व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

“यहोवा मला कधीच विसरला नाही”

“यहोवा मला कधीच विसरला नाही”

मी दक्षिण अमेरिकेच्या गयाना देशातल्या ऑरिऍल्ला या गावात राहतो. इथे जवळजवळ २,००० लोक राहतात. शहरापासून खूप दूर असलेल्या या गावात तुम्ही छोट्या विमानाने किंवा बोटीनेच येऊ शकता.

माझा जन्म १९८३ मध्ये झाला. लहानपणी मी इतर मुलांसारखाच सुदृढ होतो. पण मी दहा वर्षांचा झालो तेव्हा माझं संपूर्ण शरीर दुखायला लागलं. याच्या जवळजवळ दोन वर्षांनी असं झालं, की एकदा सकाळी मला हालचालच करता येत नव्हती. मी माझे पाय हलवायचा खूप प्रयत्न केला, पण ते हलतच नव्हते. त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीच चाललो नाही. या आजारामुळे माझ्या शरीराची वाढच झाली नाही. त्यामुळे आजही माझी उंची एका लहान मुलाइतकीच आहे.

या आजारामुळे काही महिने मी घराबाहेर गेलोच नाही. घरी कोणी यायचं तेव्हा मी लपायचो. पण एकदा, दोन साक्षीदार स्त्रिया आमच्या घरी आल्या, तेव्हा मात्र मी त्यांच्याशी बोललो. त्या नवीन जगाबद्दल सांगत होत्या. तेव्हा मला आठवलं, की पाच वर्षांचा असताना मी ही गोष्ट ऐकली होती. त्या वेळी जेथ्रो नावाचे मिशनरी, महिन्यातून एकदा सुरिनाम इथून आमच्या गावात यायचे. ते बाबांचा बायबल अभ्यास घ्यायचे. माझ्याशी प्रेमाने वागत असल्यामुळे ते मला खूप आवडायचे. आणि आजी-आजोबाही मला साक्षीदारांच्या काही सभांना घेऊन जायचे. त्या आमच्या गावातच व्हायच्या. त्यामुळे त्या स्त्रियांपैकी फ्लोरॅन्स नावाच्या स्त्रीने जेव्हा मला विचारलं, की मला याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल का, तेव्हा मी ‘हो’ म्हटलं.

पुढच्या वेळेस फ्लोरॅन्स आपल्या पतीला, जसटसला घेऊन आली. ते दोघं माझ्यासोबत बायबल अभ्यास करू लागले. मला वाचायला येत नाही हे कळल्यावर त्यांनी मला वाचायला शिकवलं. आणि काही काळातच मी वाचायला शिकलो. एकदा त्यांनी मला सांगितलं, की त्यांना सुरिनाममध्ये सेवा करायला पाठवलं आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. कारण आता माझा बायबल अभ्यास घेणारं दुसरं कोणीच नव्हतं. पण एक चांगली गोष्ट ही होती, की यहोवा मला कधीच विसरला नाही.

लवकरच फ्लॉईड नावाचा एक पायनियर भाऊ आमच्या गावात आला. तो घरोघरचं प्रचारकार्य करत होता तेव्हा आमची भेट झाली. त्याने मला बायबल अभ्यासासाठी विचारलं तेव्हा मी हसलो. त्याने विचारलं, “तू का हसतोस?” मी त्याला सांगितलं, की देव आपल्याकडून काय अपेक्षितो?  यातून माझा अभ्यास झालाय आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान  या पुस्तकातून मी अभ्यास करत होतो. * पण माझा अभ्यास का थांबला हे मी त्याला सांगितलं. मग फ्लॉईडने ज्ञान पुस्तकातून माझा उरलेला अभ्यास संपवला. पण त्याचीही नेमणूक बदलली. पुन्हा एकदा मला बायबलबद्दल सांगणारं कोणीच नव्हतं.

पण २००४ मध्ये ग्रॅनविल आणि जोशुआ या दोन बांधवांना खास पायनियर म्हणून आमच्या गावात नेमण्यात आलं. तेसुद्धा घरोघरचं प्रचारकार्य करत असतानाच मला भेटले. त्यांनी मला बायबल अभ्यासासाठी विचारलं, तेव्हासुद्धा मी हसलो. मी त्यांना ज्ञान पुस्तकाचा सुरुवातीपासून अभ्यास घ्यायला सांगितलं. कारण मला पाहायचं होतं, की हेसुद्धा आधीच्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टीच शिकवतात का. ग्रॅनविलने मला सांगितलं, की याच गावात साक्षीदारांच्या सभा होत आहेत. खरंतर, मी जवळजवळ दहा वर्षं घराबाहेर पडलो नव्हतो. पण सभेसाठी मी घराबाहेर पडायला तयार झालो. त्यासाठी ग्रॅनविल माझ्या घरी आले, मला व्हिलचेअरवर बसवलं आणि मला सभागृहात घेऊन गेले.

नंतर ग्रॅनविलने मला ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत भाग घ्यायचं प्रोत्साहन दिलं. त्यांनी म्हटलं: “तू चालू शकत नाहीस, पण बोलू तर शकतोस. बघ, एक दिवस तू जाहीर भाषण देशील. तू हे नक्की करशील.”  या शब्दांमुळे मला खूप बळ मिळालं.

मी ग्रॅनविलसोबत प्रचारकार्यात जाऊ लागलो. पण गावातले बरेच रस्ते खडबडीत असल्यामुळे व्हिलचेअरवर जाणं अवघड होतं. म्हणून मग मी ग्रॅनविलला मला एका लहानशा ढकलगाडीत घेऊन जायला सांगितलं. त्यामुळे प्रचाराला जाणं सोपं झालं. एप्रिल २००५ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला. त्यानंतर लगेचच बांधवांनी मला मंडळीत साहित्यं सांभाळायचं आणि साऊंड सिस्टम हाताळायचं प्रक्षिशण दिलं.

दुःखाची गोष्ट म्हणजे २००७ मध्ये बोटीने प्रवास करताना एका अपघातात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आमच्या कुटुंबाला धक्काच बसला. पण त्या वेळी ग्रॅनविलने आमच्यासाठी प्रार्थना केली आणि काही वचनं वाचून आमचं सांत्वन केलं. याच्या दोन वर्षांनी आणखी एका घटनेमुळे आम्हाला धक्का बसला. बोटीने प्रवास करताना ग्रॅनविलचाही तसाच मृत्यू झाला.

यामुळे मंडळीतल्या सगळ्यांना खूप दुःख झालं. आता आमच्या मंडळीत एकही वडील नव्हते, फक्‍त एक सहायक सेवक होता. ग्रॅनविलच्या मृत्यूमुळे मी खूप निराश झालो. कारण ते माझे जवळचे मित्र होते. त्यांनी नेहमी मला आध्यात्मिक प्रगती करायला मदत केली होती. तसंच, मला लागणाऱ्‍या गोष्टीही ते आणून द्यायचे. त्यांच्या मृत्यूनंतर जी सभा झाली त्यात मला टेहळणी बुरूज  अभ्यासाचे परिच्छेद वाचायचे होते. पहिले दोन परिच्छेद मी कसेबसे वाचले. पण नंतर मला अश्रूच आवरले नाहीत. त्यामुळे मला स्टेजवरून खाली यावं लागलं.

आमच्या मंडळीला मदत करण्यासाठी दुसऱ्‍या मंडळीतून बांधव आले, तेव्हा मला बरं वाटलं. एवढंच नाही तर शाखाकार्यालयाने कोजो नावाच्या एका बांधवाला खास पायनियर म्हणून आमच्या मंडळीत पाठवलं होतं. त्यामुळेही मला आनंद झाला. आणखी एका गोष्टीमुळे मला आनंद झाला. ती म्हणजे, माझ्या आईने आणि माझ्या लहान भावानेही बायबल अभ्यास सुरू केला आणि बाप्तिस्मा घेतला. तसंच, मार्च २०१५ मध्ये मला सहायक सेवक म्हणून नेमण्यात आलं. त्यानंतर काही काळातच मी माझं पहिलं जाहीर भाषण दिलं. त्या दिवशी मला ग्रॅनविलचे शब्द आठवलं. त्यांनी म्हटलं होतं, “बघ, एक दिवस तू जाहीर भाषण देशील. तू हे नक्की करशील.”  ते आठवून मला खूप रडू आलं.

JW ब्रॉडकास्टिंगमुळे मला कळलं, की माझ्यासारखेच अनेक भाऊबहीण आहेत. ते शरीराने सुदृढ नसले, तरी देवाच्या सेवेत बरंच काही करतात आणि त्यामुळे आनंदी आहेत. माझ्या बाबतीत पाहायला गेलं तर मीसुद्धा बरंच काही करू शकतो. मलाही माझी सेवा वाढवायची होती. म्हणून मी पायनियरिंग सुरू केली. आणि सप्टेंबर २०१९ मध्ये, मी अपेक्षाही केली नव्हती अशी बातमी मला ऐकायला मिळाली. सुमारे ४० प्रचारक असलेल्या आमच्या मंडळीत मला वडील म्हणून नेमण्यात आलं. हे ऐकून मला खूप आनंद झाला.

ज्या भाऊबहिणींनी माझा अभ्यास घेतला, मला माझं सेवाकार्य आणि माझ्या जबाबदाऱ्‍या पार पाडायला मदत केली, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वात जास्त मी यहोवाचे आभार मानतो. कारण, तो मला कधीच विसरला नाही!

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित, पण आता यांची छपाई होत नाही.