व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३१

“खरा पाया असलेल्या शहराची” तुम्ही वाट पाहत आहात का?

“खरा पाया असलेल्या शहराची” तुम्ही वाट पाहत आहात का?

“खरा पाया असलेल्या शहराची तो वाट पाहत होता, ज्याची रचना व बांधकाम करणारा देव आहे.”—इब्री ११:१०.

गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!

सारांश *

१. अनेकांनी जीवनात कोणते त्याग केले आहेत, आणि का?

आज देवाच्या लाखो सेवकांनी आपल्या जीवनात अनेक त्याग केले आहेत. जसं की, बऱ्‍याच भाऊबहिणींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जोडप्यांनी काही काळासाठी मुलं न होऊ द्यायचं ठरवलं आहे. तर काही कुटुंबांनी एक साधं जीवन जगण्याची निवड केली आहे. या सगळ्यांनी एका महत्त्वाच्या कारणासाठी, म्हणजेच यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी असे निर्णय घेतले आहेत. यामुळे ते सगळे जीवनात खूप आनंदी आहेत. आणि ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्या सर्व गोष्टी यहोवा त्यांना पुरवेल यावर त्यांना पूर्ण भरवसा आहे. त्यांचा हा भरवसा व्यर्थ ठरेल का? मुळीच नाही! आपण हे इतकं ठामपणे का म्हणू शकतो? कारण प्राचीन काळात यहोवाने आपल्या सेवकांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. त्यांपैकी एक उदाहरण म्हणजे, विश्‍वास दाखवणाऱ्‍या सर्वांचा पिता, अब्राहाम.—रोम. ४:११.

२. (क) इब्री लोकांना ११:८-१०, १६ या वचनांनुसार अब्राहाम ऊर शहर सोडायला तयार का झाला? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं पाहणार आहोत?

अब्राहाम ऊर शहरात होता तेव्हा तो एक आरामदायी जीवन जगत होता. पण ते आरामदायी जीवन सोडून द्यायला तो आनंदाने तयार झाला. का? “कारण, खरा पाया असलेल्या शहराची तो वाट पाहत होता.” (इब्री लोकांना ११:८-१०, १६ वाचा.) ते “शहर” काय आहे? त्या शहराची वाट पाहत असताना अब्राहामला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? आपण अब्राहामकडून आणि आज आपल्या काळात ज्यांनी त्याचं अनुकरण केलं त्या भाऊबहिणींकडून काय शिकू शकतो?

खरा पाया असलेलं ‘शहर’ काय आहे?

३. अब्राहाम ज्या “शहराची” वाट पाहत होता ते काय आहे?

अब्राहाम ज्या शहराची वाट पाहत होता ते देवाचं राज्य आहे. हे राज्य येशू ख्रिस्त आणि १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेलं आहे. प्रेषित पौल या राज्याला “जिवंत देवाचे शहर, अर्थात स्वर्गीय यरुशलेम” असं म्हणतो. (इब्री १२:२२; प्रकटी. ५:८-१०; १४:१) याच राज्यासाठी प्रार्थना करायला येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं होतं. देवाचं हे राज्य यावं आणि देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायला त्याने त्यांना शिकवलं.—मत्त. ६:१०.

४. उत्पत्ति १७:१, २, ६ या वचनांनुसार वचन दिलेल्या “शहराची,” म्हणजेच देवाच्या राज्याची अब्राहामला कितपत माहिती होती?

देवाच्या राज्याबद्दलची एकूण एक माहिती अब्राहामला होती का? नाही. बायबल म्हणतं, की बऱ्‍याच शतकांपर्यंत ही माहिती एक “पवित्र रहस्य” होती. (इफिस. १:८-१०; कलस्सै. १:२६, २७) पण आपल्या संततीपैकी काही जण पुढे राजे होतील हे अब्राहामला पक्कं माहीत होतं. कारण यहोवाने त्याला तसं अभिवचनच दिलं होतं. (उत्पत्ति १७:१,२, वाचा.) देवाच्या अभिवचनांवर अब्राहामचा इतका विश्‍वास होता, की जो देवाच्या राज्याचा राजा होणार होता, त्या अभिषिक्‍ताला किंवा मसीहाला तो जणू प्रत्यक्ष पाहू शकत होता. आणि म्हणूनच येशू त्याच्या काळातल्या यहुद्यांना असं म्हणाला: “तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या आशेने खूप आनंदित झाला आणि त्याने तो पाहिला व त्याला आनंद झाला.” (योहा. ८:५६) यावरून एक गोष्ट स्पष्ट होते; ती म्हणजे, अब्राहामला हे पक्कं माहीत होतं, की आपल्या वंशजांपैकी काही जण देवाच्या राज्यात राज्य करतील. आणि यहोवा आपलं हे अभिवचन पूर्ण करेपर्यंत तो वाट पाहायला तयार होता.

अब्राहामने यहोवाच्या अभिवचनांवर विश्‍वास असल्याचं कसं दाखवलं? (परिच्छेद ५ पाहा)

५. देवाने रचना केलेल्या “शहराची” अब्राहाम वाट पाहत होता हे आपण कशावरून म्हणू शकतो?

देवाने ज्या “शहराची,” किंवा राज्याची रचना केली त्याची अब्राहाम वाट पाहत होता हे त्याने कसं दाखवून दिलं? एक म्हणजे, पृथ्वीवरच्या कोणत्याही राज्याचा तो नागरिक बनला नाही. तो कुठल्याही एका ठिकाणी स्थायिक झाला नाही. आणि कोणत्याही मानवी राजाला त्याने कधीही आपला पाठिंबा दिला नाही. तर, तो एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी प्रवास करत राहिला. याशिवाय, त्याने स्वतःचं राज्य उभं करण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. याउलट, तो यहोवाच्या आज्ञा पाळत राहिला आणि त्याचं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत राहिला. या सगळ्या गोष्टींतून अब्राहामने दाखवून दिलं, की त्याचा यहोवावर मजबूत विश्‍वास आहे. देवाचं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत असताना अब्राहामला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, आणि त्याच्या या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो, हे आता आपण पुढे पाहू या.

अब्राहामला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?

६. ऊर शहर कसं होतं?

अब्राहामने जे ऊर शहर सोडलं होतं ते बऱ्‍यापैकी सुरक्षित होतं. कारण त्या शहराच्या भोवती उंच, मजबूत भिंती होत्या आणि शहराच्या तीन बाजूंना पाण्याचा एक खोल कालवा होता. याशिवाय, त्या शहरात अनेक सुखसोयी होत्या. तिथले लोक बरेच श्रीमंत आणि शिकलेले होते. ते लिखाणात आणि गणितात तरबेज होते. तिथे सापडलेल्या लिखाणांवरून दिसून आलं, की ऊर शहर हे व्यापाराचं एक केंद्र असावं. तिथले लोक विटांनी बांधलेल्या पक्क्या घरांमध्ये राहायचे. घराच्या भिंतींना प्लास्टर करून त्यांना पांढरा रंग दिला जायचा. काही काही घरांना तर चारही बाजूंनी १३ ते १४ खोल्या असायच्या आणि मधोमध फरश्‍यांचं मोठं अंगण असायचं.

७. यहोवा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करेल असा भरवसा अब्राहामला का ठेवावा लागणार होता?

यहोवा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करेल असा भरवसा अब्राहामला ठेवावा लागणार होता. का? कारण ऊर शहरातलं आपलं सुरक्षित आणि आरामदायी घर सोडल्यानंतर अब्राहाम आणि सारा आता कनान देशात खुल्या मैदानांमध्ये तंबूंत राहत होते. तिथे आधीसारखं त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मजबूत भिंती आणि कालवे नव्हते. उलट, आता ते अशा परिस्थितीत राहत होते जिथे शत्रू सहज त्यांच्यावर हल्ला करू शकत होते.

८. अब्राहामसमोर कोणत्या अडचणी आल्या?

अब्राहाम नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे वागला. पण तरीसुद्धा त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या जीवनात अशी एक वेळ आली जेव्हा त्याला आपल्या कुटुंबाचं पोट भरणं मुश्‍कील गेलं. कारण ज्या देशात यहोवाने त्याला पाठवलं होतं त्याच देशात एक मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळ इतका भयंकर होता, की काही काळासाठी त्याला आपल्या कुटुंबाला घेऊन इजिप्तमध्ये राहायला जावं लागलं. पण तिथे गेल्यावरसुद्धा त्याला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. इजिप्तच्या राजाने, म्हणजे फारोने अब्राहामच्या पत्नीला स्वतःकडे ठेवून घेतलं. हे खरं आहे, की यहोवाने साराला फारोच्या हातून सोडवलं. पण तोपर्यंत अब्राहामला किती मनस्ताप झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो.—उत्प. १२:१०-१९.

९. अब्राहामच्या कौटुंबिक जीवनात कोणत्या समस्या निर्माण झाल्या?

अब्राहामच्या कौटुंबिक जीवनातसुद्धा काही गंभीर समस्या निर्माण झाल्या. त्याची पत्नी सारा हिला मूल होत नव्हतं. आणि या गोष्टीचं दुःख अनेक वर्षं त्यांच्या मनात होतं. आपल्याला मुलं असावीत म्हणून शेवटी साराने, आपली दासी हागार ही बायको म्हणून अब्राहामला दिली. पण आपण गरोदर आहोत हे समजल्यावर हागार साराला तुच्छ लेखू लागली. त्या दोघींमधले संबंध इतके बिघडले की शेवटी हागार घर सोडून पळून गेली.—उत्प. १६:१-६.

१०. इश्‍माएल आणि इसहाकच्या बाबतीत असं काय घडलं ज्यामुळे अब्राहामला यहोवावर भरवसा ठेवणं कठीण जाऊ शकलं असतं?

१० शेवटी सारा गरोदर राहिली आणि अब्राहामपासून तिला एक मुलगा झाला. अब्राहामने त्याचं नाव इसहाक ठेवलं. अब्राहामचं आपल्या दोन्ही मुलांवर, म्हणजे हागारपासून झालेल्या इश्‍माएलवर आणि इसहाकवर प्रेम होतं. पण इश्‍माएल इसहाकला छळत होता. त्यामुळे इश्‍माएला आणि हागारला घरातून घालवून देण्याशिवाय अब्राहामसमोर दुसरा पर्याय उरला नाही. (उत्प. २१:९-१४) पुढे अनेक वर्षांनंतर यहोवाने अब्राहामला इसहाकचं बलिदान द्यायला सांगितलं. (उत्प. २२:१, २; इब्री ११:१७-१९) या दोन्ही परिस्थितींत अब्राहामला हा भरवसा ठेवायचा होता, की यहोवाने त्याच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत जी अभिवचनं दिली होती ती तो नक्की पूर्ण करेल.

११. अब्राहामला धीराने वाट का पाहावी लागली?

११ अब्राहामच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. या संपूर्ण काळादरम्यान त्याला धीराने वाट पाहावी लागणार होती. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने ऊर शहर सोडलं तेव्हा तो ७० पेक्षा जास्त वर्षांचा असावा. (उत्प. ११:३१–१२:४) जवळपास १०० वर्षं त्याने कनान देशात प्रवास केला आणि तो ठिकठिकाणी तंबूंमध्ये राहिला. शेवटी १७५ वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाला. (उत्प. २५:७) पण जो कनान देश त्याच्या वंशजांना द्यायचं अभिवचन यहोवाने दिलं होतं, ते पूर्ण होताना त्याने पाहिलं नाही. आणि ज्या “शहराची,” म्हणजे देवाच्या राज्याची तो वाट पाहत होता ते स्थापन होईपर्यंत तो जिवंत राहिला नाही. पण तरीसुद्धा, अब्राहामबद्दल बायबल म्हणतं, की तो “म्हातारा होऊन सुखाने मरण पावला.” (उत्प. २५:८, NW) अब्राहामसमोर अनेक अडचणी आल्या, पण तरीसुद्धा त्याने यहोवावर आपला विश्‍वास टिकवून ठेवला. तसंच, यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होईपर्यंत तो धीराने वाट पाहत राहिला. अब्राहाम धीराने वाट का पाहू शकला? कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यात यहोवाने त्याचं संरक्षण केलं होतं आणि त्याला एका मित्रासारखं वागवलं होतं.—उत्प. १५:१; यश. ४१:८; याको. २:२२, २३.

अब्राहाम आणि सारा यांच्यासारखंच देवाचे सेवक विश्‍वास आणि धीर कसा दाखवतात? (परिच्छेद १२ पाहा) *

१२. आपण कशाची वाट पाहत आहोत, आणि या लेखात पुढे आपण काय पाहणार आहोत?

१२ अब्राहामसारखंच आपणसुद्धा खरा पाया असलेल्या शहराची वाट पाहत आहोत. फरक इतकाच आहे, की आपण ते स्थापन होण्याची वाट पाहत नाही. कारण १९१४ मध्येच देवाचं राज्य स्थापन झालं आणि स्वर्गात त्याचं शासन सुरूही झालं आहे. (प्रकटी. १२:७-१०) मग कोणत्या अर्थाने आपण त्या शहराची वाट पाहत आहोत? त्या ‘शहराने,’ म्हणजेच देवाच्या राज्याने पृथ्वीवर आपलं शासन सुरू करावं याची आपण वाट पाहत आहोत. पण देवाच्या राज्याची वाट पाहत असताना अब्राहाम आणि सारा यांच्यासाखंच आपल्यालासुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अब्राहाम आणि सारा यांच्याप्रमाणेच आज यहोवाच्या अनेक सेवकांनी त्याच्यावरचा आपला विश्‍वास टिकवून ठेवला आहे आणि धीराने वाट पाहिली आहे. असे बरेच अनुभव टेहळणी बुरूज  नियतकालिकात आपल्याला वाचायला मिळतात. त्यांपैकी काही अनुभवांवर आता आपण चर्चा करू या, आणि त्यांपासून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहू या.

ज्यांनी अब्राहामचं अनुकरण केलं त्यांचे अनुभव

बिल वॉल्डन यांनी जीवनात अनेक त्याग केले आणि त्यामुळे यहोवाकडून त्यांना बरेच आशीर्वाद मिळाले

१३. बंधू वॉल्डनच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो?

१३ जीवनात त्याग करायला तयार असा.  आपल्याला जर त्या ‘शहराला,’ म्हणजेच देवाच्या राज्याला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं असेल, तर आपण अब्राहामचं अनुकरण केलं पाहिजे. देवाचं मन आनंदित करण्यासाठी त्याच्यासारखंच आपणही जीवनात त्याग करायला तयार असलं पाहिजे. (मत्त. ६:३३; मार्क १०:२८-३०) या बाबतीत बिल वॉल्डन नावाच्या एका बांधवाचं उदाहरण विचारात घ्या. * बिल हे अमेरिकेतल्या एका युनिव्हर्सिटीतून सिविल इंजिनियरिंग करत होते. आणि १९४२ साली त्यांचं हे शिक्षण पूर्ण होणार होतं. त्याच काळात, त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला होता. बिलच्या एका प्रोफेसरने आधीच त्यांच्यासाठी एक नोकरी पाहून ठेवली होती. पण बिलने ती नाकारली. त्यांनी आपल्या प्रोफेसरला सांगितलं, की मोठ्या पगाराची नोकरी करण्याऐवजी त्यांनी देवाची जास्तीत जास्त सेवा करायचं ठरवलं आहे. त्याच्या काही काळानंतरच सरकारने बिलला सैन्यात भरती व्हायला सांगितलं. पण बिलने आदराने नकार दिला. त्यामुळे त्यांना १०,००० डॉलर दंड भरावा लागला आणि पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण तीन वर्षांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. पुढे त्यांना गिलियड प्रशालेचं आमंत्रण मिळालं आणि त्यांनी आफ्रिकेत मिशनरी म्हणून सेवा केली. मग त्यांनी ईवा नावाच्या बहिणीशी लग्न केलं आणि त्या दोघांनी मिळून आफ्रिकेत सेवा केली. त्यासाठी त्यांना बरेच त्याग करावे लागले. पुढे अनेक वर्षांनंतर बिलच्या आईची काळजी घेण्यासाठी त्यांना परत अमेरिकेत यावं लागलं. आपल्या आयुष्याबद्दल बोलताना बिल म्हणतात: “७० पेक्षा जास्त वर्षं यहोवाची सेवा करण्याचा किती मोठा बहुमान मला मिळाला, याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू येतात. आयुष्यभर त्याची सेवा करायचं करिअर निवडायला यहोवाने मला मदत केली त्याबद्दल मी नेहमी त्याचे आभार मानतो.” तुम्हीसुद्धा पूर्ण-वेळची सेवा करायचं करिअर निवडाल का?

एलिनी आणि आरीस्टॉटलीस आपॉस्टोलीडीस यांनी यहोवाकडून मिळणारं बळ अनुभवलं

१४-१५. एका जोडप्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१४ जीवनात कोणत्याच समस्या येणार नाहीत असा विचार करू नका.  अब्राहामच्या उदाहरणातून एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, जे लोक आपलं संपूर्ण आयुष्य यहोवाची सेवा करण्यासाठी देतात त्यांनासुद्धा समस्यांचा सामना करावा लागतो. (याको. १:२; १ पेत्र ५:९) आरीस्टॉटलीस आपॉस्टोलीडीस नावाच्या बांधवाचंच उदाहरण विचारात घ्या. * त्यांचा बाप्तिस्मा १९४६ साली ग्रीसमध्ये झाला होता. आणि १९५२ मध्ये एलिनी नावाच्या बहिणीशी त्यांचं लग्न ठरलं. त्या दोघांनाही एकत्र मिळून यहोवाची जास्तीत जास्त सेवा करायची होती. पण एकदा एलिनी आजार पडली आणि तिच्या मेंदूत गाठ (ब्रेन ट्यूमर) असल्याचं त्यांना समजलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती गाठ काढली. पण लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच एलिनीच्या मेंदूत परत गाठ झाली. ती काढण्यासाठी डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन केलं. या वेळी मात्र एलिनीच्या शरीराच्या एका बाजूला लकवा मारला. आणि त्यामुळे ती आता नीट बोलू शकत नव्हती. पण इतका मोठा आजार असूनही, आणि त्या वेळी आपल्या कार्यावर बंदी असूनही एलिनी आवेशाने यहोवाची सेवा करत राहिली.

१५ बंधू आरीस्टॉटलीस यांनी ३० वर्षं आपल्या पत्नीची काळजी घेतली. या काळात त्यांनी मंडळीत वडील म्हणून सेवा केली, अधिवेशन समितींमध्ये काम केलं आणि संमेलनगृहं बांधण्यात हातभार लावला. मग १९८७ साली एलिनी प्रचारकार्य करत असताना तिच्यासोबत एक दुर्घटना घडली. त्यामुळे तीन वर्षं ती कोमात होती आणि शेवटी तिचा मृत्यू झाला. आपल्या जीवनात घडलेल्या या घटनांबद्दल बंधू आरीस्टॉटलीस असं म्हणतात: “गेलेल्या वर्षांत अनेक परीक्षा, कठीण आव्हाने आली आणि अनेक अनपेक्षित घटना घडल्या; या प्रसंगांना तोंड देताना असाधारण मनोबल बाळगण्याची आणि धीर धरण्याची गरज होती. पण यहोवाने सर्व समस्यांवर मात करण्यासाठी मला नेहमी सामर्थ्य पुरवले.” (स्तो. ९४:१८, १९) समस्या असतानाही जे यहोवाची सेवा करत राहण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात अशांवर यहोवा खूप प्रेम करतो.

ऑड्री हाईड या बहिणीने नेहमी आपली आशा डोळ्यांपुढे ठेवली

१६. बंधू नॉर यांनी आपल्या पत्नीला कोणता चांगला सल्ला दिला?

१६ आपल्या आशेबद्दल विचार करत राहा.  यहोवाने अब्राहामला भविष्यात जे आशीर्वाद द्यायचं अभिवचन दिलं होतं, त्या आशीर्वादांवर अब्राहाम नेहमी विचार करत राहिला. त्यामुळे त्याच्यासमोर आलेल्या समस्यांचा तो यशस्वीपणे सामना करू शकला. ऑड्री हाईड नावाच्या बहिणीनेसुद्धा हेच केलं. त्यांचे पहिले पती बंधू नेथन एच. नॉर यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. पुढे त्यांचे दुसरे पती बंधू ग्लेन हाईड यांना स्मृतिभ्रंशाचा, म्हणजे अल्झायमर्सचा आजार झाला. * पण बहिणीच्या पहिल्या पतीने, म्हणजे बंधू नॉरने आपल्या मृत्यूच्या आधी त्यांना जे काही सांगितलं होतं त्यामुळे त्यांना हे दुःख झेलायला खूप मदत झाली. त्या म्हणतात: “नेथन यांनी मला आठवण करून दिली: ‘मृत्यूनंतर आपली आशा पक्की होते आणि आपल्याला पुन्हा कधीही दुःख सहन करावं लागणार नाही.’ मग मला आर्जवत ते म्हणाले: ‘भविष्याकडे पाहा. कारण तुझं प्रतिफळ तिथं आहे.’ . . . पुढं ते म्हणाले: ‘इतरांसाठी काही करत राहण्यासाठी आपल्या जीवनाचा उपयोग करत राहण्यात व्यस्त राहा. यामुळे तुला जगण्यातला आनंद मिळेल.’” खरंच, इतरांचं भलं करण्यात स्वतःला व्यस्त ठेवण्याचा आणि आपल्या “आशेमुळे” आनंदी राहण्याचा हा किती चांगला सल्ला आहे!—रोम. १२:१२.

१७. (क) भविष्यातल्या आपल्या आशेबद्दल विचार करत राहण्याची कोणती कारणं आज आपल्याकडे आहेत? (ख) मीखा ७:७ या वचनात सांगितलेली कोणती गोष्ट केल्यामुळे भविष्यातले आशीर्वाद अनुभवायला आपल्याला मदत होईल?

१७ भविष्यातल्या आपल्या आशेबद्दल विचार करत राहण्याची कितीतरी कारणं आज आपल्याकडे आहेत. जगातल्या घडामोडी स्पष्टपणे दाखवून देतात, की आपण शेवटल्या काळाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. आपल्याला आणखी वाट पाहावी लागणार नाही. लवकरच ‘खरा पाया असलेलं शहर,’ म्हणजेच देवाचं राज्य या पृथ्वीवर शासन करू लागेल. तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. त्यांपैकी एक म्हणजे, आपल्या प्रिय जनांना पुन्हा जिवंत केलं जाईल. त्या वेळी यहोवा अब्राहामलाही त्याच्या विश्‍वासाचं आणि धीराचं प्रतिफळ देईल. यहोवा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुन्हा जिवंत करेल. त्यांचं स्वागत करायला तुम्ही तिथे असाल का? अब्राहामसारखंच तुम्ही जर देवाच्या राज्यासाठी जीवनात त्याग करायला तयार असाल, समस्या असतानाही यहोवाला विश्‍वासू राहाल आणि देवाच्या राज्याची धीराने वाट पाहात राहाल, तर त्यांचं स्वागत करायला तुम्ही नक्कीच तिथे असाल!—मीखा ७:७ वाचा.

गीत २८ नवे गीत

^ परि. 5 देवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होण्याची वाट पाहत असताना, कधीकधी आपल्याला धीर धरणं कठीण जाऊ शकतं, किंवा आपला विश्‍वास कमजोर होऊ शकतो. पण धीराने वाट पाहण्याच्या बाबतीत अब्राहामने आणि आजच्या काळातल्या देवाच्या काही सेवकांनी खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे. देवाची अभिवचनं पूर्ण होण्याची वाट पाहत असताना धीर धरायला ही उदाहरणं आपल्याला कशी मदत करू शकतात याची चर्चा या लेखात केली जाईल.

^ परि. 14 बंधू आपॉस्टोलीडीस यांची जीवन कथा १ फेब्रुवारी २००२ च्या टेहळणी बुरूज  अंकात पृष्ठं २४-२८ वर दिली आहे.

^ परि. 16 बहीण ऑड्री हाईड यांची जीवन कथा १ जुलै २००४ च्या टेहळणी बुरूज  अंकात पृष्ठं २३-२९ वर दिली आहे.

^ परि. 56 चित्राचं वर्णन : जीवनात समस्या असतानाही एक वयस्कर जोडपं विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहे. भविष्यात यहोवाकडून मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर विचार करून ते आपला विश्‍वास मजबूत ठेवतात.