व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४२

बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग २

बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग २

“स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.” —१ तीम. ४:१६.

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

सारांश *

१. शिष्य बनवण्याचं काम हे जीवन वाचवण्याचं काम आहे, असं आपण का म्हणू शकतो?

शिष्य बनवण्याचं काम हे जीवन वाचवण्याचं काम आहे! असं का म्हणता येईल? मत्तय २८:१९, २० या वचनांमध्ये येशूने काय आज्ञा दिली त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “जा आणि . . . लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . बाप्तिस्मा द्या.” बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे? कारण आपल्याला जर आपला जीव वाचवायचा असेल, तर बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. पण जीव वाचवण्यासाठी किंवा सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी एका व्यक्‍तीने हे मान्य केलं पाहिजे, की येशूने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं आणि त्याचं पुनरुत्थान झालं. म्हणूनच प्रेषित पेत्र इतर ख्रिश्‍चनांना असं म्हणाला: ‘आज येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे बाप्तिस्मा तुमचं जीवन वाचवत  आहे.’ (१ पेत्र ३:२१) त्यामुळे, जेव्हा एक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेतो तेव्हा त्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, की शिष्य बनवण्याचं काम हे जीवन वाचवण्याचं काम आहे.

२. दुसरे तीमथ्य ४:१, २ या वचनांनुसार आपण काय केलं पाहिजे?

शिष्य बनवण्यासाठी आपण आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवलं पाहिजे. (२ तीमथ्य ४:१, २ वाचा.) असं करणं का गरजेचं आहे? कारण येशूने अशी आज्ञा दिली, की “जा आणि . . . लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . शिकवा.” प्रेषित पौलनेही म्हटलं, “तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.” आणि या कामात “टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःला आणि जे तुझे ऐकतात त्यांनाही वाचवशील.”  (१ तीम ४:१६) आपण जर लोकांना चांगल्या प्रकारे शिकवलं तरच ते शिष्य बनतील. म्हणून आपण आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवत राहिलं पाहिजे.

३. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

आज आपण लाखो लोकांसोबत बायबल अभ्यास करत आहोत. पण आधीच्या लेखात आपण पाहिलं होतं, की यांपैकी जास्तीत जास्त लोकांना बाप्तिस्मा घ्यायला आणि येशूचे शिष्य बनायला आपल्याला मदत करायची आहे. मग हे आपण कसं करू शकतो? याचे आणखी पाच मार्ग या लेखात सांगितले आहेत.

स्वतःच बोलू नका, तर बायबलला बोलू द्या

शिकवताना बायबलचा चांगला वापर करण्यासाठी एका अनुभवी प्रचारकाची मदत घ्या (परिच्छेद ४-६ पाहा) *

४. बायबल अभ्यास घेणाऱ्‍याने आत्मसंयम का बाळगला पाहिजे? (तळटीप पाहा.)

आपण बायबलमधून जे काही शिकवतो ते आपल्याला खूप आवडतं. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला खूप काही बोलावंसं वाटू शकतं. पण कोणताही अभ्यास घेताना आपणच जास्त बोलू नये. मग तो टेहळणी बुरूज  अभ्यास असो, मंडळीचा बायबल अभ्यास असो किंवा आपण एखाद्यासोबत करत असलेला बायबल अभ्यास असो. अभ्यास घेणाऱ्‍याने बायबलला बोलू दिलं पाहिजे. त्यासाठी त्याने आत्मसंयम बाळगण्याची गरज आहे. म्हणजे बायबलच्या एखाद्या वचनाबद्दल किंवा विषयाबद्दल त्याला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगण्याचा त्याने प्रयत्न करू नये. * (योहा. १६:१२) तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्हाला बायबलचं किती ज्ञान होतं आणि आता किती आहे याचा विचार करा. बाप्तिस्म्याच्या वेळी तुम्हाला बायबलच्या फक्‍त मूलभूत शिकवणी माहीत होत्या. (इब्री ६:१) पण आज तुम्हाला जितकं माहीत आहे, ते शिकण्यासाठी तुम्हाला बरीच वर्षं लागली. त्यामुळे नवीन विद्यार्थ्याला सगळं काही एकाच वेळी शिकवण्याचा प्रयत्न करू नका.

५. (क) १ थेस्सलनीकाकर २:१३ या वचनानुसार आपल्या विद्यार्थ्याने काय समजून घ्यावं अशी आपली इच्छा आहे? (ख) शिकत असलेल्या गोष्टींबद्दल आपण विद्यार्थ्याला बोलायचं प्रोत्साहन कसं देऊ शकतो?

आपला विद्यार्थी जे काही शिकत आहे ते तो बायबलमधून शिकत आहे, हे त्याने समजून घ्यावं अशी आपली इच्छा आहे. (१ थेस्सलनीकाकर २:१३ वाचा.) हे समजण्यासाठी आपण त्याला कशी मदत करू शकतो? त्यासाठी बायबलची वचनं नेहमी तुम्हीच समजावून सांगण्याऐवजी विद्यार्थ्यालाही काही वचनं समजवायला सांगा. अशा प्रकारे शिकत असलेल्या गोष्टींबद्दल त्याला बोलायचं प्रोत्साहन द्या. तसंच, बायबलची वचनं तो आपल्या जीवनात कशी लागू करू शकतो, याचा विचार करायलाही त्याला मदत करा. त्यासाठी त्याला असे प्रश्‍न विचारा ज्यांमुळे वाचलेल्या वचनांबद्दल तो काय विचार करतो आणि त्याला काय वाटतं, हे त्याला सांगता येईल. (लूक १०:२५-२८) जसं की, त्याला असं विचारा: “या वचनांतून तुम्हाला यहोवाचा कोणता गुण दिसून येतो?” “तुम्ही बायबलमधून आत्ताच जे सत्य शिकलात त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?” “तुम्ही जे काही शिकलात त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?” (नीति. २०:५) विद्यार्थ्याला बायबलचं किती ज्ञान आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्याला जे काही माहीत आहे ते त्याच्यासाठी किती मोलाचं आहे आणि ते तो किती लागू करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे.

६. बायबल अभ्यासासाठी एखाद्या अनुभवी प्रचारकाला घेऊन जाणं का चांगलं आहे?

बायबल अभ्यासासाठी तुम्ही कधी अशा प्रचारकाला घेऊन जाता का ज्याला शिकवण्याचा चांगला अनुभव आहे? घेऊन जात असाल, तर तुम्ही त्याला विचारू शकता: ‘मी बायबल अभ्यास कसा चालवला?’ आणि ‘शिकवताना मी बायबलचा चांगला उपयोग केला का?’ तुम्हाला जर तुमचं शिकवण्याचं कौशल्य वाढवायचं असेल, तर तुम्ही नम्र असलं पाहिजे. (प्रेषितांची कार्ये १८:२४-२६ पडताळून पाहा.) त्यानंतर त्या अनुभवी प्रचारकाला विचारा: ‘तुम्हाला काय वाटतं, विद्यार्थी ज्या गोष्टी शिकतोय त्या त्याला खरंच समजताएत का?’ तसंच, तुम्ही जर एकदोन आठवड्यांसाठी कुठे बाहेर जाणार असाल, तर तुम्ही त्या अनुभवी प्रचारकाला आपल्या विद्यार्थ्यासोबत बायबल अभ्यास करायला सांगू शकता का? असं केलं, तर त्यामुळे अभ्यास चालू राहील आणि विद्यार्थ्याला अभ्यासाचं महत्त्वही समजेल. असा कधीच विचार करू नका, की ‘हा माझा बायबल अभ्यास आहे आणि तो मीच चालवला पाहिजे.’ शेवटी आपल्याला काय पाहिजे? हेच, की आपल्या विद्यार्थ्याने सत्याबद्दल शिकावं. त्यामुळे दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीने तो बायबल अभ्यास चालवला तरी चालेल.

उत्साहाने आणि पूर्ण खातरीने शिकवा

बायबलची तत्त्वं जीवनात कशी लागू करायची हे विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आपल्या भाऊबहिणींचे अनुभव सांगा (परिच्छेद ७-९ पाहा) *

७. शिकत असलेल्या गोष्टींबद्दल विद्यार्थ्याची आवड वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

बायबलमधली सत्यं शिकवताना तुम्ही ती उत्साहाने आणि पूर्ण खातरीने शिकवली पाहिजेत. (१ थेस्सलनी. १:५) त्यामुळे ती सत्यं तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत आणि त्यांवर तुमचा किती विश्‍वास आहे, हे तुमच्या विद्यार्थ्याला दिसेल. ते पाहून त्यालाही शिकत असलेल्या गोष्टींबद्दल उत्साह वाटेल, आणि त्याची शिकण्याची आवड आणखी वाढेल. बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे तुम्हाला स्वतःला कसा फायदा झाला, हेसुद्धा तुम्ही आपल्या विद्यार्थ्याला सांगू शकता. त्यामुळे तो हे समजू शकेल, की बायबल आपल्यालाही व्यावहारिक रितीने मदत करू शकतं.

८. बायबल विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता, आणि असं करणं का महत्त्वाचं आहे?

बायबल अभ्यास करत असताना आपल्या विद्यार्थ्याला अशा भाऊबहिणींचे अनुभव सांगा ज्यांनी त्याच्यासारख्याच समस्यांचा सामना केला आणि त्यांवर मात केली. किंवा अभ्यासासाठी तुम्ही अशा एका प्रचारकाला सोबत घेऊन जाऊ शकता ज्याच्या चांगल्या उदाहरणामुळे विद्यार्थ्याला फायदा होऊ शकतो. याशिवाय, तुम्ही टेहळणी बुरूज  नियतकालिकातल्या, “बायबलने बदलले जीवन” या लेखमालेतले अनुभव विद्यार्थ्याला सांगू शकता. किंवा jw.org वेबसाईटवरचे काही अनुभवही तुम्ही त्याला दाखवू शकता. अशा लेखांमुळे आणि व्हिडिओंमुळे तुमच्या विद्यार्थ्याला हे समजेल, की बायबलची तत्त्वं आपल्या जीवनात लागू करणं किती महत्त्वाचं आहे.

९. तुम्ही विद्यार्थ्याला तो शिकत असलेल्या गोष्टींबद्दल त्याच्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलायचं प्रोत्साहन कसं देऊ शकता?

विद्यार्थी जर विवाहित असेल तर त्याचा जोडीदारही अभ्यासाला बसतो का? नसेल, तर तुम्ही त्या जोडीदाराला अभ्यासासाठी विचारू शकता. विद्यार्थी जे काही शिकत आहे त्याबद्दल त्याला आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलायचं प्रोत्साहन द्या. (योहा. १:४०-४५) तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही त्याला काही प्रश्‍न विचारू शकता; जसं की, “तुम्ही आत्ताच जे शिकलात ते तुम्ही तुमच्या कुटुंबाला कसं समजावून सांगाल?” किंवा, “हा मुद्दा पटवून देण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला कोणतं शास्त्रवचन दाखवाल?” अशा प्रकारे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला शिक्षक बनायचं प्रशिक्षण देत असता. मग जेव्हा तो बाप्तिस्मारहित प्रचारक बनेल तेव्हा त्याला मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत प्रचारकार्य करता येईल. तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला विचारू शकता, की त्याच्या ओळखीचं असं कोणी आहे का ज्याला बायबल अभ्यास करायला आवडेल. त्याने जर कोणाचं नाव सुचवलं तर लगेच त्या व्यक्‍तीला भेटा आणि तिला बायबल अभ्यासाबद्दल सांगा. आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो?  * हा व्हिडिओ त्या व्यक्‍तीला दाखवा.

विद्यार्थ्याला मंडळीत मित्र बनवायचं प्रोत्साहन द्या

विद्यार्थ्याला मंडळीत मित्र बनवायचं प्रोत्साहन द्या (परिच्छेद १०-११ पाहा) *

१०. पहिले थेस्सलनीकाकर २:७, ८ या वचनांत पौलबद्दल जे सांगितलं आहे त्याचं एक शिक्षक अनुकरण कसं करू शकतो?

१० शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची मनापासून काळजी घेतली पाहिजे. पुढे जाऊन ते आपले भाऊबहीण बनतील असा आपण त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८ वाचा.) यहोवाची सेवा करण्यासाठी जगातले मित्र सोडून देणं आणि जीवनात बदल करणं हे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी सोपं नाही. म्हणून आपण त्यांना मंडळीत मित्र बनवायला मदत केली पाहिजे. पण त्यासाठी सर्वातआधी तुम्ही त्यांचे चांगले मित्र बनले पाहिजेत. त्याकरता फक्‍त अभ्यासाच्या वेळी नाही, तर इतर वेळीही त्यांच्यासोबत वेळ घालवा. तुम्ही अधूनमधून त्यांना फोन करू शकता, मेसेज करू शकता किंवा त्यांना सहजच भेटायला जाऊ शकता. यावरून त्यांना दिसून येईल की तुम्ही मनापासून त्यांची काळजी करता.

११. आपण आपल्या विद्यार्थ्याची भाऊबहिणींसोबत ओळख का करून दिली पाहिजे?

११ असं म्हटलं जातं, की “एका मुलाला वाढवण्यासाठी संपूर्ण गावाचा हातभार लागतो.” तसंच आपणही म्हणू शकतो, की “एक शिष्य बनवण्यासाठी संपूर्ण मंडळीचा हातभार लागतो.” म्हणूनच एक चांगला शिक्षक आपल्या विद्यार्थ्याची मंडळीतल्या इतर भाऊबहिणींशी ओळख करून देतो. याचा विद्यार्थ्यावर चांगला परिणाम होतो. जसं की, त्याला यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत होते, त्याला देवाच्या लोकांमध्ये चांगल्या संगतीचा आनंद घेता येतो आणि गरज पडल्यावर त्याला भाऊबहिणींकडून भावनिक रित्या मदत मिळते. आपल्या विद्यार्थ्याला मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत आपलेपणा वाटावा आणि त्याने त्यांना आपल्या कुटुंबासारखं समजावं अशी आपली इच्छा आहे. तसंच आपल्याला असंही वाटतं, की त्याने भाऊबहिणींमधलं प्रेम पाहावं आणि सगळ्यांशी मैत्री करावी. असं जर झालं, तर जगातले मित्र सोडायला त्याला कठीण जाणार नाही. (नीति. १३:२०) आणि त्याच्या आधीच्या मित्रांनी जरी त्याला सोडून दिलं, तरी यहोवाच्या मंडळीत आपल्याला चांगले मित्र मिळतील याची त्याला खातरी असेल.—मार्क १०:२९, ३०; १ पेत्र ४:४.

विद्यार्थ्यासोबत नेहमी समर्पण आणि बाप्तिस्म्याबद्दल बोला

एक प्रामाणिक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेण्यासाठी टप्प्याटप्याने प्रगती करतो! (परिच्छेद १२-१३ पाहा)

१२. समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याबद्दल आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यासोबत का बोललं पाहिजे?

१२ समर्पण करून बाप्तिस्मा घेणं इतकं महत्त्वाचं का आहे याबद्दल आपल्या विद्यार्थ्याशी नेहमी बोलत राहा. कारण शेवटी, त्यासाठीच आपण त्याच्यासोबत बायबल अभ्यास करत असतो. विद्यार्थी जर काही महिन्यांपासून नियमितपणे बायबल अभ्यास करत असेल, आणि खासकरून संभाना येत असेल, तर त्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. ती म्हणजे, त्याने पुढे जाऊन एक साक्षीदार म्हणून यहोवाची सेवा करावी यासाठी आपण त्याच्यासोबत बायबल अभ्यास करतो.

१३. विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घेण्यासाठी कोणकोणती पावलं उचलावी लागतात?

१३ एक प्रामाणिक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेण्यासाठी टप्प्याटप्याने प्रगती करतो. सर्वातआधी, तो यहोवाबद्दल शिकून घेतो आणि त्याच्यावर प्रेम करायला, त्याच्यावर विश्‍वास ठेवायला शिकतो. (योहा. ३:१६; १७:३) मग, यहोवासोबत आणि मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत तो जवळची मैत्री करतो. (इब्री १०:२४, २५; याको. ४:८) काही काळाने, तो आपल्या वाईट सवयी सोडून देतो आणि केलेल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करतो. (प्रे. कार्ये ३:१९) तसंच, शिकत असलेल्या गोष्टींवर त्याचा विश्‍वास असल्यामुळे तो त्यांबद्दल इतरांना सांगतो. (२ करिंथ. ४:१३) मग तो यहोवाला आपलं जीवन समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो. (१ पेत्र ३:२१; ४:२) बाप्तिस्म्याचा तो दिवस सर्वांसाठी खरंच किती आनंदाचा दिवस असतो! विद्यार्थी जेव्हा बाप्तिस्मा घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रगती करत असतो, तेव्हा त्याची मनापासून आणि भरभरून प्रशंसा करा. आणि पुढेही अशीच प्रगती करत राहण्याचं त्याला प्रोत्साहन द्या.

विद्यार्थी कशी प्रगती करतो याकडे वेळोवळी लक्ष द्या

१४. विद्यार्थी प्रगती करत आहे की नाही हे एका शिक्षकाला कसं समजेल?

१४ हे खरं आहे, की विद्यार्थ्याला समर्पण करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करत असताना आपण धीर दाखवला पाहिजे. पण त्याला खरंच यहोवाची सेवा करायची इच्छा आहे का हेसुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. तो येशूच्या आज्ञांचं पालन करत आहे हे तुम्हाला दिसून येतं का? की तो फक्‍त माहिती घेण्यासाठी बायबल अभ्यास करत आहे?

१५. शिक्षकाला विद्यार्थ्याची प्रगती कोणकोणत्या गोष्टींवरून दिसून येईल?

१५ विद्यार्थी कशी प्रगती करत आहे याकडे वेळोवेळी लक्ष द्या. जसं की, त्याला यहोवाबद्दल कसं वाटतं हे तो बोलून दाखवतो का? तो यहोवाला प्रार्थना करतो का? (स्तो. ११६:१, २) त्याला बायबल वाचायला आवडतं का? (स्तो. ११९:९७) तो नियमितपणे सभांना येतो का? (स्तो. २२:२२) शिकलेल्या गोष्टींनुसार तो आपल्या जीवनात बदल करतो का? (स्तो. ११९:११२) शिकत असलेल्या गोष्टी तो आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगतो का? (स्तो. ९:१) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याला यहोवाचा साक्षीदार व्हायची इच्छा आहे का? (स्तो. ४०:८) यांपैकी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत विद्यार्थी प्रगती करत नसेल, तर त्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्याबद्दल स्पष्टपणे, पण प्रेमाने त्याच्याशी बोला. *

१६. एखाद्याचा बायबल अभ्यास कधी बंद करायचा हे आपण कसं ठरवू शकतो?

१६ एखाद्या विद्यार्थ्याचा बायबल अभ्यास चालू ठेवायचा की नाही, हेसुद्धा वेळोवेळी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वतःला पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: ‘विद्यार्थी तयारी न करताच अभ्यासाला बसतो का? त्याला सभांना यायला आवडत नाही असं दिसून येतं का? त्याच्या वाईट सवयी अजूनही तशाच आहेत का? तो अजूनही खोट्या धर्माचा सदस्य आहे का?’ या प्रश्‍नांची उत्तरं “हो” अशी आली, तर त्याच्यासोबत बायबल अभ्यास चालू ठेवणं म्हणजे अशा व्यक्‍तीला पोहायला शिकवणं जिला भिजायचीच इच्छा नाही. विद्यार्थ्याला जर शिकत असलेल्या गोष्टींबद्दल कदर नसेल आणि तो जीवनात बदल करायला तयार नसेल, तर त्याच्यासोबत बायबल अभ्यास करत राहण्यात काय अर्थ आहे?

१७. १ तीमथ्य ४:१६ या वचनात सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे?

१७ शिष्य बनवण्याची जबाबदारी पूर्ण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या विद्यार्थ्याने प्रगती करून बाप्तिस्मा घ्यावा अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे अभ्यास घेताना आपण स्वतःच बोलणार नाही, तर बायबलला बोलू देऊ. आपण उत्साहाने आणि पूर्ण खातरीने शिकवू. तसंच, आपण आपल्या विद्यार्थ्याला मंडळीत मित्र बनवायचं प्रोत्साहन देऊ. समर्पण करून बाप्तिस्मा घेणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल आपण सतत आपल्या विद्यार्थ्याशी बोलत राहू. याशिवाय, विद्यार्थी कशी प्रगती करत आहे याकडेही आपण वेळोवेळी लक्ष देऊ. (“ विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करावी म्हणून शिक्षकांनी काय केलं पाहिजे?” ही चौकट पाहा.) जीवन वाचवण्याचं हे काम आपल्याला दिलं आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे! म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला होता होईल तितकी मदत करू या.

गीत ७ ख्रिस्ती समर्पण

^ परि. 5 बायबल अभ्यास चालवण्याचा खूप मोठा बहुमान आपल्याला यहोवाकडून मिळाला आहे. कारण, जेव्हा आपण बायबल अभ्यास चालवतो तेव्हा आपण विद्यार्थ्याला यहोवासारखा विचार करायला आणि वागायला शिकवतो. आपण आपलं शिकवण्याचं कौशल्य कसं वाढवू शकतो, याबद्दल आणखी काही गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत.

^ परि. 4 जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका  याच्या सप्टेंबर २०१६ च्या अंकातला, “बायबल अभ्यास घेताना या गोष्टी टाळा” हा लेख पाहा.

^ परि. 9 JW लायब्ररी मध्ये, मिडिया > आमच्या सभा आणि सेवाकार्य > सेवाकार्यासाठी मदत, या ठिकाणी हा व्हिडिओ पाहा.

^ परि. 76 चित्रांचं वर्णन: बायबल अभ्यास झाल्यानंतर, अनुभवी बहीण दुसऱ्‍या बहिणीला हे समजावून सांगते, की अभ्यास घेताना आपण जास्त बोलू नये.

^ परि. 78 चित्रांचं वर्णन: एक चांगली पत्नी कशी असते याबद्दल विद्यार्थी बायबल अभ्यासात शिकते. आणि नंतर, शिकलेल्या गोष्टी ती आपल्या पतीला सांगते.

^ परि. 80 चित्रांचं वर्णन: विद्यार्थी आणि तिचा पती, मंडळीत मैत्री झालेल्या एका बहिणीच्या घरी इतर भाऊबहिणींसोबत वेळ घालवत आहेत.