व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २५

तणावात असताना यहोवावर विसंबून राहा

तणावात असताना यहोवावर विसंबून राहा

“माझ्या मनावरचे दडपण काढ; माझ्या संकटांतून मला सोडव.”—स्तो. २५:१७.

गीत ५१ यहोवाला जडून राहू!

सारांश *

१. येशूने दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष देणं गरजेचं का आहे?

शेवटल्या दिवसांबद्दलच्या भविष्यवाणीत येशूने म्हटलं होतं: “जीवनाच्या चिंता [दररोजच्या चिंता] यांमुळे तुमची मने भारावून जाऊ नयेत . . . म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.” (लूक २१:३४) या इशाऱ्‍याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असं का? कारण आज इतरांप्रमाणेच आपल्यालाही समस्यांचा सामना करावा लागतो आणि या समस्यांमुळे आपल्यावर तणाव येऊ शकतो.

२. काही बंधुभगिनींना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं?

कधीकधी आपल्यावर एकापाठोपाठ एक अनेक समस्या येतात. पुढील उदाहरणांवर विचार करा. जॉन * नावाच्या बांधवाला मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाचा गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. त्यात भर म्हणजे जवळपास १९ वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्याची पत्नी अचानक त्याला सोडून गेली. यामुळे तो खूप खचून गेला. या काळातच त्याच्या दोन मुलींनी यहोवाची सेवा करण्याचंही सोडून दिलं. बॉब आणि लिन्डा नावाच्या जोडप्याला वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्या दोघांची नोकरी अचानक सुटली आणि यामुळे त्यांना आपलं घर गमवावं लागलं. हे सर्व घडत असतानाच लिन्डाला हृदयाचा एक घातक आजार झाला आणि यासोबतच संधीवाताच्या त्रासामुळे तिची रोग प्रतिरोधक शक्‍तीही कमी होऊ लागली.

३. फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांनुसार आपण कशाची खात्री बाळगू शकतो?

तणावात असताना आपल्याला कसं वाटतं हे यहोवा पूर्णपणे समजतो याची आपण खात्री बाळगू शकतो. तसंच, समस्यांचा सामना करण्यासाठी त्याला आपल्याला मदत करायची इच्छा आहे. (फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.) बायबलमध्ये तणावाचा सामना करावा लागणाऱ्‍या देवाच्या सेवकांचे अनेक अहवाल आहेत. तसंच, अशा कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी यहोवाने या सेवकांना कशी मदत केली हेदेखील त्यात सांगितलं आहे. त्यांपैकी काहींवर आता आपण चर्चा करू या.

एलीया—“आपल्यासारख्याच भावना असलेला मनुष्य”

४. एलीयाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आणि त्याला यहोवाबद्दल कसं वाटलं?

एलीया खूप कठीण काळात यहोवाची सेवा करत होता आणि त्याला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं. देवाला अविश्‍वासू राहिलेल्या आहाब राजाच्या काळात तो सेवा करत होता. आहाब राजाने बआल देवाची उपासना करणाऱ्‍या ईजबेल नावाच्या स्त्रीसोबत लग्न केलं होतं. या दोघांनी संपूर्ण राष्ट्रात बआलची उपासना पसरवली आणि यहोवाच्या बऱ्‍याच संदेष्ट्यांना ठार मारलं. पण अशा परिस्थितीतही एलीया आपला जीव वाचवू शकला. यानंतर, यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे तो एका भीषण दुष्काळातही जिवंत राहू शकला. (१ राजे १७:२-४, १४-१६) यासोबतच, बआलची उपासना करणारे आणि त्याचे संदेष्टे यांना आव्हान देतानाही एलीयाने यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला. त्याने इस्राएली लोकांना यहोवाची सेवा करण्यासाठी आर्जवलं. (१ राजे १८:२१-२४, ३६-३८) या कठीण आणि तणावपूर्ण काळात यहोवा आपल्याला मदत करत आहे याची एलीयाला पूर्ण खात्री होती.

एलीयाला बळ मिळावं म्हणून यहोवा आपला दूत पाठवतो (परिच्छेद ५-६ पाहा) *

५-६. १ राजे १९:१-४ या वचनांनुसार एलीयाला कसं वाटलं आणि एलीयावर आपलं प्रेम आहे हे यहोवाने कसं दाखवलं?

१ राजे १९:१-४ वाचा. पण ईजबेल राणीने एलीयाला जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा मात्र तो खूप घाबरला. यामुळे तो बैर-शेबा या ठिकाणी पळून गेला. तो इतका जास्त निराश झाला होता की “आपला प्राण जाईल तर बरे” असं त्याला वाटलं. त्याच्या मनात अशा भावना का आल्या? एलीया अपरिपूर्ण होता आणि तोही “आपल्यासारख्याच भावना असलेला मनुष्य होता.” (याको. ५:१७) तणावामुळे आणि खूप थकून गेल्यामुळे त्याला कदाचित असं वाटलं असावं. एलीयाने विचार केला की खऱ्‍या उपासनेला वाढवण्यासाठी त्याने केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत आणि त्याच्या प्रयत्नांचा इस्राएली लोकांवर काहीच परिणाम झाला नाही. तसंच त्याला वाटलं की संपूर्ण इस्राएलमध्ये यहोवाची उपासना करणारा आता तो एकटाच उरला आहे. (१ राजे १८:३, ४, १३; १९:१०, १४) एका विश्‍वासू संदेष्ट्याच्या मनात अशा भावना आल्या हे जाणून आपल्याला कदाचित आश्‍चर्य वाटेल. पण यहोवाने एलीयाच्या भावना समजून घेतल्या.

एलीयाने आपल्या भावना यहोवासमोर व्यक्‍त केल्या तेव्हा तो त्याच्यावर रागावला नाही. याऐवजी यहोवाने त्याला विश्‍वासात स्थिर व्हायला मदत केली. (१ राजे १९:५-७) नंतर, यहोवाने आपली अद्‌भुत शक्‍ती दाखवून प्रेमळपणे एलीयाचे चुकीचे विचार सुधारले. मग यहोवाने एलीयाला सांगितलं की इस्राएलमध्ये अजूनही असे ७,००० लोक आहेत ज्यांनी बआलची उपासना नाकारली आहे. (१ राजे १९:११-१८) आपलं एलीयावर खूप प्रेम आहे हे यहोवाने व्यावहारिक मार्गांनी दाखवलं.

यहोवा आपल्याला कशी मदत करेल?

७. यहोवाने एलीयाला ज्या प्रकारे मदत केली त्यावरून आपल्याला कोणती खात्री मिळते?

तुम्हीदेखील तणावाचा सामना करत आहात का? यहोवाने एलीयाच्या भावना समजून घेतल्या हे जाणून आपल्याला खरंच खूप दिलासा मिळतो! यामुळे आपल्याला खात्री मिळते की तो आपल्याला होणारा भावनिक त्रास समजू शकतो. त्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत आणि तो आपले विचार व भावनादेखील समजू शकतो. (स्तो. १०३:१४; १३९:३, ४) आपण एलीयाचं अनुकरण करून यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिलो, तर तो आपल्याला तणावाचा सामना करण्यासाठी नक्कीच मदत करेल.—स्तो. ५५:२२.

८. तणावाचा सामना करण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करेल?

तणावामुळे आपण नकारात्मक विचार करायला लागू शकतो आणि यामुळे आपण निराश होऊ शकतो. तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर नेहमी लक्षात असू द्या की तणावाचा सामना करण्यासाठी यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. तो तुम्हाला कशी मदत करेल? आपल्या समस्या, आपल्याला कसं वाटतं हे आपण त्याला सांगावं अशी त्याची इच्छा आहे. आणि आपल्याला त्याच्या वचनातून हमी मिळते की मदतीसाठी केलेल्या प्रार्थनांचं उत्तर तो आपल्याला देईल. (स्तो. ५:३; १ पेत्र ५:७) म्हणून आपल्या समस्यांबद्दल वारंवार यहोवाला प्रार्थनेत सांगा. अर्थात, तो जसं एलीयाशी थेटपणे बोलला तसं तो आपल्याशी आज बोलत नाही. पण त्याचं वचन बायबल आणि त्याची संघटना यांच्याद्वारे तो आपल्याशी संवाद साधतो. बायबलमधल्या अहवालांमुळे आपल्याला सांत्वन आणि आशा मिळू शकते. तसंच, आपले बंधुभगिनीही आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतात.—रोम. १५:४; इब्री १०:२४, २५.

९. एका जवळच्या भरवशालायक मित्रामुळे मदत कशी होऊ शकते?

यहोवाने एलीयाला सांगितलं की त्याने आपल्या काही जबाबदाऱ्‍या अलीशाला द्याव्यात. असं करण्याद्वारे यहोवाने एलीयाला एक चांगला मित्र दिला. यामुळे एलीयाला तणावाचा आणि निराशेचा सामना करताना मदत मिळणार होती. यावरून आपण शिकतो की एका भरवशालायक मित्राला आपल्या भावना सांगितल्यामुळे, तो आपल्याला तणावाचा सामना करण्यासाठी मदत करू शकतो. (२ राजे २:२; नीति. १७:१७) तुमचा असा एकही मित्र नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर यहोवाला प्रार्थना करा; तो तुम्हाला एखाद्या प्रौढ ख्रिस्ती बांधवाशी किंवा बहिणीशी मैत्री करायला मदत करू शकतो. यामुळे तुम्हाला भावनिक रीत्या आधार मिळेल.

१०. एलीयाच्या उदाहरणातून आपल्याला कोणती आशा मिळते, आणि यशया ४०:२८, २९ यांत दिलेलं अभिवचन आपल्याला कशी मदत करू शकतं?

१० यहोवाने एलीयाला तणावाचा सामना करण्यासाठी आणि बऱ्‍याच वर्षांपर्यंत विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी मदत केली. एलीयाच्या उदाहरणावरून आपल्याला आशा मिळते. आपल्याही जीवनात कदाचित असा काळ येऊ शकतो जेव्हा आपण खूप तणावात असू आणि यामुळे आपण भावनिक व शारीरिक रीत्या थकून जाऊ. पण अशा काळातही आपण यहोवावर विसंबून राहिलो तर त्याची सेवा करत राहण्यासाठी तो आपल्याला बळ देईल.—यशया ४०:२८, २९ वाचा.

हन्‍ना, दावीद आणि स्तोत्रकर्ता यहोवावर विसंबून राहिले

११-१३. प्राचीन काळातील देवाच्या तीन सेवकांवर तणावाचा कसा परिणाम झाला?

११ यहोवाच्या इतर सेवकांनाही तीव्र तणावाचा सामना करावा लागला. उदाहरणार्थ, मूल होत नसल्याच्या दुःखामुळे हन्‍ना खूप तणावात होती. त्या काळात एखाद्या स्त्रीला मूल न होणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट समजली जायची. तसंच, पनिन्‍ना यावरून तिला सारखे टोमणे मारायची. यामुळेही ती त्रासलेली होती. (१ शमु. १:२, ६) तणावामुळे ती इतकी खचून गेली होती की ती खूप रडायची आणि तिने खाणंपिणंही सोडून दिलं होतं.—१ शमु. १:७, १०.

१२ काही प्रसंगांमध्ये दावीद राजाला तीव्र तणावाचा सामना करावा लागला. त्याला कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं याचा विचार करा. त्याने केलेल्या चुकांमुळे त्याच्या मनात दोषीपणाची भावना होती. (स्तो. ४०:१२) त्याचा प्रिय मुलगा अबशालोम याने त्याच्याविरुद्ध बंड केलं आणि यामुळे नंतर अबशालोमचा मृत्यू झाला. (२ शमु. १५:१३, १४; १८:३३) दावीदच्या एका खूप जवळच्या मित्राने त्याचा विश्‍वासघात केला. (२ शमु. १६:२३–१७:२; स्तो. ५५:१२-१४) दावीदने रचलेल्या बऱ्‍याच स्तोत्रांमध्ये आपल्याला त्याच्या मनातल्या निराशेच्या भावना दिसून येतात. पण यासोबतच त्याचा यहोवावर असलेला खंबीर विश्‍वासही आपल्याला पाहायला मिळतो.—स्तो. ३८:५-१०; ९४:१७-१९.

स्तोत्रकर्त्याला यहोवाची सेवा पुन्हा आनंदाने करायला कशामुळे मदत झाली? (परिच्छेद १३-१५ पाहा) *

१३ नंतर, एक स्तोत्रकर्ता दुष्ट लोकांची चांगली जीवनशैली पाहून त्यांचा हेवा करू लागला होता. तो “देवाच्या पवित्रस्थानात” सेवा करायचा आणि तो कदाचित आसाफच्या वंशातला होता. या स्तोत्रकर्त्याला तणावाचा सामना करावा लागला आणि यामुळे तो निरुत्साही व असमाधानी झाला. देवाची सेवा केल्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दलही त्याच्या मनात शंका उत्पन्‍न झाल्या.—स्तो. ७३:२-५, ७, १२-१४, १६, १७, २१.

१४-१५. यहोवाकडे मदत मागण्याविषयी आपण देवाच्या तीन सेवकांकडून काय शिकतो?

१४ वर उल्लेख केलेले देवाचे तिन्ही सेवक मदतीसाठी यहोवावर विसंबून राहिले. त्यांनी यहोवाला कळकळून प्रार्थना केली आणि आपल्या चिंता त्याला सांगितल्या. ते इतक्या तणावात का आहेत याची कारणं त्यांनी यहोवासमोर मनमोकळेपणे मांडली. आणि अशा परिस्थितीतही त्यांनी यहोवाच्या मंदिरात जायचं थांबवलं नाही.—१ शमु. १:९, १०; स्तो. ५५:२२; ७३:१७; १२२:१.

१५ यहोवाने या सर्वांच्या प्रार्थनेचं प्रेमळपणे उत्तर दिलं. हन्‍नाला मनःशांती मिळाली. (१ शमु. १:१८) दावीदने म्हटलं: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्‍वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.” (स्तो. ३४:१९) आणि प्रार्थना केल्यानंतर त्या स्तोत्रकर्त्याला वाटलं की यहोवाने त्याचा “उजवा हात धरला आहे” आणि तो त्याला प्रेमळपणे सुधारत आहे. म्हणून त्याने गीतात म्हटलं: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे.” (स्तो. ७३:२३, २४, २८) या उदाहरणांवरून आपण काय शिकतो? कधीकधी आपल्या जीवनात अशा समस्या येतील ज्यामुळे आपण तणावात असू. पण तणावाचा सामना करण्यासाठी आपल्याला यहोवाकडून मदत हवी असेल तर पुढील तीन गोष्टी करणं गरजेच्या आहेत. यहोवाने इतरांना कशी मदत केली यावर आपल्याला मनन करावं लागेल, प्रार्थनेत यहोवावर विसंबून राहावं लागेल आणि त्याच्या इच्छेनुसार कार्य करावं लागले.—स्तो. १४३:१, ४-८.

यहोवावर विसंबून राहा आणि तणावाचा यशस्वीपणे सामना करा

आपण इतरांपासून अलिप्त राहावं असं सुरुवातीला एका बहिणीला वाटलं, पण तिने इतरांना वेगवेगळ्या मार्गांनी मदत केली तेव्हा तिची परिस्थिती सुधारली (परिच्छेद १६-१७ पाहा)

१६-१७. (क) आपण यहोवा आणि त्याच्या लोकांपासून अलिप्त का राहू नये? (ख) आपल्याला पुन्हा बळ कसं मिळू शकतं?

१६ या तीन उदाहरणांवरून आपल्याला आणखी एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे आपण कधीच यहोवापासून आणि त्याच्या लोकांपासून अलिप्त किंवा दूर राहू नये. (नीति. १८:१) नॅन्सी नावाच्या बहिणीचा पती जेव्हा तिला सोडून गेला तेव्हा तिला तीव्र तणावाचा सामना करावा लागला. ती म्हणते, “असेही काही दिवस होते जेव्हा मला कोणालाच भेटायची आणि कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती. पण मी जितकं एकटं राहायचा प्रयत्न केला तितकी मी आणखी दुःखी झाले.” मग नॅन्सी गरज असलेल्यांना वेगवेगळ्या मार्गांनी मदत करू लागली. त्यामुळे तिचा दृष्टिकोन बदलला. ती म्हणते, “लोकांना कायकाय सोसावं लागतं हे जेव्हा ते सांगायचे तेव्हा मी लक्ष देऊन ऐकायचे. मला जाणवलं की त्यांच्यावर आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे मला स्वतःवर आणि माझ्या समस्यांवर कमी लक्ष द्यायला मदत झाली.”

१७ मंडळीतल्या सभांना हजर राहिल्यामुळे आपल्याला पुन्हा बळ मिळू शकतं. सभेत असताना आपण यहोवाला आपलं “साहाय्य व समाधान” करण्याची आणखी संधी देत असतो. (स्तो. ८६:१७) तिथे तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा, त्याचं वचन आणि त्याचे लोक यांद्वारे बळ देतो. “एकमेकांना प्रोत्साहन” देण्याची संधी आपल्याला सभांमुळे मिळते. (रोम. १:११, १२) सोफीया नावाची बहीण म्हणते, “यहोवा आणि भाऊबहिणींमुळे मला सहन करण्याची ताकद मिळाली. मंडळीतल्या सभा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मी सेवाकार्यात आणि आपल्या मंडळीत जितका जास्त सहभाग घेते, तितकंच मला तणावाचा आणि चिंतेचा चांगल्या प्रकारे सामना करायला सोपं जातं.”

१८. निराश झाल्यावर यहोवा आपल्याला काय देऊ शकतो?

१८ निराश झाल्यावर लक्षात असू द्या की यहोवा भविष्यात आपल्या तणावाचा कायमस्वरूपी अंत तर करेलच, पण त्यासोबतच तो आजही आपल्याला तणावाचा सामना करण्यासाठी मदत पुरवतो. नैराश्‍य आणि आशाहीन वाटणं या भावनांवर मात करण्यासाठी तो आपल्यात “इच्छा निर्माण करतो आणि . . . ताकदही देतो.”—फिलिप्पै. २:१३.

१९. रोमकर ८:३७-३९ या वचनांतून आपल्याला कोणतं आश्‍वासन मिळतं?

१९ रोमकर ८:३७-३९ वाचा. देवाच्या प्रेमापासून आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही असं आश्‍वासन आपल्याला प्रेषित पौलच्या शब्दांवरून मिळतं. तणावाचा सामना करत असलेल्या आपल्या भाऊबहिणींना आपण कशी मदत करू शकतो? पुढच्या लेखात आपण पाहू की यहोवाचं अनुकरण करून आपण अशा भाऊबहिणींना प्रेमळपणे आधार कसा देऊ शकतो.

गीत ३८ आपला भार यहोवावर टाक

^ परि. 5 खूप जास्त प्रमाणात किंवा दीर्घकाळापर्यंत राहणाऱ्‍या तणावामुळे आपलं भावनिक व शारीरिक नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत यहोवा आपली मदत कशी करू शकतो? यहोवाने एलीयाला तणावाचा सामना करण्यासाठी कशी मदत केली त्याबद्दल आपण पाहू या. तसंच, इतर काही उदाहरणांवरून आपण शिकू की तणावात असताना आपण यहोवाची मदत कशी स्वीकारू शकतो.

^ परि. 2 या लेखात नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 53 चित्रांचं वर्णन: यहोवाचा देवदूत एलीयाला उठवतो आणि त्याला भाकर व पाणी देतो.

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: हा स्तोत्रकर्ता कदाचित आसाफच्या वंशातला असावा. तो स्तोत्र लिहायचं थांबवून इतर लेवींसोबत गीत गायला लागतो.