व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगाचा अंत कधी होईल?

जगाचा अंत कधी होईल?

मागच्या लेखात आपण पाहिलं होतं, की जगाचा अंत म्हणजे फक्‍त दुष्ट लोकांचा आणि वाईट परिस्थितीचा अंत; पृथ्वीचा आणि सगळ्याच लोकांचा अंत नाही. पण या दुष्ट जगाचा अंत कधी होईल हे बायबलमध्ये सांगितलं आहे का?

जगाच्या अंताबद्दल येशूने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या:

“सतत जागे राहा, कारण तो दिवस आणि ती वेळही तुम्हाला माहीत नाही.”—मत्तय २५:१३.

“सावध राहा, जागे राहा, कारण ठरवलेली वेळ केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही.”—मार्क १३:३३.

यावरून दिसून येतं, की या दुष्ट जगाचा अंत नेमका कधी होईल हे कोणत्याही माणसाला माहीत नाही. पण देवाला माहीत आहे. आणि त्यासाठी त्याने एक विशिष्ट ‘दिवस आणि वेळ’ ठरवली आहे. (मत्तय २४:३६) तो दिवस आणि वेळ आपल्याला माहीत नाही, तर याचा अर्थ असा होतो का, की अंत किती जवळ आहे हेसुद्धा आपल्याला कळणार नाही? नाही, असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. कारण येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने सांगितलं होतं, की भविष्यात अशा काही घटना घडतील ज्यांवरून हे समजेल की अंत जवळ आहे.

त्या घटना कोणत्या आहेत?

या दुष्ट जगाचा अंत होण्याआधी कोणकोणत्या घटना घडतील याबद्दल येशूने म्हटलं: “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल. ठिकठिकाणी दुष्काळ पडतील आणि भूकंप होतील.” (मत्तय २४:३, ७) तसंच त्याने असंही म्हटलं, की “रोगांच्या साथी,” म्हणजे महामाऱ्‍या येतील. (लूक २१:११) येशूने सांगितलेल्या घटना पूर्ण होताना तुम्ही पाहत आहात का?

आज आपल्याला युद्धांमुळे, दुष्काळांमुळे, भूकंपांमुळे आणि वेगवेगळ्या आजारांमुळे खूप दुःख सहन करावं लागतं. जसं की, २००४ मध्ये हिंदी महासागरात एक मोठा भूकंप आला आणि त्यामुळे त्सुनामी आली. त्यात जवळजवळ २,२५,००० लोकांचा जीव गेला. याशिवाय तीन वर्षांत, कोव्हिड-१९ या महामारीमुळे जगभरात जवळपास ६९ लाख लोकांचा मृत्यू झाला. येशूने म्हटल्याप्रमाणे, अशा घटनांवरून समजणार होतं, की जगाचा अंत जवळ आहे.

‘शेवटचे दिवस’

अंत येईल त्याआधीच्या काळाला बायबलमध्ये ‘शेवटचे दिवस’ असं म्हटलं आहे. (२ पेत्र ३:३, ४) त्या काळात, लोकांचं वागणं अगदी खालच्या थराला जाईल असंही बायबलमध्ये दुसरे तीमथ्य ३:१-५ यात सांगितलं आहे. (“ शेवटच्या दिवसांत लोकांचं वागणं कसं असेल?” ही चौकट पाहा.) आज तुम्हाला असे लोक पाहायला मिळतात का जे स्वार्थी, लोभी, हिंसक आहेत आणि जे एकमेकांचा द्वेष करतात? यावरूनही दिसून येतं, की जगाचा अंत खूप जवळ आहे.

हे शेवटचे दिवस संपायला खूप वेळ लागेल का? नाही. बायबल म्हणतं, की त्यासाठी “फार कमी वेळ उरला आहे.” मग देव, पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश करेल.—प्रकटीकरण ११:१५-१८; १२:१२.

लवकरच पृथ्वी एका सुंदर बागेसारखी होईल!

या दुष्ट जगाचा अंत करण्यासाठी देवाने एक विशिष्ट दिवस आणि वेळ आधीच ठरवली आहे. (मत्तय २४:३६) पण “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही,” तर येणाऱ्‍या अंतातून आपण वाचावं आणि नवीन जगात जावं अशी त्याची इच्छा आहे. (२ पेत्र ३:९) म्हणून तो आज सगळ्यांना त्याच्याबद्दल शिकून घ्यायची आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे वागायची संधी देत आहे.

त्यासाठी त्याने त्याच्याबद्दल शिकून घ्यायची व्यवस्थाही केली आहे. त्याविषयी येशूने म्हटलं होतं, की जगाचा अंत होण्याआधी देवाच्या राज्याबद्दलचा “आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल.” (मत्तय २४:१४) आज यहोवाचे साक्षीदार हे काम करत आहेत. ते संपूर्ण जगात देवाच्या राज्याबद्दल लोकांना सांगत आहेत आणि त्याच्याबद्दल शिकून घ्यायला त्यांना मदत करत आहेत. त्यासाठी त्यांनी अब्जो तास खर्च केले.

लवकरच देव या दुष्ट जगाचा अंत करेल. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, आपण त्यातून वाचू शकतो. आणि ही पृथ्वी एका सुंदर बागेसारखी होईल तेव्हा आपल्याला त्यात राहायची संधी मिळू शकते. पण त्या नवीन जगात जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

येशूने ‘शेवटच्या दिवसांबद्दल’ जे सांगितलं होतं त्यामुळे आपल्याला एका सुंदर भविष्याची आशा मिळते