व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

नीतिवचनं २४:१६ असं म्हणतं: “नीतिमान सात वेळा जरी पडला, तरी तो पुन्हा उठेल.” इथे अशा व्यक्‍तीबद्दल म्हटलं आहे का जी वारंवार पाप करते आणि जिला देव नंतर माफ करतो?

नाही. या वचनात वारंवार पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल सांगितलेलं नाही; तर अशा व्यक्‍तीबद्दल सांगितलं आहे जी वारंवार संकटांचा सामना करूनही सावरते. त्या अर्थाने, ती व्यक्‍ती खाली पडूनसुद्धा पुन्हा उठते.

या वचनाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आपण त्याची मागची-पुढची वचनं पाहू या. त्या वचनांमध्ये असं म्हटलं आहे: “नीतिमान माणसाच्या घराजवळ दुष्ट इराद्याने टपून बसू नकोस; त्याच्या विश्रांतीचं ठिकाण उद्ध्‌वस्त करू नकोस. कारण नीतिमान सात वेळा जरी पडला, तरी तो पुन्हा उठेल, पण दुष्टावर संकट येताच तो खाली पडेल.  तुझा शत्रू पडला तर आनंदी होऊ नकोस; तो अडखळला तर मनातल्या मनात खूश होऊ नकोस.”—नीति. २४:१५-१७.

काहींना असं वाटतं, की १६ वं वचन अशा व्यक्‍तीबद्दल सांगतं जी पाप करते, पण पश्‍चात्ताप करून पुन्हा देवासोबत चांगलं नातं जोडते. उदाहरणार्थ, इंग्लंडच्या दोन पाळकांनी असं लिहिलं, की पूर्वीच्या आणि आताच्याही ख्रिस्ती धर्म-प्रचारकांनी या वचनाचं स्पष्टीकरण असंच दिलं आहे. त्या पाळकांनी पुढे लिहिलं, की जर असं या वचनाचं स्पष्टीकरण असेल, तर त्याचा अर्थ असा होईल, की “एखाद्या चांगल्या माणसाने कितीही गंभीर पापं केली तरी काही हरकत नाही; पश्‍चात्ताप करून तो पुन्हा देवावर प्रेम करू शकतो आणि त्याची कृपा मिळवू शकतो. अशा प्रकारे तो पापात पडूनसुद्धा पुन्हा उठू शकतो.” पण हे स्पष्टीकरण अशा माणसाला आवडेल जो पापी कृत्यांपासून दूर राहायचा प्रयत्नच करत नाही. कारण, आपण वारंवार पाप जरी केलं, तरी देव आपल्याला माफ करेल असा तो विचार करतो.

पण १६ व्या वचनाचा अर्थ तसा होत नाही.

१६ व्या आणि १७ व्या वचनांत “पडला” या शब्दासाठी असलेला हिब्रू शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरण्यात आला आहे. काही वचनांमध्ये तो शब्द खरोखरचं पडणं दाखवण्यासाठी वापरला आहे; जसं की, बैल रस्त्यावर पडतो, कोणी छतावरून पडतं किंवा खडा जमिनीवर पडतो. (अनु. २२:४, ८; आमो. ९:९) पण काही वचनांमध्ये तो जीवनातल्या समस्यांमुळे अडखळून पडणं किंवा संकटात सापडणं हे दाखवण्यासाठी वापरला आहे. जसं की: “यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो, तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो. असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही, कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.”—स्तो. ३७:२३, २४; नीति. ११:५; १३:१७; १७:२०.

पण प्रोफेसर एडवर्ड एच. प्लम्पट्रे काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या. ते म्हणतात: “[‘पडला’] यासाठी असलेला हिब्रू शब्द पापात पडण्यासाठी कधीच वापरलेला नाही.” त्यामुळे बायबलच्या आणखी एका विद्वानाने १६ व्या वचनाचं स्पष्टीकरण असं दिलं आहे: “देवाच्या लोकांशी वाईट वागण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते नेहमीच सावरतात. पण दुष्ट लोकांना ते जमत नाही.”

तर या सगळ्यावरून दिसून येतं, की नीतिवचनं २४:१६ हे वचन पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल बोलत नाही. तर अशा व्यक्‍तीबद्दल बोलतं जिला जीवनात मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागतो; तिला कदाचित वारंवारही त्यांचा सामना करावा लागू शकतो. या दुष्ट जगात एका नीतिमान व्यक्‍तीला आरोग्याच्या किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. किंवा आपल्या विश्‍वासासाठी तिला कदाचित सरकाराकडून छळाचाही सामना करावा लागू शकतो. पण ती हा भरवसा ठेवू शकते, की देव तिला सांभाळेल आणि टिकून राहण्यासाठी मदत करेल. आपण स्वतः बऱ्‍याचदा हे पाहिलं आहे, की देवाच्या लोकांवर कितीही संकटं आली तरी ते त्यात टिकून राहिले आहेत. कारण, “पडत असलेल्या सर्वांना यहोवा सावरतो; तो वाकलेल्या सर्वांना उभं करतो.”—स्तो. ४१:१-३; १४५:१४-१९.

नीतिमान व्यक्‍तीबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, इतरांवर संकटं येतात तेव्हा तिला आनंद होत नाही. उलट, तिला या गोष्टीमुळे आनंद होतो, की “जे खऱ्‍या देवाचं भय मानतात त्यांचं भलं होतं, . . . कारण ते खरंच त्याचं भय मानतात.”—उप. ८:११-१३; ईयो. ३१:३-६; स्तो. २७:५, ६.