व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४०

शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात व्यस्त राहा!

शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात व्यस्त राहा!

“खंबीर व स्थिर राहा; आणि प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.”—१ करिंथ. १५:५८.

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

सारांश *

१. आपल्याला पक्की खातरी का आहे की आपण “शेवटल्या दिवसात” जगत आहोत?

तुमचा जन्म १९१४ नंतर झाला असेल तर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य या जगाच्या व्यवस्थेच्या “शेवटच्या दिवसांत” घालवलं आहे असं म्हणता येईल. (२ तीम. ३:१) आपण सर्वांनीच येशूने भाकीत केलेल्या या शेवटच्या दिवसांमधल्या घटनांबद्दल ऐकलं असेल. त्या घटनांपैकी काही घटना म्हणजे युद्ध, दुष्काळ, भूकंप, रोगांच्या साथी, वाढती अनीती आणि यहोवाच्या लोकांचा छळ. (मत्त. २४:३, ७-९, १२; लूक २१:१०-१२) प्रेषित पौलने सांगितलं होतं, की या काळातले लोक कसे असतील. आणि ही गोष्टही पूर्ण होताना आपण पाहिली असेल. (“ आज लोक कसे आहेत.” ही चौकट पाहा.) यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला पक्की खातरी आहे की आपण “शेवटल्या दिवसात” जगत आहोत.—मीखा ४:१.

२. आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेतली पाहिजेत?

१९१४ पासून बरीच वर्षं सरली आहेत. त्यामुळे आता आपण म्हणू शकतो की आपण शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात येऊन पोहोचलो आहोत. अंत इतका जवळ आहे हे माहीत असल्यामुळे आपल्याला काही महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायला हवीत: शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात कोणकोणत्या घटना घडतील? या घटना घडणार आहेत तोपर्यंत आपण काय करत राहावं अशी यहोवाची अपेक्षा आहे?

शेवटच्या दिवसांच्या शेवटी काय घडेल?

३. १ थेस्सलनीकाकर ५:१-३ या वचनांत दिलेल्या भविष्यवाणीनुसार राष्ट्रं कोणती घोषणा करतील?

१ थेस्सलनीकाकर ५:१-३ वाचा. या वचनांत पौलने “यहोवाचा दिवस” असा उल्लेख केला. या संदर्भात हा वाक्यांश एका कालावधीला सूचित करतो. हा कालावधी, मोठ्या बाबेलवर म्हणजे जगभरातल्या खोट्या धर्माच्या साम्राज्यावर हल्ला होईल तेव्हा सुरू होईल आणि हर्मगिदोनच्या युद्धाने संपेल. (प्रकटी. १६:१४, १६; १७:५) यहोवाचा “दिवस” सुरू होण्याआधी राष्ट्रं “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी घोषणा करतील. आजही राष्ट्रांना आपसांत चांगले संबंध स्थापित करायचे असतात तेव्हा कधीकधी जगभरातले नेते यांसारख्याच शब्दांचा वापर करतात. * पण बायबलमध्ये दिलेली “शांती आहे, सुरक्षा आहे!” ही घोषणा त्यांपेक्षा वेगळी असेल. असं का? कारण असं घडेल तेव्हा लोकांना वाटेल की जगातल्या नेत्यांना या संपूर्ण पृथ्वीवर शांती आणण्यात आणि तिला सुरक्षित बनवण्यात यश मिळालं आहे. पण खरं पाहिलं तर, “मोठं संकट” सुरू झाल्यावर “अचानक नाश” येईल.—मत्त. २४:२१.

राष्ट्रांनी केलेल्या “शांती आहे, सुरक्षा आहे!” या घोषणेला फसू नका (परिच्छेद ३-६ पाहा) *

४. (क) “शांती आहे, सुरक्षा आहे!” या घोषणेबद्दल कोणत्या गोष्टी अजून माहीत व्हायच्या बाकी आहेत? (ख) आपल्याला त्याबद्दल कोणत्या गोष्टी माहीत आहेत?

“शांती आहे, सुरक्षा आहे!” या घोषणेबद्दल आपल्याला काही गोष्टी माहीत आहेत. पण अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत. जसं की, जगातले शासक ही घोषणा कोणत्या कारणांमुळे आणि कशा प्रकारे करतील हे आपल्याला माहीत नाही. तसंच, याबद्दल अनेक घोषणा केल्या जातील की फक्‍त एकच मोठी घोषणा होईल हेही आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला एक गोष्ट मात्र पक्की माहीत आहे, की मानवी शासक कधीच शांती आणू शकणार नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या अशा कोणत्याही घोषणेला आपण फसू नये. तर याउलट, बायबल म्हणतं की आपण या घोषणेबद्दल सतर्क राहिलं पाहिजे, कारण हा “यहोवाचा दिवस” सुरू होण्याचा इशारा असेल!

५. १ थेस्सलनीकाकर ५:४-६ ही वचनं आपल्याला यहोवाच्या दिवसासाठी तयार व्हायला कशी मदत करतात?

१ थेस्सलनीकाकर ५:४-६ वाचा. ‘यहोवाच्या दिवसासाठी’ आपण तयार आहोत याची खातरी करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याबद्दल पौलने सांगितलं. त्याने म्हटलं, “आपण इतरांप्रमाणे झोपेत राहू नये तर जागे व सावध” राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपण निष्पक्ष राहिलं पाहिजे आणि कोणत्याही राजनैतिक गोष्टींमध्ये सहभाग घेण्याचं टाळलं पाहिजे. कारण आपण या गोष्टींमध्ये सहभाग घेतला, तर याचा अर्थ आपण “जगाचा भाग” आहोत असा होईल. (योहा. १५:१९) आपल्याला ही पक्की खातरी आहे की देवाचं राज्यच या जगात शांती आणू शकतं.

६. आपण इतरांना काय करण्यासाठी मदत केली पाहिजे आणि का?

स्वतः सतर्क राहण्यासोबत आपण इतरांनाही “जागे” राहायला मदत केली पाहिजे. या जगात कोणकोणत्या घटना घडणार आहेत, याबद्दल बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण इतरांना सांगितल्या पाहिजेत. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एकदा मोठं संकट सुरू झालं की यहोवाची उपासना करण्याची संधी लोकांकडे नसेल, कारण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे आताच प्रचार करणं खूप महत्त्वाचं आहे. *

प्रचारकार्यात व्यस्त राहा

आज आपण प्रचार करतो तेव्हा आपण दाखवतो की फक्‍त देवाचं राज्यच या जगात खऱ्‍या अर्थाने शांती आणि सुरक्षा आणू शकतं (परिच्छेद ७-९ पाहा)

७. यहोवा आपल्याकडून आज कोणती अपेक्षा करत आहे?

तो “दिवस” यायला थोडाच काळ राहिला आहे आणि म्हणून यहोवाची इच्छा आहे की आपण प्रचारकार्यात व्यस्त राहावं. आपण “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत” आहोत की नाही याची आपण नेहमी खातरी करून घेतली पाहिजे. (१ करिंथ. १५:५८) आपण कोणत्या कामात व्यस्त राहू याबद्दल येशूने आधीच सांगितलं होतं. शेवटच्या दिवसांत कोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडतील त्याबद्दल सांगताना त्याने हेही म्हटलं, की “तसंच, सर्व राष्ट्रांत आधी राज्याविषयीच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाणं गरजेचं आहे.” (मार्क १३:४, ८, १०; मत्त. २४:१४) जरा विचार करा, प्रत्येक वेळी तुम्ही प्रचाराला जाता, तेव्हा खरंतर तुम्ही बायबलमधली ही भविष्यवाणी पूर्ण करण्यात हातभार लावत असता.

८. प्रचारकांच्या संख्येत कशा प्रकारे वाढ होत चालली आहे?

आजपर्यंत प्रचारकार्यात झालेल्या प्रगतीबद्दल आपण काय म्हणू शकतो? प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त लोक राज्याचा आनंदाचा संदेश ऐकत आहेत. उदाहरणार्थ, शेवटच्या दिवसांत जगभरात प्रचारकांच्या संख्येत किती वाढ झाली आहे त्याबद्दल विचार करा. १९१४ मध्ये ४३ देशांत ५,१५५ प्रचारक होते आणि आज २४० देशांत जवळपास ८५ लाख प्रचारक आहेत! पण असं असलं तरी आपलं काम अजून संपलेलं नाही. मानवजातीच्या सर्व समस्यांवर देवाचं राज्य हा एकमेव उपाय आहे आणि त्याबद्दल आपण प्रचार करत राहिला पाहिजे.—स्तो. १४५:११-१३.

९. आपण प्रचार का करत राहिला पाहिजे?

प्रचाराचं कार्य आता पूर्ण झालं आहे असं जोपर्यंत यहोवा म्हणत नाही, तोपर्यंत आपण प्रचार करत राहिला पाहिजे. यहोवा देवाला आणि येशू ख्रिस्ताला जाणून घेण्यासाठी लोकांकडे आज किती वेळ उरला आहे? (योहा. १७:३) हे आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे पक्कं माहीत आहे, की मोठं संकट सुरू होईपर्यंत “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असणाऱ्‍या प्रत्येकाकडे आनंदाचा संदेश स्वीकारण्याची आणि यहोवाची सेवा करण्याची संधी आहे. (प्रे. कार्ये १३:४८) वेळ निघून जायच्या आत आपण या लोकांना कशी मदत करू शकतो?

१०. लोकांना सत्य शिकवण्यासाठी यहोवाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिल्या आहेत?

१० लोकांना सत्य शिकवण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, त्या सर्व यहोवा आपल्याला त्याच्या संघटनेद्वारे पुरवतो. जसं की, प्रत्येक आठवडी आपल्याला आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत प्रशिक्षण दिलं जातं. पहिल्या भेटीत आणि पुनर्भेटीत आपण काय बोलावं हे आपल्याला या सभेमुळे शिकायला मिळतं. तसंच, आपण बायबल अभ्यास कसा चालवावा हेही आपल्याला शिकायला मिळतं. यहोवाच्या संघटनेने आपल्याला शिकवण्याची साधनंही दिली आहेत. यामुळे आपल्याला . . .

  • चर्चेची सुरुवात करायला,

  • संदेशात आवड निर्माण करायला,

  • बायबलबद्दल आणखी जाणून घ्यायचं प्रोत्साहन द्यायला,

  • बायबल अभ्यासादरम्यान सत्य शिकवायला आणि

  • संदेशात आवड असणाऱ्‍या लोकांनी आपली वेबसाईट पाहायला आणि आपल्या राज्य सभागृहात यायला मदत होते.

हे खरं आहे की आपल्याकडे ही साधनं असणंच पुरेसं नाही, तर आपण ती वापरलीसुद्धा पाहिजेत. * उदाहरणार्थ, संदेशात आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत झालेल्या चांगल्या चर्चेनंतर तुम्ही तिला एखादी पत्रिका किंवा नियतकालिक दिलं, तर तिच्याशी पुन्हा भेट होईपर्यंत तिला त्यातून आणखी माहिती मिळवता येईल. प्रत्येक महिन्यादरम्यान राज्याचा प्रचार जास्तीत जास्त करण्यात व्यस्त राहणं, ही आपली वैयक्‍तिक जबाबदारी आहे.

११. ऑनलाईन बायबल स्टडी लेसन्स बनवण्यामागचा उद्देश काय होता?

११ jw.org ® यावर असलेले ऑनलाईन बायबल स्टडी लेसन्स म्हणजे ऑनलाईन बायबल अभ्यास धडे, हा आणखी एक मार्ग आहे ज्यामुळे यहोवा लोकांना सत्य शिकण्यासाठी मदत करत आहे. (BIBLE TEACHINGS > ONLINE LESSONS इथे पाहा.) हे धडे का बनवण्यात आले आहेत? प्रत्येक महिन्यात, जगभरात पुष्कळ लोक बायबल विषयांचा इंटरनेटवर शोध घेत असतात. त्यामुळे आपल्या वेबसाईटवरचे धडे लोकांना देवाच्या वचनाबद्दल सत्य जाणून घ्यायला मदत करू शकतात. तसंच, आपण प्रचारात ज्यांच्याशी बोलतो त्यांपैकी काही जण कदाचित आपल्यासोबत बायबल अभ्यास करायला कचरत असतील. असं असल्यास आपण आपल्या वेबसाईटवरचा हा भाग त्यांना दाखवू शकतो किंवा त्या धड्यांबद्दल लिंक पाठवू शकतो. *

१२. ऑनलाईन बायबल अभ्यास धड्यातून एका व्यक्‍तीला काय शिकायला मिळू शकतं?

१२ इंग्रजीत असलेल्या ऑनलाईन बायबल अभ्यास धड्यांमध्ये पुढे दिलेले विषय चर्चा करण्यात आले आहेत: ‘बायबल आणि त्याचा लेखक,’ ‘बायबलमधल्या मुख्य व्यक्‍ती’ आणि ‘बायबलमधला आशेचा संदेश.’ या विषयांबद्दल माहिती घेताना एक व्यक्‍ती पुढे दिलेल्या गोष्टी शिकते:

  • बायबल एका व्यक्‍तीची मदत कसं करू शकतं

  • यहोवा, येशू आणि देवदूत कोण आहेत

  • देवाने मानवांना का घडवलं

  • दुःख-त्रास आणि दुष्टाई का आहे

यहोवा ज्या गोष्टी करणार आहे त्यांबद्दलही या धड्यांमध्ये सांगितलं आहे जसं की तो,

  • दुःख-त्रास आणि मृत्यू यांचा नाश कसा करेल,

  • मरण पावलेल्या लोकांना पुन्हा जिवंत कसं करेल आणि

  • अपयशी ठरलेल्या मानवी सरकारच्या जागी आपलं सरकार कसं आणेल.

१३. ऑनलाईन बायबल अभ्यास धडे पूर्ण केल्यानंतर एका व्यक्‍तीने साक्षीदारासोबत बायबल अभ्यास करणं गरजेचं आहे का?

१३ एका व्यक्‍तीने ऑनलाईन बायबल अभ्यास धडे पूर्ण केले, तर याचा अर्थ असा होत नाही की तिला आता यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्याची गरज नाही. येशूने आपल्याला शिष्य बनवण्याचा बहुमान दिला आहे. आपली संघटना आशा करते की बायबल संदेशात आवड दाखवणारे ऑनलाईन धड्यांचा अभ्यास करतील, त्यांना ते धडे आवडतील आणि बायबलबद्दल आणखी जाणून घ्यायची त्यांना इच्छा होईल. जर असं झालं तर ते बायबल अभ्यास करायला तयार होतील. प्रत्येक धड्याच्या शेवटी वाचकाला, त्याच्यासोबत एका साक्षीदाराने बायबल अभ्यास करावा असा अर्ज भरण्याचं प्रोत्साहन दिलं जातं. जगभरातून वेबसाईटद्वारे सरासरी प्रत्येक दिवशी संघटनेला जवळपास २३० बायबल अभ्यासाच्या विनंत्या मिळत आहेत! खरंच, साक्षीदारांनी आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास करणं ही व्यवस्था खूप महत्त्वपूर्ण आहे.

शिष्य बनवण्याचा प्रयत्न करत राहा

१४. मत्तय २८:१९, २० या वचनांत दिलेल्या येशूच्या आज्ञेनुसार आपण काय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि का?

१४ मत्तय २८:१९, २० वाचा. बायबल अभ्यास चालवताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं ध्येय विद्यार्थ्याला येशूने “आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी” पाळायला शिकवणं आणि त्याला शिष्य बनवणं हे आहे. लोकांनी यहोवाची सेवा करण्याची निवड करणं आणि त्याच्या राज्याचं समर्थन करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण त्यांना समजायला मदत करतो. याचा अर्थ, आपण लोकांना प्रोत्साहन देतो की त्यांनी शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू कराव्यात, यहोवाला आपलं जीवन समर्पित करावं आणि बाप्तिस्मा घ्यावा. त्यांनी असं केलं, तर यहोवाचा दिवस आल्यावर त्यांचा बचाव होईल.—१ पेत्र ३:२१.

१५. आपण कशासाठी वेळ देणार नाही आणि का?

१५ आधी उल्लेख केल्याप्रमाणे या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला फार कमी वेळ उरला आहे. म्हणून जे लोक बदल करायला तयार नाहीत आणि ज्यांना यहोवाचे सेवक बनायची इच्छा नाही अशांना आपण वेळ देणार नाही आणि त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करत राहणार नाही. (१ करिंथ. ९:२६) कारण आपलं काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. उशीर होण्याआधी आपल्याला अशा बऱ्‍याच लोकांना राज्याचा संदेश सांगायचा आहे ज्यांना त्याबद्दल अजून काहीही माहीत नाही.

खोट्या धर्माशी काहीएक संबंध ठेवू नका

१६. प्रकटीकरण १८:२, ४, ५, ८ या वचनांनुसार आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? (तळटीप पाहा.)

१६ प्रकटीकरण १८:२, ४, ५,  वाचा. या वचनांमध्ये सांगितलं आहे की यहोवा आपल्याकडून आणखी कोणत्या गोष्टीची अपेक्षा करतो. आपला खोट्या धर्माशी काहीएक संबंध नाही याची सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी खातरी करून घेतली पाहिजे. सत्य शिकण्याआधी एक बायबल विद्यार्थी कदाचित खोट्या धर्माचा सदस्य असेल. त्याने पूर्वी त्याच्या धर्माशी संबंधित किंवा इतर कार्यांमध्ये भाग घेतला असेल अथवा त्याने त्या किंवा त्यांसारख्या संस्थांना अनुदान दिलं असेल. पण बायबल विद्यार्थ्याला बाप्तिस्मारहित प्रचारक बनण्याआधी त्याने खोट्या धर्माशी सर्व संबंध तोडणं गरजेचं आहे. त्याने चर्चला राजीनामा दिला पाहिजे किंवा तो जर खोट्या धर्माशी संबंधित असलेल्या संस्थेचा सदस्य असेल तर त्याने त्यांना कळवलं पाहिजे की यापुढे तो त्यांचा सदस्य राहणार नाही. *

१७. एका ख्रिश्‍चनाने कोणतं काम टाळलं पाहिजे आणि का?

१७ एका खऱ्‍या ख्रिश्‍चनाने खातरी करून घेतली पाहिजे की त्याचं काम कोणत्याही प्रकारे खोट्या धर्माशी संबंधित नाही. (२ करिंथ. ६:१४-१७) उदाहरणार्थ, तो चर्च किंवा इतर खोट्या धार्मिक संघटनेत काम करणार नाही. तसंच, तो नोकरी करत असेल (जसं की प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियनचं काम) आणि त्याच्या मालकाने खोट्या धर्माशी संबंधित इमारतीचं काही काम स्वीकारलं, तर अशा वेळी तो खोट्या उपासनेला बढावा मिळणाऱ्‍या इमारतीच्या कामात मोठ्या प्रमाणात सहभाग घेणार नाही. आणि जर एका साक्षीदाराचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तो खोट्या धर्माशी संबंधित कामाचा प्रस्ताव स्वीकारणार नाही. आपण याबाबतीत इतकी ठाम भूमिका का घेतो? कारण आपल्याला देवाच्या नजरेत अशुद्ध असलेल्या धार्मिक संस्थेच्या कामांमध्ये आणि पापांमध्ये सहभागी व्हायचं नाही.—यश. ५२:११. *

१८. एका बांधवाने कामाबाबतीत बायबल तत्त्वांशी कशी तडजोड केली नाही?

१८ मंडळीतल्या एका वडिलांचा सुतारकामाचा व्यवसाय होता. काही वर्षांपूर्वी एका कॉनट्रॅक्टरने त्यांना विचारलं की ते चर्चमध्ये सुतारकामाशी संबंधित असलेलं एक लहान काम करतील का. ते वडील ज्या ठिकाणी राहायचे तिथे जवळच ते चर्च होतं. त्या कॉनट्रॅक्टरला माहीत होतं की ते बांधव चर्चशी संबंधित कुठलंही काम हाती घेणार नाही. पण या वेळी त्या कॉनट्रॅक्टरला या कामासाठी दुसरं कोणी मिळत नव्हतं. असं असलं तरी त्या बांधवाने बायबल तत्त्वांशी तडजोड केली नाही आणि कामाला नकार दिला. पुढच्याच आठवड्यात स्थानिक वर्तमानपत्रात एका दुसऱ्‍या सुताराचा, चर्चला क्रॉस लावत असतानाचा फोटो आला. जर आपल्या बांधवाने तडजोड केली असती आणि ते काम स्वीकारलं असतं तर त्या दुसऱ्‍या सुताराच्या जागी त्यांचा फोटो आला असता. जरा विचार करा, असं झालं असतं तर आपल्या भाऊबहिणींसमोर एक ख्रिस्ती म्हणून त्या बांधवाचं नाव किती खराब झालं असतं. आणि इतकंच काय तर यहोवाला कसं वाटलं असतं!

आपल्याला काय शिकायला मिळालं?

१९-२०. (क) आपण आतापर्यंत काय शिकलो? (ख) आपल्याला आणखी काय शिकून घ्यायचं आहे?

१९ बायबलनुसार पूर्ण होणारी पुढची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी म्हणजे, राष्ट्रं अशी घोषणा करतील की “शांती आहे, सुरक्षा आहे!” पण यहोवाने सांगितलं आहे, की राष्ट्रं कधीच खरी आणि कायम टिकणारी शांती आणू शकत नाही. यहोवाने आपल्याला ही गोष्ट आधीच सांगितल्यामुळे आपण त्याचे आभारी आहोत. ती महत्त्वपूर्ण घटना घडण्याआधी आणि त्यानंतर अचानक विनाश येण्याआधी आपण काय केलं पाहिजे? यहोवा अपेक्षा करतो की आपण राज्याचा संदेश प्रचार करण्यात आणि जास्तीत जास्त शिष्य बनवण्यात व्यस्त राहिलं पाहिजे. त्यासोबतच, आपण सर्व खोट्या धर्मांपासून दूर राहिलं पाहिजे. याचाच अर्थ, आपण मोठ्या बाबेलचा सदस्य बनणार नाही आणि तिच्याशी संबंधित असलेली कोणतीही नोकरी, काम किंवा व्यवसाय करणार नाही.

२० शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात इतर घटनाही घडणार आहेत. यहोवा आपल्याकडून आणखी काही गोष्टींचीही अपेक्षा करतो. त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि आपण लवकरच भविष्यात घडणाऱ्‍या घटनांसाठी कशी तयारी करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत १७ साक्षीदारांनो, पुढे चला!

^ परि. 5 लवकरच राष्ट्रं अशी घोषणा करतील की त्यांना ‘शांती आणि सुरक्षा’ आणण्यात यश मिळालं आहे. आणि हा मोठं संकट सुरू होण्याचा इशारा असेल. पण ही घोषणा होईपर्यंत आपण काय करत राहावं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो? या लेखात या प्रश्‍नाचं उत्तर दिलं जाईल.

^ परि. 3 उदाहरणार्थ, संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या वेबसाईटवर त्यांनी असा दावा केला आहे की ते “आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती आणि सुरक्षा टिकवून ठेवत आहेत.”

^ परि. 10 शिकवण्याची साधनं कशी वापरायची याबद्दल अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज ऑक्टोबर २०१८ मधला “सत्य शिकवा” हा लेख पाहा.

^ परि. 11 हे धडे सध्या इंग्रजीत आणि पोर्तुगीज भाषेत उपलब्ध आहेत आणि भविष्यात आणखी भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

^ परि. 16 आपण खोट्या धर्माशी संबंधित संस्थेचे सदस्य बनू नये. यांपैकी काही संस्था तरुणांसाठी किंवा मनोरंजनासाठी व्यायामशाळा, स्विमींग पूल किंवा हेल्थ क्लब्स स्थापित करतात. स्थानिक संस्था असं दाखवत असतील की त्यांची कार्यं धर्माशी संबंधित नाहीत, तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा संस्था खोट्या धार्मिक विचारांना आणि हेतूंना बढावा देतात.

^ परि. 17 धार्मिक संस्थेत काम, नोकरी किंवा व्यवसाय करण्याबद्दल बायबल काय म्हणतं याविषयी अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज १५ एप्रिल १९९९ यात “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.

^ परि. 83 चित्रांचं वर्णन: कॉफी शॉपमध्ये, टिव्हीवर ‘शांती आणि सुरक्षा’ आहे अशी घोषणा झाल्याची लक्षवेधक बातमी झळकते तेव्हा तिथे बसलेले ग्राहक आश्‍चर्यचकित होतात. पण त्याच वेळी प्रचारकार्य करून आलेलं साक्षीदार जोडपं ही बातमी पाहून फसत नाहीत.