व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २०

आज “उत्तरेचा राजा” कोण आहे?

आज “उत्तरेचा राजा” कोण आहे?

“त्याचा अंत येईल; कोणी त्यास साहाय्य करणार नाही.”—दानी. ११:४५.

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

सारांश *

१-२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आज आपण या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांतल्या अखेरच्या टप्प्यात जगत आहोत याचे आपल्याकडे कधी नव्हे इतके पुरावे आहेत. देवाच्या राज्याचा विरोध करणाऱ्‍या सर्व सरकारांचा लवकरच यहोवा आणि येशू ख्रिस्त नाश करणार आहेत. पण हे घडण्याआधी उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा आपसात लढत राहतील आणि ते देवाच्या लोकांचा छळ करत राहतील.

या लेखात आपण दानीएल ११:४०–१२:१ या वचनांत दिलेल्या भविष्यवाणीवर चर्चा करणार आहोत. आज उत्तरेचा राजा कोण आहे हे आपण पाहणार आहोत. तसंच, पुढे काहीही झालं तरी यहोवा आपल्याला नक्की वाचवेल यावर आपण भरवसा का ठेवू शकतो हेही आपण पाहणार आहोत.

उत्तरेचा नवीन राजा

३-४. आज उत्तरेचा राजा कोण आहे? स्पष्ट करा.

१९९१ मध्ये, जेव्हा सोव्हियत संघ कोसळला तेव्हा त्याच्या अधिकाराखाली असलेल्या देवाच्या लोकांना काही काळासाठी स्वातंत्र्य मिळालं. दानीएलने या स्वातंत्र्याला “थोडी बहुत मदत” असं म्हटलं. (दानी. ११:३४) यामुळे त्यांना मोकळेपणाने प्रचार करता आला. आणि लवकरच सोव्हियत संघाच्या अधिकाराखाली असलेल्या देशांमधल्या प्रचारकांची संख्या लाखोंच्या घरात गेली. काही वर्षांनी रशिया आणि त्याची मित्र राष्ट्रं उत्तरेचा राजा बनली. आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे एका सरकाराने, उत्तरेचा राजा किंवा दक्षिणेचा राजा बनण्यासाठी तीन गोष्टी करणं गरजेचं होतं. त्या म्हणजे (१) हे सरकार अशा देशावर राज्य करेल जिथे बरेचसे देवाचे लोक राहत असतील किंवा ते त्यांचा छळ करेल. (२) आपल्या कार्यांद्वारे ते दाखवेल की ते यहोवाचा आणि त्याच्या लोकांचा शत्रू आहे. (३) आणि ते सरकार दुसऱ्‍या राजाशी लढत राहील.

रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना, आज आपण उत्तरेचा राजा का म्हणू शकतो याची कारणं आता आपण पाहणार आहोत. (१) त्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्‍या देवाच्या लाखो लोकांच्या प्रचारकार्यावर त्यांनी बंदी आणली आणि त्यांचा छळ केला. (२) यावरून दिसून आलं की ते यहोवाचा आणि त्याच्या लोकांचा द्वेष करतात. (३) ते दक्षिणेच्या राजापेक्षा, म्हणजे ब्रिटन-अमेरिका महासत्ता याच्यापेक्षा शक्‍तिशाली बनण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी आज असं काय केलं आहे, ज्यावरून ते उत्तरेचा राजा असल्याचं सिद्ध होतं यावर आता आपण चर्चा करू या.

उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा एकमेकांना टक्कर देत राहतात

५. दानीएल ११:४०-४३ या वचनांत कोणत्या काळाबद्दल सांगितलं आहे आणि त्या काळादरम्यान काय होईल?

दानीएल ११:४०-४३ वाचा. भविष्यवाणीतल्या या भागात अंताच्या समयाबद्दल सांगितलं आहे. उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा एकमेकांशी लढत राहतील हेही या वचनांत सांगितलं आहे. दानीएलने भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे अंताच्या समयी दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाला “टक्कर” देत राहील.—दानी. ११:४०.

६. दोन राजे एकमेकांना टक्कर कसे देत आहेत?

जगातलं सर्वात शक्‍तिशाली राष्ट्र बनण्यासाठी उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा एकमेकांशी लढत राहतात. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या महायुद्धानंतर सोव्हियत संघ युरोपमधल्या बऱ्‍याचशा भागावर अधिकार गाजवू लागला. म्हणून दक्षिणेच्या राजाने इतर देशांसोबत मिळून त्यांचं सैन्य उत्तरेच्या राजाविरुद्ध आणायचं ठरवलं. यासाठी त्यांनी एक संघटना तयार केली. त्यांनी या संघटनेला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हे नाव दिलं. उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांनी सर्वात शक्‍तिशाली सैन्य बनवण्यासाठी बराच पैसाही खर्च केला. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका इथे होणाऱ्‍या लढायांमध्येही त्यांनी एकमेकांच्या शत्रूंना साथ दिली. अलीकडच्या काही वर्षांत रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा जगभरात दबदबा वाढला आहे. ते कंप्युटर प्रोग्राम्सद्वारेही दक्षिणेच्या राजासोबत लढत आहेत. या दोन्ही राजांनी एकमेकांवर असा आरोप लावला आहे, की त्यांनी एकमेकांच्या आर्थिक आणि राजनैतिक व्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी घातक कंप्युटर प्रोग्राम्सचा वापर केला आहे. तसंच, दानीएलने भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे उत्तरेचा राजा देवाच्या लोकांवर हल्ला करतच आहे.—दानी. ११:४१.

उत्तरेचा राजा ‘वैभवी देशात’ शिरतो

७. ‘वैभवी देश’ कशाला सूचित करतो?

दानीएल ११:४१ मध्ये सांगितलं आहे की उत्तरेचा राजा ‘वैभवी देशात’ शिरेल. हा देश कोणता आहे? जुन्या काळात इस्राएल राष्ट्राला “सर्व देशांची शोभा” असं म्हटलं जायचं. (यहे. २०:६, पं.र.भा.) पण या देशाची सर्वात खास गोष्ट काय होती? इथे खरी उपासना केली जायची. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून हा ‘वैभवी देश’ कोणत्याही एका ठिकाणाला सूचित करत नाही. असं आपण का म्हणू शकतो? कारण आज यहोवाचे लोक संपूर्ण पृथ्वीवर पसरले आहेत. यामुळे आजच्या काळात हा “देश” यहोवाचे लोक करत असलेल्या खऱ्‍या उपासनेशी संबंधित कामांना सूचित करतं. जसं की, सभांना जाणं आणि प्रचार काम करणं.

८. उत्तरेचा राजा ‘वैभवी देशात’ कसा शिरला?

शेवटच्या दिवसांत उत्तरेचा राजा बऱ्‍याचदा ‘वैभवी देशात’ शिरला आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनी उत्तरेचा राजा बनला. जर्मनीच्या नात्झी सरकारने देवाच्या लोकांचा छळ केला आणि अनेकांना मारून टाकलं. असं करून उत्तरेचा राजा ‘वैभवी देशात’ शिरला. दुसऱ्‍या महायुद्धानंतर सोव्हियत संघ उत्तरेचा राजा बनला. देवाच्या लोकांचा छळ करून आणि त्यांना त्यांच्या देशातून बाहेर काढून हा राजा ‘वैभवी देशात’ शिरला.

९. अलीकडच्या काही वर्षांत रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्रं ‘वैभवी देशात’ कसे शिरले?

अलीकडच्या काही वर्षांत रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्रंही ‘वैभवी देशात’ शिरले आहेत. २०१७ मध्ये आजच्या या उत्तरेच्या राजाने देवाच्या लोकांच्या कार्यावर बंदी आणली आणि आपल्या काही भाऊबहिणींना तुरुंगातसुद्धा टाकलं. त्याने आपल्या प्रकाशनांवर आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन  यावरही बंदी आणली. तसंच, नंतर त्या राजाने आपलं रशियातलं शाखा कार्यालय, राज्य सभागृहं आणि संमेलन गृहंही जप्त केली. त्याच्या या कार्यांमुळे २०१८ मध्ये नियमन मंडळाने रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्रं उत्तरेचा राजा आहे असं म्हटलं. पण जगातली सरकारं देवाच्या लोकांचा छळ करत असली तरी ते त्यांच्याविरुद्ध लढणार नाहीत किंवा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणार नाहीत. ते बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचं पालन करून, “उच्च पदांवर असलेले अधिकारी” याच्यासाठी प्रार्थना करतात. खासकरून ते आपल्या उपासनेच्या स्वातंत्र्याशी संबंधित निर्णय घेतात तेव्हा.—१ तीम. २:१, २.

उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजावर विजय मिळवेल का?

१०. उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजावर विजय मिळवेल का? स्पष्ट करा.

१० दानीएल ११:४०-४५ यांत दिलेल्या भविष्यवाणीत, खासकरून उत्तरेचा राजा काय करेल याबद्दल सांगितलं आहे. मग याचा अर्थ असा होतो का, की तो दक्षिणेच्या राजावर विजय मिळवेल? नाही. यहोवा आणि येशू ख्रिस्त हर्मगिदोनच्या युद्धात जेव्हा सर्व मानवी सरकारांचा नाश करेल तेव्हासुद्धा दक्षिणेचा राजा “जिवंत” असेल. (प्रकटी. १९:२०) हे आपण इतक्या खातरीने का म्हणू शकतो? हे जाणण्यासाठी आता आपण दानीएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या भविष्यवाण्यांवर चर्चा करू या.

देवाच्या राज्याची तुलना एका दगडासोबत आणि मानवी सरकाराची तुलना एका मोठ्या पुतळ्यासोबत करण्यात आली आहे. हर्मगिदोनच्या युद्धात देवाचं राज्य मानवी सरकारांचा नाश करेल (परिच्छेद ११ पाहा)

११. दानीएल २:४३-४५ यांत दिलेल्या भविष्यवाणीचा काय अर्थ होतो? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

११ दानीएल २:४३-४५ वाचा. दानीएल संदेष्ट्याने एकानंतर एक येणाऱ्‍या अशा मानवी सरकारांचा उल्लेख केला ज्यांनी देवाच्या लोकांवर राज्य केलं किंवा त्यांचा छळ केला. त्या सरकारांची तुलना त्याने धातूंनी बनलेल्या एका मोठ्या पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांशी केली. त्या पुतळ्याची पावलं लोखंड आणि मातीच्या मिश्रणाने बनलेली होती. आणि ही पावलं शेवटच्या मानवी सरकाराला सूचित करतात. ही पावलं किंवा शेवटचं सरकार म्हणजे, ब्रिटन-अमेरिका महासत्ता. या भविष्यवाणीचा असा अर्थ होतो की, देवाचं सरकार सर्व मानवी सरकारांचा नाश करेल तेव्हासुद्धा ब्रिटन-अमेरिका महासत्ता राज्य करत असेल.

१२. जंगली पशूचं सातवं डोकं कोणाला सूचित करतं आणि हे आपल्याला माहीत असणं का गरजेचं आहे?

१२ प्रेषित योहाननेसुद्धा अशा महासत्तांबद्दल सांगितलं ज्यांनी देवाच्या लोकांवर राज्य केलं. योहानने पाहिलेल्या दृष्टान्तात जंगली पशूची सात डोकी सरकारांना सूचित करतात. आणि त्याचं सातवं डोकं ब्रिटन-अमेरिका महासत्तेला सूचित करतं. ही माहिती महत्त्वाची आहे, कारण या जंगली पशूला आठवं डोकं असल्याचं योहानला दिसलं नाही. जेव्हा ख्रिस्त आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य या जंगली पशूचं त्याच्या सातव्या डोक्यासोबत नाश करेल तेव्हासुद्धा हे सातवं डोकं राज्य करत असेल. *प्रकटी. १३:१, २; १७:१३, १४.

उत्तरेचा राजा लवकरच काय करणार आहे?

१३-१४. “मागोग देशातील गोग” कोण आहे आणि तो देवाच्या लोकांवर हल्ला का करेल?

१३ उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांचा नाश होण्याआधी काय घडू शकतं याबद्दल यहेज्केलने भविष्यवाणी केली. असं दिसून येतं की यहेज्केल ३८:१०-२३; दानीएल २:४३-४५; ११:४४–१२:१ आणि प्रकटीकरण १६:१३-१६, २१ या भविष्यवाण्यांमध्ये सारख्याच गोष्टींचं वर्णन केलं आहे. यावरून आपण म्हणू शकतो की पुढे दिलेल्या घटना घडतील.

१४ मोठं संकट सुरू होण्याच्या काही काळानंतर ‘सबंध पृथ्वीवरील राजे’ राष्ट्रांचा एक समूह तयार करतील. (प्रकटी. १६:१३, १४; १९:१९) बायबलमध्ये या राष्ट्रांच्या समूहाला “मागोग देशातील गोग” असं म्हटलं आहे. (यहे. ३८:२) राष्ट्रांचा हा समूह देवाच्या लोकांवर एक शेवटचा मोठा हल्ला करेल. पण तो हा हल्ला का करेल? या काळाविषयीच्या दृष्टान्तात योहानने पाहिलं की खूप मोठ्या गारांचा पाऊस देवाच्या लोकांच्या शत्रूंवर पडत आहे. हा गारांचा पाऊस यहोवाचे लोक देणार असलेला कठोर न्यायाचा संदेश असू शकतो. कदाचित या संदेशामुळे मागोगचा गोग देवाच्या लोकांवर हल्ला करेल आणि पृथ्वीवरून त्यांचा पूर्णपणे नाश करण्याचा प्रयत्न करेल.—प्रकटी. १६:२१.

१५-१६. (क) दानीएल ११:४४, ४५ या वचनांमध्ये कदाचित कोणत्या घटनांबद्दल सांगितलं आहे? (ख) उत्तरेच्या राजाचं आणि मागोगच्या गोगमधल्या इतर राष्ट्रांचं काय होईल?

१५ हा कठोर न्यायाचा संदेश आणि देवाच्या शत्रूंचा शेवटचा हल्ला यांबद्दलच कदाचित दानीएल ११:४४, ४५ या वचनांमध्ये सांगितलं आहे. (वाचा.) या वचनांमध्ये दानीएलने म्हटलं की “पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी” उत्तरेचा राजा “चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश” करण्यासाठी तो निघेल. इथे “पुष्कळांचा” असं जे म्हटलं आहे ते कदाचित देवाच्या लोकांना सूचित करतं. * दानीएल इथे देवाच्या लोकांवर होणार असलेल्या शेवटच्या मोठ्या हल्ल्याबद्दल बोलत असावा.

१६ उत्तरेचा राजा आणि जगातली इतर सरकारं जेव्हा देवाच्या लोकांवर हल्ला करतील तेव्हा सर्वशक्‍तिमान देवाचा क्रोध भडकेल आणि यामुळे हर्मगिदोनचं युद्ध सुरू होईल. (प्रकटी. १६:१४, १६) त्या वेळी मागोगचा गोग, जो उत्तरेचा राजा आणि इतर राष्ट्रांनी मिळून बनलेला आहे याचा शेवट होईल आणि त्याला कोणी “साहाय्य करणार नाही.”—दानी. ११:४५.

हर्मगिदोनच्या युद्धात येशू ख्रिस्त आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करेल आणि देवाच्या लोकांना वाचवेल (परिच्छेद १७ पाहा)

१७. दानीएल १२:१ मध्ये उल्लेख केलेला “मोठा अधिपती” किंवा मीखाएल कोण आहे? आणि तो काय करतो?

१७ उत्तरेचा राजा आणि इतर सरकारं यांचा नाश कसा होईल आणि आपल्याला कसं वाचवलं जाईल यांबद्दल दानीएल १२:१ यात सांगितलं आहे. (वाचा. *) या वचनाचा काय अर्थ होतो? मीखाएल हे नाव स्वर्गात राज्य करणाऱ्‍या आपल्या राजाचं, म्हणजेच येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव आहे. स्वर्गात १९१४ या वर्षी देवाचं राज्य स्थापन झाल्यापासून तो देवाच्या लोकांच्या वतीने “उभा” आहे. लवकरच तो आणखी एका अर्थाने, “उभा” राहील. हर्मगिदोनच्या युद्धात देवाच्या शत्रूंचा नाश करून तो असं करेल. दानीएलच्या भविष्यवाणीत म्हटलं आहे की असा “कष्टाचा समय” येईल जो इतिहासात कधीच आला नाही. या समयाच्या शेवटी, हर्मगिदोनचं युद्धं होईल. प्रकटीकरणाच्या पुस्तकात हर्मगिदोनच्या युद्धाला आणि त्याच्या आधीच्या काळाला ‘मोठं संकट’ म्हटलं आहे.—प्रकटी. ६:२; ७:१४.

तुमचं नाव पुस्तकात लिहिलं जाईल का?

१८. भविष्यात काहीही झालं तरी आपल्याला घाबरण्याची गरज का नाही?

१८ दानीएल आणि योहान या दोघांनीही म्हटलं की मोठ्या संकटाच्या वेळी यहोवा आणि येशू ख्रिस्त आपल्या सेवकांना वाचवतील. म्हणून त्या वेळी काहीही घडलं तरी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. दानीएलने म्हटलं की ज्यांची नावं ‘पुस्तकात लिहिलेली सापडतील’ त्यांनाच वाचवलं जाईल. (दानी. १२:१) त्या पुस्तकात आपलंही नाव लिहिलं जावं यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण देवाचा कोकरा, येशू ख्रिस्त याच्यावर आपला भरवसा आहे हे सिद्ध केलं पाहिजे. (योहा. १:२९) आपण आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (१ पेत्र ३:२१) तसंच, यहोवाबद्दल इतरांना शिकून घ्यायला मदत करून आपण हे दाखवलं पाहिजे की आपण देवाच्या राज्याला साथ देत आहोत.

१९. आता आपण काय केलं पाहिजे आणि का?

१९ यहोवावर आणि त्याच्या विश्‍वासू सेवकांच्या संघटनेवर भरवसा वाढवण्याची हीच वेळ आहे. तसंच, देवाच्या राज्याला साथ देण्याचीही हीच वेळ आहे. असं केल्यामुळे देवाचं राज्य उत्तरेच्या राजाचा आणि दक्षिणेच्या राजाचा नाश करेल तेव्हा आपल्याला वाचवलं जाईल.

गीत ४६ यहोवा राजा बनला आहे!

^ परि. 5 आज “उत्तरेचा राजा” कोण आहे आणि त्याचा नाश कसा होईल? या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेतल्यामुळे आपला विश्‍वास मजबूत होईल. आणि लवकरच ज्या परीक्षांचा आपल्याला सामना करावा लागणार आहे त्यासाठी आपण तयार होऊ.

^ परि. 17 दानीएल १२:१ (पंडिता रमाबाई भाषांतर): “मीखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानांसाठी उभा असतो तो त्या समयी उभा राहील; आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल; आणि त्या वेळेस तुझे लोक सोडवले जातील, प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल.”