व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

आम्ही यहोवाला कधीच ‘नाही’ म्हटलं नाही

आम्ही यहोवाला कधीच ‘नाही’ म्हटलं नाही

एका चक्रीवादळामुळे नदीतली माती ढवळून निघाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता, की मोठमोठी दगडं त्यासोबत वाहून चालली होती. त्या वेळी मी, माझे पती हार्वी आणि आमच्यासोबत आमीस भाषेचा एक अनुवादक होता. आम्हाला खरंतर नदीच्या पलीकडे जायचं होतं. पण पुराच्या पाण्याने पूलसुद्धा वाहून गेला होता. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. काय करावं ते सूचत नव्हतं. पलीकडे जाण्यासाठी आम्ही आमची छोटी कार एका मोठ्या ट्रकमध्ये चढवली. पण ती बांधली वगेरे नव्हती. मग ट्रक त्या नदीतून हळूहळू पुढे जाऊ लागला. आम्ही नदी पार करू लागलो, तेव्हा पलीकडे असलेले बांधव श्‍वास रोखून आमच्याकडे पाहत होते. तो प्रवास कधीही न संपणारा वाटत होता. आम्ही सतत यहोवाला प्रार्थना करत होतो. शेवटी कसेबसे आम्ही पलीकडे सुखरूप पोचलो. ही घटना १९७१ मध्ये घडली. त्या वेळी आम्ही आमच्या घरापासून हजारो मैल दूर, ताइवानच्या पूर्व किनारपट्टीवर होतो. पण आम्ही इथे कसे आलो ते मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगते.

यहोवाबद्दल आम्ही कसे शिकलो?

चार भावांमध्ये हार्वी सगळ्यात मोठे होते. पश्‍चिम ऑस्ट्रेलियाच्या मिडलँड जंकशन नावाच्या एका छोट्या शहरात त्यांचं कुटुंब राहत होतं. १९३० च्या काळात जगात भयंकर आर्थिक मंदी चालू होती, तेव्हा त्यांना सत्य मिळालं. हळूहळू हार्वीच्या मनातही यहोवाबद्दल प्रेम वाढू लागलं. आणि वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा बाप्तिस्मा झाला. एकदा मंडळीत एका भावाने त्यांना टेहळणी बुरूज  मासिकाचं वाचन करायला सांगितलं, तेव्हा हार्वीने त्यांना ‘नाही’ म्हटलं. कारण आपण अजूनही लहान आहोत, आपण ते करू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. पण त्या भावाने त्यांना समजावून सांगितलं, की “यहोवाच्या संघटनेत कोणी आपल्याला काही काम करायला सांगतं तेव्हा आपण ते करू शकतो  हे त्या व्यक्‍तीला माहीत असतं, आणि म्हणून ती आपल्याला ते काम करायला सांगत असते.” (२ करिंथ. ३:५) यावरून हार्वीला एक मोलाचा धडा शिकायला मिळाला. तो हा, की यहोवाच्या संघटनेत कोणत्याही कामाला ‘नाही’ म्हणायचं नाही.

मी मुळात इंग्लंडची. तिथेच आम्ही म्हणजे मी, माझी आई आणि माझी मोठी बहीण सत्य शिकलो. सुरुवातीला माझ्या वडिलांनी विरोध केला, पण नंतर तेही सत्यात आले. वडिलांचा विरोध असतानाही वयाच्या नवव्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला. मला पायनियर बनायचं होतं आणि पुढे मिशनरी सेवेत जायचं होतं. पण मी २१ वर्षांची होत नाही, तोपर्यंत मी पायनियरिंग करू शकत नाही, असं वडिलांचं म्हण्णं होतं. मला मात्र तोपर्यंत थांबायचं नव्हतं. त्यामुळे १६ वर्षांची असताना वडिलांच्या परवानगीने मी ऑस्ट्रेलियाला माझ्या मोठ्या बहिणीकडे राहायला गेले. मग १८ वर्षांची झाल्यावर मी पायनियरिंग सुरू केली.

१९५१ मध्ये आमच्या लग्नाच्या दिवशी

ऑस्ट्रेलियातच मी हार्वीला भेटले. आम्हा दोघांनाही मिशनरी सेवा करायची होती. १९५१ मध्ये आमचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही दोन वर्षं पायनियरिंग केली. मग आम्हाला विभागीय कार्यात नेमण्यात आलं. त्यासाठी पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचा खूप मोठा विभाग आम्हाला नेमला होता. त्यामुळे आम्हाला रूक्ष आणि ओसाड भागांमधून लांबलांबचा प्रवास करावा लागायचा.

आमचं स्वप्न पूर्ण झालं

१९५५ मध्ये यांकी स्टेडियममध्ये गिलियड ग्रेज्युएशनच्या वेळी

१९५४ मध्ये आम्हाला २५ व्या गिलियड प्रशालेला बोलवण्यात आलं. त्यामुळे मिशनरी बनण्याचं आमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं. आम्ही जहाजाने न्यूयॉर्कला पोचलो. गिलियड प्रशालेत आमचा बायबलचा सखोल अभ्यास सुरू झाला. त्यासोबतच आम्हाला स्पॅनिश भाषाही शिकावी लागत होती. पण हार्वीसाठी हे खूप कठीण होतं, कारण स्पॅनिश भाषेचे काही उच्चार त्यांना जमत नव्हते.

त्या वेळी प्रशालेत एक घोषणा करण्यात आली. शिक्षकांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं, की ज्यांना जपानमध्ये जाऊन सेवा करायची इच्छा असेल, त्यांनी जपानी भाषा शिकून घेण्यासाठी आपली नावं द्यावी. पण मी आणि हार्वीने काही आमची नावं दिली नाही. कारण आम्ही कुठे सेवा करावी हे संघटनेनेच ठरवावं असं आम्हाला वाटत होतं. आम्ही आमची नावं दिली नाहीत, ही गोष्ट बंधू अल्बर्ट श्रोडर या आमच्या एका शिक्षकाच्या लक्षात आली; तेव्हा ते आम्हाला म्हणाले: “याबद्दल पुन्हा विचार करा.” तरीसुद्धा आम्ही आमची नावं द्यायला कचरत होतो. त्या वेळी बंधू श्रोडर म्हणाले: “मी आणि बाकीच्या शिक्षकांनी तुमची नावं लिहून टाकलीत. कदाचित जपानी भाषा तुम्हाला सोपी वाटेल.” आणि तसंच झालं. हार्वी पटकन ती भाषा शिकले.

१९५५ साली आम्ही जपानमध्ये आलो, तेव्हा तिथे फक्‍त ५०० प्रचारक होते. त्या वेळी हार्वी २६ वर्षांचे, तर मी २४ वर्षांची होते. आम्हाला कोबे या शहरात नेमण्यात आलं होतं. तिथे आम्ही चार वर्षं सेवा केली. त्यानंतर आम्हाला पुन्हा प्रवासी कार्य करायला सांगण्यात आलं. आम्ही ती नेमणूक आनंदाने स्वीकारली. आणि नागोया या शहराजवळ आम्ही सेवा करू लागलो. तिथले भाऊबहीण, तिथलं जेवण आणि निसर्ग सौंदर्य या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आवडू लागल्या. पण काही काळातच पुन्हा आमची नेमणूक बदलली. आणि या वेळीसुद्धा आम्ही यहोवाला ‘नाही’ म्हणालो नाही.

नवीन नेमणुकीसोबत नवीन समस्याही आल्या

१९५७ मध्ये जपानच्या कोबे शहरात इतर मिशनरींसोबत मी आणि हार्वी

तीन वर्षं प्रवासी कार्य केल्यानंतर जपानच्या शाखाकार्यालयाने आम्हाला विचारलं, की ‘तुम्हाला ताइवानमध्ये जाऊन आमीस जमातीच्या लोकांना प्रचार करायला आवडेल का?’ कारण तिथले काही बांधव धर्मत्यागी बनले होते. आणि ही समस्या हाताळण्यासाठी ताइवानच्या शाखाकार्यालयाला अशा एका बांधवाची गरज होती जो जपानी भाषा चांगल्या प्रकारे बोलू शकत होता. * पण ताइवानला जायचा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. कारण जपानमधली सेवा आम्हाला खूप आवडायची. पण कोणत्याही कामाला ‘नाही’ म्हणायचं नाही, ही गोष्ट हार्वी शिकले होते. त्यामुळे आम्ही ताइवानला जायलो तयार झालो.

नोव्हेंबर १९६२ मध्ये आम्ही ताइवानला आलो. त्या वेळी तिथे २,२७१ प्रचारक होते. त्यांच्यापैकी बरेच जण आमीस भाषा बोलायचे. पण सगळ्यात आधी आम्हाला चीनी भाषा शिकावी लागणार होती. ती शिकण्यासाठी आमच्याकडे फक्‍त एक पुस्तक होतं. आणि एक शिक्षिका आम्हाला ती भाषा शिकवायची. पण तिला काही इंग्रजी येत नव्हतं. असं असलं तरी आम्ही चीनी भाषा शिकलो.

ताइवानमध्ये आल्यानंतर काही काळातच हार्वी यांना शाखा सेवक म्हणून नेमण्यात आलं. तिथली शाखा छोटी होती. त्यामुळे कार्यालयातलं आपलं काम सांभाळून हे महिन्यातले तीन आठवडे आमीस बांधवांसोबत सेवा करू शकत होते. अधूनमधून प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करताना यांना संमेलनांमध्ये भाषणंही द्यावी लागायची. हार्वी खरंतर जपानी भाषेत सहज भाषणं देऊ शकले असते आणि आमीस बांधवांना ती समजलीही असती. पण धार्मिक सभा चीनी भाषेतच असल्या पाहिजेत असा सरकारचा कायदा होता. त्यामुळे यांनी कशीबशी चीनी भाषेत भाषणं दिली आणि एका बांधवाने आमीस भाषेत त्यांचं भाषांतर केलं.

त्या वेळी ताइवानमध्ये लष्करी कायदा होता. त्यामुळे संमेलनं भरवण्यासाठी बांधवांना अधिकाऱ्‍यांची परवानगी घ्यावी लागायची. पण परवानगी मिळवणं इतकं सोपं नव्हतं आणि काही वेळा पोलीसही ती द्यायला उशीर लावायचे. संमेलनाच्या आठवड्यापर्यंत जर परवानगी मिळाली नाही, तर ती मिळेपर्यंत हार्वी पोलीस स्टेशनमध्येच बसून राहायचे. परदेशातून आलेल्या माणसाला असं बसवून ठेवणं बरं दिसत नसल्यामुळे पोलीस लगेच परवानगी देऊन टाकायचे.

मी पहिल्यांदा डोंगर चढले तेव्हा . . .

प्रचाराला जाण्यासाठी ताइवानमध्ये नदी पार करताना

आम्ही बांधवांसोबत प्रचार करायला जायचो तेव्हा बऱ्‍याचदा आम्हाला डोंगर चढावे लागायचे आणि मोठमोठ्या नद्या पार कराव्या लागायच्या. त्यासाठी सहसा आम्हाला दीडएक तास चालावं लागायचं. मी पहिल्यांदा डोंगर चढले तो अनुभव तुम्हाला सांगते. एका दूरच्या गावात जाण्यासाठी घाईघाईने नाष्टा करून आम्ही पहाटे ५:३० ची बस पकडली. त्यानंतर आम्ही एक मोठी नदी पार केली. आणि मग एक उभा डोंगर चढू लागलो. डोंगर इतका उंच आणि सरळ होता, की माझ्या पुढे चालणाऱ्‍या भावाचे पाय अक्षरशः माझ्या डोळ्यांसमोर होते.

त्या दिवशी सकाळी हार्वी काही बांधवांसोबत प्रचार करत होते. आणि मी एकटीच एका छोट्या गावात सेवाकार्य करत होते. त्या गावात जपानी भाषा बोलणारे लोक राहत होते. दुपारी एकच्या सुमारास मला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं. कारण मी कितीतरी तास काहीच खाल्लं नव्हतं. नंतर मी हार्वीला भेटले तेव्हा ते एकटेच होते. त्यांच्यासोबत इतर बांधव नव्हते. प्रचारकार्य करताना हार्वीने काही मासिकं दिली होती, आणि त्याबदल्यात त्यांना कोंबडीची तीन अंडी मिळाली होती. अंड्याच्या दोन्ही टोकांना छोटंसं छिद्र करून ते चोखून कसं खायचं हे यांनी मला शिकवलं. कच्चं अंडं खायची माझी मुळीच इच्छा होत नव्हती, पण कसंतरी मी एक खाल्लं. आणि दुसरं यांनी खाल्लं. मग तिसरं अंडं कोणाला मिळालं? मलाच. कारण भुकेने जर मला चक्कर आली असती तर यांनाच मला उचलून डोंगरावरून खाली न्यावं लागलं असतं.

अंघोळीचा एक वेगळाच प्रकार

एका विभागीय संमेलनाच्या वेळी मला एक वेगळाच अनुभव आला. आम्ही ज्या भावाच्या घरी राहत होतो त्यांचं घर राज्य सभागृहाच्या अगदी बाजूला होतं. आमीस लोकांसाठी अंघोळ ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विभागीय पर्यवेक्षकाच्या बायकोने आमच्या अंघोळीची तयारी केली. हार्वी कामात असल्यामुळे त्यांनी मला अंघोळीसाठी आधी जायला सांगितलं. मी गेले आणि पाहिलं की तिथे तीन बादल्या ठेवल्या होत्या. एक थंड पाण्याची, एक गरम पाण्याची आणि एक रिकामी. आश्‍चर्य म्हणजे, अंघोळीचं हे ठिकाण घराबाहेर उघड्यावर होतं. आणि बाजूला सभागृहात काही बांधव संमेलनाची तयारी करत होते. त्यामुळे ‘पडद्यासारखं काही मिळेल का,’ असं मी त्या बहिणीला विचारलं. तेव्हा तिने मला काय आणून द्यावं? एक पारदर्शक प्लास्टिक! म्हणून मग मी घराच्या मागे जाऊन अंघोळ करायचा विचार केला. पण तेही शक्य नव्हतं. कारण तिथे काही बदकं होती, आणि जवळ येणाऱ्‍या कोणालाही ती चोच मारायची. काय करावं समजेना. आपण अंघोळ केली नाही तर इथल्या लोकांना वाईट वाटेल. शेवटी मी विचार केला, की ‘बांधव आपल्या कामात खूप व्यस्त आहेत, त्यांचं काही लक्ष जाणार नाही. अंघोळ पटकन उरकून टाकावी.’

आमीस लोकांच्या पोशाखातला आमचा फोटो

आमीस भाषेत प्रकाशनं

हार्वीच्या लक्षात आलं, की आमीस बांधवांना आध्यात्मिक प्रगती करायला खूप संघर्ष करावा लागत आहे. कारण त्यांच्यापैकी अनेकांना लिहिता-वाचता येत नव्हतं. शिवाय, त्यांच्या भाषेत कोणतीही प्रकाशनं नव्हती. पण रोमन अक्षरं वापरून आमीस भाषा लिहायला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे, बांधवांना त्यांची भाषा वाचायला शिकवणं योग्य राहील असं आम्हाला वाटलं. हे खूप मोठं काम होतं. पण शेवटी बांधव वाचायला शिकले आणि स्वतः यहोवाबद्दल अभ्यास करू लागले. १९६६ च्या आसपास आमीस भाषेत आपली प्रकाशनं तयार होऊ लागली. आणि १९६८ मध्ये त्या भाषेत टेहळणी बुरूज प्रकाशित होऊ लागलं.

पण सरकारने चीनी भाषा सोडून इतर भाषांमध्ये असलेल्या प्रकाशनांवर बंदी घातली होती. त्यामुळे आमीस भाषेतलं टेहळणी बुरूज  वेगवेगळ्या स्वरूपांत प्रकाशित केलं जाऊ लागलं. जसं की, काही काळापर्यंत चीनी आणि आमीस या दोन्ही भाषा वापरून आम्ही टेहळणी बुरूज  तयार केलं. म्हणजे कोणाला काही शंका आली तर त्यांना वाटेल की आम्ही इथल्या लोकांना चीनी भाषा शिकवत आहोत. तेव्हापासून यहोवाच्या संघटनेने आमीस भाषेत भरपूर प्रकाशनं छापली आहेत. त्यामुळे या जमातीच्या लोकांनासुद्धा बायबलचं सत्य शिकायची संधी मिळते.—प्रे. कार्यं १०:३४, ३५.

मंडळ्या शुद्ध केल्या गेल्या

बायबलच्या तत्त्वांची पूर्ण समज नसल्यामुळे १९६० आणि १९७० च्या काळात बरेच आमीस बांधव देवाच्या स्तरांनुसार जीवन जगत नव्हते. काही जण अनैतिक जीवन जगत होते, खूप जास्त दारू पीत होते आणि तंबाखू आणि सुपारी खात होते. या गोष्टींबद्दल देवाला कसं वाटतं हे बांधवांना समजावून सांगण्यासाठी हार्वीने अनेक मंडळ्यांना भेटी दिल्या. असंच एका मंडळीला भेट द्यायला जात असताना लेखाच्या सुरुवातीला सांगितलेली घटना आमच्यासोबत घडली.

काही बांधव नम्र होते आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार होते. पण इतर बरेच जण तयार नव्हते. त्यामुळे २० वर्षांच्या काळात ताइवानमध्ये प्रचारकांची संख्या २,४५० वरून जवळपास ९०० वर आली. ही खरंच खूप दुःखाची गोष्ट होती. पण आम्हाला माहीत होतं, की संघटना शुद्ध नसेल तर त्यावर यहोवाचा आशीर्वाद कधीच राहणार नाही. (२ करिंथ. ७:१) काही काळानंतर आमीसचे बांधव यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगू लागले. आणि त्याच्या आशीर्वादाने ताइवानमध्ये आज ११,००० पेक्षा जास्त प्रचारक आहेत.

१९८० नंतर आमीस मंडळ्यांमधल्या भाऊबहिणींचा विश्‍वास आधीपेक्षा मजबूत झाला. त्यामुळे हार्वी चीनी बांधवांना जास्त वेळ मदत करू शकले. त्यांनी कितीतरी बहिणींच्या पतींना सत्यात यायला मदत केली. मला आठवतं, यांच्यापैकी एकाने यहोवाला पहिल्यांदाच प्रार्थना केली तेव्हा हार्वीला खूप आनंद झाला होता. मीसुद्धा अनेकांना सत्यात यायला मदत करू शकले याचा मला खूप आनंद होतो. याशिवाय, पूर्वी मी जिच्याबरोबर अभ्यास केला होता, तिच्या मुलासोबत आणि मुलीसोबत ताइवान शाखा कार्यालयात सेवा करायची संधीही मला मिळाली.

यांना गमावण्याचं दुःख

आज माझा सोबती माझ्याबरोबर नाहीए. ५९ वर्षं एकत्र घालवल्यानंतर १ जानेवारी २०१० ला हार्वी कॅन्सरमुळे गेले. त्यांनी जवळजवळ ६० वर्षं पूर्णवेळेची सेवा केली. आजही मला त्यांची खूप आठवण येते. पण मी त्यांच्यासोबत दोन देशांमध्ये सेवा केली याचा मला आनंद होतो. आम्ही आशिया खंडातल्या दोन कठीण भाषा बोलायला शिकलो, आणि हार्वी तर त्या लिहायलाही शिकले होते.

जवळजवळ चार वर्षांनी, माझं वाढतं वय लक्षात घेऊन नियमन मंडळाने असं ठरवलं, की मी ऑस्ट्रेलियाला परत जावं. मला खरंतर ताइवान सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती. पण यहोवाच्या संघटनेला कधीच ‘नाही’ म्हणायचं नाही, हे हार्वीने मला शिकवलं होतं. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाला परत गेले. हा निर्णय किती योग्य होता हे नंतर मला जाणवलं. कारण माझ्या वयामुळे मला जास्त मदतीची गरज होती.

आज मी बेथेल पाहायला येणाऱ्‍या चीनी आणि जपानी लोकांना त्यांच्या भाषेत बेथेलची माहिती देते

आता मी ऑस्ट्रेलेशियाच्या शाखा कार्यालयात आठवडाभर काम करते आणि शनिवारी-रविवारी मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत प्रचारकार्य करते. बेथेल पाहायला येणाऱ्‍या चीनी आणि जपानी लोकांना मी त्यांच्या भाषेत बेथेलची माहिती देते. पण यासोबतच, यहोवाने दिलेलं पुनरुत्थानाचं वचन पूर्ण व्हायची मी आतुरतेने वाट पाहत आहे. मला माहितीए यहोवा हार्वीला विसरणार नाही. हार्वीने कधीच यहोवाला ‘नाही’ म्हटलं नाही.—योहा. ५:२८, २९.

^ परि. 14 आज ताइवानची राष्ट्रीय भाषा चीनी असली तरी, पण कित्येक वर्षांपर्यंत तिथली राष्ट्रीय भाषा जपानी होती. त्यामुळे ताइवानमधल्या अनेक जमातींचे लोक जपानी भाषासुद्धा बोलायचे.