व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४

एकमेकांना आपुलकी दाखवत राहा

एकमेकांना आपुलकी दाखवत राहा

“भावाभावांसारखं प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा.”—रोम. १२:१०.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

सारांश *

१. आज कुटुंबांमधलं प्रेम नाहीसं होत आहे हे कशावरून दिसून येतं?

बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं, की शेवटल्या दिवसांत लोकांमध्ये “माया-ममता” राहणार नाही. (२ तीम. ३:१, ३) ही गोष्ट आज आपल्या डोळ्यांसमोर घडताना आपण पाहत आहोत. आज घटस्फोटामुळे लाखो कुटुंबं विस्कटली आहेत. आईवडिलांमधलं प्रेम आटल्यामुळे मुलांना असं वाटतं, की आपल्यावर कोणाचंही प्रेम नाही. एका घरात राहणारी माणसंसुद्धा एकमेकांशी परक्यांसारखी वागतात. याबद्दल एका कुटुंब-सल्लागाराने असं म्हटलं: “कुटुंबातला प्रत्येक जण एकमेकांशी बोलण्याऐवजी कंप्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतो; किंवा मग, व्हिडिओ गेम्स खेळण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे एका छताखाली राहूनसुद्धा ते एकमेकांना नीट ओळखत नाहीत.”

२-३. (क) रोमकर १२:१० या वचनाप्रमाणे आपल्याला कुणाबद्दल आपुलकी असली पाहिजे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

एकमेकांवर प्रेम न करणाऱ्‍या जगातल्या लोकांसारखं आपल्याला व्हायचं नाही. (रोम. १२:२) याउलट, आपल्या कुटुंबातल्या लोकांबद्दल आणि मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला आपुलकी असली पाहिजे. (रोमकर १२:१० वाचा.) आपुलकी म्हणजे, कुटुंबातल्या लोकांबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि आपलेपणा. असाच जिव्हाळा आणि आपलेपणा मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दलही आपल्याला वाटला पाहिजे. आपण अशी आपुलकी दाखवतो तेव्हा मंडळीतली एकता टिकवून राहते.—मीखा २:१२.

भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी बायबलची काही उदाहरणं आपल्याला कशी मदत करू शकतात ते आता आपण पाहू या.

यहोवा “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहे”

४. यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे स्तोत्र १०३:८ वरून कसं दिसून येतं?

बायबलमध्ये यहोवाच्या अनेक सुंदर गुणांबद्दल सांगितलं आहे. जसं की, “देव प्रेम आहे” असं बायबल म्हणतं. (१ योहा. ४:८) प्रेमाच्या या गुणामुळेच आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. पण बायबल असंही म्हणतं, की यहोवा “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहे.” (स्तोत्र १०३:८ वाचा.) यावरून यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हेच दिसून येत नाही का?

५. यहोवा कशा प्रकारे दया दाखवतो, आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

स्तोत्र १०३:८ या वचनामध्ये यहोवाच्या आणखी एका गुणाबद्दल सांगितलं आहे. तो म्हणजे दया. या गुणामुळेसुद्धा आपण यहोवाकडे आकर्षित होतो. (निर्ग. ३४:६) यहोवा आपल्या चुका माफ करून आपल्याला दया दाखवतो. (स्तो. ५१:१) पण दया दाखवणं म्हणजे फक्‍त माफ  करणं इतकंच नाही. एखाद्या व्यक्‍तीला आपण दुःखात पाहतो तेव्हा आपल्याला तिची दया येते. आणि त्यामुळे आपण लगेच तिला मदत करायला पुढे येतो. एका आईलासुद्धा आपल्या बाळाबद्दल असंच वाटतं. त्याला त्रासात पाहून तिचा जीव कळवळतो आणि ती लगेच त्याच्या मदतीला धावून जाते. पण आपल्याला त्रासात पाहून यहोवाचा जीव एका आईपेक्षा जास्त कळवळतो. (यश. ४९:१५) त्याला आपली दया येते आणि म्हणून तो आपल्याला मदतही करतो. (स्तो. ३७:३९; १ करिंथ. १०:१३) यहोवाप्रमाणेच, आपणसुद्धा दया दाखवली पाहिजे. भाऊबहिणींनी आपलं मन दुखावलं तर त्याबद्दल राग न बाळगता, आपण मोठ्या मनाने त्यांना क्षमा केली पाहिजे. (इफिस. ४:३२) पण याशिवाय आणखी एका महत्त्वाच्या मार्गाने आपण दया दाखवू शकतो. तो म्हणजे, जेव्हा आपले भाऊबहीण संकटात असतात तेव्हा आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. आपण प्रेमापोटी इतरांना दया दाखवतो तेव्हा आपण त्यांना आपुलकी दाखवत असतो, आणि यहोवाचंच अनुकरण करत असतो.—इफिस. ५:१.

“योनाथान व दावीद यांच्यात घट्ट मैत्री जुळली”

६. योनाथान आणि दावीद यांच्यातली मैत्री कशी होती?

आपुलकी दाखवणाऱ्‍या कितीतरी लोकांची उदाहरणं बायबलमध्ये दिली आहेत. त्यातलंच एक उदाहरण योनाथान आणि दावीद यांचं आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल बायबल म्हणतं: “योनाथान व दावीद यांच्यात घट्ट मैत्री जुळली. योनाथान दावीदवर जिवापाड प्रेम करू लागला.” (१ शमु. १८:१) शौलच्या जागी राजा म्हणून दावीदचा अभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे शौल दावीदची ईर्ष्या करू लागला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करू लागला. पण शौलच्या मुलाने, म्हणजे योनाथानने दावीदला मारून टाकण्यासाठी आपल्या वडिलांना मुळीच साथ दिली नाही. उलट, योनाथान आणि दावीद यांनी आपली मैत्री टिकवून ठेवायची आणि एकमेकांना साथ द्यायची शपथ घेतली.—१ शमु. २०:४२.

योनाथान आणि दावीद यांच्यात वयाचं खूप अंतर होतं, पण तरी ते जिवलग मित्र बनले (परिच्छेद ६-९ पाहा)

७. कोणती एक गोष्ट योनाथान आणि दावीद यांच्या मैत्रीच्या आड येऊ शकली असती?

योनाथान आणि दावीद यांच्या मैत्रीच्या आड खरंतर बऱ्‍याच गोष्टी येऊ शकल्या असत्या. जसं की, त्या दोघांमध्ये वयाचं खूप अंतर होतं. योनाथान दावीदपेक्षा जवळजवळ तीस वर्षांनी मोठा होता. त्यामुळे तो असा विचार करू शकला असता, की ‘आपल्यात आणि दावीदमध्ये काहीच सारखं नाही. दावीद आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे. शिवाय त्याला अनुभवही कमी आहे. अशा व्यक्‍तीशी आपण कशी काय मैत्री करू शकतो?’ पण योनाथानने तसा विचार केला नाही. उलट, दावीदबद्दल त्याला खूप आदर होता.

८. योनाथान दावीदचा एक चांगला मित्र होता असं का म्हणता येईल?

योनाथान दावीदची ईर्ष्या करू शकला असता. कारण शौल राजाचा मुलाग असल्यामुळे पुढचा राजा होण्याचा हक्क त्याचाच होता. (१ शमु. २०:३१) पण योनाथान नम्र आणि यहोवाला एकनिष्ठ होता. त्यामुळे यहोवाने दावीदला राजा म्हणून निवडलं तेव्हा त्याने ती गोष्ट आनंदाने स्वीकारली. तसंच, तो दावीदलाही एकनिष्ठ राहिला. या गोष्टीला शौलचा भयंकर विरोध असतानाही योनाथानने शेवटपर्यंत दावीदला साथ दिली.—१ शमु. २०:३२-३४.

९. योनाथानने दावीदचा कधी हेवा केला का? समजावून सांगा.

दावीदबद्दल आपुलकी असल्यामुळे योनाथानने कधीच त्याचा हेवा केला नाही. योनाथान स्वतः एक कुशल तिरंदाज आणि एक शूर योद्धा होता. त्याच्याबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दल लोक असं म्हणायचे, की “ते गरुडांपेक्षा वेगवान, आणि सिंहांपेक्षा बलवान होते.” (२ शमु. १:२२, २३) त्यामुळे आपण केलेल्या पराक्रमांची योनाथान सहज शेखी मारू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. दावीदने केलेल्या मोठमोठ्या कामांमुळे त्याने त्याचा कधीच हेवा केला नाही किंवा त्याच्याशी चढाओढ करायचाही प्रयत्नही केला नाही. उलट दावीद किती धैर्यवान आहे आणि यहोवावर त्याचा किती भरवसा आहे, या गोष्टीचं त्याला नेहमीच कौतुक वाटलं. खरंतर, दावीदने गल्याथला ठार मारलं त्यानंतरच योनाथानला तो आवडू लागला, आणि पुढे त्यांच्यात आपुलकीची मैत्री निर्माण झाली. अशा प्रकारची आपुलकी आपण आपल्या भाऊबहिणींना कशी दाखवू शकतो?

आपण भाऊबहिणींना आपुलकी कशी दाखवू शकतो?

१०. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणं म्हणजे काय?

१० बायबल आपल्याला असं सांगतं, की “एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.” (१ पेत्र १:२२) या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. तो आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. आणि आपण जर त्याला एकनिष्ठ राहिलो तर आपल्यावरचं त्याचं हे प्रेम कधीही कमी होणार नाही. (रोम. ८:३८, ३९) “जिवापाड” या शब्दासाठी ग्रीक भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ असा होतो, की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करणं. काही वेळा भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी आपल्यालासुद्धा खूप प्रयत्न करावे लागतील. जसं की, कोणी आपलं मन दुखावलं तर आपण प्रेमाने त्यांचं सहन करत राहिलं पाहिजे. आणि आपल्यातली शांती आणि एकता टिकवून ठेवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं पाहिजे. (इफिस. ४:१-३) आपण जर आपल्यातलं शांतीचं बंधन टिकवून ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला, तर आपण त्यांच्या चुकांकडे लक्ष देणार नाही. उलट, आपण त्यांच्याकडे यहोवाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू.—१ शमु. १६:७; स्तो. १३०:३.

“प्रभूमध्ये एक मनाच्या असा,” असा सल्ला पौलने युवदीया आणि सुंतुखेला दिला. हा सल्ला आपल्यालाही तितकाच लागू होतो. कारण काही वेळा भाऊबहिणींसोबत जुळवून घेणं आपल्याला कठीण जाऊ शकतं (परिच्छेद ११ पाहा)

११. भाऊबहिणींना आपुलकी दाखवणं काही वेळा आपल्याला कठीण का जाऊ शकतं?

११ भाऊबहिणींना आपुलकी दाखवणं नेहमीच सोपं नसतं. खासकरून आपल्याला त्यांच्या चुका दिसतात तेव्हा. असं दिसतं, की पहिल्या शतकातल्या काही ख्रिश्‍चनांचीसुद्धा हीच समस्या होती. उदाहरणार्थ, युवदीया आणि सुंतुखे या दोन बहिणींनी आनंदाचा संदेश सांगण्यासाठी पौलसोबत “खांद्याला खांदा लावून” खूप मेहनत केली होती. पण काही कारणामुळे त्या दोघींचं एकमेकींशी पटत नव्हतं. त्यामुळे पौलने त्यांना असा सल्ला दिला: “प्रभूमध्ये एक मनाच्या असा.”—फिलिप्पै. ४:२, ३.

मंडळीतले तरुण आणि वृद्ध असे सगळेच वडील एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात (परिच्छेद १२ पाहा)

१२. भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो?

१२ भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना समजून घ्यायला आणि त्यांच्याशी मैत्री करायला आपल्याला सोपं जाईल. कोणाशी मैत्री करण्यासाठी वयाचं आणि संस्कृतीचं बंधन नसावं. योनाथान आणि दावीदचंच उदाहरण आठवा. त्यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचं अंतर होतं, पण तरी ते जिवलग मित्र बनले. तुम्हीसुद्धा मंडळीत अशा एखाद्या व्यक्‍तीशी मैत्री करू शकता का जी वयाने तुमच्यापेक्षा मोठी किंवा लहान आहे? अशी मैत्री करून तुम्ही दाखवून द्याल, की तुमचं “संपूर्ण बंधुसमाजावर प्रेम” आहे.—१ पेत्र २:१७.

परिच्छेद १२ पाहा *

१३. मंडळीतल्या प्रत्येकाशी आपली एकसारखीच मैत्री होऊ शकते का? समजावून सांगा.

१३ भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्याचा अर्थ असा होतो का, की मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीशी आपली एकसारखी मैत्री असेल? नाही. ते शक्यही नाही. सहसा आपल्यासारख्या आवडीनिवडी असलेल्या लोकांशी आपली जवळची मैत्री होते. आणि त्यात चुकीचं असं काहीच नाही. येशूचाच विचार करा. त्याचे सगळे प्रेषित त्याचे “मित्र” होते. पण योहानशी त्याची खास मैत्री होती. (योहा. १३:२३; १५:१५; २०:२) पण म्हणून त्याने योहानला इतरांपेक्षा खास वागणूक दिली का? नाही. उदाहरणार्थ, देवाच्या राज्यात आपल्याला मानाचं पद मिळावं अशी योहानने आणि त्याच्या भावाने, याकोबने येशूकडे विनंती केली, तेव्हा तो त्यांना म्हणाला: “माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसायचा अधिकार देणं माझ्या हातात नाही.” (मार्क १०:३५-४०) आपणसुद्धा आपल्या जवळच्या मित्रांना इतरांपेक्षा खास वागणूक देऊ नये. (याको. २:३, ४) नाहीतर मंडळीत शांती आणि एकता राहणार नाही.—यहू. १७-१९.

१४. फिलिप्पैकर २:३ मध्ये दिलेल्या सल्ल्यामुळे चढाओढ करायची वृत्ती टाळायला कशी मदत होते?

१४ आपल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला आपुलकी असेल, तर आपण त्यांच्याशी चढाओढ करण्याचा प्रयत्न करणार नाही. योनाथान दावीदशी कसं वागला ते आठवा. दावीदऐवजी स्वतः राजा बनण्यासाठी त्याने त्याच्याशी चढाओढ केली नाही. आपण सगळेच योनाथानचं अनुकरण करू शकतो. भाऊबहिणींच्या कौशल्यांमुळे किंवा क्षमतांमुळे आपण त्यांची ईर्ष्या करू नये. उलट आपण ‘नम्रतेने त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं पाहिजे.’ (फिलिप्पैकर २:३ वाचा.) हे नेहमी लक्षात असू द्या, की मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीमध्ये काही ना काही चांगलं असतं आणि त्यामुळे मंडळीला मदतच होते. आपण जर नम्र असलो, तर भाऊबहिणींमधल्या या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतील आणि त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकता येईल.—१ करिंथ. १२:२१-२५.

१५. एका कुटुंबाच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१५ आपल्यावर अचानक संकट कोसळतं तेव्हा यहोवा आपलं सांत्वन करतो. तो हे कसं करतो? भाऊबहिणींद्वारे तो आपल्याला आपुलकी दाखवतो आणि व्यावहारिक मार्गांनी मदत करतो. हे एका कुटुंबाने कसं अनुभवलं त्याकडे लक्ष द्या. २०१९ सालच्या “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी तानिया आणि तिची तीन मुलं अमेरिकेला गेली होती. शनिवारचा कार्यक्रम संपल्यानंतर ते गाडीने परत आपल्या हॉटेलवर चालले होते. तानिया म्हणते: “जात असताना दुसऱ्‍या एका गाडीचा ताबा अचानक सुटला आणि ती आमच्या गाडीला येऊन धडकली. कुणालाही दुखावपत झाली नव्हती, पण आम्ही खूप घाबरलो होतो. आणि गाडीतून उतरून रस्त्यावर उभे होतो. त्यानंतर आम्ही पाहिलं, की रस्त्याच्या कडेला असलेलं कोणीतरी आम्हाला हात दाखवून त्याच्या गाडीत यायला सांगत होतं. तो आपला एक बांधवच होता आणि अधिवेशन संपल्यावर तोही घरी चालला होता. पण तो एकटाच आमच्यासाठी थांबला नव्हता, तर अधिवेशनासाठी स्वीडनहून आलेले आणखी पाच भाऊबहीणसुद्धा आमच्यासाठी थांबले होते. त्या बहिणींनी आम्हाला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्याचीच तर आम्हाला सगळयात जास्त गरज होती! ‘आम्ही ठीक आहोत’ असं आम्ही त्यांना सांगितलं. पण ते आम्हाला एकटं सोडायला तयार नव्हते. ॲम्ब्यूलेन्स येईपर्यंत आणि आम्हाला प्रथमोपचार मिळेपर्यंत ते आमच्यासोबतच थांबले. या कठीण प्रसंगात पावलोपावली आम्ही यहोवाचं प्रेम अनुभवलं. यामुळे भाऊबहिणींवरचं आमचं प्रेम आणखी वाढलं. आणि यहोवाबद्दलसुद्धा मनात प्रेम आणि कृतज्ञता दाटून आली.” तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का जेव्हा तुम्हाला मदतीची खूप गरज होती आणि भाऊबहिणींनी आपुलकीने ती केली?

१६. आपण एकमेकांना आपुलकी दाखवतो तेव्हा कोणते चांगले परिणाम घडून येतात?

१६ आपण एकमेकांना आपुलकी दाखवतो तेव्हा किती चांगले परिणाम घडून येतात याचा विचार करा. संकटाच्या काळात आपण आपल्या भाऊबहिणींचं सांत्वन करतो. मंडळीतली एकता वाढते आणि सगळे आनंदाने यहोवाची सेवा करू शकतात. आपण खरोखर येशूचे शिष्य आहोत हे दिसून येतं. आणि हीच गोष्ट चांगल्या मनाच्या लोकांना खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित करते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, “जो खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे” त्याची आपण स्तुती करतो. (२ करिंथ. १:३) त्यामुळे भाऊबहिणींनो, आपण सगळे एकमेकांना आपुलकी दाखवून आपल्यातलं प्रेम वाढवत राहू या!

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

^ परि. 5 येशूने म्हटलं होतं, की त्याचे शिष्य आपसातल्या प्रेमामुळे ओळखले जातील. आणि म्हणूनच आपण एकमेकांसोबत प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपसातलं हे प्रेम वाढवण्यासाठी आपण एकमेकांना आपुलकी दाखवली पाहिजे. म्हणजे, आपल्या कुटुंबातल्या लोकांवर आपण जितकं प्रेम करतो, तितकंच प्रेम आपण आपल्या भाऊबहिणींवर केलं पाहिजे. आपण हे कसं करत राहू शकतो, तेच या लेखात सांगितलं आहे.

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: मंडळीतल्या एका तरुण वडिलाला एका वयस्कर वडिलाच्या अनुभवामुळे खूप मदत होते. नंतर हेच वयस्कर वडील त्या तरुण वडिलाचं आणि त्याच्या पत्नीचं आपल्या घरी आनंदाने स्वागत करत आहेत. तरुण जोडपंसुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन आलं आहे. अशा प्रकारे दोन्ही जोडपी एकमेकांना प्रेम आणि आपुलकी दाखवत आहेत.