व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४३

यहोवा त्याची संघटना चालवतो

यहोवा त्याची संघटना चालवतो

“बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.”—जख. ४:६.

गीत ३१ आम्ही यहोवाचे साक्षीदार!

सारांश *

१. बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्‍चनाने काय करत राहिलं पाहिजे?

तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का? असेल, तर तुमच्या बाप्तिस्म्याच्या वेळी तुम्ही सगळ्यांसमोर हे जाहीर केलं होतं, की यहोवावर तुमचा विश्‍वास आहे आणि त्याच्या संघटनेसोबत * काम करायची तुमची इच्छा आहे. पण यहोवावरचा तुमचा हा विश्‍वास तुम्ही मजबूत करत राहिला पाहिजे. यासोबतच, यहोवा त्याचं काम पूर्ण करण्यासाठी त्याच्या संघटनेचा वापर करत आहे, यावरचा तुमचा भरवसाही तुम्ही वाढवत राहिला पाहिजे.

२-३. यहोवा ज्या प्रकारे त्याची संघटना चालवतो त्यावरून त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे कोणते तीन पैलू दिसून येतात?

आज यहोवा ज्या प्रकारे त्याची संघटना चालवत आहे त्यातून त्याचं व्यक्‍तिमत्त्व, त्याचा उद्देश आणि त्याचे स्तर दिसून येतात. आता आपण, यहोवाच्या संघटनेतून दिसून येणाऱ्‍या त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या तीन पैलूंबद्दल चर्चा करू.

पहिला पैलू म्हणजे “देव भेदभाव करत नाही.”  (प्रे. कार्ये १०:३४) मानवांवर असलेल्या प्रेमामुळेच त्याने “सर्वांच्या मोबदल्यात खंडणी म्हणून” आपल्या मुलाचं बलिदान दिलं. (१ तीम. २:६; योहा. ३:१६) यहोवा त्याच्या लोकांद्वारे सर्वांपर्यंत आनंदाचा संदेश पोचवत आहे. अशा प्रकारे, ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना यहोवा खंडणीचा फायदा घेण्याची, म्हणजेच आपला जीव वाचवण्याची संधी देतो. दुसरा पैलू म्हणजे, यहोवा सुव्यवस्थेचा आणि शांतीचा देव आहे.  (१ करिंथ. १४:३३, ४०) त्यामुळे त्याचे सेवकही सुव्यवस्थितपणे आणि शांतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. तिसरा पैलू म्हणजे, यहोवा एक महान “शिक्षक” आहे.  (यश. ३०:२०, २१) म्हणूनच मंडळीत आणि सेवाकार्यात बायबलबद्दल शिकवायला त्याची संघटना इतकी मेहनत घेते. यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे हे तीन पैलू पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीतून कसे दिसून आले? ते आपल्या काळात कसे दिसून येत आहेत? आणि आज यहोवाच्या संघटनेसोबत काम करत असताना पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करतो?

देव भेदभाव करत नाही

४. प्रेषितांची कार्ये १:८ या वचनाप्रमाणे येशूने आपल्या शिष्यांना कोणती आज्ञा दिली होती, आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणती गोष्ट त्यांना मदत करणार होती?

पहिल्या शतकात.  येशूने जो संदेश सांगितला त्यामुळे सर्व लोकांना एक आशा मिळाली. (लूक ४:४३) त्याने त्याच्या शिष्यांना “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत” साक्ष द्यायची आज्ञा दिली. (प्रेषितांची कार्ये १:८ वाचा.) पण ते हे काम स्वतःच्या बळावर करू शकणार नव्हते; त्यासाठी त्यांना ‘सहायकाची,’ म्हणजेच पवित्र आत्म्याची गरज होती. आणि येशूने त्यांना तो आत्मा द्यायचं वचन दिलं होतं.—योहा. १४:२६; जख. ४:६.

५-६. पवित्र आत्म्याने येशूच्या शिष्यांना कोणकोणत्या मार्गांनी मदत केली?

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ते लगेच प्रचार करू लागले आणि हजारो लोकांनी आनंदाचा संदेश स्वीकारला. (प्रे. कार्ये २:४१; ४:४) पुढे शिष्यांना जेव्हा विरोधाचा सामना करावा लागला तेव्हा ते घाबरले नाही, तर त्यांनी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. त्यांनी अशी प्रार्थना केली: “तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहण्यासाठी तुझ्या सेवकांना बळ दे.” त्यानंतर ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि “देवाचे वचन धैर्याने सांगू लागले.”—प्रे. कार्ये ४:१८-२०, २९, ३१.

पण येशूच्या शिष्यांना इतर समस्यांचाही सामना करावा लागला. उदाहरणार्थ, त्या काळात शास्त्रवचनांच्या खूप कमी प्रती उपलब्ध होत्या. तसंच, आजच्यासारखं त्या वेळी बायबल अभ्यासासाठी कोणतंही साहित्य नव्हतं. शिवाय, शिष्यांना वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करायचा होता. पण इतक्या सगळ्या समस्या असतानाही शिष्यांनी आवेशाने प्रचार केला. आणि जे काम अशक्य वाटत होतं ते त्यांनी पूर्ण केलं. त्यांनी सुमारे ३० वर्षांतच “आकाशाखालच्या सबंध सृष्टीत” आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला.—कलस्सै. १:६, २३.

७. यहोवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे १८८१ मध्ये त्याच्या सेवकांना कसं समजलं, आणि त्यांनी काय केलं?

आजच्या काळात.  आजसुद्धा यहोवा त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना बळ देत आहे. तो जास्त करून, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या त्याच्या वचनातून आपलं मार्गदर्शन करत आहे. त्यात आपल्याला येशूच्या सेवाकार्याबद्दल आणि त्याने त्याच्या शिष्यांना दिलेल्या आज्ञेबद्दल वाचायला मिळतं. (मत्त. २८:१९, २०) १०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी, म्हणजे जुलै १८८१ मध्ये या नियतकालिकात असं म्हटलं होतं: “लोकांनी आपला मानसन्मान करावा किंवा आपण खूप धनसंपत्ती मिळवावी म्हणून यहोवाने आपल्याला निवडलेलं नाही किंवा अभिषिक्‍त केलेलं नाही;  तर आपल्याजवळ जे काही आहे त्याचा उपयोग आपण आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी  करावा यासाठी त्याने आपल्याला निवडलं आहे.” तसंच, १९१९ मध्ये प्रकाशिकत झालेल्या, टू हूम द वर्क इज एन्ट्रस्टेड  या पुस्तिकेत असं म्हटलं होतं: “हे काम जरी खूप मोठं वाटत असलं, तरी ते प्रभूचं काम आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तोच आपल्याला बळ देईल.” खरंच, पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच या बांधवांनीसुद्धा स्वतःला या कामात धैर्याने झोकून दिलं. कारण त्यांना हा भरवसा होता, की सर्व प्रकारच्या लोकांना प्रचार करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना मदत करेल. आणि तोच भरवसा आज आपल्यालाही आहे.

आनंदाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने नेहमीच, उपलब्ध असलेल्या सगळ्यात चांगल्या साधनांचा उपयोग केला आहे (परिच्छेद ८-९ पाहा)

८-९. आनंदाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने कोणकोणत्या पद्धतींचा उपयोग केला आहे?

आनंदाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने नेहमीच, उपलब्ध असलेल्या सगळ्यात चांगल्या साधनांचा उपयोग केला आहे. जसं की छापील साहित्य, “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन,” फोनोग्राफ्स, साऊंड कार्स, रेडिओ स्टेशन्स; आणि अलीकडच्या काळात कंप्युटर आणि इंटरनेट. याशिवाय, आज यहोवाची संघटना अनेक भाषांमध्ये साहित्यांचं भाषांतर करत आहे. यापूर्वी कधीच इतक्या भाषांमध्ये भाषांतर केलं गेलं नाही. सर्व प्रकारच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत आनंदाचा संदेश ऐकायला मिळावा म्हणून भाषांतराचं हे काम केलं जात आहे. खरंच, यहोवा भेदभाव करत नाही. त्याने आधीच हे सांगितलं होतं, की आनंदाचा संदेश “प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जातीच्या लोकांना” घोषित केला जाईल. (प्रकटी. १४:६, ७) कारण राज्याचा संदेश सगळ्या लोकांना ऐकायला मिळावा अशी त्याची इच्छा आहे.

आज काही लोक अशा सोसायटीमध्ये राहतात जिथे आपल्याला प्रचार करायची परवानगी नसते. अशा लोकांपर्यंत आनंदाचा संदेश पोचवण्यासाठी यहोवाने त्याच्या संघटनेला वेगवेगळ्या प्रकारे सार्वजनिक साक्षकार्य करायला मदत केली आहे. उदाहरणार्थ, २००१ मध्ये नियमन मंडळाने फ्रान्समधल्या भाऊबहिणींना ट्रॉलीचा, टेबलचा आणि अशा इतर साधनांचा उपयोग करून सार्वजनिक साक्षकार्य करायची परवानगी दिली. आणि नंतर इतर ठिकाणीही अशा प्रकारे साक्षकार्य करायची परवानगी देण्यात आली. याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळाले. नंतर २०११ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क सीटीतल्या सगळ्यात गजबजलेल्या भागांमध्ये अशा प्रकारचं साक्षकार्य सुरू करण्यात आलं. पहिल्याच वर्षी १,०२,१२९ इतकी पुस्तकं आणि ६८,९११ मासिकं देण्यात आली. आणि ४,७०१ लोकांनी बायबल अभ्यासासाठी विनंती केली! यावरून दिसून आलं, की या कामाला पवित्र आत्म्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे नियमन मंडळाने जगभरातल्या सगळ्या भाऊबहिणींना ट्रॉलीचा, टेबलचा आणि अशा इतर साधनांचा उपयोग करून सार्वजनिक साक्षकार्य करायची परवानगी दिली.

१०. सेवाकार्यातलं कौशल्य सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकतो?

१० तुम्ही काय करू शकता?  ख्रिस्ती सभांद्वारे यहोवा आपल्याला जे प्रशिक्षण देतो त्याचा पूर्ण फायदा घ्या. तुम्ही ज्या क्षेत्र सेवेच्या गटात आहात त्यासोबत नियमितपणे काम करा. तिथे तुम्हाला तुमचं सेवाकार्यातलं कौशल्य सुधारण्यासाठी वैयक्‍तिक मदत मिळेल, आणि भाऊबहिणींच्या चांगल्या उदाहरणामुळे प्रोत्साहन मिळेल. समस्या आल्या तरी सेवाकार्य सोडू नका. कारण, या लेखाच्या मुख्य वचनात सांगितल्याप्रमाणे आपण स्वतःच्या बळावर नाही, तर पवित्र आत्म्याच्या मदतीने देवाचं काम पूर्ण करू शकतो. (जख. ४:६) आपण देवाचं काम करत असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला बळ देईल याची आपण खातरी बाळगू शकतो.

यहोवा सुव्यवस्थेचा आणि शांतीचा देवा आहे

११. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांमध्ये शांती टिकवून ठेवण्यासाठी नियमन मंडळाने कशा प्रकारे काम केलं?

११ पहिल्या शतकात.  देवाच्या लोकांमध्ये सुव्यवस्था आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी यरुशलेममधल्या नियमन मंडळाने एकत्र मिळून काम केलं. (प्रे. कार्ये २:४२) उदाहरणार्थ, इ.स. ४९ च्या सुमारास सुंतेचा वादविषय समोर आला तेव्हा नियमन मंडळाने काय केलं त्याचा विचार करा. त्यांनी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने एकत्र मिळून त्या विषयावर चर्चा केली. ख्रिस्ती मंडळीतला हा वाद मिटला नसता, तर प्रचाराच्या कामात अडथळा निर्माण झाला असता. नियमन मंडळावर काम करणारे प्रेषित आणि वडीलजन यहुदी होते. पण त्यांनी यहुदी परंपरेचा किंवा यहुदी शिकवणींना उत्तेजन देणाऱ्‍या लोकांचा आपल्या निर्णयावर परिणाम होऊ दिला नाही. उलट, ते मार्गदर्शनासाठी देवाच्या वचनावर आणि पवित्र आत्म्यावर विसंबून राहिले. (प्रे. कार्ये १५:१, २, ५-२०, २८) याचा काय परिणाम झाला? यहोवाने त्यांच्या निर्णयावर आशीर्वाद दिला, बांधवांमधली शांती आणि एकी टिकून राहिली आणि प्रचाराचं काम वाढत गेलं.—प्रे. कार्ये १५:३०, ३१; १६:४, ५.

१२. आजसुद्धा यहोवाच्या संघटनेत सुव्यवस्था आणि शांती कशी दिसून येते?

१२ आजच्या काळात.  आजसुद्धा यहोवाच्या संघटनेने त्याच्या लोकांना सुव्यवस्था आणि शांती टिकवून ठेवायला मदत केली आहे. उदाहरणार्थ, १८९५ मध्ये झायन्स वॉच टावर ॲण्ड हेरअल्ड ऑफ क्राईस्ट्‌स प्रेजेन्स  याच्या १५ नोव्हेंबरच्या अंकात एक लेख दिला होता. १ करिंथकर १४:४० या वचनावर आधारित असलेल्या त्या लेखाचा विषय असा होता: “शिस्तीने आणि सुव्यवस्थितपणे.” त्या लेखात असं म्हटलं होतं: “प्रेषितांनी पहिल्या शतकातल्या मंडळ्यांना सुव्यवस्थेबद्दल  बरंच काही लिहून पाठवलं होतं. . . . आपल्याला शिक्षण देण्याकरता आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टींचं काळजीपूर्वक पालन करत राहणं खूप महत्त्वाचं आहे.” (रोम. १५:४) पहिल्या शतकाप्रमाणेच आजसुद्धा यहोवाच्या संघटनेत सुव्यवस्था आणि शांती दिसून येते. उदाहरणार्थ, तुम्ही जर स्वतःच्याच देशातल्या किंवा दुसऱ्‍या एखाद्या देशातल्या मंडळीत गेलात, आणि तिथे टेहळणी बुरूज  अभ्यासाला उपस्थित राहिलात, तर तुम्हाला तिथे वेगळं काही वाटणार नाही. कारण, सभेत कोणत्या लेखावर चर्चा केली जाणार आहे आणि ती चर्चा कशी केली जाणार आहे, हे तुम्हाला माहीत असतं. जगभरातल्या बांधवांमधली ही एकता फक्‍त देवाच्या पवित्र आत्म्यामुळेच शक्य होते.—सफ. ३:९.

१३. याकोब ३:१७ हे वचन लक्षात ठेवून आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१३ तुम्ही काय करू शकता?  यहोवाची अशी इच्छा आहे, की त्याच्या लोकांनी “शांतीच्या बंधनात,” राहण्याचा आणि “पवित्र आत्म्यामुळे उत्पन्‍न होणारी एकता टिकवून ठेवण्याचा” प्रयत्न करावा. (इफिस. ४:१-३) त्यामुळे स्वतःला विचारा: ‘मी मंडळीत शांती आणि एकता टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो का? नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांचं मी ऐकतो का? इतर जण माझ्यावर भरवसा ठेवू शकतात का, खासकरून मंडळीत माझ्यावर जबाबदाऱ्‍या असतात तेव्हा? मी सगळं काही वेळेवर करतो का? मदत करायला आणि सेवा करायला मी पुढे येतो का?’ (याकोब ३:१७ वाचा.) या बाबतींत कुठे सुधारणा करायची गरज आहे असं जर तुम्हाला जाणवलं, तर पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करा. तुम्ही जितका स्वतःमध्ये बदल कराल, तितकंच मंडळीतले भाऊबहीण तुमच्यावर प्रेम करतील आणि तुमच्या कामाची कदर करतील.

यहोवा आपल्याला शिकवतो आणि लागणारी मदत पुरवतो

१४. कलस्सैकर १:९, १० या वचनांनुसार यहोवाने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना कसं शिकवलं?

१४ पहिल्या शतकात.  यहोवाला आपल्या लोकांना शिकवायला खूप आवडतं. (स्तो. ३२:८) कारण त्याची अशी इच्छा आहे, की आपण त्याला जाणून घ्यावं, त्याच्यावर प्रेम करावं आणि सर्वकाळ जगावं. जर यहोवाने आपल्याला शिकवलं नसतं, तर या सगळ्या गोष्टी शक्यच झाल्या नसत्या. (योहा. १७:३) यहोवाने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना शिकवण्यासाठी मंडळीचा उपयोग केला. (कलस्सैकर १:९, १० वाचा.) तसंच, येशूने जो “सहायक,” म्हणजे पवित्र आत्मा द्यायचं वचन दिलं होतं, तो मिळाल्यामुळेही शिष्यांना मदत केली. (योहा. १४:१६) पवित्र आत्म्याने त्यांना देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत केली. तसंच, येशूने शिकवलेल्या आणि केलेल्या सगळ्या गोष्टी आठवणीत आणून द्यायलाही आत्म्याने त्यांना मदत केली. या सगळ्या गोष्टी पुढे शुभवर्तमानाच्या पुस्तकांत लिहिण्यात आल्या. या माहितीमुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा विश्‍वास मजबूत झाला, आणि यहोवावरचं, येशूवरचं आणि एकमेकांवरचं त्यांचं प्रेमही वाढलं.

१५. यशया २:२, ३ यात यहोवाने दिलेलं अभिवचन तो कशा प्रकारे पूर्ण करत आहे?

१५ आजच्या काळात.  यहोवाने हे आधीच सांगितलं होतं, की “शेवटच्या दिवसांत” सर्व राष्ट्रांतले लोक त्याच्याकडून शिकण्यासाठी त्याच्या ‘डोंगराकडे’ येतील; म्हणजेच, खऱ्‍या उपासकांसोबत मिळून त्याची उपासना करतील. (यशया २:२, ३ वाचा.) आज ही भविष्यवाणी पूर्ण होत असल्याचं आपण पाहत आहोत. खरी उपासना ही सर्व प्रकारच्या खोट्या उपासनेपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे आपण पाहू शकतो. तसंच, आज यहोवाने आपल्यासमोर किती मोठी आध्यात्मिक मेजवानी मांडली आहे त्याचाही विचार करा! (यश. २५:६) आज विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे यहोवा भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न तर पुरवतोच; पण त्यासोबतच तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अन्‍नही पुरवतो. जसं की, आपण वेगवेगळे लेख वाचू शकतो, वेगवेगळी भाषणं ऐकू शकतो आणि वेगवेगळे कार्टून व्हिडिओ आणि इतर प्रकारचे व्हिडिओ पाहू शकतो. (मत्त. २४:४५) त्यामुळे आपणसुद्धा अलीहूसारखंच म्हणू शकतो: “[देवासमान] शिक्षण देणारा कोण आहे?”—ईयो. ३६:२२.

स्वतःला सत्याची खातरी पटवून द्या आणि ते जीवनात लागू करा (परिच्छेद १६ पाहा) *

१६. यहोवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१६ तुम्ही काय करू शकता?  तुम्ही बायबलमधून जे काही वाचता आणि शिकता ते जीवनात लागू करायला देवाचा आत्मा तुम्हाला मदत करू शकतो. त्यामुळे स्तोत्रकर्त्याप्रमाणे प्रार्थना करा: “हे परमेश्‍वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.” (स्तो. ८६:११) तसंच, बायबलचं आणि संघटनेने पुरवलेल्या इतर प्रकाशनांचं वाचन आणि अभ्यास करा. पण आपण हे फक्‍त ज्ञान मिळवण्यासाठी करू नये; तर स्वतःला सत्याची खातरी पटवून देण्यासाठी आणि ते जीवनात लागू करण्यासाठी करावं. आणि हे करायला यहोवाचा आत्मा तुम्हाला मदत करेल. याशिवाय, आपण आपल्या भाऊबहिणींना उत्तेजन दिलं पाहिजे. (इब्री १०:२४, २५) असं करणं का गरजेचं आहे? कारण, ते आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य आहेत. तसंच, सभेत मनापासून उत्तरं द्याला आणि नेमून दिलेला भाग चांगल्या प्रकारे सादर करायला पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. असं करून तुम्ही यहोवाला आणि त्याच्या मुलाला दाखवून द्याल, की त्यांच्या मौल्यवान मेढरांवर तुम्ही मनापासून प्रेम करता.—योहा. २१:१५-१७.

१७. तुम्ही यहोवाच्या संघटनेसोबत मिळून काम करत आहात हे तुम्ही कसं दाखवू शकता?

१७ लवकरच अशी एक वेळ येईल जेव्हा या पृथ्वीवर फक्‍त एकच संघटना असेल. ती म्हणजे, यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे चालवत असलेली संघटना. म्हणून यहोवाच्या संघटनेसोबत मिळून आवेशाने काम करा. यहोवासारखंच सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम करा. आणि कोणताही भेदभाव न करता सगळ्या लोकांना आनंदाचा संदेश सांगा. तसंच, यहोवासारखंच सुव्यवस्थितपणे आणि शांतीने काम करा, आणि मंडळीतली एकता टिकवून ठेवा. याशिवाय, आपल्या महान शिक्षकाचं ऐका आणि जी आध्यात्मिक मेजवानी तो देत आहे तिचा पूर्ण फायदा घ्या. मग जेव्हा सैतानाच्या जगाचा नाश होईल तेव्हा तुम्हाला मुळीच भीती वाटणार नाही. उलट, यहोवाच्या संघटनेसोबत मिळून विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या लोकांमध्ये तुम्ही धैर्याने उभे राहाल.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

^ परि. 5 आज यहोवा त्याची संघटना चालवत आहे याची तुम्हाला पक्की खातरी आहे का? त्याने पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीचं मार्गदर्शन कसं केलं, आणि आज तो हे कसं करत आहे, याची चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

^ परि. 1 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: यहोवाच्या संघटनेचे दोन भाग आहेत. एक स्वर्गातला आणि एक पृथ्वीवरचा. या लेखात, “संघटना” हा शब्द पृथ्वीवरच्या भागाला सूचित करतो.

^ परि. 52 चित्रांचं वर्णन: प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्‍या भाऊबहिणींचे व्हिडिओ पाहून एका पायनियर बहिणीलाही तेच ध्येय ठेवायचं प्रोत्साहन मिळतं. शेवटी, तीसुद्धा आपलं हे ध्येय पूर्ण करते.