व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४८

“नेहमी पुढे पाहत राहा”

“नेहमी पुढे पाहत राहा”

“तू नेहमी पुढे पाहत राहा; तुझी नजर नेहमी समोर खिळवून ठेव.”—नीति. ४:२५.

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

सारांश *

१-२. नीतिवचनं ४:२५ यातला सल्ला आपण कसा लागू करू शकतो, हे उदाहरण देऊन सांगा.

पुढे दिलेल्या तीन उदाहरणांचा विचार करा. एका वयस्कर बहिणीला तिच्या तरुणपणाचे दिवस आठवतात. आज जरी तिचं वय झालं असलं, तरी तिच्याने होईल तितकी ती यहोवाची सेवा करत आहे. (१ करिंथ १५:५८) तसंच, ती दररोज स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला नवीन जगात पाहते. आणखी एका बहिणीला आठवतं, की मंडळीतल्या एका व्यक्‍तीने तिचं मन दुखावलं होतं. पण त्या गोष्टीचा राग ती मनात बाळगत नाही. (कलस्सै. ३:१३) तिसरं उदाहरण म्हणजे, एका भावाला त्याने पूर्वी केलेल्या चुका आठवतात. पण आता तो यहोवाला विश्‍वासू राहायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो.—स्तो. ५१:१०.

या तिन्ही उदाहरणांमध्ये कोणती गोष्ट सारखी आहे? तिघांनाही त्यांच्या जीवनात पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवतात. पण त्यांवरच ते विचार करत बसत नाहीत, तर भविष्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा ते विचार करतात.—नीतिवचनं ४:२५ वाचा.

३. नेहमी पुढे पाहत राहणं का महत्त्वाचं आहे?

नेहमी पुढे पाहत राहणं का महत्त्वाचं आहे? एक व्यक्‍ती जर चालताना सतत मागे पाहत राहिली, तर तिला पुढे चालत राहणं कठीण जाईल. आपल्या सेवेच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं. आपण जर घडून गेलेल्या गोष्टी सतत आठवत राहिलो, तर यहोवाची सेवा करत राहणं आपल्याला कठीण जाईल.—लूक ९:६२.

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण अशा तीन गोष्टींवर चर्चा करणार आहोत, ज्या आपण टाळल्या पाहिजेत. (१) जुन्या आठवणींमध्ये अडकून राहणं, (२) मनात राग ठेवणं आणि (३) स्वतःला नको तितका दोष देणं. प्रत्येक मुद्द्‌यावर चर्चा करताना आपण बायबलची काही तत्त्वं पाहू. ही तत्त्वं आपल्याला “मागच्या गोष्टी विसरून” पुढच्या गोष्टींवर लक्ष लावायला मदत करतील.—फिलिप्पै. ३:१३.

जुन्या आठवणींमध्ये अडकून राहू नका

कोणत्या गोष्टी आपल्याला मागे खेचू शकतात? (परिच्छेद ५, ९, १३ पाहा) *

५. उपदेशक ७:१० या वचनाप्रमाणे काय करणं चुकीचं आहे?

उपदेशक ७:१० वाचा. “पूर्वीचे दिवस चांगले  होते,” असं म्हणणं चुकीचं आहे, असं या वचनात म्हटलेलं नाही. कारण, चांगल्या आठवणी मनात जपून ठेवायची क्षमता यहोवानेच आपल्याला दिली आहे. तर त्या वचनात असं म्हटलं आहे, की “‘पूर्वीचे दिवस आजच्यापेक्षा चांगले  होते,’ असं म्हणू नकोस.” दुसऱ्‍या शब्दांत सांगायचं, तर जुने दिवस आठवणं चुकीचं नाही; पण आजच्यापेक्षा जुने दिवस चांगले होते आणि आज आपल्या जीवनात दुःखाशिवाय काहीच नाही, असं म्हणणं चुकीचं आहे.

इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर इस्राएली लोकांनी कोणती चूक केली? (परिच्छेद ६ पाहा)

६. आजच्यापेक्षा पूर्वीचे दिवस चांगले होते असा सतत विचार करणं चुकीचं का आहे? एक उदाहरण द्या.

आजच्यापेक्षा पूर्वीचे दिवस चांगले होते असा सतत विचार करणं चुकीचं का आहे? कारण त्यामुळे पूर्वीच्या दिवसांतल्या फक्‍त चांगल्या गोष्टी आपल्याला आठवतील. पण ज्या वाईट गोष्टी आपल्याला सोसाव्या लागल्या होत्या त्यांचा कदाचित आपल्याला विसर पडेल. इस्राएली लोकांचाच विचार करा. इजिप्त देश सोडल्यानंतर ते लगेच हे विसरून गेले, की तिथे त्यांना किती कष्ट करावे लागले होते. याउलट, तिथे आपल्याला किती चांगल्या-चांगल्या गोष्टी खायला मिळायच्या याचीच ते आठवण करत राहिले. ते म्हणायचे: “इजिप्तमध्ये कसे फुकटात मासे खायला मिळायचे, याची आम्हाला खूप आठवण येते; कलिंगड, कांदे, लसूण, काकड्याही खायला मिळायच्या!” (गण. ११:५) पण या सगळ्या गोष्टी त्यांना खरंच “फुकटात” खायला मिळायच्या का? नाही. त्यासाठी त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. तिथे त्यांना गुलामी करावी लागायची आणि त्यांच्यावर खूप जुलूम केले जायचे. (निर्ग. १:१३, १४; ३:६-९) पण तरीही, हे सगळे कष्ट ते विसरून गेले आणि त्यांना जुन्या दिवसांची ओढ वाटू लागली. यहोवाने नुकत्याच त्यांच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्या विसरून ते जुने दिवस आठवू लागले. त्यांचं हे वागणं यहोवाला मुळीच आवडलं नाही.—गण. ११:१०.

७. जुन्या आठवणींमध्ये अडकून न राहायला एका बहिणीला कशी मदत झाली?

जुन्या आठवणींमध्ये अडकून राहायचं आपण कसं टाळू शकतो? एका बहिणीचा अनुभव विचारात घ्या. १९४५ साली तिने ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा सुरू केली. काही वर्षांनी तिथल्याच एका भावाशी तिचं लग्न झालं. आणि त्या दोघांनी मिळून अनेक वर्षं यहोवाची सेवा केली. पण १९७६ मध्ये तिचे पती आजारी पडले. तिच्या पतीला जेव्हा जाणवलं, की त्यांच्याकडे खूप कमी दिवस उरले आहेत, तेव्हा त्यांनी तिला खूप चांगला सल्ला दिला. त्या सल्ल्याचा पुढे तिला खूप फायदा झाला. त्यांनी तिला म्हटलं होतं: “आपला सुखी संसार होता. पुष्कळ लोकांना हा अनुभव येत नाही.” पण त्यांनी तिला असंही सांगितलं: “तुला जुन्या आठवणी येत राहतील परंतु गतकाळावर विचार करत बसू नकोस. वेळ तुझ्या जखमा भरायला मदत करेल. मनात राग बाळगू नकोस, स्वतःची दया करत बसू नकोस. तुला हा आनंद, हे आशीर्वाद अनुभवायला मिळाले म्हणून आनंद कर. . . . आठवणी, या देवाने आपल्याला दिलेल्या देणग्या आहेत.” खरंच, किती चांगला सल्ला दिला त्या भावाने!

८. पतीचा सल्ला मानल्यामुळे आपल्या बहिणीला कसा फायदा झाला?

बहिणीने आपल्या पतीचा सल्ला मानला. तिने शेवटपर्यंत, म्हणजे वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली. आपल्या मृत्यूच्या काही वर्षांआधी तिने म्हटलं: “यहोवाच्या पूर्ण वेळेच्या ६३ वर्षांच्या सेवेकडे मी मागे वळून पाहते तेव्हा मी म्हणू शकते, की होय, माझं खरोखरच समाधानी जीवन होतं.” ती असं का म्हणू शकली? ती म्हणते: “आपल्या अद्‌भुत बंधूसमाजामुळे, आपल्या बंधूभगिनींबरोबर परादीस पृथ्वीवर राहण्याच्या तसेच एकमेव खरा देव असलेल्या आपल्या महान निर्माणकर्त्याची अनंतकाळ सेवा करण्याच्या आशेमुळे जीवन समाधानकारक बनतं.” * खरंच, नेहमी पुढे पाहत राहण्याच्या बाबतीत या बहिणीने आपल्यासमोर किती चांगलं उदाहरण मांडलं आहे!

मनात राग ठेवू नका

९. लेवीय १९:१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे, एखाद्याला माफ करणं खासकरून केव्हा कठीण वाटू शकतं?

लेवीय १९:१८ वाचा. जर मंडळीतल्या एखाद्या व्यक्‍तीने, एका जवळच्या मित्राने किंवा आपल्या एखाद्या नातेवाइकाने आपलं मन दुखावलं, तर त्याला माफ करणं आपल्याला कधीकधी कठीण जाऊ शकतं. एक उदाहरण विचारात घ्या. मंडळीतल्या एका बहिणीने दुसऱ्‍या एका बहिणीवर आपले पैसे चोरी करायचा आरोप लावला होता. पण नंतर तिला जाणवलं, की त्या बहिणीची काही चूक नव्हती. म्हणून तिने तिची माफी मागितली. पण जिच्यावर आरोप लावण्यात आला होता त्या बहिणीला इतकं वाईट वाटलं, की ती सतत त्याच गोष्टीचा विचार करत होती. असा आरोप कदाचित आपल्यावर कोणी लावला नसेल. पण, आपल्यापैकी अनेकांना कधी न कधी नक्कीच असं वाटलं असेल, की ज्याने आपलं मन दुखावलं आहे त्याला आपण कधीच माफ करू शकत नाही.

१०. कोणी जर आपलं मन दुखावलं तर ते दुःख सहन करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१० कोणी जर आपलं मन दुखावलं तर ते दुःख सहन करायला आपल्याला कशामुळे मदत होईल? यहोवा सगळंकाही पाहतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवल्याने आपल्याला मदत होईल. आपल्याला कायकाय सोसावं लागतं हे त्याला माहीत आहे; खासकरून लोक आपल्याशी वाईट वागतात तेव्हा. (इब्री ४:१३) आपल्याला दुःख सोसावं लागतं तेव्हा त्यालाही दुःख होतं. (यश. ६३:९) म्हणून तो असं अभिवचन देतो, की इतरांच्या वाईट वागण्यामुळे आपल्याला जे काही सहन करावं लागतं, ते सगळं तो शेवटी काढून टाकेल.—प्रकटी. २१:३, ४.

११. इतरांवरचा राग सोडून दिल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

११ तसंच आपण हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण जर राग सोडून दिला तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. ज्या बहिणीवर चुकीचा आरोप लावण्यात आला होता, तिनेसुद्धा हेच केलं. काही काळाने, तिने त्या बहिणीवरचा राग सोडून दिला आणि तिला माफ केलं. कारण आपण जेव्हा इतरांना माफ करतो, तेव्हा यहोवासुद्धा आपल्याला माफ करतो याची तिला जाणीव झाली. (मत्त. ६:१४) या बहिणीला माहीत होतं, की आरोप लावणाऱ्‍या बहिणीने जे काही केलं होतं ते चुकीचं होतं. पण तरीसुद्धा तिने तिला माफ केलं. यामुळे ती पुन्हा आनंदी झाली आणि यहोवाची सेवा करण्यावर लक्ष लावू शकली.

स्वतःला नको तितका दोष देऊ नका

१२. पहिले योहान ३:१९, २० या वचनांमधून आपल्याला काय समजतं?

१२ १ योहान ३:१९, २० वाचा. आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी न कधी दोषीपणाची भावना येते. जसं की, सत्य शिकण्याआधी केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे काहींना दोषी वाटतं. तर असेही काही जण आहेत ज्यांना सत्यात आल्यानंतर केलेल्या चुकांमुळे दोषी वाटतं. असं वाटणं स्वाभाविक आहे. (रोम. ३:२३) आपल्या सर्वांनाच योग्य ती करायची इच्छा आहे. पण “आपण सगळेच बऱ्‍याच वेळा चुकतो.” (याको. ३:२; रोम. ७:२१-२३) आणि आपलं मन आपल्याला दोष देतं तेव्हा आपल्याला ते मुळीच आवडत नाही. पण त्यामुळे एक फायदा होतो. तो कोणता? या भावनेमुळे आपण आपल्या चुका सुधारतो आणि त्या पुन्हा न करण्याचा निश्‍चय करतो.—इब्री १२:१२, १३.

१३. स्वतःला नको तितका दोष देण्यापासून आपण सावध का असलं पाहिजे?

१३ पण कधीकधी असं होऊ शकतं, की आपण स्वतःला नको तितका  दोष देऊ. म्हणजे आपण जरी पश्‍चाताप केला असला आणि यहोवाने जरी आपल्याला माफ केलं असलं, तरी आपण स्वतःला दोष देत राहू. पण स्वतःला नको तितका दोष देणं आपल्यासाठी चांगलं नाही. (स्तो. ३१:१०; ३८:३, ४) ते का? त्यासाठी एका बहिणीच्या उदाहरणाचा विचार करा. पूर्वी केलेल्या पापांबद्दल ती सतत स्वतःला दोष देत होती. ती म्हणते: “मला असं वाटायचं, की मी जे काही केलंय त्यामुळे येणाऱ्‍या अंतातून माझा बचाव होणार नाही. त्यामुळे यहोवाच्या सेवेत मेहनत करण्यात काहीच अर्थ नाही.” आपल्यापैकी अनेकांना या बहिणीसारखं वाटू शकतं. पण स्वतःला नको तितका दोष देण्यापासून आपण सावध असलं पाहिजे. कारण यहोवाने आपल्याला माफ केल्यानंतरही आपण जर स्वतःला दोष देत राहिलो आणि त्याची सेवा करायचं सोडून दिलं, तर सैतानाला किती आनंद होईल याचा विचार करा.—२ करिंथकर २:५-७, ११ पडताळून पाहा.

१४. आपल्याला कसं समजेल की यहोवाने आपल्याला माफ केलं आहे?

१४ पण तरीही आपण विचार करू, की ‘यहोवाने मला माफ केलंय हे मला कसं समजेल?’ तुम्ही हा प्रश्‍न विचारत आहात याचाच अर्थ यहोवाने तुम्हाला माफ केलं आहे. बऱ्‍याच वर्षांपूर्वी टेहळणी बुरूज  मासिकात असं म्हटलं होतं: “सत्यात येण्याआधी तुम्हाला कदाचित एखादी वाईट सवय असेल. पण सत्यात आल्यानंतरही तुम्ही अधूनमधून त्या सवयीकडे वळत असाल. . . . यामुळे खचून जाऊ नका. आणि यहोवा मला कधीच माफ करणार नाही, असा विचार करू नका. कारण तुम्ही असा विचार करावा हेच तर सैतानाला पाहिजे. केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला जर वाईट वाटत असेल, तुमची चिडचिड होत असेल, तर ती एक चांगली गोष्ट आहे. कारण त्यावरून दिसून येतं, की तुम्ही एक चांगली व्यक्‍ती आहात आणि यहोवा तुम्हाला माफ करेल. त्यामुळे नम्र असा आणि यहोवाला मनापासून प्रार्थना करा. त्याने तुम्हाला माफ करावं, तुम्हाला एक शुद्ध विवेक द्यावा आणि ही सवय सोडून द्यायला मदत करावी, अशी विनंती त्याच्याकडे करा. ज्याप्रमाणे एखादं मूल एकच समस्या घेऊन सारखंसारखं आपल्या वडिलांकडे मदतीसाठी जातं, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा सारखंसारखं यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा. तो तुम्हाला नक्की मदत करेल!” *

१५-१६. काही भाऊबहिणींना स्वतःबद्दल कसं वाटायचं, आणि त्यावर मात करायला त्यांना कशी मदत झाली?

१५ यहोवाने आपल्याला माफ केलं आहे या जाणिवेमुळे अनेक भाऊबहिणींना खूप दिलासा मिळाला. उदाहरणार्थ, “बायबलने बदललं जीवन” या लेखमालेत दिलेला एक अनुभव वाचून एका भावाला खूप प्रोत्साहन मिळालं. त्या लेखात एका बहिणीने असं म्हटलं आहे, की तिच्या जीवनात ज्या वाईट गोष्टी घडल्या होत्या त्यांमुळे यहोवा आपल्यावर प्रेम करतो, ही गोष्ट स्वीकारायला तिला खूप कठीण जायचं. तिचा बाप्तिस्मा झाला तरीही कितीतरी वर्षांपर्यंत तिला असंच वाटायचं. पण खंडणी बलिदानावर मनन केल्यामुळे तिला हे स्वीकारायला मदत झाली, की यहोवा तिच्यावर खूप प्रेम करतो. *

१६ या अनुभवामुळे त्या भावाला कशी मदत झाली? तो म्हणतो: “मी तरुण होतो तेव्हा मला अश्‍लील चित्रं (पोर्नोग्राफी) पाहायची सवय लागली होती. बऱ्‍याच प्रयत्नांनंतर शेवटी माझी ती सवय मोडली. पण अलीकडेच मला पुन्हा ती सवय लागली. त्यासाठी मी मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली आणि हळूहळू या सवयीवर मात केली. वडिलांनी मला ही गोष्ट समजायला मदत केली, की यहोवाने मला माफ केलं आहे आणि तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो. पण तरीही अधूनमधून मला असं वाटतं, की मी यहोवाच्या प्रेमाच्या लायकीचा नाही, यहोवा कधीच माझ्यावर प्रेम करू शकणार नाही. पण त्या बहिणीच्या अनुभवामुळे मला खरंच खूप मदत झाली. माझ्या लक्षात आलं, की ‘यहोवा मला कधीच माफ करणार नाही,’ असा विचार करणं किती चुकीचं आहे. कारण असा विचार करून मी जसं काय हेच म्हणत होतो, की देवाच्या मुलाचं बलिदान माझ्या पापांची क्षमा करण्याइतकं मोठं नाही. म्हणून मी त्या बहिणीचा लेख बाजूला काढून ठेवलाय. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं, की मी यहोवाच्या प्रेमाच्या लायकीचा नाही, तेव्हा तेव्हा मी तो लेख काढून वाचतो आणि त्यावर मनन करतो.”

१७. स्वतःला नको तितका दोष द्यायचं प्रेषित पौलने कसं टाळलं?

१७ असे अनुभव वाचून आपल्याला प्रेषित पौलची आठवण येते. ख्रिस्ती बनण्याआधी त्याने काही गंभीर चुका केल्या होत्या. त्या चुका त्याला आठवायच्या, पण तो सतत त्यांवरच विचार करत बसला नाही. (१ तीम. १:१२-१५) कारण त्याला हे पक्कं माहीत होतं, की देवाने आपल्या मुलाचं बलिदान त्याच्यासाठी दिलं आहे. आणि त्या आधारावर तो आपल्याला माफ करतो. (गलती. २:२०) त्यामुळे पौलने स्वतःला नको तितका दोष दिला नाही. उलट, त्याने आपलं संपूर्ण लक्ष यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यावर लावलं.

आपलं लक्ष नवीन जगावर लावा!

आपण नेहमी नवीन जगावर आपली नजर ठेवू या! (परिच्छेद १८-१९ पाहा) *

१८. या लेखात आपण काय शिकलो?

१८ या लेखात आपण काय शिकलो? तीन गोष्टी. (१) चांगल्या आठवणी मनात जपून ठेवायची क्षमता यहोवानेच आपल्याला दिली आहे. पण त्या आठवणींमध्ये आपण अडकून राहू नये. कारण पूर्वी आपलं जीवन कितीही चांगलं असलं, तरी नवीन जगातलं आपलं जीवन त्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगलं असेल. (२) कोणी आपलं मन दुखावलं तर आपण त्यांना माफ केलं पाहिजे. त्यामुळे आनंदाने यहोवाची करत राहायला आपल्याला मदत होईल. (३) पूर्वी केलेल्या चुकांबद्दल आपण स्वतःला नको तितका दोष देऊ नये; नाहीतर आपण आनंदाने यहोवाची सेवा करू शकणार नाही. पौलप्रमाणे आपण हे मान्य केलं पाहिजे, की यहोवाने आपल्याला माफ केलं आहे.

१९. नवीन जगात पूर्वीच्या गोष्टी आठवून आपण दुःखी होणार नाही, असं का म्हणता येईल?

१९ यहोवाने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशा दिली आहे. आपण जेव्हा नवीन जगात असू तेव्हा पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवून आपण दुःखी होणार नाही. कारण त्या काळाबद्दल बायबल म्हणतं: “जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत.” (यश. ६५:१७) जरा विचार करा: आपल्यापैकी काही जण अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आले आहेत, आणि आता ते वयस्कर झाले आहेत. पण नवीन जगात ते पुन्हा तरुण होतील. (ईयो. ३३:२५) म्हणून भाऊबहिणींनो, नेहमी पुढे पाहत राहा. सतत जुन्या गोष्टींचा विचार करत बसण्याऐवजी नवीन जगावर आपली नजर ठेवा!

गीत ५४ खरा विश्‍वास बाळगू या!

^ परि. 5 आपल्या जीवनात पूर्वी काय काय घडलं, याचा विचार करणं चांगली गोष्ट आहे. पण त्याचा आपण इतकासुद्धा विचार करू नये, की आपल्याला यहोवाची चांगल्या प्रकारे सेवा करता येणार नाही. किंवा मग, भविष्यात जे सुंदर आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत त्यांचा विचार करायचंच आपण सोडून देऊ. असं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण कोणत्या तीन गोष्टी टाळल्या पाहिजेत, याची चर्चा या लेखात आपण करू या. त्यासाठी आपण बायबलची काही तत्त्वं आणि आजच्या काळातले काही अनुभव पाहू या.

^ परि. 14 टेहळणी बुरूज (इंग्रजी), १५ फेब्रुवारी १९५४, पृष्ठ १२३ पाहा.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: जुन्या आठवणींमध्ये अडकून राहणं, मनात राग ठेवणं आणि स्वतःला नको तितका दोष देणं या गोष्टी जड ओझ्यांसारख्या आहेत. जीवनाच्या प्रवासात चालत असताना या गोष्टी आपल्याला मागे खेचत राहतात. त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत.

^ परि. 65 चित्रांचं वर्णन: पण ही ओझी मागे टाकून दिल्यावर आपल्याला खूप हलकं आणि छान वाटतं. आणि नव्या जोमाने आपण पुढे चालत राहू शकतो.