व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही म्हटलेलं “आमेन” यहोवासाठी मौल्यवान आहे

तुम्ही म्हटलेलं “आमेन” यहोवासाठी मौल्यवान आहे

यहोवा आपल्या उपासनेची कदर करतो. तो आपल्या सेवकांचं “कान देऊन” ऐकतो. त्याच्या स्तुतीसाठी आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची तो कदर करतो. मग त्या गोष्टी अगदी लहान असल्या तरीही. (मला. ३:१६) उदाहरणार्थ, एका शब्दाबद्दल विचार करा जो आपण अनेकवेळा म्हटला असेल. तो शब्द म्हणजे “आमेन”. आपण व्यक्‍त केलेल्या या साध्या शब्दाची यहोवा कदर करतो का? हो, तो खरंच करतो! हे समजण्यासाठी आपण पाहू या की या शब्दाचा काय अर्थ होतो आणि बायबलमध्ये त्याचा वापर कशा प्रकारे करण्यात आला आहे.

“सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे”

इंग्रजी भाषेत “आमेन” या शब्दाचा अर्थ “असंच होवो” किंवा “नक्कीच घडो” असा होतो. हा शब्द मूळ इब्री शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ “विश्‍वासू असणं” व “भरवशालायक असणं” असा होतो. कायदेशीर प्रकरणं हाताळली जायची तेव्हा कधीकधी या शब्दाचा वापर केला जायचा. शपथ घेतल्यानंतर एक व्यक्‍ती “आमेन” म्हणायची. असं म्हणून ती खात्री करून द्यायची की तिने म्हटलेल्या गोष्टी खऱ्‍या आहेत आणि त्या गोष्टींचा परिणाम भोगण्यास ती तयार आहे. (गण. ५:२२) जेव्हा ती व्यक्‍ती सर्वांसमोर “आमेन” म्हणायची तेव्हा दिलेलं वचन ती पूर्ण करेल याची लोकांना हमी मिळायची.​—नहे. ५:१३.

“आमेन” हा शब्द वापरण्याच्या बाबतीत अनुवाद पुस्तकातल्या २७ अध्यायात एक लक्षवेधक उदाहरण आहे. इस्राएलांनी वचनयुक्‍त देशात प्रवेश केल्यानंतर ते एबाल आणि गरिज्जीम या डोंगरामध्ये यहोवाचा नियम ऐकण्यासाठी एकत्रित झाले. त्यांना तिथे फक्‍त नियम ऐकायचे नव्हते पण नियमांचं पालन करण्यासाठी जाहीरपणे होकार द्यायचा होता. नियमांचं पालन न केल्याने काय परिणाम होतील हे ऐकल्यावर त्यांनी “आमेन” म्हणून होकार दिला. (अनु. २७:१५-२६) जरा विचार करा, हजारो पुरुष, स्त्रिया आणि मुलं या सर्वांनी मिळून किती मोठ्या आवाजात “आमेन” म्हटलं असेल! (यहो. ८:३०-३५) त्या दिवशी त्यांनी दिलेला शब्द ते कधीच विसरले नसतील. त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि याबद्दल अहवाल असा सांगतो: “यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्‍वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्‍वराची सेवा केली.”​—यहो. २४:३१.

सांगितलेली गोष्ट खरी आहे हे दाखवण्यासाठीही येशूने “आमेन” या शब्दाचा वापर केला. पण त्याने एका विशेष पद्धतीने या शब्दाचा वापर केला. एखादी व्यक्‍ती विधान मांडल्यानंतर  “आमेन” म्हणायची, पण येशूने विधान सांगण्याआधी  “आमेन” म्हटलं. असं करून पुढे सांगितलेली गोष्ट खरी आहे यावर येशूने जोर दिला. काही वेळा त्याने “आमेन, आमेन” असा दोनदा उल्लेख केला. (मत्त. ५:१८; योहा. १:५१) अशा प्रकारे त्याने ऐकणाऱ्‍यांना खात्री करून दिली की सांगितलेली गोष्ट पूर्णपणे खरी आहे. येशू या गोष्टी निश्‍चितपणे यासाठी बोलू शकला कारण देवाची अभिवचने खरी ठरवण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता.​—२ करिंथ. १:२०; प्रकटी. ३:१४.

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्‍वराचे स्तवन केले”

इस्राएलीसुद्धा यहोवाची स्तुती आणि प्रार्थना करताना “आमेन” म्हणायचे. (नहे. ८:६; स्तो. ४१:१३) प्रार्थना झाल्यानंतर ऐकणारे सर्व जण “आमेन” म्हणून प्रार्थनेत सांगितलेल्या गोष्टींशी सहमत असल्याचं दाखवायचे. अशा प्रकारे तिथे उपस्थित असलेले सर्व जण यहोवाची उपासना आनंदाने करायचे. जेव्हा दावीद राजाने यहोवाचा कोश परत यरुशलेमेत आणला तेव्हा अशाच प्रकारे उपासना केली गेली. त्याच्यानंतर उत्सव साजरा केला गेला आणि त्या उत्सवात दावीदने मनःपूर्वक प्रार्थना केली. त्याने त्याची प्रार्थना गीताच्या रूपात केली आणि याचा उल्लेख १ इतिहास १६:८-३६ या वचनांत आढळतो. तिथे असलेले सर्व जण त्या गीतामुळे इतके प्रेरित झाले की “सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्‍वराचे स्तवन केले.” खरंच, एकत्र येऊन यहोवाची उपासना केल्याने त्या दिवशी त्यांना खूप आनंद झाला.

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनीसुद्धा यहोवाची स्तुती करण्यासाठी “आमेन” या शब्दाचा उल्लेख केला. बायबल लेखकांनीसुद्धा बऱ्‍याचदा आपल्या पत्रांत या शब्दाचा उल्लेख केला. (रोम. १:२५; १६:२७; १ पेत्र ४:११) प्रकटीकरण या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे, स्वर्गातील आत्मिक प्राणी यहोवाची स्तुती करताना “आमेन”! याहाची स्तुती करा!” असं म्हणतात. (प्रकटी. १९:१, ४) पहिल्या शतकातील ख्रिस्ती सहसा सभांमध्ये प्रार्थना झाल्यानंतर “आमेन” म्हणायचे. (१ करिंथ. १४:१६) पण हा शब्द ते कारण नसताना किंवा व्यर्थपणे वापरत नव्हते.

आपण “आमेन” म्हणणं का महत्त्वाचं आहे?

यहोवाच्या सेवकांनी कशा प्रकारे “आमेन” या शब्दाचा वापर केला हे आपण पाहिलं. त्यामुळे प्रार्थनेनंतर “आमेन” म्हणणं का महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजलं. आपण वैयक्‍तिक प्रार्थनेच्या शेवटी “आमेन” म्हणतो तेव्हा प्रार्थनेत उल्लेख केलेल्या गोष्टींशी आपण सहमत आहोत हे आपण दाखवून देत असतो. तसंच, जाहीर रीत्या केल्या जाणाऱ्‍या प्रार्थनेनंतर आपण जरी मनात “आमेन” म्हटलं तरी आपण त्या प्रार्थनेशी सहमत असल्याचं दाखवून देतो. “आमेन” म्हणणं का महत्त्वाचं आहे याची आता आपण आणखी काही कारणं पाहूयात.

आपण प्रार्थनेदरम्यान नेहमी सतर्क राहतो. प्रार्थनेत आपण ज्या गोष्टी बोलतो त्याद्वारे आपण यहोवाची उपासना तर करतोच पण त्यासोबतच आपण त्यानुसार वागतोही. आपलं “आमेन” मनापासून असेल तर प्रार्थनेच्या बाबतीत आपल्याला योग्य मनोवृत्ती ठेवण्यासाठी आणि आपलं लक्ष त्यावर केंद्रित करण्यासाठी मदत होईल.

उपासक या नात्याने आपल्यात ऐक्य आहे. मंडळीतले सर्वच बंधूभगिनी जाहीर रीत्या केली जाणारी प्रार्थना ऐकतात. (प्रे. कार्ये १:१४; १२:५) सर्व मंडळी एकत्र मिळून “आमेन” म्हणते तेव्हा आपल्यामधली एकता आणखी वाढते. आपण जरी मनातल्या मनात किंवा मोठ्याने “आमेन” म्हणतो तेव्हा यहोवा प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी आणखी प्रेरित होतो.

“आमेन” म्हटल्यामुळे यहोवाची स्तुती होते

आपण यहोवाचा गौरव करतो. आपण यहोवाच्या उपासनेसाठी करत असलेल्या अगदी लहानसहान गोष्टींकडेही तो लक्ष देतो. (लूक २१:२, ३) आपले हेतू आणि आपले विचार यहोवा जाणतो. आपण फोनद्वारे जरी सभा ऐकत असलो तरी आपण मनापासून बोललेलं “आमेन” याकडे यहोवाचं लक्ष असतं. आपण “आमेन” म्हणतो तेव्हा आपण आपल्या सहउपासकांसोबत मिळून यहोवाचा गौरव करतो.

“आमेन” हा शब्द कमी महत्त्वाचा वाटत असला तरी त्याचं काही मोल नाही असा याचा मुळीच अर्थ होत नाही. एका बायबल विश्‍वकोशानुसार या “एका शब्दाचा वापर केल्याने देवाचे सेवक आपला भरवसा, सहमती आणि आशा व्यक्‍त करतात.” तेव्हा आपण म्हटलेलं “आमेन” नेहमी यहोवाच्या नजरेत मौल्यवान ठरो!​—स्तो. १९:१४.