व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४७

लेवीय पुस्तकातून शिकण्यासारखे धडे

लेवीय पुस्तकातून शिकण्यासारखे धडे

“संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असून ते . . . उपयोगी आहे.”—२ तीम. ३:१६.

गीत ३७ देवप्रेरित शास्त्रवचने

सारांश *

१-२. आपण लेवीय पुस्तकातून शिकण्यासाठी उत्सुक का असलं पाहिजे?

प्रेषित पौलने तीमथ्यला आठवण करून दिली की “संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असून ते” उपयोगी आहे. (२ तीम. ३:१६) यात लेवीय पुस्तकाचाही समावेश होतो. या पुस्तकाबद्दल तुमच्या काय भावना आहेत? काही लोकांना कदाचित वाटेल की या पुस्तकात फक्‍त नियमांची मोठी यादी दिली आहे आणि आज ते आपल्याला लागू होत नाहीत. पण ख्रिस्ती या नात्याने आपण तसा विचार करू नये.

लेवीय पुस्तक जवळपास ३,५०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आलं होतं, पण तरीही यहोवाने हे पुस्तक “आपल्याला शिक्षण देण्याकरता” जपून ठेवलं. (रोम. १५:४) या पुस्तकातून आपल्याला यहोवाची विचारसरणी कळते आणि यामुळे आपण त्यातून शिकून घेण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे. देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या या पुस्तकातून आपण अनेक धडे शिकू शकतो. आता आपण त्यांपैकी चार धड्यांवर चर्चा करू या.

आपण यहोवाची पसंती कशी मिळवू शकतो?

३. दरवर्षी प्रायश्‍चित्ताच्या दिवशी बलिदानं अर्पण करणं गरजेचं का होतं?

पहिला धडा: यहोवाची पसंती असल्याशिवाय त्याच्या सेवेसाठी आपण करत असलेले त्याग व्यर्थ आहेत.  प्रायश्‍चित्ताच्या दिवशी संपूर्ण इस्राएल राष्ट्र एकत्र यायचं आणि प्राण्यांचं बलिदान अर्पण करायचं. या बलिदानांमुळे इस्राएली लोकांना आठवण व्हायची की त्यांना पापापासून सुटका मिळवण्याची गरज आहे. पण त्या दिवशी परमपवित्र स्थानात बलिदानाचं रक्‍त आणण्याआधी मुख्य याजकाला आणखी एक गोष्ट करणं गरजेचं होतं. आणि हे करणं राष्ट्राच्या पापांची माफी मिळवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं.

(परिच्छेद ४ पाहा) *

४. लेवीय १६:१२, १३ या वचनांनुसार प्रायश्‍चित्ताच्या दिवशी पहिल्यांदा परमपवित्र स्थानात गेल्यावर मुख्य याजक काय करायचा? (मुखपृष्ठावरील चित्र पाहा.)

लेवीय १६:१२, १३ वाचा. प्रायश्‍चित्ताच्या दिवसाची कल्पना करा: मुख्य याजक निवासमंडपात प्रवेश करत आहे. या दिवशी त्याला तीन वेळा परमपवित्र स्थानात प्रवेश करावा लागणार आहे आणि ही त्यातली पहिली वेळ आहे. त्याच्या एका हातात सुगंधित धूप असलेलं भांडं आहे, तर दुसऱ्‍या हातात सोन्याचं धूप जाळण्याचं पात्र आहे आणि त्यात जळते निखारे आहेत. मग तो पवित्र आणि परमपवित्र स्थानाला वेगळं करणाऱ्‍या पडद्याजवळ येऊन काही क्षण थांबतो. मनात गहिरा आदर बाळगून तो परमपवित्र स्थानात प्रवेश करतो आणि कराराच्या कोशापुढे उभा राहतो. लाक्षणिक अर्थाने तो जणू यहोवासमोर उभा आहे. आता तो पात्रात असलेल्या जळत्या निखाऱ्‍यांवर पवित्र धूप टाकतो. यामुळे ती संपूर्ण खोली सुगंधित होऊन जाते. * त्याच दिवशी नंतर त्याला पापबलीचं रक्‍त घेऊन परत परमपवित्र स्थानात यावं लागेल. यात एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे मुख्य याजक आधी  पवित्र धूप जाळायचा आणि मग नंतर पापबलीचं रक्‍त अर्पण करायचा.

५. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी वापरण्यात येणारा धूप यापासून आपण काय शिकू शकतो?

प्रायश्‍चित्ताच्या दिवशी जो धूप जाळला जायचा त्यावरून आपण काय शिकू शकतो? यहोवाचे विश्‍वासू उपासक त्याला ज्या प्रार्थना करतात त्यांची तुलना बायबल, धूपाशी करतं. (स्तो. १४१:२; प्रकटी. ५:८) परमपवित्र स्थानात मुख्य याजक मनात गहिरा आदर बाळगून यहोवासमोर यायचा. त्याच प्रकारे आपण जेव्हा प्रार्थनेत यहोवाशी बोलतो, तेव्हा आपणही मनात गहिरा आदर बाळगला पाहिजे. संपूर्ण विश्‍वाचा निर्माणकर्ता आपल्याला त्याच्याशी बोलायची संधी देतो यासाठी आपण मनापासून कदर बाळगली पाहिजे. एक लहान मूल आपल्या पित्याशी जसं निःसंकोच बोलू शकतं तसंच आपणही यहोवाशी बोलू शकतो. (याको. ४:८) यहोवा आपल्याला त्याचे जवळचे मित्र समजतो. (स्तो. २५:१४) यहोवाने आपल्याला जी संधी दिली आहे ती आपण कधीही गमावू नये; त्याचं मन दुखावेल असं काहीही आपण करू नये.

६. मुख्य याजक बलिदान अर्पण करण्याआधी  धूप जाळायचा यावरून आपण काय शिकू शकतो?

मुख्य याजकाला आधी  धूप जाळावा लागायचा आणि मग त्यानंतरच त्याला बलिदान अर्पण करणं शक्य होतं. आधी धूप जाळण्याद्वारे तो यहोवाची पसंती मिळवायचा आणि मग बलिदान अर्पण करायचा. आपण यावरून काय शिकू शकतो? पृथ्वीवर असताना आपलं जीवन बलिदान म्हणून अर्पण करण्याआधी येशूला एक खूप महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं होतं. ही गोष्ट मानवजातीचं तारण करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाची होती. त्याला काय करणं गरजेचं होतं? त्याला आयुष्यभर यहोवाला एकनिष्ठ राहायचं होतं. असं करण्याद्वारे त्याला यहोवाची पसंती मिळणार होती आणि यामुळेच यहोवाने त्याचं बलिदान मान्य केलं असतं. एकनिष्ठ राहण्याद्वारे येशू हे सिद्ध करू शकत होता की यहोवाच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणंच योग्य आहे. तसंच फक्‍त यहोवालाच राज्य करण्याचा अधिकार आहे आणि राज्य करण्याची त्याचीच पद्धत योग्य आहे, हेदेखील येशू सिद्ध करू शकत होता.

७. येशू ज्या प्रकारे जीवन जगला त्यामुळे यहोवाला आनंद का झाला?

पृथ्वीवर असताना येशूने नेहमी यहोवाचे स्तर पाळले. येशूसमोर अनेक प्रलोभनं आणि परीक्षा आल्या. तसंच त्याला दुःखदायक मृत्यूलाही सामोरं जावं लागणार होतं, तरीही तो यहोवाला एकनिष्ठ राहिला. आपल्या पित्याची राज्य करण्याची पद्धतच योग्य आहे हे सिद्ध करण्याचा त्याचा निर्धार पक्का होता. (फिलिप्पै. २:८) परीक्षांचा सामना करताना येशूने “आक्रोश करून व अश्रू गाळून” प्रार्थना केली. (इब्री ५:७) तो मनापासून प्रार्थना करायचा आणि यामुळे यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा त्याचा निर्धार आणखी पक्का झाला. येशूने केलेल्या प्रार्थना यहोवासाठी सुगंधित धूपासारख्या होत्या. येशू आयुष्यभर यहोवाला एकनिष्ठ राहिला आणि यामुळे यहोवाला खूप आनंद झाला. तसंच, यहोवालाच राज्य करण्याचा अधिकार आहे हेदेखील सिद्ध झालं.

८. आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

जीवनात नेहमी यहोवाला एकनिष्ठ राहून आणि त्याने दिलेल्या तत्त्वांवर चालून आपण येशूचं अनुकरण करू शकतो. आपल्याला यहोवाचं मन आनंदित करायचं आहे, त्यामुळे परीक्षांचा सामना करत असताना आपण कळकळीने त्याला प्रार्थना केली पाहिजे. असं करण्याद्वारे आपण यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराचं समर्थन करत असतो. आपण जर यहोवाला आवडत नसलेली कार्यं करत असलो, तर तो आपल्या प्रार्थना स्वीकारणार नाही. याउलट आपण जर यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगत असलो, तर आपल्या प्रार्थना यहोवासाठी सुगंधित धूपासारख्या असतील याची आपण खातरी बाळगू शकतो. तसंच, आपल्या एकनिष्ठ सेवेमुळे यहोवाचं मन नक्कीच आनंदित होईल.—नीति. २७:११.

यहोवाबद्दल कदर आणि प्रेम असल्यामुळे आपण त्याची सेवा करतो

(परिच्छेद ९ पाहा) *

९. शांत्यर्पणं का दिली जायची?

दुसरा धडा: यहोवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल कदर असल्यामुळे आपण त्याची सेवा करतो.  हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण प्राचीन इस्राएलमध्ये उपासनेत देण्यात येणाऱ्‍या शांत्यर्पणांबद्दल चर्चा करू या. ही अर्पणं उपासनेचा एक महत्त्वाचा भाग होती. * लेवीय पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं की एक इस्राएली व्यक्‍ती “उपकारस्तुतीच्या” उद्देशाने शांत्यर्पण देऊ शकत होती. (लेवी. ७:११-१३, १६-१८) त्या व्यक्‍तीला हे बलिदान देण्याची सक्‍ती नव्हती, तर तिची देण्याची इच्छा असल्यामुळे ती यहोवाला हे बलिदान अर्पण करायची. यहोवा देवावर मनापासून प्रेम असल्यामुळे ती व्यक्‍ती स्वेच्छेने हे बलिदान द्यायची. बलिदान अर्पण करणारी व्यक्‍ती, तिच्या कुटुंबातले सदस्य आणि याजक त्या प्राण्याचं मांस खाऊ शकत होते. पण बलिदान देण्यात आलेल्या प्राण्याचे काही अवयव आणि भाग फक्‍त यहोवासाठी राखून ठेवण्यात यायचे. ते भाग कोणते होते?

(परिच्छेद १० पाहा) *

१०. लेवीय ३:६, १२, १४-१६ या वचनांमध्ये शांत्यर्पणांबद्दल जे सांगितलं आहे, त्यावरून आपल्याला येशूच्या मनोवृत्तीबद्दल काय शिकायला मिळतं?

१० तिसरा धडा: यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण आपलं सर्वोत्तम त्याला देतो.  यहोवाच्या नजरेत त्या प्राण्याची चरबी हा त्याचा सर्वोत्तम भाग होता. त्याने आज्ञा दिली होती की बलिदान म्हणून देण्यात आलेल्या प्राण्याचे काही महत्त्वाचे अवयव, जसं की गुरदे त्याच्यासाठी राखून ठेवण्यात यावे. (लेवीय ३:६, १२, १४-१६ वाचा.) म्हणून जेव्हा एखादी इस्राएली व्यक्‍ती यहोवाला स्वखुशीने प्राण्याचे महत्त्वाचे अवयव आणि चरबी अर्पण करायची तेव्हा त्याला खूप आनंद व्हायचा. अशा प्रकारचं बलिदान देण्याद्वारे ती व्यक्‍ती दाखवायची की यहोवाला आपलं सर्वोत्तम देण्याची तिची इच्छा आहे. येशू ख्रिस्तानेही यहोवाप्रती प्रेम असल्यामुळे संपूर्ण मनाने त्याची सेवा केली आणि अशा प्रकारे आपलं सर्वोत्तम त्याला अर्पण केलं. (योहा. १४:३१) यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात येशूला आनंद मिळायचा आणि देवाने दिलेल्या नियमांवर त्याचं मनापासून प्रेम होतं. (स्तो. ४०:८) येशूला पूर्ण मनाने सेवा करताना पाहून यहोवाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा.

आपलं यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण त्याला सर्वोत्तम देतो (परिच्छेद ११-१२ पाहा) *

११. आपल्या सेवेची तुलना आपण शांत्यर्पणांसोबत कशी करू शकतो, आणि यामुळे आपल्याला सांत्वन का मिळतं?

११ आपण यहोवाची स्वखुशीने करत असलेली सेवा ही शांत्यर्पणांसारखीच आहे. यावरून दिसून येतं की आपल्याला यहोवाबद्दल किती कदर वाटते. यहोवावर मनापासून प्रेम असल्यामुळे आपण त्याला आपलं सर्वोत्तम देतो. त्याच्यावर आणि त्याच्या तत्त्वांवर मनापासून प्रेम करणाऱ्‍या लाखो विश्‍वासू उपासकांना सेवा करताना पाहून यहोवाला खरंच किती आनंद होत असेल! यहोवा फक्‍त आपण करत असलेली सेवाच पाहत नाही, तर त्यामागची भावनादेखील पाहतो. ही गोष्ट आपल्यासाठी खूप सांत्वन देणारी आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही वृद्ध आहात आणि आता सेवेत आधीसारखं सहभाग घेणं तुम्हाला शक्य नाही, तर यहोवा तुमची परिस्थिती आणि मर्यादा जाणतो याची खातरी बाळगा. तुम्हाला कदाचित वाटेल की तुम्ही खूप कमी सेवा करत आहात, पण यहोवा तुमच्या मनात त्याच्याप्रती किती प्रेम आहे हे पाहतो. आणि त्या प्रेमाने प्रेरित होऊन तुम्ही शक्य तितकी  सेवा करता तेव्हा त्याला आनंद होतो. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुमचं सर्वोत्तम देता तेव्हा तो तुमची सेवा स्वीकारतो.

१२. शांत्यर्पण दिल्यावर यहोवाच्या ज्या भावना होत्या त्यावरून आपल्याला कोणती खातरी मिळते?

१२ आपण शांत्यर्पणांपासून काय शिकू शकतो? प्राण्याचे महत्त्वाचे अवयव आणि भाग वेदीवर जाळले जायचे, तेव्हा त्याचा धूर वर जायचा. यामुळे यहोवाचं मन आनंदित व्हायचं. तुम्ही स्वखुशीने आणि संपूर्ण मनाने सेवा करता तेव्हा यहोवाचं मन आनंदित होतं याची तुम्ही खातरी बाळगू शकता. (कलस्सै. ३:२३) तुमची सेवा पाहून यहोवा किती संतुष्ट होत असेल याची कल्पना करा. तुम्ही त्याच्या सेवेसाठी जे काही करता, मग ते कमी असो किंवा जास्त, त्याला तो मौल्यवान संपत्ती समजतो. तुमच्या सेवेबद्दल तो नेहमी कदर बाळगेल आणि त्याची आठवण ठेवेल.—मत्त. ६:२०; इब्री ६:१०.

यहोवा त्याच्या संघटनेला आशीर्वाद देतो

१३. लेवीय ९:२३, २४ या वचनांनुसार याजकांच्या नेमणुकीवर यहोवाने आपली पसंती कशी दाखवली?

१३ चौथा धडा: यहोवा आपल्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाला आशीर्वाद देत आहे.  इ.स.पू. १५१२ मध्ये सीनाय पर्वताच्या पायथ्याशी निवासमंडपाची स्थापना करण्यात आली. त्या वेळी काय झालं याचा विचार करा. (निर्ग. ४०:१७) मोशेने एक विधी करून अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक म्हणून नेमलं. याजकांनी पहिल्यांदाच प्राण्यांचं बलिदान अर्पण केलं तेव्हा संपूर्ण इस्राएल राष्ट्र तिथे एकत्र आलं होतं. (लेवी. ९:१-५) याजकांच्या नेमणुकीवर यहोवाची पसंती आहे हे त्याने कसं दाखवलं? अहरोन आणि मोशे लोकांना आशीर्वाद देत असतानाच स्वर्गातून अग्नी आला आणि वेदीवर असलेलं बलिदान पूर्णपणे भस्म झालं.—लेवीय ९:२३, २४ वाचा.

१४. यहोवाने याजकपदाच्या नेमणुकीवर ज्या प्रकारे पसंती दाखवली ते आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे?

१४ स्वर्गातून आलेल्या या अग्नीमुळे काय दिसून आलं? याजकपदासाठी नेमण्यात आलेल्या लोकांवर यहोवाची पसंती आहे हे तिथे स्पष्ट झालं. इस्राएली लोकांनी हे पाहिल्यामुळे त्यांना याजकांचं समर्थन करण्याची प्रेरणा मिळाली. आज हे आपल्याशी कसं संबंधित आहे? इस्राएल राष्ट्रामध्ये याजकांना नेमण्यात आलं होतं, पण ती योजना भविष्यासाठी असलेल्या याजकांच्या एका मोठ्या योजनेची फक्‍त छाया होती. या योजनेत येशू ख्रिस्त हा मुख्य याजक आहे आणि १,४४,००० जन हे याजक म्हणून स्वर्गात त्याच्यासोबत सेवा करतील.—इब्री ४:१४; ८:३-५; १०:१.

यहोवा त्याच्या संघटनेला मार्गदर्शन व आशीर्वाद देत आहे आणि आपण संपूर्ण मनाने संघटनेला समर्थन देतो (परिच्छेद १५-१७ पाहा) *

१५-१६. “विश्‍वासू आणि बुद्धिमान” दासाला यहोवाने आपली पसंती कशी दाखवली आहे?

१५ येशूने १९१९ साली अभिषिक्‍त बांधवांच्या एका छोट्या गटाला “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणून नेमलं. हा दास जगभरात चाललेल्या प्रचारकार्यात पुढाकार घेतो आणि ख्रिस्ताच्या अनुयायांना “योग्य वेळी अन्‍न” पुरवतो. (मत्त. २४:४५) विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला यहोवाची पसंती आहे याचे काही स्पष्ट पुरावे आपल्याजवळ आहेत का?

१६ विश्‍वासू दासाचं काम थांबवण्यासाठी सैतान आणि त्याच्या समर्थकांनी बरेच प्रयत्न केले आहेत. या दासाला जर यहोवाची मदत मिळाली नसती, तर त्याला हे काम करणं कधीच शक्य झालं नसतं. मागच्या शतकात दोन विश्‍व युद्धं झाली, साक्षीदारांचा छळ करण्यात आला, जगाची आर्थिक स्थिती ढासळली आणि काही ठिकाणी तर साक्षीदारांवर अन्यायदेखील झाला आहे. पण इतकं सगळं होऊनही विश्‍वासू दास ख्रिस्ताच्या अनुयायांना नियमितपणे आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. आज आपल्याजवळ किती मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न उपलब्ध आहे याची कल्पना करा. आणि हे सर्व आपल्याला ९०० पेक्षा जास्त भाषांमध्ये अगदी मोफत पुरवलं जातं. यावरून हे स्पष्ट आहे की या कार्याला यहोवाचा पूर्ण पाठिंबा आहे. यहोवा आपल्या कार्यावर आशीर्वाद देत असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे आपलं प्रचारकार्य. आज आनंदाचा संदेश एका अर्थी “सर्व  जगात घोषित” केला जात आहे. (मत्त. २४:१४) यहोवा आपल्या संघटनेला मार्गदर्शन आणि भरभरून आशीर्वाद देत आहे यात काहीच शंका नाही.

१७. यहोवाच्या संघटनेला आपण आपलं समर्थन कसं दाखवू शकतो?

१७ आपण स्वतःला विचारलं पाहिजे की ‘यहोवाच्या संघटनेचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून कदर बाळगतो का?’ मोशे आणि अहरोन यांच्या दिवसांत यहोवाने स्वर्गातून अग्नी पाठवून दृश्‍य पुरावा दिला की त्याने नेमलेल्या लोकांना त्याची स्वीकृती आहे. त्याच प्रकारे, यहोवा आज त्याच्या संघटनेचा वापर करत असल्याचा स्पष्ट पुरावा देत आहे. यहोवा आपल्याला पुरवत असलेल्या सर्व गोष्टींसाठी आपण मनापासून त्याचे आभार मानले पाहिजेत. (१ थेस्सलनी. ५:१८, १९) यहोवाच्या संघटनेला आपलं समर्थन आहे हे आपण कसं दाखवू शकतो? आपली प्रकाशनं, सभा, संमेलनं आणि अधिवेशनांमधून आपल्याला जे बायबल आधारित मार्गदर्शन दिलं जातं, त्याचं पालन करण्याद्वारे आपण आपलं समर्थन दाखवू शकतो. यासोबतच, प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात होईल तितका सहभाग घेऊनही आपण संघटनेला आपलं समर्थन असल्याचं दाखवू शकतो.—१ करिंथ. १५:५८.

१८. तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१८ लेवीय पुस्तकातून आपण जे धडे शिकलो ते लागू करण्याचा आपण निर्धार करू या. आपण जे बलिदान अर्पण करतो, म्हणजे सेवेसाठी जे त्याग करतो ते यहोवाने स्वीकारावेत म्हणून आधी आपण त्याची पसंती मिळवू या. यहोवाबद्दल मनात कदर असल्यामुळे आपण त्याची सेवा करू या. त्याच्यावर मनापासून प्रेम असल्यामुळे आपण नेहमी आपलं सर्वोत्तम त्याला देत राहू या. तसंच, आपण यहोवाच्या संघटनेला पूर्ण मनाने समर्थन देऊ या कारण तो संघटनेला भरभरून आशीर्वाद देत आहे. या सर्व गोष्टी करण्याद्वारे आपण त्याला दाखवून देऊ शकतो की त्याचे साक्षीदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपण त्याचे खूप आभारी आहोत.

गीत १ यहोवाचे मन हर्षविणे

^ परि. 5 यहोवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमांबद्दल आपल्याला लेवीय पुस्तकात वाचायला मिळतं. आज ख्रिस्ती या नात्याने आपल्याला ते नियम पाळण्याची गरज नाही. पण तरीही त्यांवर मनन केल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. लेवीय पुस्तकातून मिळणाऱ्‍या मौल्यवान धड्यांबद्दल आपण या लेखात शिकणार आहोत.

^ परि. 4 निवासमंडपात जाळण्यात आलेला धूप पवित्र मानला जायचा आणि प्राचीन इस्राएलमध्ये तो फक्‍त यहोवाची उपासना करण्यासंबंधीच्या कार्यांतच वापरला जायचा. (निर्ग. ३०:३४-३८) पहिल्या शतकात ख्रिश्‍चनांनी उपासनेसाठी धूप जाळला असा उल्लेख कुठेही आढळत नाही.

^ परि. 9 शांत्यर्पणाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इन्साइट-२ पृ. ५२६ आणि टेहळणी बुरूज१२ १/१५ पृ. १९, परि. ११ पाहा.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मुख्य याजक परमपवित्र स्थानात सुगंधी धूप आणि निखारे घेऊन यायचा आणि त्यामुळे ती खोली सुवासिक व्हायची. नंतर, तो पुन्हा तिथे पापार्पणाचं रक्‍त घेऊन यायचा.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: १. इस्राएली व्यक्‍ती याजकाला शांत्यर्पणासाठी एक मेंढरू देते, याद्वारे ती यहोवाप्रती असलेली आपली व तिच्या कुटुंबाची कदर व्यक्‍त करते.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: २. पृथ्वीवरील आपल्या सेवेदरम्यान येशूने देवाच्या आज्ञा पाळण्याद्वारे आणि आपल्या शिष्यांनाही त्या पाळण्यासाठी मदत करण्याद्वारे यहोवावर असलेलं प्रेम व्यक्‍त केलं.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: ३. एका वृद्ध बहिणीला आजारपणामुळे जास्त सेवा करता येत नाही, तरीही ती पत्राद्वारे साक्षकार्य करत आहे आणि यहोवाला आपलं सर्वोत्तम देत आहे.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: फेब्रुवारी २०१९ मध्ये नियमन मंडळाचे सदस्य बंधू गेरिट लॉश यांनी जर्मन भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन  याची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. आज या दोन बहिणींसारखं जर्मनीमधले इतर प्रचारकही सेवाकार्यात आनंदाने बायबलचा उपयोग करत आहेत.