व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २९

“मी दुर्बळ असतो, तेव्हाच सामर्थ्यशाली होतो”

“मी दुर्बळ असतो, तेव्हाच सामर्थ्यशाली होतो”

“ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ आणि कठीण परिस्थिती यांना तोंड देताना मी आनंद मानतो.”—२ करिंथ. १२:१०.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१. प्रेषित पौलच्या मनात कधीकधी कशा भावना यायच्या?

प्रेषित पौलला कधीकधी खूप कमजोर असल्यासारखं वाटायचं. त्याने म्हटलं, की त्याचं शरीर “झिजत” चाललं आहे, योग्य ते करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे आणि यहोवा नेहमीच आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. (२ करिंथ. ४:१६; १२:७-९; रोम. ७:२१-२३) पौलने असंही म्हटलं की त्याचे विरोधी त्याला कमजोर * समजतात. पण स्वतःच्या कमतरतांमुळे किंवा इतरांनी आपल्याबद्दल म्हटलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे, ‘मी काहीच कामाचा नाही’ असं पौलला वाटलं नाही.—२ करिंथ. १०:१०-१२, १७, १८.

२. दुसरे करिंथकर १२:९, १० या वचनांनुसार पौल कोणता महत्त्वाचा धडा शिकला?

पौल आपल्या अनुभवातून एक महत्त्वाचा धडा शिकला. तो म्हणजे, एखाद्या व्यक्‍तीला कमजोर झाल्यासारखं वाटत असलं, तरी ती सामर्थ्यशाली बनू शकते. (२ करिंथकर १२:९, १० वाचा.) यहोवाने पौलला म्हटलं, की “दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.” याचा अर्थ, पौलला लागणारी ताकद यहोवा त्याला देणार होता. या लेखात, सर्वातआधी आपण पाहू या की विरोधी आपला अपमान करतात तेव्हा आपल्याला दुःखी होण्याची गरज का नाही.

अपमान झाला तरी आनंद माना

३. आपला अपमान होत असतानाही आपण आनंदी का राहू शकतो?

आपल्यापैकी कोणालाही अपमान झालेला आवडत नाही. विरोधी आपला अपमान करतात तेव्हा आपल्याला इतकं वाईट वाटू शकतं की आपण निराश होऊ. (नीति. २४:१०) मग अशा वेळी आपण काय करू शकतो? प्रेषित पौलप्रमाणे अपमान होत असताना आपण आनंदी राहू शकतो. (२ करिंथ. १२:१०) कारण जेव्हा आपला अपमान आणि विरोध केला जातो तेव्हा आपण येशूचे खरे शिष्य असल्याचं दिसून येतं. (१ पेत्र ४:१४) येशूने म्हटलं होतं की त्याच्या शिष्यांचा छळ केला जाईल. (योहा. १५:१८-२०) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसोबत असंच घडलं. त्या काळात लोकांवर ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता. म्हणून लोक ख्रिश्‍चनांना कमजोर आणि मूर्ख समजायचे. तसंच, पेत्र आणि योहान यांच्याप्रमाणेच इतर ख्रिश्‍चनही “अशिक्षित व साधारण” आहेत असं यहुदी लोक मानायचे. (प्रे. कार्ये ४:१३) अनेकांना वाटायचं की ख्रिस्ती लोक कमजोर आहेत. ते राजकारणात भाग घेत नसल्यामुळे सरकारची त्यांना साथ नाही. ते सैन्यात भरती होत नसल्यामुळे युद्ध लढण्याची किंवा स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. शिवाय, लोक त्यांना तुच्छही लेखायचे.

४. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा अपमान करण्यात आला तेव्हा त्यांनी काय केलं?

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा अपमान करण्यात आला तेव्हा त्यांनी प्रचारकार्य करणं थांबवलं का? नाही. उदाहरणार्थ, पेत्र आणि योहान यांनी येशूबद्दल शिकवल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला. पण ही गोष्ट त्यांनी सन्मानाची समजली. (प्रे. कार्ये ४:१८-२१; ५:२७-२९, ४०-४२) त्यांचा अपमान करण्यात आला तेव्हा त्यांनी वाईट वाटून घेतलं नाही. विरोधकांच्या तुलनेत पाहिलं तर त्या नम्र ख्रिश्‍चनांनी मानवजातीच्या भल्यासाठी खूप काही केलं होतं. जसं की, त्यांच्यापैकी काहींनी देवाच्या प्रेरणेने बायबलची पुस्तकं लिहिली. आणि या पुस्तकांमुळे आजही लाखो लोकांना मदत आणि आशा मिळत आहे. तसंच, ज्या राज्याबद्दल त्यांनी प्रचार केला होता ते स्वर्गात स्थापित झालं आहे, आणि लवकरच ते संपूर्ण मानवजातीवर राज्य करेल. (मत्त. २४:१४) याउलट, प्राचीन काळातल्या ज्या शक्‍तिशाली रोमी सरकारने ख्रिश्‍चनांचा छळ केला होता त्याचं अस्तित्व केव्हाच मिटून गेलं आहे. तसंच, ज्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांचा छळ करण्यात आला होता ते आज स्वर्गात राजे म्हणून राज्य करत आहेत. पण त्यांच्या विरोधकांचा मात्र मृत्यू झाला आहे. आणि भविष्यात जरी त्यांचं पुनरुत्थान झालं तरी त्यांना त्याच राज्याच्या अधिकाराखाली राहावं लागेल ज्याचा त्यांनी विरोध केला होता.—प्रकटी. ५:१०.

५. योहान १५:१९ या वचनानुसार यहोवाच्या लोकांना तुच्छ का लेखलं जातं?

आज काही लोक यहोवाच्या साक्षीदारांचा आदर करत नाहीत आणि त्यांची थट्टा करतात. कारण त्यांना असं वाटत की आपण मूर्ख आणि कमजोर आहोत. पण ते आपल्याबद्दल असा विचार का करतात? कारण जगातले लोक जसं वागतात तसं आपण वागत नाही. त्या लोकांना असे लोक आवडतात जे गर्विष्ठ, उद्धट आणि बंडखोर वृत्तीचे आहेत. पण याउलट आपण नम्र आणि आज्ञाधारक राहण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय आपण राजकारणात भाग घेत नाही आणि सैन्यात भरती होत नाही. यामुळेच ते आपल्याला तुच्छ लेखतात.योहान १५:१९ वाचा; रोम. १२:२.

६. यहोवा आज त्याच्या लोकांकडून काय साध्य करून घेत आहे?

जगातले लोक आपल्याला कमजोर समजत असले तरी यहोवा आपल्याकडून मोठमोठ्या गोष्टी साध्य करून घेत आहे. मानव इतिहासात आजपर्यंत कधी घडलं नव्हतं असं मोठं प्रचारकार्य तो आपल्याकडून साध्य करून घेत आहे. आज त्याचे सेवक असं साहित्य प्रकाशित करत आहेत ज्याचं सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतर आणि वितरण होत आहे. याशिवाय, ते बायबलचा उपयोग करून लाखो लोकांना आपलं जीवन सुधारायला मदत करत आहेत. या सर्व गोष्टींचं श्रेय यहोवालाच जातं. जगातले लोक ज्यांना कमजोर समजतात त्यांच्याकडून यहोवा मोठमोठी कार्यं साध्य करून घेत आहे. एक गट म्हणून तो आपली मदत करत आहे. पण आपल्यापैकी प्रत्येकालाही तो शक्‍तिशाली बनायला मदत करत आहे का? तसं असेल तर त्याच्याकडून मदत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? आता आपण प्रेषित पौलच्या उदाहरणातून शिकायला मिळणाऱ्‍या तीन विशिष्ट गोष्टींवर चर्चा करणार आहोत.

स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहू नका

७. पौलच्या उदाहरणातून आपण कोणता एक धडा शिकू शकतो?

पौलच्या उदाहरणातून आपण एक धडा शिकू शकतो. तो म्हणजे, यहोवाची सेवा करत असताना आपण स्वतःच्या ताकदीवर किंवा क्षमतांवर अवलंबून राहू नये. पौलच्या क्षमतांमुळे बरेच लोक त्याची प्रशंसा करायचे. तो रोमी प्रांतातल्या राजधानी शहरात, म्हणजे तार्ससमध्ये वाढला होता. तार्सस हे एक समृद्ध शहर होतं आणि तिथे एक नावाजलेलं विद्यापीठही होतं. तसंच, पौल खूप शिकलेलाही होता. त्याने त्याच्या काळातल्या गमलियेल नावाच्या यहुदी पुढाऱ्‍याकडून शिक्षण घेतलं होतं. या शिक्षकाचा सर्व जण आदर करायचे. (प्रे. कार्ये ५:३४; २२:३) याशिवाय, पौलला एकेकाळी यहुदी समाजात प्रतिष्ठेचं स्थान होतं. त्याबद्दल त्याने म्हटलं: “माझ्या राष्ट्रातल्या माझ्याच वयाच्या इतर अनेकांपेक्षा मी यहुदी धर्मात पुष्कळ प्रगती करत होतो.” (गलती. १:१३, १४; प्रे. कार्ये २६:४) या सगळ्या गोष्टींमुळे पौल सहज गर्विष्ठ बनू शकला असता. तो स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहू शकला असता. पण त्याने तसं मुळीच केलं नाही.

ख्रिस्ताचा शिष्य असणं हा पौलसाठी एक मोठा बहुमान होता; या बहुमानाच्या तुलनेत, जगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सगळ्या गोष्टी “केरकचरा” आहेत असं त्याने मानलं (परिच्छेद ८ पाहा) *

८. (क) फिलिप्पैकर ३:८ या वचनानुसार मागे सोडून दिलेल्या गोष्टींबद्दल पौलचा काय दृष्टिकोन होता? (ख) पौलने दुर्बलतांमध्ये आनंद का मानला?

इतर जण पौलला ज्या गोष्टींमुळे महत्त्व देत होते, त्या त्याने आनंदाने मागे सोडून दिल्या. इतकंच काय तर त्याने त्या गोष्टींना “केरकचरा” समजलं. (फिलिप्पैकर ३:८ वाचा.) येशू ख्रिस्ताचा शिष्य बनल्यामुळे पौलला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याच्याच राष्ट्रातल्या लोकांनी त्याचा द्वेष केला. (प्रे. कार्ये २३:१२-१४) तो रोमी नागरिक होता. पण तरी रोमी लोकांनी त्याला मारहाण केली आणि तुरुंगात टाकलं. (प्रे. कार्ये १६:१९-२४, ३७) याशिवाय, त्याला आपल्या कमतरतांचीही जाणीव होती, आणि योग्य ते करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. (रोम. ७:२१-२५) पण पौलने आपल्या समस्यांमुळे, विरोधकांमुळे किंवा कमतरतांमुळे हार मानली नाही. याउलट, त्याने आपल्या ‘दुर्बलतांमध्ये आनंद’ मानला. तो असं का करू शकला? कारण जेव्हा-जेव्हा तो दुर्बळ होता तेव्हा-तेव्हा त्याने यहोवाचं सामर्थ्य अनुभवलं.—२ करिंथ. ४:७; १२:१०.

९. आपण कमजोर आहोत असं आपल्याला वाटत असेल तर आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

आपल्याला जर यहोवाकडून सामर्थ्य मिळवायचं असेल तर आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे? आपण आपल्या ताकदीवर, शिक्षणावर, संस्कृतीवर किंवा पैशांवर घमेंड करू नये. या गोष्टींमुळे आपण यहोवाच्या कामी येत नाही. खरंतर, यहोवाचे बरेचसे सेवक हे मानवी दर्जानुसार “बुद्धिमान, शक्‍तिशाली व उच्च घराण्यातले” नाहीत. याउलट, यहोवाने “जगातल्या दुर्बल गोष्टींना निवडले” आहे. (१ करिंथ. १:२६, २७) म्हणून, परिच्छेदाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या गोष्टी जरी तुमच्याकडे नसल्या तरी तुम्ही यहोवाची सेवा करू शकता. लक्षात असू द्या, की जगात एखाद्या व्यक्‍तीला ज्या गोष्टींमुळे महत्त्व मिळतं त्या गोष्टी तुमच्याकडे नसतात तेव्हा तुम्हाला यहोवाची ताकद अनुभवायला मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही मानत असलेली एखादी गोष्ट चुकीची आहे असं कोणी म्हणतं तेव्हा घाबरून जाऊ नका, तर यहोवाकडे प्रार्थना करा. तो तुम्हाला आपल्या विश्‍वासाची बाजू मांडण्यासाठी लागणारं धैर्य देईल. (इफिस. ६:१९, २०) तसंच, एखाद्या गंभीर आजाराचा सामना करत असतानाही यहोवाची सेवा करता यावी म्हणून ताकदीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करा. यहोवा प्रत्येक वेळी तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो हे तुम्ही पाहाल तेव्हा तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल आणि तुम्ही सामर्थ्यवान व्हाल.

बायबलमधल्या उदाहरणांतून शिका

१०. इब्री लोकांना ११:३२-३४ यात वचनांत आणि बायबलमध्ये उल्लेख केलेल्या इतर विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांवर आपण मनन का केलं पाहिजे?

१० पौल देवाच्या वचनाचा चांगला अभ्यास करायचा. असं करत असताना विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांतून तो बऱ्‍याच गोष्टी शिकला. इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात पौलने त्यांना विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांवर मनन करायचं आणि त्यांच्याकडून शिकायचं प्रोत्साहन दिलं. (इब्री लोकांना ११:३२-३४ वाचा.) त्या विश्‍वासू सेवकांपैकी एक म्हणजे दावीद राजा. त्याला फक्‍त त्याच्या शत्रूंचाच नाही, तर एकेकाळी त्याचे मित्र असणाऱ्‍यांचाही विरोध सहन करावा लागला. या लेखात दावीदच्या उदाहरणावर चर्चा करत असताना आपण पाहू, की पौलला दावीदच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे कशी मदत झाली. तसंच, आपण पौलच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो हेही आपण या लेखात पाहू.

दावीद लहान होता आणि गल्याथच्या तुलनेत कमजोर वाटत होता. पण तरीसुद्धा गल्याथचा सामना करायला तो घाबरला नाही. दावीद यहोवावर विसंबून होता, कारण गल्याथला हरवण्यासाठी यहोवा आपल्याला ताकद देईल याची त्याला खातरी होती. आणि अगदी तसंच घडलं (परिच्छेद ११ पाहा)

११. मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यावर दावीद कमजोर का वाटला? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

११ शक्‍तिशाली योद्धा गल्याथ याच्या नजरेत दावीद कमजोर होता. गल्याथने त्याला पाहिलं तेव्हा तो त्याला “तुच्छ वाटला.” कारण गल्याथ हा उंच आणि धिप्पाड होता. त्याला युद्धाचं प्रशिक्षण मिळालं होतं आणि त्याच्याकडे हत्यारंही होती. पण गल्याथच्या तुलनेत दावीद खूप लहान होता. त्याला युद्धाचं प्रशिक्षण मिळालं नव्हतं आणि त्याच्याकडे हत्यारंही नव्हती. मानवी दृष्टिकोनातून तो कमजोर वाटत असला तरी तो शक्‍तिशाली होता. कारण तो यहोवावर विसंबून होता. आणि यहोवाने त्याला गल्याथला हरवण्यासाठी लागणारी ताकद दिली.—१ शमु. १७:४१-४५, ५०.

१२. दावीदला आणखी कोणत्या एका समस्येचा सामना करावा लागला?

१२ दावीदला आणखी एका समस्येला तोंड द्यावं लागलं. त्या समस्येमुळे त्याला कमजोर झाल्यासारखं वाटलं असेल. यहोवाने शौलला इस्राएलचा राजा म्हणून नियुक्‍त केलं होतं. दावीदने एकनिष्ठपणे त्याची सेवा केली. सुरुवातीला दावीदबद्दल शौलला फार आदर वाटायचा. पण नंतर गर्वामुळे तो दावीदचा हेवा करू लागला. तो त्याच्याशी खूप वाईट वागू लागला. इतकंच नाही, तर त्याने त्याला मारून टाकण्याचाही प्रयत्न केला.—१ शमु. १८:६-९, २९; १९:९-११.

१३. शौल दावीदशी वाईट वागत राहिला तेव्हा दावीदने काय केलं?

१३ शौल दावीदशी वाईट वागत असला, तरी यहोवाने नेमलेल्या राजाचा दावीद आदर करत राहिला. (१ शमु. २४:६) शौल राजा आपल्याशी वाईट वागतो म्हणून दावीदने यहोवाला दोष दिला नाही. याउलट तो यहोवावर विसंबून राहिला. कारण त्याला या गोष्टीची खातरी होती, की कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी यहोवा त्याला बळ देईल.—स्तो. १८:१ आणि उपरीलेखन.

१४. दावीदप्रमाणेच पौलला कोणत्या समस्येचा सामना करावा लागला?

१४ प्रेषित पौललाही दावीदसारख्याच समस्येचा सामना करावा लागला. पौलचे शत्रू त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने शक्‍तिशाली होते. मोठ्या पदावर असलेले बरेचसे अधिकारी त्याचा द्वेष करायचे. बऱ्‍याचदा अधिकाऱ्‍यांनी त्याला मारहाण करण्याचा आणि तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. दावीदप्रमाणेच पौलचे काही मित्र त्याच्याशी वाईट वागले. तसंच, ख्रिस्ती मंडळीतल्या काही जणांनी त्याचा विरोध केला. (२ करिंथ. १२:११; फिलिप्पै. ३:१८) पण पौलने हार मानली नाही. विरोध होत असतानाही तो प्रचार करत राहिला. भाऊबहिणींनी त्याला साथ दिली नाही तरी तो त्यांना मदत करत राहिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत तो देवाला विश्‍वासू राहिला. (२ तीम. ४:८) तो हे यासाठी करू शकला कारण तो स्वतःच्या क्षमतांवर नाही, तर यहोवावर विसंबून राहिला.

आपल्या विश्‍वासाची परीक्षा होते तेव्हा इतरांना त्याबद्दल समजावून सांगताना आपण आदराने आणि प्रेमाने बोललं पाहिजे (परिच्छेद १५ पाहा) *

१५. आपला उद्देश काय असला पाहिजे, आणि आपण तो कसा साध्य करू शकतो?

१५ वर्गसोबती, सोबत काम करणारे किंवा सत्यात नसलेले कुटुंबातले सदस्य यांच्याकडून तुम्हाला अपमानाचा किंवा छळाचा सामना करावा लागतो का? मंडळीतली एखादी व्यक्‍ती तुमच्याशी वाईट वागली का? असेल तर दावीद आणि पौल यांचं उदाहरण लक्षात ठेवा. तुम्ही “बऱ्‍याने वाइटाला जिंकत” राहू शकता. (रोम. १२:२१) आपला विरोध होतो तेव्हा दावीद जसा गल्याथसोबत लढला तसं नक्कीच आपण आपल्या विरोधकांसोबत लढत नाही. उलट लोकांना यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल शिकवण्याद्वारे आपण बऱ्‍याने वाइटाला जिंकतो. आणि हाच आपला उद्देश असला पाहिजे. तो साध्य करण्यासाठी आपण लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून देऊ शकतो, आणि आपल्याशी वाईट वागणाऱ्‍या लोकांसोबत आदराने व दयेने वागू शकतो. तसंच आपण सगळ्यांशीच, अगदी आपल्या विरोधकांशीसुद्धा चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करू शकतो.—मत्त. ५:४४; १ पेत्र ३:१५-१७.

इतर जण देत असलेली मदत स्वीकारा

१६-१७. पौल कोणती गोष्ट कधीच विसरला नाही?

१६ ख्रिस्ताचा शिष्य होण्याआधी प्रेषित पौल हा शौल या नावाने ओळखला जायचा. तो उद्धट होता, आणि येशूच्या शिष्यांचा छळ करायचा. (प्रे. कार्ये ७:५८; १ तीम. १:१३) तो जेव्हा ख्रिस्ती मंडळीचा छळ करत होता तेव्हा येशूने स्वतः त्याला तसं करण्यापासून रोखलं. येशू स्वर्गातून त्याच्याशी बोलला आणि त्याने त्याची दृष्टी काढून घेतली; त्यामुळे पौल अंधळा झाला. पौलला आपली दृष्टी परत मिळवण्यासाठी अशा लोकांची मदत घ्यावी लागली ज्यांचा त्याने पूर्वी छळ केला होता. हनन्या नावाच्या येशूच्या शिष्याने पौलला मदत करायची तयारी दाखवली, तेव्हा पौलने ती नम्रपणे स्वीकारली.—प्रे. कार्ये ९:३-९, १७, १८.

१७ पुढे पौलने ख्रिस्ती मंडळीत एक महत्त्वाची भूमिका निभावली. असं असलं तरी, दिमिष्कला जात असताना येशूने त्याला नम्रतेचा जो धडा शिकवला तो धडा पौल कधीच विसरला नाही. पुढेही तो नेहमी नम्र राहिला, आणि भाऊबहीण देत असलेली मदत त्याने आनंदाने स्वीकारली. आपले भाऊबहीण आपल्याला “धीर देणारे साहाय्यक आहेत,” ही गोष्ट त्याने मान्य केली.—कलस्सै. ४:१०, ११, तळटीप.

१८. काही वेळा इतरांकडून मदत स्वीकारायला आपण मागे-पुढे का पाहू?

१८ पौलच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? आपण सत्यात आलो तेव्हा सुरुवातीला कदाचित इतरांकडून शिकून घ्यायला आपण खूप उत्सुक होतो. कारण आध्यात्मिक दृष्टीने आपण तान्ह्या बाळासारखे होतो आणि आपल्याला अजून खूप काही शिकायचं होतं. (१ करिंथ. ३:१, २) पण आता आपली मनोवृत्ती कशी आहे? आपण जर बऱ्‍याच वर्षांपासून सत्यात असलो आणि आपल्याकडे भरपूर अनुभव असेल तर आपण कदाचित इतरांकडून मदत स्वीकारायला तयार नसू; खासकरून अशा व्यक्‍तीकडून जी आपल्यानंतर सत्यात आली आहे. पण यहोवा आपल्या भाऊबहिणींद्वारेच आपल्याला धीर आणि बळ देत असतो. (रोम. १:११, १२) त्यामुळे आपल्याला जर यहोवाकडून सामर्थ्य मिळवायचं असेल, तर भाऊबहिणींकडून मिळणारी मदत आपण आनंदाने स्वीकारली पाहिजे.

१९. यहोवाच्या सेवेत अनेक मोठ्या गोष्टी करणं पौलला कशामुळे शक्य झालं?

१९ ख्रिस्ती बनल्यानंतर पौलने यहोवाच्या सेवेत काही मोठी कामं केली. कशामुळे तो ही कामं करू शकला? कारण एक गोष्ट तो शिकला होता; ती म्हणजे एक व्यक्‍ती कोणत्या संस्कृतीची आहे, ती किती शिकलेली आहे, तिच्याकडे किती पैसा आहे किंवा ती किती ताकदवान आहे हे महत्त्वाचं नसतं. पण ती जर नम्र असेल आणि यहोवावर विसंबून राहत असेल, तर ती अनेक चांगल्या गोष्टी करू शकते. तेव्हा पौलसारखं आपण (१) यहोवावर विसंबून राहू या, (२) बायबलमध्ये दिलेल्या व्यक्‍तींच्या उदाहरणांतून शिकू या, आणि (३) आपले भाऊबहीण देत असलेली मदत स्वीकारू या. आपण जर असं केलं, तर यहोवा नक्कीच आपल्याला सामर्थ्यशाली करेल, मग आपल्याला कितीही कमजोर वाटत असलं तरीही.

गीत १७ साक्षीदारांनो, पुढे चला!

^ परि. 5 आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना अपमान सहन करावा लागतो, किंवा आपल्या कमतरतांमुळे आपल्याला कदाचित कमजोर वाटू शकतं. या लेखात आपण प्रेषित पौलच्या उदाहरणावर चर्चा करणार आहोत. तसंच, आपण नम्र असलो तर कठीण परिस्थितींचा सामना करण्यासाठी यहोवा आपल्याला कशा प्रकारे ताकद देईल, हेही आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 1 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: बऱ्‍याच कारणांमुळे आपल्याला कमजोर वाटू शकतं. जसं की, आपल्या अपरिपूर्णतेमुळे, गरिबीमुळे, आजारपणामुळे किंवा कमी शिक्षणामुळे. याशिवाय, जेव्हा लोक आपल्याला वाईटसाईट बोलतात किंवा आपल्याला मारहाण करतात तेव्हासुद्धा आपल्याला कमजोर झाल्यासारखं वाटू शकतं.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन: ख्रिस्ती बनण्याआधी पौल एक परूशी होता आणि परूश्‍यांकडे असणाऱ्‍या अनेक गोष्टी त्याच्याकडे होत्या; जसं की मानवी विचारधारेच्या गुंडाळ्या आणि कपाळावर बांधल्या जाणाऱ्‍या शास्त्राच्या लहान डब्या. पण ख्रिस्ताबद्दल प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर पौलने या सगळ्या गोष्टी मागे सोडून दिल्या.

^ परि. 61 चित्रांचं वर्णन: कामाच्या ठिकाणी एका व्यक्‍तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका बांधवाला त्याचे सोबती बोलवत आहेत.