व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५१

यहोवा निराश असलेल्यांना वाचवतो

यहोवा निराश असलेल्यांना वाचवतो

“यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो; निराश असलेल्यांना तो वाचवतो.”—स्तो. ३४:१८, तळटीप.

गीत ५१ यहोवाला जडून राहू!

सारांश *

१-२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

बायबल म्हणतं, की “माणसाचं आयुष्य, फक्‍त काही काळाचं आणि दुःखाने भरलेलं असतं.” (ईयो. १४:१) हे किती खरं आहे! या छोट्या आणि समस्यांनी भरलेल्या आयुष्याचा विचार करून, आपण सगळेच कधी ना कधी निराश होतो. बायबलच्या काळात यहोवाच्या अनेक सेवकांनासुद्धा असंच वाटलं होतं. काहींना तर आपलं जीवनही नकोसं झालं होतं. (१ राजे १९:२-४; ईयो. ३:१-३, ११; ७:१५, १६) पण यहोवाने नेहमी त्यांना धीर आणि बळ दिलं. त्यांच्या उदाहरणांतून आज आपल्याला धीर मिळावा आणि काहीतरी शिकायला मिळावं, म्हणून हे अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आले आहेत.—रोम. १५:४.

या लेखात आपण यहोवाच्या काही सेवकांची उदाहरणं पाहू; जसं की, याकोबचा मुलगा योसेफ, नामी आणि तिची सून रूथ, ७३ वं स्तोत्र लिहिणारा एक लेवी आणि प्रेषित पेत्र. या सगळ्यांनी निराश करणाऱ्‍या समस्यांचा सामना केला. आपल्या या सेवकांना यहोवाने बळ कसं दिलं? त्यांच्या उदाहरणातून आज आपण काय शिकू शकतो? या प्रश्‍नांच्या उत्तरांमुळे आपल्याला खातरी मिळेल, की “यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो” आणि “निराश असलेल्यांना तो वाचवतो.”—स्तो. ३४:१८, तळटीप.

योसेफला अन्याय सोसावा लागला

३-४. तरुण असताना योसेफसोबत कोणत्या गोष्टी घडल्या?

योसेफ जवळजवळ १७ वर्षांचा होता तेव्हा त्याला दोन स्वप्नं पडली. ती स्वप्नं यहोवाकडून होती. त्या स्वप्नांचा अर्थ असा होता, की योसेफला पुढे जाऊन एक मानाचं स्थान मिळेल आणि त्याच्या कुटुंबाचे लोक त्याचा आदर करतील. (उत्प. ३७:५-१०) पण योसेफला ही स्वप्नं पडली त्यानंतर लगेचच त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक वाईट घटना घडू लागल्या. त्याचा आदर करायचा तर दूरच, उलट त्याच्या भावांनी त्याला विकून टाकलं. आणि इजिप्तमध्ये पोटीफर नावाच्या एका अधिकाऱ्‍याच्या घरी तो गुलाम म्हणून काम करू लागला. (उत्प. ३७:२१-२८) एका क्षणातच त्याचं आयुष्य बदलून गेलं. कालपर्यंत जो आपल्या वडिलांचा लाडका होता, तो आता एक गुलाम बनला होता.—उत्प. ३९:१.

पण योसेफच्या समस्या एवढ्यावरच संपल्या नाहीत. पुढे त्याला याहून वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. पोटीफरच्या बायकोने त्याच्यावर असा खोटा आरोप लावला, की तो तिचा बलात्कार करायचा प्रयत्न करत होता. आणि पोटीफरने खरं काय आहे याची चौकशी न करताच योसेफला तुरुंगात टाकलं. तिथे त्याला साखळ्यांनी बांधण्यात आलं. (उत्प. ३९:१४-२०; स्तो. १०५:१७, १८) इतक्या लहान वयात इतका मोठा आरोप योसेफवर लावल्यामुळे त्याला कसं वाटलं असेल याचा विचार करा. तसंच, ही गोष्ट जेव्हा लोकांच्या कानावर पडली असेल, तेव्हा ते योसेफच्या देवाबद्दल, यहोवाबद्दल किती वाईटसाईट बोलले असतील याचाही विचार करा. या सगळ्या कारणांमुळे योसेफ नक्कीच खूप निराश झाला असेल.

५. योसेफने निराशेचा सामना कसा केला?

इजिप्तमध्ये एक गुलाम असल्यामुळे आणि नंतर कैदेत असल्यामुळे योसेफ आपली परिस्थिती बदलण्यासाठी काहीच करू शकत नव्हता. मग निराश करणाऱ्‍या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याने काय केलं? आपण काय करू शकत नाही यावर तो विचार करत बसला नाही; तर दिलेली कामं तो प्रामाणिकपणे करत राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाच्या नजरेत जे योग्य आहे ते करण्याचा त्याने नेहमी प्रयत्न केला. त्यामुळे योसेफ जे काही करायचा त्यावर यहोवाचा आशीर्वाद असायचा.—उत्प. ३९:२१-२३.

६. योसेफला आणखी कोणत्या गोष्टीमुळे धीर मिळाला असेल?

अनेक वर्षांपूर्वी यहोवाने योसेफला जी स्वप्नं दाखवली होती, त्यांवर विचार केल्यामुळेही योसेफला धीर मिळाला असेल. त्या स्वप्नांवरून त्याला जाणवलं असेल, की तो त्याच्या कुटुंबाला पुन्हा भेटेल आणि त्याची ही परिस्थिती सुधारेल. आणि खरोखर असंच घडलं. योसेफ जवळजवळ ३७ वर्षांचा होता तेव्हा ती स्वप्नं एका अनोख्या पद्धतीने पूर्ण होऊ लागली.—उत्प. ३७:७, ९, १०; ४२६, .

७. १ पेत्र ५:१० हे वचन आपल्याला परीक्षांचा सामना करायला कशी मदत करतं?

आपण काय शिकतो?  योसेफच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं, की आजचं जग काही वेगळं नाही. ते खूप वाईट आहे आणि लोक आपल्याशी अन्यायाने वागू शकतात. मंडळीतली एखादी व्यक्‍तीसुद्धा आपलं मन दुखावू शकते. पण यहोवा आपला मजबूत खडक आणि आश्रय आहे हे जर आपण लक्षात ठेवलं, तर आपण कधीच निराश होणार नाही आणि यहोवाची सेवा करायचं सोडून देणार नाही. (स्तो. ६२:६, ७; १ पेत्र ५:१० वाचा.) शिवाय, आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की योसेफ जेव्हा फक्‍त सतराएक वर्षांचा होता तेव्हा यहोवाने त्याला ती स्वप्नं दाखवली होती. यावरून दिसून येतं, की यहोवाचा त्याच्या तरुण सेवकांवर खूप भरवसा आहे. आज अनेक तरुण योसेफसारखेच आहेत; त्यांचाही यहोवावर मजबूत विश्‍वास आहे. यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे काहींना तर अन्याय सोसावा लागला आणि तुरुंगातही जावं लागलं.—स्तो. ११०:३.

दुःखात बुडालेल्या दोन स्त्रिया

८. नामी आणि रूथला कायकाय सोसावं लागलं?

यहूदामध्ये भयंकर दुष्काळ पडल्यामुळे नामी आणि तिच्या कुटुंबाला आपलं घर सोडून एका परक्या देशात, म्हणजे मवाबमध्ये राहायला जावं लागलं. तिथे नामीच्या पतीचा, अलीमलेखचा मृत्यू झाला. त्यामुळे नामी आणि तिची दोन मुलं एकटी पडली. काही काळाने त्या मुलांनी रूथ आणि अर्पा नावाच्या मवाबी मुलींशी लग्न केलं. पण जवळपास दहा वर्षांनंतर नामीच्या मुलांचाही मृत्यू झाला. आणि मूलबाळ नसल्यामुळे त्यांच्या बायकासुद्धा एकट्या पडल्या. (रूथ १:१-५) या तिन्ही स्त्रिया किती दुःखी असतील याचा विचार करा. रूथ आणि अर्पा तर लग्न करू शकत होत्या. पण वय होत चाललेल्या नामीचं काय झालं असतं? तिला कोणी सांभाळलं असतं? एकदा तर नामी इतकी निराश झाली, की ती म्हणाली: “मला नामी म्हणू नका, मला ‘मारा’ म्हणा. कारण सर्वशक्‍तिमान देवाने मला फार दुःख दिलंय.” शेवटी आपल्या दुःखाचं ओझं मनात घेऊन नामी बेथलेहेमला जायला निघाली; तेव्हा रूथही तिच्यासोबत गेली.—रूथ १:७, १८-२०.

देवाने नामी आणि रूथला निराशेचा आणि दुःखाचा सामना करायला मदत केली. मग तो तुम्हालाही मदत करणार नाही का? (परिच्छेद ८-१३ पाहा) *

९. रूथ १:१६, १७, २२ या वचनांप्रमाणे रूथने नामीला धीर कसा दिला?

आपल्या दुःखातून बाहेर यायला नामीला कशामुळे मदत झाली? यहोवा आणि इतर लोकांनी दाखवलेल्या एकनिष्ठ प्रेमामुळे. उदाहरणार्थ, रूथने नामीची साथ सोडली नाही. अशा प्रकारे तिने एकनिष्ठ प्रेम दाखवलं. (रूथ १:१६, १७, २२ वाचा.) पुढे बेथलेहेममध्ये रूथने स्वतःसाठी आणि नामीसाठी शेतातून धान्य वेचून आणण्याकरता खूप मेहनत घेतली. त्यामुळे काही काळातच या तरुण स्त्रीने एक चांगलं नाव कमावलं.—रूथ ३:११; ४:१५.

१०. यहोवाने नामी आणि रूथ यांच्यासारख्या गरजू लोकांची काळजी कशी घेतली?

१० नामी आणि रूथ यांच्यासारख्या गरजू लोकांना मदत करण्यासाठी यहोवाने इस्राएली लोकांना एक नियम दिला होता. त्या नियमाप्रमाणे शेताची कापणी करताना त्यांनी काठावरचं सगळं पीक कापायचं नव्हतं, तर काही पीक गरिबांसाठी सोडायचं होतं. (लेवी. १९:९, १०) त्यामुळे नामी आणि रूथ यांना कोणापुढेही अन्‍नासाठी हात पसरावे लागले नाही.

११-१२. बवाजने नामी आणि रूथसाठी काय केलं?

११ रूथ ज्या शेतात धान्य गोळा करायला जायची, ते बवाज नावाच्या एका श्रीमंत माणसाचं शेत होतं. रूथने कशा प्रकारे आपल्या सासूला साथ दिली आणि ती किती प्रेमाने तिची काळजी घेते, ही गोष्ट बवाजला खूप आवडली. त्यामुळे त्याने नामीच्या कुटुंबाची वारशाची जमीन विकत घेऊन ती सोडवली. आणि रूथशी लग्न केलं. (रूथ ४:९-१३) नंतर त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव ओबेद होतं. पुढे त्याच्याच घराण्यात दावीद राजाचा जन्म झाला. दावीद त्याचा नातू होता.—रूथ ४:१७.

१२ त्या लहान बाळाला, ओबेदला कुशीत घेतल्यावर नामीला किती आनंद झाला असेल आणि तिने यहोवाचे किती आभार मानले असतील याची कल्पना करा. आणि नवीन जगात जेव्हा नामी आणि रूथला हे समजेल, की वचन दिलेला मसीहा, येशू ख्रिस्त ओबेदच्या घराण्यातून आला, तेव्हा तर त्यांच्या आनंदाला सीमाच उरणार नाही.

१३. नामी आणि रूथच्या अहवालातून आपण कोणते महत्त्वाचे धडे शिकतो?

१३ आपण काय शिकतो?  समस्यांचा सामना करताना आपण निराश होऊ शकतो, कदाचित खचूनही जाऊ शकतो. यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही असंही कदाचित आपल्याला वाटेल. पण अशा वेळी आपण आपला पूर्ण भरवसा यहोवावर ठेवला पाहिजे आणि भाऊबहिणींच्या जवळ राहिलं पाहिजे. हे खरं आहे, की यहोवा प्रत्येक वेळी आपल्या समस्या काढून टाकणार नाही; उदाहरणार्थ, त्याने नामीच्या पतीला आणि तिच्या मुलांना जिवंत केलं नाही. पण नामीप्रमाणेच समस्यांचा सामना करायला यहोवा नक्कीच आपल्याला मदत करेल. आणि त्यासाठी तो मंडळीतल्या भाऊबहिणींचा उपयोग करू शकतो.—नीति. १७:१७.

एक लेवी जो जवळजवळ भरकटलाच होता

जे यहोवाची सेवा करत नव्हते अशांचं वरवर दिसणारं यश पाहून एक लेवी जवळजवळ भरकटलाच होता. तसं आपल्यासोबतही होऊ शकतं (परिच्छेद १४-१६ पाहा)

१४. कोणत्या गोष्टीमुळे एक लेवी खूप निराश झाला होता?

१४ ज्याने ७३ वं स्तोत्र लिहिलं तो एक लेवी होता. लेवी असल्यामुळे, यहोवाची उपासना केली जायची तिथे सेवा करायचा खूप मोठा बहुमान त्याला होता. पण इतकं असूनही एक वेळ अशी आली, की तो निराश झाला. त्याला दुष्ट आणि गर्विष्ठ लोकांचा हेवा वाटू लागला. त्यांच्यासारखं त्याला वाईट कामं करायची इच्छा होती असं नाही; पण इतकी वाईट कामं करूनही ते श्रीमंत होत आहेत असं वाटल्यामुळे त्याला त्यांचा हेवा वाटू लागला. (स्तो. ७३:२-९, ११-१४) त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते ऐशआरामाचं जीवन जगत आहेत आणि त्यांना कसलीही चिंता नाही असं त्याला वाटलं. हे सगळं पाहून तो इतका निराश झाला की तो म्हणाला: “खरंच, मी उगाचच माझं हृदय शुद्ध ठेवलं आणि निर्दोषतेने आपले हात धुतले.” हा स्तोत्रकर्ता यहोवापासून दूर जाण्याच्या मार्गावर होता.

१५. स्तोत्र ७३:१६-१९, २२-२५ यांत सांगितल्याप्रमाणे, त्या लेवीने आपल्या निराशेवर कशी मात केली?

१५ स्तोत्र ७३:१६-१९, २२-२५ वाचा. तो लेवी “देवाच्या महान उपासना मंडपात” गेला. तिथे देवाच्या उपासकांमध्ये तो शांत मनाने आपल्या विचारांचं परीक्षण करू शकला आणि आपली समस्या देवाला प्रार्थनेत सांगू शकला. आणि आपण किती चुकीचा विचार करत होतो हे हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं. आपल्या चुकीच्या विचारसरणीमुळे आपण यहोवापासून दूर जाण्याच्या मार्गावर होतो हे त्याला समजलं. त्याला हेही समजलं, की दुष्ट लोक “निसरड्या जमिनीवर” आहेत आणि पुढे त्यांचा “भयंकर अंत” होईल. या लेवीला आपल्या मनातून हेव्याची आणि निराशेची भावना काढून टाकण्यासाठी सगळ्या गोष्टींबद्दल यहोवासारखा विचार करायची गरज होती. आणि तेच त्याने केलं. त्यामुळे त्याचं मन शांत झालं आणि गमावलेला आनंद त्याने परत मिळवला. तो म्हणाला: “[यहोवाशिवाय] या पृथ्वीवर मला आणखी काहीही नको.”

१६. त्या लेवीकडून आपण कोणते धडे शिकू शकतो?

१६ आपण काय शिकतो?  दुष्ट लोक कितीही श्रीमंत आणि आनंदी वाटत असले तरी आपण कधीच त्यांचा हेवा करू नये. कारण ते फक्‍त वरवर आनंदी वाटतात आणि त्यांचा तो आनंद जास्त काळ टिकणारा नसतो. शिवाय, भविष्याबद्दल त्यांना कोणतीही आशा नसते. (उप. ८:१२, १३) आपण जर अशा लोकांचा हेवा केला तर आपण निराश होऊ आणि हळूहळू यहोवापासून दूर जाऊ. तुम्हाला कधी त्या लेवीसारखं वाटलं, तर निराशेवर मात करण्यासाठी त्याने जे केलं तेच करा. देवाकडून मिळणारा प्रेमळ सल्ला पाळा आणि त्याच्या लोकांमध्ये राहा. दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त यहोवावर तुमचं प्रेम असेल, तर तुम्हाला खरा आनंद मिळेल. आणि तुम्ही ‘खऱ्‍या जीवनाकडे’ जाणाऱ्‍या मार्गावर चालत राहाल.—१ तीम. ६:१९.

पेत्र आपल्या कमतरतांमुळे निराश झाला

पेत्र निराश झाला होता, पण तो सावरून पुन्हा यहोवाची सेवा करू लागला. यावर मनन केल्यामुळे आपल्याला तर मदत होईलच, पण आपण इतरांनाही मदत करू शकू (परिच्छेद १७-१९ पाहा)

१७. पेत्र कोणत्या गोष्टींमुळे निराश झाला होता?

१७ प्रेषित पेत्र खूप आवेशी होता. पण तो उतावळासुद्धा होता. त्यामुळे कधीकधी तो अशा काही गोष्टी बोलायचा किंवा करायचा, ज्यांचा नंतर त्याला पस्तावा व्हायचा. उदाहरणार्थ, येशूने जेव्हा आपल्या प्रेषितांना सांगितलं, की त्याला बराच छळ सोसावा लागेल आणि शेवटी त्याला ठार मारलं जाईल, तेव्हा पेत्र त्याला रागावून म्हणाला: “तुला नक्कीच असं काही होणार नाही.” त्या वेळी येशूने त्याची चूक सुधारली. (मत्त. १६:२१-२३) नंतर जेव्हा लोकांचा एक जमाव येशूला अटक करायला आला, तेव्हा पेत्र अविचारीपणे वागला; त्याने महायाजकाच्या दासाचा कान कापून टाकला. या वेळी पुन्हा येशूने त्याची चूक सुधारली. (योहा. १८:१०, ११) आणखी एका प्रसंगी पेत्र बढाई मारत म्हणाला, की इतर सगळे प्रेषित जरी येशूला सोडून गेले तरी तो त्याला कधीच सोडून जाणार नाही. (मत्त. २६:३३) पण त्याचा हा आत्मविश्‍वास फार काळ टिकला नाही. कारण नंतर त्याच रात्री लोकांच्या भीतीने त्याने तीन वेळा येशूला नाकारलं. त्यामुळे तो इतका निराश झाला की “तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.” (मत्त. २६:६९-७५) आता येशू आपल्याला कधीच माफ करणार नाही असा त्याने विचार केला असेल.

१८. येशूने पेत्रला निराशेवर मात करायला कशी मदत केली?

१८ हे खरं आहे, की पेत्र निराश झाला होता. पण तो इतकाही निराश झाला नाही, की त्याने यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं. उलट, नंतर तो सावरला आणि इतर प्रेषितांसोबत यहोवाची सेवा करत राहिला. (योहा. २१:१-३; प्रे. कार्यं १:१५, १६) कोणत्या गोष्टींनी त्याला सावरायला मदत केली? एक म्हणजे, त्याला हे आठवलं असेल की त्याचा विश्‍वास खचू नये म्हणून येशूने त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. आणि पश्‍चात्ताप केल्यावर त्याने आपल्या बांधवांचा विश्‍वास दृढ करावा असं येशूने त्याला सांगितलेलंही त्याला आठवलं असेल. येशूने पेत्रसाठी मनापासून केलेली प्रार्थना यहोवाने ऐकली. नंतर जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं तेव्हा तो स्वतः पेत्रला भेटला; त्याला धीर देण्यासाठीच तो त्याला भेटला असेल. (लूक २२:३२; २४:३३, ३४; १ करिंथ. १५:५) तसंच, तो प्रसंगही आठवा जेव्हा प्रेषितांनी मासे धरण्यासाठी रात्रभर मेहनत करूनही त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. तेव्हा पुनरुत्थान झालेला येशू त्यांना भेटला. त्या वेळी येशूने पेत्रला आपल्यावरचं प्रेम व्यक्‍त करायची संधी दिली आणि त्याला आणखी जबाबदाऱ्‍या सोपवल्या. यावरून दिसून आलं, की आपल्या या प्रिय मित्राला येशूने माफ केलं होतं.—योहा. २१:१५-१७.

१९. स्तोत्र १०३:१३, १४ या वचनांप्रमाणे, आपण जेव्हा पाप करतो तेव्हा यहोवा आपल्याबद्दल कसा विचार करतो?

१९ आपण काय शिकतो?  येशू पेत्रशी ज्या प्रकारे वागला त्यावरून दिसून येतं, की येशूसुद्धा यहोवाप्रमाणेच खूप दयाळू आहे. त्यामुळे आपण जेव्हा चुका करतो, तेव्हा यहोवा आपल्याला माफ करणार नाही असा आपण कधीही विचार करू नये. कारण आपण असा विचार करावा हेच तर सैतानाला पाहिजे. उलट आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो, त्याला आपल्या कमतरतांची जाणीव आहे आणि आपल्याला माफ करायला तो नेहमी तयार असतो. (स्तोत्र १०३:१३, १४ वाचा.) आणि इतर जण आपलं मन दुखावतात, तेव्हा आपण त्यांच्याशी यहोवासारखंच दयाळूपणे वागलं पाहिजे.

२०. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२० योसेफ, नामी, रूथ, एक लेवी आणि पेत्र यांच्या उदाहरणांवरून आपल्याला ही खातरी मिळते, की “यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो.” (स्तो. ३४:१८) या उदाहरणांवरून आपण शिकलो, की आपल्यावर येणारी प्रत्येक समस्या यहोवा काढून टाकणार नाही. आणि त्यामुळे आपण निराश होऊ शकतो. पण यहोवाच्या मदतीने आपण जेव्हा या समस्यांचा धीराने सामना करतो, तेव्हा आपला विश्‍वास मजबूत होतो. (१ पेत्र १:६, ७) पुढच्या लेखात आपण हे पाहणार आहोत, की आपल्या कमतरतांमुळे किंवा कठीण परिस्थितींमुळे निराश झालेल्या आपल्या विश्‍वासू सेवकांना यहोवा कशी मदत करतो.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

^ परि. 5 योसेफ, नामी, रूथ, एक लेवी आणि प्रेषित पेत्र यांनी अशा समस्यांचा सामना केला ज्यांमुळे ते खूप निराश झाले. पण यहोवाने या सगळ्यांना धीर आणि बळ कसं दिलं हे आपण या लेखात पाहू या. तसंच, आपण हेसुद्धा पाहू, की त्यांच्या चांगल्या उदाहरणांतून आणि यहोवाने त्यांना प्रेमळपणे केलेल्या मदतीतून आपण काय शिकू शकतो.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: आपल्या पतींच्या मृत्यूमुळे नामी, रूथ आणि अर्पा खूप दुःखी आणि निराश आहेत. नंतर, ओबेदच्या जन्मामुळे नामी, रूथ आणि बवाजला खूप आनंद होतो.