व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५२

निराशेवर मात करणं शक्य आहे!

निराशेवर मात करणं शक्य आहे!

“तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे, म्हणजे तो तुला सांभाळेल.”—स्तो. ५५:२२.

गीत ३८ आपला भार यहोवावर टाक

सारांश *

. निराशेमुळे काय होऊ शकतं?

आपल्या जीवनात दररोज कोणत्या न कोणत्या समस्या येतात, आणि त्यांचा सामना करायचा आपण होता होईल तितका प्रयत्न करतो. पण तुम्ही हे नक्कीच मान्य कराल, की आपण जेव्हा निराश असतो तेव्हा समस्यांचा सामना करणं आपल्याला कठीण जातं. कारण निराशेमुळे आपला आत्मविश्‍वास कमजोर होऊ शकतो, आपलं धैर्य खचू शकतं आणि जीवनातला आनंद नाहीसा होऊ शकतो. नीतिवचनं २४:१० (तळटीप) यात म्हटलं आहे: “संकटाच्या काळात तू निराश झालास, तर तुझी शक्‍ती कमी पडेल.” हे किती खरं आहे. आपण जेव्हा निराश असतो, तेव्हा आपण इतके कमजोर होऊ शकतो, की समस्यांचा सामना करायची शक्‍तीच आपल्यात उरत नाही.

२. निराश होण्याची कोणती कारणं असू शकतात, आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

निराशेची भावना वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकते; जसं की, स्वतःच्या चुकांमुळे, कमतरतांमुळे किंवा आजारपणामुळे. तसंच, यहोवाच्या सेवेत हवी असलेली नेमणूक मिळाली नाही म्हणून आपण निराश होऊ शकतो. याशिवाय, आपल्याला कदाचित अशा क्षेत्रात काम करावं लागत असेल, जिथले बहुतेक लोक आपला संदेश ऐकत नाहीत आणि यामुळेही आपण निराश होऊ शकतो. मग या भावनेवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो, ते आपण पुढे पाहू या.

स्वतःच्या चुकांचा आणि कमतरतांचा सामना करावा लागतो तेव्हा

३. कमीपणाच्या भावनेवर मात करायला आपल्याला कशामुळे मदत होईल?

आपण सगळेच बऱ्‍याचदा चुका करतो आणि आपल्यात काही कमतरताही असतात. त्यामुळे आपल्याला कदाचित असं वाटेल, की आपण फार वाईट आहोत आणि यहोवा त्याच्या नवीन जगात आपल्याला जाऊ देणार नाही. पण असा विचार करणं खूप चुकीचं आहे. असा विचार टाळण्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? बायबल म्हणतं, की येशू ख्रिस्ताला सोडून सगळ्या मानवांनी “पाप केलं आहे.” (रोम. ३:२३) असं असलं तरी, यहोवा आपल्या चुका काढत नाही आणि आपल्याकडून चुका होऊच नये अशी अपेक्षाही तो करत नाही. उलट, तो आपला प्रेमळ पिता आहे आणि त्यामुळे त्याला आपल्याला मदत करायची इच्छा आहे. तसंच, तो आपल्याशी फार धीराने वागतो. आपण आपल्या कमतरतांवर आणि कमीपणाच्या भावनेवर मात करण्यासाठी किती प्रयत्न करतो, हे तो पाहतो आणि आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो.—रोम. ७:१८, १९.

आपण पूर्वी ज्या चांगल्या गोष्टी केल्या आणि आताही ज्या करत आहोत त्यांची यहोवा कदर करतो (परिच्छेद ५ पाहा) *

४-५. पहिले योहान ३:१९, २० या वचनांत दिलेल्या कोणत्या गोष्टीमुळे दीपा आणि मरीयाला निराशेवर मात करायला मदत झाली?

दीपा आणि मरीया या दोन बहिणींचं उदाहरण विचारात घ्या. * दीपा लहान असताना तिच्या घरच्यांनी तिला कधीच प्रेमाने वागवलं नाही, तिचं कधी कौतुक केलं नाही. त्यामुळे तिला स्वतःबद्दल खूप कमीपणा वाटायचा. आणि मोठी झाल्यावरही तिला स्वतःबद्दल असंच वाटायचं. तिच्या हातून एखादी छोटीशी चूक जरी झाली तरी तिला असं वाटायचं, की आपण काहीच कामाचे नाही. मरीयाच्या बाबतीतही असंच घडलं. तिच्या घरचेसुद्धा तिच्याशी फार वाईट वागायचे. त्यामुळे आपण कसल्याच लायकीचे नाही असं तिला वाटायचं. सत्यात आल्यानंतरही ती असा विचार करायची, की यहोवाची साक्षीदार म्हणवून घ्यायचीसुद्धा आपली लायकी नाही.

पण तरीही या दोन बहिणींनी यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं नाही. कोणत्या गोष्टीने त्यांना निराशेवर मात करायला मदत केली? एक म्हणजे, त्यांनी यहोवाला प्रार्थना केली आणि आपल्याला कसं वाटतं हे त्याला सांगितलं. (स्तो. ५५:२२) तसंच, पूर्वी आपण जे काही सोसलं त्यामुळे आपण स्वतःबद्दल वाईट विचार करतो याची आपल्या प्रेमळ पित्याला, यहोवाला जाणीव आहे हे त्यांना बायबलमधून समजलं. आणि आपल्यातले चांगले गुण आपल्याला जरी दिसत नसले, तरी यहोवाला ते दिसतात हेही त्यांना समजलं.—१ योहान ३:१९, २० वाचा.

६. पुन्हापुन्हा तीच चूक केल्यामुळे एखाद्या व्यक्‍तीला कसं वाटू शकतं?

आणखी एका परिस्थितीचा विचार करा. एक व्यक्‍ती कदाचित एखादी वाईट सवय सोडायचा खूप प्रयत्न करत असेल. पण पुन्हा तीच चूक केल्यामुळे ती निराश होते. आपल्यालाही असं वाटू शकतं, आणि असं वाटणं साहजिक आहे. (२ करिंथ. ७:१०) पण आपण स्वतःला नको तितका दोष देऊ नये. आणि असा टोकाचा विचार करू नये, की ‘आपण काहीच कामाचे नाही. यहोवा आपल्याला कधीच माफ करणार नाही.’ कारण हे खरं नाही. अशा विचारसरणीमुळे आपण कदाचित यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ. तसंच, नीतिवचनं २४:१० या वचनात काय म्हटलं आहे ते आठवा. तिथे म्हटलं आहे, की आपण ‘निराश होतो, तेव्हा आपली शक्‍ती कमी होते.’ त्यामुळे निराश होण्याऐवजी, आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्याकडे माफी मागितली पाहिजे. (यश. १:१८) केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला खरंच वाईट वाटतं आणि ती चूक सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, हे पाहून यहोवा नक्कीच तुम्हाला माफ करेल. याशिवाय, मंडळीतल्या वडिलांशीही बोला. ते तुम्हाला यहोवासोबत पुन्हा एक जवळचं नातं जोडायला धीराने मदत करतील.—याको. ५:१४, १५.

७. एखाद्या कमतरतेवर मात करायला आपल्याला खूप संघर्ष करावा लागत असेल तर आपण निराश का होऊ नये?

जे भाऊबहीण आपल्या कमतरतांवर मात करायचा प्रयत्न करतात अशांना फ्रान्समधले एक वडील, शॉन-लूक असं म्हणतात: “आपण कधीच चुका केल्या नाही तरच यहोवा आपल्याला नीतिमान मानेल का? नाही. तर चुका केल्यानंतर त्याबद्दल जर आपल्याला वाईट वाटत असेल आणि त्या सुधारण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करत असू तरच यहोवा आपल्याला नीतिमान मानेल.” (रोम. ७:२१-२५) त्यामुळे एखाद्या कमतरतेवर मात करण्यासाठी जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल, तर निराश होऊ नका, स्वतःला दोष देऊ नका. हे नेहमी लक्षात ठेवा, की आपल्यापैकी कोणीही स्वतःच्या बळावर यहोवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकत नाही. आपल्या सगळ्यांनाच यहोवाच्या अपार कृपेची गरज आहे आणि ती आपल्याला खंडणी बलिदानामुळेच मिळू शकते.—इफिस. १:७; १ योहा. ४:१०.

८. आपण निराश असतो तेव्हा आपण कोणाची मदत घेऊ शकतो?

आपण मंडळीतल्या भाऊबहिणींची मदत घेऊ शकतो.  आपण जेव्हा निराश असतो तेव्हा आपण आपल्या भाऊबहिणींकडे आपलं मन मोकळं करू शकतो. ते धीराने आपलं ऐकतील आणि दिलासा देणाऱ्‍या त्यांच्या शब्दांमुळे आपल्याला बरं वाटेल. (नीति. १२:२५; १ थेस्सलनी. ५:१४) नायजीरियामध्ये राहणाऱ्‍या जॉय नावाच्या एका बहिणीनेसुद्धा निराशेवर मात केली. ती म्हणते: “भाऊबहीण नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही. त्यांनी मला खूप बळ दिलं आणि त्यांच्याद्वारेच यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. निराशेत असलेल्या व्यक्‍तीला धीर कसा द्यायचा हेसुद्धा मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळालं.” पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, आपल्याला प्रोत्साहनाची गरज कधी आहे हे नेहमीच आपल्या भाऊबहिणींना कळणार नाही. त्यामुळे आपण स्वतःहून एखाद्या अनुभवी भावाशी किंवा बहिणीशी बोललं पाहिजे आणि त्यांची मदत घेतली पाहिजे.

आजारपणाचा सामना करावा लागतो तेव्हा

९. स्तोत्र ४१:३ आणि ९४:१९ या वचनांमुळे आपल्याला दिलासा कसा मिळतो?

यहोवाकडे मदत मागा.  आपण आजारी असतो, आणि खासकरून बऱ्‍याच काळापासून आजारी असतो तेव्हा आपण निराश होऊ शकतो. हे खरं आहे, की आज यहोवा चमत्कार करून आपला आजार बरा करत नाही; पण त्याचा सामना करण्यासाठी लागणारी शक्‍ती तो नक्कीच आपल्याला देतो आणि आपलं सांत्वन करतो. (स्तोत्र ४१:३; ९४:१९ वाचा.) तसंच, तो भाऊबहिणींना आपल्याला मदत करायला प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे ते आपल्या घरातली काही कामं करायला, काही खरेदी करायला आपल्याला मदत करतील आणि आपल्यासोबत प्रार्थनाही करतील. याशिवाय, यहोवा बायबलमधल्या दिलासा देणाऱ्‍या गोष्टीही आपल्या लक्षात आणून देऊ शकतो; जसं की, नवीन जगातली सुंदर आशा, दुःख आणि आजारपण नसलेलं परिपूर्ण जीवन.—रोम. १५:४.

१०. इसांगला कोणत्या गोष्टीमुळे सावरायला मदत झाली?

१० नायजीरियामध्ये राहणाऱ्‍या इसांग नावाच्या भावाचा अनुभव विचारात घ्या. त्यांचा एक मोठा अपघात झाला होता. आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, की ते यापुढे कधीच चालू शकणार नाहीत. इसांग म्हणतात: “ते ऐकून मी पूर्णपणे खचून गेलो, खूप निराश झालो.” पण ते कायम निराश राहिले नाही. कोणत्या गोष्टीने त्यांना सावरायला मदत केली? ते म्हणतात, “मी आणि माझ्या बायकोने यहोवाला प्रार्थना करायचं आणि बायबलचा अभ्यास करायचं कधीच सोडलं नाही. आम्ही ठरवलं होतं, की यहोवाने आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत आणि भविष्यासाठी जी सुंदर आशा दिली आहे, त्यांचा विचार करायचा.”

जे भाऊबहीण आजारी असतात, जास्त चालूफिरू शकत नाहीत, तेसुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रचार करू शकतात आणि आनंदी राहू शकतात (परिच्छेद ११-१३ पाहा)

११. सिंडी या बहिणीला आपल्या आजारपणात आनंदी राहायला कशामुळे मदत झाली?

११ आता मेक्सिकोमध्ये राहणाऱ्‍या सिंडी नावाच्या बहिणीचा अनुभव विचारात घ्या. तिला एक जीवघेणा आजार झाला होता. या आजाराचा तिने कसा सामना केला? तिच्यावर उपचार चालू होते तेव्हा तिने ठरवलं, की दररोज कोणाला ना कोणाला तरी साक्ष द्यायची. ती म्हणते: “असं केल्यामुळे स्वतःच्या दुखण्याचा, ऑपरेशनचा किंवा आजाराचा विचार करण्याऐवजी मी इतरांचा विचार करू शकले. साक्ष देण्यासाठी मी सहसा असं करायचे: डॉक्टरांशी किंवा नर्सेसशी बोलताना मी त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करायचे. मग मी त्यांना विचारायचे की त्यांनी इतकं अवघड काम का निवडलं. त्यांच्या उत्तरावरून मला समजायचं की त्यांच्याशी कोणत्या विषयावर बोललेलं त्यांना आवडेल. त्यांच्यापैकी अनेक जण म्हणाले, की ‘खूप कमी पेशन्ट आमची विचारपूस करतात.’ आणि अशी काळजी दाखवल्याबद्दल अनेकांनी माझे आभार मानले आहेत. काहींनी तर मला त्यांचा पत्ता आणि फोन नंबरही दिला. माझ्या आयुष्यातल्या या कठीण काळात यहोवा मला मदत करेल हे मला माहीत होतं. पण तो मला इतका आनंद देईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती.”—नीति. १५:१५.

१२-१३. काही आजारी किंवा वयोवृद्ध जण कशा प्रकारे साक्ष देऊ शकले, आणि याचा काय परिणाम झाला?

१२ जे भाऊबहीण आजारी किंवा वयोवृद्ध असतात, ते सेवाकार्यात हवा तितका सहभाग घेऊ शकत नाहीत. त्यामुळे काही वेळा ते निराश होतात. पण असं असलं, तरी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गांनी चांगली साक्ष दिली आहे. अमेरिकेत राहणाऱ्‍या लॉरल नावाच्या बहिणीचाच विचार करा. एका आजारामुळे तिला श्‍वास घ्यायला खूप त्रास व्हायचा. त्यामुळे श्‍वास घेण्यासाठी तिला ३७ वर्षं एका मशीनमध्ये पडून राहावं लागलं. याशिवाय, तिला कॅन्सर झाला, त्वचेचे गंभीर आजार झाले आणि तिच्यावर अनेक ऑपरेशन करण्यात आले. पण इतकं सगळं असूनही तिने प्रचार करायचं सोडलं नाही. तिच्या उपचारासाठी तिच्या घरी येणाऱ्‍या नर्सेसना आणि इतर लोकांना ती साक्ष द्यायची. याचा काय परिणाम झाला? तिने जवळजवळ १७ लोकांना सत्यात यायला मदत केली. *

१३ अनेक भाऊबहिणींना आजारामुळे किंवा वय झाल्यामुळे घराबाहेर पडता येत नाही, किंवा त्यांना अशा ठिकाणी राहावं लागतं जिथे त्यांची काळजी घेतली जाते. अशांना फ्रान्समध्ये राहणारे रिचअर्ड नावाचे एक वडील खूप चांगली गोष्ट सुचवतात. ते म्हणतात: “त्यांनी आपली मासिकं-पुस्तकं सगळ्यांना दिसतील अशा प्रकारे एका टेबलावर मांडून ठेवावीत. ते पाहून सहसा लोकांची उत्सुकता वाढते आणि ते प्रश्‍न विचारतात. त्यामुळे त्यांना साक्ष द्यायची संधी मिळते. या पद्धतीने साक्ष दिल्यामुळे अशा भाऊबहिणींना खूप प्रोत्साहन मिळतं.” या भावाने सुचवलेल्या या पद्धतीशिवाय घराबाहेर पडू न शकणारे भाऊबहीण पत्र लिहून किंवा फोनवरूनही इतरांना साक्ष देऊ शकतात.

हवी असलेली नेमणूक आपल्याला मिळत नाही तेव्हा

१४. दावीद राजाने कशा प्रकारे आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं?

१४ कधीकधी आपल्याला यहोवाच्या सेवेत हवी असलेली नेमणूक मिळत नाही. याची बरीच कारणं असू शकतात; जसं की, वाढतं वय, आरोग्याच्या समस्या किंवा दुसरं काही कारण. आपल्या बाबतीत कधी असं घडलं तर दावीद राजाच्या उदाहरणातून आपण बरंच काही शिकू शकतो. देवाचं मंदिर बांधायची दावीदची मनापासून इच्छा होती. पण त्यासाठी यहोवाने दुसऱ्‍याची निवड केली. दावीदला हे कळलं तेव्हा यहोवाने ज्याची निवड केली होती, त्याला दावीदने पूर्ण पाठिंबा दिला. मंदिराच्या बांधकामासाठी त्याने खूप मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी दिली. खरंच, दावीदचं किती छान उदाहरण आपल्यासमोर आहे!—२ शमु. ७:१२, १३; १ इति. २९:१, ३-५.

१५. ह्‍यूग नावाच्या भावाने निराशेवर कशी मात केली?

१५ फ्रान्समध्ये राहणाऱ्‍या ह्‍यूग नावाच्या भावाचा विचार करा. ते मंडळीत वडील म्हणून सेवा करत होते. पण आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना आपली जबाबदारी सोडून द्यावी लागली. आजारामुळे घरातली छोटीछोटी कामंसुद्धा ते करू शकत नव्हते. ते म्हणतात: “सुरुवातीला मी खूप निराश झालो आणि आपण काहीच कामाचे नाहीत असं मला वाटायचं. पण काही काळानंतर माझ्या लक्षात आलं, की ज्या गोष्टी आपण आता करू शकत नाही त्यांबद्दल दुःख करत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी यहोवाच्या सेवेत आपल्याला जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि तेच मी केलं. त्यामुळे मी आनंदी राहू शकलो. मी ठरवलंय, मी हार मानणार नाही. गिदोन आणि त्याच्यासोबतचे तिनशे पुरुष खूप दमले होते, पण तरीसुद्धा ते लढत राहिले. त्यांच्यासारखंच मीसुद्धा शेवटपर्यंत लढत राहीन!”—शास्ते ८:४.

१६. स्वर्गदूतांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१६ आपल्यासमोर विश्‍वासू स्वर्गदूतांचंही एक चांगलं उदाहरण आहे. एकदा, दुष्ट राजा अहाब याला कसं फसवता येईल याबद्दल यहोवाने स्वर्गदूतांना विचारलं. तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी काही ना काही सुचवलं. मग यहोवाने एका स्वर्गदूताची कल्पना विचारात घेतली, आणि त्याची ही कल्पना यशस्वी होईल असं म्हटलं. (१ राजे २२:१९-२२) पण त्यामुळे इतर विश्‍वासू स्वर्गदूत निराश झाले का? त्यांनी असा विचार केला का, की ‘कल्पना सुचवून आम्ही उगाचच आमचा वेळ वाया घालवला?’ मुळीच नाही. कारण स्वर्गदूत नम्र आहेत आणि सगळा गौरव यहोवाला गेला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे.—शास्ते १३:१६-१८; प्रकटी. १९:१०.

१७. यहोवाच्या सेवेत विशिष्ट नेमणुका न मिळाल्यामुळे आपण निराश झालो तर आपण काय केलं पाहिजे?

१७ हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवाचे साक्षीदार असण्याचा आणि त्याच्या राज्याबद्दल प्रचार करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे.  नेमणुका आज आहेत, तर उद्या नाहीत. शिवाय, आपण आपल्या नेमणुकांमुळे नाही; तर आपल्या नम्रतेमुळे यहोवाच्या आणि आपल्या भाऊबहिणींच्या नजेरत मौल्यवान ठरतो. त्यामुळे नेहमी नम्र राहण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. तसंच, बायबलमध्ये यहोवाच्या ज्या अनेक नम्र सेवकांची उदाहरणं दिली आहेत, त्यांवर मनन करा. आणि जमेल त्या मार्गाने आपल्या भाऊबहिणींची आनंदाने सेवा करा.—स्तो. १३८:६; १ पेत्र ५:५.

आपल्या क्षेत्रातले बहुतेक लोक आपला संदेश ऐकत नाहीत तेव्हा

१८-१९. आपण सेवाकार्यातला आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो?

१८ तुम्ही अशा क्षेत्रात प्रचार करत आहात का जिथे बहुतेक लोक तुमचा संदेश ऐकत नाहीत, किंवा ते घरी भेटत नाहीत? आणि यामुळे तुम्ही निराश होता का? अशा क्षेत्रात काम करत असताना आनंदी राहण्यासाठी किंवा आपला आनंद वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी “ सेवाकार्यातला आनंद कसा वाढवायचा?” या चौकटीत काही गोष्टी सुचवल्या आहेत. पण यासोबतच, सेवाकार्याबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवणंही खूप महत्त्वाचं आहे. तो आपण कसा ठेवू शकतो?

१९ आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण देवाच्या नावाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल लोकांना सांगण्यासाठी प्रचार करतो.  येशूने हे स्पष्टपणे सांगितलं होतं, की खूप कमी लोक त्याचे शिष्य बनतील. (मत्त. ७:१३, १४) आपण सेवाकार्यात असतो, तेव्हा आपल्याला यहोवा, येशू आणि स्वर्गदूतांसोबत काम करण्याचा बहुमान मिळतो. (मत्त. २८:१९, २०; १ करिंथ. ३:९; प्रकटी. १४:६, ७) यहोवा अशाच लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतो ज्यांना त्याची सेवा करायची इच्छा असते. (योहा. ६:४४) म्हणून आज जरी एखाद्या व्यक्‍तीने आपला संदेश ऐकला नाही, तरी आपण निराश होऊ नये. कदाचित पुढच्या वेळी ती आपला संदेश ऐकेल.

२०. यिर्मया २०:८, ९ या वचनांमुळे आपल्याला निराशेवर मात करायला कशी मदत मिळते?

२० यिर्मया संदेष्ट्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो. त्याला ज्या क्षेत्रात संदेश सांगण्यासाठी नेमलं होतं, तिथले लोक त्याचा संदेश ऐकत नव्हते. त्या लोकांकडून त्याला “दिवसभर अपमान आणि थट्टा सहन करावी” लागायची. (यिर्मया २०:८, ९ वाचा.) एकदा तर तो इतका निराश झाला, की संदेश सांगायचं सोडून द्यावं असं त्याला वाटलं. पण त्याने तसं केलं नाही. कारण, “यहोवाचा संदेश” त्याच्या मनात धगधगत्या अग्नीसारखा होता आणि तो स्वतःकडे ठेवणं त्याला कठीण झालं. आपण जर दररोज बायबलचा अभ्यास केला आणि त्यावर मनन केलं, तर आपल्यालाही यिर्मयासारखंच वाटेल. देवाचा संदेश आपण स्वतःकडे ठेवू शकणार नाही, तर आपण तो इतरांना सांगू. यामुळे सेवाकार्यातला आपला आनंद वाढेल आणि संदेश ऐकणारे लोकही कदाचित आपल्याला भेटतील.—यिर्म. १५:१६.

२१. आपल्याला निराशेवर मात कशी करता येईल?

२१ आधी उल्लेख केलेली दीपा म्हणते: “आपल्यावर वार करण्यासाठी सैतान एका शक्‍तिशाली हत्याराचा वापर करतो; ते हत्यार म्हणजे निराशा.” पण सैतानाच्या कोणत्याही हत्यारापेक्षा यहोवा देव कितीतरी शक्‍तिशाली आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही कारणामुळे निराश झालात, तर मदतीसाठी यहोवाकडे कळकळून प्रार्थना करा. तो तुम्हाला तुमच्या चुकांचा आणि कमतरतांचा सामना करायला बळ देईल. तसंच, तुमच्या आजारपणात तो तुम्हाला आधार देईल. तो तुम्हाला सेवेच्या नेमणुकांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला, आणि प्रचारातला आनंद टिकवून ठेवायला मदत करेल. तर मग, तुम्ही कधीही निराश झालात, तर आपल्या प्रेमळ पित्याकडे आपलं मन मोकळं करा. त्याच्या मदतीने, तुम्ही नक्कीच निराशेवर मात करू शकाल!

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

^ परि. 5 आपण सगळेच कधी ना कधी निराश होतो. पण या भावनेवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो हे या लेखात सांगितलं आहे. तसंच, यहोवाच्या मदतीने निराशेवर मात करणं शक्य आहे हेसुद्धा या लेखातून आपल्याला शिकायला मिळेल.

^ परि. 4 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 12 लॉरल निस्बेट या बहिणीची जीवन कथा २२ जानेवारी १९९३ च्या (इंग्रजी) सावध राहा!  अंकात दिली आहे.

^ परि. 69 चित्रांचं वर्णन: एक बहीण काही काळासाठी निराश होते. पण यहोवाच्या सेवेत तिने पूर्वी कायकाय केलं ते ती आठवते आणि यहोवाला प्रार्थना करते. तिने यहोवासाठी जे काही केलं आणि आताही जे काही करत आहे, ते तो कधीच विसरणार नाही याची तिला पक्की खातरी आहे.