व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४४

अंत येण्याआधी भाऊबहिणींसोबत आपली मैत्री घनिष्ठ करा

अंत येण्याआधी भाऊबहिणींसोबत आपली मैत्री घनिष्ठ करा

“मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो.”—नीति. १७:१७.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

मोठ्या संकटादरम्यान आपल्याला खऱ्‍या मित्रांचा आधार लागेल (परिच्छेद २ पाहा) *

१-२. १ पेत्र ४:७, ८ या वचनांनुसार आपल्याला कठीण परिस्थितीत कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?

आपण जसजसं अंताच्या जवळ जात आहोत तसतसं आपल्याला कठीण परीक्षांना तोंड द्यावं लागू शकतं. (२ तीम. ३:१) उदाहरणार्थ, पूर्व आफ्रिकेतल्या एका देशात झालेल्या निवडणुकीनंतर सर्वत्र अशांती आणि हिंसेचं वातावरण पसरलं होतं. सगळीकडे लोक मारामारी करत असल्यामुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापर्यंत आपल्या भाऊबहिणींना मोकळेपणे बाहेर फिरणं मुश्‍किल झालं होतं. मग अशा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांना कुठून मदत मिळाली? काही जण दूरवर सुरक्षित असलेल्या ठिकाणी आपल्या भाऊबहिणींच्या घरी राहायला गेले. याबद्दल एका बांधवाने म्हटलं: “अशा परिस्थितीत आपल्या भाऊबहिणींसोबत असताना मला जाणवलं की खरंच मला किती चांगले मित्र मिळाले आहेत. यामुळे आम्हाला एकमेकांना प्रोत्साहन देणं शक्य झालं.”

मोठं संकट सुरू होईल तेव्हा आपल्यावर प्रेम करणारे मित्र आपल्यासोबत असतील याचा आपल्याला आनंद असेल. (प्रकटी. ७:१४) त्यामुळे आताच मैत्रीचं नातं मजबूत करणं खूप गरजेचं आहे. (१ पेत्र ४:७, ८ वाचा.) आपण यिर्मयाच्या उदाहरणावरून खूप काही शिकू शकतो. यरुशलेमचा नाश झाल्याच्या काही काळाआधी त्याच्या मित्रांनी त्याचा जीव वाचवला. * आपण यिर्मयाचं अनुकरण कसं करू शकतो?

यिर्मयाच्या उदाहरणावरून शिका

३. (क) यिर्मयाला लोकांपासून दूर राहण्याची इच्छा का होती? (ख) यिर्मयाने बारूखला काय सांगितलं आणि याचा काय परिणाम झाला?

कमीतकमी चाळीस वर्षं यिर्मया अविश्‍वासू लोकांमध्ये राहिला. त्याच्या गावातले म्हणजे अनाथोथ इथे राहणारे काही नातेवाईक आणि शेजारीही कदाचित तिथे होते. (यिर्म. ११:२१; १२:६) असं असलं तरी तो सर्वांपासून दूर एकटा राहिला नाही, तर त्याने आपल्या भावना त्याचा विश्‍वासू सचिव बारूख याला सांगितल्या. त्याला त्या वेळी कसं वाटलं हे आपल्यालाही माहीत आहे कारण त्याच्या भावना आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. (यिर्म. ८:२१; ९:१; २०:१४-१८; ४५:१) बारूखने यिर्मयाच्या जीवनात घडलेल्या गोष्टी लिहिल्या. आणि या काळादरम्यान बारूख आणि यिर्मया यांच्यातलं प्रेम वाढलं आणि ते एकमेकांचा आदर करायला शिकले.—यिर्म. २०:१, २; २६:७-११.

४. यहोवाने यिर्मयाला काय करायला सांगितलं आणि यिर्मया व बारूख यांना मिळालेल्या नेमणुकीमुळे त्यांची मैत्री कशी घट्ट झाली?

अनेक वर्षं यिर्मयाने धैर्याने इस्राएली लोकांना यरुशलेम शहराचं काय होईल हे सांगितलं. (यिर्म. २५:३) मग पुढे यहोवाने आपल्या लोकांना पस्तावा करण्यासाठी आणखी एक संधी दिली तेव्हा त्याने यिर्मयाला त्या इशाऱ्‍याबद्दल एका गुंडाळीवर लिहायला सांगितलं. (यिर्म. ३६:१-४) यिर्मया आणि बारूख यांनी सोबत मिळून देवाने दिलेलं काम पूर्ण केलं. याला काही महिने लागले असावेत आणि यात काहीच शंका नाही, की त्या संपूर्ण काळादरम्यान त्या दोघांमध्ये विश्‍वास वाढवणारं संभाषण नक्कीच झालं असणार!

५. बारूख हा यिर्मयाचा चांगला मित्र होता हे आपण कशावरून म्हणू शकतो?

गुंडाळीत संदेश लिहिण्याचं काम संपल्यावर त्यांना तो लोकांना जाऊन सांगायचा होता. अशा वेळी यिर्मयाला आपल्या मित्रावर, बारूखवर भरवसा ठेवावा लागणार होता, कारण तो संदेश लोकांना जाऊन सांगायची जबाबदारी बारूखवर सोपवण्यात आली होती. (यिर्म. ३६:५, ६) बारूखने धैर्याने ही धोकेदायक नेमणूक पूर्ण केली. बारूखला दिलेलं काम त्याने पूर्ण केलं आणि मंदिरात जाऊन लोकांसमोर ती गुंडाळी वाचली. हे समजल्यावर यिर्मयाला बारूखचा किती अभिमान वाटला असेल! (यिर्म. ३६:८-१०) यहूदाच्या राजदरबाऱ्‍यांना बारूखने सांगितलेल्या संदेशाबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी बारूखला ती गुंडाळी त्यांनाही मोठ्याने वाचून दाखवायला सांगितली. (यिर्म. ३६:१४, १५) मग राजदरबाऱ्‍यांनी यिर्मयाने सांगितलेल्या गोष्टी यहोयाकीम राजाला सांगायचं ठरवलं. त्यांना बारूख आणि यिर्मयावर दया आली आणि त्यांनी बारूखला म्हटलं: “जा, यिर्मया व तू लपून राहा; तुम्ही कुठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका.” (यिर्म. ३६:१६-१९) खरंच, त्यांनी त्याला चांगला सल्ला दिला होता!

६. यिर्मया आणि बारूख यांना विरोधाचा सामना करावा लागला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

यिर्मयाने गुंडाळीत जे लिहिलं होतं ते जेव्हा यहोयाकीम राजाला वाचून दाखवण्यात आलं तेव्हा तो भयंकर चिडला. त्याने ती गुंडाळी जाळून टाकण्याचा आणि यिर्मया व बारूख यांना अटक करण्याचा आदेश दिला. पण यिर्मया घाबरला नाही. त्याने दुसरी गुंडाळी घेतली आणि बारूखला दिली. मग यिर्मयाने बारूखला यहोवाचा संदेश पुन्हा सांगायला सुरुवात केली आणि “यहूदाचा राजा यहोयाकीम याने जो ग्रंथ [गुंडाळी] अग्नीत जाळून टाकला होता त्यातली सर्व वचने” बारूखने गुंडाळीवर लिहून काढली.—यिर्म. ३६:२६-२८, ३२.

७. यिर्मया आणि बारूख यांनी एकत्र मिळून काम केल्यामुळे त्यांच्या नात्यावर कसा परिणाम झाला?

जे लोक एकत्र परीक्षांचा सामना करतात त्यांचं आपसातलं नातं आणखी घनिष्ठ होतं. दुष्ट यहोयाकीम राजाने गुंडाळी नष्ट केल्यावर यिर्मया आणि बारूख यांनी एकत्र मिळून नवीन गुंडाळी तयार केली. आपण कल्पना करू शकतो, की सोबत काम केल्यामुळे, एकमेकांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांबद्दल त्यांच्या मनात कदर वाढली असेल आणि त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली असेल. या दोन विश्‍वासू सेवकांनी आपल्यासमोर जे उदाहरण मांडलं त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

मनमोकळेपणे आपल्या भावना व्यक्‍त करा

८. जवळचे मित्र बनवण्याच्या आड कोणत्या गोष्टी येऊ शकतात आणि आपण हार का मानू नये?

आपल्याला आधी कोणी दुखावलं असेल तर मनमोकळेपणे आपल्या भावना इतरांना सांगणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. (नीति. १८:१९, २४) किंवा आपल्याला वाटेल की जवळचे मित्र बनवायला माझ्याकडे वेळ आणि ताकद नाही. असं असलं तरी आपण हार मानू नये. आपल्या भाऊबहिणींनी परीक्षेच्या काळादरम्यान आपली साथ द्यावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण आजच त्यांच्यासोबत घनिष्ठ मैत्री करणं गरजेचं आहे. असं करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्याला जे वाटतं आणि आपण जे विचार करतो ते त्यांना सांगणं.—१ पेत्र १:२२.

९. (क) येशूचा आपल्या मित्रांवर भरवसा होता हे त्याने कसं दाखवलं? (ख) मनमोकळेपणाने बोलल्याने आपलं इतरांसोबतचं नातं घनिष्ठ कसं होतं? एक उदाहरण द्या.

येशू आपल्या मित्रांसोबत मनमोकळेपणाने बोलायचा. असं करण्याद्वारे त्याने त्यांच्यावर भरवसा असल्याचं दाखवून दिलं. (योहा. १५:१५) आपणही त्याचं अनुकरण करू शकतो. आपला आनंद, चिंता आणि निराश करणाऱ्‍या गोष्टी आपण आपल्या मित्रांना सांगू शकतो. तसंच, कोणी आपल्याशी बोलत असेल तेव्हा त्याचं आपण लक्ष देऊन ऐकू शकतो. आणि असं केल्याने आपल्याला जाणवेल की आपलेही बरेचसे विचार, भावना आणि ध्येयं आपल्या मित्रांसारखेच आहेत. २९ वर्षांच्या सींडी नावाच्या बहिणीचा विचार करा. तिने ६७ वर्षांच्या मेरी-लुईस नावाच्या पायनियर बहिणीशी मैत्री केली. सींडी आणि मेरी-लुईस दर गुरुवारी सकाळी प्रचारकार्य करतात. ते आपसात वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने बोलतात. सींडी म्हणते: “मला मित्रमैत्रिणींसोबत महत्त्वाच्या विषयांवर बोलायला आवडतं, कारण यामुळे मला त्यांना जाणून घ्यायला आणि समजून घ्यायला मदत होते.” सींडीसारखंच आपण जेव्हा आपले विचार आणि भावना आपल्या मित्रांना सांगतो आणि ते बोलत असताना त्यांचं लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा आपली मैत्री बहरते.—नीति. २७:९.

सोबत मिळून काम करा

खरे मित्र सेवाकार्यात एकत्र काम करतात (परिच्छेद १० पाहा)

१०. नीतिसूत्रे २७:१७ या वचनानुसार आपल्या भाऊबहिणींसोबत काम केल्याने काय फायदा होऊ शकतो?

१० यिर्मया आणि बारूख यांच्यासारखं आपण भाऊबहिणींसोबत काम करतो तेव्हा आपल्यालाही त्यांच्यातले चांगले गुण पाहण्याची संधी मिळते. यामुळे आपण त्यांना चांगल्या प्रकारे ओळखू लागतो आणि त्यांच्याशी आपल्याला एक घनिष्ठ नातं जोडायला मदत होते. (नीतिसूत्रे २७:१७ वाचा.) उदाहरणार्थ, प्रचारात असताना तुम्ही तुमच्या मित्राला आपल्या विश्‍वासाबद्दल धैर्याने तर्क करताना पाहता किंवा यहोवा व त्याच्या उद्देशाबद्दल मनापासून बोलताना पाहता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला नक्कीच तुमचा मित्र आणखी प्रिय वाटू लागतो.

११-१२. भाऊबहिणींसोबत सेवाकार्य केल्याने आपली मैत्री कशी घनिष्ठ होऊ शकते याचं उदाहरण द्या.

११ सेवाकार्यात एकत्र काम केल्याने मैत्री आणखी कशी घनिष्ठ होऊ शकते हे समजण्यासाठी आपण दोन उदाहरणं पाहू या. २३ वर्षांची ॲडलीन हिने तिच्या एका मैत्रिणीला, कॅन्डीसला अशा क्षेत्रात सोबत प्रचारकार्य करायला विचारलं जिथे प्रचाराचं जास्त काम झालं नव्हतं. ॲडलीन म्हणते: “आम्हाला आणखी आवेशाने प्रचार करायचा होता. तसंच, सेवाकार्यातून आनंद मिळवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहनाचीही खूप गरज होती.” त्या दोघींना सोबत मिळून काम केल्याने कसा फायदा झाला? ॲडलीन म्हणते: “प्रत्येक दिवशी संध्याकाळी प्रचार झाल्यावर आम्ही एकमेकांना आपला अनुभव सांगायचो. लोकांसोबत चर्चा करताना कोणत्या गोष्टी आम्हाला आवडल्या आणि यहोवा आम्हाला सेवाकार्यात कसं मार्गदर्शन देत आहे याबद्दलही आम्ही बोलायचो. आम्हाला या चर्चा खूप आवडायच्या आणि यामुळे आम्ही एकमेकांना आणखी जवळून ओळखू लागलो.”

१२ लायला आणि मेरीॲन या फ्रान्समध्ये राहणाऱ्‍या दोन अविवाहित बहिणी पाच आठवड्यांसाठी मध्य आफ्रिका प्रजासत्ताक इथल्या राजधानी शहरात, म्हणजे बांगी इथे प्रचारासाठी गेल्या. ते शहर खूप गजबजलेलं होतं. लायला त्याबद्दल आठवून म्हणते: “मेरीॲन आणि मला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं, पण आमच्यात चांगलं संभाषण आणि खरं प्रेम असल्यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट झाली. मेरीॲन कोणत्याही परिस्थितीशी लगेच जुळवून घ्यायची, तिला स्थानिक लोकांबद्दल आपुलकी वाटायची आणि ती सेवाकार्यही खूप आवेशाने करायची. हे सर्व पहिल्याने माझ्या मनात तिच्याबद्दल आणखी आदर वाढला.” पण हे सर्व फायदे अनुभवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्‍या देशात जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्याच क्षेत्रात जेव्हा भाऊबहिंणीसोबत काम करता तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची तुम्हाला संधी मिळते आणि त्यांच्यासोबत असलेली तुमची मैत्रीही आणखी घनिष्ठ होते.

चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि क्षमा करा

१३. आपल्या मित्रांसोबत काम करत असताना कोणती गोष्ट घडू शकते?

१३ आपण आपल्या मित्रांसोबत काम करतो, तेव्हा कधीकधी आपल्याला फक्‍त त्यांचे चांगले गुणच दिसत नाहीत, तर त्यांच्या कमतरताही दिसतात. या आव्हानावर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करू शकते? आपण पुन्हा एकदा यिर्मयाच्या उदाहरणाकडे लक्ष देऊ या. त्याला कोणत्या गोष्टीमुळे आपल्या मित्रांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्यायला आणि त्यांच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करायला मदत झाली?

१४. यिर्मया यहोवाबद्दल काय शिकला आणि यामुळे त्याला कशी मदत झाली?

१४ यिर्मयाने १ आणि २ राजे व यिर्मया ही नावं असलेली पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं लिहिल्यामुळे त्याला पाहायला मिळालं असेल की यहोवा अपरिपूर्ण लोकांवर अपार दया करतो. उदाहरणार्थ, अहाब राजाने वाईट कार्यं केली पण त्याने पुढे जाऊन पस्तावा दाखवला तेव्हा यहोवाने त्याला माफ केलं आणि तो जिवंत असेपर्यंत त्याचं घराणं नष्ट होऊ दिलं नाही. (१ राजे २१:२७-२९) तसंच, यिर्मयाला हेही माहीत होतं की अहाब राजापेक्षा मनश्‍शे राजाने जास्त वाईट कार्यं केली होती. पण त्याने पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्यालाही माफ केलं. (२ राजे २१:१६, १७; २ इति. ३३:१०-१३) या अहवालांमुळे यिर्मयाला नक्कीच यहोवाकडून धीराचा आणि दयेचा गुण शिकायला मिळाला असेल. आणि आपल्या मित्रांशी वागताना त्याने यहोवाच्या या गुणांचं अनुकरण केलं असेल.—स्तो. १०३:८, ९.

१५. बारूखचं लक्ष विचलित झालं तेव्हा यिर्मयाने यहोवाच्या धीराचं कसं अनुकरण केलं?

१५ बारूखचं काही काळासाठी आपल्या नेमणुकीवरून लक्ष विचलित झालं तेव्हा यिर्मया त्याच्याशी कसा वागला याकडे लक्ष द्या. बारूख काही बदलणार नाही असं यिर्मयाने लगेच त्याच्याबद्दल मत बनवलं नाही. तर त्याने बारूखला देवाचा त्याच्यासाठी काय संदेश आहे हे प्रेमळपणे पण स्पष्ट शब्दांत सांगितलं. (यिर्म. ४५:१-५) या अहवालावरून आपण कोणते धडे घेऊ शकतो?

खरे मित्र एकमेकांना मनापासून क्षमा करतात (परिच्छेद १६ पाहा)

१६. नीतिसूत्रे १७:९ हे वचन आपल्याला मैत्री टिकवून ठेवायला कशी मदत करतं?

१६ खरं पाहता, आपण आपल्या भाऊबहिणींकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू शकत नाही. म्हणून आपली त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाल्यावर आपण ती मैत्री टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आपल्या मित्रांनी चुका केल्या तर आपण त्यांना देवाच्या वचनातून स्पष्ट शब्दांत पण प्रेमळपणे सल्ला देऊ शकतो. (स्तो. १४१:५) आणि जर त्यांनी आपलं मन दुखावलं तर आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. एकदा का आपण त्यांना माफ केलं तर भविष्यात तो विषय त्यांच्याकडे किंवा इतरांकडे पुन्हा काढण्याचा आपण प्रयत्न करू नये. (नीतिसूत्रे १७:९ वाचा.) या कठीण काळात आपण आपल्या भाऊबहिणींच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असं केल्यामुळे आपली त्यांच्यासोबत असलेली मैत्री आणखी घनिष्ठ होईल. आणि असं करणं आज महत्त्वाचं आहे कारण मोठ्या संकटादरम्यान आपल्याला आपल्या जवळच्या मित्रांची साथ लागणारच!

एकनिष्ठ प्रेम करा

१७. यिर्मयाने संकटकाळी खरा मित्र असल्याचं कसं दाखवून दिलं?

१७ यिर्मया संदेष्ट्याने, तो संकटकाळी खरा मित्र असल्याचं दाखवून दिलं. उदाहरणार्थ, यिर्मयाला जेव्हा चिखलाने भरलेल्या एका विहिरीत मरण्यासाठी सोडून दिलं होतं, तेव्हा राजमहलातला अधिकारी एबद-मलेख याने त्याला तिथून बाहेर काढलं. एबद-मलेखला भीती होती की आता राजदरबारी आपल्याला काही सोडणार नाहीत. यिर्मयाला याबद्दल कळलं तेव्हा त्याने असा विचार केला नाही, की आपला मित्र एबद-मलेख स्वतः या परिस्थितीतून सावरेल आणि त्याला धीराची गरज नाही. तर याउलट त्याने त्याला मदत करण्याचं ठरवलं. यिर्मया कैदेत होता तरी त्याने यहोवाचं सांत्वनदायक अभिवचन एबद-मलेखपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या परीने होता होईल ते प्रयत्न केले.—यिर्म. ३८:७-१३; ३९:१५-१८.

खरे मित्र आपल्या भाऊबहिणींना गरजेच्या वेळी मदत करतात (परिच्छेद १८ पाहा)

१८. नीतिसूत्रे १७:१७ या वचनानुसार आपले मित्र समस्यांचा सामना करत असताना आपण काय केलं पाहिजे?

१८ आज आपल्या भाऊबहिणींना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, अनेकांना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवांमुळे दुःख भोगावं लागतं. अशी परिस्थिती उद्‌भवल्यावर आपण भाऊबहिणींना आपल्या घरी राहायला बोलवू शकतो. तसंच, इतर जण त्यांना आर्थिक मदत करू शकतात. आपल्याला या गोष्टी करणं शक्य नसल्या तरी आपण सगळेच आपल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना मात्र नक्कीच करू शकतो. आपले भाऊबहीण निराश झाल्याचं आपल्याला कळतं, तेव्हा आपण काय बोलावं किंवा करावं हे कदाचित त्या वेळी आपल्याला सुचणार नाही. पण असं असलं तरी आपण सगळेच मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या मित्राला वेळ देऊ शकतो. तो आपल्याशी बोलत असतो तेव्हा आपण त्याचं लक्ष देऊन ऐकू शकतो. तसंच, आपण त्याला एखादं सांत्वन देणारं आपलं आवडतं वचनही सांगू शकतो. (यश. ५०:४) मित्रांना आपली गरज असते, तेव्हा आपण त्यांच्यासोबत असणं, हीच खरंतर त्या वेळी खूप महत्त्वाची गोष्ट असते.—नीतिसूत्रे १७:१७ वाचा.

१९. आज मैत्रीचं नातं घनिष्ठ केल्यामुळे आपल्याला भविष्यात कसा फायदा होऊ शकतो?

१९ आपण आजच आपल्या भाऊबहिणींसोबत एक घनिष्ठ नातं जोडण्याचा आणि ते टिकवून ठेवण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. पण का? आपले शत्रू खोटी आणि चुकीची माहिती पसरवून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. ते आपल्याला एकमेकांविरुद्ध जाण्यासाठी प्रवृत्त करतील. पण ते यात यशस्वी होणार नाहीत. आपल्यातल्या प्रेमळ नात्याचे बंध ते कधीच तोडू शकणार नाहीत. ते जे काही करतील त्यामुळे आपल्यातल्या मैत्रीला तडा जाणार नाही. आणि खरं पाहिलं तर, ही मैत्री फक्‍त या व्यवस्थेच्या अखेरपर्यंतच नाही तर अनंतकाळापर्यंत टिकणार आहे!

गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!

^ परि. 5 अंत जवळ येत असताना आपण भाऊबहिणींसोबत असलेलं आपलं नातं आणखी घनिष्ठ करणं गरजेचं आहे. यिर्मयाच्या अनुभवावरून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायला मिळू शकतात हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आज भाऊबहिणींसोबत नातं घनिष्ठ केल्यामुळे पुढे येणाऱ्‍या कठीण काळात आपल्याला कशी मदत होऊ शकते हेही आपण पाहू या.

^ परि. 2 यिर्मया या पुस्तकात दिलेल्या घटना कालक्रमानुसार मांडलेल्या नाहीत.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन: भविष्यात मोठ्या संकटादरम्यान काय घडेल याचं एक दृश्‍य. अनेक भाऊबहिणी एका बांधवाच्या घरी माळ्यावर लपून बसले आहेत. त्यांचे मित्र त्यांच्या जवळ आहेत आणि यामुळे परीक्षेच्या काळात ते एकमेकांचं सांत्वन करू शकतात. पुढे दिलेल्या तीन दृश्‍यांमध्ये दाखवलं आहे की या भाऊबहिणींनी मोठं संकट सुरू होण्याआधीच त्यांच्यातलं मैत्रीचं नातं घनिष्ठ केलं होतं.