व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५

“प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे”

“प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे”

“प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे.”—१ करिंथ. ११:३.

गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो

सारांश *

१. अनेक पुरुष आपल्या बायको-मुलांशी कसं वागतात, आणि का?

तुम्हाला काय वाटतं, एका पुरुषाने आपल्या बायको-मुलांशी कसं वागलं पाहिजे? काही पुरुष आपल्या परंपरेप्रमाणे किंवा ज्या संस्कृतीत ते वाढले आहेत त्याप्रमाणे आपल्या बायको-मुलांशी वागतात. युरोपमध्ये राहणारी यानिटा नावाची बहीण काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “मी जिथे राहते तिथे लोक स्त्रियांना पुरुषांपेक्षा खूप कमी समजतात आणि त्यांना मोलकरणींसारखं वागवतात.” तसंच, अमेरिकेत राहणारा लूक नावाचा बांधव सांगतो: “काही वडील आपल्या मुलांना असं शिकवतात, की स्त्रियांच्या मतांची किंमत करायची गरज नाही. कारण त्यांना आपलं मत व्यक्‍त करायचा हक्क नाही.” पण नवऱ्‍याने आपल्या बायकोशी असं वागावं अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. (मार्क ७:१३ पडताळून पाहा.) तर मग, एक पुरुष चांगला कुटुंबप्रमुख कसा बनू शकतो?

२. एका कुटुंबप्रमुखाला कोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, आणि का?

एक चांगला कुटुंबप्रमुख बनण्यासाठी एका पुरुषाने सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे, की यहोवा त्याच्याकडून काय अपेक्षा करतो. त्याला हेसुद्धा माहीत असलं पाहिजे, की यहोवाने त्याला कुटुंबात हा अधिकार का दिला आहे. आणि खासकरून त्याला हे माहीत असलं पाहिजे, की तो यहोवा आणि येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो. या सगळ्या गोष्टी एका पुरुषाला का माहीत असल्या पाहिजेत? कारण यहोवाने कुटुंबप्रमुखाला काही प्रमाणात अधिकार दिला आहे, आणि त्या अधिकाराचा त्याने चांगला वापर करावा अशीच तो त्याच्याकडून अपेक्षा करतो.—लूक १२:४८ख.

यहोवाने आपल्या संपूर्ण कुटुंबाची रचना कशी केली आहे?

३. १ करिंथकर ११:३ या वचनात सांगितल्याप्रमाणे यहोवाने कशा प्रकारे आपल्या संपूर्ण कुटुंबाची रचना केली आहे?

१ करिंथकर ११:३ वाचा. या वचनावरून कळतं, की यहोवाने कशा प्रकारे स्वर्गात आणि पृथ्वीवर आपल्या कुटुंबाची रचना केली आहे. या कुटुंबाचं मस्तक यहोवा आहे, आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर त्याला पूर्ण अधिकार आहे. असं असलं, तरी त्याने स्वर्गात आणि पृथ्वीवरही काहींना अधिकार दिला आहे. पण ते या अधिकाराचा वापर कसा करतात याबद्दल त्यांना यहोवाला हिशोब द्यावा लागेल. (रोम. १४:१०; इफिस. ३:१४, १५) जसं की, यहोवाने येशूला मंडळीचं मस्तक असण्याचा अधिकार दिला आहे. पण तो मंडळीशी कसा वागतो याबद्दल त्याला यहोवाला हिशोब द्यावा लागतो. (१ करिंथ. १५:२७) त्याचप्रमाणे, यहोवाने पुरुषाला कुटुंबाचं मस्तक असण्याचा अधिकार दिला आहे. पण तो आपल्या बायको-मुलांशी कसा वागतो याबद्दल त्याला यहोवा आणि येशू या दोघांनाही हिशोब द्यावा लागेल.—१ पेत्र ३:७.

४. यहोवा आणि येशूला काय करण्याचा अधिकार आहे?

कुटुंबाचं मस्तक असल्यामुळे यहोवाला आपल्या मुलांसाठी नियम बनवण्याचा आणि मुलं ते नियम पाळतात की नाही याची खातरी करण्याचा अधिकार आहे. (यश. ३३:२२) आणि येशू ख्रिस्ती मंडळीचा मस्तक असल्यामुळे, त्यालाही मंडळीसाठी नियम बनवण्याचा आणि ते नियम पाळले जातात की नाही याची खातरी करण्याचा अधिकार आहे.—गलती. ६:२; कलस्सै. १:१८-२०.

५. एका ख्रिस्ती कुटुंबाच्या मस्तकाला काय अधिकार आहे, आणि त्याच्या अधिकाराला कोणत्या मर्यादा आहेत?

यहोवा आणि येशू यांच्याप्रमाणेच एका ख्रिस्ती कुटुंबाच्या मस्तकाला आपल्या कुटुंबासाठी नियम बनवण्याचा अधिकार आहे. (रोम. ७:२; इफिस. ६:४) पण त्याच्या अधिकाराला काही मर्यादा आहेत. जसं की, आपल्या कुटुंबासाठी तो जे काही नियम बनवतो ते त्याने स्वतःच्या मनाप्रमाणे बनू नयेत, तर ते बायबलच्या तत्त्वांवर आधारित असले पाहिजेत. (नीति. ३:५, ६) तसंच, जे त्याच्या कुटुंबाचे सदस्य नाहीत अशांसाठी नियम बनवण्याचा त्याला अधिकार नाही. (रोम. १४:४) याशिवाय, मुलं मोठी झाल्यावर काही कारणामुळे वेगळी राहतात, तेव्हा मस्तक म्हणून त्यांच्यावर त्याचा अधिकार राहत नाही. असं असलं, तरी आपल्या वडिलांबद्दल मुलांच्या मनात खूप आदर असतो.—मत्त. १९:५.

यहोवाने काहींना मस्तक असण्याचा अधिकार का दिला?

६. यहोवाने काहींना मस्तक असण्याचा अधिकार का दिला?

यहोवाचं आपल्या कुटुंबावर प्रेम असल्यामुळे त्याने काहींना मस्तक असण्याचा अधिकार दिला आहे. ही खरंतर खूप चांगली व्यवस्था आहे. यामुळे यहोवाच्या कुटुंबात शांती आणि सुव्यवस्था टिकून राहते. (१ करिंथ. १४:३३, ४०) कारण मस्तक कोण आहे हे स्पष्टपणे माहीत नसतं, तर त्याच्या कुटुंबात गोंधळ माजला असता आणि कोणीही आनंदी नसतं. उदाहरणार्थ, कुटुंबात शेवटी निर्णय कोण घेईल आणि त्यांप्रमाणे काम केलं जातं की नाही याची खातरी कोण करेल, हे कोणालाही माहीत नसतं.

७. इफिसकर ५:२५, २८ मध्ये सांगितल्याप्रमाणे पतीने आपल्या पत्नीशी कसं वागावं अशी यहोवाची इच्छा आहे?

कुटुंबात शांती आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून यहोवाने पुरुषाला कुटुंबाचं मस्तक असण्याचा अधिकार दिला आहे. मग बरेच पती आपल्या पत्नीचा छळ का करतात आणि तिच्यावर क्रूरपणे अधिकार का गाजवतात? कारण ते यहोवाने कुटुंबासाठी दिलेल्या स्तरांचं पालन करत नाहीत. त्याऐवजी ते आपल्या रूढी-परंपरांनुसार आपल्या पत्नीशी वागतात. काही वेळा स्वतःच्या स्वार्थासाठीही ते आपल्या पत्नीशी वाईट वागतात. जसं की, आपण काही कमजोर नाही हे दाखवण्यासाठी ते आपल्या पत्नीवर क्रूरपणे हक्क गाजवतात. ते असा विचार करतात, की आपण आपल्या पत्नीला आपल्यावर प्रेम करायची जबरदस्ती तर करू शकत नाही, पण तिला आपल्या धाकात नक्कीच ठेवू शकतो. त्यामुळे ती आपल्या ताब्यात राहील. * पुरुषाच्या अशा विचारसरणीमुळे आणि वागण्यामुळे स्त्रियांना जो आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि ही गोष्ट यहोवाने जे सांगितलं आहे त्याच्या अगदी विरोधात आहे.—इफिसकर ५:२५, २८ वाचा.

एक पुरुष चांगला कुटुंबप्रमुख कसा बनू शकतो?

८. एक पुरुष चांगला कुटुंबप्रमुख कसा बनू शकतो?

मस्तक या नात्याने यहोवा आणि येशू आपल्या अधिकाराचा वापर कसा करतात याचं अनुकरण करून एक पुरुष चांगला कुटुंबप्रमुख बनू शकतो. आता आपण, यहोवा आणि येशू दाखवत असलेल्या दोन गुणांचा विचार करू या. आणि एक कुटुंबप्रमुख आपल्या बायको-मुलांशी वागताना हे दोन गुण कसे दाखवू शकतो त्याकडे लक्ष देऊ या.

९. यहोवाची नम्रता कशी दिसून येते?

नम्रता.  अख्ख्या विश्‍वात सगळ्यात बुद्धिमान कोणी असेल तर तो यहोवा आहे. पण तरीसुद्धा तो आपल्या सेवकांची मतं ऐकतो. (उत्प. १८:२३, २४, ३२) एकदा तर त्याने, एक विशिष्ट समस्या कशी हाताळता येईल हे सुचवण्याची संधीही स्वर्गदूतांना दिली. (१ राजे २२: १९-२२) याशिवाय, यहोवा परिपूर्ण असला, तरी तो आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. उलट, आपण अपरिपूर्ण आहोत ही गोष्ट लक्षात ठेवून तो आपल्याला मदत करतो. (स्तो. ११३:६, ७) म्हणूनच बायबलमध्ये यहोवाला “सहायक” असं म्हटलं आहे. (स्तो. २७:९; इब्री १३:६) दावीद राजाने हे कबूल केलं, की यहोवा नम्र असल्यामुळेच त्याने त्याला मदत केली आणि म्हणून तो आपल्या कामात यशस्वी झाला.—२ शमु. २२:३६.

१०. येशू नम्र होता हे कसं दिसून आलं?

१० आता येशूच्या उदाहरणाचा विचार करा. तो जरी आपल्या शिष्यांचा प्रभू आणि गुरू होता, तरी त्याने त्यांचे पाय धुतले. तुम्हाला काय वाटतं, यहोवाने बायबलमध्ये हा वृत्तान्त का लिहून ठेवला असेल? सगळ्यांनीच, अगदी कुटुंबप्रमुखांनीसुद्धा नम्रतेच्या बाबतीत त्याचं अनुकरण करावं म्हणून. येशू स्वतःही असं म्हणाला: “जसं मी तुमच्यासाठी केलं, तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुमच्यासमोर आदर्श ठेवलाय.” (योहा. १३:१२-१७) येशूकडे भरपूर अधिकार होता, पण इतरांनी आपली सेवा करावी अशी अपेक्षा त्याने कधीही केली नाही. उलट, त्याने नेहमीच इतरांची सेवा केली.—मत्त. २०:२८.

एक कुटुंबप्रमुख नम्र असेल आणि आपल्या पत्नीवर त्याचं प्रेम असेल, तर तो घरकामात तिला मदत करेल आणि तिच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष देईल (परिच्छेद ११, १३ पाहा)

११. एक कुटुंबप्रमुख नम्रतेच्या बाबतीत यहोवा आणि येशूकडून काय शिकू शकतो?

११ आपण काय शिकतो?  एका कुटुंबप्रमुखाची नम्रता बऱ्‍याच मार्गांनी दिसून येते. उदाहरणार्थ, आपल्या बायको-मुलांकडून कधीच कुठली चूक होऊ नये अशी तो अपेक्षा करत नाही. त्यांची मतं त्याच्यापेक्षा वेगळी असली, तरी तो ती ऐकून घेतो. अमेरिकेत राहणारी मर्लीन * आपल्या पतीबद्दल म्हणते: “एखाद्या गोष्टीबद्दल काही वेळा आमच्या दोघांची मतं वेगळी असतात, तरीसुद्धा हे मला माझं मत विचारतात आणि निर्णय घेण्याआधी त्यावर विचार करतात. त्यामुळे ते माझ्या मतांची कदर करतात, माझा आदर करतात हे मला जाणवतं.” आणखी एका मार्गाने पतीची नम्रता दिसून येते. घरातली कामं करायला त्याला कमीपणा वाटत नाही; मग ही कामं बायकांची आहेत असं त्याच्या समाजातले लोक मानत असले तरीही. अशा समाजात राहणाऱ्‍या पतीसाठी हे खूप कठीण असू शकतं. याबद्दल रेचल नावाची एक बहीण असं म्हणते: “मी ज्या समाजातून आले आहे तिथे जर नवऱ्‍याने आपल्या बायकोला भांडी घासायला किंवा घर साफ करायला मदत केली, तर तो बायकोचा बैल आहे असं त्याचे नातेवाईक आणि शेजारपाजरचे लोक म्हणतात. तो बायकोच्या तालावर नाचणारा आहे असा ते विचार करतात.” तुमच्या समाजातले लोकसुद्धा असाच विचार करत असतील, तर ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, की येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. हे काम खरंतर घरातल्या दासाचं असायचं. येशूप्रमाणेच, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याकडे एक चांगला कुटुंबप्रमुख लक्ष देत नाही. उलट, तो आपल्या बायको-मुलांना आनंदी ठेवण्याकडे लक्ष देतो. पण एक चांगला कुटुंबप्रमुख बनण्यासाठी आणखी एका गुणाची गरज आहे. तो कोणता आहे ते पुढे पाहू या.

१२. यहोवा आणि येशूचं आपल्यावर प्रेम आहे हे कोणत्या गोष्टींवरून दिसून येतं?

१२ प्रेम. यहोवा आपल्यासाठी जे काही करतो ते आपल्यावर प्रेम असल्यामुळे करतो. (१ योहा. ४:७, ८) तो आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्याला त्याचं वचन, बायबल दिलं आहे आणि त्याच्या संघटनेमार्फत तो आपलं मार्गदर्शन करतो. तसंच, त्याचं आपल्यावर प्रेम आहे याचं वेगवेगळ्या मार्गांनी आश्‍वासन देऊन तो आपल्या भावनिक गरजाही पूर्ण करतो. आणि आपल्या रोजच्या गरजांबद्दल काय? त्याबद्दल बायबल म्हणतं: “आपण उपभोगत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यानेच भरपूर प्रमाणात पुरवल्या आहेत.” (१ तीम. ६:१७) याशिवाय, आपण जेव्हा चुकतो तेव्हासुद्धा आपल्यावरचं त्याचं प्रेम कमी होत नाही. उलट तो प्रेमाने आपल्याला सुधारतो. आपल्यावर प्रेम असल्यामुळेच यहोवाने खंडणी बलिदानाची व्यवस्था केली. आणि येशूबद्दल म्हणायचं, तर त्याचंही आपल्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच त्याने आपल्यासाठी स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं. (योहा. ३:१६; १५:१३) आपण जर यहोवाला आणि येशूला एकनिष्ठ राहिलो, तर कोणतीही गोष्ट आपल्याला त्यांच्या प्रेमापासून वेगळी करू शकणार नाही.—योहा. १३:१; रोम. ८:३५, ३८, ३९.

१३. एका कुटुंबप्रमुखाने आपल्या कुटुंबावर प्रेम का केलं पाहिजे? (“ पतींनो, आपल्या पत्नीचा आदर मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?” ही चौकटही पाहा.)

१३ आपण काय शिकतो?  कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबासाठी जे काही करतो ते त्याने त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे केलं पाहिजे. हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर प्रेषित योहान आपल्याला देतो. त्याने म्हटलं: ‘जो आपल्या भावावर [किंवा कुटुंबावर] प्रेम करत नाही, तो न पाहिलेल्या देवावर प्रेम करूच शकत नाही.’ (१ योहा. ४:११, २०) ज्या पुरुषाचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे तो यहोवा आणि येशू यांच्याप्रमाणेच आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक, भावनिक आणि रोजच्या गरजा पूर्ण करेल. (१ तीम. ५:८) तसंच, तो आपल्या मुलांवर चांगले संस्कार करेल आणि गरज पडल्यावर त्यांना शिस्तही लावेल. याशिवाय, तो नेहमी असे निर्णय घेईल ज्यांमुळे यहोवाचा सन्मान होईल आणि त्याच्या कुटुंबाचं भलं होईल. हे सगळं करण्यासाठी तो यहोवा आणि येशूचं अनुकरण कसं करू शकतो, ते आता आपण पाहू.

एका कुटुंबप्रमुखाने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

१४. एक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा कशा पूर्ण करू शकतो?

१४ त्याने कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.  आपल्या पित्याप्रमाणेच येशूलासुद्धा आपल्या शिष्यांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी होती. आणि म्हणून यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला त्याने त्यांना मदत केली. (मत्त. ५:३, ६; मार्क ६:३४) त्याचप्रमाणे एका कुटुंबप्रमुखानेसुद्धा आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच, त्याने त्यांना यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला आणि ते टिकवून ठेवायला मदत केली पाहिजे. (अनु. ६:६-९) त्यासाठी त्याने त्यांच्यासोबत मिळून बायबल वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, नियमितपणे सभांना उपस्थित राहिलं पाहिजे आणि सेवाकार्यात सहभाग घेतला पाहिजे.

१५. कोणत्या काही मार्गांनी एक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या भावनिक गरजा पूर्ण करू शकतो?

१५ त्याने कुटुंबाच्या भावनिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.  यहोवाने उघडपणे आपल्या मुलाबद्दल प्रेम व्यक्‍त केलं. (मत्त. ३:१७) येशूनेसुद्धा अनेकदा आपल्या शब्दांतून आणि कृतींतून शिष्यांबद्दल प्रेम असल्याचं दाखवून दिलं. आणि शिष्यांनीही त्याच्यावरचं आपलं प्रेम व्यक्‍त केलं. (योहा. १५:९, १२, १३; २१:१६) त्याचप्रमाणे, एका कुटुंबप्रमुखानेसुद्धा आपल्या कुटुंबातल्या लोकांबद्दल असलेलं आपलं प्रेम शब्दांतून आणि कृतींतून दाखवलं पाहिजे. जसं की, त्याने त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास केला पाहिजे. तसंच, त्याचं त्यांच्यावर किती प्रेम आहे आणि ते त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे त्याने त्यांना सांगितलं पाहिजे. याशिवाय, इतरांसमोर त्यांची प्रशंसा करायलाही त्याने मागे-पुढे नाही पाहिलं पाहिजे.—नीति. ३१:२८, २९.

एक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या रोजच्या गरजा पूर्ण करतो तेव्हा तो यहोवाची आज्ञाच पाळत असतो (परिच्छेद १६ पाहा)

१६. यहोवा आणि येशूप्रमाणेच एका कुटुंबप्रमुखाने काय केलं पाहिजे, आणि त्याने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१६ त्याने कुटुंबाच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.  यहोवाने नेहमीच इस्राएली लोकांच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या; देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांना शिक्षा होत होती अगदी तेव्हासुद्धा. (अनु. २:७; २९:५) आज तो आपल्याही रोजच्या गरजा पूर्ण करतो. (मत्त. ६:३१-३३; ७:११) येशूनेसुद्धा तेच केलं. त्याचा उपदेश ऐकायला आलेल्या लोकांना त्याने जेवू घातलं. (मत्त. १४:१७-२०) याशिवाय, त्याने अनेकांचे रोग बरे केले. (मत्त. ४:२४) यहोवा आणि येशूप्रमाणेच एका कुटुंबप्रमुखानेही आपल्या कुटुंबाच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. असं करून तो यहोवाची आज्ञाच पाळत असतो. पण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असताना त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, त्याने आपल्या कामात इतकं बुडून जाऊ नये, की कुटुंबाच्या आध्यात्मिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्याकडे त्याचं दुर्लक्ष होईल.

१७. यहोवा आणि येशू कशा प्रकारे आपल्याला शिकवतात आणि शिस्त लावतात?

१७ त्याने कुटुंबाचं प्रेमळपणे मार्गदर्शन केलं पाहिजे.  यहोवा आपल्या भल्यासाठीच आपल्याला शिकवतो आणि शिस्त लावतो. (इब्री १२:७-९) आपल्या पित्याप्रमाणेच येशूसुद्धा आपल्याला प्रेमाने शिकवतो आणि आपलं मार्गदर्शन करतो. (योहा. १५:१४, १५) आणि गरज पडल्यावर तो आपल्याला कडक सल्लाही देतो, पण तोसुद्धा प्रेमाने. (मत्त. २०:२४-२८) कारण आपण अपरिपूर्ण आहोत आणि चुका करण्याकडे आपला कल असतो याची त्याला जाणीव आहे.—मत्त. २६:४१.

१८. एका चांगल्या कुटुंबप्रमुखाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१८ यहोवा आणि येशूप्रमाणेच एक कुटुंबप्रमुख हे नेहमी लक्षात ठेवतो, की त्याच्या कुटुंबातले सदस्य अपरिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात तेव्हा तो त्यांच्यावर ‘संतापत’ नाही. (कलस्सै. ३:१९, तळटीप) याउलट, आपणसुद्धा अपरिपूर्ण आहोत हे तो लक्षात ठेवतो. आणि गलतीकर ६:१ यात दिलेलं तत्त्व लागू करून तो त्यांना “सौम्यतेने सुधारण्याचा प्रयत्न” करतो. येशूसारखंच स्वतःच्या उदाहरणातून शिकवणं नेहमी चांगलं असतं याची त्याला जाणीव असते.—१ पेत्र २:२१.

१९-२०. कुटुंबासाठी निर्णय घेताना एक कुटुंबप्रमुख यहोवा आणि येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

१९ त्याने स्वतःचा स्वार्थ न पाहता निर्णय घेतले पाहिजेत.  यहोवाचे निर्णय नेहमी असे असतात ज्यांमुळे इतरांचं भलं होतं. उदाहरणार्थ, त्याने आपल्याला स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलं नाही. तर त्याच्यासारखंच आपल्यालाही जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून त्याने आपल्याला बनवलं. तसंच, आपल्याला पापाची क्षमा मिळावी म्हणून त्याने आपल्या मुलाचं बलिदान दिलं. हे करण्यासाठी कोणीही त्याला जबरदस्ती केली नव्हती. पण आपल्या भल्यासाठी त्याने स्वतःहून ही व्यवस्था केली. येशूनेही नेहमी असे निर्णय घेतले ज्यांमुळे इतरांचं भलं झालं. (रोम. १५:३) उदाहरणार्थ, एकदा येशू खूप थकला होता. त्याला आरामाची खूप गरज होती. पण आराम करण्याऐवजी त्याने लोकांना शिकवलं.—मार्क ६:३१-३४.

२० कुटुंबातल्या सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेणं खूप मोठी जबाबदारी आहे हे एका चांगल्या कुटुंबप्रमुखाला माहीत असतं. आणि तो ही जबाबदारी गंभीरपणे घेतो. आपल्या कुटुंबासाठी निर्णय घेताना तो मागचा-पुढचा विचार न करता किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. याउलट, चांगले निर्णय घेण्यासाठी तो यहोवाच्या बुद्धीवर विसंबून राहतो. * (नीति. २:६, ७) असं करून तो दाखवतो, की निर्णय घेताना तो स्वतःचा नाही, तर दुसऱ्‍यांचा विचार करतो.—फिलिप्पै. २:४.

२१. पुढच्या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

२१ यहोवाने कुटुंबप्रमुखांवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि ते ती कशी पार पाडतात याबद्दल त्यांना यहोवाला हिशोब द्यायचा आहे. पण, जर एका कुटुंबप्रमुखाने यहोवा आणि येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, तर तो नक्कीच एक चांगला कुटुंबप्रमुख बनेल. त्यासोबतच जर पत्नीनेसुद्धा तिची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली, तर त्यांचं वैवाहिक जीवन खूप सुखी होईल. एक पत्नी आपल्या मस्तकाच्या, म्हणजेच पतीच्या अधीन कशी राहू शकते? आणि तिच्यासमोर कोणत्या अडचणी येऊ शकतात? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला पुढच्या लेखात मिळतील.

गीत १४ सर्व काही नवे झाले!

^ परि. 5 लग्न झाल्यावर एक पुरुष एका नवीन कुटुंबाचं मस्तक बनतो. या लेखात आपण पाहू, की कुटुंबाच्या मस्तकाला यहोवाने काय अधिकार दिला आहे, तो का दिला आहे आणि मस्तक या नात्याने यहोवा आणि येशूने जे चांगलं उदाहरण मांडलं आहे त्यातून एक पुरुष काय शिकू शकतो. दुसऱ्‍या लेखात आपण हे पाहू, की पती-पत्नी येशूकडून आणि बायबलमध्ये दिलेल्या इतर सेवकांच्या उदाहरणांतून काय शिकू शकतात. आणि तिसऱ्‍या लेखात आपण हे पाहू, की बांधवांना मंडळीत मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी कसा वापर केला पाहिजे.

^ परि. 7 चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये आणि मुलांच्या कॉमिक पुस्तकांमध्ये पुरुष आपल्या बायकोला छळत असल्याचं, तिच्यावर हात उचलत असल्याचं सर्रासपणे दाखवलं जातं. त्यामुळे पुरुषाने आपल्या बायकोवर अधिकार गाजवणं मुळीच चुकीचं नाही असं लोकांना वाटू शकतं.

^ परि. 11 नाव बदलण्यात आलं आहे.

^ परि. 20 चांगले निर्णय कसे घ्यावेत याबद्दल जास्त माहितीसाठी १५ एप्रिल २०११ च्या टेहळणी बुरूज अंकात पान क्र. १३-१७ वर दिलेला, “देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या,” हा लेख पाहा.