व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १८

ख्रिस्ती मंडळीत प्रेम आणि न्याय

ख्रिस्ती मंडळीत प्रेम आणि न्याय

“एकमेकांची ओझी वाहत राहा; अशा रीतीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.”—गलती. ६:२.

गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो

सारांश *

१. आपण कोणत्या दोन गोष्टींची खातरी बाळगू शकतो?

यहोवा देवाचं आपल्या उपासकांवर प्रेम आहे. तो आधीही त्यांच्यावर प्रेम करायचा आणि पुढेही करत राहणार. त्याला न्यायसुद्धा प्रिय आहे. (स्तो. ३३:५) यामुळे आपण दोन गोष्टींची खातरी बाळगू शकतो: (१) आपल्या सेवकांवर कोणी अन्याय केला तर यहोवाला दुःख होतं. (२) तो वचन देतो की त्याच्या सेवकांवर होत असलेला अन्याय तो थांबवेल आणि अन्याय करणाऱ्‍यांना योग्य ती शिक्षा करेल. देवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांना दिलेलं नियमशास्त्र प्रेमावर आधारलेलं होतं हे आपण या शृंखलेच्या पहिल्या लेखात * शिकलो. यामुळे लोकांना न्यायाने वागण्याचं प्रोत्साहन मिळायचं आणि खासकरून जे स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हते अशांना न्याय मिळायचा. (अनु. १०:१८) यहोवाचं आपल्या उपासकांवर गाढ प्रेम आहे हे त्या नियमशास्त्रातून दिसून आलं.

२. आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेणार आहोत?

ख्रिस्ती मंडळी इ.स. ३३ मध्ये स्थापित झाली तेव्हा मोशेचं नियमशास्त्र संपुष्टात आलं. मग याचा अर्थ, प्रेमावर आधारलेल्या आणि न्यायाला बढावा देणाऱ्‍या नियमशास्त्रामुळे जो फायदा व्हायचा तो आता ख्रिस्ती लोकांना होणार नव्हता का? मुळीच नाही! खरंतर, ख्रिस्ती लोकांना आता एक नवा नियम मिळाला होता. आपण या लेखात सर्वात आधी चर्चा करणार आहोत की तो नियम कोणता आहे. मग आपण पुढील प्रश्‍नांची उत्तरंही जाणून घेणार आहोत: हा नवा नियम प्रेमावर आधारलेला आहे असं आपण का म्हणू शकतो? तो न्यायाला प्रोत्साहन देतो असं का म्हणता येईल? या नियमाचं पालन करून जबाबदार व्यक्‍तींनी इतरांना कशी वागणूक दिली पाहिजे?

“ख्रिस्ताचा नियम” म्हणजे काय?

३. गलतीकर ६:२ मध्ये सांगितल्यानुसार ‘ख्रिस्ताच्या नियमात’ कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

गलतीकर ६:२ वाचा. आज देवाचे सेवक “ख्रिस्ताचा नियम” याच्या अधीन आहेत. येशूने आपल्या अनुयायांना नियमांची सूची लिहून दिली नाही, तर त्याने त्यांना जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या आज्ञा व सूचना दिल्या आणि तत्त्वंही दिली. ‘ख्रिस्ताच्या नियमात’ येशूच्या सर्व शिकवणींचा समावेश होतो. पुढच्या परिच्छेदांतून आपल्याला या नियमाबद्दल आणखी चांगल्या रीत्या समजून घ्यायला मदत होईल.

४-५. येशूने कोणत्या मार्गांनी आणि कधी शिकवलं?

येशूने कोणत्या मार्गांनी शिकवलं? त्याने लोकांना आपल्या शब्दांद्वारे शिकवलं. त्याचे शब्द खूप प्रभावी होते कारण यामुळे लोकांना देवाबद्दलचं सत्य आणि जीवनाचा खरा अर्थ कळला. तसंच, देवाचं राज्य हे संपूर्ण मानवजातीच्या दुःखांवर एकमेव उपाय आहे हेदेखील त्यातून स्पष्ट झालं. (लूक २४:१९) येशूने आपल्या उदाहरणाद्वारेही शिकवलं. त्याने आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीवरून आपल्या अनुयायांना दाखवून दिलं की जीवन कसं जगावं.—योहा. १३:१५.

येशूने कधी शिकवलं? त्याने पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना लोकांना शिकवलं. (मत्त. ४:२३) तसंच, त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतरही त्याने आपल्या अनुयायांना शिकवलं. जसं की, जवळपास ५०० पेक्षा जास्त शिष्यांच्या समूहासमोर तो प्रकट झाला आणि त्याने त्यांना “शिष्य” बनवण्याची आज्ञा दिली. (मत्त. २८:१९, २०; १ करिंथ. १५:६) ख्रिस्ती मंडळीचा मस्तक या नात्याने, येशू स्वर्गात गेल्यावरही आपल्या शिष्यांना सूचना देत राहिला. उदाहरणार्थ, इ.स. ९६ मध्ये अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना प्रोत्साहन आणि सल्ला देण्यासाठी ख्रिस्ताने प्रेषित योहानला प्रेरित केलं.—कलस्सै. १:१८; प्रकटी. १:१.

६-७. (क) येशूच्या शिकवणी कुठे नमूद केल्या आहेत? (ख) आपण ख्रिस्ताच्या नियमाचं पालन कसं करतो?

येशूच्या शिकवणी कुठे नमूद केल्या आहेत? येशूचे शब्द आणि कार्य यांबद्दल बरीचशी माहिती आपल्याला शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. तसंच, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमधल्या इतर पुस्तकांतूनही आपल्याला येशूची विचारसरणी समजते. कारण “ख्रिस्ताचे मन” बाळगणाऱ्‍या व्यक्‍तींनी पवित्र आत्म्याद्वारे प्रेरीत होऊन ती पुस्तकं लिहिली आहेत.—१ करिंथ. २:१६

धडे: येशूच्या शिकवणी जीवनातल्या सर्व बाबतीत फायदेकारक आहेत. त्यामुळे आपण घरात, कामावर, शाळेत किंवा मंडळीत असताना जे काही करतो ते ख्रिस्ताच्या नियमाला अनुसरून असलं पाहिजे. आपण ख्रिस्ती ग्रीक शास्रवचनं वाचून आणि त्यांवर मनन करून या नियमाबद्दल शिकतो. देवाच्या शास्त्रवचनांत दिलेल्या सुचना, आज्ञा आणि तत्त्वं यांनुसार जगण्याद्वारे आपण या नियमाचं पालन करत असतो. येशूने जे काही शिकवलं त्याचा स्रोत यहोवा होता. यामुळे आपण ख्रिस्ताच्या नियमाचं पालन करतो तेव्हा खरंतर आपण आपला प्रेमळ पिता, यहोवा याच्या आज्ञांचं पालन करत असतो.—योहा. ८:२८.

प्रेमावर आधारलेला नियम

८. ख्रिस्ताच्या नियमाचा पाया काय आहे?

ज्या प्रकारे मजबूत पाया असलेल्या घरात राहणाऱ्‍यांना सुरक्षित वाटतं, त्याच प्रकारे विचारपूर्वक बनवलेल्या नियमामुळे त्याचं पालन करणाऱ्‍यांना सुरक्षित वाटतं. ख्रिस्ताचा नियम सर्वात चांगल्या पायावर बांधला आहे. तो म्हणजे प्रेम. असं आपण का म्हणू शकतो?

आपण प्रेमाने इतरांशी वागतो तेव्हा आपण ‘ख्रिस्ताच्या नियमाचं’ पालन करत असतो (परिच्छेद ९-१४ पाहा) *

९-१०. येशूने प्रेमामुळे प्रेरित होऊन सर्वकाही केलं हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येतं आणि आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

पहिलं कारण म्हणजे, येशूने प्रेमाने प्रेरित होऊन सर्वकाही केलं. करुणा किंवा कोमल दया या गुणांमुळे खरंतर प्रेमच व्यक्‍त होतं. आणि या करुणेपोटी येशूने जमावाला शिकवलं, आजारी लोकांना बरं केलं, उपाशी लोकांना जेवू घातलं आणि मृत जणांना जिवंत केलं. (मत्त. १४:१४; १५:३२-३८; मार्क ६:३४; लूक ७:११-१५) या सर्व गोष्टी करण्यामागे त्याचा बराचसा वेळ आणि शक्‍ती खर्च व्हायची, पण येशूने आपल्याआधी इतरांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जीवन दुसऱ्‍यांसाठी देण्याद्वारे त्याने आपलं प्रेम व्यक्‍त केलं.—योहा. १५:१३.

१० धडे: आपल्याआधी इतरांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष दिल्याने आपण येशूचं अनुकरण करू शकतो. आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल कोमल दया विकसित केल्यानेही आपण त्याचं अनुकरण करू शकतो. या दयेच्या गुणामुळे आपण जेव्हा आनंदाचा संदेश प्रचार करायला आणि शिकवायला प्रेरित होतो तेव्हा आपण ख्रिस्ताच्या नियमाचं पालन करत असतो.

११-१२. (क) यहोवाचं आपल्यावर गाढ प्रेम आहे हे कशावरून दिसून येतं? (ख) आपण यहोवाच्या प्रेमाचं अनुकरण कसं करू शकतो?

११ दुसरं कारण म्हणजे, येशूने आपल्या पित्याच्या प्रेमाबद्दल सांगितलं. सेवाकार्यादरम्यान येशूने दाखवून दिलं की यहोवाचं आपल्या उपासकांवर गाढ प्रेम आहे. इतर गोष्टीही येशूने शिकवल्या. जसं की, प्रत्येक व्यक्‍ती यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे. (मत्त. १०:३१) हरवलेलं मेंढरू पश्‍चात्ताप करून मंडळीत परत येतं तेव्हा त्याला स्वीकारण्यासाठी यहोवा खूप उत्सुक असतो. (लूक १५:७, १०) आपल्यासाठी त्याच्या पुत्राचं खंडणी बलिदान देण्याद्वारे यहोवाने आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम सिद्ध केलं.—योहा. ३:१६.

१२ धडे: आपण यहोवाच्या प्रेमाचं अनुकरण कसं करू शकतो? (इफिस. ५:१, २) सर्व बंधुभगिनींना मौल्यवान लेखण्याद्वारे आणि ‘हरवलेलं मेंढरू’ यहोवाकडे परत येतं तेव्हा त्याचं आनंदाने स्वागत करण्याद्वारे आपण असं करू शकतो. (स्तो. ११९:१७६) तसंच, आपल्या बंधुभगिनींना खासकरून जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा त्यांना मदत करण्याद्वारेही आपलं प्रेम सिद्ध होतं. (१ योहा. ३:१७) इतरांना प्रेम दाखवण्याद्वारे आपण ख्रिस्ताच्या नियमाचं पालन करतो.

१३-१४. (क) योहान १३:३४, ३५ यात सांगितल्यानुसार येशूने आपल्या अनुयायांना काय करायला सांगितलं आणि ही एक नवीन आज्ञा का होती? (ख) आपण नवीन आज्ञेचं पालन कसं करू शकतो?

१३ तिसरं कारण म्हणजे, येशूने आपल्या अनुयायांना आत्मत्यागी प्रेम दाखवण्याची आज्ञा दिली. (योहान १३:३४, ३५ वाचा.) येशूची आज्ञा नवीन आहे. या आज्ञेनुसार अनुयायांकडून एका विशिष्ट प्रकारचं प्रेम दाखवण्याची अपेक्षा केली जाते. मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएली लोकांकडून अशा प्रकारचं प्रेम दाखवण्याची अपेक्षा केली जात नव्हती. हे प्रेम म्हणजे, येशूने जसं आपल्यावर प्रेम केलं तसं आपणही इतरांवर केलं पाहिजे. यासाठी आत्मत्यागी प्रेम दाखवणं गरजेचं आहे. * आपण स्वतःवर जितकं प्रेम करतो त्यापेक्षाही जास्त बंधुभगिनींवर प्रेम करणं गरजेचं आहे. येशूप्रमाणेच आपणही त्यांच्यावर इतकं प्रेम केलं पाहिजे की स्वेच्छेने त्यांच्यासाठी आपला जीवही द्यायला आपण तयार असलं पाहिजे.

१४ धडे: आपण नवीन आज्ञेचं म्हणजे पालन कोणत्या मार्गांनी करतो? सोप्या शब्दांत सांगायचं तर आपण आपल्या बंधुभगिनींसाठी त्याग करायला तयार असतो. आपलं जीवन देण्याद्वारे आपण आपल्या बंधुभगिनींसाठी सर्वात मोठा त्याग करायला कदाचित तयार असू, पण लहानसहान गोष्टींमध्येही त्याग करायला आपण तयार असतो का? उदाहरणार्थ, जेव्हा एका वृद्ध बांधवाला किंवा बहिणीला नियमितपणे सभेला हजर राहता यावं म्हणून आपण विशेष प्रयत्न करतो किंवा आपल्या प्रिय जणांना आनंद व्हावा यासाठी आपल्या आवडीनिवडी बाजूला सारतो किंवा विपत्ती मदतकार्यात साहाय्य करण्यासाठी आपल्या सुट्ट्या वापरतो, तेव्हा आपण नवीन आज्ञा पाळत असतो. तसंच, आपल्या मंडळीत प्रत्येक व्यक्‍तीला सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करण्यातही आपण हातभार लावतो.

न्यायाला बढावा देणारा नियम

१५-१७. (क) येशूच्या कार्यांवरून न्यायाविषयी त्याचा काय दृष्टिकोन होता हे कसं दिसून येतं? (ख) आपण ख्रिस्ताचं अनुकरण कसं करू शकतो?

१५ बायबलमध्ये “न्याय” या शब्दाचा मूळ अर्थ, देवानुसार जे योग्य आहे ते करणं आणि तेही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता करणं असा होतो. ख्रिस्ताच्या नियमामुळे न्यायाला प्रोत्साहन मिळतं असं आपण का म्हणू शकतो?

येशू स्त्रियांशी आदराने आणि दयेने वागला; अगदी अशा स्त्रियांशीही ज्यांना इतर जण तुच्छ लेखायचे (परिच्छेद १६ पाहा) *

१६ याचं पहिलं कारण म्हणजे, येशूच्या कार्यांतून दिसून येणारा न्यायाविषयीचा त्याचा दृष्टिकोन. येशू पृथ्वीवर असताना यहुदी धार्मिक गुरू यहुदी नसलेल्या लोकांचा द्वेष करायचे, सामान्य यहुदी लोकांना तुच्छ लेखायचे आणि स्त्रियांचा अनादर करायचे. पण याउलट, लोकांशी वागताना येशू भेदभाव करत नव्हता. यहुदी नसलेल्या लोकांनी त्याच्यावर विश्‍वास दाखवला तेव्हा त्याने त्यांना मदत केली. (मत्त. ८:५-१०, १३) श्रीमंत असो वा गरीब त्याने भेदभाव न करता सर्वांना प्रचार केला. (मत्त. ११:५; लूक १९:२, ९) तो स्त्रियांशी कधीच कठोरपणे वागला नाही किंवा त्याने त्यांचा अपमान केला नाही, तर तो त्यांच्याशी नेहमी आदरपूर्वक आणि दयेने वागला; अशा स्त्रियांसोबतही ज्यांना इतर जण तुच्छ लेखायचे.—लूक ७:३७-३९, ४४-५०.

१७ धडे: इतरांशी वागताना आपण भेदभाव करण्याचं टाळू. आणि जो कोणी आपला संदेश ऐकायला तयार असेल त्याला आपण प्रचार करू. मग तो कुठल्याही धर्माचा असो किंवा त्याची आर्थिक स्थिती कशीही असो. ख्रिस्ती बांधव स्त्रियांशी आदरपूर्वक वागण्याद्वारे येशूचं अनुकरण करतात. या सर्व गोष्टी करण्याद्वारे आपण ख्रिस्ताचा नियम पाळत असतो.

१८-१९. येशूने न्यायाबद्दल काय शिकवलं आणि यामुळे आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात?

१८ दुसरं कारण म्हणजे येशूने न्यायाविषयी शिकवलेल्या गोष्टी. त्याने अशी तत्त्वं शिकवली ज्यामुळे त्याच्या अनुयायांना इतरांशी भेदभाव न करता वागणं शक्य होणार होतं. याचंच एक उदाहरण म्हणजे सुवर्ण नियम. (मत्त. ७:१२) आपल्याशी वागताना कोणीही आपल्यासोबत भेदभाव करू नये अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. म्हणून मग आपणही इतरांशी वागताना भेदभाव करण्याचं टाळलं पाहिजे. जर आपण भेदभाव केला तर तेही आपल्याशी तसंच वागतील. पण जर आपल्यासोबत अन्याय झाला असेल तर? अशा परिस्थितीत काय करावं हेही येशूने आपल्या अनुयायांना सांगितलं. त्याने त्यांना यहोवावर भरवसा ठेवायला शिकवलं. यहोवा “रात्रंदिवस त्याचा धावा करणाऱ्‍या त्याच्या निवडलेल्या लोकांना न्याय मिळवून” देतो. (लूक १८:६, ७) हे शब्द खरंतर एक अभिवचन आहे: या शेवटच्या दिवसांत आपल्याला ज्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं त्याबद्दल आपल्या न्यायी देवाला सर्वकाही माहीत आहे आणि त्याने ठरवलेल्या योग्य वेळी तो आपल्याला नक्की न्याय मिळवून देईल.—२ थेस्सलनी. १:६.

१९ धडे: येशूने शिकवलेली तत्त्वं लागू केली तर इतरांशी आपण न्यायीपणे वागू. या सैतानाच्या जगात आपल्यासोबत अन्याय झाला असेल तर यहोवा आपल्याला न्याय मिळवून देईल याची आपण खातरी बाळगू शकतो आणि यामुळे आपल्याला सांत्वन मिळतं.

जबाबदारी असलेल्यांनी इतरांना कशी वागणूक दिली पाहिजे?

२०-२१. (क) जबाबदारी असलेल्यांनी इतरांना कशी वागणूक दिली पाहिजे? (ख) एक पती आत्मत्यागी प्रेम कसं दाखवू शकतो आणि एका पित्याने आपल्या मुलांना कशी वागणूक दिली पाहिजे?

२० ख्रिस्ताच्या नियमाधीन काहींना कुटुंबात आणि मंडळीत जबाबदाऱ्‍या मिळाल्या आहेत. अशांनी इतरांना कशी वागणूक दिली पाहिजे? प्रेम हा ख्रिस्ताच्या नियमाचा पाया आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराखाली असलेल्या लोकांशी आदराने आणि प्रेमाने वागणं गरजेचं आहे. आपल्या सर्व कार्यांतून प्रेम व्यक्‍त झालं पाहिजे अशी अपेक्षा ख्रिस्त आपल्याकडून करतो हे त्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

२१ कुटुंबात. जसं ख्रिस्त मंडळीवर प्रेम करतो तसंच प्रेम पतीने आपल्या पत्नीवर केलं पाहिजे. (इफिस. ५:२५, २८, २९) ख्रिस्ताने दाखवलेल्या आत्मत्यागी प्रेमाचं अनुकरण करून पती स्वतःच्या नाही तर पत्नीच्या गरजा आणि आवडीनिवडी यांचा विचार करेल. पण काही पुरुषांना असं प्रेम दाखवणं कठीण जातं. कारण ते अशा संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले असतात जिथे इतरांशी प्रेमाने आणि न्यायाने वागण्याचा अभाव असतो. आणि त्यांना आपल्या वाईट सवयी सुधारणं कदाचित कठीण जाऊ शकतं. पण ख्रिस्ताचा नियम पाळण्यासाठी त्यांनी हे बदल करणं आवश्‍यक आहेत. आत्मत्यागी प्रेम दाखवणारा पती आपल्या पत्नीचा आदर कमावतो. आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करणारा पिता कधीच आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांना इजा पोचवणार नाही. (इफिस. ४:३१) याउलट, आपल्या मुलांना सुरक्षित वाटेल अशा मार्गांनी तो आपलं प्रेम आणि आपुलकी व्यक्‍त करतो. अशा पित्यावर मुलं प्रेम करतात आणि त्याच्यावर त्यांचा भरवसादेखील असतो.

२२. १ पेत्र ५:१-३ या वचनांनुसार “मेंढरं” कोणाची आहेत आणि त्यांना कशी वागणूक दिली पाहिजे?

२२ मंडळीत. “मेंढरं” आपल्या मालकीची नाहीत हे वडिलांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. (योहा. १०:१६; १ पेत्र ५:१-३ वाचा.) “देवाच्या कळपाचे,” “देवासमोर” आणि “देवाची संपत्ती” या वाक्यांशांमुळे वडिलांना नेहमी लक्षात ठेवायला मदत होते की मेंढरं यहोवाच्या मालकीची आहेत. त्याच्या मेंढरांना प्रेमाने आणि कोमलतेने वागणूक दिली जावी अशी तो अपेक्षा करतो. (१ थेस्सलनी. २:७, ८) मेंढपाळाची जबाबदारी प्रेमळपणे हाताळणाऱ्‍या वडिलांना यहोवाची पसंती असते. इतकंच काय तर असे वडील बंधुभगिनींकडूनही प्रेम आणि आदर कमावतात.

२३-२४. (क) एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडल्यास वडिलांची काय भूमिका असते? (ख) असे प्रकरण हाताळताना वडिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

२३ गंभीर पाप हाताळताना वडिलांची काय भूमिका असते? देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या मोशेच्या नियमात न्यायाधीशांची आणि वडिलांची जी भूमिका होती त्याच्या तुलनेत आताच्या वडिलांची भूमिका वेगळी आहे. त्या नियमाधीन असलेले जबाबदार पुरुष यहोवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या गोष्टीच हाताळत नव्हते, तर नागरिकांच्या हक्कासंबंधित किंवा गुन्हेगारीशी संबंधित असलेले प्रकरणही हाताळायचे. पण ख्रिस्ताच्या नियमाधीन असलेले वडील फक्‍त यहोवाच्या उपासेनेसंबंधित घडलेले पाप हाताळतात. मतभेद किंवा गुन्हेगारीचे प्रकरण हाताळण्यासाठी देवाने सरकारी अधिकाऱ्‍यांना नेमलं आहे हे ते मान्य करतात. दंड भरण्याची मागणी करणं किंवा तुरुंगवासाची शिक्षा देणं या गोष्टीही सरकारी अधिकाऱ्‍यांच्या हाती आहेत.—रोम. १३:१-४.

२४ मंडळीत एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडलं असल्यास वडिलांची काय जबाबदारी असते? ते शास्त्रवचनांचं परीक्षण करून निर्णय घेतात. ख्रिस्ताच्या नियमाचा पाया प्रेम आहे हे ते नेहमी लक्षात ठेवतात. प्रेमामुळे मंडळीतले वडील पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करतात: मंडळीत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांना मदत करण्यासाठी कोणतं पाऊल उचलणं गरजेचं आहे? प्रेम हा गुण वडिलांना गंभीर पाप करणाऱ्‍याबद्दल पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करण्यासाठी मदत करेल: तो पस्तावा दाखवत आहे का आणि यहोवासोबत त्याचं नातं पुन्हा जोडण्यासाठी आपण त्याला मदत करू शकतो का?

२५. पुढच्या लेखात कशावर चर्चा केली जाईल?

२५ ख्रिस्ताच्या नियमाधीन असण्याबद्दल आपण यहोवाचे खरंच खूप आभारी आहोत! प्रत्येक जण जेव्हा हा नियम पाळण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा आपण मंडळीत एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात हातभार लावत असतो. त्यामुळे प्रत्येकाला प्रेम, सुरक्षितता आणि आपण मौल्यवान असल्याची जाणीव होते. पण हे खरं आहे की आपण अशा जगात राहत आहोत ज्यात “दुष्ट . . . माणसे अधिकाधिक वाईट” होत चालली आहेत. (२ तीम. ३:१३) त्यामुळे आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतो तेव्हा ख्रिस्ती मंडळी देवासारखा न्याय कसा प्रदर्शित करू शकते? पुढच्या लेखात या प्रश्‍नावर चर्चा केली जाईल.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

^ परि. 5 हा आणि यानंतरचे दोन लेख हे एकाच शृंखलेचे भाग आहेत. यहोवा प्रेमाचा आणि न्यायाचा देव आहे हे आपण खातरीने का म्हणू शकतो याबद्दल या शृंखलेत चर्चा करण्यात आली आहे. त्याच्या सेवकांना न्याय मिळावा अशी त्याची इच्छा आहे आणि या दुष्ट जगात अन्यायामुळे पीडित असलेल्यांना तो सांत्वन देतो.

^ परि. 1 टेहळणी बुरूज फेब्रुवारी २०१९ च्या अंकातला “नियमशास्त्रातून यहोवाचं प्रेम आणि न्याय कसा दिसून आला?” हा लेख पाहा.

^ परि. 13 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: आत्मत्यागी प्रेम आपल्याला स्वतःपेक्षा इतरांच्या गरजा आणि आवड यांकडे जास्त लक्ष देण्यासाठी प्रवृत्त करतं. इतरांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी आपण स्वेच्छेने त्याग करायला तयार असतो.

^ परि. 61 चित्रांचं वर्णन: येशू एका विधवेला पाहतो जिचा एकुलता एक मुलगा मरण पावला आहे. दयेपोटी येशू त्या तरुणाला जिवंत करतो.

^ परि. 63 चित्रांचं वर्णन: येशू शिमोन नाव असलेल्या परूश्‍याच्या घरी जेवतो. एक स्त्री जी कदाचित वेश्‍या असावी, येशूचे पाय आपल्या अश्रूंनी धुते, आपल्या केसांनी पुसते आणि त्यांवर तेल ओतते. या स्त्रीने केलेल्या कार्यांची शिमोन टीका करतो पण येशू तिची बाजू घेतो.