व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५०

“मेलेल्यांना कसं उठवलं जाईल?”

“मेलेल्यांना कसं उठवलं जाईल?”

“अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे?”—१ करिंथ. १५:५५.

गीत १ यहोवाचे गुण

सारांश *

१-२. अभिषिक्‍त जनांच्या पुनरुत्थानाबद्दल सगळ्याच ख्रिश्‍चनांनी का जाणून घेतलं पाहिजे?

आज आपल्यापैकी अनेकांना पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची आशा आहे, तर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गातल्या जीवनाची आशा आहे. स्वर्गातलं आपलं जीवन कसं असेल हे जाणून घ्यायला अभिषिक्‍त ख्रिश्‍चन खूप उत्सुक आहेत. पण पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असणाऱ्‍यांनाही त्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता का असली पाहिजे? कारण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या पुनरुत्थानामुळे पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असणाऱ्‍यांना भविष्यात अनेक आशीर्वाद मिळतील. म्हणून, आपली आशा कोणतीही असो, अभिषिक्‍त जनांना स्वर्गातल्या जीवनासाठी कसं उठवलं जाईल याबद्दल आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे.

देवाने पहिल्या शतकातल्या येशूच्या काही शिष्यांना स्वर्गातल्या जीवनाच्या आशेबद्दल लिहायची प्रेरणा दिली. जसं की, प्रेषित योहानने असं लिहिलं: “आपण आता देवाची मुलं आहोत, पण पुढे आपण कसे असू हे अजून प्रकट झालेलं नाही. त्याला प्रकट करण्यात येईल तेव्हा आपण त्याच्यासारखेच होऊ इतकं मात्र आपल्याला माहीत आहे.” (१ योहा. ३:२) या वचनावरून दिसून येतं, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचं जेव्हा अदृश्‍य शरीरात पुनरुत्थान होईल तेव्हा स्वर्गातलं त्यांचं जीवन कसं असेल हे त्यांना माहीत नाही. पण एक गोष्ट त्यांना नक्की माहीत आहे. ती म्हणजे, ते यहोवाला प्रत्यक्ष पाहतील. स्वर्गातल्या जीवनाच्या पुनरुत्थानाबद्दलची प्रत्येक माहिती बायबलमध्ये दिलेली नाही. पण त्याबद्दलची थोडीफार माहिती प्रेषित पौलने आपल्याला दिली आहे. जसं की, भविष्यात येशू जेव्हा “सगळी सरकारं, अधिकारी आणि सत्ता नाहीशा” करेल, आणि त्यासोबतच “शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू नाहीसा” करेल, तेव्हा अभिषिक्‍त जनसुद्धा त्याच्यासोबत असतील. शेवटी, येशू आणि त्याच्यासोबत राज्य करणारे सगळ्या गोष्टी यहोवाच्या अधीन करतील आणि ते स्वतःसुद्धा यहोवाच्या अधीन होतील. (१ करिंथ. १५:२४-२८) खरंच, तो क्षण किती आनंदाचा असेल! *

३. (क) १ करिंथकर १५:३०-३२ या वचनांत सांगितल्याप्रमाणे पौलने कोणत्या परीक्षांचा सामना केला? (ख) कशामुळे तो या परीक्षांचा सामना करू शकला?

पुनरुत्थानाच्या आशेवर विश्‍वास असल्यामुळे पौल वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करू शकला. (१ करिंथकर १५:३०-३२ वाचा.) त्याबद्दल करिंथच्या ख्रिश्‍चनांना तो म्हणाला: “मी दररोज मृत्यूचा सामना करतो.” पुढे तो असंही म्हणाला, की इफिसमध्ये त्याला “हिंस्र प्राण्यांशी” लढावं लागलं. कदाचित इफिसमध्ये तो खरोखरच हिंस्र प्राण्यांशी लढला असेल आणि त्याबद्दलच तो इथे बोलत असावा. (२ करिंथ. १:८; ४:१०; ११:२३) किंवा मग, तो त्या यहुद्यांबद्दल आणि त्या लोकांबद्दल बोलत असावा जे त्याचा विरोध करत होते आणि त्याच्याशी ‘हिंस्र प्राण्यांसारखं’ वागत होते. (प्रे. कार्यं १९:२६-३४; १ करिंथ. १६:९) अशा प्रकारे पौलने अनेक जीवघेण्या संकटांचा सामना केला. पण तरीही तो भविष्याकडे आशेने पाहत राहिला.—२ करिंथ. ४:१६-१८.

आपल्या कामावर बंदी असलेल्या ठिकाणी राहणारं एक कुटुंब विश्‍वासूपणे यहोवाची उपासना करत राहतं. कारण, भविष्यात यहोवा आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देईल याचा त्यांना पूर्ण भरवसा आहे (परिच्छेद ४ पाहा)

४. पुनरुत्थानाच्या आशेमुळे आज भाऊबहिणींना बळ कसं मिळतं? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

आज आपण एका धोकादायक काळात जगत आहोत. आपले काही भाऊबहीण गुन्हेगारीचे शिकार बनले आहेत. इतर काही जण अशा ठिकाणी राहतात जिथे सतत युद्धं होत असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका आहे. तर असेही काही भाऊबहीण आहेत जे अशा देशांमध्ये राहतात जिथे आपल्या कामावर बंधनं आहेत किंवा त्यावर पूर्णपणे बंदी आहे. आपण पकडले गेलो, तर आपल्याला तुरुंगवास होईल, नाहीतर मारून टाकलं जाईल हे त्यांना माहीत आहे. पण तरीही ते विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करतात. या सगळ्या भाऊबहिणींचं आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे. त्यांना याची पक्की खातरी आहे, की आज आपला जीव जरी गेला तरी भविष्यात यहोवा आपल्याला पुन्हा जिवंत करेल आणि असं जीवन देईल जे आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगलं असेल.

५. कोणत्या मनोवृत्तीमुळे पुनरुत्थानावरचा आपला विश्‍वास कमजोर होऊ शकतो?

पौलच्या दिवसांमध्ये काही जण असं म्हणत होते: “जर मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नसेल, तर ‘चला, आपण खाऊ-पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचंच आहे.’” पौलने ख्रिश्‍चनांना या मनोवृत्तीपासून दूर राहायला सांगितलं, कारण यामुळे पुनरुत्थानावरचा त्यांचा विश्‍वास कमजोर पडला असता. या ठिकाणी पौल कदाचित यशया २२:१३ या वचनाचा उल्लेख करत असावा. त्या वचनात इस्राएली लोकांच्या मनोवृत्तीबद्दल सांगितलं आहे. यावरून दिसून येतं, की अशी मनोवृत्ती फक्‍त पौलच्या दिवसांतच नाही, तर फार पूर्वी इस्राएली लोकांमध्येसुद्धा होती. यहोवासोबत जवळचं नातं जोडण्याऐवजी इस्राएली लोक मौजमजा करण्यात गुंतले होते. त्यांची मनोवृत्ती, ‘आजच्यासाठी जगा, उद्या कोणी पाहिला आहे’ अशी होती. आणि हीच मनोवृत्ती आजही सर्रासपणे पाहायला मिळते. अशा मनोवृत्तीचे परिणाम सहसा वाईटच होतात. आणि इस्राएली लोकांच्या बाबतीत असंच घडलं.—२ इति. ३६:१५-२०.

६. जे लोक फक्‍त आजच्यासाठी जगतात अशा लोकांची मैत्री आपण का टाळली पाहिजे?

पुनरुत्थानावरचा आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी करिंथच्या ख्रिश्‍चनांनी अशा लोकांची मैत्री टाळायची होती, ज्यांचा पुनरुत्थानावर विश्‍वास नव्हता. आज आपणही तेच केलं पाहिजे. कारण आपण जर सतत अशा लोकांसोबत वेळ घालवला जे फक्‍त आजच्यासाठी जगतात आणि मौजमजेचा विचार करतात, तर त्यांचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा लोकांसोबत वेळ घालवल्यामुळे आपली चांगली मनोवृत्ती आणि चांगल्या सवयी बिघडू शकतात. आणि कदाचित आपण अशा गोष्टी करू ज्यांची देवाला घृणा वाटते. म्हणूनच पौलने कडक शब्दांत असा सल्ला दिला: “शुद्धीवर या आणि चांगली कामं करा; पाप करत राहू नका.”—१ करिंथ. १५:३३, ३४.

“ते कोणत्या प्रकारच्या शरीराने उठतील?”

७. १ करिंथकर १५:३५-३८ यात सांगितल्याप्रमाणे पुनरुत्थानाबद्दल काहींनी कदाचित कोणता प्रश्‍न विचारला असेल?

१ करिंथकर १५:३५-३८ वाचा. पुनरुत्थानाबद्दल शंका निर्माण करण्यासाठी कोणी कदाचित असं विचारलं असेल: “मेलेल्यांना कसं उठवलं जाईल?” या प्रश्‍नाचं पौलने काय उत्तर दिलं त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण, मेल्यानंतर माणसाचं काय होतं याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. तर मग, पौलने काय म्हटलं ते आपण पुढे पाहू या. 

देवाला योग्य वाटतं तसं शरीर देऊन तो एका व्यक्‍तीला जिवंत करू शकतो, हे समजावण्यासाठी पौलने जमिनीत पेरलेल्या बीचं आणि त्यातून वाढलेल्या रोपट्याचं उदाहरण वापरलं (परिच्छेद ८ पाहा)

८. पौलने बीचं उदाहरण देऊन काय समजावलं?

माणूस मरतो तेव्हा त्याचं शरीर कुजून नष्ट होतं. पण ज्या देवाने शून्यातून हे विश्‍व उभं केलं तो त्या व्यक्‍तीला जिवंत करू शकतो. (उत्प. १:१; २:७) त्यासाठी देवाला त्याच शरीरात तिला जिवंत करायची गरज पडत नाही. तर देवाला योग्य वाटतं तसं शरीर देऊन तो त्या व्यक्‍तीला जिवंत करू शकतो. हे समजावण्यासाठी पौलने जमिनीत पेरल्या जाणाऱ्‍या बीचं उदाहरण वापरलं. जमिनीत पेरलेलं बी वाढून पुढे त्याचं एक रोपटं तयार होतं. वाढलेलं हे रोपटं पेरलेल्या बीपेक्षा खूप वेगळं असतं. हे उदाहरण वापरून पौलने समजावलं, की आपला निर्माणकर्ता त्याला “योग्य [वाटेल]” तसं शरीर देऊन मेलेल्या व्यक्‍तीला जिवंत करू शकतो.

९. १ करिंथकर १५:३९-४१ या वचनांत पौल कोणत्या वेगवेगळ्या शरीरांबद्दल बोलतो?

१ करिंथकर १५:३९-४१ वाचा. या वचनांत पौलने म्हटलं, की सृष्टीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात; जसं की, गुरंढोरं, पक्षी आणि मासे. या सगळ्यांचं शरीर एकमेकांपासून वेगळं असतं. पौलने असंही म्हटलं, की आकाशात दिसणारे सूर्य आणि चंद्र हेसुद्धा एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. इतकंच नाही, तर “प्रत्येक ताऱ्‍याचं तेज दुसऱ्‍या ताऱ्‍याच्या तेजापेक्षा वेगळं” आहे. हा फरक आपल्याला जरी दिसत नसला तरी ते खरं आहे. कारण वैज्ञानिकसुद्धा सांगतात, की आकाशात वेगवेगळ्या प्रकारचे तारे आहेत. काही लहान तर काही मोठे; काही लाल, काही पांढरे, तर काही पिवळ्या रंगाचे. जसं की, सूर्य हा तारा पिवळ्या रंगाचा आहे. पौलने पुढे म्हटलं, की “जे स्वर्गात आहेत त्यांचं शरीर पृथ्वीवर राहणाऱ्‍यांपेक्षा वेगळं असतं.” कोणत्या अर्थाने? पृथ्वीवर राहणाऱ्‍यांचं शरीर हाडामांसाचं, तर स्वर्गात राहणाऱ्‍यांचं शरीर अदृश्‍य असतं; जसं की स्वर्गदूतांचं शरीर अदृश्‍य असतं.

१०. ज्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जातं त्यांना कोणत्या प्रकारचं शरीर मिळतं?

१० पौल पुढे काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या: तो म्हणाला: “मेलेल्यांच्या पुनरुत्थानाच्या बाबतीतसुद्धा हेच खरं आहे. शरीर नाशवंत स्थितीत पेरलं जातं आणि अविनाशीपणात उठवलं जातं.” आपल्याला हे माहीत आहे, की मेल्यावर माणसाचं शरीर नष्ट होऊन मातीला मिळतं. (उत्प. ३:१९) तर मग, ते शरीर “अविनाशीपणात उठवलं जातं,” असं कसं म्हणता येईल? एलीया, अलीशा आणि येशू यांनी काही लोकांना पृथ्वीवरच्या जीवनासाठी उठवलं होतं. पण पौल इथे अशा लोकांबद्दल बोलत नव्हता ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनासाठी उठवलं जातं. तर तो अशा लोकांबद्दल बोलत होता, ज्यांना “अदृश्‍य शरीर” देऊन स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जातं.—१ करिंथ. १५:४२-४४.

११-१२. येशूचं पुनरुत्थान कोणत्या शरीरात झालं, आणि अभिषिक्‍त जनांचं पुनरुत्थान कोणत्या शरीरात होतं?

११ पृथ्वीवर असताना येशूचं हाडामांसाचं शरीर होतं. पण त्याला मृत्यूतून जिवंत करण्यात आलं, तेव्हा तो “जीवन देणारा अदृश्‍य प्राणी बनला.” म्हणजे, त्याला एक अदृश्‍य शरीर देण्यात आलं आणि तो स्वर्गात गेला. तसंच, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाही अदृश्‍य शरीरात उठवलं जातं. ही गोष्ट समजावण्यासाठी पौल म्हणाला: “ज्याप्रमाणे आपण मातीपासून बनवलेल्याच्या स्वरूपात आहोत, त्याचप्रमाणे आपण स्वर्गातून आलेल्याच्या स्वरूपात असू.”—१ करिंथ. १५:४५-४९.

१२ आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की येशूचं पुनरुत्थान हाडामांसाच्या शरीरात झालं नाही. याचं कारण पौलने १ करिंथकर याच्या १५ व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं. तो म्हणाला: “मांस आणि रक्‍त देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही.” (१ करिंथ. १५:५०) प्रेषितांचं आणि इतर अभिषिक्‍त जनांचं पुनरुत्थानही हाडामांसाच्या नाशवंत शरीरात होणार नव्हतं. पण प्रश्‍न आहे, की स्वर्गातल्या जीवनासाठी त्यांचं पुनरुत्थान कधी होणार होतं? पौलने म्हटलं, की मृत्यू झाल्यावर लगेच त्यांचं पुनरुत्थान होणार नव्हतं, तर भविष्यात होणार होतं. पण, पौलने करिंथकरांना आपलं पहिलं पत्र लिहिलं तोपर्यंत काही शिष्यांचा “मृत्यू झाला” होता; जसं की, प्रेषित याकोब. (प्रे. कार्यं १२:१, २) तर इतर प्रेषित आणि अभिषिक्‍त जन त्या वेळी अजून जिवंत होते.—१ करिंथ. १५:६.

मृत्यूवर विजय

१३. येशूच्या उपस्थितीदरम्यान कोणकोणत्या घटना घडणार होत्या?

१३ येशू आणि पौल या दोघांनीही भविष्यात येणाऱ्‍या एका महत्त्वाच्या काळाबद्दल सांगितलं होतं. तो म्हणजे, ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काळ. या काळात संपूर्ण जगभरात युद्धं, भूकंप, महामाऱ्‍या आणि इतर वाईट गोष्टी घडणार होत्या. बायबलची ही भविष्यवाणी १९१४ पासून पूर्ण होत असल्याची आपण पाहत आहोत. ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडेल असं येशूने सांगितलं होतं. तो म्हणाला होता, की देवाच्या राज्याने शासन करायला सुरुवात केली आहे, याबद्दलचा “आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर अंत येईल.” (मत्त. २४:३, ७-१४) पौलनेही ‘प्रभूच्या उपस्थितीच्या’ काळात काय घडेल याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, की जे अभिषिक्‍त ख्रिश्‍चन “मरण पावले आहेत” त्यांचं स्वर्गातल्या जीवनासाठी या काळात पुनरुत्थान होईल.—१ थेस्सलनी. ४:१४-१६; १ करिंथ. १५:२३.

१४. ज्या अभिषिक्‍त जनांचा मृत्यू ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान होतो त्यांचं पुनरुत्थान केव्हा होतं?

१४ आज जेव्हा अभिषिक्‍त जनांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांना लगेच स्वर्गाच्या जीवनासाठी उठवलं जातं. याचा पुरावा आपल्याला १ करिंथकर १५:५१, ५२ मध्ये दिलेल्या पौलच्या शब्दांवरून मिळतो. तिथे तो म्हणतो: “आपण सगळेच मृत्यूची झोप घेणार नाही, तर आपण सगळे बदलून जाऊ. शेवटचा कर्णा वाजण्याच्या वेळी, एका क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आपण बदलून जाऊ.” पौलचे हे शब्द आज पूर्ण होत आहेत. ख्रिस्ताच्या या भावांचं पुनरुत्थान होतं तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. कारण ते “सदासर्वकाळ प्रभूसोबत” राहतील.—१ थेस्सलनी. ४:१७.

पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जन येशूसोबत मिळून राष्ट्रांचा चुराडा करतील (परिच्छेद १५ पाहा)

१५. पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जन स्वर्गात काय करतील?

१५ पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जन स्वर्गात काय करतील? येशू त्यांना म्हणतो: “जो विजय मिळवेल आणि शेवटपर्यंत माझ्या कार्यांचं अनुकरण करेल, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. मला माझ्या पित्याकडून जसा अधिकार मिळाला आहे तसा तोसुद्धा लोहदंडाने लोकांवर अधिकार चालवेल आणि मातीच्या भांड्यांप्रमाणे त्यांचा चुराडा करेल.” (प्रकटी. २:२६, २७) यावरून दिसून येतं, की अभिषिक्‍त जन आपल्या सेनापतीच्या, म्हणजे येशूच्या आज्ञेवरून राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवतील.—प्रकटी. १९:११-१५.

१६. मृत्यूवर विजय कसा मिळवला जाईल?

१६ तर मग स्पष्टच आहे, की अभिषिक्‍त ख्रिस्ती मृत्यूवर विजय मिळवतील. (१ करिंथ. १५:५४-५७) त्यांचं पुनरुत्थान झाल्यामुळे ते हर्मगिदोनाच्या युद्धाच्या वेळी येशूसोबत मिळून संपूर्ण पृथ्वीवरून दुष्टाई नाहीशी करतील. इतर लाखो विश्‍वासू ख्रिस्ती “मोठ्या संकटातून” वाचतील आणि नवीन जगात प्रवेश करतील. (प्रकटी. ७:१४) तिथे ते मरण पावलेल्या लाखो लोकांचं पुनरुत्थान होताना पाहतील. हा मृत्यूवर आणखी एक विजय असेल. तो किती आनंदाचा क्षण असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? (प्रे. कार्यं २४:१५) शेवटी, जे पूर्णपणे यहोवाला विश्‍वासू राहतील ते आदामपासून मिळालेल्या मृत्यूवरही विजय मिळवतील. आणि त्यानंतर ते कायम जिवंत राहतील.

१७. १ करिंथकर १५:५८ हे वचन आपल्याला काय करायचं प्रोत्साहन देतं?

१७ करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात पौलने पुनरुत्थानाबद्दल जे काही म्हटलं त्यामुळे आज आपल्याला खूप सांत्वन मिळतं. याबद्दल आपण यहोवाचे किती आभार मानले पाहिजेत! म्हणून पौलने सांगितल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त “प्रभूचं काम” करत राहू या. (१ करिंथकर १५:५८ वाचा.) हे काम करण्यात जर आपण मनापासून मेहनत घेतली, तर भविष्यात मिळणाऱ्‍या आनंदी जीवनाची आपण आशा बाळगू शकतो. ते जीवन किती चांगलं असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्या वेळी आपल्याला जाणीव होईल, की प्रभूच्या सेवेत आपण केलेली मेहनत वाया गेली नाही.

गीत ५५ चिरकालाचे जीवन!

^ परि. 5 आधीच्या लेखात आपण १ करिंथकर १५ व्या अध्यायाच्या काही भागावर चर्चा केली होती. आता या लेखात आपण उरलेल्या भागावर चर्चा करू या. यात खासकरून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या पुनरुत्थानाबद्दल सांगितलं आहे. पण पौलने लिहिलेली ही माहिती पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असणाऱ्‍यांसाठीही महत्त्वाची आहे. हा लेख आपल्याला दोन गोष्टी समजायला मदत करेल. पहिली गोष्ट म्हणजे, पुनरुत्थानाच्या आशेवर जर आपला विश्‍वास असेल तर आज आपण कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. आणि दुसरी, या आशेमुळे भविष्यात आपल्याला आनंदी जीवन कसं मिळेल.

^ परि. 2 १ करिंथकर १५:२९ या वचनात पौलने जे म्हटलं त्याचं स्पष्टीकरण या अंकातल्या “वाचकांचे प्रश्‍न” यात दिलं आहे.