व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३६

बायबल विद्यार्थ्यांनो, तुम्ही प्रचारक बनायला तयार आहात का?

बायबल विद्यार्थ्यांनो, तुम्ही प्रचारक बनायला तयार आहात का?

“घाबरू नकोस; कारण आतापासून तू जिवंत माणसं धरणारा होशील.”—लूक ५:१०.

गीत ३३ वैऱ्‍यांना भिऊ नको!

सारांश *

१. येशूने मासे धरणाऱ्‍यांना कोणतं आमंत्रण दिलं, आणि त्यांनी कसा प्रतिसाद दिला?

पेत्र, अंद्रिया, याकोब आणि योहान या येशूच्या शिष्यांचा मासेमारीचा व्यवसाय होता. येशूने जेव्हा त्यांना म्हटलं: “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन,” * तेव्हा त्यांना किती आश्‍चर्य वाटलं असेल याची कल्पना करा. येशूच्या या आमंत्रणाला त्यांनी कसा प्रतिसाद दिला? बायबल म्हणतं: “हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.” (मत्त. ४:१८-२२) त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलं. तिथून पुढे ते मासे धरणारे नाही, तर ‘माणसं धरणारे’ बनले. (लूक ५:१०) आजही येशू, सत्याबद्दल प्रेम असणाऱ्‍या चांगल्या मनाच्या लोकांना हेच आमंत्रण देत आहे. (मत्त. २८:१९, २०) येशूचं हे आमंत्रण तुम्ही स्वीकारलं आहे का?

२. प्रचारक बनण्याचा निर्णय कोणी घेतला पाहिजे, आणि हा निर्णय घ्यायला कोणती गोष्ट त्यांना मदत करू शकते?

बायबल विद्यार्थ्यांनो, कदाचित तुमचा बायबल अभ्यास बराच पुढे गेला असेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात बरेच बदलही केले असतील. आणि आता, प्रचारक व्हायचा निर्णय घ्यायची वेळ आली असेल. पण, हा निर्णय घ्यायला जर तुम्हाला भीती वाटत असेल तर निराश होऊ नका. कारण यावरून हेच दिसून येतं, की हा निर्णय किती महत्त्वाचा आहे याची तुम्हाला जाणीव आहे. पेत्र आणि त्याच्या सोबत्यांनी येशूचं आमंत्रण “ऐकताच” आपली जाळी टाकून दिली हे खरं आहे. पण, पेत्रने आणि त्याच्या भावाने कोणताही विचार न करता तडकाफडकी हा निर्णय घेतला नाही. येशू हाच मसीहा आहे, ही गोष्ट स्वीकारून त्यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला होता. (योहा. १:३५-४२) त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा यहोवा आणि येशू यांच्याबद्दल आत्तापर्यंत बरंच काही शिकला असाल, आणि पुढेही प्रगती करत राहण्याची तुम्ही इच्छा असेल. पण प्रचारक बनण्याचा हा निर्णय तुम्ही घाईघाईने नाही, तर विचार करून घेतला पाहिजे. पेत्र, अंद्रिया आणि इतर जण हा निर्णय का घेऊ शकले?

३. प्रचारक बनण्यासाठी कोणते गुण तुम्हाला मदत करतील?

येशूच्या या चार शिष्यांना मासेमारीचं आपलं काम खूप आवडायचं आणि त्या कामाबद्दल त्यांना चांगलं ज्ञान होतं. तसंच, ते खूप धाडसी होते आणि आपल्या कामाच्या बाबतीत त्यांनी स्वतःला चांगली शिस्त लावली होती. याच गुणांमुळे नंतर प्रचाराचं काम चांगल्या प्रकारे करायला त्यांना मदत झाली. चांगले प्रचारक बनण्यासाठी लागणारे हे गुण तुम्ही कसे विकसित करू शकता, याची चर्चा या लेखात केली जाईल.

आपली आवड वाढवा

पेत्र आणि इतर जण ‘माणसं धरणारे’ बनले. हे महत्त्वाचं काम आजही चालू आहे (परिच्छेद ४-५ पाहा)

४. पेत्रला मासेमारीच्या कामाबद्दल कसं वाटायचं?

आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी पेत्र मासेमारीचं काम करायचा. पण त्याच्यासाठी ते फक्‍त एक काम नव्हतं. त्याला ते खूप आवडायचं आणि त्यामुळेही तो हे काम करायचा. (योहा. २१:३, ९-१५) पुढे तो ‘माणसं धरण्याचं’ काम, म्हणजेच प्रचाराचं काम तितक्याच आवडीने करायला शिकला. आणि यहोवाच्या मदतीने तो या कामात खूप कुशल बनला.—प्रे. कार्ये २:१४, ४१.

५. लूक ५:८-११ या वचनांनुसार पेत्र का घाबरला होता, आणि अशा भावनांवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

प्रचाराचं काम करायचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे? यहोवावरचं आपलं प्रेम. आपल्याला कदाचित वाटेल, की आपण हे काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही. पण यहोवावरचं आपलं प्रेमच या भावनेवर मात करायला आपल्याला मदत करू शकतं. पेत्रच्या बाबतीत काय झालं याचा विचार करा. आपला शिष्य होण्याचं आमंत्रण देताना येशू त्याला म्हणाला: “घाबरू नकोस.” (लूक ५:८-११ वाचा.) पण, पेत्र का घाबरला होता? येशूचा शिष्य झाल्यामुळे आपल्यासोबत काय होईल याची त्याला भीती वाटत होती का? नाही. खरंतर, येशूने नुकताच एक चमत्कार करून त्यांना भरपूर मासे पकडायला मदत केली होती. तो चमत्कार पाहून पेत्र चकित झाला, आणि येशूसोबत काम करायची आपली योग्यता नाही असं त्याला वाटलं. आणि त्यामुळे तो घाबरला. पेत्रसारखंच तुम्हालाही भीती वाटू शकते. प्रचारक बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील या विचाराने तुम्हाला भीती वाटू शकते, कमीपणाची भावना येऊ शकते. पण जर तुम्ही यहोवावरचं, येशूवरचं आणि लोकांवरचं आपलं प्रेम वाढवलं, तर तुम्हालासुद्धा येशूने दिलेलं आमंत्रण आनंदाने स्वीकारता येईल.—मत्त. २२:३७, ३९; योहा. १४:१५.

६. प्रचार करायची आणखी कोणती कारणं आहेत?

आपण प्रचार का करतो याची आणखी काही कारणं आहेत. येशूने म्हटलं होतं, “जा आणि . . . शिष्य करा.” या आज्ञेचं पालन करायची आपली इच्छा आहे, म्हणून आपण प्रचार करतो. (मत्त. २८:१९, २०) तसंच, आज लोक “जखमी झालेले व भरकटलेले” आहेत, आणि त्यामुळे त्यांना राज्याबद्दलचं सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. (मत्त. ९:३६) शिवाय, सगळ्या प्रकारच्या लोकांना सत्याचं अचून ज्ञान मिळावं आणि त्यांचं तारण व्हावं, अशी यहोवाची इच्छा आहे.—१ तीम. २:४.

७. रोमकर १०:१३-१५ या वचनांवरून प्रचाराच्या कामाचं महत्त्व कसं दिसून येतं?

आपल्या प्रचारकार्यामुळे किती चांगले परिणाम घडू शकतात याचा जर आपण विचार केला, तर हे काम करायची प्रेरणा आपल्याला मिळेल. मासेमारीचा व्यवसाय करणारे एकतर खाण्यासाठी किंवा विकण्यासाठी मासे पकडतात. पण आपण मात्र लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रचाराचं काम करतो.—रोमकर १०:१३-१५ वाचा; १ तीम. ४:१६.

आपलं ज्ञान वाढवा

८-९. मासेमारी करणाऱ्‍याला काय माहीत असणं गरजेचं आहे, आणि का?

पाण्यातले कोणते प्राणी खायचे आणि कोणते नाही हे नियमशास्त्रात सांगितलं होतं. त्यामुळे कोणते मासे पकडायचे हे मासेमारी करणाऱ्‍या एका इस्राएली माणसाला माहीत असणं गरजेचं होतं. (लेवी. ११:९-१२) तसंच, समुद्रात जास्त मासे कुठे सापडतील हेही त्याला माहीत असणं गरजेचं होतं. कारण मासे सहसा अशा ठिकाणी असतात जिथलं पाणी त्यांच्यासाठी चांगलं असतं आणि जिथे त्यांना भरपूर अन्‍न मिळतं. याशिवाय, दिवसाच्या कोणत्या वेळी मासे पकडायचे हेसुद्धा मासेमारी करणाऱ्‍याला माहीत असणं गरजेचं होतं. मासे पकडण्याची सगळ्यात चांगली वेळ कोणती याबद्दल पॅसिफिक बेटावर राहणाऱ्‍या एक साक्षीदार भावाने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. एकदा त्या भावाने एका मिशनरी बांधवाला त्याच्यासोबत मासेमारी करायला बोलवलं. तेव्हा मिशनरी बांधव त्याला म्हणाला: “ठीक आहे, उद्या सकाळी नऊ वाजता भेटू.” त्यावर त्या भावाने त्याला म्हटलं: “तुम्हाला कदाचित माहीत नसेल; पण आम्ही आमच्या सोयीच्या वेळी मासे पकडायला जात नाही, तर ज्या वेळी समुद्रात जास्त मासे मिळू शकतात त्या वेळी जातो.”

त्याचप्रमाणे, पहिल्या शतकातले येशूचे शिष्यही अशा वेळी आणि अशा ठिकाणी प्रचार करायचे, जिथे त्यांना सगळ्यात जास्त लोक भेटण्याची शक्यता होती. जसं की, त्यांनी मंदिरात आणि सभास्थानात; तसंच बाजारात आणि घरोघरी जाऊन प्रचार केला. (प्रे. कार्ये ५:४२; १७:१७; १८:४) अगदी तसंच, आपल्या क्षेत्रातले लोक सहसा कोणत्या वेळी घरी असतात किंवा कोणत्या ठिकाणी जास्त लोक भेटू शकतात, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्या वेळेत बदल करायला आपण तयार असलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला त्यांना प्रचार करता येईल.—१ करिंथ. ९:१९-२३.

मासेमारीचा व्यवसाय करणारे . . . १. अशा वेळी आणि अशा ठिकाणी जाळं टाकतात जिथे त्यांना भरपूर मासे मिळतील (परिच्छेद ८-९ पाहा)

१०. संघटना आपल्याला प्रचारासाठी कशी मदत करते?

१० मासेमारी करण्यासाठी एका व्यक्‍तीकडे योग्य साधनं असणं आणि ती कशी वापरायाची याचं ज्ञान असणंही महत्त्वाचं आहे. त्याचप्रकारे, आपल्याजवळसुद्धा प्रचारासाठी लागणारी योग्य साधनं असणं गरजेचं आहे. आणि ती कशी वापरायची हेसुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. प्रचार कसा करायचा याबद्दल येशूने शिष्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. जसं की, प्रचाराला जाताना सोबत काय घ्यायचं, कुठे प्रचार करायचा आणि लोकांशी काय बोलायचं. (मत्त. १०:५-७; लूक १०:१-११) आज आपल्या संघटनेने आपल्याला प्रचारासाठी लागणारी ‘शिकवण्याची साधनं’ दिली आहेत आणि ती खूप प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. * ही साधनं कशी वापरायची याचं प्रशिक्षण आपल्याला दिलं जातं. या प्रशिक्षणामुळे आपला आत्मविश्‍वास आणि शिकवण्याचं कौशल्य वाढतं.—२ तीम. २:१५.

मासेमारीचा व्यवसाय करणारे . . . २. योग्य साधनं वापरतात (परिच्छेद १० पाहा)

आपलं धैर्य वाढवा

११. आपल्याला धैर्याची गरज का आहे?

११ मासेमारी करणारे सहसा रात्रीच्या वेळी मासे पकडायला जातात. त्या वेळी समुद्रातलं वातावरण अचानक बदलून वादळ येऊ शकतं. त्यामुळे त्यांनी धाडसी असणं गरजेचं असतं. त्याच प्रकारे, आपल्यालाही धैर्याची गरज आहे. कारण आपण जेव्हा प्रचार करायला सुरुवात करतो आणि साक्षीदार म्हणून स्वतःची ओळखी करून देऊ लागतो, तेव्हा आपल्या जीवनातसुद्धा वादळं येऊ शकतात. जसं की, कुटुंबातले सदस्य आपला विरोध करू शकतात, आपले मित्र आपली थट्टा करू शकतात किंवा मग लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करू शकतात. पण या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. कारण विरोध करणाऱ्‍या लोकांमध्ये जाऊन आपल्याला प्रचार करावा लागेल, हे येशूने आधीच सांगितलं होतं.—मत्त. १०:१६.

१२. यहोशवा १:७-९ या वचनांनुसार कोणती गोष्ट धैर्य वाढवायला आपल्याला मदत करेल?

१२ तुम्ही तुमचं धैर्य कसं वाढवू शकता? सर्वातआधी, असा भरवसा ठेवा की आजसुद्धा येशू स्वर्गातून प्रचारकार्याचं मार्गदर्शन करत आहे. (योहा. १६:३३; प्रकटी. १४:१४-१६) त्यानंतर, तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं जे वचन यहोवाने दिलं आहे त्यावरचा तुमचा विश्‍वास वाढवा. (मत्त. ६:३२-३४) तुमचा विश्‍वास जितका वाढेल, तितकंच तुमचं धैर्यही वाढेल. पेत्र आणि त्याचे सोबती यांनी येशूचे शिष्य बनण्यासाठी आपला मासेमारीचा व्यवसाय सोडून दिला, तेव्हा त्यांनी खूप मोठा विश्‍वास दाखवला. त्याचप्रमाणे, तुम्ही बायबलचा अभ्यास सुरू केल्याचं आणि साक्षीदारांच्या सभांना जात असल्याचं तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगितलं, तेव्हा तुम्हीसुद्धा खूप मोठा विश्‍वास दाखवला. याशिवाय, यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमच्या वागण्यात आणि जीवनशैलीत बरेच बदल केले असतील, यात शंका नाही. हे सगळं करून तुम्ही हेच दाखवलं, की देवावर तुमचा किती विश्‍वास आहे आणि तुम्ही किती धैर्यवान आहात! असंच धैर्य जर तुम्ही पुढेही दाखवत राहिलात, तर ‘यहोवा तुमच्याबरोबर आहे’ याची खातरी तुम्हाला पटेल.—यहोशवा १:७-९ वाचा.

मासेमारीचा व्यवसाय करणारे . . . ३. हवामान वाईट असलं तरीही धाडसाने काम करत राहतात (परिच्छेद ११-१२ पाहा)

१३. प्रार्थना आणि मनन केल्यामुळे तुम्हाला धैर्य वाढवायला कशी मदत होईल?

१३ तुमचं धैर्य वाढवण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता? धैर्य वाढवण्यासाठी आणि धाडसी होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. (प्रे. कार्ये ४:२९, ३१) यहोवा नक्की तुमची प्रार्थना ऐकेल. तो तुम्हाला कधीच सोडून देणार नाही. तो नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तसंच, पूर्वीच्या काळात यहोवाने त्याच्या सेवकांना कसं वाचवलं यावर तुम्ही मननही करू शकता. याशिवाय, समस्यांवर मात करण्यासाठी आणि जीवनात बदल करण्यासाठी यहोवाने तुम्हाला कशी मदत केली याचाही विचार करा. ज्या देवाने आपल्या लोकांना लाल समुद्र पार करायला मदत केली, तो तुम्हाला ख्रिस्ताचा शिष्य व्हायला मदत करणार नाही का? नक्कीच करेल! (निर्ग. १४:१३) स्तोत्रकर्त्यासारखाच तुम्हीसुद्धा हा भरवसा ठेवू शकाल, की “परमेश्‍वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”—स्तो. ११८:६.

१४. मॅसी आणि टोमोयो या बहिणींच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१४ धैर्य वाढवण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे, यहोवाने लाजाळू स्वभावाच्या लोकांना धाडसी व्हायला कशी मदत केली याचा विचार करणं. मॅसी नावाच्या एका बहिणीचा अनुभव विचारात घ्या. ती खूप लाजाळू होती आणि अनोळखी लोकांशी बोलायच्या विचाराने ती फार घाबरून जायची. त्यामुळे आपण लोकांना कधीच साक्ष देऊ शकणार नाही असं तिला वाटायचं. म्हणून मग तिने यहोवावर आणि लोकांवर असलेलं आपलं प्रेम वाढवण्याचा प्रयत्न केला. आपण कोणत्या काळात जगत आहोत आणि लोकांना प्रचार करणं किती महत्त्वाचं आहे या गोष्टीचाही तिने विचार केला. तसंच, प्रचार करायची आपली इच्छा वाढवण्यासाठी तिने यहोवाला प्रार्थना केली. यामुळे ती आपल्या लाजाळू स्वभावावर आणि भीतीवर मात करू शकली आणि नियमित पायनियर म्हणून सेवाही करू शकली. यहोवा नवीन प्रचारकांनाही “खंबीर” व्हायला, म्हणजेच धैर्य वाढवायला मदत करतो. टोमोयो नावाच्या बहिणीचा अनुभव विचारात घ्या. तिने जेव्हा घरोघरचं प्रचारकार्य करायला सुरुवात केली, तेव्हा पहिल्याच घरात एक बाई तिला ओरडून म्हणाली: “मला यहोवाच्या साक्षीदारांसोबत काहीच बोलायचं नाहीए.” आणि तिने तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला. तेव्हा टोमोयो घाबरली नाही. उलट, ती आपल्या सोबत असलेल्या बहिणीला म्हणाली: “तू ऐकलंस ती काय बोलली? मी एक शब्दही बोलले नाही, तरी तिने लगेच ओळखलं की मी यहोवाची साक्षीदार आहे. याचा मला खूप आनंद होतोय.” आज टोमोयो एक नियमित पायनियर म्हणून सेवा करत आहे.

स्वतःला शिस्त लावा

१५. स्वतःला शिस्त लावणं म्हणजे काय, आणि ख्रिश्‍चनांनी हे करणं का गरजेचं आहे?

१५ स्वतःला शिस्त लावणं म्हणजे “ज्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे त्या करण्यासाठी मेहनत घेणं.” मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्‍यांनीही स्वतःला चांगली शिस्त लावलेली असते. जसं की, ते सकाळी लवकर उठायला आणि काम पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबून राहायला तयार असतात. तसंच, हवामान चांगलं नसतानाही ते काम करत राहतात. त्याचप्रमाणे, आपल्यालाही आपलं प्रचाराचं काम धीराने करत राहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे.—मत्त. १०:२२.

१६. स्वतःला शिस्त लावण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१६ स्वतःला शिस्त लावण्याचा गुण आपल्यात जन्मापासून नसतो. त्यामुळे एखादी गोष्ट करणं कठीण वाटतं, तेव्हा आपण सहसा ती टाळण्याचा प्रयत्न करतो. पण काही गोष्टी कठीण वाटत असल्या, तरी त्या करणं महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे. असं करण्यासाठी कोणता गुण आपल्याला मदत करेल? आत्मसंयम. आणि हा गुण विकसित करण्यासाठी यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मदत करतो.—गलती. ५:२२, २३.

१७. १ करिंथकर ९:२५-२७ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःला शिस्त लावण्यासाठी प्रेषित पौलला काय करावं लागलं?

१७ स्वतःला शिस्त लावण्याच्या बाबतीत प्रेषित पौलचं एक चांगलं उदाहरण आहे. पण योग्य ते करण्यासाठी त्यालाही जणू आपल्या “शरीराला बुक्के” मारावे लागले असं तो म्हणतो. (१ करिंथकर ९:२५-२७ वाचा.) त्याने इतरांनाही स्वतःला शिस्त लावण्याचं आणि “सर्व गोष्टी योग्य पद्धतीने व सुव्यवस्थितपणे” करण्याचं प्रोत्साहन दिलं. (१ करिंथ. १४:४०) त्याच प्रकारे, आपणसुद्धा यहोवाच्या उपासनेशी संबंधित गोष्टी करायला स्वतःला शिस्त लावली पाहिजे. या गोष्टींमध्ये प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम नियमितपणे करणंही येतं.—प्रे. कार्ये २:४६.

वेळ लावू नका

१८. यहोवा कशावरून आपलं यश मोजतो?

१८ मासेमारी करणाऱ्‍याने जर भरपूर मासे पकडले तर तो आपल्या कामात यशस्वी झाला असं म्हटलं जातं. पण आपल्या बाबतीत तसं नाही. आपण किती लोकांना सत्यात यायला मदत करतो यावरून आपलं यश ठरत नाही. (लूक ८:११-१५) तर आपण किती धीराने प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम करत राहतो त्यावरून यहोवा आपलं यश मोजतो. असं का म्हणता येईल? कारण यहोवाने आणि त्याच्या मुलाने आपल्याला जे काम करायला सांगितलं आहे ते आपण करत असतो.—मार्क १३:१०; प्रे. कार्ये ५:२८, २९.

१९-२०. प्रचाराच्या कामात आत्ताच पुरेपूर भाग घेण्याचं एक खास कारण काय आहे?

१९ काही देशांमध्ये वर्षातल्या काही विशिष्ट महिन्यांमध्येच मासे पकडण्याची परवानगी असते. मासे पकडण्याचा तो काळ जसजसा संपायला येतो तसतसं मासेमारी करणाऱ्‍यांना याची जाणीव होते, की आता फार कमी वेळ उरला आहे. म्हणून आपण हे काम जास्तीत जास्त केलं पाहिजे. आज प्रचाराचं काम करण्यासाठी आपल्याजवळही फार कमी वेळ उरला आहे. कारण या दुष्ट जगाचा अंत खूप वेगाने जवळ येत आहे. जो थोडाफार वेळ उरला आहे त्यात आपल्याला जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवायचा आहे. म्हणून उशीर करू नका! आणि प्रचाराचं हे महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी जीवनात योग्य परिस्थिती येण्याची वाट पाहू नका.—उप. ११:४.

२० पाऊल उचलण्याची हीच वेळ आहे! प्रचारकार्याबद्दल आपली आवड वाढवा, बायबलचं ज्ञान वाढवा, धैर्यवान व्हा आणि स्वतःला शिस्त लावा. जगभरात प्रचाराचं काम करणाऱ्‍या ८० लाखांपेक्षा जास्त लोकांमध्ये सामील व्हा आणि यहोवाकडून मिळणारा आनंद अनुभवा. (नेह. ८:१०) जोपर्यंत यहोवा हे काम थांबवायला सांगत नाही, तोपर्यंत त्यात पुरेपूर भाग घेण्याचा निश्‍चय करा. प्रचाराचं काम करत राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का करण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी आपल्याला मदत करू शकतात, याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ४७ सुर्वाता घोषित करा!

^ परि. 5 येशूने ज्या मासे धरणाऱ्‍यांना आपले शिष्य बनण्याचं आमंत्रण दिलं होतं ते नम्र आणि मेहनती होते. आजसुद्धा येशू असेच गुण असणाऱ्‍या लोकांना ‘माणसं धरणारे’ बनण्याचं आमंत्रण देत आहे. जे बायबल विद्यार्थी येशूचं हे आमंत्रण स्वीकारायला कचरतात ते कोणती पावलं उचलू शकतात, याबद्दल या लेखात सांगितलं आहे.

^ परि. 1 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: जे आनंदाच्या संदेशाचा प्रचार करतात आणि लोकांना येशूचे शिष्य बनायला मदत करतात, अशांना ‘माणसं धरणारे’ किंवा प्रचारक म्हटलं आहे.