व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १६

ऐकून घ्या, जाणून घ्या आणि दयाळूपणे वागा

ऐकून घ्या, जाणून घ्या आणि दयाळूपणे वागा

“वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींच्या आधारावर न्याय करण्याचं सोडून द्या, तर खरेपणाने न्याय करा.”—योहा. ७:२४.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

१. बायबलमध्ये यहोवाबद्दल सांगितलेल्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला दिलासा मिळतो?

लोकांनी तुमच्या रंगावरून, चेहऱ्‍यावरून किंवा तुमच्या अंगकाठीवरून तुमच्याबद्दल मत बनवलं तर तुम्हाला आवडेल का? नक्कीच नाही. लोक सहसा असं करत असले तरी यहोवा वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींवरून कधीही आपल्याबद्दल मत बनवत नाही. ही खरंच किती दिलासा देणारी गोष्ट आहे! उदाहरणार्थ, यहोवाने शमुवेलला सांगितलं होतं की इशायच्या मुलांपैकी एक जण इस्राएलचा राजा बनेल. पण शमुवेलने इशायच्या मुलांना बघितलं तेव्हा त्याने यहोवाचा दृष्टिकोन ठेवला नाही. इशायचा सगळ्यात मोठा मुलगा अलियाब याला पाहून शमुवेलने म्हटलं: “परमेश्‍वरासमोर आलेला हाच परमेश्‍वराचा अभिषिक्‍त” आहे. पण यहोवा शमुवेलला म्हणाला: “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे.‏” यावरून आपण काय शिकतो? यहोवा त्याला पुढे म्हणाला: “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.”—१ शमु. १६:१, ६, ७.

२. योहान ७:२४ या वचनात सांगितल्याप्रमाणे वरवर दिसतं त्यावरून आपण एखाद्याबद्दल मत का बनवू नये? उदाहरण द्या.

आपण अपरिपूर्ण असल्यामुळे बऱ्‍याचदा आपण फक्‍त जे दिसतं त्यावरूनच इतरांबद्दल मत बनवतो. (योहान ७:२४ वाचा.) पण डोळ्यांना जे दिसतं त्यावरून आपल्याला एका व्यक्‍तीबद्दल सगळीच माहिती मिळत नाही. उदाहरणार्थ, एखादा डॉक्टर कितीही हुशार आणि अनुभवी असला, तरी रुग्णाकडे नुसतं पाहून त्याला जास्त माहिती मिळणार नाही. रुग्णाला याआधी झालेले आजार, त्याचा स्वभाव किंवा त्याला नेमका काय त्रास होत आहे हे जाणून घेण्यासाठी त्या डॉक्टरला रुग्णाचं बोलणं लक्ष देऊन ऐकावं लागेल. रुग्णाच्या शरीराची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर कदाचित त्याला एक्स-रे काढायलाही सांगेल. हे सगळं केलं नाही, तर डॉक्टर रुग्णावर कदाचित चुकीचा उपचार करेल. त्याचप्रमाणे, फक्‍त वरवर बघून आपण भाऊबहिणींना पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही. एक व्यक्‍ती म्हणून ते कसे आहेत हे समजण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे खरं आहे की आपण यहोवासारखं इतरांच्या मनात काय चाललं आहे हे कधीही जाणून घेऊ शकतं नाही. पण आपण यहोवाचं अनुकरण करायचा पुरेपूर प्रयत्न करू शकतो. तो कसा?

३. या लेखात दिलेले बायबलमधले अहवाल आपल्याला यहोवाचं अनुकरण करायला कसे मदत करतील?

यहोवा आपल्या उपासकांशी कशा प्रकारे वागतो? यहोवा त्यांचं ऐकून  घेतो. तो त्यांची परिस्थिती आणि त्यांना जीवनात आलेले अनुभव लक्षात घेतो.  तसंच, तो त्यांच्याशी दयाळूपणे वागतो.  हे त्याने योना, एलीया, हागार आणि लोट यांच्याबाबतीत कसं केलं हे आता आपण पाहू या. तसंच, आपल्या भाऊबहिणींशी वागताना आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो याकडेही लक्ष देऊ या.

लक्ष देऊन ऐका

४. आपण योनाबद्दल चुकीचं मत का बनवू शकतो?

योनाच्या परिस्थितीबद्दल आपल्याला सगळं काही माहीत नसल्यामुळे कदाचित आपण असा विचार करू की योना भरवशालायक नव्हता. तो अविश्‍वासू होता असाही कदाचित आपण विचार करू. त्याला निनवेला जाऊन न्यायदंडाचा संदेश घोषित करायची आज्ञा स्वतः यहोवाने दिली होती. पण तसं करण्याऐवजी योना एका जहाजात बसून उलट दिशेने, यहोवाच्या “दृष्टिआड” जायला निघाला. (योना १:१-३) ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही योनाला आणखी एक संधी दिली असती का? कदाचित नाही. पण यहोवाने त्याला पुन्हा एकदा संधी दिली.—योना ३:१, २.

५. योना २:१, २, ९ यांत दिलेल्या योनाच्या शब्दांवरून तुम्हाला त्याच्याबद्दल काय समजलं?

योना खरोखर कसा होता हे त्याने यहोवाला केलेल्या प्रार्थनेवरून दिसून येतं. (योना २:१, २,  वाचा.) तो नक्कीच यहोवाला बऱ्‍याच वेळा प्रार्थना करत असेल. पण त्याने माशाच्या पोटातून केलेल्या प्रार्थनेवरून कळतं, की तो पळून गेला असला तरी त्याच्यात पुष्कळ चांगले गुण होते. त्याच्या शब्दांवरून दिसून येतं, की तो नम्र, उपकारांची जाणीव ठेवणारा आणि यहोवाच्या आज्ञा पाळणारा माणूस होता. म्हणूनच, यहोवाने फक्‍त योनाच्या चुकीकडे लक्ष दिलं नाही. तर, त्याने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि पुढेही संदेष्टा म्हणून त्याचा वापर केला!

आपण जर इतरांची खरी परिस्थिती माहीत करून घेतली तर आपण त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो (परिच्छेद ६ पाहा) *

६. लक्ष देऊन ऐकल्यामुळे कोणते फायदे होतात?

दुसऱ्‍यांचं लक्ष देऊन ऐकण्यासाठी  आपण नम्र असलं पाहिजे आणि धीर दाखवला पाहिजे. यामुळे आपल्याला कमीतकमी तीन फायदे होतील. पहिला म्हणजे, आपण लोकांबद्दल लगेचच चुकीचं मत बनवणार नाही. दुसरा म्हणजे, त्यांना नेमकं कसं वाटतं आणि ते विशिष्ट गोष्टी का करतात हे आपल्याला जाणून घेता येईल आणि त्यांच्याशी आणखी दयाळूपणे वागणं आपल्याला शक्य होईल. तिसरा म्हणजे, आपण आपल्या भावाला बोलू देतो तेव्हा त्याला स्वतःच्या भावना आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होऊ शकते. बऱ्‍याचदा असं होतं, की जोपर्यंत आपण आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत नाही तोपर्यंत त्या आपल्यालाही नीट समजलेल्या नसतात. (नीति. २०:५) वडील म्हणून सेवा करणारा आशियातला एक बांधव म्हणतो: “मी पूर्वी ऐकून घेण्याआधीच बोलण्याची चूक करायचो. एकदा मी एका बहिणीला सांगितलं की तिने सभेत आणखी चांगली उत्तरं दिली पाहिजेत. पण नंतर मला कळलं की त्या बहिणीला नीट वाचताही येत नाही आणि उत्तरं तयार करण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागते.” खरंच, प्रत्येक वडिलाने सल्ला देण्याआधी ‘ऐकून घेणं’ किती महत्त्वाचं आहे!—नीति. १८:१३.

७. यहोवा एलीयाशी जसा वागला त्यावरून आपण काय शिकतो?

आपल्या काही भाऊबहिणींना त्यांच्या भावनांबद्दल इतरांशी बोलणं कठीण जातं. त्यांच्या जीवनात आलेले अनुभव, त्यांची संस्कृती किंवा त्यांचा स्वभाव यांमुळे असं होऊ शकतं. मग अशा भाऊबहिणींना मनातलं बोलून दाखवणं सोपं जावं म्हणून आपण काय करू शकतो? ईजबेलच्या भीतीने एलीया पळून जात होता तेव्हा यहोवा त्याच्याशी कसा वागला हे आठवा. एलीयाला स्वर्गातल्या आपल्या पित्याजवळ मनातल्या भावना मोकळेपणाने बोलून दाखवायला बरेच दिवस लागले. तरीपण यहोवाने त्याचं लक्ष देऊन ऐकलं. मग त्याने एलीयाला दिलासा दिला आणि त्याच्यावर एक महत्त्वाचं काम सोपवलं. (१ राजे १९:१-१८) कदाचित आपल्या भाऊबहिणींनाही आपल्याशी मोकळेपणाने बोलायला वेळ लागेल; पण ते त्यांच्या मनातलं बोलतील तेव्हाच आपल्याला त्यांच्या खऱ्‍या भावना कळतील. जर आपण त्यांच्याशी यहोवाप्रमाणे धीराने वागलो तर काही काळाने ते त्यांचं मन आपल्याजवळ मोकळं करतील. आणि जेव्हा ते असं करतील, तेव्हा आपण त्यांचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे.

भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे समजून घ्या

८. उत्पत्ति १६:७-१३ या वचनांप्रमाणे यहोवाने हागारला कशी मदत केली?

सारायची दासी हागार हिचं अब्रामशी लग्न झाल्यावर ती मूर्खपणे वागली. तिला दिवस गेल्यावर ती सारायला तुच्छ लेखू लागली, कारण सारायला मूलबाळ नव्हतं. परिस्थिती इतकी बिघडली की सारायने हागारला घरातून हाकलून दिलं. (उत्प. १६:४-६) अपरिपूर्ण असल्यामुळे कदाचित आपण विचार करू की हागारसारख्या गर्विष्ठ स्त्रीसोबत जे झालं ते योग्यच होतं. पण यहोवाने हागारबद्दल असा विचार केला नाही. उलट त्याने आपल्या देवदूताला तिच्याकडे पाठवलं. त्या देवदूताने तिला भेटून योग्य प्रकारे विचार करायला मदत केली आणि तिला आशीर्वादही दिला. हागारला जाणीव झाली की यहोवाचं तिच्याकडे लक्ष होतं आणि तिच्या परिस्थितीबद्दल त्याला सगळं माहीत होतं. ही गोष्ट तिच्या मनाला भिडली, म्हणूनच तिने त्याला “पाहणारा देव” आणि ‘मला पाहणारा’ असं म्हटलं.उत्पत्ति १६:७-१३ वाचा.

९. यहोवाने हागारच्या बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या?

यहोवाने हागारच्या बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या? हागारच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल आणि तिला ज्या परिस्थितीतून जावं लागलं होतं त्याची त्याला पूर्ण कल्पना होती. (नीति. १५:३) हागार ही मुळात इजिप्तची होती आणि ती एका इब्री घराण्यात राहत होती. यामुळे तिला कधीकधी परक्यासारखं वाटलं असेल का? तिला तिच्या घरच्यांची आणि देशाची आठवण येत असेल का? शिवाय, तिच्यासोबत सारायसुद्धा अब्रामची बायको होती. काही काळापर्यंत, यहोवाची सेवा करणाऱ्‍या काही विश्‍वासू पुरुषांना एकापेक्षा जास्त बायका होत्या. पण हा यहोवाचा मूळ उद्देश नव्हता. (मत्त. १९:४-६) त्यामुळे अशा कुटुंबामध्ये बऱ्‍याचदा हेवेदावे आणि भांडणं असायची. हागारने सारायचा अनादर केला याकडे यहोवाने दुर्लक्ष केलं नाही. पण त्याच वेळी त्याने हागारच्या भावना आणि तिची परिस्थिती समजून घेतली आणि यामुळे तो तिच्याशी दयाळूपणे वागला.

भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करा (परिच्छेद १०-१२ पाहा) *

१०. आपल्या भाऊबहिणींना आपण चांगल्या प्रकारे कसं जाणून घेऊ शकतो?

१० यहोवाचं अनुकरण करून आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भाऊबहिणींना समजून घ्यायचा प्रयत्न करा.  सभांच्या आधी आणि नंतर त्यांच्याशी बोला, त्यांच्यासोबत प्रचारकार्य करा आणि शक्य असेल तर त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला कदाचित कळेल की जी बहीण मिळून-मिसळून वागत नाही असं तुम्हाला वाटायचं, ती खरंतर खूप लाजाळू आहे; एखादा श्रीमंत भाऊ खरंतर पैशाच्या मागे धावत नाही, उलट तो खूप उदार आहे; किंवा सभांना नेहमी उशिरा येणाऱ्‍या कुटुंबाला खरंतर विरोधाचा सामना करावा लागत आहे. (ईयो. ६:२९) हे खरं आहे की आपण दुसऱ्‍यांच्या जीवनात “लुडबुड” करू नये. (१ तीम. ५:१३) पण, आपल्या भाऊबहिणींच्या परिस्थितीबद्दल आणि त्यांना जीवनात आलेल्या अनुभवांबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेणं शक्य होईल.

११. वडिलांना भाऊबहिणींची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहीत असणं का गरजेचं आहे?

११ मंडळीतल्या भाऊबहिणींना कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागला आहे हे खासकरून मंडळीतल्या वडिलांना माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण बंधू आर्थर यांच्या उदाहरणावर चर्चा करू या. ते विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करत होते. एकदा ते एका वडिलांसोबत अशा एका बहिणीला भेटायला गेले जिचा स्वभाव लाजाळू होता. आर्थर म्हणतात: “आम्हाला समजलं की लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच तिचे पती वारले. तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, तरीही तिने तिच्या दोन्ही मुलींना यहोवावर प्रेम करायला आणि त्याला विश्‍वासू राहायला शिकवलं. पण आता तिची नजर कमजोर होत चालली होती आणि तिला नैराश्‍य यायचं. तरीही तिचं यहोवावरचं प्रेम आणि विश्‍वास कमी झाला नाही. आम्हाला जाणवलं की या बहिणीच्या उदाहरणातून खूप काही शिकण्यासारखं आहे.” (फिलिप्पै. २:३) या विभागीय पर्यवेक्षकांनी यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण केलं. यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांना अगदी जवळून ओळखतो आणि ते सहन करत असलेल्या दुःखाची त्याला जाणीव आहे. (निर्ग. ३:७) ज्या वडिलांना भाऊबहिणींची नेमकी परिस्थिती माहीत असते त्यांना ते चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.

१२. एका बहिणीने मंडळीतल्या दुसऱ्‍या एका बहिणीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे तिला काय फायदा झाला?

१२ एखाद्या बांधवाच्या काही सवयींमुळे आपल्याला चीड येऊ शकते. अशा वेळी आपण त्यांच्या पार्श्‍वभूमीबद्दल, ते कोणत्या परिस्थितीत वाढले आहेत याबद्दल जाणून घेतलं तर ते तसे का वागतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. एका उदाहरणावर विचार करा. आशियात राहणारी एक बहीण म्हणते: “माझ्या मंडळीतली एक बहीण खूप जोरजोरात बोलायची. मला वाटायचं की तिला शिस्तच नाहीये. पण मी जेव्हा तिच्यासोबत प्रचारकार्यात गेले तेव्हा मला समजलं की ती आधी तिच्या आईवडिलांसोबत मासे विकायची, आणि ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी तिला खूप मोठ्याने ओरडावं लागायचं.” ती पुढे म्हणते: “मला जाणवलं की भाऊबहिणींना नीट समजून घेण्यासाठी मला त्यांच्या आधीच्या परिस्थितीबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.” हे खरं आहे की भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. पण जेव्हा तुम्ही ‘आपलं मन मोठं करा’ हा बायबलमधला सल्ला लागू करता, तेव्हा तुम्ही यहोवाचं अनुकरण करता. कारण यहोवा “सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम करतो.”—१ तीम. २:३, ४; २ करिंथ. ६:११-१३.

दयाळूपणे वागा

१३. लोट उशीर करत होता तेव्हा उत्पत्ति १९:१५, १६ या वचनांनुसार स्वर्गदूतांनी काय केलं आणि का?

१३ आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या प्रसंगी लोट यहोवाच्या आज्ञेचं पालन करण्यात उशीर करत होता. दोन स्वर्गदूतांनी लोटला सांगितलं की त्याने त्याच्या कुटुंबासोबत सदोममधून बाहेर पडावं. पण का? स्वर्गदूतांनी म्हटलं: “आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत.” (उत्प. १९:१२, १३) पण दुसऱ्‍या दिवशी सकाळी पाहिलं तर लोट आणि त्याचं कुटुंब अजूनही घरीच होतं. त्यामुळे स्वर्गदूतांनी त्यांना पुन्हा एकदा बाहेर निघायला सांगितलं. पण “तो दिरंगाई करू लागला.” आपण कदाचित विचार करू की लोट यहोवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करत होता. पण यहोवाने त्याला मदत करायचं सोडलं नाही. कारण “परमेश्‍वराची करुणा” किंवा दया त्याच्यावर होती आणि म्हणून स्वर्गदूतांनी त्याच्या कुटुंबाचा हात धरून त्यांना नगराबाहेर आणून सोडलं.—उत्पत्ति १९:१५, १६ वाचा.

१४. यहोवाने लोटला दया का दाखवली असेल?

१४ बऱ्‍याचशा कारणांमुळे यहोवाने लोटला दया दाखवली असेल. लोटला कदाचित नगराबाहेर असलेल्या लोकांची भीती वाटत असावी आणि म्हणून तो निघायला उशीर करत होता. तसंच, इतर गोष्टींमुळेही त्याला भीती वाटत असावी. दोन राजे जवळच्याच खोऱ्‍यात डांबराने भरलेल्या खड्यात पडले हे लोटला कदाचित माहीत असावं. (उत्प. १४:८-१२) एक पती आणि पिता या नात्याने लोटला आपल्या कुटुंबाची काळजी होती. त्याचबरोबर, लोट श्रीमंत असल्यामुळे सदोममध्ये त्याचं एक भलंमोठं घर असावं. (उत्प. १३:५, ६) पण यहोवाच्या आज्ञेचं पालन करण्यात उशीर करण्याची ही काही रास्त कारणं नव्हती. तरीपण यहोवाने लोटच्या चुकांपलीकडे पाहिलं आणि त्याने त्याला एक “नीतिमान” माणूस म्हटलं.—२ पेत्र २:७, ८.

इतरांचं ऐकून घेतल्यामुळे आपण त्यांना दया कशी दाखवू शकतो हे आपल्याला समजेल (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. एखाद्याच्या वागण्याबद्दल लगेच मत बनवण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे?

१५ एखाद्याच्या वागण्याबद्दल लगेच मत बनवण्यापेक्षा आपण त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. युरोपमध्ये राहणारी वेरोनिका या बहिणीने हेच करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणते: “एका बहिणीचा चेहरा नेहमी उतरलेला असायचा. ती नेहमी एकटी-एकटी राहायची आणि इतरांसोबत मिसळत नव्हती. कधीकधी तर मला तिच्याशी बोलायला भीतीच वाटायची. पण मग मी विचार केला, ‘मी तिच्या जागी असते तर माझी एक मैत्रीण असावी असं मला वाटलं असतं.’ म्हणून मी ठरवलं की मी तिच्याशी बोलेन. तिच्याशी बोलल्यावर तिने मला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. खरंच, आता मी तिला चांगल्या प्रकारे समजू शकते.”

१६. इतरांच्या भावना समजून घेण्यासाठी आपण प्रार्थना का केली पाहिजे?

१६ आपल्याला सगळ्यात चांगल्या प्रकारे जर कोणी समजून घेऊ शकतं तर तो फक्‍त यहोवा आहे. (नीति. १५:११) यहोवा ज्या दृष्टिकोनातून इतरांना पाहतो त्याप्रमाणे तुम्हालाही पाहता यावं यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करा. तसंच, त्यांना करूणा किंवा दया कशी दाखवायची  हे समजण्यासाठीसुद्धा त्याच्याकडे मदत मागा. प्रार्थनेमुळे अँझीला नावाच्या बहिणीला इतरांना समजून घेण्यासाठी मदत झाली. तिच्या मंडळीतल्या एका बहिणीशी तिचं पटत नव्हतं. अँझीला म्हणते: “अशा परिस्थितीत तिची टीका करणं आणि तिला टाळणं खूप सोपं होतं. पण मग तिला समजून घेता यावं यासाठी मी यहोवाकडे मदत मागितली.” यहोवाने अँझीलाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं का? हो नक्कीच. ती म्हणते: “आम्ही सोबत प्रचाराला गेलो आणि त्यानंतर बरेच तास बोललो. मी तिचं लक्ष देऊन ऐकलं. आता आमची चांगली मैत्री झाली आहे आणि मी ठरवलंय की मी तिला मदत करेन.”

१७. आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

१७ आपण फक्‍त काही भाऊबहिणींनाच दया दाखवली पाहिजे असं आपण म्हणू शकत नाही. योना, एलीया, हागार आणि लोट यांच्या जीवनात स्वतःच्या चुकांमुळे समस्या आल्या. खरंतर, आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी स्वतःच्या चुकांमुळे समस्या आल्या आहेत. त्यामुळे आपण एकमेकांना सहानुभूती दाखवावी अशी यहोवा आपल्याकडून करत असलेली अपेक्षा योग्य आहे. (१ पेत्र ३:८) आपण जेव्हा यहोवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा जगभरात पसरलेल्या वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या भाऊबहिणींमध्ये असलेली एकता मजबूत होत जाते. तेव्हा आपण इतरांशी वागताना नेहमी त्यांचं ऐकून घेण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा आणि त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याचा निर्धार करू या!

गीत २० आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

^ परि. 5 आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला इतरांबद्दल आणि त्यांच्या हेतूंबद्दल लगेच निष्कर्ष काढायची सवय असते. पण यहोवा मात्र प्रत्येकाचं “हृदय पाहतो.” (१ शमु. १६:७) यहोवाने योना, एलीया, हागार आणि लोट यांना प्रेमळपणे कशी मदत केली याबद्दल या लेखात आपण पाहू या. यामुळे आपल्याला भाऊबहिणींशी वागताना यहोवाचं अनुकरण करता येईल.

^ परि. 52 चित्रांचं वर्णन: एक तरुण बांधव सभेला उशिरा आल्यामुळे एका वृद्ध बांधवाला चीड येते; पण नंतर त्या वृद्ध बांधवाला कळतं की त्या तरुण बांधवाच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: प्रचाराची सभा घेणाऱ्‍या बांधवाला वाटतं की एक बहीण इतरांसोबत मिसळत नाही; पण नंतर त्याला कळतं की तिचा स्वभाव लाजाळू आहे आणि ज्यांना ती चांगल्या प्रकारे ओळखत नाही त्यांच्याशी ती बोलायला कचरते.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: एक बहीण पहिल्यांदाच एका दुसऱ्‍या बहिणीला राज्य सभागृहात भेटली, तेव्हा तिला वाटलं की हिला लोकांसोबत मिसळायला आणि मैत्री करायला आवडत नाही. पण नंतर जेव्हा ती त्या बहिणीसोबत वेळ घालवते, तेव्हा तिला कळतं की तिने जसा विचार केला होता तशी ती नाही.