व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लवकरच जे नवीन जग येणार आहे त्यात राहण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच तयारी करू शकता

एक सुंदर नवीन जग जवळ आहे!

एक सुंदर नवीन जग जवळ आहे!

देवाने ही पृथ्वी माणसांसाठी बनवली. त्याची अशी इच्छा होती, की चांगल्या लोकांनी या पृथ्वीवर कायम राहावं. (स्तोत्र ३७:२९) आधी त्याने एदेन या ठिकाणी एक सुंदर बाग बनवली. आणि पहिल्या मानवी जोडप्याला, म्हणजे आदाम आणि हव्वा यांना ती राहायला दिली. देवाची अशी इच्छा होती, की या जोडप्याने आणि त्यांना होणाऱ्‍या मुलांनी या संपूर्ण पृथ्वीला त्या बागेसारखं सुंदर बनवावं आणि तिची देखभाल करावी.—उत्पत्ती १:२८; २:१५.

दुःखाची गोष्ट म्हणजे, आज ही पृथ्वी त्या सुंदर बागेसारखी नाही. पण म्हणून देवाने आपलं मन बदललेलं नाही. देवाने सुरुवातीला ठरवलं होतं त्याप्रमाणे तो लवकरच संपूर्ण पृथ्वीला एका सुंदर बागेसारखं बनवणार आहे. याआधीच्या लेखांमध्ये आपण पाहीलं होतं, की देव या पृथ्वीचा नाश करणार नाही, तर फक्‍त दुष्ट लोकांचा आणि वाईट परिस्थितीचा नाश करणार आहे. आणि चांगल्या लोकांना तो या पृथ्वीवर राहण्याची संधी देणार आहे. त्या वेळी परिस्थिती कशी असेल, ते आता आपण पाहू या.

अख्ख्या जगावर एकच सरकार शासन करेल

लवकरच देवाचं सरकार स्वर्गातून संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. मग सगळं काही चांगलं होईल. सगळे लोक मिळून-मिसळून राहतील. आणि प्रत्येकाकडे चांगलं आणि समाधान देणारं काम असेल. या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी देवाने येशू ख्रिस्ताला निवडलं आहे. पण आज जे शासन करतात त्यांच्यासारखा तो मुळीच नाही. कारण, तो नेहमी लोकांच्या भल्याचा विचार करेल. तो सगळ्यांशी प्रेमाने आणि दयेने वागेल. आणि कोणावरही अन्याय करणार नाही. —यशया ११:४.

जगातल्या सगळ्या लोकांमध्ये एकता असेल

त्या सुंदर नवीन जगात जातीपातीच्या, देशाच्या किंवा संस्कृतीच्या भिंती नसतील. सगळ्या लोकांमध्ये एकी असेल. (प्रकटीकरण ७:९, १०) आणि पृथ्वीवर राहणारे सगळे लोक देवावर आणि एकमेकांवर प्रेम करतील. पृथ्वीची देखभाल करायचं जे काम देवाने माणसांना सुरुवातीला दिलं होतं, ते काम सगळे लोक एकत्र मिळून आनंदाने पूर्ण करतील. —स्तोत्र ११५:१६.

कधीच नैसर्गिक आपत्ती येणार नाही

आजकाल नैसर्गिक आपत्तींमुळे बरंच नुकसान होतं. पण देवाचं सरकार पृथ्वीवर राज्य करू लागेल तेव्हा कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार नाही. (स्तोत्र २४:१, २) येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने देवाच्या शक्‍तीच्या मदतीने काय केलं हे तुम्हाला माहीत आहे का? एकदा समुद्रात खूप मोठं वादळ उठलं होतं. पण येशूने फक्‍त एका शब्दाने ते शांत केलं. (मार्क ४:३९, ४१) त्यामुळे येशू राज्य करायला सुरुवात करेल तेव्हा नैसर्गिक आपत्तींची भीती राहणार नाही. तसंच, मानव आणि प्राणी एकमेकांना इजा करणार नाहीत. शिवाय, लोक पर्यावरणाचंही नुकसान करणार नाहीत.—होशेय २:१८.

चांगलं आरोग्य आणि भरपूर अन्‍न असेल

नवीन जगात कोणीही आजारी पडणार नाही, म्हातारं होणार नाही किंवा मरणार नाही. सगळ्यांना चांगलं आरोग्य असेल. (यशया ३५:५, ६) कारण सुरुवातीला एदेन बागेत जसं स्वच्छ आणि सुंदर वातावरण होतं, तसंच नवीन जगात असेल. त्या वेळी जमीन भरपूर पीक देईल आणि अन्‍नधान्याची रेलचेल असेल. (उत्पत्ती २:९) देवाने पूर्वी जसं आपल्या लोकांना “पोठभर अन्‍न” दिलं, तसंच तो नवीन जगातही देईल. —लेवीय २६:४, ५.

खऱ्‍या अर्थाने शांती आणि सुरक्षा असेल

देवाचं सरकार राज्य करू लागेल तेव्हा सगळेच एकमेकांशी प्रेमाने वागतील, कोणी कोणावर अन्याय करणार नाही. संपूर्ण जगात शांती असेल. मग कधीच युद्धं होणार नाहीत, कोणीही अधिकाराचा गैरवापर करणार नाही आणि रोजच्या गरजांसाठी कधीच कुणाला संघर्ष करावा लागणार नाही. बायबल असं वचन देतं: “त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, कोणीही त्यांना घाबरवणार नाही.”—मीखा ४:३, ४.

प्रत्येकाला स्वतःचं घर आणि समाधान देणारं काम असेल

आज वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांना आपलं राहतं घर सोडून जावं लागतं. पण नवीन जगात तशी भीती नसेल. उलट, प्रत्येक कुटुंब स्वतःच्या घरात राहील. शिवाय, आपण जे काही काम करू त्यातून आपल्याला समाधान मिळेल. बायबल म्हणतं: “लोक जे काही काम करतील, त्यापासून त्यांना खूप आनंद मिळेल. त्यांची मेहनत वाया जाणार नाही.”—यशया ६५:२१-२३.

सगळ्यात चांगलं शिक्षण मिळेल

बायबल असं वचन देतं, की नवीन जगात “संपूर्ण पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरून जाईल.” (यशया ११:९) तिथे राहणाऱ्‍या लोकांना आपल्या निर्माणकर्त्याच्या, म्हणजे यहोवाच्या अफाट बुद्धीबद्दल आणि त्याने बनवलेल्या सुंदर गोष्टींबद्दल शिकायला मिळेल. ते आपल्या ज्ञानाचा उपयोग शस्त्रं बनवण्यासाठी किंवा इतरांना नुकसान पोचवण्यासाठी करणार नाहीत. (यशया २:४) याउलट, एकमेकांसोबत शांतीने कसं राहायचं आणि पृथ्वीची काळजी कशी घ्यायची हे ते शिकतील.—स्तोत्र ३७:११.

कधीही न संपणारं जीवन मिळेल

माणसांना प्रत्येक दिवस जीवनाचा मनसोक्‍त आनंद घेता यावा म्हणून देवाने ही पृथ्वी खूप विचार करून बनवली आहे. माणसांनी या पृथ्वीवर कायम जगावं अशी देवाची इच्छा आहे. (स्तोत्र ३७:२९; यशया ४५:१८) त्यासाठी “तो मृत्यू कायमचा काढून टाकेल.” (यशया २५:८) त्यानंतर, “कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही,” असंही बायबल म्हणतं. (प्रकटीकरण २१:४) मग देव सर्व लोकांना, म्हणजे ज्यांना तो या दुष्ट जगाच्या नाशातून वाचवेल त्यांना, तसंच नवीन जगात ज्या असंख्य लोकांना तो मेलेल्यांतून पुन्हा जिवंत करेल त्या सगळ्यांना या पृथ्वीवर कायम जगण्याची संधी देईल. —योहान ५:२८, २९; प्रेषितांची कार्यं २४:१५.

आत्तासुद्धा जगभरात असे लाखो लोक आहेत, जे येणाऱ्‍या त्या नवीन जगात राहण्यासाठी तयारी करत आहेत. नवीन जगात राहण्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे हे समजून घेण्यासाठी ते यहोवाबद्दल आणि येशू ख्रिस्ताबद्दल शिकत आहेत.—योहान १७:३.

येणाऱ्‍या जगाच्या नाशातून वाचण्यासाठी आणि नवीन जगात जाण्यासाठी काय करायची गरज आहे? हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांसोबत कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातून चर्चा करून मोफत बायबलचा अभ्यास करा.