व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २७

छळाचा सामना करण्यासाठी आताच तयारी करा

छळाचा सामना करण्यासाठी आताच तयारी करा

“ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सर्वांचा छळ केला जाईल.”—२ तीम. ३:१२.

गीत ५१ यहोवाला जडून राहू!

सारांश *

१. छळाचा सामना करण्यासाठी तयारी करणं गरजेचं का आहे?

आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री प्रभू येशूने म्हटलं होतं की जे कोणी त्याचे शिष्य बनण्याचं निवडतील त्यांचा द्वेष केला जाईल. (योहा. १७:१४) तेव्हापासून ते आजपर्यंत यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांचा त्यांच्या विरोधकांकडून छळ केला जात आहे. (२ तीम. ३:१२) त्यामुळे हे अपेक्षितच आहे की जसजसा या जगाच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ येईल, तसतसं आपले विरोधक जास्त प्रमाणात आपला छळ करतील.—मत्त. २४:९.

२-३. (क) भीतीबद्दल आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

तर मग, छळाचा सामना करण्यासाठी आपण आताच तयारी कशी करू शकतो? आपल्यासोबत कायकाय घडू शकतं त्या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला विचार करण्याची गरज नाही. कारण आपण जर असं केलं तर आपण चिंता आणि भीती यांमुळे भारावून जाऊ. आपण कदाचित इतके घाबरून जाऊ की छळ होण्याआधीच आपण यहोवाची सेवा करण्याचं सोडून देऊ. (नीति. १२:२५; १७:२२) आपला “शत्रू सैतान” भीतीला आपल्याविरुद्ध एका प्रभावशाली शस्त्राप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करतो. (१ पेत्र ५:८, ९) मग छळाचा सामना करण्यासाठी आपण स्वतःला आताच तयार कसं करू शकतो?

या लेखात आपण पाहू की यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आपण आणखी घनिष्ठ कसा करू शकतो आणि आताच त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं का आहे. तसंच, आपलं धैर्य वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलही आपण चर्चा करू. आणि मग शेवटी आपण पाहू की लोक आपला द्वेष करतात तेव्हा आपण काय करू शकतो.

यहोवासोबत असलेलं नातं घनिष्ठ कसं कराल?

४. इब्री लोकांना १३:५, ६ या वचनांनुसार आपल्याला कोणती पक्की खात्री आहे आणि का?

यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला कधीच सोडणार नाही अशी पक्की खात्री बाळगा. (इब्री लोकांना १३:५, ६ वाचा.) खूप वर्षांआधी एका टेहळणी बुरूजमध्ये म्हटलं होतं: “जी व्यक्‍ती देवाला खूप चांगल्या रीतीने ओळखते ती छळ होत असताना त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवेल.” हे शब्द किती खरे आहेत! छळाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपण यहोवावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे. त्याचं आपल्यावर प्रेम नाही असा विचार कधीच आपल्या मनात येऊ नये.—मत्त. २२:३६-३८; याको. ५:११.

५. यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होईल?

यहोवासोबत घनिष्ठ नातं जोडण्याच्या हेतूने बायबलचं दररोज वाचन करा. (याको. ४:८) बायबलचं वाचन करताना यहोवाच्या प्रेमळ गुणांवर लक्ष केंद्रित करा. त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे त्याच्या शब्दांतून आणि कार्यांतून समजण्याचा प्रयत्न करा. (निर्ग. ३४:६) काही लोकांना कोणाकडूनच प्रेम मिळालेलं नसल्यामुळे, यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना समजणं कठीण जाऊ शकतं. जर तुमच्या बाबतीतही हे खरं असेल तर यहोवाने तुमच्यावर वेगवेगळ्या मार्गांनी दया आणि कृपा कशी केली आहे याची रोज एक यादी बनवा. (स्तो. ७८:३८, ३९; रोम. ८:३२) तुमच्या अनुभवामुळे आणि देवाच्या वचनात वाचलेल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे यहोवाने तुमच्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही त्या लिहून काढू शकाल. यहोवाच्या कार्यांबद्दल तुम्ही जितकी जास्त कदर बाळगाल तितकंच तुमचं यहोवासोबत नातं घनिष्ठ होईल.—स्तो. ११६:१, २.

६. स्तोत्र ९४:१७-१९ या वचनांनुसार मनापासून प्रार्थना केल्याने आपल्याला कशी मदत होऊ शकते?

नियमितपणे प्रार्थना करा. कल्पना करा, एका प्रेमळ वडिलांनी आपल्या लहान मुलाला आपल्या कुशीत घेतलं आहे. त्या मुलाला त्या वेळी इतकं सुरक्षित वाटतं, की तो आपल्या वडिलांना दिवसभरात घडलेल्या चांगल्या आणि वाईट, दोन्ही गोष्टी मनमोकळेपणाने सांगतो. आपण जर यहोवाला दररोज मनापासून प्रार्थना केली तर आपणसुद्धा यहोवासोबत अशाच प्रकारचं जवळचं नातं अनुभवू शकू. (स्तोत्र ९४:१७-१९ वाचा.) यहोवाला प्रार्थना करत असताना आपण “आपले मनोगत पाण्यासारखे” ओतले पाहिजे आणि आपल्या प्रेमळ पित्याला मनातल्या सर्व चिंता आणि भीती सांगितली पाहिजे. (विलाप. २:१९) याचा काय परिणाम होईल? बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” अनुभवता येईल. (फिलिप्पै. ४:६, ७) तुम्ही जितकं जास्त या प्रकारे प्रार्थना कराल, तितकं जास्त तुम्हाला यहोवाच्या जवळ आल्यासारखं वाटेल.—रोम. ८:३८, ३९.

यहोवावर आणि त्याच्या राज्यावर भरवसा ठेवल्यामुळे धैर्य उत्पन्‍न होतं

देवाचं राज्य खरं आहे याची पक्की खात्री बाळगल्यामुळे स्टॅनली जोन्सचा विश्‍वास मजबूत झाला (परिच्छेद ७ पाहा)

७. देवाने त्याच्या राज्याबद्दल दिलेली अभिवचनं खरी ठरतील याची आपल्याला पक्की खात्री का असली पाहिजे?

देवाच्या राज्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल पक्की खात्री बाळगा. (गण. २३:१९) या आशीर्वादांबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर सैतानाला आणि त्याच्या साथीदारांना आपल्याला घाबरवणं सोपं जाईल. (नीति. २४:१०; इब्री २:१५) आपण आज देवाच्या राज्यावर आपला विश्‍वास कसा मजबूत करू शकतो? देवाच्या राज्याबद्दलची अभिवचनं आणि ती का खरी ठरतील यांवर अभ्यास करण्यासाठी वेळ काढा. यामुळे आपल्याला कशी मदत होईल? स्टॅनली जोन्स याच्यासोबत काय घडलं ते लक्षात घ्या. आपल्या विश्‍वासामुळे त्याला सात वर्षांसाठी तुरुंगवास सोसावा लागला. त्या वेळी त्याला विश्‍वासू राहायला कशामुळे मदत झाली? तो म्हणतो: “देवाचं राज्य आणि ते भविष्यात काय साध्य करेल यांबद्दल मला माहीत होतं. त्याबद्दल माझ्या मनात कधीच शंका आली नाही आणि त्यामुळे मला कोणीच यहोवापासून दूर करू शकलं नाही.” जर तुम्हाला देवाच्या अभिवचनांवर पक्का भरवसा असेल तर तुम्ही यहोवाच्या जवळ याल आणि तुम्ही कोणत्याही भीतीला बळी पडणार नाही.—नीति. ३:२५, २६.

८. सभांबद्दल आपला जो दृष्टिकोन आहे त्यावरून आपल्याला स्वतःबद्दल काय समजतं? स्पष्ट करा.

ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहा. सभांमुळे आपल्याला यहोवासोबत नातं घनिष्ठ करायला मदत होते. सभांना हजर राहिल्यामुळे आपण भविष्यात येणाऱ्‍या छळाचा किती धीराने सामना करू हे दिसून येतं. (इब्री १०:२४, २५) असं का म्हणता येईल? आपण जर आज लहानसहान गोष्टींमुळे सभा चुकवत असू तर भविष्यात सरकार आपल्या सभांवर बंदी आणेल तेव्हा आपण काय करू? याउलट, आपण जर आज सभांना नियमितपणे हजर राहण्याचा पक्का निर्धार केला, तर पुढे विरोधक आपल्याला एकत्र भेटण्यापासून रोखतील तेव्हा आपण त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही. सभांबद्दल प्रेम विकसित करण्याची हीच वेळ आहे! आपल्याला जर सभांना जायची आवड असेल तर कोणताही विरोध, मग सरकारने बंदी आणली तरी आपण माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करू.—प्रे. कार्ये ५:२९.

बायबलची वचनं आणि राज्यगीतं आताच पाठ केल्यामुळे छळ होत असताना तुम्हाला बळ मिळेल (परिच्छेद ९ पाहा) *

९. छळाचा सामना करण्यासाठी तयारी करण्यात वचनं तोंडपाठ करणं एक चांगला मार्ग का आहे?

आपली आवडती वचनं तोंडपाठ करा. (मत्त. १३:५२) तुमची स्मरणशक्‍ती कदाचित इतकी चांगली नसेल पण यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचा वापर करून तुम्हाला वचनं आठवणीत ठेवायला मदत करू शकतो. (योहा. १४:२६) पूर्व जर्मनीमध्ये एक बांधव एकांत कारावासात शिक्षा भोगत होता. तो काय म्हणतो याकडे लक्ष द्या: “मी २०० पेक्षा जास्त वचनं तोंडपाठ केली होती! तुरुंगात असताना मी बायबलच्या अनेक विषयांवर मनन करू शकलो.” त्या वचनांमुळे या बांधवाला यहोवासोबतचं नातं घनिष्ठ ठेवायला आणि विश्‍वासूपणे धीर धरायला मदत झाली.

(परिच्छेद १० पाहा) *

१०. आपण राज्यगीतं तोंडपाठ का केली पाहिजे?

१० यहोवाची स्तुती करणारी गीतं गा आणि तोंडपाठ करा. फिलिप्पैमध्ये तुरुंगात असताना पौल आणि सीला यांनी गीत गाऊन देवाची स्तुती केली. त्यांना ही गीतं तोंडपाठ होती. (प्रे. कार्ये १६:२५) तसंच, पूर्वीच्या सोव्हियत संघाच्या प्रदेशात राहणाऱ्‍या आपल्या बांधवांना जेव्हा साइबीरियामध्ये पाठवण्यात आलं, तेव्हा त्यांनी आपला विश्‍वास मजबूत कसा ठेवला? मारीया फ्यूडन नावाची बहीण म्हणते: “आम्ही आपल्या गीतपुस्तकातली अनेक गाणी गात होतो, आम्हाला ती तोंडपाठ होती.” बहीण म्हणते की त्या गीतांमुळे सर्वांना खूप प्रोत्साहन मिळालं. तसंच, त्यामुळे त्यांना यहोवाच्या जवळ असल्यासारखंही वाटलं. तुम्ही तुमच्या आवडीचं राज्यगीत गाता तेव्हा तुम्हालाही तजेला मिळतो का? तेव्हा ही गाणी आताच तोंडपाठ करा!—“ आम्हाला हिंमत दे” ही चौकट पाहा.

तुम्ही धैर्य कसं विकसित करू शकता?

११-१२. (क) १ शमुवेल १७:३७, ४५-४७ या वचनांनुसार दावीद इतका धैर्यवान का होता? (ख) दावीदच्या उदाहरणावरून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकतो?

११ छळाचा सामना करण्यासाठी तुम्हाला धैर्याची गरज पडेल. जर तुम्हाला जाणवलं की तुम्हाला धैर्य विकसित करण्याची गरज आहे तर तुम्ही काय करू शकता? नेहमी लक्षात असू द्या की खरं धैर्य हे तुमच्या क्षमतांवर, बळावर किंवा तुमच्या अंगकाठीवर अवलंबून नसतं. दावीदचा विचार करा. त्याने अगदी तरुण वयात गल्याथचा सामना केला. गल्याथच्या तुलनेत दावीद खूपच लहान आणि कमजोर होता. एखाद्या सैनिकासारखं तो युद्धासाठी सज्ज नव्हता. त्याच्याकडे तर तलवारसुद्धा नव्हती. पण तरीही तो खूप धैर्यवान होता. त्या मगरूर गल्याथशी लढण्यासाठी दावीद धैर्याने धावून गेला.

१२ दावीद इतकं धैर्य कशामुळे दाखवू शकला? त्याला पक्का विश्‍वास होता की यहोवा त्याच्यासोबत आहे. (१ शमुवेल १७:३७, ४५-४७ वाचा.) आपल्या तुलनेत गल्याथ किती मोठा आहे यावर दावीदने लक्ष केंद्रित केलं नाही, तर गल्याथ यहोवाच्या तुलनेत किती छोटा आहे याचा दावीदने विचार केला. आपण या अहवालातून काय शिकतो? यहोवा आपल्यासोबत आहे या गोष्टीची पक्की खात्री असल्यामुळे आपल्याला धैर्य मिळतं. तसंच, आपले विरोधक यहोवाच्या तुलनेत अगदीच क्षुल्लक आहेत यावर विचार केल्यामुळेही आपल्याला धैर्य मिळतं. (२ इति. २०:१५; स्तो. १६:८) तर मग, आपला छळ होण्याआधीच आपण आज धैर्य कसं विकसित करू शकतो?

१३. आपण धैर्य कसं विकसित करू शकतो? समजावून सांगा.

१३ देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश इतरांना सांगण्याद्वारे आपण आज धैर्य उत्पन्‍न करू शकतो. असं का म्हणता येईल? कारण प्रचारामुळे आपण यहोवावर भरवसा ठेवायला शिकतो आणि माणसांची भीतीही आपल्यातून निघून जाते. (नीति. २९:२५) व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला जसं बळ मिळतं, तसंच घरोघरचं, सार्वजनिक ठिकाणी, अनौपचारिक रीत्या आणि व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य केल्यामुळे आपलं धैर्य वाढतं. आपण आज जर प्रचार करण्यासाठी धैर्य विकसित केलं, तर भविष्यात आपल्या कामावर बंदी असतानाही आपण धैर्याने प्रचार करत राहण्यासाठी तयार असू.—१ थेस्सलनी. २:१, २.

नॅन्सी यूवानने प्रचारकाम थांबवण्यास साफ नकार दिला (परिच्छेद १४ पाहा)

१४-१५. नॅन्सी यूवान आणि वॅलंटिना गारनोवस्काया यांच्या उदाहरणावरून आपण कोणते धडे शिकू शकतो?

१४ धैर्य दाखवणाऱ्‍या दोन विश्‍वासू बहिणींच्या उदाहरणावरून आपण खूप काही शिकू शकतो. नॅन्सी यूवान या बहिणीची उंची ५ फुटापेक्षा कमी होती, पण कोणीही तिला सहजासहजी घाबरवू शकत नव्हतं. * तिला प्रचारकाम थांबवायला सांगण्यात आलं होतं, पण तिने तसं करण्यापासून साफ नकार दिला. यामुळे तिला चीन देशात २० पेक्षा जास्त वर्षं तुरुंगात काढावे लागले. ज्या अधिकाऱ्‍यांनी तिची चौकशी केली होती, ते म्हणाले की त्यांच्या देशातली “ती सर्वात हट्टी व्यक्‍ती” आहे.

वॅलंटिना गारनोवस्काया हिला पूर्ण खात्री होती की यहोवा तिच्यासोबत आहे (परिच्छेद १५ पाहा)

१५ वॅलंटिना गारनोवस्काया नावाच्या बहिणीला सोव्हियत संघाच्या काळात तीन वेळा तुरुंगात टाकण्यात आलं. तिने एकूण २१ वर्षं तुरुंगात काढली. * यामागचं कारण काय होतं? प्रचार करत राहण्याचा तिचा निर्धार इतका पक्का होता की अधिकाऱ्‍यांनी तिला “खूप धोकादायक अपराधी” असं म्हणून संबोधलं. या दोन्ही बहिणी इतकं धैर्य का दाखवू शकल्या? त्यांना पूर्ण खात्री होती की यहोवा त्यांच्यासोबत आहे.

१६. खरं धैर्य मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे?

१६ आतापर्यंत आपण पाहिलं की धैर्य विकसित करण्यासाठी आपण आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करू नये. याऐवजी, आपण पूर्ण भरवसा बाळगला पाहिजे की यहोवा आपल्यासोबत आहे आणि तो आपल्या वतीने लढत आहे. (अनु. १:२९, ३०; जख. ४:६) खरं धैर्य मिळवण्यासाठी हा भरवसा असणं खूप गरजेचं आहे.

लोक आपला द्वेष करतात तेव्हा आपण काय करू शकतो?

१७-१८. योहान १५:१८-२१ या वचनांमध्ये येशूने आपल्याला कोणता इशारा दिला? स्पष्ट करा.

१७ लोक आपला आदर करतात तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. पण लोकांना आपण आवडत नसलो तर याचा अर्थ असा मुळीच होत नाही की आपली काहीच किंमत नाही. येशूने म्हटलं: “मनुष्याच्या पुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुम्हाला एकटं पाडतात, तुमचा अपमान करतात आणि दुष्ट म्हणून तुमची बदनामी करतात तेव्हा तुम्ही सुखी आहात.” (लूक ६:२२) येशूच्या शब्दांचा काय अर्थ होता?

१८ येशूला असं म्हणायचं नव्हतं, की लोक ख्रिश्‍चनांचा द्वेष करतात तेव्हा त्यांना ते आवडतं. याऐवजी आपल्याला कशी वागणूक मिळेल याबद्दल तो सांगत होता. येशूसारखंच आपणही या जगाचे भाग नाही. आपण येशूच्या शिकवणींनुसार जीवन जगतो आणि त्याने सांगितलेल्या संदेशाचा प्रचार करतो. यामुळे सर्व लोक आपला द्वेष करतात. (योहान १५:१८-२१ वाचा.) आपल्याला यहोवाचं मन आनंदित करायचं आहे. यहोवावर प्रेम करत असल्यामुळे लोक जर आपला द्वेष करत असतील, तर मग आपल्याला वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही.

१९. आपण प्रेषितांच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

१९ लोक आपल्याबद्दल जे बोलतात किंवा आपल्याशी जसा व्यवहार करतात त्यामुळे आपल्याला कधीही यहोवाचे साक्षीदार असण्याची लाज वाटू नये. (मीखा ४:५) लोक काय बोलतील या भीतीवर मात करण्यासाठी आपण यरुशलेममधल्या प्रेषितांच्या उदाहरणावर विचार करू शकतो. येशूला ठार मारल्यानंतर यहुदी धार्मिक पुढारी त्यांचाही खूप द्वेष करायचे. आणि याची प्रेषितांना जाणीव होती. (प्रे. कार्ये ५:१७, १८, २७, २८) असं असलं तरीही, ते दररोज मंदिरात जाऊन शिकवायचे आणि आपली ओळख येशूचे शिष्य म्हणून करून द्यायचे. (प्रे. कार्ये ५:४२) ते घाबरून गेले नाहीत. आपल्यालाही लोकांच्या भीतीवर मात करायची असेल, तर आपण नेहमी सर्वांसमोर आपली ओळख यहोवाचे साक्षीदार म्हणून करून दिली पाहिजे. हे आपण कामावर, शाळेत आणि राहतो त्या ठिकाणी करू शकतो.—प्रे. कार्ये ४:२९; रोम. १:१६.

२०. लोक प्रेषितांचा द्वेष करत असले तरीही ते आनंदी का होते?

२० प्रेषित आपला आनंद का टिकवून ठेवू शकले? लोक त्यांचा द्वेष का करत आहेत यामागचं कारण त्यांना माहीत होतं. आणि यहोवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे होणाऱ्‍या छळाला त्यांनी आदराची गोष्ट समजली. (लूक ६:२३; प्रे. कार्ये ५:४१) प्रेषित पेत्रने नंतर असं म्हटलं: “न्यायनीतीने वागल्यामुळे जरी तुम्हाला दुःख सोसावे लागले, तरी तुम्ही सुखी आहात.” (१ पेत्र २:१९-२१; ३:१४) योग्य ते करण्यासाठी आपला द्वेष केला जात आहे हे माहीत असल्यामुळे, आपण लोकांच्या भीतीला कधीच आपल्या सेवेच्या आड येऊ देणार नाही.

आताच तयारी केल्यामुळे पुढे फायदा होईल

२१-२२. (क) छळाचा सामना करायला तयार होण्यासाठी तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२१ आपल्याविरुद्ध छळाची लाट कधी उसळेल किंवा आपल्या कामावर पूर्णपणे बंदी कधी घालण्यात येईल हे आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही. पण आपण यहोवासोबतचा आपला नातेसंबंध घनिष्ठ करून येणाऱ्‍या संकटांसाठी आताच तयारी करू शकतो. तसंच, धैर्य विकसित करण्याद्वारे आणि लोकांच्या भीतीवर मात करण्याद्वारेही आपण तयारी करू शकतो. आपण आज जी काही तयारी करू त्यामुळे आपल्याला भविष्यात विश्‍वासात टिकून राहायला मदत होईल.

२२ पण समजा आपल्या कामावर बंदी घालण्यात आली तेव्हा काय? पुढच्या लेखात आपण बायबलच्या अशा काही तत्त्वांवर चर्चा करू ज्यामुळे बंदी असतानाही यहोवाची सेवा करत राहण्यासाठी आपल्याला मदत होईल.

गीत ५४ खरा विश्‍वास बाळगू या!

^ परि. 5 लोकांनी आपला द्वेष करावा अशी आपली मुळीच इच्छा नाही. पण आज न उद्या आपल्या सर्वांनाच छळाचा सामना करावा लागणार आहे. छळाचा धैर्याने सामना करण्यासाठी हा लेख आपल्याला मदत करेल.

^ परि. 14 इंग्रजीमध्ये टेहळणी बुरूज १५ जुलै, १९७९ पृ. ४-७ पाहा. जेहोवास नेम विल बी मेड नोन हा व्हिडिओ JW ब्रॉडकास्टिंगवर INTERVIEWS AND EXPERIENCES यात पाहा.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: कौटुंबिक उपासनेदरम्यान आईवडील कार्ड्‌सचा उपयोग करून मुलांना वचनं तोंडपाठ करायला मदत करतात.

^ परि. 69 चित्रांचं वर्णन: सभांना जाताना एक कुटुंब गाडीत राज्यगीतांचा सराव करतं.