व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३५

यहोवाच्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीचा आदर करा

यहोवाच्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीचा आदर करा

“डोळा हाताला म्हणू शकत नाही, की ‘मला तुझी गरज नाही,’ किंवा डोके पायांना म्हणू शकत नाही, की ‘मला तुमची गरज नाही.’”—१ करिंथ. १२:२१.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

सारांश *

१. यहोवाचा प्रत्येक सेवक त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे, हे त्याने कसं दाखवलं आहे?

यहोवाने त्याच्या प्रत्येक सेवकाला मंडळीत एक महत्त्वाचं स्थान दिलं आहे. मंडळीतला हरेक सदस्य एक वेगळी भूमिका निभावत असला, तरी प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच एकमेकांची गरज आहे. हीच गोष्ट समजून घ्यायला प्रेषित पौल आपल्याला मदत करतो. ते कसं?

२. इफिसकर ४:१६ या वचनात सांगितल्यानुसार एकमेकांचा आदर करणं आणि एकत्र मिळून काम करणं का गरजेचं आहे?

या लेखाच्या मुख्य वचनात सांगितल्याप्रमाणे पौलने हे स्पष्ट केलं, की यहोवाचा कोणताही सेवक दुसऱ्‍या सेवकाबद्दल “मला तुझी गरज नाही,” असा विचार करू शकत नाही. (१ करिंथ. १२:२१) मंडळीतली शांती टिकून राहावी अशी आपली इच्छा असेल तर आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि सोबत मिळून काम केलं पाहिजे. (इफिसकर ४:१६ वाचा.) अशा प्रकारे एकत्र काम केल्यामुळे भाऊबहिणींचं आपसातलं प्रेम वाढेल आणि मंडळी मजबूत होईल.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आपण कशा प्रकारे आपल्या भाऊबहिणींचा आदर करू शकतो? या लेखात सुरुवातीला आपण हे पाहू, की मंडळीतले वडील एकमेकांचा आदर कसा करू शकतात. मग आपण हे पाहू, की आपण सगळेच मंडळीतल्या अविवाहित भाऊबहिणींचा आदर कसा करू शकतो. आणि शेवटी आपण यावर चर्चा करू, की ज्यांना आपली भाषा नीट बोलता येत नाही त्यांचा आपण आदर कसा करू शकतो.

मंडळीतले वडील एकमेकांचा आदर कसा करू शकतात?

४. रोमकर १२:१० मध्ये दिलेल्या कोणत्या सल्ल्याचं वडिलांनी पालन केलं पाहिजे?

मंडळीतल्या सगळ्या वडिलांना यहोवाच्या पवित्र आत्म्याने नियुक्‍त केलं जातं. पण तरीही प्रत्येकाची कौशल्यं आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. (१ करिंथ. १२:१७, १८) काहींना अलीकडेच वडील म्हणून नेमण्यात आलेलं असतं, आणि त्यामुळे बाकीच्या वडिलांइतका त्यांना फारसा अनुभव नसतो. तर असेही काही वडील असतात ज्यांना वाढत्या वयामुळे आणि आरोग्याच्या समस्यांमुळे जास्त काही करता येत नाही. असं असलं तरी कोणत्याही वडिलाने दुसऱ्‍या वडिलाबद्दल असा विचार करू नये की, “मला तुमची गरज नाही.” याउलट, प्रत्येक वडिलाने रोमकर १२:१० या वचनात दिलेल्या पौलच्या सल्ल्याप्रमाणे वागलं पाहिजे.—वाचा.

मंडळीतले वडील एकमेकांचं लक्ष देऊन ऐकतात तेव्हा ते एकमेकांबद्दल आदर असल्याचं दाखवतात (परिच्छेद ५-६ पाहा)

५. मंडळीतले वडील एकमेकांचा आदर करतात हे ते कसं दाखवू शकतात, आणि त्यांनी असं करणं का महत्त्वाचं आहे?

मंडळीतले वडील एकमेकांचा आदर करतात, हे ते कसं दाखवू शकतात? एकमेकांचं लक्षपूर्वक ऐकून. खासकरून, एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी ते सगळे एकत्र येतात तेव्हा. याबद्दल १ ऑक्टोबर १९८८ च्या टेहळणी बुरूज  (इंग्रजी) अंकात काय म्हटलं आहे त्याकडे लक्ष द्या: “मंडळीतले वडील हे ओळखतात, की एखादी समस्या हाताळण्यासाठी किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी ते सर्व एकत्र येतात तेव्हा येशू पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यापैकी कोणत्याही वडिलाला बायबलमधलं एखादं तत्त्व किंवा सल्ला सांगण्यासाठी मदत करू शकतो. (प्रे. कार्ये १५:६-१५) पवित्र आत्मा सगळ्याच वडिलांना मदत करतो, फक्‍त एकाला नाही.”

६. मंडळीतले वडील एकत्र मिळून काम कसं करू शकतात, आणि यामुळे मंडळीला कसा फायदा होतो?

जो वडील इतर वडिलांचा आदर करतो तो वडिलांच्या सभेत नेहमी पहिलं बोलायची घाई करत नाही. तो स्वतःच बोलत राहत नाही, तर इतर वडिलांनाही बोलायची संधी देतो. आणि ‘मी जे म्हणतो तेच खरंय’ असा तो विचार करत नाही. याउलट, तो आपलं मत नम्रपणे मांडतो. तसंच, तो इतर वडिलांचं म्हणणंही लक्ष देऊन ऐकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इतर वडिलांशी चर्चा करताना तो बायबलच्या तत्त्वांकडे आणि विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने दिलेल्या मार्गदर्शनाकडे सगळ्यांचं लक्ष वेधतो. (मत्त. २४:४५-४७) अशा प्रकारे जर वडील एकमेकांशी प्रेमळपणे वागले आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला, तर देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर राहील. आणि तो त्यांना असे निर्णय घ्यायला मदत करेल ज्यांमुळे मंडळी मजबूत होईल.—याको. ३:१७, १८.

आपण अविवाहित भाऊबहिणींचा आदर कसा करू शकतो?

७. येशूने अविवाहित लोकांबद्दल कसा विचार केला?

ख्रिस्ती मंडळीत विवाहित जोडपी आणि कुटुंबं तर आहेतच, पण त्यासोबत असे अनेक भाऊबहीण आहेत ज्याचं लग्न झालेलं नाही. अशा अविवाहित भाऊबहिणींबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे? त्यांच्याबद्दल येशूने जसा विचार केला तसाच आपणही केला पाहिजे. येशूने अविवाहित राहून सेवाकार्य पूर्ण करण्यावर आपलं लक्ष लावलं आणि त्यासाठी आपला वेळ दिला. ख्रिस्ती बनण्यासाठी एखाद्याने लग्न केलं पाहिजे किंवा त्याने अविवाहित राहिलं पाहिजे असं कधीच त्याने शिकवलं नाही. पण काही ख्रिस्ती लग्न न करण्याचा निर्णय घेतील हे मात्र येशू म्हणाला होता. (मत्त. १९:११, १२; मत्तय १९:१२ या वचनासाठी असलेली हिंदी ‘अध्ययन नोट’ पाहा.) येशूने अविवाहित लोकांचा आदर केला. लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत ते कमी महत्त्वाचे आहेत किंवा त्यांचं जीवन अपूर्ण आहे असा त्याने विचार केला नाही.

८. १ करिंथकर ७:७-९ या वचनांनुसार पौलने ख्रिश्‍चनांना काय प्रोत्साहन दिलं?

येशूप्रमाणेच प्रेषित पौलनेसुद्धा अविवाहित राहून यहोवाची सेवा केली. पण एखाद्या ख्रिश्‍चनाने लग्न करणं चुकीचं आहे असं त्याने कधीच शिकवलं नाही. कारण हा प्रत्येकाचा वैयक्‍तिक निर्णय आहे हे त्याला माहीत होतं. असं असलं तरीही त्याने ख्रिश्‍चनांना अविवाहित राहून यहोवाची सेवा करण्याचं प्रोत्साहन दिलं. (१ करिंथकर ७:७-९ वाचा.) यावरून दिसून येतं, की पौलने अविवाहित लोकांना कमी लेखलं नाही. उलट मोठमोठ्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी त्याने एका अविवाहित बांधवाला, म्हणजेच तीमथ्यला निवडलं. * (फिलिप्पै. २:१९-२२) यावरून स्पष्ट होतं, की एखाद्या बांधवाला जबाबदारी सोपवताना त्याचं लग्न झालं आहे की नाही याचा विचार करणं चुकीचं ठरेल.—१ करिंथ. ७:३२-३५, ३८.

९. लग्न करण्याच्या बाबतीत आणि अविवाहित राहण्याच्या बाबतीत आपण कसा विचार केला पाहिजे?

ख्रिश्‍चनांनी लग्न केलं पाहिजे किंवा त्यांनी अविवाहित राहिलं पाहिजे असं येशूने आणि प्रेषित पौलने कधीच शिकवलं नाही. मग, लग्न करण्याच्या बाबतीत आणि अविवाहित राहण्याच्या बाबतीत आपण कसा विचार केला पाहिजे? या प्रश्‍नाचं उत्तर १ ऑक्टोबर २०१२ च्या टेहळणी बुरूज  (इंग्रजी) अंकात मिळतं. त्यात असं म्हटलं आहे: “खरंच, लग्न करणं आणि अविवाहित राहणं या दोन्ही गोष्टी देवाकडून मिळालेल्या देणग्या आहेत . . . . आपलं लग्न झालं नाही म्हणून अविवाहित जणांना लाज वाटावी किंवा त्यांनी दुःखी व्हावं अशी यहोवाची इच्छा नाही.” ही गोष्ट लक्षात घेऊन आपण मंडळीतल्या अविवाहित भाऊबहिणींचा आदर केला पाहिजे.

अविवाहित भाऊबहिणींच्या भावनांची आपल्याला कदर असेल तर आपण काय करणार नाही? (परिच्छेद १० पाहा)

१०. अविवाहित भाऊबहिणींबद्दल आपल्याला आदर असेल तर आपण काय करणार नाही?

१० आपल्याला अविवाहित भाऊबहिणींच्या भावनांची कदर आहे आणि त्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे हे आपण कसं दाखवू शकतो? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की काही ख्रिश्‍चनांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि इतरही असे भाऊबहीण आहेत ज्यांना लग्न तर करायचं आहे, पण त्यांना योग्य जोडीदार मिळत नसेल. तर असेही काही आहेत ज्यांच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यामुळे ते एकटे असतील. परिस्थिती कोणतीही असो, या भाऊबहिणींना असं विचारणं योग्य ठरेल का, की ‘तुम्ही लग्न का केलं नाही?’ किंवा ‘आम्ही तुमच्यासाठी स्थळ शोधावं का?’ त्यांनी जर स्वतःहून मदत मागितली असेल तर ठीक आहे. पण मदत मागितलेली नसतानाही तुम्ही त्यांना स्थळं सुचवली तर त्यांना कसं वाटेल? (१ थेस्सलनी. ४:११; १ तीम. ५:१३) यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या काही अविवाहित भाऊबहिणींनी या बाबतीत काय म्हटलं ते आता आपण पाहू.

११-१२. काही वेळा आपल्याकडून अविवाहित जणांच्या भावना कशा दुःखावल्या जाऊ शकतात?

११ सर्वातआधी, एका अविवाहित विभागीय पर्यवेक्षकाने काय म्हटलं ते आपण पाहू या. हा बांधव आपली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करतो. त्याच्या मते अविवाहित राहण्याचे अनेक फायदे आहेत. पण जेव्हा भाऊबहीण मदत करण्याच्या हेतूने त्याला असं विचारतात की ‘तुम्ही लग्न का केलं नाही?’ तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. बेथेलमध्ये काम करणाऱ्‍या आणखी एका अविवाहित बांधवाने असं म्हटलं: “कधी कधी मला असं वाटतं, की मंडळीतल्या काही भाऊबहिणींना अविवाहित भाऊबहिणींची दया येते. त्यामुळे अविवाहित राहणं एक आशीर्वाद नाही, तर समस्या आहे असं वाटू शकतं.”

१२ बेथेलमध्ये काम करणारी एक अविवाहित बहीण म्हणते: “काही भाऊबहिणींना असं वाटतं, की सगळेच अविवाहित जण जोडीदाराच्या शोधात असतात. ते असाही विचार करतात, की अविवाहित जण जेव्हा चारचौघांत असतात तेव्हा ते जोडीदारच शोधत असतात. एकदा मी बेथेलच्या काही कामानिमित्त दुसऱ्‍या देशात गेले होते. मी तिथे पोचले त्या दिवशी संध्याकाळी सभा होती. मी ज्या बहिणीच्या घरी थांबले होते तिने मला सांगितलं की तिच्या मंडळीत माझ्याच वयाचे दोन बांधव आहेत. पुढे तिने असंही म्हटलं की ‘मी काय तुझं जमवून वगैरे देत नाही.’ पण मग सभागृहात पोचताच ती मला सरळ त्या दोन बांधवांना भेटायला घेऊन गेली. त्या वेळी आम्हा तिघांना किती अवघडल्यासारखं झालं असेल, याचा विचार करा.”

१३. एका अविवाहित बहिणीला कोणामुळे प्रोत्साहन मिळालं?

१३ बेथेलमध्ये सेवा करणारी आणखी एक अविवाहित बहीण असं म्हणते: “मी अशा काही पायनियरांना ओळखते, जे अनेक वर्षांपासून अविवाहित राहिले आहेत आणि विश्‍वासात टिकून आहेत. ते आपली ध्येयं नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवतात. ते इतरांना मदत करायला नेहमी तयार असतात. त्यामुळे ते खूप आनंदी असतात. असे भाऊबहीण मंडळीसाठी एक आशीर्वादच आहेत. आपण अविवाहित आहोत म्हणून आपण कोणीतरी खास आहोत, असा ते विचार करत नाहीत. किंवा मग, आपल्याला जोडीदार किंवा मुलंबाळं नाहीत म्हणून आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे, असाही ते विचार करत नाहीत. अशा प्रकारे ते आपल्या अविवाहित स्थितीबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवतात.” खरंच, ज्या मंडळीत सगळे जण एकमेकांचा आदर करतात, एकमेकांच्या भावनांची कदर करतात अशा मंडळीचा भाग असणं ही आपल्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे! कारण आपल्याला माहीत असतं, की मंडळीतले भाऊबहीण आपली कीव करत नाहीत, आपल्यावर जळत नाहीत, आपल्याला टाळत नाहीत, किंवा तुम्ही इतरांपेक्षा खूप खास आहात असाही ते आपल्याबद्दल विचार करत नाहीत. उलट, ते आपल्यावर खूप प्रेम करतात.

१४. आपण आपल्या अविवाहित भाऊबहिणींचा आदर करतो हे त्यांना कसं जाणवेल?

१४ आपले काही भाऊबहीण अविवाहित आहेत म्हणून त्यांची कीव करण्याऐवजी आपण त्यांच्या चांगल्या गुणांची कदर केली पाहिजे. ते विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत याबद्दल जर आपण त्यांची प्रशंसा केली, तर त्यांना किती बरं वाटेल! त्यामुळे आपल्या अविवाहित भाऊबहिणींना असं कधीच वाटणार नाही की इतरांना आपली गरज नाही. (१ करिंथ. १२:२१) उलट, मंडळीतले सगळे जण आपला आदर करतात आणि मंडळीत आपलं एक महत्त्वाचं स्थान आहे हे त्यांना जाणवेल.

ज्यांना आपली भाषा नीट बोलता येत नाही त्यांचा आपण आदर कसा करू शकतो?

१५. आपली सेवा वाढवण्यासाठी बऱ्‍याच भाऊबहिणींनी जीवनात कोणते फेरबदल केले आहेत?

१५ अलीकडच्या काही वर्षांत, बऱ्‍याच भाऊबहिणींनी आपली सेवा वाढवण्यासाठी एक नवीन भाषा शिकायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांना आपल्या जीवनात बरेच फेरबदल करावे लागले. प्रचारकांची जास्त गरज असलेल्या आणि एका वेगळ्या भाषेच्या मंडळीत जाऊन सेवा करण्यासाठी त्यांना आपल्या भाषेची मंडळी सोडावी लागली. (प्रे. कार्ये १६:९) यहोवाची जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलेला असतो. नवीन भाषा चांगल्या प्रकारे शिकून घ्यायला त्यांना कदाचित बरीच वर्षं लागू शकतात. पण या संपूर्ण काळात ते वेगवेगळ्या मार्गांनी मंडळीला मदत करत असतात. त्यांच्या चांगल्या गुणांमुळे आणि अनुभवामुळे मंडळीतले भाऊबहीण विश्‍वासात आणखी मजबूत होतात. जीवनात अनेक त्याग करणाऱ्‍या अशा भाऊबहिणींची आपण मनापासून कदर करतो.

१६. एखादा बांधव वडील किंवा सहायक सेवक बनण्यासाठी योग्य आहे की नाही हे कशाच्या आधारावर वडील ठरवतात?

१६ वडिलांनी असा विचार करू नये, की एखाद्या बांधवाला मंडळीत बोलली जाणारी भाषा नीट येत नाही म्हणून तो वडील किंवा सहायक सेवक बनू शकत नाही. याउलट, या जबाबदाऱ्‍यांसाठी बायबलमध्ये ज्या पात्रता दिल्या आहेत त्यांच्या आधारावर वडिलांनी निर्णय घ्यावा.—१ तीम. ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९.

१७. एका नवीन देशात राहायला गेल्यावर ख्रिस्ती कुटुंबांसमोर कोणते प्रश्‍न उभे राहू शकतात?

१७ काही ख्रिस्ती कुटुंबांना युद्धामुळे, दुष्काळामुळे, नोकरी नसल्यामुळे किंवा यांसारख्या इतर समस्यांमुळे आपला देश सोडून दुसऱ्‍या देशात राहायला जावं लागतं. म्हणून मग त्यांच्या मुलांना त्या देशातल्या भाषेतून शिक्षण घ्यावं लागतं. तसंच, आईवडिलांनाही नोकरी मिळवण्यासाठी तिथली भाषा शिकावी लागते. त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या भाषेतली एखादी मंडळी किंवा गट आहे का? असेल, तर त्यांनी कोणत्या मंडळीत गेलं पाहिजे? त्या देशातल्या भाषेच्या मंडळीत, की स्वतःच्या भाषेतल्या मंडळीत?

१८. गलतीकर ६:५ या वचनात सांगितल्याप्रमाणे कुटुंबप्रमुख जो काही निर्णय घेईल त्याचा आपण आदर कसा करू शकतो?

१८ आपल्या कुटुंबाने कोणत्या भाषेच्या मंडळीत जावं हा निर्णय कुटुंबप्रमुखाने घेतला पाहिजे. हे ठरवताना, आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणत्या भाषेची मंडळी योग्य राहील, याचा त्याने विचार करावा. (गलतीकर ६:५ वाचा.) हा एक वैयक्‍तिक निर्णय असल्यामुळे कुटुंबप्रमुख जो काही निर्णय घेईल त्याचा आपण आदर केला पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? त्या कुटुंबाचं आपल्या मंडळीत स्वागत करून आणि त्यांच्याशी प्रेमाने वागून.—रोम. १५:७.

१९. कुटुंबप्रमुखाने कोणत्या गोष्टीचा प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे?

१९ आणखी एका परिस्थितीचा विचार करा. काही कुटुंबं कदाचित अशा मंडळीत सेवा करत असतील जिथे त्यांची स्वतःची भाषा बोलली जाते. पालकांना जरी ती भाषा येत असली, तरी त्यांच्या मुलांना मात्र ती चांगली येत नसेल. कारण कदाचित त्यांचं शिक्षण ते राहत असलेल्या देशात बोलल्या जाणाऱ्‍या भाषेतून झालेलं असेल. त्यामुळे मुलं जरी स्वतःच्या भाषेच्या मंडळीत जात असली, तरी त्यांना सभांमधून जास्त फायदा होत नसेल आणि त्यांची आध्यात्मिक प्रगतीही होत नसेल. अशा वेळी, आपल्या मुलांना यहोवासोबत आणि मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत मैत्री करता यावी म्हणून काय करणं योग्य ठरेल याचा कुटुंबप्रमुखांनी प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. ते एकतर आपल्या मुलांना त्यांची स्वतःची भाषा चांगली शिकवू शकतात, किंवा मग मुलांना जी भाषा चांगली समजते त्या भाषेच्या मंडळीत जाण्याचा विचार करू शकतात. कुटुंबप्रमुख ज्या कोणत्या मंडळीत जायचं ठरवेल, तिथल्या भाऊबहिणींनी त्यांच आणि त्याच्या कुटुंबाचं मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे.

ज्यांना आपली भाषा नीट बोलता येत नाही त्यांचा आपण आदर कसा करू शकतो? (परिच्छेद २० पाहा)

२०. नवीन भाषा शिकणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींचा आपण आदर कसा करू शकतो?

२० आपण आतापर्यंत पाहिलं, की आपल्या मंडळ्यांमध्ये असे अनेक भाऊबहीण असतील जे नवीन भाषा शिकून घ्यायला खूप मेहनत घेत आहेत. त्यांना आपले विचार व्यक्‍त करणं कठीण जात असेल. पण ते नवीन भाषा कशा प्रकारे बोलतात याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचं यहोवावर किती प्रेम आहे आणि त्याची सेवा करण्यासाठी ते किती मेहनत घेत आहेत, याकडे लक्ष द्या. आपण त्यांचे हे चांगले गुण पाहिले, तर आपल्याला त्यांचा खूप आदर वाटेल आणि आपण त्यांची मनापासून कदर करू. त्यांना आपली भाषा नीट बोलता येत नाही, म्हणून ‘आम्हाला तुमची गरज नाही,’ असा आपण त्यांच्याबद्दल कधीच विचार करणार नाही.

आपण सगळेच यहोवासाठी महत्त्वाचे आहोत

२१-२२. आपल्याला कोणता बहुमान मिळाला आहे?

२१ यहोवाने त्याच्या मंडळीत आपल्यापैकी प्रत्येकाला एक महत्त्वाचं स्थान दिलं आहे, आणि हा आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे. आपण स्त्री असो किंवा पुरूष, आपलं लग्न झालेलं असो किंवा नसो, आपण तरुण असो किंवा वृद्ध, एखादी भाषा आपल्याला चांगली येत असो किंवा नसो, आपण सगळेच यहोवासाठी आणि एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहोत.—रोम. १२:४, ५; कलस्सै. ३:१०, ११.

२२ प्रेषित पौलने मानवी शरीराचं जे उदाहरण दिलं त्यातून आपण बरेच चांगले धडे शिकलो. ते धडे आपण आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करत राहू या. त्यामुळे यहोवाच्या मंडळीत आपलं महत्त्वाचं स्थान आहे हे ओळखायला आणि मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीचा आदर करायला आपल्याला मदत होईल.

गीत ५३ ऐक्य जपू या

^ परि. 5 यहोवाचे लोक वेगवेगळ्या संस्कृतींतले आहेत आणि मंडळीत ते वेगवेगळ्या भूमिका पार पाडतात. यहोवाच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा आदर करणं महत्त्वाचं का आहे, हे समजायला हा लेख आपल्याला मदत करेल.

^ परि. 8 तीमथ्यने कधीच लग्न केलं नाही असं आपण निश्‍चितपणे म्हणू शकत नाही.