व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बेलशस्सरचं नाव कोरलेलं क्ले-सिलिंडर

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

बेलशस्सर हा खरोखर अस्तित्वात होता आणि तो बॅबिलॉनचा राजा होता याचा पुरावा पुरातत्त्वशास्त्रामुळे कसा मिळतो?

अनेक वर्षांपर्यंत बायबल टीकाकार असा दावा करत होते की बेलशस्सर राजा कधीच अस्तित्वात नव्हता. (दानी. ५:१) कारण दानिएल पुस्तकात उल्लेख केलेल्या बेलशस्सर राजाच्या अस्तित्वाबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञांना काहीच पुरावे सापडले नव्हते. पण १८५४ मध्ये त्यांचं मत बदललं. ते कसं?

कारण त्यावर्षी जे. जी. टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्‍याला, दक्षिण इराक या भागात काही पुरावे सापडले. इथे आधी प्राचीन काळातलं ऊर शहर होतं. त्या अधिकाऱ्‍याला तिथे उंच बुरूजांमध्ये बरेच क्ले-सिलिंडर म्हणजेच मातीपासून बनवलेल्या लांबट गोल आकाराच्या वस्तू सापडल्या. त्या प्रत्येक क्ले-सिलिंडरची लांबी जवळपास ४ इंच होती आणि त्यावर क्यूनिफॉर्म लिपी कोरण्यात आली होती. यातल्या एका क्ले-सिलिंडरवर बॅबिलॉनचा राजा नबोनायडस आणि त्याचा मोठा मुलगा बेलशस्सर यांच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना लिहिली होती. या शोधामुळे टीकाकारांनाही मान्य करावं लागलं की बेलशस्सर नक्कीच अस्तित्वात होता.

खरंतर, बेलशस्सर अस्तित्वात होता इतकंच बायबलमध्ये सांगितलेलं नाही तर तो एक राजा होता हेही त्यात सांगितलं आहे. तरीही, टीकाकारांना याबद्दल संशय होता. उदाहरणार्थ, १९व्या शतकातले ब्रिटिश वैज्ञानिक विल्यम टॅलबट यांनी लिहिलं की काहींच्या मते “बेलशस्सर आपला पिता नबोनायडस याच्यासोबत मिळून राज्य करत होता. पण याबद्दल त्यांना कोणताही पुरावा सापडला नव्हता.”

पण हा वादसुद्धा मिटला. तो कसा? इतर क्ले-सिलिंडरच्या लिखाणावरून स्पष्ट झालं की एकदा बेलशस्सरचा पिता नबोनायडस हा बऱ्‍याच वर्षांपर्यंत बॅबिलॉनमध्ये नव्हता. तो तिथे नव्हता तेव्हा काय घडलं? याबद्दल एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका  यात म्हटलं आहे की “नबोनायडस राजा शहरापासून दूर गेला तेव्हा त्याने बेलशस्सरला राजा बनवलं आणि त्याच्या बऱ्‍याचशा सैनिकांच्या तुकड्यांवर अधिकार दिला.” यावरून कळतं की त्या काळादरम्यान बेलशस्सरने बॅबिलॉनमध्ये सहराजा म्हणून राज्य केलं. पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि भाषेचे विद्वान ॲलन मिलार्ड यांनी असं म्हटलं की “दानिएलच्या पुस्तकात बेलशस्सरला ‘राजा’ म्हटलं आहे ते अगदी योग्यच आहे.”

या सर्व पुराव्यांवरून स्पष्ट होतं की दानिएलच्या पुस्तकातली माहिती खरी आहे. पण दानिएलचं पुस्तक भरवशालायक आणि देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे याचा सर्वात मोठा पुरावा देवाच्या सेवकांना बायबलमधूनच मिळतो.—२ तीम. ३:१६.