व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४५

ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो?

ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो?

‘म्हणून, जा आणि लोकांना शिष्य करा आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.’—मत्त. २८:१९, २०.

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

सारांश *

१. मत्तय २८:१८-२० या वचनांनुसार येशूने शिष्यांना कोणती आज्ञा दिली?

येशूचं पुनरुत्थान झाल्यावर तो गालीलमध्ये जमलेल्या आपल्या शिष्यांना भेटला. त्याला त्यांना एक महत्त्वाची आज्ञा द्यायची होती. ती आपल्याला मत्तय २८:१८-२० (वाचा.) या वचनांमध्ये वाचायला मिळते.

२. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

येशूने शिष्य बनवायची जी आज्ञा दिली होती ती आज देवाच्या प्रत्येक सेवकाने पूर्ण केली पाहिजे. या आज्ञेच्या बाबतीत आता तीन प्रश्‍नांवर आपण चर्चा करू या. पहिला, आपल्या बायबल विद्यार्थ्याला देवाबद्दल शिकवण्यासोबतच आपण आणखी काय केलं पाहिजे? दुसरा, विद्यार्थ्याने आध्यात्मिक प्रगती करावी म्हणून मंडळीतले सगळे प्रचारक काय करू शकतात? आणि तिसरा, अक्रियाशील झालेल्यांनी शिष्य बनवायचं काम पुन्हा सुरू करावं म्हणून आपण त्यांना कशी मदत करू शकतो?

त्यांना ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला शिकवा

३. येशूने कोणती विशिष्ट सूचना दिली?

आपण नेमकं काय केलं पाहिजे हे येशूने अगदी स्पष्टपणे सांगितलं. त्याने आज्ञा केलेल्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना शिकवल्या पाहिजेत. पण येशूच्या आज्ञेतला एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याने असं नाही म्हटलं, की ‘मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवा.’ तर त्याने असं म्हटलं, की “मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला  शिकवा.” या विशिष्ट सूचनेचं पालन करण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्याला फक्‍त काय करायचं एवढंच शिकवू नये, तर ते कसं करायचं हेसुद्धा समजावून सांगितलं पाहिजे. (प्रे. कार्यं ८:३१) असं करणं का गरजेचं आहे?

४. विद्यार्थ्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला कसं शिकवता येईल, हे उदाहरण देऊन सांगा.

आपण विद्यार्थ्याला, ख्रिस्ताने आज्ञा केलेल्या गोष्टी “पाळायला” कसं शिकवू शकतो? हे समजण्यासाठी, कार चालवायला शिकवणाऱ्‍या माणसाचं उदाहरण आपण पाहू या. सगळ्यात आधी, तो कार शिकणाऱ्‍याला ट्रॅफिकचे नियम काय आहेत ते बसून शिकवतो. पण ते नियम कसे पाळायचे हे शिकवण्यासाठी त्याला आणखी एक गोष्ट करावी लागते. ती म्हणजे, आता प्रत्यक्षात गाडी कशी चालवायची हे त्याला समजावून सांगावं लागतं. त्यासाठी, शिकणारा गाडी चालवत असतो तेव्हा तो त्याच्या बाजूला बसतो आणि शिकलेले ट्रॅफिकचे नियम कसे पाळायचे हे त्याला सांगतो. या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

५. (क) योहान १४:१५ आणि १ योहान २:३ या वचनांत सांगितल्याप्रमाणे, आपण आपल्या विद्यार्थ्याला काय करायला शिकवलं पाहिजे? (ख) विद्यार्थ्याला शिकलेल्या गोष्टी लागू करायला आपण कशी मदत करू शकतो?

आपण जेव्हा एखाद्यासोबत बायबलचा अभ्यास करतो तेव्हा आपण त्याला देवाच्या आज्ञा, त्याचे स्तर आणि त्याची तत्त्वं शिकवत असतो. पण तेवढंच करणं पुरेसं नाही; तर शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू कशा करायच्या हेसुद्धा आपण त्याला शिकवलं पाहिजे. (योहान १४:१५; १ योहान २:३ वाचा.) आपल्याला ते कसं करता येईल? आपल्या वागण्या-बोलण्यातून आपण त्याला दाखवू शकतो, की शिकलेल्या गोष्टी तो शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा इतर वेळी कशा लागू करू शकतो. तसंच, तुमचा एखादा अनुभव सांगूनही तुम्ही त्याला शिकवू शकता. जसं की, बायबलचं एखादं तत्त्व लागू केल्यामुळे धोक्यापासून तुमचं संरक्षण कसं झालं, किंवा एखादा योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला कशी मदत झाली याबद्दलचा एखादा अनुभव तुम्ही त्याला सांगू शकता. याशिवाय, तुम्ही विद्यार्थ्यासोबत प्रार्थना करू शकता. आणि यहोवाने आपल्या पवित्र शक्‍तीद्वारे विद्यार्थ्याचं मार्गदर्शन करावं अशी विनंती तुम्ही करू शकता.—योहा. १६:१३.

६. विद्यार्थ्याला येशूच्या आज्ञा पाळायला शिकवण्यासाठी आपण आणखी काय केलं पाहिजे?

विद्यार्थ्याला येशूच्या आज्ञा पाळायला शिकवण्यासाठी आपण आणखी काय केलं पाहिजे? आपण त्याच्या मनात शिष्य बनवण्याच्या कामाची आवड निर्माण केली पाहिजे. पण काही विद्यार्थ्यांना प्रचार करायला कदाचित भीती वाटू शकते. त्यामुळे त्यांना बायबलची सत्यं शिकवताना आपल्याला धीर दाखवायची गरज आहे. जर बायबलची सत्यं विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे समजली, त्याच्या मनापर्यंत पोचली, तरच त्याचा विश्‍वास वाढेल आणि प्रचार करायची आवड त्याच्या मनात निर्माण होईल. पण आपण ही आवड व्यावहारिक मार्गांनी कशी निर्माण करू शकतो?

७. विद्यार्थ्याला व्यावहारिक मार्गांनी मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?

विद्यार्थ्याला व्यावहारिक मार्गांनी मदत करण्यासाठी आपण त्याला काही प्रश्‍न विचारू शकतो. जसं की: “बायबलच्या शिकवणी जीवनात लागू केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा झालाय? तुम्हाला जसा फायदा झाला तसाच इतरांनाही व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? मग त्या लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?” (नीति. ३:२७; मत्त. ९:३७, ३८) त्यानंतर, आपल्या शिकवण्याच्या साधनांमध्ये ज्या वेगवेगळ्या पत्रिका आहेत त्या विद्यार्थ्याला दाखवा. त्यांपैकी कोणते विषय त्याच्या नातेवाइकांना, मित्रांना किंवा कामावरच्या लोकांना वाचायला आवडतील हे त्याला विचारा. त्यातल्या काही पत्रिका त्याला द्या. मग तो त्या पत्रिका त्यांना आदराने कशा देऊ शकतो याचा सराव त्याच्यासोबत करा. आणि पुढे जेव्हा तो प्रचारक बनेल, तेव्हा त्याला मदत करण्यासाठी त्याच्यासोबत प्रचार करा.—उप. ४:९, १०; लूक ६:४०.

विद्यार्थ्याला प्रगती करायला मंडळी कशी मदत करू शकते?

८. विद्यार्थ्याने देवावर आणि शेजाऱ्‍यावर असलेलं आपलं प्रेम वाढवणं का गरजेचं आहे? (“ देवावरचं प्रेम वाढवायला आपल्या विद्यार्थ्याला कशी मदत कराल?” ही चौकटही पाहा.)

येशूने आपल्याला काय करायला सांगितलं ते आठवा. त्याने म्हटलं: “मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी  त्यांना पाळायला शिकवा.” यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञा पाळायला शिकवणंही येतं. त्या म्हणजे, देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम करणं. या दोन्ही आज्ञांचा प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामाशी खूप जवळचा संबंध आहे. (मत्त. २२:३७-३९) तो कसा? प्रचार करायचं आपलं मुख्य कारण म्हणजे देवावर आणि शेजाऱ्‍यावर असलेलं आपलं प्रेम. पण प्रचारकार्य करण्याच्या विचाराने काही विद्यार्थ्यांना भीती वाटू शकते. आणि हे समजण्यासारखं आहे. पण आपण त्यांना आश्‍वासन देऊ शकतो, की यहोवाच्या मदतीने ते हळूहळू आपल्या भीतीवर मात करतील. (स्तो. १८:१-३; नीति. २९:२५) देवावरचं प्रेम वाढवायला तुम्ही विद्यार्थ्याला कशी मदत करू शकता, हे या लेखात दिलेल्या चौकटीत सांगितलं आहे. पण तुमच्याशिवाय मंडळीतले भाऊबहीणही विद्यार्थ्याला देवावरचं प्रेम वाढवायला मदत करू शकतात. ते कसं ते आपण पुढे पाहू या.

९. गाडी शिकणारा मोलाचे धडे कसे शिकत असतो?

आता पुन्हा एकदा सुरुवातीला पाहिलेल्या उदाहरणाचा विचार करा. गाडी शिकणारा जेव्हा रस्त्यावर गाडी चालवायला शिकत असतो, तेव्हा शिकवणारा त्याच्या बाजूला बसलेला असतो. त्या वेळी, गाडी शिकणारा कशा प्रकारे शिकतो? एकतर शिकवणारा जे काही सांगत असतो ते तो लक्ष देऊन ऐकतो. आणि दुसरं म्हणजे, चांगल्या प्रकारे गाडी चालवणाऱ्‍या इतर ड्रायव्हरला तो पाहतो. जसं की, गाडी शिकवणारा त्याचं लक्ष कदाचित अशा एका ड्रायव्हरकडे वेधेल जो इतर गाड्यांना पुढे जाऊ देतो. किंवा, समोरून येणाऱ्‍या ड्रायव्हरला नीट दिसावं म्हणून एखादा ड्रायव्हर कशा प्रकारे आपल्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश कमी करतो हे तो त्याला दाखवतो. अशा चांगल्या उदाहरणांमुळे गाडी शिकणाऱ्‍याला अनेक मोलाचे धडे शिकायला मिळतात. पुढे जेव्हा तो स्वतः गाडी चालवेल तेव्हा या गोष्टींचा त्याला फायदाच होईल.

१०. आध्यात्मिक प्रगती करायला कोणती गोष्ट विद्यार्थ्याला मदत करेल?

१० गाडी शिकणाऱ्‍यासारखंच, एक बायबल विद्यार्थी जेव्हा जीवनाच्या मार्गावर आपला प्रवास सुरू करतो तेव्हा तो फक्‍त आपल्या शिक्षकाकडूनच शिकत नाही; तर यहोवाच्या इतर सेवकांच्या चांगल्या उदाहरणांतूनही तो शिकत असतो. तर मग, विद्यार्थ्याला आध्यात्मिक प्रगती करायला कशामुळे मदत होईल? सभांना उपस्थित राहिल्यामुळे. कारण, सभांमध्ये तो जे काही ऐकेल त्यामुळे त्याचं ज्ञान वाढेल, त्याचा विश्‍वास मजबूत होईल आणि यहोवावरचं त्याचं प्रेम वाढेल. (प्रे. कार्यं १५:३०-३२) तसंच, सभांमध्ये त्याला असे भाऊबहीण भेटतील ज्यांची परिस्थिती त्याच्यासारखीच आहे, किंवा ज्यांनी त्याच्यासारख्याच समस्यांचा यशस्वीपणे सामना केला. म्हणून शिक्षकाने त्यांच्याशी त्याची ओळख करून दिली पाहिजे. आपसात खरं प्रेम दाखवणाऱ्‍या बऱ्‍याच भाऊबहिणींची उदाहरणं त्याला मंडळीत पाहायला मिळतील.

११. एखाद्या बायबल विद्यार्थ्याला मंडळीत कोणती उदाहरणं पाहायला मिळू शकतात? आणि त्यांचा त्याच्यावर कसा प्रभाव पडू शकतो?

११ काही परिस्थितींचा विचार करा: तुम्ही कदाचित अशा एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास करत असाल, जी एकटीच आपल्या मुलांना वाढवत आहे. मग सभांना येऊ लागल्यावर तिला अशी एक बहीण भेटते, जी तिच्यासारख्याच परिस्थितीचा सामना करत आहे. ती बहीण आपल्या लहान मुलांना घेऊन सभांना येण्यासाठी किती मेहनत घेते हे जेव्हा ती स्त्री पाहते तेव्हा ती गोष्ट तिच्या मनाला स्पर्श करते. किंवा, असा एखादा बायबल विद्यार्थी असेल जो सिग्रेट ओढण्याची सवय मोडायचा खूप प्रयत्न करत आहे. मग सभेमध्ये त्याची ओळख अशा एका प्रचारकाशी होते जो आपल्या या सवयीवर मात करू शकला. प्रचारक त्या विद्यार्थ्याला सांगतो, की यहोवावरचं प्रेम वाढवल्यामुळे त्याला देवाच्या आज्ञा पाळायला आणि ही वाईट सवय मोडायला मदत झाली. (२ करिंथ. ७:१; फिलि. ४:१३) विद्यार्थ्याला आपला अनुभव सांगितल्यावर प्रचारक जेव्हा त्याला असं म्हणतो, की “तुमचीसुद्धा सवय सुटेल,” तेव्हा विद्यार्थ्याला खूप प्रोत्साहन मिळतं आणि त्याचा आत्मविश्‍वास वाढतो. किंवा बायबल अभ्यास करणाऱ्‍या एखाद्या तरुण मुलीला कदाचित असं वाटत असेल, की ती जर साक्षीदार बनली, तर तिच्यावर अनेक बंधनं येतील. पण सभेमध्ये तिला अशी एक तरुण बहीण भेटते जी साक्षीदार बनल्यानंतरही खूप आनंदी आहे. हे पाहून तिला जाणून घ्यावंसं वाटतं, की ती बहीण कशामुळे नेहमी आनंदी असते.

१२. मंडळीतला प्रत्येक जण बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला मदत करू शकतो, असं का म्हणता येईल?

१२ मंडळीतल्या वेगवेगळ्या भाऊबहिणींशी ओळख झाल्यामुळे विद्यार्थ्याला खूप काही शिकायला मिळतं. देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम करायच्या आज्ञेचं पालन कसं करायचं हे त्याला त्यांच्या चांगल्या उदाहरणांतून शिकायला मिळतं. (योहा. १३:३५; १ तीम. ४:१२) तसंच, आधी पाहिल्याप्रमाणे विद्यार्थ्याला अशा भाऊबहिणींकडूनही शिकायला मिळतं जे त्याच्यासारख्याच समस्यांचा सामना करत आहेत. अशा उदाहरणांवरून विद्यार्थ्याला हे समजेल, की येशूचा शिष्य बनण्यासाठी जे काही बदल करायची गरज आहे ते करणं शक्य आहे. (अनु. ३०:११) मंडळीतला प्रत्येक जण अशा वेगवेगळ्या मार्गांनी बायबल विद्यार्थ्याला आध्यात्मिक प्रगती करायला मदत करू शकतो. (मत्त. ५:१६) बायबल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय करत आहात?

अक्रियाशील झालेल्यांना पुन्हा प्रचार करायला मदत करा

१३-१४. निराश झालेल्या आपल्या शिष्यांशी येशू कसा वागला?

१३ जे भाऊबहीण अक्रियाशील झाले आहेत त्यांना पुन्हा प्रचार सुरू करायला आणि शिष्य बनवण्याची आज्ञा पाळायला आपण मदत केली पाहिजे. आपण ती कशी करू शकतो? येशूने आपल्या प्रेषितांना मदत केली तशी.

१४ येशूच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्याचे शिष्य खूप घाबरले आणि “त्याला सोडून पळून गेले.” (मार्क १४:५०; योहा. १६:३२) ते फार निराश झाले होते. मग आपल्या या शिष्यांशी येशू कसा वागला? पुनरुत्थान झाल्याच्या काही वेळानंतरच त्याने आपल्या काही अनुयायांना म्हटलं: “घाबरू नका! जा आणि माझ्या भावांना ही बातमी सांगा, [की मी पुन्हा जिवंत झालो आहे].” (मत्त. २८:१०क) यावरून दिसून येतं, की शिष्य जरी त्याला सोडून पळून गेले, तरी येशूने मात्र त्यांना सोडून दिलं नाही. उलट, त्याने त्यांना ‘माझे भाऊ’ असं म्हटलं. यहोवाप्रमाणेच येशू त्यांच्याशी दयाळूपणे वागला आणि त्याने त्यांना माफ केलं.—२ राजे १३:२३.

१५. ज्यांनी प्रचारकार्य करायचं सोडून दिलं आहे अशांबद्दल आपल्याला कसं वाटतं?

१५ ज्यांनी प्रचार करायचं सोडून दिलं आहे त्यांच्याबद्दल येशूप्रमाणेच आपल्यालाही काळजी वाटते. कारण ते आपले भाऊबहीण आहेत आणि आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यांनी यहोवाच्या सेवेत पूर्वी जी मेहनत घेतली होती, ती अजूनही आपल्याला आठवते. त्यांच्यापैकी काहींनी तर अनेक वर्षं खूप मेहनत घेतली होती. (इब्री ६:१०) अशा भाऊबहिणींची आपल्याला खरंच खूप आठवण येते! (लूक १५:४-७) तर मग, येशूने शिष्यांबद्दल जशी काळजी दाखवली, तशीच काळजी आपणही या भाऊबहिणींबद्दल कशी दाखवू शकतो?

१६. अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला काळजी आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१६ त्यांना सभांना यायचं प्रोत्साहन द्या.  येशूने आपल्या निराश झालेल्या शिष्यांना एका सभेला यायचं प्रोत्साहन दिलं होतं. (मत्त. २८:१०ख; १ करिंथ. १५:६) तसंच, आपणसुद्धा अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींना सभांना यायचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यासाठी कदाचित आपल्याला त्यांना अनेकदा सभांना बोलवावं लागेल. येशूने बोलावलेल्या सभेत त्याचे शिष्य आले, तेव्हा त्याला नक्कीच खूप आनंद झाला असेल. (मत्तय २८:१६ आणि लूक १५:६ पडताळून पाहा.) अगदी तसंच, अक्रियाशील झालेले भाऊबहीण जेव्हा सभेला येतील तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होईल.

१७. अक्रियाशील झालेला एखादा भाऊ किंवा बहीण सभेला येते, तेव्हा आपण काय केलं पाहिजे?

१७ त्यांचं मनापासून स्वागत करा.  येशूचे शिष्य त्या सभेला आले तेव्हा त्याने आनंदाने त्यांचं स्वागत केलं. त्यांनी येऊन आपल्याशी बोलावं अशी अपेक्षा त्याने केली नाही, तर तो स्वतःहून त्यांच्याशी बोलला. (मत्त. २८:१८) तर मग, अक्रियाशील झालेला एखादा भाऊ किंवा बहीण सभेला येते, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? आपण स्वतः पुढे जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे. सुरुवातीला त्यांच्याशी काय बोलावं हे कदाचित आपल्याला कळणार नाही. पण, ‘तुम्हाला पाहून खूप आनंद झाला,’ इतकं तर आपण नक्कीच म्हणू शकतो. पण त्यांना अवघडल्यासारखं वाटेल असं काहीही आपण बोलणार नाही.

१८. आपण अक्रियाशील झालेल्यांचं धैर्य कसं वाढवू शकतो?

१८ त्यांचं धैर्य वाढवा.  संपूर्ण जगभरात प्रचार करायच्या विचाराने येशूच्या शिष्यांना कदाचित भीती वाटली असेल. पण त्यांचं धैर्य वाढवण्यासाठी येशू त्यांना म्हणाला: “मी नेहमी तुमच्यासोबत असेन.” (मत्त. २८:२०) यामुळे शिष्यांचं धैर्य वाढलं का? हो नक्कीच. कारण त्यानंतर लगेच ते आवेशाने लोकांना आनंदाचा संदेश सांगू लागले आणि त्यांना शिकवू लागले. (प्रे. कार्यं ५:४२) त्याचप्रमाणे, अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींनासुद्धा धैर्याची गरज असते. कारण पुन्हा प्रचारकार्य सुरू करायच्या विचाराने त्यांना भीती वाटू शकते. पण आपण त्यांना आश्‍वासन देऊ शकतो, की प्रचारकार्य करत असताना आपण त्यांच्यासोबत असू. त्यामुळे त्यांना एकटं वाटणार नाही. पुढे जेव्हा ते प्रचारकार्य सुरू करतील तेव्हा त्यांच्यासोबत राहून आपण त्यांना मदत करू शकतो. यामुळे त्यांना नक्कीच खूप बरं वाटेल. आपण जर अक्रियाशील झालेल्यांशी आपल्या भाऊबहिणींप्रमाणे वागलो, तर ते पुन्हा यहोवाची सेवा करायला सुरुवात करतील. आणि यामुळे संपूर्ण मंडळीलाच आनंद होईल.

येशूने दिलेलं काम पूर्ण करायची आपली इच्छा आहे

१९. आपली काय इच्छा आहे, आणि का?

१९ शिष्य बनवण्याचं हे काम आपण कधीपर्यंत करत राहू? या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत. (मत्त. २८:२०; शब्दार्थसूचीत “जगाच्या व्यवस्थेची समाप्ती” पाहा.) पण तोपर्यंत आपल्याला हे काम पूर्ण करता येईल का? हो नक्की, आपण तसा दृढनिश्‍चयच केला आहे! आणि म्हणूनच “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांना शोधायला आपण आपला वेळ, शक्‍ती आणि पैसा आनंदाने खर्च करतो. (प्रे. कार्यं १३:४८) असं करून आपण येशूचंच अनुकरण करत असतो. त्याने म्हटलं होतं: “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं  हेच माझं अन्‍न आहे.” (योहा. ४:३४; १७:४) तसंच सोपवलेलं काम पूर्ण करायची आपलीसुद्धा मनापासून इच्छा आहे. (योहा. २०:२१) आणि आपल्यासोबत इतर सगळ्यांनी, अगदी अक्रियाशील झालेल्यांनीसुद्धा, हे काम धीराने करत राहावं असं आपल्याला वाटतं.—मत्त. २४:१३.

२०. फिलिप्पैकर ४:१३ या वचनानुसार आपण येशूने दिलेलं काम पूर्ण करू शकतो असं का म्हणता येईल?

२० हे खरं आहे, की येशूने दिलेलं काम पूर्ण करणं सोपं नाही. पण या कामात आपण एकटे नाही. कारण येशूने आपल्याला अभिवचन दिलं आहे, की तो आपल्यासोबत असेल. तसंच, या कामात आपण “देवाचे सहकारी” म्हणून काम करतो. शिवाय, आपण “ख्रिस्तासोबत” मिळूनही हे काम करत असतो. (१ करिंथ. ३:९; २ करिंथ. २:१७) त्यामुळे आपण ते नक्कीच पूर्ण करू शकतो. खरंच, हे काम करण्याचा आणि इतरांनाही ते करायला मदत करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे!—फिलिप्पैकर ४:१३ वाचा.

गीत ७ ख्रिस्ती समर्पण

^ परि. 5 येशूने आपल्या अनुयायांना सांगितलं, की त्यांनी लोकांना शिष्य बनवावं आणि त्याने आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला  शिकवाव्यात. येशूच्या या आज्ञेचं आपण पालन कसं करू शकतो याची चर्चा या लेखात केली जाईल. या लेखातली काही माहिती, १ जुलै २००४ च्या टेहळणी बुरूज  अंकातल्या पृष्ठं १४-१९ मधून घेतली आहे.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: बायबल अभ्यास चालवणारी एक बहीण आपल्या विद्यार्थीनीला हे समजावून सांगत आहे, की देवावरचं प्रेम वाढवण्यासाठी ती काय करू शकते. बायबल शिक्षकाने सांगितलेल्या तीन गोष्टी ती विद्यार्थीनी नंतर लागू करते.