व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३९

आपल्या ख्रिस्ती बहिणींची काळजी घ्या आणि त्यांना मदत करा

आपल्या ख्रिस्ती बहिणींची काळजी घ्या आणि त्यांना मदत करा

“मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना” आहे.—स्तो. ६८:११.

गीत ३ “देव प्रीती आहे”

सारांश *

आपल्या आवेशी बहिणी सभांमध्ये आणि सेवाकार्यात भाग घेतात, राज्य सभागृहातल्या दुरुस्तीच्या कामात हातभार लावतात आणि भाऊबहिणींची काळजी असल्याचं ते आपल्या कामांतून दाखवतात (परिच्छेद १ पाहा)

१. आपल्या ख्रिस्ती बहिणी कशा प्रकारे संघटनेला मदत करतात, पण त्यांच्यापैकी अनेकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

आपल्या मंडळीत मेहनत करणाऱ्‍या अनेक बहिणी आहेत, याचा आपल्याला खूप आनंद होतो. त्या सभांमध्ये आणि सेवाकार्यात भाग घेतात. काही बहिणी राज्य सभागृहातल्या दुरुस्तीच्या कामात हातभार लावतात. तसंच, त्यांना भाऊबहिणींची काळजी आहे, हे त्या आपल्या कामांतून दाखवतात. पण आपल्या या बहिणींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसं की, त्यांच्यापैकी काही जणी वयस्कर आईवडिलांची काळजी घेतात, तर काही घरच्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करतात. आणि अशाही काही बहिणी आहेत ज्या नोकरी करून आपल्या मुलांना एकट्यानेच सांभाळतात.

२. आपण आपल्या मंडळीतल्या बहिणींची काळजी का घेतली पाहिजे?

आपण आपल्या मंडळीतल्या बहिणींची काळजी का घेतली पाहिजे? कारण, आज जगात सहसा स्त्रियांची काळजी घेतली जात नाही. जो आदर त्यांना मिळाला पाहिजे, तो बऱ्‍याचदा त्यांना दिला जात नाही. याशिवाय, बायबल आपल्याला स्त्रियांची काळजी घ्यायचं आणि त्यांना मदत करायचं प्रोत्साहन देतं. उदाहरणार्थ, प्रेषित पौलने रोममधल्या मंडळीला सांगितलं, की त्यांनी फीबी या बहिणीचं स्वागत करावं आणि “तिला जे काही साहाय्य लागेल ते” द्यावं. (रोम. १६:१, २) ख्रिस्ती बनण्याआधी पौल एक परूशी होता. आणि परूशी लोक स्त्रियांना खूप तुच्छ लेखायचे. पण ख्रिस्ती बनल्यानंतर तो येशूसारखाच स्त्रियांशी आदराने आणि प्रेमाने वागला.—१ करिंथ. ११:१.

३. येशू स्त्रियांशी कसा वागायचा, आणि आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करणाऱ्‍या स्त्रियांबद्दल त्याला कसं वाटायचं?

येशू सर्व स्त्रियांशी आदाराने वागायचा. (योहा. ४:२७) त्याच्या काळात यहुदी धर्मपुढारी स्त्रियांशी जसं वागायचे, तसं तो त्यांच्याशी वागायचा नाही. त्याच्याबद्दल बायबलच्या एका संदर्भग्रंथात असं म्हटलं आहे, की “येशू कधीच असं काही बोलला नाही ज्यामुळे स्त्रियांचा अनादर होईल किंवा त्यांचा अपमान होईल.” आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करणाऱ्‍या स्त्रियांबद्दल तर त्याला खास आदर होता. अशांना येशूने आपल्या बहिणी मानलं. तसंच, आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य कोणकोण आहेत हे सांगताना त्याने पुरुषांसोबत त्यांचाही उल्लेख केला.—मत्त. १२:५०.

४. आपण या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?

आपल्या पित्याची सेवा करणाऱ्‍या स्त्रियांना मदत करायला येशू नेहमी तयार असायचा. तो त्यांची मनापासून कदर करायचा आणि गरज पडल्यावर त्यांच्या बाजूने बोलायचाही. येशूचं अनुकरण करून आपणही आपल्या बहिणींची काळजी कशी घेऊ शकतो आणि त्यांना मदत कशी करू शकतो ते आता आपण पाहू या.

बहिणींना मदत करण्यासाठी वेळ काढा

५. भाऊबहिणींसोबत वेळ घालवणं काही बहिणींना कठीण का जाऊ शकतं?

आपल्या सगळ्यांनाच भाऊबहिणींसोबत वेळ घालवायला आवडतं. पण काही बहिणींना कधीकधी अशी चांगली सोबत मिळणं कठीण जाऊ शकतं. असं का होऊ शकतं? याबद्दल काही बहिणींनी काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. जॉर्डन * नावाची एक बहीण म्हणते, “मी अविवाहित असल्यामुळे मला असं वाटतं, की मंडळीत माझं काहीच स्थान नाहीये. कोणालाही माझी गरज नाहीये.” क्रिस्टिन नावाची एक पायनियर बहीण सेवा वाढवण्यासाठी एका नवीन ठिकाणी राहायला गेली. ती म्हणते, “नवीन मंडळीत गेल्यावर तुम्हाला खूप एकटंएकटं वाटू शकतं.” काही भावांनासुद्धा असंच वाटू शकतं. ज्या बहिणींच्या कुटुंबातले सदस्य सत्यात नसतात अशांना आपल्या कुटुंबासोबत जवळचं नातं ठेवणं कठीण जाऊ शकतं. यासोबतच, त्यांना आपल्या मंडळीतल्या भाऊबहिणींपासूनही दुरावल्यासारखं वाटू शकतं. काही बहिणी आजारी असल्यामुळे किंवा कुटुंबातल्या आजारी व्यक्‍तीची काळजी घेत असल्यामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत, आणि त्यामुळे त्यांना एकटं वाटू शकतं. अनिटा नावाच्या बहिणीलाही असंच वाटायचं, ती म्हणते: “मी भाऊबहिणींसोबत वेळ घालवू शकत नव्हते, कारण मलाच माझ्या आईची काळजी घ्यावी लागायची.”

येशूप्रमाणे आपणही आपल्या विश्‍वासू बहिणींची काळजी घेतली पाहिजे (परिच्छेद ६-९ पाहा) *

६. लूक १०:३८-४२ या वचनांनुसार येशूने मरीया आणि मार्था यांना कशी मदत केली?

देवाची सेवा करणाऱ्‍या स्त्रियांसाठी येशूने वेळ काढला आणि त्यांच्यासोबत त्याची चांगली मैत्री होती. मरीया आणि मार्था या दोघींशी येशूची किती चांगली मैत्री होती याचा विचार करा. असं दिसून येतं, की या दोघी बहिणी अविवाहित होत्या. (लूक १०:३८-४२ वाचा.) येशूचं वागणं-बोलणं इतकं चांगलं होतं, की त्या मनमोकळेपणे त्याच्याशी बोलू शकत होत्या. उदाहरणार्थ, एक शिष्य म्हणून त्याच्या पायाजवळ बसायला मरीयाला मुळीच संकोच वाटला नाही. * आणि मरीया आपल्याला कामात मदत करत नाही, याची येशूला तक्रार करायला मार्थालाही संकोच वाटला नाही. त्या प्रसंगी येशूने त्या दोघींना काही महत्त्वाचे धडे शिकायला मदत केली. तसंच, इतर प्रसंगीही त्यांना भेट देऊन येशूने दाखवून दिलं, की त्याला त्यांची आणि त्यांचा भाऊ, लाजर याची काळजी आहे. (योहा. १२:१-३) म्हणूनच जेव्हा लाजर खूप आजारी पडला तेव्हा मरीया आणि मार्था येशूकडे मदत मागू शकल्या.—योहा. ११:३, ५.

७. बहिणींना प्रोत्साहन द्यायचा एक मार्ग कोणता आहे?

काही बहिणींना जास्त करून सभांमध्येच भाऊबहिणींना भेटायची संधी मिळते. त्यामुळे आपण सभांमध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि आपल्याला त्यांची किती काळजी आहे हे आपल्या कामांतून दाखवलं पाहिजे. आधी उल्लेख केलेली जॉर्डन म्हणते: “मी सभांमध्ये दिलेल्या उत्तरांबद्दल भाऊबहीण माझी प्रशंसा करतात, माझ्यासोबत प्रचार करायची व्यवस्था करतात किंवा इतर मार्गांनी माझी काळजी घेतात, तेव्हा मला खूप बरं वाटतं.” यावरून हेच कळतं, की आपल्या बहिणी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत हे आपल्या वागण्या-बोलण्यातून दिसून आलं पाहिजे. कीया नावाची बहीण म्हणते: “मी जर एखाद्या वेळी सभेला जाऊ शकले नाही, तर माझी विचारपूस करण्यासाठी कोणी ना कोणी मला नक्की मेसेज करेल याची मला खातरी असते. यावरून मला जाणीव होते, की भाऊबहिणींना माझी खूप काळजी आहे.”

८. आपण आणखी कोणत्या मार्गांनी येशूचं अनुकरण करू शकतो?

येशूप्रमाणेच आपणसुद्धा ख्रिस्ती बहिणींसोबत वेळ घालवला पाहिजे. आपण त्यांना जेवणासाठी किंवा करमणुकीसाठी घरी बोलवू शकतो. पण त्यांच्यासोबत वेळ घालवताना त्यांना प्रोत्साहन मिळेल अशाच गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत. (रोम. १:११, १२) असं करताना मंडळीतल्या वडिलांनी येशूसारखीच मनोवृत्ती ठेवली पाहिजे. येशूला माहीत होतं, की अविवाहित राहणं काहींना कठीण जाऊ शकतं. पण त्याने ही गोष्ट स्पष्ट केली, की आपण लग्न केलं किंवा आपल्याला मुलं झाली, तरच आपण कायम आनंदी राहू असं नाही. (लूक ११:२७, २८) याउलट, यहोवाच्या सेवेला आपण जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तर आपण कायम आनंदी राहू.—मत्त. १९:१२.

९. बहिणींना मदत करण्यासाठी वडील काय करू शकतात?

खासकरून मंडळीतल्या वडिलांनी ख्रिस्ती स्त्रियांना आपल्या बहिणीसारखं आणि आईसारखं समजलं पाहिजे. (१ तीम. ५:१, २) त्यांनी सभेच्या आधी किंवा नंतर बहिणींशी बोलायला वेळ काढला पाहिजे. आधी उल्लेख केलेली क्रिस्टिन म्हणते: “एका वडिलांच्या लक्षात आलं, की मी जरा जास्तच व्यस्त असते. म्हणून त्यांनी मला विचारलं, की दिवसभरात मला काय-काय करावं लागतं. त्यांना माझी काळजी आहे, हे पाहून मला खरंच खूप चांगलं वाटलं.” अशा प्रकारे मंडळीतले वडील बहिणींशी बोलण्यासाठी नेहमी वेळ काढतात, तेव्हा ते दाखवून देतात की त्यांना त्यांची काळजी आहे. * वडिलांसोबत नेहमी बोलण्याचा एक फायदा काय आहे, याबद्दल आधी उल्लेख केलेली अनिटा म्हणते: “त्यामुळे ते मला चांगलं समजून घेऊ शकतात आणि मीही त्यांना चांगलं समजून घेऊ शकते. मग मला काही समस्या असली की मी अगदी सहज त्यांच्याकडे मदत मागू शकते.”

बहिणींची मनापासून कदर करा

१०. बहिणींना आपलं काम आनंदाने करत राहण्यासाठी कोणती गोष्ट मदत करू शकते?

१० आपण कोणीही असो, स्त्री असो किंवा पुरूष, इतर जण जेव्हा आपल्या कौशल्यांची किंवा कामाची प्रशंसा करतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण त्यांनी तसं केलं नाही तर आपल्याला खूप वाईट वाटतं. अबीगेल नावाच्या एका अविवाहित पायनियर बहिणीलाही कधीकधी असंच वाटतं. ती म्हणते: “माझी स्वतःची अशी काहीच ओळख नाहीये. माझ्या भावंडांमुळे किंवा आईवडिलांमुळेच लोक मला ओळखतात.” पण याउलट, पॅम नावाच्या बहीणीच्या अनुभवाकडे लक्ष द्या. अविवाहित असूनही तिने बरीच वर्षं मिशनरी म्हणून सेवा केली. नंतर आईवडिलांची काळजी घेण्यासाठी तिला घरी जावं लागलं. आता तिचं वय ७० पेक्षा जास्त आहे. तरीही ती पायनियर म्हणून सेवा करत आहे. ती म्हणते: “मी जे काही करते त्याबद्दल भाऊबहीण माझी प्रशंसा करतात. आणि यामुळेच मला आपलं काम करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं.”

११. येशूची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या स्त्रियांची त्याने कदर कशी केली?

११ काही विश्‍वासू स्त्रियांनी “स्वतःच्या संपत्तीतून येशूची” सेवा केली. त्यांनी केलेल्या या सेवेबद्दल येशूने मनापासून त्यांची कदर केली. (लूक ८:१-३) त्याने त्यांना आपली सेवा करण्याचाच बहुमान दिला नाही, तर देवाच्या वचनातली महत्त्वाची सत्यंही त्यांना सांगितली. जसं की, येशूने त्या स्त्रियांना आधीच सांगितलं होतं, की त्याचा मृत्यू होईल आणि नंतर त्याचं पुनरुत्थानही केलं जाईल. (लूक २४:५-८) तसंच, पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यासाठी त्याने प्रेषितांसोबतच या स्त्रियांनाही तयार केलं. (मार्क ९:३०-३२; १०:३२-३४) आणि लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे, येशूला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याचे प्रेषित पळून गेले. पण ज्या स्त्रियांनी त्याची सेवा केली होती त्यांच्यापैकी काही स्त्रिया त्याच्या मृत्यूच्या वेळी शेवटपर्यंत त्याच्याजवळ होत्या.—मत्त. २६:५६; मार्क १५:४०, ४१.

१२. येशूने स्त्रियांवर कोणती कामं सोपवली?

१२ येशूने स्त्रियांवर महत्त्वाची कामंही सोपवली. उदाहरणार्थ, येशूचं पुनरुत्थान झाल्यावर त्याला पाहण्याची संधी, सगळ्यात आधी विश्‍वासू स्त्रियांना मिळाली. मग त्याने त्या स्त्रियांना आपलं पुनरुत्थान झाल्याची बातमी प्रेषितांना कळवायला सांगितली. (मत्त. २८:५, ९, १०) तसंच, इ.स.३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेव्हा शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला त्या वेळी त्यांच्यामध्ये स्त्रियाही असाव्यात. तसं जर असेल, तर याचा अर्थ असा होतो की त्यांनाही वेगवेगळ्या भाषेत “देवाच्या अद्‌भुत” गोष्टी सांगण्याची संधी मिळाली असेल.—प्रे. कार्ये १:१४; २:२-४, ११.

१३. आज ख्रिस्ती बहिणी यहोवाच्या सेवेत कोणकोणती कामं करतात, आणि त्याबद्दल तुम्हाला कदर असल्याचं तुम्ही कसं दाखवू शकता?

१३ आपल्या बहिणी यहोवाच्या सेवेत जी मेहनत घेतात त्यासाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे. जसं की, त्या बांधकाम प्रकल्पांवर काम करतात, नवीन भाषा शिकून गरज असेल त्या भाषेच्या गटांना मदत करतात आणि बेथेलमध्ये सेवा करतात. तसंच, नैसर्गिक विपत्तीच्या वेळी त्या मदतकार्यात हातभार लावतात, भाषांतराच्या कामात मदत करतात, पायनियर आणि मिशनरी म्हणून सेवा करतात. बांधवांप्रमाणेच त्यासुद्धा पायनियर प्रशालेला, सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला आणि गिलियड प्रशालेला उपस्थित राहतात. त्यासोबतच ख्रिस्ती पत्नी आपल्या पतींना साथ देतात. त्यामुळे या बांधवांना मंडळीतल्या आणि संघटनेतल्या आपल्या जबाबदाऱ्‍या चांगल्या प्रकारे पार पाडणं शक्य होतं. हे बांधव “माणसांच्या रूपात देणग्या” आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी ते बऱ्‍याच गोष्टी करतात. पण जर या बांधवांना आपल्या पत्नीची साथ नसती, तर त्यांना आपल्या जबाबदऱ्‍या पार पाडणं कठीण गेलं असतं. (इफिस. ४:८) आपल्या ख्रिस्ती बहिणी जे काही करतात त्याची तुम्हाला कदर आहे, हे तुम्ही कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकता?

१४. स्तोत्र ६८:११ या वचनाच्या आधारावर सुज्ञ वडील काय करतात?

१४ प्रचारकार्य करणाऱ्‍यांमध्ये स्त्रियांची एक “मोठी सेना” आहे. प्रचाराच्या कामात त्या सहसा खूप कुशल असतात आणि मोठ्या आनंदाने हे काम करतात. या गोष्टीची वडिलांना जाणीव असते. (स्तोत्र ६८:११ वाचा.) म्हणून वडील त्यांच्या या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करतात. असं करून ते सुज्ञता दाखवतात. आधी उल्लेख केलेल्या अबीगेलला जेव्हा बांधव विचारतात, की प्रचारकार्यात लोकांशी संभाषण सुरू करण्याचे कोणते काही चांगले मार्ग आहेत, तेव्हा तिला खूप प्रोत्साहन मिळतं. ती म्हणते, “यामुळे यहोवाच्या संघटनेत माझंसुद्धा एक महत्त्वाचं स्थान आहे, हे मला जाणवतं.” तसंच, तरुण बहिणींना काही समस्या असतात तेव्हा प्रौढ बहिणी त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकतात, हेसुद्धा वडील मान्य करतात. (तीत २:३-५) खरंच, आपल्या या बहिणींची कदर करणं, त्यांची प्रशंसा करणं किती गरजेचं आहे!

आपल्या बहिणींच्या बाजूने बोला

१५. बहिणींना कोणत्या काही प्रसंगी आपल्या बाजूने बोलण्यासाठी कोणाचीतरी मदत लागू शकते?

१५ काही वेळा एखाद्या समस्येचा सामना करत असताना बहिणींना आपल्या बाजूने बोलणारं कोणीतरी हवं असतं. (यश. १:१७) उदाहरणार्थ, एखाद्या विधवा किंवा घटस्फोट झालेल्या बहिणीला तिच्या बाजूने बोलण्यासाठी कोणाचीतरी गरज पडू शकते. तसंच, काही कामं जी आधी तिचे पती करायचे ती करण्यासाठीही तिला कोणाचीतरी मदत लागू शकते. किंवा एखाद्या वयस्कर बहिणीला डॉक्टरांसोबत बोलण्यासाठी मदत लागू शकते. एखादी पायनियर बहीण संघटनेशी संबंधित एखादं काम करत असेल आणि त्यामुळे तिला कदाचित इतर पायनिरांइतकं प्रचारकार्यात भाग घेता येत नसेल. अशा वेळी काही जण कदाचित तिची टीका करत असतील. त्या वेळीही तिला आपल्या बाजूने बोलणाऱ्‍या व्यक्‍तीची गरज पडू शकते. आणखी कोणत्या मार्गांनी आपण आपल्या बहिणींना मदत करू शकतो? त्यासाठी आपण पुन्हा येशूचं उदाहरण पाहू.

१६. मार्क १४:३-९ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे येशू कशा प्रकारे मरीयाच्या बाजूने बोलला?

१६ देवाची उपासना करण्याऱ्‍या स्त्रियांबद्दल इतरांना गैरसमज होत आहे, असं येशूला वाटलं तेव्हा तो लगेच त्यांच्या बाजूने बोलला. उदाहरणार्थ, मार्थाने जेव्हा येशूजवळ मरीयाची तक्रार केली तेव्हा तो मरीयाच्या बाजूने बोलला. (लूक १०:३८-४२) तसंच, जेव्हा लोकांना वाटलं की मरीयाने चुकीचा निर्णय घेतला आहे आणि त्याबद्दल ते तिची टीका करू लागले तेव्हासुद्धा येशू तिच्या बाजूने बोलला. (मार्क १४:३-९ वाचा.) मरीयाने असं का केलं हे येशूने समजून घेतलं आणि त्याने तिची प्रशंसा केली. तो म्हणाला: “तिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलं आहे. . . . तिला जे करता आलं ते तिने केलं.” येशू टीका करणाऱ्‍या लोकांसमोर मरीयाच्या बाजूने बोलला तेव्हा तिला किती बरं वाटलं असेल! तसंच, येशूने असंही म्हटलं, “जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाईल तिथे तिथे” तिने केलेल्या या चांगल्या कामाची आठवण केली जाईल. आणि हेच या लेखात केलं जात नाही का? लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे येशूने मरीयाच्या या निःस्वार्थ कृत्याचा, जगभरात केल्या जाणाऱ्‍या प्रचाराच्या कामासोबत उल्लेख केला!

१७. आपल्याला आपल्या ख्रिस्ती बहिणींच्या बाजूने कधी बोलावं लागू शकतं, याचं एक उदाहरण द्या.

१७ आपल्या ख्रिस्ती बहिणींना गरज असते तेव्हा तुम्ही त्यांच्या बाजूने बोलता का? एका परिस्थितीचा विचार करा. सत्यात एकटीच असलेली एक बहीण बऱ्‍याचदा सभांना उशिरा येते आणि सभा संपली की लगेच निघून जाते. तसंच, ती क्वचितच आपल्या मुलांना सभांना घेऊन येते. आणि हे काही प्रचारकांच्या लक्षात येतं, तेव्हा ते आपसात तिची टीका करतात. त्यांना असं वाटतं, की तिने सत्यात नसलेल्या आपल्या पतीशी स्पष्टपणे बोलून मुलांना सभांना घेऊन आलं पाहिजे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की ती बहीण तिच्या परीने होता होईल तितका प्रयत्न करत आहे. तिला कदाचित तिच्या पतीच्या कामानुसार आपल्या वेळेत फेरबदल करावा लागत असेल. किंवा मुलांच्या बाबतीतही ती स्वतःच निर्णय घेऊ शकत नसेल. मंडळीत अशा प्रकारे एखाद्या बहिणीबद्दल बोललं जात असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही जर या बहिणीची प्रशंसा केली आणि ती किती मेहनत घेत आहे, याबद्दल इतरांशी बोललात तर तिच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्‍या टीकात्मक गोष्टी तुम्ही थांबवू शकाल.

१८. आपण आणखी कोणत्या मार्गांनी आपल्या बहिणींना मदत करू शकतो?

१८ आपल्या बहिणींना व्यावहारिक मदत पुरवून आपण दाखवू शकतो, की आपल्याला त्यांची किती काळजी आहे. (१ योहा. ३:१८) आपल्या आईची काळजी घेणारी अनिटा म्हणते: “काही भाऊबहीण घरी येऊन थोड्या वेळासाठी माझ्या आईची काळजी घ्यायचे. त्यामुळे मला माझी दुसरी काही कामं करता यायची. कधीकधी ते आमच्यासाठी जेवण बनवून आणायचे. यामुळे मला याची जाणीव झाली, की भाऊबहिणींचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मीसुद्धा मंडळीचा एक महत्त्वाचा भाग आहे.” आधी उल्लेख केलेल्या जॉर्डन या बहिणीलासुद्धा अशीच मदत मिळाली. तिला तिची कार चांगल्या स्थितीत कशी ठेवता येईल, याबद्दल एका बांधवाने तिला काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणते: “भाऊबहीण माझ्या सुरक्षिततेची किती काळजी करतात हे पाहून मला खूप बरं वाटतं.”

१९. आणखी कोणत्या मार्गांनी वडील बहिणींना मदत करू शकतात?

१९ मंडळीतले वडीलसुद्धा बहिणींना कोणत्या गोष्टींची गरज आहे याकडे लक्ष देतात. कारण आपण बहिणींची काळजी घ्यावी, अशी यहोवाची इच्छा आहे हे त्यांना माहीत असतं. (याको. १:२७) ते येशूचं अनुकरण करून समजूतदारपणे वागतात. ते नियम पाळण्यावर अडून राहत नाहीत, तर परिस्थिती समजून घेतात आणि प्रेमाने वागतात. (मत्त. १५:२२-२८) जेव्हा वडील बहिणींना मदत करण्यासाठी मेहनत घेतात तेव्हा यहोवा आणि त्याची संघटना आपल्यावर किती प्रेम करते याची बहिणींना जाणीव होते. आधी उल्लेख केलेल्या कीयाच्या ग्रुप ओवरसियरला जेव्हा कळलं की ती घर बदलत आहे, तेव्हा त्यांनी तिला मदत करण्यासाठी लगेच व्यवस्था केली. ते आठवून कीया सांगते: “यामुळे माझा बराच ताण कमी झाला. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे मला याची जाणीव झाली, की मंडळीत माझं महत्त्वाचं स्थान आहे आणि कठीण परिस्थितीत मी एकटी नाही.”

मंडळीतल्या सगळ्याच बहिणींना मदतीची गरज आहे

२०-२१. आपण कसं दाखवू शकतो की आपल्या सगळ्या ख्रिस्ती बहिणींवर आपलं प्रेम आहे?

२० आपल्या मंडळ्यांमध्ये अनेक मेहनती बहिणी आहेत. अशा बहिणींची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. येशूच्या उदाहरणातून आपण शिकलो, की आपण आपल्या बहिणींसोबत वेळ घालवला पाहिजे आणि त्यांना जाणून घेतलं पाहिजे. त्या देवाच्या सेवेत जी काही मेहनत करतात, त्याची आपण मनापासून कदर केली पाहिजे. आणि गरज असेल तेव्हा आपण त्यांच्या बाजूने बोललंही पाहिजे.

२१ प्रेषित पौलने रोमकरांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी नऊ ख्रिस्ती बहिणींचा उल्लेख केला. (रोम. १६:१, ३, ६, १२, १३, १५) पौलने जेव्हा त्यांचा उल्लेख केला आणि त्यांची प्रशंसा केली, तेव्हा त्या बहिणींना खरंच किती प्रोत्साहन मिळालं असेल! आपणही आपल्या बहिणींची काळजी घेत राहू या आणि त्यांना मदत करत राहू या. असं करून आपण दाखवून देऊ, की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि तेही आपल्या कुटुंबाचे भाग आहेत.

गीत २६ देवासोबत चालत राहा!

^ परि. 5 आपल्या मंडळीतल्या बहिणींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. येशूने स्त्रियांना मदत करण्यासाठी वेळ दिला, त्यांची मनापासून कदर केली आणि गरज पडल्यावर तो त्यांच्या बाजूने बोललाही. या बाबतींत त्याचं अनुकरण करून आपण आपल्या ख्रिस्ती बहिणींची काळजी कशी घेऊ शकतो, हे आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 5 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 6 त्या काळाबद्दल बायबलच्या एका एन्सायक्लोपीडियामध्ये असं म्हटलं आहे: “एखाद्या शिष्याला जर पुढे जाऊन गुरू व्हायचं असेल, तर तो सहसा आपल्या गुरुच्या पायाजवळ बसायचा. पण त्या काळात, स्त्रियांना गुरू किंवा शिक्षक होण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मरीयाला येशूच्या पायाजवळ बसलेलं पाहून आणि त्याच्याकडून शिकून घ्यायला ती किती उत्सुक आहे हे पाहून, अनेक यहुदी पुरुषांना धक्का बसला असेल.”

^ परि. 9 बहिणींना मदत करताना वडिलांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसं की, एखाद्या बहिणीची भेट घेताना त्यांनी एकटं जाऊ नये.

^ परि. 65 चित्राचं वर्णन पृष्ठ: येशूने देवाची सेवा करणाऱ्‍या स्त्रियांना मदत केली. त्याचं अनुकरण करून एक भाऊ दोन बहिणींना कारचा टायर बदलायला मदत करत आहे, दुसरा भाऊ एका आजारी बहिणींला भेटायला गेला आहे, आणि तिसरा भाऊ आपल्या पत्नीसोबत एका बहिणीच्या घरी गेला आहे. आणि तिथे ते तिच्यासोबत आणि तिच्या मुलीसोबत कौटुंबिक उपासना करत आहेत.