व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४८

“तुम्ही जे काम सुरू केले होते ते आता पूर्णही करा”

“तुम्ही जे काम सुरू केले होते ते आता पूर्णही करा”

“तुम्ही जे काम सुरू केले होते ते आता पूर्णही करा.”—२ करिंथ. ८:११.

गीत ४२ “दुर्बळांना साहाय्य करावे”

सारांश *

१. यहोवाने आपल्याला काय करण्याची मोकळीक दिली आहे?

आपण जीवनात कोणते निर्णय घ्यावेत हे ठरवण्याची मोकळीक यहोवाने आपल्याला दिली आहे. यहोवा आपल्याला चांगले निर्णय घ्यायला शिकवतो आणि आपण जेव्हा त्याचं मन आनंदित होईल असे निर्णय घेतो तेव्हा तो आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतो. (स्तो. ११९:१७३) आपण जर देवाच्या वचनात दिलेले सुज्ञ सल्ले जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नेहमी चांगले निर्णय घेता येतील.—इब्री ५:१४.

२. निर्णय घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या समस्येचा सामना करावा लागू शकतो?

आपण जरी एखाद्या कामाविषयी चांगला निर्णय घेतला असला तरी आपल्याला त्या निर्णयानुसार काम पूर्ण करणं कठीण जाऊ शकतं. काही उदाहरणांचा विचार करा: एक तरुण बांधव एका वर्षात संपूर्ण बायबल वाचून काढण्याचा निर्णय घेतो. ठरवल्याप्रमाणे तो नियमितपणे बायबल वाचतो पण नंतर कोणत्यातरी कारणामुळे त्याचं वाचन बंद पडतं. एक बहीण रेग्युलर पायनियरिंग करायचं ठरवते, पण मग ती असा विचार करते की ‘आता नको, नंतर करू या’ आणि पायनियरिंग लांबणीवर टाकते. वडील वर्ग मंडळीतल्या भाऊबहिणींची जास्त वेळा मेंढपाळ भेट घेतील असा ते एकमताने निर्णय घेतात. पण बऱ्‍याच महिन्यांनतरही त्यांनी ठरवल्याप्रमाणे काम सुरू केलेलं नसतं. या सर्व परिस्थिती वेगवेगळ्या असल्या तरी त्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे त्या भाऊबहिणींनी निर्णय तर घेतले पण त्यांनी ते पूर्णपणे अमलात आणले नाहीत. पहिल्या शतकातल्या करिंथच्या ख्रिश्‍चनांनासुद्धा अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला. आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो यावर आता आपण चर्चा करू या.

३. करिंथच्या ख्रिश्‍चनांनी कोणता निर्णय घेतला पण त्याचा काय परिणाम झाला?

जवळपास इ.स. ५५ मध्ये करिंथमधल्या ख्रिश्‍चनांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. करिंथमधल्या बांधवांना कळलं की यरुशलेम आणि यहूदीया इथे राहणाऱ्‍या भाऊबहिणींना समस्यांचा आणि गरिबीचा सामना करावा लागत आहे. आणि इतर मंडळ्या त्यांना मदत करण्यासाठी पैसे गोळा करत आहेत. करिंथमधले भाऊबहीण खूप दयाळू व उदार होते आणि म्हणून त्यांना त्यांच्या बांधवांना मदत करायची होती. आपल्या भाऊबहिणींना ते कशी मदत करू शकतात याबद्दल त्यांनी पौलला विचारलं. यावर पौलने त्या मंडळीला काही सूचना दिल्या आणि दान गोळा करण्यासाठी तीतला नियुक्‍त केलं. (१ करिंथ. १६:१; २ करिंथ. ८:६) पण काही महिन्यांनंतर पौलला कळलं की करिंथकरांनी ठरवल्यानुसार दान गोळा केलं नाही. यामुळे जेव्हा यरुशलेमला इतर मंडळ्यांकडून आलेल्या दानासोबत हे दान घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा ते दान गोळा केलेलं नव्हतं.—२ करिंथ. ९:४, ५.

४. २ करिंथकर ८:७, १०, ११ या वचनांत उल्लेख केल्याप्रमाणे पौलने करिंथकरांना काय करण्याचं प्रोत्साहन दिलं?

करिंथकरांनी खरंच एक चांगला निर्णय घेतला होता आणि पौलने त्यांच्या भक्कम विश्‍वासासाठी आणि मनापासून मदत करण्याच्या त्यांच्या इच्छेसाठी त्यांची प्रशंसा केली. पण करिंथकरांनी ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी पौलला त्यांना प्रोत्साहनही द्यावं लागलं. (२ करिंथकर ८:७, १०, ११ वाचा.) या अनुभवावरून आपल्याला कळतं की विश्‍वासू ख्रिश्‍चनांनासुद्धा त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्य करणं कठीण जाऊ शकतं.

५. आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेणार आहोत?

आपल्यालाही करिंथकरांप्रमाणेच आपल्या निर्णयांनुसार काम करणं कठीण जाऊ शकतं. असं का? कारण आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपण कदाचित एखादं काम वेळेवर न करता टाळाटाळ करू. किंवा एखादी अनपेक्षित घटना घडू शकते आणि त्यामुळे ठरवलेली गोष्ट पूर्ण करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. (उप. ९:११; रोम. ७:१८) आधी घेतलेल्या निर्णयाचं आपल्याला पुन्हा परीक्षण करावं लागलं तर आपण काय करू शकतो? आणि घेतलेल्या निर्णयात फेरबदल करावा की नाही हे आपण कसं ठरवू शकतो? तसंच, आपण सुरू केलेलं काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो?

निर्णय घेण्याआधी काय करावं?

६. आपण घेतलेल्या निर्णयांमध्ये फेरबदल करण्याची गरज केव्हा पडू शकते?

काही महत्त्वाचे निर्णय आपण कधीच बदलणार नाही. उदाहरणार्थ, नेहमी यहोवाची सेवा करत राहण्याचा आणि आपल्या विवाहसोबत्याला विश्‍वासू राहण्याचा आपण ठाम निर्धार केला आहे. (मत्त. १६:२४; १९:६) पण इतर काही निर्णय असे आहेत ज्यांमध्ये आपल्याला फेरबदल करण्याची गरज पडू शकते. का? कारण परिस्थिती नेहमी बदलत असते. कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला सर्वात चांगले निर्णय घ्यायला मदत होऊ शकते?

७. आपण कशासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि का?

बुद्धीसाठी प्रार्थना करा. यहोवाने याकोबला पुढे दिलेली गोष्ट लिहायला प्रेरित केलं: “तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असल्यास त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल, कारण देव कोणालाही कमी न लेखता सर्वांना उदारपणे बुद्धी देतो.” (याको. १:५) काही बाबतीत आपल्या सर्वांनाच “बुद्धीची गरज” असते. म्हणून आपण निर्णय घेतो तेव्हा आणि घेतलेला निर्णय बदलावा लागतो तेव्हा, आपल्याला यहोवावर विसंबून राहणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे यहोवा आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल.

८. निर्णय घेण्याआधी आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल संशोधन केलं पाहिजे?

सखोल संशोधन करा. देवाचं वचन वाचा, यहोवाच्या संघटनेने पुरवलेली प्रकाशनं वाचा आणि तुम्हाला सुज्ञ सल्ला देतील अशा लोकांशी बोला. (नीति. २०:१८) काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी संशोधन करणं गरजेचं आहे. जसं की, नोकरी बदलण्याआधी किंवा दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जाण्याआधी आपल्याला संशोधन करावं लागेल. तसंच, यहोवाची सेवा करण्यासोबतच स्वतःचा खर्च भागवायला मदत होईल, असं शिक्षण निवडण्याआधीही आपल्याला संशोधन करावं लागेल.

९. स्वतःशी प्रामाणिक राहिल्याने आपल्याला कसा फायदा होईल?

आपल्या हेतूंचं परीक्षण करा. आपण एखादी गोष्ट कोणत्या हेतूने करतो याकडे यहोवाचं लक्ष असतं. (१ शमु. १६:७) आपण सर्व गोष्टींत प्रामाणिक असावं अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा तो आपण कोणत्या हेतूने घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या हेतूंबद्दल आपण स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असलं पाहिजे. आपण प्रामाणिक राहिलो नाही तर आपल्या निर्णयांवर टिकून राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. कल्पना करा, एक तरुण बांधव रेग्युलर पायनियरिंग करण्याचा निर्णय घेतो. पण काही काळानंतर त्याला त्याचे तास पूर्ण करणं कठीण जाऊ लागतं आणि सेवाकार्यातला त्याचा आनंद कमी होऊ लागतो. हे कशामुळे घडलं असावं? त्याला सुरुवातीला वाटलं असावं की यहोवाचं मन आनंदित करणं हा त्याचा पायनियरिंग करण्याचा मुख्य हेतू आहे. पण खरंतर त्याचा मुख्य हेतू आईवडिलांना किंवा इतरांना खूश करणं हा असावा.

१०. स्वतःमध्ये बदल करण्यासाठी काय करणं महत्त्वाचं आहे?

१० एका अशा बायबल विद्यार्थ्याचा विचार करा ज्याने आपल्या धुम्रपानाच्या व्यसनावर मात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला त्याला खूप अवघड जात असलं तरी तो एक-दोन आठवड्यांसाठी सिगरेट पीत नाही. पण नंतर त्याला सिगरेट पिण्याचा मोह आवरत नाही आणि तो पुन्हा धुम्रपान करतो. पण शेवटी तो आपल्या सवयीवर मात करण्यात यशस्वी होतो. यहोवावर असलेल्या प्रेमामुळे आणि त्याचं मन आनंदित करण्याची इच्छा असल्यामुळे त्याला आपली वाईट सवय सोडायला मदत होते!—कलस्सै. १:१०; ३:२३.

११. विशिष्ट ध्येय ठेवणं का महत्त्वाचं आहे?

११ विशिष्ट ध्येय ठेवा. विशिष्ट ध्येय ठेवल्यामुळे सुरू केलेली गोष्ट लवकरात लवकर पूर्ण करणं सोपं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही नियमितपणे बायबल वाचण्याचं ध्येय ठेवलं असेल. पण जर तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन व्यवस्थितपणे केलं नाही तर तुम्हाला तुमच्या योजनेनुसार काम करता येणार नाही. * कदाचित मंडळीतले वडील भाऊबहिणींची जास्त वेळा मेंढपाळ भेट घेण्याचं ठरवतील. पण कालांतराने त्यांच्या लक्षात येईल की त्यांनी ठरवल्याप्रमाणे कार्य केलेलं नाही. मग अशा वेळी त्यांना जर यशस्वी व्हायचं असेल तर ते स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकतात: “आपण अशा भाऊबहिणींची यादी बनवली आहे का ज्यांना मेंढपाळ भेटीमुळे जास्त मदत होईल? त्यांना भेट देण्यासाठी आपण एक विशिष्ट वेळ ठरवली आहे का?”

१२. आपल्याला काय करण्याची गरज पडू शकते आणि का?

१२ अवाजवी अपेक्षा ठेवू नका. आपल्यापैकी कोणाकडेही ठरवलेल्या सर्वच गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारा वेळ, साधनं किंवा ताकद नाही. त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारा आणि स्वतःबद्दल वाजवी दृष्टिकोन ठेवा. एखादी ठरवलेली गोष्ट तुमच्या अवाक्याबाहेर आहे असं जाणवल्यावर तुम्हाला घेतलेला निर्णय कदाचित बदलावा लागेल. (उप. ३:६) समजा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं परीक्षण केलं आहे, त्यात गरजेनुसार फेरबदल केले आहेत आणि आता तुम्ही त्यानुसार काम करू शकता अशी तुम्हाला खातरी पटली आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या पाच गोष्टींमुळे मदत होऊ शकते यावर आता आपण चर्चा करू या.

निर्णयानुसार काम पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलणं

१३. तुमच्या निर्णयानुसार कार्य करण्याची ताकद तुम्हाला कशामुळे मिळू शकते?

१३ कार्य करण्याची ताकद मिळवण्यासाठी प्रार्थना करा. देव तुम्हाला तुमच्या निर्णयानुसार “कार्य करण्याची” ताकद देऊ शकतो. (फिलिप्पै. २:१३) त्यामुळे तुम्हाला ताकद मिळावी म्हणून देवाकडे पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला वेळ लागत आहे असं वाटत असलं तरी प्रार्थना करत राहा. येशूने म्हटलं होतं की “मागत राहा म्हणजे तुम्हाला [पवित्र आत्मा] दिलं जाईल.”—लूक ११:९, १३.

१४. नीतिसूत्रे २१:५ या वचनात दिलेलं तत्त्व आपल्याला घेतलेल्या निर्णयानुसार काम करायला कसं मदत करू शकतं?

१४ योजना बनवा. (नीतिसूत्रे २१:५ वाचा.) कोणतंही काम सुरू करण्याआधी तुम्ही एक चांगली योजना बनवणं आणि त्या योजनेनुसार काम करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा एखादा निर्णय घेता तेव्हा तो पूर्ण करण्यासाठी जी विशिष्ट पावलं उचलावी लागतील त्यांची एक यादी बनवा. एखादं मोठं काम साध्य करायचं असल्यास त्याची छोट्या-छोट्या कामांमध्ये विभागणी करा. मग तुम्ही जसजसं एक-एक काम पूर्ण करत जाल, तसतसं तुम्ही बरचसं काम पूर्ण केलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. पौलने भाऊबहिणींना सांगितलं की तो करिंथमध्ये पोहोचल्यावर दान गोळा करण्याऐवजी, त्यांनी “दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी” दान बाजूला काढून ठेवावं. (१ करिंथ. १६:२) एखाद्या कामाची लहान कामांमध्ये विभागणी केली तर आपल्याला त्याचं दडपणही येणार नाही.

१५. योजना बनवल्यानंतर काय करणं गरजेचं आहे?

१५ तुम्ही तुमची योजना लिहून काढली तर तुम्हाला त्यानुसार काम करणं सोपं जाईल. (१ करिंथ. १४:४०) उदाहरणार्थ, मंडळीच्या वडिलांनी एकत्र मिळून घेतलेल्या निर्णयांची नोंद करण्यासाठी ते एका वडिलांना सांगतात. एखादं काम करायला कोणाला नेमण्यात आलं आहे आणि ते कधीपर्यंत पूर्ण केलं जावं या माहितीचीही नोंद केली जाते. वडील जेव्हा त्यांच्या कामांची अशी यादी बनवतात तेव्हा त्यांना ठरवल्यानुसार काम करणं सोपं जातं. (१ करिंथ. ९:२६) तुम्हीही तुमच्या दररोजच्या कामांबाबतीत त्यांचं अनुकरण करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला दररोज कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याची तुम्ही एक यादी बनवू शकता. आणि महत्त्वाच्या गोष्टी यादीच्या सुरुवातीला लिहू शकता. असं केल्यामुळे सुरू केलेलं काम तुम्हाला पूर्ण तर करता येईलच, पण त्यासोबत ते कमी वेळेत पूर्ण करणंही तुम्हाला शक्य होईल.

१६. आपल्या निर्णयांनुसार काम करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि रोमकर १२:११ या गोष्टीला आणखी कसं स्पष्ट करतं?

१६ मेहनत घ्या. योजनेनुसार काम करण्यासाठी आणि ते काम पूर्ण करण्यासाठी मेहनत लागते. (रोमकर १२:११ वाचा.) पौलने तीमथ्यला एक चांगला शिक्षक बनण्यासाठी जिवापाड मेहनत घ्यायला आणि चिकाटीने प्रयत्न करत राहायला सांगितलं. पौलचा हा सल्ला आपण इतर आध्यात्मिक ध्येयांबाबतीतही लागू करू शकतो.—१ तीम. ४:१३, १६.

१७. आपण ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी इफिसकर ५:१५, १६ या वचनांमध्ये दिलेला सल्ला कसा लागू करू शकतो?

१७ वेळेचं सुज्ञपणे नियोजन करा. (इफिसकर ५:१५, १६ वाचा.) तुम्ही एखादं काम कधी पूर्ण करणार आहात त्याची एक वेळ ठरवा आणि ते काम तेव्हाच पूर्ण करा. ते काम पूर्ण करण्यासाठी परिस्थिती चांगली होण्याची वाट बघू नका; कारण परिस्थिती सर्व बाजूंनी नेहमीच चांगली असू शकत नाही. (उप. ११:४) कमी महत्त्वाच्या गोष्टींमागे तुमचा वेळ आणि शक्‍ती जाऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा. कारण महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ आणि शक्‍ती देणं गरजेचं आहे. (फिलिप्पै. १:१०) शक्य असल्यास अशी वेळ निवडा जेव्हा इतर जण तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाहीत. इतरांना सांगा की तुम्हाला एकचित्ताने काम करण्यासाठी वेळ हवा आहे. तसंच, काम करताना फोन बंद करणं, ई-मेल आणि मेसेजेस न बघणं या गोष्टींमुळेही तुम्हाला काम वेळेत पूर्ण करायला मदत होईल. *

१८-१९. कठीण वाटत असलं तरीही तुम्ही ठरवलेली गोष्ट कशी पूर्ण करू शकता?

१८ चांगल्या परिणामांबद्दल विचार करा. एखाद्या निर्णयामुळे होणाऱ्‍या परिणामाची तुलना, आपण प्रवासाच्या अंतिम मुक्कामाशी करू शकतो. तुम्हाला निर्धारित ठिकाणी पोहोचायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवणं गरजेचं आहे. प्रवासादरम्यान एक रस्ता बंद असला तर तुम्ही थांबणार नाही तर दुसऱ्‍या रस्त्याने जाल. त्याच प्रकारे, आपण निर्णयांच्या चांगल्या परिणामांवर विचार केला तर आपण हार मानणार नाही; मग आपल्यासमोर कितीही समस्या किंवा अडथळे आले तरीही.—गलती. ६:९.

१९ हे खरं आहे की आपल्याला चांगले निर्णय घेणं कठीण जाऊ शकतं आणि त्या निर्णयांनुसार काम करणं आव्हानात्मक वाटू शकतं. पण असं असलं तरी यहोवाकडे मदत मागितल्याने आपल्याला बुद्धि आणि शक्‍ती मिळू शकते आणि आपण सुरू केलेलं काम पूर्ण करू शकतो.

गीत ४५ उन्‍नती करू या!

^ परि. 5 तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा तुम्हाला कधी पस्तावा होतो का? किंवा तुम्हाला निर्णय घेणं आणि त्यानुसार काम करणं कठीण जातं का? या लेखात या आव्हानांबद्दल चर्चा करण्यात आली आहे आणि आपण हाती घेतलेलं काम कसं पूर्ण करू शकतो हेही या लेखात सांगण्यात आलं आहे.

^ परि. 11 तुम्हाला वैयक्‍तिक बायबल वाचनात मदत व्हावी म्हणून, तुम्ही “बायबल वाचनाचा आराखडा” याचा वापर करू शकता. हा आराखडा jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

^ परि. 17 वेळेचं चांगलं नियोजन कसं करावं याबद्दल अधिक माहितीसाठी अवेक! एप्रिल २०१० या अंकातला “ट्‌वेंटी वेझ टू क्रियेट मोर टाईम” हा लेख पाहा.