने माझ्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल मी शिकलो आणि त्या माझ्या मनाला भिडल्या. येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाबद्दल मी जेव्हा खोलवर विचार केला तेव्हा मला जाणीव झाली की यहोवाचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. या गोष्टीमुळे मला माझं जीवन यहोवाला समर्पित करण्याची आणि बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा मिळाली.”

तुमच्या निर्णयावर ठाम राहा

देवाने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल कदर असल्याचं आपण दाखवू शकतो (परिच्छेद १७ पाहा)

१७. आपल्या सर्वांकडे कोणती संधी आहे?

१७ हव्वाने एदेन बागेतल्या त्या झाडाचं फळ खाल्लं तेव्हा आपल्या पित्याला नाकारल्याचं तिने दाखवून दिलं. त्यानंतर आदामने तिला साथ दिली आणि त्यानेही दाखवून दिलं की यहोवाने त्याच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची त्याला बिलकुल कदर नाही. त्यांनी घेतलेला निर्णय किती चुकीचा होता हे दाखवण्याची संधी आपल्या सर्वांकडे आहे. आपण बाप्तिस्मा घेण्याद्वारे हे दाखवून देतो की आपल्यासाठी बऱ्‍यावाइटाचे स्तर ठरवण्याचा अधिकार फक्‍त यहोवाला आहे. आणि असं केल्यामुळे आपल्या पित्यावर आपलं प्रेम आणि विश्‍वास असल्याचं आपण सिद्ध करत असतो.

१८. यहोवाच्या सेवेत तुम्ही यशस्वी कसं होऊ शकता?

१८ बाप्तिस्म्यानंतर आपल्या सर्वांना प्रत्येक दिवशी स्वतःच्या नाही तर यहोवाच्या स्तरांनुसार जगणं गरजेचं असतं आणि हे आपल्याला आव्हानात्मक वाटू शकतं. पण असं करणं शक्य आहे कारण आज लाखो लोक यहोवाच्या स्तरांनुसार जगत आहेत. म्हणून मग देवाच्या वचनाची खोलवर समज मिळवत राहा; आपल्या बंधुभगिनींसोबत नियमितपणे संगती करत राहा आणि आपल्या प्रेमळ पित्याबद्दल शिकलेल्या गोष्टी इतरांना आवेशाने सांगत राहा. या गोष्टी केल्यामुळे तुम्हीही यहोवाच्या स्तरांनुसार जगत असलेल्या लाखो लोकांपैकी एक व्हाल. (इब्री १०:२४, २५) कोणताही निर्णय घेताना यहोवा आपल्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे देत असलेलं निर्देशन ऐका. (यश. ३०:२१) मग तुम्ही जे काही कराल त्यात नक्की यशस्वी व्हाल.​—नीति. १६:३, २०.

१९. तुम्ही कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि का?

१९ यहोवाच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला नेहमी फायदा होतो हे समजल्यावर, तुमचं त्याच्याबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल असलेलं प्रेम आणखी वाढत जाईल. यहोवाची सेवा थांबवण्यासाठी सैतान दाखवत असलेल्या कोणत्याही आमिषाला आपण बळी पडणार नाही. जरा कल्पना करा, हजारो वर्षं ओसरली आहेत आणि तुम्ही नवीन जगात आहात. तुम्ही आपल्या बाप्तिस्म्याचा दिवस आठवता आणि त्या वेळी तुम्हाला पक्की खात्री पटते की बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय हा तुमच्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय होता!

गीत २७ यहोवाला इमानी राहा!

^ परि. 5 बाप्तिस्मा घ्यायचा की नाही हा तुमच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय असेल. पण हा निर्णय इतका महत्त्वाचा का आहे? या प्रश्‍नाचं उत्तर या लेखात देण्यात आलं आहे. तसंच, बाप्तिस्मा घ्यायचा विचार करणाऱ्‍यांसमोर कदाचित अनेक आव्हानं असतील आणि ते बाप्तिस्मा घ्यायला कचरत असतील. या लेखामुळे त्यांना या आव्हानांवर मात करण्यासाठीही मदत होईल.

^ परि. 56 चित्राचं वर्णन: आत्मविश्‍वास: एक तरुण उत्तरं द्यायला कचरतो.

^ परि. 58 चित्राचं वर्णन: मैत्री: एका तरुण साक्षीदार मुलीची मैत्री चांगल्या व्यक्‍तीसोबत नसते आणि इतर साक्षीदारांना पाहिल्यावर तिला लाज वाटते.

^ परि. 60 चित्राचं वर्णन: अपयश: आपला भाऊ बहिष्कृत झाल्याचं आणि घर सोडून जात असल्याचं एक मुलगी पाहते तेव्हा तीसुद्धा अपयशी होईल अशी तिला भीती वाटते.

^ परि. 62 चित्राचं वर्णन: विरोध: एक मुलगा सत्यात नसलेल्या आपल्या आईसमोर प्रार्थना करण्यासाठी घाबरत आहे.

^ परि. 65 चित्राचं वर्णन: आत्मविश्‍वास: एक तरुण आणखी चांगल्या प्रकारे वैयक्‍तिक अभ्यास करतो.

^ परि. 67 चित्राचं वर्णन: मैत्री: साक्षीदार असण्याचा अभिमान बाळगण्यास एका तरुण साक्षीदार शिकते.

^ परि. 69 चित्राचं वर्णन: अपयश: एक तरुण मुलगी सत्याबद्दल ठाम भूमिका घेते आणि बाप्तिस्मा घेते.

^ परि. 71 चित्राचं वर्णन: विरोध: एक मुलगा सत्यात नसलेल्या आपल्या आईला धैर्याने आपल्या विश्‍वासांबद्दल सांगतो.