व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २८

तुम्ही जे मानता तेच सत्य आहे याची खातरी करा

तुम्ही जे मानता तेच सत्य आहे याची खातरी करा

“तू मात्र, ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुला खातरी पटवून देण्यात आली त्यांचे पालन करत राहा.”—२ तीम. ३:१४.

गीत ३४ आपल्या नावाला जागू या!

सारांश *

१. ‘सत्य’ या शब्दाचा काय अर्थ होतो?

“तुम्हाला सत्य कसं मिळालं?” “लहानपणापासूनच तुम्ही सत्यात आहात का?” “तुम्ही सत्यात किती वर्षांपासून आहात?” असे प्रश्‍नं तुम्हाला कधीतरी कोणी विचारले असतील किंवा तुम्ही इतरांना ते विचारले असतील. आपण जेव्हा ‘सत्य’ असं म्हणतो, तेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं? सहसा ज्या गोष्टी आपण मानतो, ज्या पद्धतीने उपासना करतो आणि ज्या प्रकारे जगतो हे सांगण्यासाठी आपण या शब्दाचा वापर करतो. सत्यात असलेल्या लोकांना माहीत असतं की बायबल काय शिकवतं आणि ते बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगतात. यामुळे खोट्या शिकवणींपासून त्यांची सुटका होते. तसंच सैतानाच्या जगात राहत असतानासुद्धा ते आनंदी राहू शकतात.—योहा. ८:३२.

२. योहान १३:३४, ३५ या वचनांनुसार सुरुवातीला कोणती गोष्ट एखाद्याला सत्याकडे आकर्षित करू शकते?

सुरुवातीला कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही सत्याकडे आकर्षित झाला होता? कदाचित यहोवाच्या साक्षीदारांच्या चांगल्या वागणुकीमुळे. (१ पेत्र २:१२) किंवा कदाचित आपसात असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे. अनेकांनी पहिल्यांदा सभेला आल्यावर ते प्रेम अनुभवलं. भाषणात त्यांनी जे ऐकलं ते कदाचित त्यांच्या एवढं लक्षात नसेल, पण ते प्रेम मात्र त्यांच्या कायम लक्षात राहिलं असेल. या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. कारण येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, की त्यांचं आपसात प्रेम असेल तर त्यावरून इतरांना दिसून येईल की ते त्याचे शिष्य आहेत. (योहान १३:३४, ३५ वाचा.) पण आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपल्याला आणखीही काही गोष्टी करण्याची गरज आहे.

३. देवावरचा आपला विश्‍वास जर भाऊबहिणींच्या ख्रिस्ती प्रेमावरच आधारित असेल तर काय होऊ शकतं?

आपला विश्‍वास फक्‍त भाऊबहिणींच्या ख्रिस्ती प्रेमावरच आधारित नसला पाहिजे. असं आपण का म्हणू शकतो? कारण आपला विश्‍वास फक्‍त या प्रेमावर आधारित असला, तर तो लगेच कमजोर होऊ शकतो. उदाहरणार्थ, मंडळीत वडील असलेला एखादा भाऊ किंवा एखादी पायनियर बहीण गंभीर चूक करते तेव्हा कदाचित आपण यहोवाची सेवा करणं सोडून देऊ. मंडळीतली एखादी व्यक्‍ती आपलं मन दुखावते किंवा ती धर्मत्यागी बनते आणि आपण जे काही मानतो ते चुकीचं आहे असं ती म्हणते तेव्हासुद्धा कदाचित आपण यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ. त्यामुळे आपला विश्‍वास मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी यहोवासोबत आपलं नातं घनिष्ठ असलं पाहिजे. आपला विश्‍वास यहोवासोबतच्या नात्याऐवजी दुसऱ्‍यांच्या वागण्यावर अवलंबून असेल, तर तो मजबूत नसेल. कारण घर बांधण्यासाठी फक्‍त रेती पुरेशी नसते तर सिमेंट, विटा यांसारख्या मजबूत आणि टिकाऊ गोष्टीही गरजेच्या असतात. अगदी त्याचप्रमाणे विश्‍वास वाढवण्यासाठी आपल्याला यहोवाबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल जे काही वाटतं तितकंच पुरेसं नाही, तर बायबलचा सखोल अभ्यास करणं, शिकत असलेल्या गोष्टी समजून घेणं आणि संशोधन करणंही खूप महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे आपण यहोवाबद्दल जे शिकतो त्याची आपल्याला पक्की खातरी होईल.—रोम. १२:२.

४. मत्तय १३:३-६, २०, २१ या वचनांनुसार विश्‍वासाची परीक्षा झाल्यावर काहींच्या बाबतीत काय होऊ शकतं?

येशूने म्हटलं की काही जण “आनंदाने” सत्य स्वीकारतील, पण परीक्षा आल्यावर त्यांचा विश्‍वास कमजोर होऊ शकतो. (मत्तय १३:३-६, २०, २१ वाचा.) येशूचे शिष्य बनल्यावर आपल्या जीवनात समस्या येतील असा विचार त्यांनी कदाचित केला नसेल. (मत्त. १६:२४) त्याऐवजी त्यांना कदाचित असं वाटलं असेल की त्यांच्या जीवनात कधीच समस्या येणार नाहीत किंवा देव त्यांच्या सर्व समस्या काढून टाकेल. पण या दुष्ट जगात राहत असताना आपल्या जीवनात समस्या या येतीलच. परिस्थिती बदलल्यामुळे काही काळासाठी आपण आपला आनंद गमावू शकतो.—स्तो. ६:६; उप. ९:११.

५. आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींना सत्याची खातरी पटली आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींना या गोष्टीची खातरी आहे की त्यांच्याकडे सत्य आहे. असं का म्हणता येईल? एखाद्या बांधवाने त्यांचं मन दुखावलं किंवा एखादी गंभीर चूक केली तरी त्यांचा विश्‍वास डळमळत नाही. (स्तो. ११९:१६५) उलट, प्रत्येक परीक्षेनंतर त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होत जातो. (याको. १:२-४) आपण आपला विश्‍वास इतका मजबूत कसा करू शकतो?

‘देवाबद्दल अचूक ज्ञान’ मिळवा

६. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी आपला विश्‍वास कशाच्या आधारावर वाढवला?

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी शास्त्रवचनांचं आणि येशूच्या शिकवणींचं ज्ञान घेऊन आपला विश्‍वास मजबूत केला. बायबलमध्ये येशूच्या शिकवणींना “आनंदाच्या संदेशाचे सत्य” म्हटलं आहे. (गलती. २:५) हे सत्य म्हणजे आपण ख्रिस्ती या नात्याने मानत असलेल्या सर्व गोष्टी. जसं की, येशूचं खंडणी बलिदान आणि त्याचं पुनरुत्थान. या शिकवणी खऱ्‍या आहेत याची प्रेषित पौलला पूर्ण खातरी होती. असं का म्हणता येईल? कारण “ख्रिस्ताने दुःख सोसणे व मेलेल्यांतून उठणे आवश्‍यक होते, हे त्याने शास्त्रवचनांच्या आधारे स्पष्ट करून” लोकांना पटवून दिलं. (प्रे. कार्ये १७:२, ३) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी त्या शिकवणी स्वीकारल्या आणि देवाचं वचन समजून घेण्यासाठी ते पवित्र आत्म्यावर विसंबून राहिले. या शिकवणी शास्त्रवचनावर आधारित आहेत हे स्वतःला पटवून देण्यासाठी त्यांनी संशोधन केलं. (प्रे. कार्ये १७:११, १२; इब्री ५:१४) त्यांनी आपला विश्‍वास फक्‍त भावनांच्या आधारावर वाढवला नाही. किंवा भाऊबहिणींच्या सहवासात चांगलं वाटतं म्हणून त्यांनी यहोवाची सेवा केली नाही, तर यहोवाबद्दल अचूक ज्ञान मिळवून त्यांनी आपला विश्‍वास वाढवला.—कलस्सै. १:९, १०.

७. बायबलच्या सत्यांवर जर आपला विश्‍वास मजबूत असेल तर याचा आपल्याला कसा फायदा होईल?

बायबलमधली सत्यं कधीही बदलत नाहीत. (स्तो. ११९:१६०) एखाद्या भावाने किंवा बहिणीने आपलं मन दुखावलं किंवा गंभीर पाप केलं तेव्हाही बायबलची सत्यं बदलत नाहीत. जेव्हा आपल्यासमोर समस्या येतात तेव्हासुद्धा ती बदलत नाहीत. म्हणून बायबलची सत्यं आपण चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजेत, आणि ती खरी आहेत याची आपल्याला खातरी असली पाहिजे. आपला विश्‍वास जर बायबलच्या सत्यांवर आधारलेला असेल, तर परीक्षा येतात तेव्हा तो डळमळणार नाही. ज्या प्रकारे वादळी समुद्रात नांगर एका नावेला एका ठिकाणी खिळवून ठेवतो, अगदी त्याच प्रकारे आपला विश्‍वास टिकून राहील. पण आपण जे मानतो तेच सत्य आहे याची आपण स्वतःला नेहमी खातरी कशी पटवून देऊ शकतो?

स्वतःला “खातरी पटवून” द्या

८. दुसरे तीमथ्य ३:१४, १५ या वचनांनुसार आपण जे मानतो तेच सत्य आहे याची तीमथ्यला खातरी कशी पटली?

आपण जे मानतो तेच सत्य आहे याची तीमथ्यला खातरी होती. त्याला या गोष्टीची खातरी कशी पटली? (२ तीमथ्य ३:१४, १५ वाचा.) जेव्हा तीमथ्य लहान होता तेव्हा त्याच्या आईने आणि त्याच्या आजीने त्याला “पवित्र लिखाणांचे ज्ञान” दिले. पण या लिखाणांचं अभ्यास करण्यासाठी त्याने स्वतःसुद्धा नक्कीच वेळ दिला असेल आणि मेहनत घेतली असेल. यामुळे पवित्र लिखाणांमध्ये जे सांगितलं आहे तेच सत्य आहे याची त्याला स्वतःला “खातरी” पटली. पुढे तीमथ्य, त्याची आई आणि त्याची आजी यांनी येशूच्या शिकवणींबद्दल ज्ञान घेतलं. ख्रिश्‍चनांचं आपसातलं प्रेम पाहून तीमथ्यच्या मनावर नक्कीच चांगला परिणाम झाला असेल. तसंच, मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत संगती करायची आणि त्यांना मदत करायचीही त्याची मनापासून इच्छा असावी यात शंका नाही. (फिलिप्पै. २:१९, २०) पण त्याचा विश्‍वास लोकांबद्दल वाटणाऱ्‍या भावनांवर नाही, तर शास्त्रवचनांतून शिकलेल्या गोष्टींवर आधारित होता. तीमथ्यप्रमाणे आपणसुद्धा बायबलचा अभ्यास केला पाहिजे आणि बायबलमध्ये यहोवाबद्दल जे काही सांगितलं आहे तेच खरं आहे याची स्वतःला खातरी पटवून दिली पाहिजे.

९. आपण कोणत्या तीन महत्त्वाच्या सत्यांची स्वतःला खातरी पटवून दिली पाहिजे?

सुरुवातीला आपण स्वतःला तीन महत्त्वाच्या सत्यांची खातरी पटवून दिली पाहिजे. पहिलं म्हणजे, यहोवा देव सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. (निर्ग. ३:१४, १५; इब्री ३:४; प्रकटी. ४:११) दुसरं म्हणजे, बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलं आहे आणि त्यातला संदेश मानवांसाठी आहे. (२ तीम. ३:१६, १७) तिसरं म्हणजे, यहोवाच्या लोकांचा एक संघटित गट आहे आणि ते येशूच्या नेतृत्वाखाली यहोवाची उपासना करतात; आणि हा गट यहोवाचे साक्षीदार या नावाने ओळखला जातो. (यश. ४३:१०-१२; योहा. १४:६; प्रे. कार्ये १५:१४) या तीन महत्त्वाच्या सत्यांची स्वतःला खातरी पटवून देण्यासाठी बायबलचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं नाही. आपण जे मानतो तेच सत्य आहे याची स्वतःला खातरी पटवून देण्यासाठी आपल्या विचारशक्‍तीचा उपयोग करणं गरजेचं आहे.—रोम. १२:१.

इतरांना खातरी पटवून द्यायला तयार असा

१०. सत्य माहीत असण्यासोबतच आपल्याला काय करता आलं पाहिजे?

१० या तीन महत्त्वपूर्ण सत्यांची स्वतःला खातरी पटवून दिल्यानंतर, शास्त्रवचनांचा उपयोग करून आपल्याला ही सत्यं इतरांना शिकवताही आली पाहिजे. का बरं? कारण ख्रिस्ती असल्यामुळे, जी सत्यं आपल्याला माहीत आहेत ती इतरांना शिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. * (१ तीम. ४:१६) आपण जेव्हा बायबलमधल्या या सत्यांची इतरांना खातरी पटवून द्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या सत्यांबद्दलची आपली खातरीही आणखी पक्की होत जाते.

११. प्रेषित पौल इतरांना कसं शिकवायचा आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

११ प्रेषित पौल जेव्हा लोकांना शिकवायचा, तेव्हा “त्यांना येशूबद्दल खातरी पटवून देण्यासाठी” तो “मोशेच्या नियमशास्त्रातून व संदेष्ट्यांच्या लिखाणांतून अनेक पुरावे” द्यायचा. (प्रे. कार्ये २८:२३) इतरांना सत्य शिकवताना आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो? त्यासाठी बायबलमध्ये काय सांगितलं आहे इतकंच आपल्या विद्यार्थ्यांना सांगणं पुरेसं नाही; तर आपण त्यांना बायबलचा अभ्यास करायला आणि शिकत असलेल्या गोष्टींवर खोलवर विचार करायलाही शिकवलं पाहिजे. त्यांनी सत्यात यावं असं नक्कीच आपल्याला वाटतं. पण आपल्याबद्दल आदर असल्यामुळे नाही, तर आपल्या प्रेमळ पित्याबद्दल ते जे काही शिकतात तेच सत्य आहे याची स्वतःला खातरी पटवून दिल्यामुळे त्यांनी सत्यात यावं असं आपल्याला वाटतं.

पालकांनो, आपल्या मुलांचा विश्‍वास वाढवण्यासाठी त्यांना “देवाच्या गहन गोष्टीही” शिकवा (परिच्छेद १२-१३ पाहा) *

१२-१३. पालक आपल्या मुलांना सत्यात टिकून राहायला कशी मदत करू शकतात?

१२ पालकांनो! तुमच्या मुलांनी सत्यात टिकून राहावं असं नक्कीच तुम्हाला वाटत असेल. तुम्हाला कदाचित वाटेल, की मंडळीत जर त्यांचे चांगले मित्र असतील, तर देवावरचा त्यांचा विश्‍वास मजबूत होईल. पण बायबल जे शिकवतं तेच सत्य आहे याची तुमच्या मुलांना खातरी पटण्यासाठी इतकंच पुरेसं नाही; तर देवासोबत त्यांचं एक वैयक्‍तिक नातं असणं, आणि बायबल जे शिकवतं तेच सत्य आहे याची त्यांना स्वतःला खातरी असणंही गरजेचं आहे.

१३ पालकांना जर आपल्या मुलांना देवाबद्दलचं सत्य शिकवायचं असेल, तर त्यांनी स्वतः बायबलचा चांगला अभ्यास करणारे आणि शिकलेल्या गोष्टींवर मनन करणारे असलं पाहिजे. मगच ते आपल्या मुलांना या गोष्टी करायला शिकवू शकतील. ज्या प्रकारे ते आपल्या बायबल विद्यार्थ्याला बायबल अभ्यासाची साधनं वापरायला शिकवतात, अगदी त्याच प्रकारे त्यांनी आपल्या मुलांनासुद्धा ही साधनं वापरायला शिकवलं पाहिजे. यामुळे मुलं यहोवावर प्रेम करायला शिकतील. तसंच, आज यहोवा विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाचा उपयोग करून आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो यावरचा त्यांचा भरवसाही वाढेल. (मत्त. २४:४५-४७) म्हणून पालकांनो, आपल्या मुलांना बायबलची मूलभूत सत्यं शिकवण्यावरच समाधान मानू नका; तर त्यांचं वय आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांना ‘देवाच्या गहन गोष्टीही’ शिकवा. यामुळे देवावरचा त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होईल.—१ करिंथ. २:१०.

बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करा

१४. बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांचा आपण अभ्यास का केला पाहिजे? (“ तुम्ही या भविष्यवाण्या समजावून सांगू शकता का?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१४ बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या देवाच्या वचनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचा अभ्यास केल्यामुळे यहोवावरचा आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. बायबलमधल्या कोणत्या भविष्यवाण्यांमुळे तुमचा विश्‍वास आणखी मजबूत झाला आहे? तुम्ही कदाचित म्हणाल, ‘शेवटल्या दिवसांविषयीच्या भविष्यवाण्यांमुळे.’ (२ तीम. ३:१-५; मत्त. २४:३, ७) पण पूर्ण झालेल्या इतरही काही भविष्यवाण्या आहेत ज्यांमुळे आपला विश्‍वास आणखी मजबूत होऊ शकतो. जसं की, दानीएलच्या दुसऱ्‍या किंवा ११ व्या अध्यायात दिलेल्या भविष्यवाण्या. या भविष्यवाण्या पूर्वी कशा पूर्ण झाल्या आणि आजही त्या कशा पूर्ण होत आहेत हे तुम्ही समजावून सांगू शकता का? * आपला विश्‍वास जर बायबलवर आधारित असेल, तर तो सहज डळमळणार नाही. दुसऱ्‍या महायुद्धात जर्मनीमधल्या आपल्या ज्या बांधवांना तीव्र छळाचा सामना करावा लागला त्यांचं उदाहरण विचारात घ्या. शेवटच्या दिवसांविषयी बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांची त्यांना पूर्ण समज नव्हती; पण तरीसुद्धा देवाच्या वचनावरचा त्यांचा विश्‍वास मजबूत होता.

बायबलचा आणि त्यातल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास केल्याने परीक्षा येतात तेव्हा यहोवाला विश्‍वासू राहायला आपल्याला मदत होईल (परिच्छेद १५-१७ पाहा) *

१५-१७. बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्या बांधवांना नात्झी सरकारकडून होणाऱ्‍या छळाचा सामना करायला कशी मदत झाली?

१५ जर्मनीमध्ये नात्झी सरकार सत्तेवर असताना आपल्या हजारो भाऊबहिणींना छळ छावण्यांमध्ये पाठवण्यात आलं. हिटलर आणि त्याचा एक मुख्य अधिकारी, हाइनरिक हिम्लर हे यहोवाच्या साक्षीदारांचा खूप द्वेष करायचे. एका छळ छावणीत असलेल्या आपल्या काही बहिणींना हिम्लर काय म्हणाला याबद्दल एका बहिणीने सांगितलं. तो म्हणाला होता: “तुमचा यहोवा स्वर्गात राज्य करत असेल, पण इथे पृथ्वीवर आमचं राज्य चालतं! बघू कोण जास्त काळ टिकतं, तुम्ही की आम्ही.” मग कोणत्या गोष्टीने यहोवाच्या लोकांना विश्‍वासू राहायला मदत केली?

१६ बायबल विद्यार्थ्यांना हे माहीत होतं, की देवाच्या राज्याने १९१४ मध्ये राज्य करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याला तीव्र छळाचा सामना करावा लागत आहे या गोष्टीचं त्यांना आश्‍चर्य वाटलं नाही. यहोवाच्या लोकांना या गोष्टीची पक्की खातरी होती, की कोणतंही मानवी सरकार देवाला त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. हिटलर खऱ्‍या उपासनेचं नामोनिशाण मिटवू शकला नाही, किंवा देवाच्या राज्यापेक्षा शक्‍तिशाली असलेलं सरकार स्थापन करू शकला नाही. हिलटरच्या शासनाचा एक ना एक दिवस अंत होईल याची आपल्या बांधवांना पक्की खातरी होती.

१७ नात्झी सरकारबद्दल आपल्या भाऊबहिणींना जे वाटत होतं अगदी तसंच घडलं. काही वर्षांनी नात्झी सरकार कोसळलं, आणि जो हाइनरिक हिम्लर असं म्हणाला होता, की “इथे पृथ्वीवर आमचं राज्य चालतं!” तो आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढत होता. त्या वेळी बंधू लूबके यांच्याशी त्याची गाठ पडली. बंधू लूबके एक यहोवाचे साक्षीदार असून पूर्वी तुरुंगात होते हे हिम्लरला माहीत होतं. त्यांना भेटल्यावर हिम्लरने अतिशय दुःखी होऊन त्यांना विचारलं: “बायबल विद्यार्थ्या! सांग आता काय होणार आहे?” त्यावर बंधू लूबके यांनी हिम्लरला सांगितलं, की यहोवाच्या साक्षीदारांना हे आधीपासूनच माहीत होतं, की एक ना एक दिवस नात्झी सरकार कोसळेल आणि साक्षीदारांची सुटका होईल. हिम्लर यहोवाच्या साक्षीदारांबद्दल खूप बरंवाईट बोलला होता. पण या क्षणी मात्र त्याला काहीच बोलता आलं नाही. आणि काही काळाने त्याने आत्महत्या केली. तर सांगायचा मुद्दा हा, की आपण जर बायबलचा आणि त्यातल्या भविष्यवाण्यांचा सखोल अभ्यास केला तर देवावरचा आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल. आणि परीक्षा येतात तेव्हा विश्‍वासात टिकून राहायला आपल्याला मदत होईल.—२ पेत्र १:१९-२१.

१८. योहान ६:६७, ६८ यांत सांगितल्याप्रमाणे आपल्याला सत्याचं अचूक ज्ञान आणि पूर्ण समज का असली पाहिजे?

१८ आपण नेहमी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. यावरून इतरांना दिसून येईल की आपण खरे ख्रिस्ती आहोत. पण प्रेमासोबतच आपल्याला “सत्याचे अचूक ज्ञान व पूर्ण समज” असली पाहिजे. (फिलिप्पै. १:९) नाहीतर आपण “चलाख माणसांकडून फसवले जाऊन, . . . प्रत्येक शिकवणीच्या वाऱ्‍याने इकडेतिकडे वाहवत” जाऊ. या शिकवणींमध्ये धर्मत्यागी लोकांच्या शिकवणीही येतात. (इफिस. ४:१४) पहिल्या शतकात येशूच्या शिष्यांपैकी अनेक जण त्याला सोडून गेले. पण प्रेषित पेत्र मात्र मोठ्या खातरीने म्हणाला, की “सर्वकाळाचं जीवन देणाऱ्‍या गोष्टी” येशूकडे आहेत. (योहान ६:६७, ६८ वाचा.) येशूने शिकवलेल्या सगळ्याच गोष्टी पेत्रला त्या वेळी समजल्या नव्हत्या. पण तरीसुद्धा तो विश्‍वासू राहिला, कारण येशू हाच ख्रिस्त आहे या गोष्टीची त्याला पक्की खातरी होती. बायबल जे काही शिकवतं त्याबद्दल आपणही आपली खातरी आणखी पक्की करत राहू शकतो. आपण जर असं केलं, तर आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी आपला विश्‍वास डळमळणार नाही. तसंच, आपल्याला इतरांनाही त्यांचा विश्‍वास मजबूत करायला मदत करता येईल.—२ योहा. १, २.

गीत १० “हा मी आहे, मला पाठीव!”

^ परि. 5 बायबलमधलं सत्य किती महत्त्वाचं आहे हे समजायला हा लेख आपल्याला मदत करेल. तसंच, जे काही आपण मानतो तेच सत्य आहे याची आपण स्वतःला आणखी खातरी कशी करून देऊ शकतो हेही आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 10 बायबलच्या मूलभूत शिकवणींवर इतरांसोबत तर्क कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी २०१५ च्या टेहळणी बुरूज  नियतकालिकात दिलेली ही लेखमाला पाहा: “यहोवाच्या साक्षीदारांबरोबर चर्चा,” विषय: “देवाचे राज्य केव्हापासून शासन करू लागले?

^ परि. 14 या भविष्यवाण्या समजून घेण्यासाठी टेहळणी बुरूज नियतकालिकाचे १५ जून २०१२ आणि मे २०२० हे अंक पाहा.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: कौटुंबिक उपासनेत आईवडील आपल्या मुलांसोबत मोठ्या संकटाबद्दलच्या काही भविष्यवाण्यांचा अभ्यास करत आहेत.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: मोठ्या संकटाच्या वेळी जे काही घडेल ते पाहून या कुटुंबाला आश्‍चर्य वाटणार नाही.