व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २०

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांचं सांत्वन करणं

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांचं सांत्वन करणं

“सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव . . . आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो.”—२ करिंथ. १:३, ४.

गीत ४१ तारुण्यात यहोवाची सेवा करा

सारांश *

१-२. (क) मानवांना सांत्वनाची गरज असते आणि ते इतरांचं सांत्वन करू शकतात हे कोणत्या उदाहरणावरून समजतं? (ख) काही मुलांना कोणत्या छळाचा सामना करावा लागतो?

मानवांमध्ये सांत्वन मिळवण्याची उपजत गरज असते. तसंच, त्यांच्यात इतरांचं सांत्वन करण्याची अद्‌भुत क्षमताही असते. एका उदाहरणाचा विचार करा. एक लहान मुलगा खेळता-खेळता पडतो आणि त्याला लागतं. तो रडत-रडत आपल्या आईजवळ जातो. त्याची आई ती जखम लगेच बरी तर करू शकत नाही, पण ती त्याचं सांत्वन नक्की करते. त्याला काय झालं हे ती विचारते, त्याचे अश्रू पुसते, त्याच्याशी प्रेमाने बोलते, त्याला जवळ घेते आणि कदाचित त्याच्या जखमेवर औषधही लावते. यामुळे काही वेळातच त्याचं रडणं थांबतं आणि तो पुन्हा खेळू लागतो. त्याची जखमही काही दिवसांत बरी होते.

पण कधीकधी मुलांच्या कोवळ्या मनावर खूप खोलवर जखम होते आणि बऱ्‍याच काळापर्यंत त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. काही मुलांचं लैंगिक शोषण केलं जातं. यांपैकी काहींचं एकदाच तर इतरांचं बऱ्‍याच वर्षांपर्यंत शोषण केलं जातं. पण दोन्ही बाबतीत या शोषणामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळा शोषण करणारा पकडला जातो आणि त्याला शिक्षा होते. पण काही वेळा तो पकडला जात नाही आणि त्याला त्याच्या दुष्कर्माची काहीच शिक्षा होत नाही. आणि जरी अशा व्यक्‍तीला शिक्षा झाली तरी त्या मुलाला बऱ्‍याच वर्षांपर्यंत, कदाचित मोठं झाल्यावरही त्या भावनिक छळाचा सामना करावा लागू शकतो.

३. २ करिंथकर १:३, ४ यांत सांगितल्यानुसार यहोवाची इच्छा काय आहे आणि आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

एखाद्या बांधवाचं किंवा बहिणीचं जर लहानपणी शोषण झालं असेल, आणि मोठं झाल्यावरही त्यांना त्याचा मानसिक त्रास होत असेल, तर त्यांच्यासाठी कोणती मदत उपलब्ध आहे? (२ करिंथकर १:३, ४ वाचा.) यहोवाची इच्छा आहे की त्याच्या मुलांना प्रेम आणि सांत्वन मिळावं. यामुळे आपण आता तीन प्रश्‍नांवर चर्चा करू या: (१) लहानपणी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना अजूनही सांत्वनाची गरज का आहे? (२) त्यांना सांत्वन कोण देऊ शकतं? (३) आपण त्यांना प्रभावीपणे सांत्वन कसं देऊ शकतो?

सांत्वनाची गरज का आहे?

४-५. (क) मुलांची जडणघडण ही प्रौढ लोकांपेक्षा वेगळी असते हे समजून घेणं गरजेचं का आहे? (ख) शोषणामुळे मुलं इतरांवर भरवसा ठेवायला का घाबरू शकतात?

लहानपणी लैंगिक छळाला बळी पडलेल्या काहींना मोठं झाल्यावरही सांत्वनाची गरज पडू शकते. असं का? यामागचं कारण समजून घेण्यासाठी आपण आधी हे लक्षात घ्यायला हवं की मुलांची जडणघडण ही प्रौढ लोकांपेक्षा खूप वेगळी असते. गैरवागणुकीचा मुलांवर जसा परिणाम होतो तसाच परिणाम प्रौढ लोकांवर होत नाही. हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणांवर विचार करा.

मुलांचं संगोपन करणाऱ्‍या लोकांसोबत त्यांचं जवळचं, विश्‍वासाचं नातं असतं. अशा नात्यामुळे मुलांना सुरक्षित वाटतं. तसंच, यामुळे मुलं इतरांवर भरवसा ठेवायला आणि त्यांच्यावर प्रेम करायलाही शिकतात. (स्तो. २२:९) पण दुःखाची गोष्ट म्हणजे बऱ्‍याच वेळा मुलांचं शोषण त्यांच्या घरातच होतं आणि ते करणारी जवळची व्यक्‍ती असते. सहसा असं पाहण्यात आलं आहे की जवळचे नातलग किंवा ओळखीचे लोक मुलांचं शोषण करतात. मुलांचा त्यांच्यावर भरवसा असतो, पण शोषणामुळे त्यांचा भरवसा तुटतो आणि म्हणून मग ती मुलं बऱ्‍याच वर्षांपर्यंत कोणावरही भरवसा ठेवायला घाबरतात.

६. शोषणाचा मुलांवर कसा परिणाम होऊ शकतो?

मुलं स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत. यामुळे त्यांचं लैंगिक शोषण हा खरंतर त्यांच्यावर झालेला मोठा अन्याय असतो आणि हे त्यांच्यासाठी धोक्याचं असतं. शारीरिक संबंधांबद्दल समजून घेण्याइतकी मुलांची वाढ झालेली नसते. शारीरिक, मानसिक आणि भावनिक रीत्या ते या गोष्टीसाठी मुळीच तयार नसतात. यामुळे शोषणाचा त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. शोषणामुळे शारीरिक संबंधाबद्दल त्यांच्या मनात चुकीच्या धारणा येऊ शकतात. यामुळे त्यांच्यात कमीपणाची भावना येऊ शकते आणि ते कोणावरही भरवसा ठेवायला घाबरू शकतात.

७. (क) मुलांना भुलवून त्यांचं शोषण करणं लोकांना सहज रीत्या शक्य का होतं आणि हे ते कसं करतात? (ख) खोटं सांगितल्यामुळे मुलांवर काय परिणाम होऊ शकतो?

लहान मुलांमध्ये विचार करण्याची, तर्क करण्याची किंवा धोके ओळखून ते टाळण्याची क्षमता नसते. (१ करिंथ. १३:११) यामुळे शोषण करणारे लोक अगदी सहज रीत्या मुलांना भुलवून त्यांचं शोषण करतात. हे लोक मुलांना बऱ्‍याच खोट्या गोष्टी सांगतात जसं की शोषणासाठी मुलं जबाबदार आहेत, जो प्रकार घडला तो गुपित ठेवणं गरजेचं आहे, मुलांनी इतरांना याबद्दल सांगितलं तर कोणीही त्यांचं ऐकणार किंवा भरवसा ठेवणार नाही. तसंच, हे लोक असंदेखील सांगतात की मोठ्यांनी लहान मुलांसोबत लैंगिक गोष्टी करणं हा खरंतर मुलांवर प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे. अशा खोट्या गोष्टी ऐकल्यामुळे मुलांना कदाचित खरं काय हे समजून घेण्यासाठी बरीच वर्षं लागू शकतात. मोठं होत असताना अशा मुलांना स्वतःची लाज वाटू शकते किंवा त्यांच्या मनात कमीपणाची भावना येऊ शकते. तसंच, आपण कोणाचंही प्रेम आणि सांत्वन मिळवण्याच्या लायकीचे नाहीत असंही त्यांना वाटू शकतं.

८. भावनिक छळाचा सामना कराणाऱ्‍या लोकांना यहोवा सांत्वन देऊ शकतो अशी खातरी आपण का बाळगू शकतो?

यावरून हे स्पष्टच आहे की लैंगिक शोषणामुळे मुलांच्या मनावर झालेला परिणाम दिर्घकाळापर्यंत राहू शकतो. खरंच मुलांचं शोषण किती क्रूर कृत्य आहे! जगात इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारं मुलांचं शोषण आपल्याला दाखवतं की आपण शेवटच्या दिवसांत जगत आहोत. अशा दिवसांत जिथे लोक “माया-ममता नसलेले” आणि “दुष्ट व फसवी माणसे अधिकाधिक वाईट” होत आहेत. (२ तीम. ३:१-५, १३) सैतानाचे डावपेच खूप दुष्ट आहेत आणि लोक सैतानाच्या इच्छेनुसार कार्य करतात हे पाहून आपल्याला खूप दुःख होतं. पण यहोवा हा सैतानापेक्षा किंवा त्याची इच्छा पूर्ण करणाऱ्‍या लोकांपेक्षा खूप जास्त शक्‍तिशाली आहे. सैतान कोणते डावपेच वापरतो याबद्दल यहोवाला सर्वकाही माहीत आहे. आपल्याला सहन करावा लागणारा त्रास यहोवा समजतो याची खातरी आपण बाळगू शकतो. आणि तो आपल्याला सांत्वन देऊ शकतो. आपण सर्व खरंच आशीर्वादित लोक आहोत कारण “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव . . . आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो, अशा हेतूने, की देवाकडून मिळणाऱ्‍या या सांत्वनाद्वारे आपल्यालाही इतरांचे, कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत सांत्वन करता यावे.” (२ करिंथ. १:३, ४) पण यहोवा सांत्वन देण्यासाठी कोणाचा वापर करतो?

सांत्वन कोण देऊ शकतं?

९. आईवडिलांकडून दुर्लक्ष केलं जातं अशा मुलांसाठी यहोवा स्तोत्र २७:१० मध्ये सांगितलेल्या दावीदच्या शब्दांनुसार काय करेल?

काही आईवडील मुलांवर होत असलेल्या शोषणाकडे दुर्लक्ष करतात आणि अशा मुलांना सांत्वनाची गरज असू शकते. तसंच, ज्या मुलांचं जवळच्या लोकांनी शोषण केलं आहे अशांनाही सांत्वनाची गरज पडू शकते. स्तोत्रकर्ता दावीदला माहीत होतं की यहोवा हा सांत्वन देण्याच्या बाबतीत सर्वात भरवशालायक आहे. (स्तोत्र २७:१० वाचा.) कुटुंबातील लोकांकडून ज्या मुलांना गैरवागणूक मिळते अशांसाठी यहोवा स्वतः पिता ठरेल याची दावीदला खातरी होती. यहोवा अशा मुलांना कशा प्रकारे सांत्वन देतो? आपल्या विश्‍वासू सेवकांचा उपयोग करून तो असं करतो. यहोवाची सेवा करणारे आपले बंधुभगिनी खरंतर आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य आहेत. उदाहरणार्थ, येशूने त्याच्यासोबत मिळून यहोवाची सेवा करणाऱ्‍या लोकांना त्याचे भाऊ, बहीण आणि आई असं संबोधलं.—मत्त. १२:४८-५०.

१०. प्रेषित पौलने वडील म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडली?

१० ख्रिस्ती मंडळी एका कुटुंबासारखी कशी आहे याच्या एका उदाहरणावर विचार करा. प्रेषित पौल मंडळीत एक विश्‍वासू आणि मेहनती वडील होता. त्याने आपल्यासाठी उत्तम उदाहरण मांडलं. तसंच, त्याने जसं ख्रिस्ताचं अनुकरण केलं तसं आपणही त्याचं अनुकरण करावं हे लिहिण्यासाठी त्याला प्रेरणा देण्यात आली होती. (१ करिंथ. ११:१) मंडळीत एक वडील या नात्याने त्याच्या जबाबदारीबद्दल पौलने म्हटलं: “अंगावर पाजणारी आई जशी स्वतःच्या मुलांची कोमलतेने काळजी घेते, तसेच आम्हीही तुमच्याशी सौम्यतेने वागलो.” (१ थेस्सलनी. २:७) बांधवांची प्रेमाने काळजी घेणारे वडील पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करतात आणि सांत्वन देताना बायबलचा वापर करून सौम्यतेने बोलतात.

आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या बहिणी इतरांना सांत्वन देण्यात प्रभावी असतात (परिच्छेद ११ पाहा) *

११. कोणती गोष्ट दाखवून देते की सांत्वन देण्याचं काम फक्‍त वडिलांचंच नाही?

११ पण शोषणाला बळी पडलेल्यांना फक्‍त वडीलच सांत्वन देऊ शकतात असा याचा अर्थ होतो का? मुळीच नाही. “एकमेकांना सांत्वन देत” राहण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. (१ थेस्सलनी. ४:१८) खासकरून आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या बहिणी इतर बहिणींना चांगल्या प्रकारे सांत्वन देऊ शकतात. म्हणूनच यहोवाने स्वतःची तुलना एका आईशी केली जी आपल्या मुलाचं सांत्वन करते. (यश. ६६:१३) बायबलमध्ये अशा स्त्रियांची उदाहरणं आहेत ज्यांनी निराश असलेल्यांना सांत्वन दिलं. (ईयो. ४२:११) भावनिक त्रासाचा सामना करत असलेल्या बहिणींना जेव्हा प्रौढ ख्रिस्ती बहिणी सांत्वन देतात, तेव्हा ते पाहून यहोवाला खूप आनंद होतो. काही परिस्थितींमध्ये वडील आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या एखाद्या बहिणीला निराश झालेल्या बहिणीला मदत करायला सांगू शकतात. *

आपण इतरांना सांत्वन कसं देऊ शकतो?

१२. आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे?

१२ आपल्या बंधुभगिनींना मदत करताना आपण अशा खासगी गोष्टींबद्दल विचारू नये ज्यामुळे त्यांना अवघडल्यासारखं वाटेल. (१ थेस्सलनी. ४:११) पण मग सांत्वनाची आणि मदतीची गरज असलेल्यांना आपण साहाय्य कसं करू शकतो? याचे शास्त्रावर आधारित पाच मार्ग पाहू या. यांमुळे आपल्याला बंधुभगिनींना सांत्वन देता येईल.

१३. १ राजे १९:५-८ मध्ये सांगितल्यानुसार यहोवाच्या दूताने एलीयासाठी काय केलं? आपण त्या देवदूताचं अनुकरण कसं करू शकतो?

१३ व्यावहारिक रीतीने मदत करा. संदेष्टा एलीया जेव्हा आपला जीव मुठीत घेऊन पळत होता, तेव्हा तो इतका निराश झाला की आपल्याला मरण यावं असं त्याला वाटलं. हे पाहून यहोवाने त्याला मदत करण्यासाठी एका सामर्थ्यशाली देवदूताला पाठवलं. त्या देवदूताने एलीयाला व्यावहारिक मार्गाने मदत केली. त्याने एलीयाला जेवण दिलं आणि ते खाण्यासाठी त्याला प्रेमाने आर्जवलं. (१ राजे १९:५-८ वाचा.) या अहवालावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो: कधीकधी व्यावहारिक रीतीने केलेली छोटी मदतही खूप प्रभावी ठरू शकते. निराश झालेल्या एखाद्या बांधवाला आपण जेवण देऊ शकतो, भेटवस्तू देऊ शकतो, किंवा आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम आणि काळजी आहे हे दाखवणारं एखादं पत्र किंवा कार्ड देऊ शकतो. यामुळे त्या बांधवाला खूप दिलासा मिळेल. आपल्याला कदाचित त्या बांधवाशी नाजूक विषयांवर बोलणं अवघड वाटत असेल, पण वरील व्यावहारिक मार्गांनी मदत करूनही आपण त्याला सांत्वन देऊ शकतो.

१४. एलीयाच्या अहवालातून आपण कोणते धडे शिकू शकतो?

१४ निराश झालेल्या व्यक्‍तीला सुरक्षित वाटेल अशा प्रकारे व्यवहार करा. एलीयाच्या अहवालातून आपण आणखी एक धडा शिकू शकतो. होरेब पर्वतापर्यंतचा लांबचा प्रवास करण्यासाठी लागणारी शक्‍ती चमत्कारिक रीत्या यहोवाने एलीयाला दिली. बऱ्‍याच शतकांआधी यहोवाने याच पर्वताजवळ आपल्या लोकांसोबत करार केला होता. कदाचित यामुळेच त्या ठिकाणी आपण सुरक्षित राहू असा विचार एलीयाच्या मनात आला असेल. आपल्याला जिवे मारणाऱ्‍या लोकांच्या तावडीतून आपण आता सुटलो असं त्याला कदाचित वाटलं असेल. यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो? शोषणाला बळी पडलेल्यांना आपल्याला सांत्वन द्यायचं असेल, तर आधी त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, वडिलांनी हे लक्षात ठेवावं की निराश असलेल्या एखाद्या बहिणीला राज्य सभागृहापेक्षा तिच्या घरी मोकळ्या वातावरणात बसून बोलणं जास्त सुरक्षित वाटू शकतं. तेच दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला राज्य सभागृहात याबद्दल बोलायला जास्त सुरक्षित वाटू शकतं.

लक्ष देऊन ऐकणं, मनापासून प्रार्थना करणं आणि सांत्वनदायक शब्द निवडणं यांद्वारे आपण इतरांना सांत्वन देऊ शकतो (परिच्छेद १५-२० पाहा) *

१५-१६. लक्ष देऊन ऐकण्यात काय सामील आहे?

१५ लक्ष देऊन ऐका. बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं: “प्रत्येकाने ऐकण्यास उत्सुक व बोलण्यात संयमी असावे.” (याको. १:१९) मग प्रश्‍न येतो की आपण लक्ष देऊन ऐकणारे आहोत का? आपल्याला कदाचित वाटेल लक्ष देऊन ऐकणं म्हणजे समोरची व्यक्‍ती बोलत असताना तिचं शांतपणे ऐकून घेणं. पण असा विचार चुकीचा आहे कारण लक्ष देऊन ऐकण्यात आणखी काही समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, एलीयाने आपल्या मनातल्या भावना, विचार आणि चिंता यहोवाला सांगितल्या तेव्हा त्याने त्याचं लक्ष देऊन ऐकलं. एलीयाच्या शब्दांवरून यहोवाला जाणीव झाली की तो घाबरला आहे, त्याला एकटं वाटत आहे आणि त्याने केलेल्या सेवेची काहीच किंमत नाही असा विचार तो करत आहे. मग यहोवाने त्याला या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी प्रेमळपणे मदत केली. असं करण्याद्वारे यहोवाने दाखवून दिलं की त्याने एलीयाचं खरंच लक्ष देऊन ऐकलं.—१ राजे १९:९-११, १५-१८.

१६ बंधुभगिनींचं ऐकून घेताना आपण त्यांना प्रेम आणि आपुलकी कशी दाखवू शकतो? आपल्याला त्यांच्याबद्दल कसं वाटतं हे आपण विचारपूर्वक निवडलेल्या शब्दांतून दाखवू शकतो. त्यांचं ऐकून घेतल्यावर आपण कदाचित म्हणू शकतो: “ऐकून खरंच खूप वाईट वाटलं, कोणासोबतही असं कधीच होऊ नये.” त्यांच्या भावना आपल्याला पूर्णपणे समजल्या आहेत याची खातरी करून घेण्यासाठी तुम्ही कदाचित त्यांना काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, “मला थोडंफार समजलंय तुम्हाला काय म्हणायचं ते, पण कशामुळे तुम्हाला असं वाटतंय?” किंवा “तुमचं ऐकल्यावर मला असं जाणवलं की . . . , बरोबर बोलतोय ना मी?” अशा प्रकारे बोलल्यामुळे समोरच्याला याची खातरी मिळेल की तुम्ही लक्ष देऊ ऐकत आहात आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात.—१ करिंथ. १३:४, ७.

१७. आपण “बोलण्यात संयमी” का असलं पाहिजे आणि धीर का दाखवला पाहिजे?

१७ पण आपण नेहमी “बोलण्यात संयमी” असणं गरजेचं आहे. समोरची व्यक्‍ती बोलत असताना मधेच तिचं बोलणं तोडू नका, किंवा तिचे विचार सुधारू नका. धीर दाखवा! शेवटी जेव्हा एलीयाने यहोवापुढे आपलं मन मोकळं केलं, तेव्हा तो खूप निराश आणि दुःखी होता. मग यहोवाने एलीयाला धीर दिला आणि त्याचा विश्‍वास मजबूत केला. मग एलीयाने परत यहोवासमोर आपलं मन मोकळं केलं आणि पुन्हा त्याच गोष्टी बोलून दाखवल्या. (१ राजे १९:९, १०, १३, १४) आपण यातून काय शिकू शकतो? कधीकधी निराश झालेली व्यक्‍ती आपल्या मनातल्या भावना अनेक वेळा बोलून दाखवेल. अशा वेळेस यहोवासारखंच आपणही तिचं धीराने ऐकलं पाहिजे. तिने समस्या कशी सोडवावी याबद्दल सल्ले देण्याऐवजी, आपण तिला दया आणि आपुलकी दाखवली पाहिजे.—१ पेत्र ३:८.

१८. दुःखात असलेल्यांना प्रार्थनेमुळे सांत्वन कसं मिळू शकतं?

१८ दुःखात असलेल्यांसोबत मनापासून प्रार्थना करा. जे लोक खूप निराश झालेले असतात त्यांना सहसा प्रार्थना करायलाही कठीण जातं. मनात कमीपणाची भावना असल्यामुळे कदाचित एखाद्या व्यक्‍तीला वाटू शकतं की ती यहोवाला प्रार्थना करू शकत नाही. अशा व्यक्‍तीला सांत्वन देण्यासाठी आपण तिच्यासोबत प्रार्थना करू शकतो. असं करत असताना तिचं वैयक्‍तिक नाव घेणं फायद्याचं ठरेल. प्रार्थनेत आपण यहोवाला सांगू शकतो की त्या व्यक्‍तीवर आपलं आणि मंडळीचंही किती प्रेम आहे. यहोवाने त्या व्यक्‍तीला एक शांत मन आणि सांत्वन द्यावं यासाठी आपण प्रार्थनेत विनंती करू शकतो. अशा प्रकारे प्रार्थना केल्यामुळे त्या व्यक्‍तीला खूप सांत्वन मिळू शकतं.—याको. ५:१६.

१९. एखाद्याला सांत्वन देण्यासाठी तयारी करताना आपल्याला कशामुळे मदत मिळू शकते?

१९ सांत्वनदायक शब्दांचा वापर करा. बोलण्याआधी विचार करा. अविचारीपणे बोलल्यामुळे समोरच्या व्यक्‍तीला त्रास होऊ शकतो. याउलट प्रेमळ शब्दांमुळे मनावरच्या जखमा भरून निघू शकतात. (नीति. १२:१८) बोलताना तुम्हाला सांत्वनदायक शब्द वापरता यावेत म्हणून यहोवाकडे मदत मागा. नेहमी लक्षात असू द्या की कोणत्याही शब्दांपेक्षा बायबलमध्ये दिलेले यहोवाचे शब्द मनावर जास्त प्रभाव पाडू शकतात.—इब्री ४:१२.

२०. शोषण झाल्यामुळे काही बंधुभगिनींच्या मनात कोणत्या भावना येऊ शकतात आणि आपण त्यांना कशाची आठवण करून दिली पाहिजे?

२० गतकाळात झालेल्या शोषणामुळे काही लोकांच्या मनात कमीपणाची भावना येऊ शकते. त्यांना असं वाटू शकतं की ते कोणाचंही प्रेम मिळवण्याच्या लायकीचे नाहीत. पण असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. यहोवाच्या नजरेत ते किती मौल्यवान आहेत हे आपण त्यांना शास्त्रवचनांचा उपयोग करून पटवून देऊ शकतो. (“ शास्त्रवचनांतून सांत्वन” ही चौकट पाहा.) दानीएल जेव्हा निराश झाला होता तेव्हा एका देवदूताने प्रेमळपणे त्याला कशी मदत केली याचा विचार करा. दानीएल खूप मौल्यवान आहे हे त्याला कळावं अशी यहोवाची इच्छा होती. (दानी. १०:२, ११, १९) त्याचप्रमाणे आपले बंधुभगिनीही यहोवासाठी खूप मौल्यवान आहेत.

२१. पश्‍चात्ताप न करणाऱ्‍यांचं काय होईल? आपण सर्वांनी काय करत राहिलं पाहिजे?

२१ इतरांना सांत्वन देण्याद्वारे आपण त्यांना यहोवाचं त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची आठवण करून देतो. आणि आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यहोवा हा न्याय करणारा देव आहे. कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार त्याच्यापासून लपून राहू शकत नाही. यहोवा सर्व काही पाहू शकतो आणि पश्‍चात्ताप न करणाऱ्‍यांना तो त्यांच्या चुकांची शिक्षा नक्की देईल. (गण. १४:१८) पण तोपर्यंत आपण लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना मनापासून प्रेम दाखवत राहू या. सैतान आणि त्याचं जग यांनी ज्या लोकांचं शोषण केलं आहे त्यांच्या जखमा यहोवा लवकरच पूर्णपणे भरून काढणार हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो. लवकरच अशी वेळ येईल जेव्हा या दुःखदायक आठवणी त्यांच्या मनात पुन्हा कधीच येणार नाहीत.—यश. ६५:१७.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

^ परि. 5 लहानपणी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना बऱ्‍याच वर्षांपर्यंत त्या गोष्टीचा मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. यामागचं कारण समजून घेण्यासाठी या लेखामुळे आपल्याला मदत होईल. अशा लोकांना मदत आणि सांत्वन कोण देऊ शकतं याबद्दलही आपण पाहू. तसंच, अशा लोकांना चांगल्या रीतीने सांत्वन देण्याचे काही मार्गही आपण पाहू.

^ परि. 11 लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या व्यक्‍तीने वैद्यकीय सल्लागाराची मदत घ्यायची की नाही, हा पूर्णपणे तिचा वैयक्‍तिक निर्णय आहे.

^ परि. 76 चित्रांचं वर्णन: आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेली एक बहीण निराश झालेल्या बहिणीला सांत्वन देते.

^ परि. 78 चित्रांचं वर्णन: निराश असलेल्या बहिणीला दोन वडील भेट देतात. तिने त्या प्रौढ बहिणीलाही तिच्यासोबत बसायला सांगितलं आहे.