व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ११

यहोवाचा आवाज ऐका

यहोवाचा आवाज ऐका

“हा माझा परमप्रिय पुत्र आहे . . . याचं ऐका.”​—मत्त. १७:५.

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

सारांश *

१-२. (क) यहोवाने मानवांशी बोलण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांचा उपयोग केला आहे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

यहोवाला आपल्या सेवकांशी बोलायला आवडतं. प्राचीन काळात यहोवाने संदेष्ट्यांचा, देवदूतांचा आणि त्याचा पुत्र ख्रिस्त येशू याचा उपयोग करून लोकांना आपले विचार कळवले. (आमो. ३:७; गलती. ३:१९; प्रकटी. १:१) आज तो आपल्याशी त्याच्या वचनाद्वारे संवाद साधतो. आपल्याला यहोवाचे विचार कळावेत आणि त्याची कार्य करण्याची पद्धत समजावी म्हणून त्याने आपल्याला बायबल दिलं आहे.

येशू पृथ्वीवर असताना तीन वेळा स्वर्गातून यहोवाचा आवाज ऐकू आला. या तिन्ही वेळा यहोवाने जे म्हटलं त्याचं आता आपण परीक्षण करू या. तसंच, त्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो आणि ते शब्द आपल्यासाठी फायद्याचे कसे आहेत हेदेखील आपण पाहू या.

“तू माझा परमप्रिय पुत्र आहेस”

३. मार्क १:९-११ या वचनांनुसार येशूचा बाप्तिस्मा होत असताना यहोवाने काय म्हटलं, आणि या शब्दांमुळे कोणत्या गोष्टी स्पष्ट झाल्या?

मार्क १:९-११ या वचनांमध्ये आपल्याला त्या पहिल्या प्रसंगाबद्दल वाचायला मिळतं जिथे यहोवाचा आवाज ऐकू आला. (वाचा.) यहोवाने म्हटलं: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” आपल्या पित्याचा आवाज ऐकून आणि त्याच्या शब्दांमधून आपल्याप्रती त्याचं प्रेम आणि भरवसा यांबद्दल ऐकून येशूला किती उभारणी मिळाली असेल याची कल्पना करा! यहोवाच्या शब्दांमुळे येशूबद्दल तीन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली, येशू यहोवाचा पुत्र आहे. दुसरी, यहोवाचं येशूवर खूप प्रेम आहे. आणि तिसरी, यहोवाने येशूबद्दल आपली पसंती दर्शवली आहे. या प्रत्येक मुद्द्‌यावर आपण आता चर्चा करू या.

४. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी ‘तू माझा पुत्र आहेस’ असं यहोवाने का म्हटलं?

“तू माझा . . . पुत्र आहेस.” यहोवाने असं का म्हटलं? स्वर्गात असताना येशू देवाचा आत्मिक पुत्र होता. पण बाप्तिस्म्यानंतर तो पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त झाला. यहोवाने आपल्या शब्दांद्वारे दाखवून दिलं की येशू त्याचा अभिषिक्‍त पुत्र आहे आणि आता त्याला स्वर्गात जाण्याची आशा आहे. तिथे जाऊन तो देवाचा नियुक्‍त राजा आणि महायाजक बनणार होता. (लूक १:३१-३३; इब्री १:८, ९; २:१७) यामुळेच येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर यहोवाने म्हटलं: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस”​—लूक ३:२२.

प्रशंसा आणि प्रोत्साहन मिळाल्यावर आपल्याला प्रगती करायला मदत होते (परिच्छेद ५ पाहा) *

५. प्रेम आणि पसंती दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?

तू “परमप्रिय” आहेस. आपल्या शब्दांतून प्रेम आणि पसंती दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवाकडून शिकू शकतो. आपणदेखील इतरांना प्रोत्साहन देण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत. (योहा. ५:२०) आपली काळजी करणारी व्यक्‍ती जेव्हा आपल्याला प्रेम दाखवते आणि आपल्या चांगल्या कार्यांबद्दल प्रशंसा करते तेव्हा आपल्याला खूप उत्तेजन मिळतं. याच प्रकारे, आपल्या मंडळीतील बंधुभगिनींना आणि कुटुंबातील सदस्यांना आपल्या प्रेमाची आणि प्रोत्साहनाची गरज आहे. इतरांना प्रोत्साहन देण्याद्वारे आपण त्यांचा विश्‍वास मजबूत करतो आणि यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करत राहण्यासाठी त्यांना मदत करतो. खासकरून पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देत राहण्याची गरज आहे. पालक जेव्हा आपल्या मुलांची मनापासून प्रशंसा करतात आणि त्यांना प्रेम दाखवतात, तेव्हा मुलांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी मदत मिळते.

६. आपण येशू ख्रिस्तावर भरवसा का ठेवू शकतो?

“तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” या शब्दांवरून आपल्याला कळतं की येशू शेवटपर्यंत विश्‍वासूपणे आपली इच्छा पूर्ण करेल या गोष्टीवर यहोवाला पूर्ण भरवसा होता. जर यहोवाला त्याच्यावर इतका भरवसा होता, तर मग आपल्यालाही त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवण्याची गरज आहे, की तो यहोवाने दिलेली सर्व अभिवचनं पूर्ण करेल. (२ करिंथ. १:२०) येशूच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे, त्याच्याबद्दल आणखी शिकण्यासाठी आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. यहोवाला जसा येशूवर पूर्ण भरवसा होता, तसाच भरवसा त्याला आपल्यावरही आहे. एक गट म्हणून त्याचे सेवक नेहमी येशूपासून शिकत राहतील याची यहोवाला खात्री आहे.​—१ पेत्र २:२१.

“याचं ऐका”

७. मत्तय १७:१-५ या वचनांनुसार कोणत्या प्रसंगी यहोवाचा आवाज ऐकू आला आणि त्याने काय म्हटलं?

मत्तय १७:१-५ वाचा. येशूचं “रूपांतर” झालं तेव्हा दुसऱ्‍यांदा यहोवाचा आवाज ऐकू आला. उंच डोंगरावर जाण्यासाठी येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत घेतलं होतं. तिथे पोचल्यावर त्यांनी एक रोमांचक दृष्टान्त पाहिला. येशूचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी झाले. तिथे त्यांना दोन आकृत्या दिसल्या ज्या मोशे आणि एलीया यांना सूचित करत होत्या. ते दोघं येशूसोबत त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांबद्दल बोलत होते. येशूच्या तिन्ही शिष्यांचे डोळे “झोपेने जड झाले होते,” पण हा रोमांचक दृष्टांत पाहताना ते पूर्णपणे जागे होते. (लूक ९:२९-३२) यानंतर एका तेजस्वी ढगाने त्यांना झाकून टाकलं आणि त्या ढगातून त्यांना यहोवाचा आवाज ऐकू आला! यहोवाने येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी जसं केलं होतं, तसंच या वेळीही त्याने आपल्या पुत्राबद्दल प्रेम आणि पसंती शब्दांतून दर्शवली. त्याने म्हटलं: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” पण या प्रसंगी यहोवाने पुढे असंही म्हटलं: “याचं ऐका.”

८. रूपांतराच्या दृष्टान्ताचा येशूवर आणि शिष्यांवर कसा परिणाम झाला?

देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशूचं वैभव कसं असेल आणि त्याच्याजवळ किती शक्‍ती असेल याची एक झलक या दृष्टान्तातून मिळाली. या दृष्टान्तामुळे येशूला पुढे येणाऱ्‍या छळाचा आणि वेदनादायक मृत्यूचा सामना करण्यासाठी नक्कीच ताकद मिळाली असेल. या दृष्टान्तामुळे शिष्यांचा विश्‍वासदेखील खूप वाढला. यामुळे त्यांना पुढे येणाऱ्‍या एकनिष्ठेच्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी बळ मिळालं. तसंच, त्यांना पुढे जाऊन बरीच वर्षं सेवेत जी मेहनत घ्यायची होती त्यासाठीही त्यांना ताकद मिळाली. या घटनेच्या जवळपास ३० वर्षांनंतर पेत्रने आपल्या पत्रात त्याचा उल्लेख केला. यावरून दिसून येतं की तो दृष्टान्त त्याला अजूनही लक्षात होता.​—२ पेत्र १:१६-१८.

९. येशूने आपल्या शिष्यांना कोणते व्यावहारिक सल्ले दिले?

“याचं ऐका.” या शब्दांद्वारे यहोवाने स्पष्टपणे दाखवलं की आपण येशूचं ऐकावं आणि त्याची आज्ञा पाळावी अशी त्याची इच्छा आहे. पृथ्वीवर असताना येशूने काय-काय शिकवलं? त्याने बऱ्‍याच महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. उदाहरणार्थ, त्याने आपल्या शिष्यांना आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला शिकवलं आणि वारंवार त्यांना जागृत राहण्याची ताकीद दिली. (मत्त. २४:४२; २८:१९, २०) तसंच, त्याने त्यांना सेवेत खूप मेहनत घेण्यासाठी आर्जवलं आणि कधीही हार न मानण्यासाठीही सांगितलं. (लूक १३:२४) त्याच्या शिष्यांनी नेहमी एकमेकांवर प्रेम करावं, एकतेत राहावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात या गोष्टींवर त्याने जोर दिला. (योहा. १५:१०, १२, १३) येशूने आपल्या शिष्यांना जे सल्ले दिले ते खूप व्यावहारिक होते. त्या काळासारखंच आजही ते सल्ले आपल्यासाठी तितकेच फायद्याचे आहेत.

१०-११. आपण येशूचं ऐकत आहोत हे कसं दाखवू शकतो?

१० येशूने म्हटलं: “जो कोणी सत्याच्या बाजूने आहे, तो माझं ऐकतो.” (योहा. १८:३७) “एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा” या सल्ल्याचं आपण पालन करतो, तेव्हा आपण येशूचं ऐकत आहोत हे दाखवत असतो. (कलस्सै. ३:१३; लूक १७:३, ४) यासोबतच “चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांत” आवेशाने प्रचार करूनही आपण दाखवतो की आपण येशूचं ऐकत आहोत.​—२ तीम. ४:२.

११ येशूने म्हटलं: “माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात.” (योहा. १०:२७) पण येशूचे शब्द फक्‍त ऐकणंच पुरेसं नाही, तर त्यानुसार कार्य करणंही गरजेचं आहे. असं करण्याद्वारे आपण दाखवतो की आपण येशूचं ऐकत आहोत. “जीवनाच्या चिंता” यांमुळे आपण आपलं लक्ष सेवेपासून विचलित होऊ देत नाही. (लूक २१:३४) याउलट आपण येशूच्या आज्ञा पाळण्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान देतो, मग असं करणं कठीण असलं तरीही. आपल्या बऱ्‍याच बंधुभगिनींना मोठमोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, जसं की विरोधकांच्या छळाचा, तीव्र स्वरूपाच्या गरिबीचा आणि नैसर्गिक विपत्तींचा. पण या सर्व प्रसंगांतून जात असताना ते यहोवाला विश्‍वासू राहतात. त्यांचं कितीही नुकसान झालं तरी ते यहोवाला कधीच सोडत नाहीत. अशा सर्व लोकांना येशू पुढील आश्‍वासन देतो: “जो कोणी माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यावर माझा पिता प्रेम करेल आणि मीही प्रेम करेन.”​—योहा. १४:२१.

सेवाकार्यामुळे आपलं लक्ष विचलित होत नाही (परिच्छेद १२ पाहा) *

१२. आपण येशूचं ऐकत आहोत हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग कोणता आहे?

१२ आपण येशूचं ऐकत आहोत हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे, पुढाकार घेण्यासाठी नेमलेल्या लोकांचं ऐकणं. (इब्री १३:७, १७) मागील काही वर्षांत यहोवाच्या संघटनेने बरेच बदल केले आहेत. यात सेवेत वापरण्यासाठी नवनवीन पद्धती व साधनं, आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेचं स्वरूप आणि राज्य सभागृहांचं निर्माण व नवीनीकरण यांबद्दल मार्गदर्शन, यांसारख्या गोष्टी सामील आहेत. संघटना आपल्या गरजा ओळखून खूप विचारपूर्वक आणि प्रेमळपणे आपल्याला मार्गदर्शन देते त्यासाठी आपण किती कृतज्ञ आहोत! आपण खात्री बाळगू शकतो की संघटनेकडून योग्य वेळी मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचं पालन करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यावर यहोवा नक्की आशीर्वाद देईल.

१३. येशूचं ऐकण्याचे कोणते फायदे आहेत?

१३ येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टीचं पालन केल्यामुळे आपल्याला फायदा होतो. येशूने शिष्यांना अभिवचन दिलं की त्याच्या शिकवणींमुळे त्यांना तजेला मिळेल. त्याने म्हटलं: “तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल. कारण माझं जू वाहायला सोपं व माझं ओझं हलकं आहे.” (मत्त. ११:२८-३०) देवाच्या वचनामुळे आपल्याला तजेला मिळतो. यात येशूचं जीवन आणि सेवा यांबद्दलची शुभवर्तमानाची पुस्तकंदेखील सामील आहेत. तसंच, आपण आध्यात्मिक रीत्या बळकट आणि सुज्ञ बनतो. (स्तो. १९:७; २३:३) येशूने म्हटलं होतं: “जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”​—लूक ११:२८.

मी माझ्या नावाचा गौरव करेन

१४-१५. (क) योहान १२:२७, २८ या वचनांमध्ये कोणत्या घटनेबद्दल सांगितलं आहे? (ख) यहोवाच्या शब्दांमुळे येशूला सांत्वन आणि बळ कसं मिळालं असेल?

१४ योहान १२:२७, २८ वाचा. योहानच्या पुस्तकात आपल्याला त्या तिसऱ्‍या प्रसंगाबद्दल वाचायला मिळतं जिथे यहोवाचा आवाज ऐकू आला. आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी येशू वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेम शहरात होता. त्याने म्हटलं “मी फार खिन्‍न झालो आहे.” यानंतर त्याने प्रार्थनेत म्हटलं: “बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” या प्रार्थनेचं उत्तर देत स्वर्गातून यहोवाचा आवाज ऐकू आला: “मी त्याचा गौरव केला आहे आणि पुन्हा करेन.”

१५ यहोवाला एकनिष्ठ राहण्याची खूप मोठी जबाबदारी येशूवर होती, त्यामुळे तो खूप चिंतित होता. त्याला माहीत होतं की लवकरच त्याला निर्दयीपणे चाबकाचे फटके मारण्यात येतील आणि निष्ठुरपणे मृत्युदंड दिला जाईल. (मत्त. २६:३८) अशा परिस्थितीतही आपल्या पित्याच्या नावाला गौरव देणं ही गोष्ट येशूसाठी सर्वात महत्त्वाची होती. येशूवर देवाची निंदा करण्याचा आरोप लावण्यात आला आणि त्याच्या मृत्यूमुळे देवाच्या नावावर कलंक लागेल अशी काळजी त्याला वाटत होती. पण यहोवाचे शब्द ऐकून येशूला किती दिलासा मिळाला असेल. त्याला पूर्ण खात्री मिळाली असेल की यहोवाच्या नावाला नक्की गौरव मिळेल! आपल्या पित्याच्या शब्दांमुळे येशूला सांत्वन मिळालं असेल आणि पुढे येणाऱ्‍या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी बळ मिळालं असेल. यहोवाचा आवाज ऐकू आला तेव्हा कदाचित येशू तिथे एकटाच होता आणि त्यालाच त्या शब्दांचा खरा अर्थ समजला असेल. पण यहोवाने मात्र बायबलमध्ये आपल्या सर्वांसाठी त्या शब्दांची नोंद केली आहे.​—योहा. १२:२९, ३०.

यहोवा आपल्या नावाचा गौरव करेल आणि आपल्या लोकांना वाचवेल (परिच्छेद १६ पाहा) *

१६. देवाच्या नावावर लागलेल्या कलंकाबद्दल आपल्याला काळजी का वाटू शकते?

१६ येशूसारखंच आपल्यालाही कदाचित यहोवाच्या नावावर लागलेल्या कलंकाबद्दल काळजी वाटत असेल. कदाचित येशूसारखंच आपल्यासोबतही अन्याय झाला असेल. किंवा आपले विरोधक आपल्याबद्दल ज्या अफवा पसरवतात त्या ऐकून आपल्याला वाईट वाटत असेल. या अफवांमुळे यहोवाच्या नावावर आणि त्याच्या संघटनेवर जो कलंक लागला आहे त्याबद्दल आपण कदाचित खूप जास्त विचार करू लागू. असं असेल, तर यहोवाच्या शब्दांमुळे आपल्याला खूप सांत्वन मिळू शकतं. अशा गोष्टींबद्दल आपण खूप जास्त चिंता करण्याची गरज नाही. आपण खात्री बाळगू शकतो की “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे [आपल्या] मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.” (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवा नेहमी आपल्या नावाचा गौरव करेल. सैतान आणि त्याच्या जगामुळे यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना आज जे काही सहन करावं लागत आहे, त्या सर्व गोष्टी देवाचं राज्य कायमचं काढून टाकेल.​—स्तो. ९४:२२, २३; यश. ६५:१७.

यहोवाचं ऐकून आज फायदा मिळवा

१७. यशया ३०:२१ या वचनानुसार यहोवा आज आपल्यासोबत कशा प्रकारे बोलतो?

१७ यहोवा आजही आपल्या लोकांशी बोलतो. (यशया ३०:२१ वाचा.) अर्थात आज आपल्याला स्वर्गातून त्याचा आवाज ऐकू येत नाही. पण त्याने आपल्याला त्याचं वचन, बायबल दिलं आहे. त्याद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन देतो. यासोबतच आपल्या सर्वांना आध्यात्मिक अन्‍न देत राहण्यासाठी यहोवाचा पवित्र आत्मा “विश्‍वासू आणि बुद्धिमान कारभारी”ला प्रेरीत करतो. (लूक १२:४२) आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आज आपल्याला छापील स्वरूपात आणि वेबसाईटवर भरपूर माहिती मिळते. तसंच, आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात ऑडिओ आणि व्हिडिओ प्रकाशनंही आहेत ज्यांद्वारे यहोवा आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो.

१८. यहोवाच्या शब्दांमुळे तुमचा विश्‍वास कसा वाढला आहे? त्या शब्दांमुळे तुम्हाला धैर्य कसं मिळालं आहे?

१८ येशू पृथ्वीवर असताना यहोवा जे काही बोलला ते शब्द आपण नेहमी आपल्या मनात ठेवले पाहिजेत. बायबलमध्ये असलेले यहोवाचे शब्द आपल्याला नेहमी भरवसा देत राहतील की संपूर्ण परिस्थिती त्याच्या नियंत्रणात आहे. आणि सैतान व त्याचं जग यांमुळे आपलं जे काही नुकसान झालं आहे, ते सर्व यहोवा लवकरच भरून काढेल. म्हणून आपण यहोवाचा आवाज ऐकण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. आपण असं केलं, तर आज आणि भविष्यात येणाऱ्‍या कठीण प्रसंगांचा आपण यशस्वी रीत्या सामना करू शकू. बायबल आपल्याला सांगतं: “देवाची इच्छा पूर्ण केल्यावर, त्याने दिलेल्या अभिवचनाचे प्रतिफळ तुम्हाला मिळावे, म्हणून तुम्हाला धीराची गरज आहे.”​—इब्री १०:३६.

गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”

^ परि. 5 येशू पृथ्वीवर असताना तीन वेळा स्वर्गातून यहोवाचा आवाज ऐकू आला. यांपैकी एका प्रसंगी यहोवाने ख्रिस्ताच्या शिष्यांना आर्जवलं की त्यांनी येशूचं ऐकावं. आज यहोवा आपल्याशी बायबलच्या माध्यमातून बोलतो आणि यात येशूच्या शिकवणीही सामील आहेत. तसंच, यहोवा आपल्याशी त्याच्या संघटनेमार्फतही बोलतो. यहोवा आणि येशू यांचं ऐकल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपण या लेखात पाहू या.

^ परि. 52 चित्रांचं वर्णन: मंडळीतील वडील एका सहायक सेवकाला राज्य सभागृहाची साफसफाई करताना आणि साहित्य विभागात मदत करताना पाहतात. ते त्याची मनापासून प्रशंसा करतात.

^ परि. 54 चित्राचं वर्णन: सिएरा लियोन या देशात एक ख्रिस्ती जोडपं मासेमारी करणाऱ्‍या एका व्यक्‍तीला सभेची आमंत्रणपत्रिका देतात.

^ परि. 56 चित्राचं वर्णन: आपल्या कामावर काही प्रमाणात प्रतिबंद असलेल्या देशात, एका घरात बांधव सभा चालवत आहेत. लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून त्यांनी साधे कपडे घातले आहेत.