व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ९

यहोवाला तुमचं सांत्वन करू द्या

यहोवाला तुमचं सांत्वन करू द्या

“माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.”—स्तो. ९४:१९.

गीत ३८ आपला भार यहोवावर टाक

सारांश *

१. आपल्याला कशामुळे चिंता वाटू शकते आणि यामुळे आपण काय विचार करायला लागू?

तुम्हाला कधी एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंता * वाटली आहे का? कदाचित एखाद्याच्या वागण्या-बोलण्यामुळे तुमचं मन दुखावलं असेल आणि त्यामुळे तुम्ही चिंतित असाल. किंवा तुमच्याच वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही चिंतित असाल. उदाहरणार्थ, तुमच्या हातून चूक घडली आहे आणि तुम्हाला चिंता वाटत आहे की यहोवा तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि त्यात भर म्हणजे, तुम्ही असाही विचार करत असाल की एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला खूप जास्त चिंता वाटते, म्हणजेच तुमच्यात विश्‍वासाची कमतरता आहे आणि तुम्ही एक वाईट व्यक्‍ती आहात. पण असं खरंच आहे का?

२. चिंता वाटणं म्हणजे विश्‍वासाची कमतरता असणं असं नाही हे बायबलच्या कोणत्या उदाहरणांवरून दिसून येतं?

आता आपण बायबलमधली काही उदाहरणं पाहू या. संदेष्टा शमुवेलची आई हन्‍ना हिचा देवावर भक्कम विश्‍वास होता. पण जेव्हा तिच्या घरातली व्यक्‍ती तिच्याशी वाईट वागली तेव्हा ती खूप निराश झाली. (१ शमु. १:७) प्रेषित पौलचा विश्‍वास खूप मजबूत होता पण सर्व मंडळ्यांची काळजी असल्यामुळे त्याला ‘चिंता’ वाटली. (२ करिंथ. ११:२८) दावीद राजाचा यहोवावर खूप विश्‍वास होता आणि यामुळे यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. (प्रे. कार्ये १३:२२) असं असलं तरी दावीदने केलेल्या चुकांमुळे त्याचं मन त्याला खात होतं आणि तो अनेकदा निराश झाला. (स्तो. ३८:४) यहोवाने या तिन्ही सेवकांना सांत्वन आणि दिलासा दिला. त्यांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो हे आता आपण पाहू या.

आपण विश्‍वासू हन्‍नाकडून काय शिकतो?

३. इतरांच्या बोलण्यामुळे आपण हताश का होऊ शकतो?

इतर जण जेव्हा आपल्याशी कठोरपणे बोलतात किंवा आपल्याला वाईट वागणूक देतात तेव्हा आपल्याला चिंता वाटू शकते. आणि आपल्याला खासकरून जास्त वाईट तेव्हा वाटतं, जेव्हा दुखावणारी व्यक्‍ती आपल्या जवळची असते. आता आपल्यात आधीसारखी मैत्री राहिलेली नाही अशीही भीती आपल्याला वाटू शकते. कदाचित, त्या व्यक्‍तीने जाणूनबुजून आपलं मन दुखावलं नसेल पण तिच्या बोलण्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटलं असेल. (नीति. १२:१८) किंवा कदाचित एखाद्याने जाणूनबुजून असे काही शब्द वापरले असतील ज्यामुळे आपलं मन दुखावलं असेल. एका तरुण बहिणीबरोबर असंच काहीतरी घडलं. ती म्हणते, “काही वर्षांआधी माझ्या जवळच्या मैत्रिणीने माझ्याबद्दल इंटरनेटवर अफवा पसरवायला सुरुवात केली. यामुळे मला खूप वाईट वाटलं आणि मी निराश झाले. मला कळतच नव्हतं की ती माझ्याशी इतकी वाईट का वागली.” तुमच्या जवळच्या मित्राने किंवा नातेवाइकाने तुम्हाला दुखावलं असेल तर तुम्ही हन्‍नाच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकता.

४. हन्‍नाला कोणत्या कठीण समस्यांचा सामना करावा लागला?

हन्‍नाला काही कठीण समस्यांचा सामना करावा लागला. बऱ्‍याच वर्षांपर्यंत तिला मूल होत नव्हतं. (१ शमु. १:२) त्या काळी, बरेच इस्राएली लोक असा विचार करायचे की एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल, तर याचा अर्थ तिच्यावर देवाचा आशीर्वाद नाही. आणि एका स्त्रीसाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट होती. यामुळे हन्‍ना खूपच निराश होती. (उत्प. ३०:१, २) दुःखात भर म्हणजे, तिच्या नवऱ्‍याला दुसरी बायको होती. तिचं नाव होतं पनिन्‍ना आणि तिला मुलं होती. पनिन्‍ना हन्‍नावर जळायची आणि तिला त्रास व्हावा म्हणून खूप टोमणेही मारायची. (१ शमु. १:६) सुरुवातीला हन्‍नाला या समस्यांना तोंड देणं कठीण गेलं. ती इतकी निराश झाली की “ती रडे व काही खात नसे.” तिचं मन खूपच कटू झालं होतं. (१ शमु. १:७, १०) मग, अशा परिस्थितीत हन्‍नाला कुठून दिलासा मिळाला?

५. प्रार्थनेमुळे हन्‍नाला कशी मदत झाली?

हन्‍नाने यहोवाला प्रार्थना करून आपलं मन मोकळं केलं. प्रार्थना केल्यानंतर तिने आपल्या परिस्थितीबद्दल महायाजक एलीला सांगितलं. यावर एली तिला म्हणाला, “सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.” याचा काय परिणाम झाला? हन्‍नाने “परत जाऊन अन्‍न सेवन केले, व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमु. १:१७, १८) खरंच, प्रार्थनेमुळे हन्‍नाचं मन शांत झालं.

हन्‍नाप्रमाणे आज आपण मनाची शांती पुन्हा कशी मिळवू शकतो आणि ती कशी टिकवून ठेवू शकतो? (परिच्छेद ६-१० पाहा)

६. आपण हन्‍नाच्या उदाहरणातून आणि फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांतून प्रार्थनेबद्दल काय शिकू शकतो?

प्रार्थना करत राहिल्यामुळे आपण मनाची शांती पुन्हा मिळवू शकतो.  हन्‍ना आपल्या स्वर्गीय पित्याशी, यहोवाशी बराच वेळ बोलायची. (१ शमु. १:१२) आपणही यहोवाशी बराच वेळ बोलू शकतो आणि आपल्या चिंता, भीती आणि कमतरता त्याला सांगू शकतो. आपली प्रार्थना अलंकारिक भाषेत किंवा व्याकरणानुसार अगदीच व्यवस्थित मांडलेली असावी हे गरजेचं नाही. कधीकधी आपल्या दुःखाबद्दल आणि तणावाबद्दल सांगताना आपल्या डोळ्यांतून अश्रू येऊ शकतात. पण यहोवाला आपल्या प्रार्थनांचा कधीच कंटाळा येणार नाही. आपल्या समस्यांबद्दल प्रार्थना करण्यासोबतच आपण फिलिप्पैकर ४:६, ७ मध्ये दिलेला सल्ला लक्षात ठेवला पाहिजे. (वाचा.) या वचनांत पौलने खासकरून म्हटलं की आपण प्रार्थनेत यहोवाचे आभार व्यक्‍त केले पाहिजेत. यहोवाचे आभार मानण्याची आपल्याजवळ बरीच कारणं आहेत. उदाहरणार्थ, त्याने आपल्याला जीवन दिलं, सुंदर सृष्टी बनवली, आपल्यावर एकनिष्ठ प्रेम केलं आणि आपल्या सर्वांना सुंदर आशा दिली. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. हन्‍नाच्या उदाहरणातून आपण आणखी काय शिकू शकतो?

७. हन्‍ना आणि तिचा पती नियमितपणे कुठे जायचे?

हन्‍नाला इतक्या समस्या होत्या तरी ती आपल्या पतीसोबत यहोवाची उपासना करण्यासाठी शिलो इथल्या निवासमंडपात जायची. (१ शमु. १:१-५) खरंतर हन्‍ना जेव्हा निवासमंडपात गेली तेव्हा एली महायाजकाने तिला सांत्वन दिलं. त्याने म्हटलं की यहोवा तिच्या प्रार्थनेचं उत्तर देईल अशी त्याला आशा आहे.—१ शमु. १:९, १७.

८. सभांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? स्पष्ट करा.

नियमितपणे सभांना हजर राहिल्यामुळे आपण मनाची शांती पुन्हा मिळवू शकतो.  सभेच्या सुरुवातीला जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा देवाचा पवित्र आत्मा आपल्यासोबत राहावा अशी विनंती यहोवाकडे केली जाते. आणि या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक पैलू म्हणजे शांती. (गलती. ५:२२) आपण निराश असतानाही सभांना जातो तेव्हा यहोवा व आपले भाऊबहीण आपल्याला प्रोत्साहन देतात. यामुळे आपल्याला मनाची शांती पुन्हा मिळवायला मदत होते. प्रार्थना आणि सभा महत्त्वाच्या आहेत कारण त्यांद्वारे यहोवा आपल्याला दिलासा देतो. (इब्री १०:२४, २५) आता आपण हन्‍नाच्या उदाहरणावरून आणखी एक धडा शिकू या.

९. हन्‍नाच्या परिस्थितीत कोणता बदल झाली नाही, पण तिला कशामुळे मदत झाली?

हन्‍ना ज्या समस्यांमुळे चिंतित होती त्या सर्व लगेच दूर झाल्या नाहीत. हन्‍ना यहोवाची उपासना करून घरी परतली तेव्हा परिस्थिती आहे तशीच होती. तिला अजूनही पनिन्‍नासोबत एकाच घरात राहावं लागत होतं. तसंच, पनिन्‍नाचं वागणं-बोलणं आता बदललं होतं असंही बायबलमध्ये सांगितलेलं नाही. हन्‍नाला पुढेही पनिन्‍नाचं खोचक बोलणं सहन करत राहावं लागलं. पण या वेळी मात्र हन्‍ना तिच्या बोलण्यामुळे खचून गेली नाही तर तिने आपल्या मनाची शांती टिकवून ठेवली. हन्‍ना हे कसं करू शकली? तिला भरवसा होता की यहोवाने तिची प्रार्थना ऐकली आहे आणि म्हणून तिने चिंता करायचं सोडून दिलं. खरंतर, तिने यहोवाला तिचं सांत्वन करू दिलं. काही काळानंतर यहोवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि तिला मुलं झाली.—१ शमु. १:१९, २०; २:२१.

१०. आपण हन्‍नाच्या उदाहरणावरून काय शिकतो?

१० आपल्या समस्या दूर झाल्या नाहीत तरी आपण मनाची शांती पुन्हा मिळवू शकतो.  आपण कळकळून यहोवाला प्रार्थना केली आणि सभांना नियमितपणे हजर राहिलो तर याचा अर्थ आपल्या समस्या लगेचच दूर होतील असं नाही; काही समस्या कदाचित आहेत तशाच राहतील. पण हन्‍नाच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला मिळतं, की आपल्या बेचैन मनाला दिलासा देण्यापासून कोणतीच गोष्ट यहोवाला रोखू शकत नाही. तो आपल्याला कधीच विसरणार नाही आणि आज न्‌ उद्या तो आपल्या विश्‍वासूपणाचं प्रतिफळ नक्कीच देईल.—इब्री ११:६.

आपण प्रेषित पौलकडून काय शिकतो?

११. पौल कोणत्या कारणांमुळे चिंतित होता?

११ पौल बऱ्‍याच गोष्टींमुळे चिंतित होता. उदाहरणार्थ, भाऊबहिणींना समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे तो खूप चिंतित होता. त्याला त्यांची खूप काळजी होती. (२ करिंथ. २:४; ११:२८) पौलला प्रचारकार्यात बऱ्‍याचदा विरोधकांनी मारलं आणि तुरुंगातही टाकलं. त्यासोबतच, त्याला इतर समस्यांमुळेही चिंता होती. जसं की, त्याला “हलाखीच्या परिस्थितीत” काही दिवस काढावे लागले. (फिलिप्पै. ४:१२) इतकंच काय तर समुद्रप्रवास करताना त्याचं जहाज तीन वेळा फुटलं. आपण कल्पना करू शकतो की त्या परिस्थितीत तो किती चिंतित झाला असेल! (२ करिंथ. ११:२३-२७) मग पौलला या सर्व चिंतांचा सामना करण्यासाठी कुठून मदत मिळाली?

१२. पौलची चिंता कोणत्या गोष्टीमुळे कमी झाली?

१२ भाऊबहिणींना समस्यांचा सामना करावा लागला, तेव्हा पौलला चिंता वाटली पण त्याने स्वतःहून त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या नाहीत. पौलला जाणीव होती की तो स्वतः सर्वकाही करू शकत नाही. त्यामुळे मंडळीतल्या भाऊबहिणींना साहाय्य करण्यासाठी त्याने इतर बांधवांची मदत घेतली. उदाहरणार्थ, तीमथ्य आणि तीत अशा भरवशालायक बांधवांवर त्याने बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या सोपवल्या. त्या बांधवांनी केलेल्या मदतीमुळे पौलची चिंता नक्कीच कमी झाली असेल.—फिलिप्पै. २:१९, २०; तीत १:१, ४, ५.

आपलं मन चिंतेमुळे दबून जाऊ नये यासाठी प्रेषित पौलप्रमाणे आपण काय करू शकतो? (परिच्छेद १३-१५ पाहा)

१३. मंडळीतले वडील पौलचं अनुकरण कसं करू शकतात?

१३ इतरांची मदत घ्या.  पौलसारखंच आज बऱ्‍याच वडिलांना मंडळीतल्या भाऊबहिणींची चिंता वाटते. कारण भाऊबहिणींना परीक्षांचा सामना करावा लागतो. पण मंडळीतल्या एका प्रेमळ वडिलाला एकट्याने सर्वकाही करणं शक्य होणार नाही. या गोष्टीची जाणीव असल्यामुळे तो इतर जबाबदार बांधवांची मदत घेईल. तसंच देवाच्या कळपाची काळजी घेण्यासाठी तो तरुण बांधवांना प्रशिक्षणही देईल.—२ तीम. २:२.

१४. पौलने कोणत्या गोष्टीबद्दल चिंता केली नाही आणि आपण त्याच्या उदाहरणावरून काय शिकू शिकतो?

१४ आपल्याला सांत्वनाची गरज आहे हे मान्य करा.  पौल नम्र असल्यामुळे त्याला जाणीव होती की त्याला मदतीची गरज आहे. म्हणून त्याने त्याच्या मित्रांकडून मदत घेतली आणि त्याला प्रोत्साहन मिळालं. तो अशी चिंता करत बसला नाही की इतर जण त्याला कमजोर समजतील. फिलेमोनला लिहिलेल्या पत्रात पौलने म्हटलं की, “तू दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल जेव्हा मी ऐकले, तेव्हा मला खूप आनंद झाला व सांत्वन मिळाले.” (फिले. ७) पौलने अशा इतर बांधवांचाही उल्लेख केला ज्यांनी कठीण काळात त्याला खूप प्रोत्साहन दिलं होतं. (कलस्सै. ४:७-११) आपल्याला मदतीची आणि प्रोत्साहनाची गरज आहे हे जेव्हा आपण मान्य करतो, तेव्हा आपले भाऊबहीण आनंदाने आपली मदत करतील.

१५. तणावपूर्ण परिस्थितीत पौलला कसं सांत्वन मिळालं?

१५ देवाच्या वचनावर भरवसा ठेवा.  पौलला माहीत होतं की शास्त्रवचनांतून त्याला सांत्वन मिळेल. (रोम. १५:४) तसंच, कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी त्याला त्यांतून योग्य मार्गदर्शन मिळेल हेही त्याला माहीत होतं. (२ तीम. ३:१५, १६) रोममध्ये पौलला जेव्हा दुसऱ्‍यांदा कैद करण्यात आलं तेव्हा त्याला वाटलं की त्याचा मृत्यू आता जवळ आला आहे. अशा तणावपूर्ण परिस्थितीत पौलने काय केलं? त्याने लगेच तीमथ्यला बोलावून घेतलं आणि सोबत “गुंडाळ्या” आणायला सांगितल्या. (२ तीम. ४:६, ७, ९, १३) असं का? कारण वैयक्‍तिक अभ्यासासाठी पौलला त्यांचा उपयोग होणार होता. या गुंडाळ्या हिब्रू शास्त्रवचनांचा भाग असाव्यात. आपण पौलचं अनुकरण करून नियमितपणे बायबलचा अभ्यास केला पाहिजे. मग कोणत्याही परीक्षेचा सामना करावा लागला तरी यहोवा त्याच्या वचनांद्वारे आपल्याला दिलासा देईल.

आपण दावीद राजाकडून काय शिकतो?

दावीदप्रमाणे आपल्या हातूनही गंभीर चूक घडली असेल तर आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? (परिच्छेद १६-१९ पाहा)

१६. दावीदने गंभीर पाप केलं तेव्हा त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला?

१६ दावीदने खूप मोठी चूक केली होती. त्यामुळे त्याचा विवेक त्याला दोष देत होता. त्याने बथशेबासोबत व्यभिचार केला, तिच्या नवऱ्‍याचा खून घडवून आणला आणि काही काळासाठी आपला गुन्हा लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. (२ शमु. १२:९) सुरुवातीला दावीदचं मन त्याला दोषी ठरवत होतं पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे त्याचं देवासोबत नातं तर बिघडलंच, पण त्याला मानसिक आणि शारीरिक त्रासही सहन करावा लागला. (स्तो. ३२:३, ४) दावीदने गंभीर चूक केल्यामुळे त्याला चिंतेचा सामना करावा लागला. मग अशा परिस्थितीत त्याला कशामुळे मदत मिळाली? आणि आपल्या हातून गंभीर चूक घडल्यावर आपल्याला कुठून मदत मिळू शकते?

१७. दावीदने मनापासून पश्‍चात्ताप केला हे आपल्याला स्तोत्र ५१:१-४ या वचनांतून कसं दिसून येतं?

१७ क्षमा मिळवण्यासाठी प्रार्थना करा.  शेवटी, दावीदने यहोवाकडे प्रार्थना केली. त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला आणि आपली पापं यहोवासमोर कबूल केली. (स्तोत्र ५१:१-४ वाचा.) यामुळे दावीदला दिलासा मिळाला. (स्तो. ३२:१, २, ४, ५) तुमच्या हातून जर गंभीर पाप घडलं असेल तर ते लपवून ठेवू नका. याउलट प्रार्थनेत यहोवाजवळ आपलं पाप कबूल करा. यामुळे तुमची चिंता दूर होईल आणि तुमचा विवेकही तुम्हाला दोषी ठरवणार नाही. पण यहोवासोबत तुम्हाला पुन्हा मैत्री करायची असेल तर तुम्हाला प्रार्थनेव्यतिरिक्‍त आणखी काहीतरी करणं गरजेचं आहे.

१८. ताडन मिळाल्यावर दावीदची काय प्रतिक्रिया होती?

१८ ताडन स्वीकारा.  यहोवाने जेव्हा नाथानद्वारे दावीदला त्याचं पाप लक्षात आणून दिलं, तेव्हा त्याने कारणं दिली नाहीत किंवा घडलेली चूक इतकी काही मोठी नव्हती असंही म्हटलं नाही. त्याने लगेच मान्य केलं की त्याने फक्‍त बथशेबाच्या नवऱ्‍याविरूद्ध पाप केलं नाही, तर यहोवाविरूद्ध पाप केलं आहे आणि ही खूप गंभीर गोष्ट होती. यहोवाकडून मिळालेलं ताडन दावीदने स्वीकारलं आणि यहोवाने त्याला माफ केलं. (२ शमु. १२:१०-१४) जर आपल्या हातून गंभीर पाप घडलं असेल, तर यहोवाने आपली देखरेख करण्यासाठी नियुक्‍त केलेल्या वडिलांशी आपण बोललं पाहिजे. (याको. ५:१४, १५) आपली चूक आपण कबूल केली पाहिजे आणि स्वतःला योग्य ठरवण्याचं टाळलं पाहिजे. आपल्याला मिळालेलं ताडन आपण जितक्या लवकर स्वीकारू आणि त्यानुसार कार्य करू, तितक्या लवकर आपण पुन्हा आनंद आणि शांती मिळवू.

१९. आपण काय करण्याचा निश्‍चय केला पाहिजे?

१९ पुन्हा त्याच चुका न करण्याचा निश्‍चय करा.  दावीद राजाला माहीत होतं की त्याला जर त्याच चुका पुन्हा करायच्या नसतील तर त्याला यहोवाच्या मदतीची गरज लागेल. (स्तो. ५१:७, १०, १२) यहोवाने दावीदला माफ केल्यावर त्याने निश्‍चय केला की आता तो पुन्हा चुकीची इच्छा मनात येऊ देणार नाही. याचा परिणाम म्हणजे, तो मनाची शांती पुन्हा मिळवू शकला.

२०. यहोवा आपल्याला क्षमा करतो याची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

२० यहोवा आपल्याला क्षमा करतो याची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? आपण केलेल्या चुकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, ताडन स्वीकारलं पाहिजे आणि त्याच चुका पुन्हा न घडाव्यात यासाठी मेहनत घेतली पाहिजे. या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण पुन्हा मनाची शांती मिळवू शकतो. जेम्स नावाच्या बांधवाने गंभीर पाप केलं तेव्हा त्याने ही गोष्ट खरी असल्याचं मान्य केलं. तो म्हणतो: “जेव्हा मी माझ्या पापाबद्दल वडिलांना सांगितलं तेव्हा माझ्या खांद्यावरून एक खूप मोठं ओझं कमी झाल्याचं मला जाणवलं. मी माझ्या मनाची शांती पुन्हा मिळवू शकलो.” हे जाणून आपल्याला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं की “जे भग्न हृदयाचे आहेत त्यांच्याजवळ यहोवा असतो, आणि जे पश्‍चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांना तो तारतो.”—स्तो. ३४:१८, पं. र. भा.

२१. आपण यहोवाला आपलं सांत्वन कसं करू देऊ शकतो?

२१ आपण अंताच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत त्यामुळे आपल्या चिंतेची कारणं दिवसेंदिवस वाढतच जाणार. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा यहोवाकडून मदत मिळवण्यासाठी थोडाही उशीर करू नका. बायबलचा मनापासून अभ्यास करा. हन्‍ना, पौल आणि दावीद यांच्या उदाहरणातून शिका. आपल्याला चिंता का वाटते याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्या स्वर्गीय पित्याकडे मदत मागा. (स्तो. १३९:२३) आपलं ओझं, आपल्या समस्या यहोवावर टाका; खासकरून अशा समस्या ज्या सोडवणं तुमच्या हातात नाही. तुम्ही जर असं केलं तर तुम्हीसुद्धा स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवाला म्हणू शकाल की “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.”—स्तो. ९४:१९.

गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”

^ परि. 5 आपल्या सर्वांनाच आपल्या समस्यांमुळे कधी न्‌ कधी चिंतेचा सामना करावा लागू शकतो. या लेखात बायबलमधल्या यहोवाच्या अशा तीन सेवकांबद्दल चर्चा केली जाईल ज्यांना अनेक चिंताचा सामना करावा लागला. तसंच, यहोवाने यांपैकी प्रत्येकाला कसा दिलासा दिला यावरही या लेखात चर्चा केली जाईल.

^ परि. 1 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: आपल्याला आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक किंवा वैयक्‍तिक समस्यांमुळे चिंता वाटू शकते. आपल्या हातून घडलेल्या चुकांमुळे किंवा पुढे आपल्याला ज्या आव्हानांचा सामना करावा लागेल त्यामुळेही आपल्याला चिंता वाटू शकते.