व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २८

बंदी असतानाही यहोवाची उपासना करत राहा

बंदी असतानाही यहोवाची उपासना करत राहा

“ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.”—प्रे. कार्ये ४:१९, २०.

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश *

१-२. (क) आपल्या उपासनेवर बंदी घातली जाते तेव्हा आपल्याला आश्‍चर्य का वाटू नये? (ख) या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?

२०१८ सालच्या अहवालानुसार २,२३,००० पेक्षा जास्त प्रचारक अशा देशांतले आहेत जिथे आपल्या कार्यावर बंदी किंवा तीव्र प्रमाणात प्रतिबंध आहेत. हे ऐकून आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. कारण आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना छळाचा सामना करावा लागेल हे अपेक्षित आहे. (२ तीम. ३:१२) आपण कुठेही राहत असलो तरी, यहोवाच्या उपासनेवर सरकार अचानक आणि अनपेक्षितपणे बंदी घालू शकतं.

आपण राहत असलेल्या ठिकाणी जर सरकारने आपल्या उपासनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तर तुम्ही स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकता: छळ होत असल्याचा अर्थ देवाची स्वीकृती गमावणं असा होतो का? बंदी आली म्हणजे आपण यहोवाची उपासना करू शकत नाही असं आहे का? मी दुसऱ्‍या देशात राहायला गेलं पाहिजे का जिथे मला मोकळेपणाने यहोवाची उपासना करता येईल? या लेखात या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल. आपल्या कार्यावर जरी बंदी घालण्यात आली तरी आपण यहोवाची उपासना कशी करत राहू शकतो आणि आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हेही आपण पाहणार आहोत.

छळाचा अर्थ आपण देवाची स्वीकृती गमावली आहे असा होतो का?

३. २ करिंथकर ११:२३-२७ वचनांनुसार प्रेषित पौलला कोणत्या छळाचा सामना करावा लागला आणि त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

सरकार आपल्या उपासनेवर बंदी घालतं तेव्हा आपल्या मनात असा चुकीचा विचार येऊ शकतो की आपल्यावर देवाचा आशीर्वाद नाही. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की छळ होत असल्याचा अर्थ यहोवा आपल्यावर नाखूश आहे असा होत नाही. प्रेषित पौलचं उदाहरण लक्षात घ्या. देव पौलवर नक्कीच खूश होता. त्याला ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातली १४ पत्रं लिहिण्याचा बहुमान मिळाला. तसंच, त्याला प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे पाठवण्यात आलं. असं असलं तरी त्याला तीव्र छळाचा सामना करावा लागला. (२ करिंथकर ११:२३-२७ वाचा.) प्रेषित पौलच्या उदाहरणावरून आपण शिकतो की यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना छळाला सामोरं जाऊ देतो.

४. जग आपला द्वेष का करतं?

आपल्याला छळाचा सामना का करावा लागेल याबद्दल येशूने समजावलं. त्याने म्हटलं की आपण जगाचा भाग नसल्यामुळे आपला द्वेष केला जाईल. (योहा. १५:१८, १९) आपला छळ होतो तेव्हा यहोवाचा आशीर्वाद आपल्यावर नाही असा याचा अर्थ होत नाही. उलट, आपण योग्य तेच करत असल्याचं दिसून येतं!

बंदीचा अर्थ आपण यहोवाची उपासना करू शकणार नाही असा होतो का?

५. विरोध करणारे सर्वसमर्थ देव यहोवा याच्या उपासनेवर बंदी आणू शकतात का? स्पष्ट करा.

विरोध करणारे, सर्वसमर्थ देव यहोवा याच्या उपासनेवर बंदी आणू शकत नाही. बऱ्‍याच जणांनी असं करण्याचा प्रयत्न केला आहे पण ते अपयशी ठरले आहेत. दुसऱ्‍या महायुद्धात काय झालं यावर विचार करा. त्या वेळी बऱ्‍याचशा देशातल्या सरकारांनी देवाच्या लोकांचा तीव्रपणे छळ केला. यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर जर्मनीच्या नात्झी दलाने बंदी घातली होती. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर देशांतल्या सरकारांनीही आपल्या कामावर बंदी घातली होती. असं असलं तरी काय घडलं याकडे लक्ष द्या. १९३९ मध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा जगभरात ७२,४७५ प्रचारक होते. पण एका रिपोर्टनुसार १९४५ मध्ये युद्धाच्या शेवटी यहोवाच्या आशीर्वादामुळे प्रचारकांची संख्या १,५६,२९९ इतकी झाली. प्रचारकांची संख्या दुप्पटपेक्षा जास्त वाढली होती!

६. छळामुळे कोणती सकारात्मक गोष्ट घडू शकते? उदाहरण द्या.

विरोधामुळे आपण घाबरून जात नाही, याउलट यहोवाची सेवा करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होऊ शकतो. उदाहरणार्थ, एक जोडपं आणि त्यांचा मुलगा अशा देशात राहात होते जिथे सरकारने आपल्या उपासनेवर बंदी घातली होती. पण, त्या जोडप्याने भीतीमुळे माघार घेण्याऐवजी नियमित पायनियरींग सुरू केली. पत्नीने चांगल्या पगाराची नोकरी सोडली. पती म्हणतात की बंदीमुळे बरेच लोक यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांना बायबल अभ्यास सुरू करायला सोपं झालं. बंदीमुळे इतरांवर आणखी एक चांगला परिणाम झाला. त्याच देशातल्या एका वडिलांनी म्हटलं की यहोवाची सेवा करण्याचं सोडून दिलेले बरेच लोक आता नियमितपणे सभांना येतात आणि सक्रियपणे यहोवाची सेवा करतात.

७. (क) लेवीय २६:३६, ३७ या वचनांतून आपण काय शकतो? (ख) बंदी असल्यावर तुम्ही काय करणार?

विरोधक जेव्हा आपल्या उपासनेवर बंदी घालतात तेव्हा त्यांची इच्छा असते की आपण घाबरून जावं आणि यहोवाची सेवा बंद करावी. बंदी आणण्यासोबतच, ते आपल्याबद्दल अफवा पसरवू शकतात, आपल्या घराची झडती घेण्यासाठी अधिकाऱ्‍यांना पाठवू शकतात, आपल्याला कोर्टात खेचू शकतात किंवा आपल्यापैकी काहींना तुरुंगात टाकू शकतात. आपल्यापैकी काहींना तुरुंगात टाकण्यात यश आल्यामुळे त्यांना वाटू शकतं की आपण घाबरून जाऊ. आपण जर त्यांच्या भीतीला बळी पडलो तर आपण कदाचित स्वतःच आपल्या उपासनेवर ‘बंदी’ आणू. आपल्याला लेवीय २६:३६, ३७ या वचनांत सांगितलेल्या लोकांसारखं बनण्याची मुळीच इच्छा नाही. (वाचा.) भीतीमुळे आपण यहोवाची सेवा थांबवणार नाही किंवा कमी करणार नाही. आपण पूर्णपणे यहोवावर भरवसा ठेवतो आणि भयभीत होत नाही. (यश. २८:१६) आपण मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना करतो. आपल्याला माहीत आहे की यहोवाच्या मदतीमुळे सर्वात शक्‍तिशाली सरकारसुद्धा आपल्याला विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करण्यापासून रोखू शकत नाही.—इब्री १३:६.

बंदी नसलेल्या देशात राहायला जावं का?

८-९. (क) प्रत्येक ख्रिश्‍चनाने स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी कोणता वैयक्‍तिक निर्णय घेतला पाहिजे? (ख) एखाद्या व्यक्‍तीला योग्य निर्णय घेण्यासाठी कोणती गोष्ट मदत करेल?

आपण राहत असलेल्या ठिकाणी सरकारने आपल्या उपासनेवर बंदी आणली तर आपण कदाचित विचार करू, की ‘आपल्या उपासनेवर बंदी नसलेल्या देशात जावं का?’ हा निर्णय वैयक्‍तिक आहे आणि इतर कोणीही आपल्यासाठी हा निर्णय घेऊ शकत नाही. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा छळ झाला तेव्हा त्यांनी काय केलं यावर विचार केल्याने एका व्यक्‍तीला मदत होऊ शकते. स्तेफनला दगडमार करून ठार मारण्यात आलं तेव्हा यरुशलेममध्ये असलेल्या ख्रिस्ती लोकांची पांगापांग झाली. ते यहूदीया, शोमरोन तसंच, दूरवर असलेल्या फेनीके, कुप्र आणि अंत्युखिया या ठिकाणी गेले. (मत्त. १०:२३; प्रे. कार्ये ८:१; ११:१९) पण दुसरीकडे पाहता एक व्यक्‍ती कदाचित पौलच्या उदाहरणाचाही विचार करेल. काही काळानंतर दुसऱ्‍यांदा छळाची लाट आली तेव्हा प्रेषित पौलने विरोध असतानाही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. तो आपला जीव धोक्यात घालून आनंदाचा संदेश सांगत राहिला आणि त्या शहरात तीव्र छळाचा सामना करत असलेल्या बांधवांना प्रोत्साहन देत राहिला.—प्रे. कार्ये १४:१९-२३.

या अहवालांतून आपण काय शिकतो? दुसऱ्‍या ठिकाणी जाण्याबद्दल कुटुंबप्रमुखाने वैयक्‍तिक निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेण्याआधी कुटुंबप्रमुखाने प्रार्थनापूर्वक आणि काळजीपूर्वक आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. तसंच, दुसऱ्‍या ठिकाणी जाण्याचे त्यांच्यावर कोणते चांगले आणि वाईट परिणाम होतील यावरही त्याने विचार केला पाहिजे. याबाबतीत प्रत्येक ख्रिश्‍चनाने “स्वतःचा भार” वाहिला पाहिजे. (गलती. ६:५) इतर जण याबाबतीत जे काही निर्णय घेतात त्यावरून आपण त्यांच्याबद्दल मत बनवू नये.

बंदी असताना आपण उपासना कशी करू शकतो?

१०. शाखा कार्यालय आणि वडील कोणतं मार्गदर्शन देतील?

१० बंदी असलेल्या ठिकाणी आपण यहोवाची उपासना कशी करत राहू शकतो? शाखा कार्यालय मंडळीतल्या वडिलांना आध्यात्मिक अन्‍न कसं मिळवायचं, उपासनेसाठी एकत्र कसं यायचं आणि आनंदाच्या संदेशाचा प्रचार कसा करायचा यांबद्दल मार्गदर्शन आणि व्यावहारिक सल्ले देईल. जर शाखा कार्यालय मंडळीतल्या वडिलांना संपर्क करू शकलं नाही तर वडील तुम्हाला आणि मंडळीतल्या सर्वांना यहोवाची उपासना करत राहण्यासाठी मदत करतील. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशनांवर आधारित असेल.—मत्त. २८:१९, २०; प्रे. कार्ये ५:२९; इब्री १०:२४, २५.

११. आपल्याला आध्यात्मिक अन्‍न दिलं जाईल याची खातरी आपण का बाळगली पाहिजे आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

११ यहोवा आपल्या सेवकांना आध्यात्मिक रीतीने तृप्त करेल असं अभिवचन त्याने दिलं आहे. (यश. ६५:१३, १४; लूक १२:४२-४४) आपण खातरी बाळगू शकतो की आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी यहोवाची संघटना आपल्याला मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. पण त्यासोबतच आपणसुद्धा काहीतरी करू शकतो. तुमचं बायबल आणि इतर प्रकाशनं लपवून ठेवण्यासाठी एक चांगली जागा शोधून ठेवा. ही मौल्यवान प्रकाशनं अशा ठिकाणी ठेवू नका ज्यामुळे ती सहज कोणाच्याही हाती लागतील, मग ती छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असोत. प्रत्येकाला आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी व्यावहारिक पावलं उचलण्याची गरज आहे.

यहोवाच्या मदतीने आपण निर्भयपणे त्याच्या उपासनेसाठी एकत्र येऊ शकतो (परिच्छेद १२ पाहा) *

१२. लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून वडील कशा प्रकारे सभा आयोजित करू शकतात?

१२ बंदी आल्यावर आपल्या सभा कशा चालवण्यात येतील? वडील अशा प्रकारे सभा आयोजित करतील ज्यामुळे आपण विरोधकांच्या नजरेत येणार नाही. ते कदाचित आपल्याला छोट्या गटांमध्ये एकत्र यायला सांगतील आणि बऱ्‍याचदा सभेची वेळ आणि ठिकाण यांत बदल करत राहतील. सभांना येताना किंवा तिथून निघाल्यावर आपण आपसांत मोठमोठ्याने बोलण्याचं टाळू. असं केल्यामुळे आपण आपल्या बांधवांच्या सुरक्षिततेचा विचार करत असू. सभांसाठी कदाचित आपल्याला अशा प्रकारचे कपडे घालावे लागतील जे खूप साधे असतील. यामुळे आपण लोकांच्या नजरेत येणार नाही.

सरकारने बंदी घातली तरी आपण प्रचार करत राहणार (परिच्छेद १३ पाहा) *

१३. पूर्वीचा सोव्हिएत संघ इथल्या बांधवांकडून आपण काय शिकतो?

१३ प्रचार करण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असेल. पण आपलं यहोवावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगायला आवडतं, म्हणून आपण प्रचार करत राहण्याचे मार्ग शोधू. (लूक ८:१; प्रे. कार्ये ४:२९) ऍमीली बी. बेरएन नावाची इतिहासकार यांनी पूर्वीचा सोव्हिएत संघ इथल्या, यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचारकार्याबद्दल असं म्हटलं: “सरकारने यहोवाच्या साक्षीदारांना आदेश दिला की त्यांनी आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगू नये. तरी साक्षीदार आपल्या शेजाऱ्‍यांना, सहकर्मचाऱ्‍यांना आणि आपल्या मित्रांना प्रचार करत राहिले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना सक्‍तमजुरी करण्यासाठी छावणीत पाठवण्यात आलं. तिथेही साक्षीदारांनी इतर कैद्यांना प्रचार केला.” सोव्हिएत संघ इथे बंदी होती तरी साक्षीदारांनी प्रचार करण्याचं थांबवलं नाही. जर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी प्रचारकार्यावर बंदी आली तर तुम्ही या साक्षीदारांचं अनुकरण करू शकता.

आपण कोणत्या गोष्टींपासून सावध असलं पाहिजे?

कधी शांत राहायचं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे (परिच्छेद १४ पाहा) *

१४. स्तोत्र ३९:१ या वचनात कोणता इशारा दिला आहे?

१४ माहिती देण्याबाबतीत सावधगिरी बाळगा. बंदी असताना आपण “मौन धरण्याचा समय” ओळखला पाहिजे. (उप. ३:७) आपण गोपनीय माहिती सुरक्षित ठेवली पाहिजे. जसं की, आपल्या बंधुभगिनींची नावं, एकत्र येण्याचं ठिकाण, आपलं प्रचारकार्य कसं चालवलं जातं आणि आपल्याला आध्यात्मिक अन्‍न कसं पुरवलं जातं. ही माहिती आपण सरकारी अधिकाऱ्‍यांना देणार नाही. तसंच, आपल्या किंवा दुसऱ्‍या देशात राहणाऱ्‍या आपल्या मित्रांना व नातेवाइकांनाही सांगणार नाही. पण आपण जर ही माहिती त्यांना सांगितली तर आपण आपल्या बांधवांचा जीव धोक्यात घालत असू.—स्तोत्र ३९:१ वाचा.

१५. सैतान आपल्यासोबत काय करण्याचा प्रयत्न करेल आणि आपण काय केलं पाहिजे?

१५ लहान-सहान समस्यांमुळे आपसांत फूट पडू देऊ नका. एखाद्या घरात फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही हे सैतानाला माहीत आहे. (मार्क ३:२४, २५) सैतान आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याशी लढण्याऐवजी आपसांत लढत राहावं.

१६. बहीण गर्टरुड पोएट्‌जिंगर यांनी आपल्यासमोर कोणतं चांगलं उदाहरण मांडलं?

१६ अनुभवी ख्रिश्‍चनांनासुद्धा या पाशात अडकण्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. दोन अभिषिक्‍त बहिणींच्या उदाहरणावर विचार करा. गर्टरुड पोएट्‌जिंगर आणि एलफ्रिडे लोअर या दोघी इतर बहिणींसोबत नात्झी छळछावणीच्या तुरुंगात होत्या. एलफ्रिडेने जेव्हा छावणीतल्या इतर बहिणींना प्रोत्साहनदायक भाषणं दिली तेव्हा गर्टरुडला तिचा हेवा वाटू लागला. पण नंतर गर्टरुडला याबद्दल वाईट वाटलं आणि तिने यहोवाला प्रार्थना केली. याबद्दल तिने लिहिलं: “इतरांकडे आपल्यापेक्षा जास्त कौशल्य किंवा जबाबदाऱ्‍या असतात, ही गोष्ट आपण मान्य करायला शिकलं पाहिजे. गर्टरुडने तिच्या मनात असलेल्या हेव्यावर कशी मात केली? तिने एलफ्रिडेच्या चांगल्या गुणांवर आणि मैत्रीपूर्ण स्वभावावर लक्ष केंद्रित केलं. अशा प्रकारे ती एलफ्रिडेसोबत पुन्हा चांगलं नातं जोडू शकली. दोघींचीही छळछावणीतून सुटका झाली आणि पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत त्यांनी विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली. आपण आपल्या बांधवासोबत असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपल्यात फूट पडणार नाही.—कलस्सै. ३:१३, १४.

१७. संघटनेकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं आपण नेहमी पालन का केलं पाहिजे?

१७ नेहमी मार्गदर्शनाचं पालन करा. आपण जर भरवशालायक आणि जबाबदार बांधवांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं तर आपल्याला अनावश्‍यक समस्या टाळता येतील. (१ पेत्र ५:५) उदाहरणार्थ, बंदी असलेल्या एका देशात जबाबदार बांधवांनी प्रचारकांना असं मार्गदर्शन दिलं की त्यांनी सेवाकार्यात छापील साहित्यं देऊ नये. तरीपण, त्या क्षेत्रातल्या एका पायनियर बांधवाने मार्गदर्शनाचं पालन केलं नाही आणि लोकांना साहित्यं दिली. याचा काय परिणाम झाला? त्या बांधवाचं आणि इतर काहींचं अनौपचारिक साक्षकार्य संपल्यावर काही वेळेतच तिथे पोलीस आले आणि त्यांनी त्यांना प्रश्‍न विचारले. खरंतर, अधिकाऱ्‍यांनी त्यांचा पाठलाग केला होता आणि साक्षीदारांनी लोकांना वाटलेली साहित्यं त्यांनी गोळा केली. या अनुभवातून आपण काय शिकतो? एखादं मार्गदर्शन आपल्याला पटत नसलं तरीसुद्धा आपण त्याचं पालन केलं पाहिजे. यहोवाने नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांना नेमलं आहे आणि जेव्हा आपण त्यांना सहकार्य देतो तेव्हा यहोवाचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असतो.—इब्री १३:७, १७.

१८. अनावश्‍यक नियम बनवण्याचं का टाळलं पाहिजे?

१८ अनावश्‍यक नियम बनवू नका. जर वडिलांनी अनावश्‍यक नियम बनवले तर बांधवांना त्यांचं पालन करणं अवघड होईल. पूर्वीच्या चेकोस्लोवाकिया या ठिकाणी बंदी असताना काय घडलं याबद्दल बंधू युराय कॅमनस्की म्हणतात: “जबाबदार बांधवांना आणि बऱ्‍याच वडिलांना अटक झाल्यानंतर, विभागात आणि मंडळीत पुढाकार घेणारे बांधव स्वतःच्या मनाने प्रचारकांसाठी नियम बनवू लागले. प्रचारकांनी काय करावं आणि काय करू नये हे ते त्यांना सांगू लागले.” इतरांसाठी वैयक्‍तिक निर्णय घेण्याचा अधिकार यहोवाने आपल्याला दिलेला नाही. जो कोणी अनावश्‍यक नियम बनवतो तो बांधवांच्या सुरक्षेसाठी नाही, तर बांधवांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवण्यासाठी तसं करतो.—२ करिंथ. १:२४.

यहोवाची उपासना करणं कधीच सोडू नका

१९. सैतानाने कितीही प्रयत्न केले तरी २ इतिहास ३२:७, ८ या वचनांतून आपल्याला कोणता भरवसा मिळतो?

१९ आपला मुख्य शत्रू सैतान, यहोवाच्या विश्‍वासू सेवकांचा छळ करत राहील. (१ पेत्र ५:८; प्रकटी. २:१०) सैतान आणि त्याचे साथीदार आपल्या उपासनेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला भीती वाटली तरी आपण यहोवाची सेवा कधीच सोडणार नाही! (अनु. ७:२१) यहोवा आपल्यासोबत आहे आणि आपल्या कार्यावर बंदी आली तरी तो आपल्याला मदत करत राहील.२ इतिहास ३२:७, ८ वाचा.

२०. तुम्ही कोणता निर्धार केला आहे?

२० पहिल्या शतकातल्या बांधवांप्रमाणे आपलाही निर्धार पक्का असला पाहिजे. त्यांनी अधिकाऱ्‍यांना म्हटलं होतं: “आम्ही देवापेक्षा तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, हे तुम्हीच ठरवा. पण आमच्याविषयी विचाराल, तर ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.”—प्रे. कार्ये ४:१९, २०.

गीत ३३ वैऱ्‍यांना भिऊ नको!

^ परि. 5 आपण करत असलेल्या यहोवाच्या उपासनेवर सरकार बंदी घालतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे? अशा वेळी, आपण काय करावं आणि काय करू नये यांबद्दल या लेखात व्यावहारिक सल्ले दिले आहेत. यामुळे आपल्याला यहोवाची उपासना करत राहायला मदत होईल.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: सर्व चित्रं अशा साक्षीदारांची आहेत जे बंदी असलेल्या देशांत सेवा करतात. एका बांधवाच्या घरात सामान ठेवण्याच्या खोलीत एक छोटासा गट सभेसाठी एकत्रित आला आहे.

^ परि. 61 चित्रांचं वर्णन: डाव्या बाजूला असलेली बहीण एका स्त्रीसोबत मैत्रीपूर्ण संभाषण करत आहे आणि तिला यहोवाबद्दल सांगण्याची संधी शोधते.

^ परि. 63 चित्रांचं वर्णन: पोलीस एका बांधवाला प्रश्‍न विचारत आहेत पण बांधव त्याच्या मंडळीबद्दल माहिती द्यायला नकार देतो.