व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जोसफ एफ. रदरफर्ड आणि इतर बांधव युरोपच्या दौऱ्‍यावर असताना

१९२०—शंभर वर्षांआधी

१९२०—शंभर वर्षांआधी

१९२० हे वर्ष सुरू झालं, तेव्हापासून यहोवाचे लोक पुढे होणाऱ्‍या कामासाठी खूप उत्साही होते. १९२० या वर्षासाठी त्यांनी हे वार्षिक वचन निवडलं: परमेश्‍वर माझे बल व माझे गीत आहे.—स्तो. ११८:१४.

या उत्साही प्रचारकांना यहोवाने नक्कीच बळ दिलं. त्या वर्षी कॉलपोर्टरची, म्हणजेच पायनियरांची संख्या २२५ पासून ३५० इतकी झाली. आणि पहिल्यांदाच ८,००० पेक्षा जास्त क्लास वर्करनी, म्हणजेच प्रचारकांनी आपला क्षेत्र सेवेचा अहवाल मुख्यालयाला पाठवला. त्यांच्या या मेहनतीचं यहोवाने त्यांना मोठं प्रतिफळ दिलं; त्यांच्या कामाचा त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यांनी उल्लेखनीय आवेश दाखवला

त्या काळात, बंधू जोसफ एफ. रदरफर्ड बायबल विद्यार्थ्यांचं नेतृत्व करायचे. २१ मार्च १९२० या दिवशी त्यांनी एक भाषण दिलं. त्यांच्या भाषणाचा विषय होता: “सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत.” लोकांना हे भाषण ऐकण्याचं आमंत्रण देण्यासाठी बायबल विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी जवळजवळ ३,२०,००० आमंत्रण पत्रिका वाटल्या. आणि न्यूयॉर्क सीटीमध्ये एक खूप मोठं सभागृह भाड्याने घेतलं.

“सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत,” या भाषणाची वृत्तपत्रात दिलेली जाहिरात

बायबल विद्यार्थ्यांनी अपेक्षाही केली नव्हती इतके लोक भाषण ऐकायला आले होते. सभागृहात फक्‍त ५,००० लोक बसू शकत असल्यामुळे जवळजवळ ७,००० लोकांना परत जावं लागलं. या घटनेबद्दल टेहळणी बुरूज  मासिकात असं म्हटलं होतं: “ही सभा, आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांनी आयोजित केलेली आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी सभा आहे.”

हे बायबल विद्यार्थी, “सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत,” याची घोषणा करणारे म्हणून खूप प्रसिद्ध झाले. पण राज्याचा संदेश याहून मोठ्या प्रमाणात घोषित करणं गरजेचं आहे, ही गोष्ट त्या वेळी त्यांना समजली नव्हती. असं असलं, तरी त्यांचा आवेश उल्लेखनीय होता. १९०२ पासून सभांना उपस्थित राहणारी आयडा ऑमस्टेड ही बहीण त्याबद्दल आठवून सांगते: “सर्व मानवांना भविष्यात अनेक आशीर्वाद मिळतील हे आम्हाला माहीत होतं. आणि म्हणून सेवाकार्यात भेटणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला आम्ही हा आनंदाचा संदेश सांगायचो.”

ते स्वतःच प्रकाशनं छापू लागले

आध्यात्मिक अन्‍न मिळत राहावं म्हणून बेथेलमधले बांधव स्वतःच काही प्रकाशनं छापू लागले. त्यासाठी त्यांनी एक मशीन विकत घेतली आणि भाड्याने घेतलेल्या एका बिल्डिंगमध्ये ती बसवली. ही बिल्डिंग, बेथेलपासून थोड्याच अंतरावर असलेल्या ३५ मर्टल ॲव्हेन्यू, ब्रुकलिन, न्यूयॉर्क या ठिकाणी होती.

जानेवारी १९२० मध्ये लिओ पेल आणि वॉल्टर केस्लर हे दोन बांधव बेथेलमध्ये सेवा करायला आले. त्या दिवसाबद्दल आठवून वॉल्टर म्हणतात: “आम्ही पोचलो त्या दिवशी प्रिंटरीचं काम पाहणारे बांधव आमच्याकडे बघून म्हणाले: ‘जेवणाची सुट्टी व्हायला अजून दीड दास आहे.’ तोपर्यंत आम्ही तळमजल्यातून पुस्तकांचे काही बॉक्सेस उचलून वर आणावेत, असं त्यांनी आम्हाला सांगितलं.”

त्याच्या दुसऱ्‍या दिवशी काय घडलं त्याबद्दल लिओ म्हणतात: “आम्हाला पहिल्या मजल्यावरच्या भिंती धुवायचं काम दिलं गेलं. त्या भिंती खूप घाण होत्या. इतक्या घाणेरड्या भिंती मी कधीच साफ केल्या नव्हत्या. पण आम्ही ते काम यहोवासाठी करत होतो, म्हणून आम्ही ते आनंदाने केलं.”

टेहळणी बुरूज  मासिक छापण्यासाठी वापरलेली मशीन

पुढे काही आठवड्यांतच स्वयंसेवकांनी मोठ्या आवेशाने टेहळणी बुरूज  मासिकाचं छपाई काम सुरू केलं. १ फब्रुवरी १९२० च्या टेहळणी बुरूज  अंकाच्या ६० हजार प्रती दुसऱ्‍या मजल्यावर छापण्यात आल्या. त्याच दरम्यान, बांधवांनी तळमजल्यावर छपाई करायची एक मशीन बसवली. तिला त्यांनी ‘बॅटलशीप’ असं नाव दिलं. १४ एप्रिल १९२० या अंकापासून द गोल्डन एज या मासिकाची छपाई सुरू झाली. यावरून दिसून येतं, की त्या स्वयंसेवकांनी जी मेहनत घेतली होती त्यावर यहोवाचा आशीर्वाद होता.

“आम्ही ते काम यहोवासाठी करत होतो, म्हणून आम्ही ते आनंदाने केलं”

“आपण शांतीने राहू या”

यहोवाचे विश्‍वासू लोक या नवीन कामाचा आणि एकमेकांच्या सहवासाचा खूप आनंद घेत होते. पण १९१७ ते १९१९ या काळादरम्यान ज्या परीक्षा आल्या, त्यामुळे काही बायबल विद्यार्थी संघटना सोडून गेले. अशांना कशा प्रकारे मदत करण्यात आली?

१ एप्रिल १९२० च्या टेहळणी बुरूज  अंकात एक लेख छापण्यात आला होता. त्याचा विषय होता: “आपण शांतीने राहू या.” त्या लेखात प्रेमळपणे अशी विनंती करण्यात आली होती: ‘आम्हाला याची खातरी आहे, की ज्यांना यहोवाच्या आज्ञा पाळायची इच्छा आहे, ते आपल्या चुका विसरून परत त्याच्या लोकांकडे येतील. आणि त्यांच्यासोबत मिळून एकतेने काम करतील.’

बऱ्‍याच जणांनी ही विनंती स्वीकारली. एका जोडप्याने असं लिहिलं: “या लेखामुळे आम्हाला याची जाणीव झाली, की आम्ही खूप मोठी चूक केली होती. कारण गेले दीडएक वर्षं आम्ही काहीच प्रचारकार्य केलं नाही. अशी चूक आम्ही पुन्हा कधीच होऊ देणार नाही.” संघटनेत परत येणाऱ्‍या अशा अनेकांसाठी पुढे भरपूर काम होतं.

“झेड जी” (ZG) याचं वाटप करण्यात आलं

२१ जून १९२० या दिवशी, बायबल विद्यार्थ्यांनी “झेड जी” याचं वाटप करायची एक जोरदार मोहीम सुरू केली. “झेड जी,” म्हणजे द फिनिश्‍ड मिनिस्ट्री  * या पुस्तकाची साध्या कव्हरमधली आवृत्ती. १९१८ मध्ये या पुस्तकावर बंदी आल्यामुळे, या पुस्तकाचा भरपूर साठा जपून ठेवण्यात आला होता.

“झेड जी” याचं वाटप करण्यासाठी फक्‍त पायनियरांनाच नाही, तर सगळ्या प्रचारकांना सांगितलं गेलं. त्यांना असं सांगितलं होतं, की “मंडळीतल्या बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्‍तीने या कामात उत्साहाने सहभाग घ्यावा. प्रत्येकाचं ध्येय एकच असलं पाहिजे. ते म्हणजे: ‘काहीही झालं तरी मी झेड जीचं वाटप करणार.’” तो प्रसंग आठवून एडमन्ड हूपर सांगतात, की या मोहिमेमुळे अनेकांना पहिल्यांदाच घरोघरचं प्रचारकार्य करायची संधी मिळाली. ते असंही म्हणाले: “पुढे जे काम अतिशय मोठ्या प्रमाणात वाढणार होतं, ते करण्यामध्ये आमची काय भूमिका आहे हे आता आम्हाला समजू लागलं होतं.”

युरोपमध्ये प्रचाराच्या कामासाठी प्रोत्साहन देण्यात आलं

पहिल्या महायुद्धाच्या काळात, इतर देशांतल्या बायबल विद्यार्थ्यांशी संपर्क करणं अवघड होतं. त्यामुळे बंधू रदरफर्ड यांना त्या बांधवांना प्रोत्साहन द्यायचं होतं आणि प्रचाराच्या कामाचं नियोजन करायचं होतं. म्हणून मग १२ ऑगस्ट १९२० ला बंधू रदरफर्डनी आणि आणखी चार बांधवांनी ब्रिटनचा आणि इतर अनेक देशांचा मोठा दौरा सुरू केला.

बंधू रदरफर्ड इजिप्तमध्ये

बंधू रदरफर्ड ब्रिटनला गेले तेव्हा तिथल्या बायबल विद्यार्थ्यांनी तिथे तीन अधिवेशनं आणि १२ सार्वजनिक सभा आयोजित केल्या. या सगळ्याची उपस्थिती जवळजवळ ५०,००० इतकी होती. या भेटीचा काय परिणाम झाला याबद्दल टेहळणी बुरूज  अंकात असं म्हटलं होतं: “ही भेट बांधवांसाठी खूप तजेला देणारी आणि प्रोत्साहन देणारी होती. ते एकमेकांशी सहवास करू लागले आणि मिळून काम करू लागले. आणि त्यामुळे ते सगळे खूप आनंदी होते.” नंतर बंधू रदरफर्ड यांनी पॅरिसला भेट दिली तेव्हा तिथेही त्यांनी “सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत,” या विषयावर भाषण दिलं. भाषण सुरू झालं तेव्हा सभागृह खचाखच भरलं होतं. आणि तीनशे लोकांनी याबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा व्यक्‍त केली.

लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दिल्या जाणाऱ्‍या भाषणाची जाहिरात करणारं पोस्टर

येणाऱ्‍या आठवड्यांत काही बांधवांनी अथेन्स, कैरो आणि जेरुसलेम या ठिकाणी भेट दिली. आवड दाखवणाऱ्‍यांना मदत करण्यासाठी बंधू रदरफर्ड यांनी जेरुसलेमजवळ असलेल्या रामल्ला शहरात आपल्या साहित्यांचं एक डेपो उघडलं. त्यानंतर बंधू रदरफर्ड पुन्हा युरोपला गेले. तिथे त्यांनी सेंट्रल युरोपियन ऑफिस स्थापन केलं आणि आपलं साहित्य छापण्याची व्यवस्था केली.

अन्यायाचा पर्दाफाश केला गेला

सप्टेंबर १९२० मध्ये बायबल विद्यार्थ्यांनी द गोल्डन एज  क्र. २७ हा खास अंक प्रकाशित केला. त्या खास अंकात, १९१८ च्या काळात बायबल विद्यार्थ्यांचा जो छळ करण्यात आला त्याचा पर्दाफाश केला होता. या मासिकाच्या ४० लाखांपेक्षा जास्त प्रती छापण्यात आल्या. त्यासाठी ‘बॅटलशीप’ नावाची छपाई मशीन दिवस-रात्र चालू होती.

एम्मा मार्टीन या बहिणीचा पोलीसांच्या फाईलमधला फोटो

त्या मासिकात एका खास खटल्याबद्दल, म्हणजे एम्मा मार्टीन या बहिणीच्या खटल्याबद्दल सांगितलं होतं. बहीण मार्टीन ही कॅलिफोर्नियातल्या सॅन बरनार्डिनो या ठिकाणी पायनियर सेवा करत होती. १७ मार्च १९१८ या दिवशी, बहीण मार्टीन आणि तीन बांधव बायबल विद्यार्थ्यांच्या एका छोट्याशा सभेला उपस्थित होते. त्या तीन बांधवांची नावं, ई. हॅम, ई. जे. सोननबर्ग आणि ई. ए. स्टीवन्स अशी होती.

त्या सभेत आणखी एक माणूस उपस्थित होता. पण बायबलबद्दल शिकण्यासाठी तो तिथे आला नव्हता. तो तिथे का आला होता हे त्याने नंतर सांगितलं. तो म्हणाला: “मी सरकारी अधिकाऱ्‍यांच्या सांगण्यावरून त्या सभेत गेलो होतो. त्यांनी मला पुरावा गोळा करण्यासाठी तिथे पाठवलं होतं.” आणि त्याला जो “पुरावा” हवा होता तो त्याने मिळवला. त्याला द फिनिश्‍ड मिनिस्ट्री  या पुस्तकाची प्रत मिळाली. याच्या काही दिवसांनंतरच बहीण मार्टीनला आणि त्या तीन बांधवांना अटक करण्यात आली. ज्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती, त्या पुस्तकाचं वाटप करून त्यांनी कायदा मोडला आहे असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.

बहीण एम्माला आणि त्या तीन बांधवांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना तीन वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबद्दल त्यांनी अनेकदा कोर्टात अपील केलं, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी, १७ मे १९२० ला त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. पण लवकरच ही परिस्थिती बदलली.

२० जून १९२० या दिवशी, सॅन फ्रॅन्सिस्को इथे झालेल्या अधिवेशनात बंधू रदरफर्ड यांनी हा अनुभव सांगितला. या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत जे काही घडलं ते ऐकून श्रोत्यांना धक्काच बसला. म्हणून त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना एक टेलिग्राम पाठवला. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं: ‘कायदा मोडण्याचा जो आरोप मिसेस मार्टीनवर लावण्यात आला आहे तो चुकीचा आहे. सरकारी अधिकाऱ्‍यांनी मिसेस मार्टीनला अडकवण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. तिला तुरुंगात पाठवण्यासाठी त्यांनी तिच्या विरोधात कट रचला. असं करून त्यांनी खूप मोठा अन्याय केला आहे.’

दुसऱ्‍याच दिवशी अध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी लगेच बहीण मार्टीनची, तसंच बंधू हॅम, सोननबर्ग आणि स्टीवन्स यांची शिक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांना अन्यायाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा संपली.

१९२० हे वर्ष संपत आलं तोपर्यंत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या होत्या. मुख्यालयातलं काम वाढत चाललं होतं. आणि देवाचं राज्यच मानवांच्या सगळ्या समस्या काढून टाकेल याची बायबल विद्यार्थ्यांनी मोठ्या आवेशाने घोषणा केली होती. (मत्त. २४:१४) अशा अनेक कारणांमुळे बायबल विद्यार्थ्यी खूप आनंदी होते. पण पुढचं वर्ष, म्हणजे १९२१ हे वर्ष आधीपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरणार होतं. कारण त्या वर्षी राज्याच्या सत्याबद्दल आणखी मोठ्या प्रमाणात घोषणा केली जाणार होती.

^ परि. 18 द फिनिश्‍ड मिनिस्ट्री हा स्टडीज इन द स्क्रिप्चर्स  याचा सातवा खंड होता. साध्या कव्हरमधली “झेड जी” ही आवृत्ती १ मार्च १९१८ चा टेहळणी बुरूज  अंक म्हणून प्रकाशित करण्यात आली. “झेड” हे अक्षर झायन्स वॉच टावरला  सूचित करतं, तर “जी” हे सातव्या खंडाला सूचित करतं, कारण ते इंग्रजी मुळाक्षरांतलं सातवं अक्षर आहे.