व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ७

वडिलांना मंडळीत कोणता अधिकार देण्यात आला आहे?

वडिलांना मंडळीत कोणता अधिकार देण्यात आला आहे?

“ख्रिस्त मंडळीचं मस्तक आणि या शरीराचा तारणकर्ता आहे.”—इफिस. ५:२३.

गीत ३ “देव प्रीती आहे”

सारांश *

१. यहोवाच्या कुटुंबात एकता का आहे?

आपल्या सगळ्यांसाठी यहोवाच्या कुटुंबाचा भाग असणं एक आनंदाची गोष्ट आहे. आपल्या या कुटुंबात शांती आणि एकता का आहे? याचं एक कारण म्हणजे, यहोवाने मस्तक म्हणून इतरांना आपल्यावर जो अधिकार दिला आहे त्याचा आपण मनापासून आदर करतो. खरंतर, या व्यवस्थेला आपण जितका पाठिंबा देऊ तितकी जास्त आपल्यातली एकता वाढेल.

२. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण याची चर्चा करू, की मंडळीत कोणाला अधिकार दिला आहे. त्यासोबतच आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरंही पाहू: मंडळीत बहिणींची काय भूमिका आहे? मंडळीतला प्रत्येक भाऊ प्रत्येक बहिणीचं मस्तक आहे का? एका कुटुंबप्रमुखाला आपल्या बायको-मुलांवर जो अधिकार आहे तोच अधिकार मंडळीतल्या वडिलांना भाऊबहिणींवर आहे का? तर चला, सगळ्यात आधी आपण हे पाहू की बहिणींबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे?

बहिणींबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे?

३. आपल्या बहिणींबद्दल आपली कदर कशामुळे आणखी वाढेल?

आपल्या बहिणी कुटुंबाची काळजी घेण्यासाठी, प्रचार करण्यासाठी आणि मंडळीत इतरांना मदत करण्यासाठी जी मेहनत घेतात त्याची आपण सगळेच कदर करतो. पण यहोवा आणि येशू या बहिणींबद्दल जसा विचार करतात ते जर आपण समजून घेतलं, तर त्यांच्याबद्दल आपली कदर आणखी वाढेल. तसंच, प्रेषित पौल त्यांच्याशी कसा वागला यातूनही आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल.

४. यहोवा पुरुषांइतकंच स्त्रियांनाही मौल्यवान समजतो हे बायबलमधून कसं दिसून येतं?

बायबल म्हणतं की यहोवा पुरुषांइतकंच स्त्रियांनाही मौल्यवान समजतो.  उदाहरणार्थ, बायबल म्हणतं, की यहोवाने पहिल्या शतकात स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही पवित्र शक्‍ती दिली. यामुळे ते मोठमोठे चमत्कार करू शकले. जसं की, ते वेगवेगळ्या भाषा बोलू शकले. (प्रे. कार्यं २:१-४, १५-१८) आणि त्या दोघांनाही ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी पवित्र शक्‍तीने निवडण्यात आलं आहे. (गलती. ३:२६-२९) तसंच, पुरुषांसोबत स्त्रियांनाही या पृथ्वीवर सर्वकाळ जीवन जगण्याची आशा आहे. (प्रकटी. ७:९, १०, १३-१५) शिवाय, प्रचार करण्याची आणि शिष्य बनवण्याची जबाबदारी ही दोघांनाही देण्यात आली आहे. (मत्त. २८:१९, २०) जसं की, प्रेषितांची कार्यं या पुस्तकात प्रिस्किल्ला नावाच्या बहिणीबद्दल सांगितलं आहे. तिने आपल्या पतीसोबत, म्हणजे अक्विलासोबत अपुल्लो नावाच्या एका खूप शिकलेल्या माणसाला शास्त्रवचनांतलं सत्य चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत केली.—प्रे. कार्यं १८:२४-२६.

५. येशू स्त्रियांचा आदर करायचा हे लूक १०:३८, ३९, ४२ या वचनांवरून कसं दिसतं?

येशूने स्त्रियांचा आदर केला.  येशूच्या काळात परूशी लोक स्त्रियांना खूप कमी समजायचे. शास्त्रवचनांबद्दल त्यांच्याशी बोलायची तर दूरची गोष्ट, चारचौघांतसुद्धा ते त्यांच्याशी बोलत नव्हते. पण येशू त्या परुशी लोकांसारखा नव्हता. उलट, तो आपल्या शिष्यांसोबत शास्त्रवचनांवर जशी चर्चा करायचा, तशीच तो स्त्रियांशीही करायचा. * (लूक १०:३८, ३९, ४२ वाचा.) येशू वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराला जायचा तेव्हा त्याच्या शिष्यांशिवाय काही स्त्रियाही त्याच्यासोबत असायच्या. (लूक ८:१-३) इतकंच नाही तर आपलं पुनरुत्थान झालं आहे हे आपल्या शिष्यांना सांगण्याचा बहुमानही त्याने स्त्रियांना दिला.—योहा. २०:१६-१८.

६. पौलला स्त्रियांबद्दल आदर होता हे त्याने कसं दाखवलं?

प्रेषित पौलनेसुद्धा स्त्रियांचा आदर केला. आणि त्याने तीमथ्यलाही आठवण करून दिली की त्याने स्त्रियांचा आदर करावा.  त्याने त्याला असा सल्ला दिला, की त्याने वयस्कर स्त्रियांना आई समजावं आणि तरुण स्त्रियांना आपल्या बहिणी समजावं. (१ तीम. ५:१, २) पौलने जरी तीमथ्यला एक प्रौढ ख्रिस्ती बनायला मदत केली असली, तरी त्याने ही गोष्ट मान्य केली की सर्वात आधी तीमथ्यच्या आईने आणि आजीने त्याला “पवित्र लिखाणांचं” ज्ञान दिलं. (२ तीम. १:५; ३:१४, १५) तसंच, पौलने रोमकरांना पत्र लिहिलं तेव्हा त्याने बहिणींचा खास त्यांच्या नावाने उल्लेख केला आणि त्यांना आपला नमस्कार कळवला. आपल्या या ख्रिस्ती बहिणींनी यहोवाच्या सेवेत जी काही मेहनत घेतली होती त्याचा त्याने फक्‍त उल्लेख केला नाही, तर त्यासाठी त्यांचे मनापासून आभारही मानले.—रोम. १६:१-४, ६, १२; फिलिप्पै. ४:३.

७. आता आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आतापर्यंत आपण जे पाहिलं त्यावरून दिसून येतं, की बहिणी भावांपेक्षा कमी महत्त्वाच्या आहेत असं बायबलमध्ये कुठेही सांगितलेलं नाही. उलट, प्रेमळ आणि उदार मनोवृत्ती असलेल्या आपल्या बहिणींमुळे मंडळीला बरीच मदत होते. मंडळीत शांती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी त्या जी काही मेहनत घेतात त्याबद्दल मंडळीतले वडील त्यांची कदर करतात. पण तरीसुद्धा काही प्रश्‍न उभे राहतात. जसं की, काही परिस्थितींत बहिणींनी आपल्या डोक्यावर पदर घ्यावा अशी अपेक्षा यहोवा का करतो? मंडळीत फक्‍त भावांनाच वडील आणि सहायक सेवक म्हणून नेमलं जातं. मग याचा अर्थ असा होतो का, की प्रत्येक भाऊ मंडळीतल्या प्रत्येक बहिणीचं मस्तक आहे?

मंडळीतला प्रत्येक भाऊ प्रत्येक बहिणीचं मस्तक आहे का?

८. इफिसकर ५:२३ या वचनात जे सांगितलं आहे त्याचा अर्थ असा होता का, की मंडळीतला प्रत्येक भाऊ प्रत्येक बहिणीचं मस्तक आहे? स्पष्ट करा.

याचं थेट उत्तर आहे नाही! मंडळीतल्या सगळ्या बहिणींचं मस्तक एक भाऊ नाही, तर ख्रिस्त आहे. (इफिसकर ५:२३ वाचा.) कुटुंबामध्ये एक पती आपल्या पत्नीचं मस्तक आहे. आणि मुलाचा जरी बाप्तिस्मा झाला असला, तरी तो आपल्या आईचं मस्तक बनत नाही. (इफिस. ६:१, २) मंडळीतल्या वडिलांना भाऊबहिणींवर काही प्रमाणात अधिकार असतो. (१ थेस्सलनी. ५:१२; इब्री १३:१७) पण जर एखाद्या बहिणीचं लग्न झालं नसेल आणि ती आपल्या आईवडिलांसोबत राहत नसेल तर काय? ती नक्कीच आपल्या पालकांचा आणि ख्रिस्ती वडिलांचा आदर करते. पण मंडळीतल्या इतर भावांप्रमाणे तिचं एकच मस्तक आहे. तो म्हणजे येशू.

जे अविवाहित आहेत आणि आपल्या आईवडिलांसोबत राहत नाहीत त्यांचं मस्तक येशू आहे (परिच्छेद ८ पाहा)

९. कोणत्या परिस्थितींत एका बहिणीला डोक्यावर पदर घ्यायची गरज पडू शकते?

मंडळीत सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून यहोवाने येशूला पुरुषाचं मस्तक नेमलं आहे. आणि त्याच कारणासाठी मंडळीत शिकवण्याची जबाबदारी त्याने पुरुषांना दिली आहे. ही जबाबदारी त्याने स्त्रियांना दिलेली नाही. (१ तीम. २:१२) पण काही परिस्थितींत बांधवांची ही जबाबदारी एका बहिणीला हाताळावी लागते. अशा वेळी तिने आपल्या डोक्यावर पदर घ्यावा अशी अपेक्षा यहोवा तिच्याकडून करतो. * (१ करिंथ. ११:४-७) तिला अपमानित करण्यासाठी नाही, तर यहोवाने ज्यांना अधिकार दिला आहे त्यांच्याबद्दल तिला आदर आहे हे दिसून यावं म्हणून यहोवाने तिला तसं सांगितलं आहे. या गोष्टी लक्षात ठेवून आता आपण पुढच्या प्रश्‍नाकडे जाऊ या. कुटुंबप्रमुखांना आणि मंडळीतल्या वडिलांना कोणता अधिकार देण्यात आला आहे?

कुटुंबप्रमुखांना आणि मंडळीतल्या वडिलांना कोणता अधिकार देण्यात आला आहे?

१०. आपण मंडळीसाठी नियम बनवले पाहिजेत असं एखाद्या वडिलाला का वाटू शकतं?

१० मंडळीतले वडील ख्रिस्तावर प्रेम करतात. आणि त्याच वेळी यहोवाने आणि येशूने जी मेंढरं त्यांना सांभाळायला दिली आहेत त्यांच्यावरही ते तितकंच प्रेम करतात. (योहा. २१:१५-१७) एका ख्रिस्ती वडिलाला मंडळीची काळजी असते. आणि त्यामुळे मंडळीसाठी आपण एका कुटुंबप्रमुखासारखे आहोत असा तो कदाचित विचार करेल. ज्याप्रमाणे एक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी नियम बनवतो, त्याचप्रमाणे देवाच्या मेंढरांचं रक्षण करण्यासाठी आपणसुद्धा नियम बनवले पाहिजेत असा तो कदाचित विचार करेल. तसंच, कधीकधी मंडळीतले काही भाऊबहीणसुद्धा वडिलांना आपल्यासाठी निर्णय घ्यायला सांगतात. पण मंडळीतल्या वडिलांना आणि कुटुंबप्रमुखांना एकसारखाच अधिकार आहेत का?

मंडळीतले वडील भाऊबहिणींच्या आध्यात्मिक आणि भावनिक गरजा पूर्ण करतात. आणि मंडळी नैतिक रितीने शुद्ध ठेवायची जबाबदारीही यहोवाने त्यांना दिली आहे (परिच्छेद ११-१२ पाहा)

११. कोणत्या बाबतींत एका कुटुंबप्रमुखाच्या आणि ख्रिस्ती वडिलाच्या जबाबदाऱ्‍या एकसारख्याच आहेत?

११ प्रेषित पौलच्या शब्दांवरून दिसून येतं, की काही बाबतींत एका कुटुंबप्रमुखाच्या आणि मंडळीतल्या वडिलाच्या जबाबदाऱ्‍या एकसारख्याच  आहेत. (१ तीम. ३:४, ५) उदाहरणार्थ, कुटुंबातल्या सदस्यांनी आपल्या कुटुंबप्रमुखाच्या आज्ञेत राहावं अशी यहोवा अपेक्षा करतो. (कलस्सै. ३:२०) त्याचप्रमाणे मंडळीतल्या भाऊबहिणींनीसुद्धा ख्रिस्ती वडिलांच्या आज्ञेत राहावं अशी यहोवाची इच्छा आहे. यासोबतच, यहोवा अपेक्षा करतो की कुटुंबप्रमुखांनी आणि मंडळीतल्या वडिलांनी त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या लोकांच्या आध्यात्मिक आणि भावनिक गरजा पूर्ण कराव्यात. एक कुटुंबप्रमुख संकटाच्या वेळी जसं आपल्या कुटुंबाला मदत करतो, तसंच मंडळीतले वडीलसुद्धा संकटाच्या वेळी भाऊबहिणींना मदत करतात. (याको. २:१५-१७) यासोबतच, मंडळीतल्या वडिलांनी आणि कुटुंबप्रमुखांनी त्यांच्या अधिकाराखाली असलेल्यांना यहोवाच्या नियमांचं पालन करायला मदत करावी अशी अपेक्षा यहोवा त्यांच्याकडून करतो. पण त्यांनी ‘लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नये’ असंही यहोवाला वाटतं.—१ करिंथ. ४:६.

कुटुंबप्रमुखांना आपल्या कुटुंबात पुढाकार घ्यायची जबाबदारी यहोवाकडून मिळाली आहे. कुटुंबासाठी निर्णय घेताना त्यांनी आपल्या पत्नीशी बोललं पाहिजे (परिच्छेद १३ पाहा)

१२-१३. रोमकर ७:२ या वचनावरून कसं कळतं, की काही बाबतींत एका कुटुंबप्रमुखाच्या आणि ख्रिस्ती वडिलाच्या जबाबदाऱ्‍या वेगळ्या असतात?

१२ पण काही बाबतींत एका ख्रिस्ती वडिलाच्या आणि एका कुटुंबप्रमुखाच्या जबाबदाऱ्‍या वेगळ्या  असतात. उदाहरणार्थ, मंडळीत न्याय करण्याची जबाबदारी यहोवाने ख्रिस्ती वडिलांना दिली आहे. मंडळीतली एखादी व्यक्‍ती चुकीचं काम करत असेल आणि त्याबद्दल ती पश्‍चाताप करत नसेल, तर तिला मंडळीतून काढून टाकण्याची जबाबदारी यहोवाने वडिलांना दिली आहे.—१ करिंथ. ५:११-१३.

१३ दुसरीकडे पाहता, यहोवाने कुटुंबप्रमुखांना असे काही अधिकार दिले आहेत जे मंडळीतल्या वडिलांना दिलेले नाहीत. उदाहरणार्थ, यहोवाने कुटुंबप्रमुखांना आपल्या कुटुंबासाठी नियम बनवण्याची आणि ते नियम पाळले जातात याची खातरी करण्याची जबाबदारी दिली आहे. (रोमकर ७:२ वाचा.) जसं की, आपल्या मुलांनी संध्याकाळी किती वाजायच्या आत घरी आलं पाहिजे हे ठरवायचा अधिकार कुटुंबप्रमुखाला आहे. आणि मुलांनी जर तो नियम मोडला तर त्यांना शिस्त लावायचा अधिकारसुद्धा त्याला आहे. (इफिस. ६:१) पण आपल्या कुटुंबासाठी नियम बनवताना एका कुटुंबप्रमुखाने आपल्या पत्नीशीसुद्धा बोललं पाहिजे. कारण शेवटी ते दोघं “एकदेह आहेत.” *मत्त. १९:६.

मंडळीच्या मस्तकाचा म्हणजे ख्रिस्ताचा आदर करा

येशू यहोवाच्या अधीन राहून ख्रिस्ती मंडळीचं मार्गदर्शन करतो (परिच्छेद १४ पाहा)

१४. (क) यहोवाने येशूला मस्तक म्हणून नेमलं हे योग्यच आहे, हे मार्क १०:४५ या वचनावरून कसं दिसून येतं? (ख) नियमन मंडळाची जबाबदारी काय आहे? (“ नियमन मंडळाची जबाबदारी,” ही चौकट पाहा.)

१४ यहोवाने आपल्या मुलाचं बलिदान देऊन मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीला आणि जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवेल त्याला विकत घेतलं आहे. (मार्क १०:४५ वाचा; प्रे. कार्यं २०:२८; १ करिंथ. १५:२१, २२) येशूने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं. त्यामुळे यहोवाने त्याला मंडळीचं मस्तक म्हणून निवडलं हे योग्यच आहे. मस्तक या नात्याने येशूला लोकांसाठी, कुटुंबांसाठी आणि संपूर्ण मंडळीसाठी नियम बनवण्याचा आणि ते पाळले जातात याची खातरी करण्याचा अधिकार आहे. (गलती. ६:२) पण येशू फक्‍त नियम बनवत नाही, तर तो आपल्या प्रत्येकावर प्रेम करतो आणि आपल्या प्रत्येकाची चांगली काळजीही घेतो.—इफिस. ५:२९.

१५-१६. मर्लीन आणि बेंजामिन यांनी जे काही म्हटलं त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१५ ख्रिस्ताने मंडळीत पुढाकार घेण्यासाठी ज्यांना अधिकार दिला आहे, त्यांच्या अधीन राहून ख्रिस्ती बहिणी दाखवून देतात की त्या ख्रिस्ताचा आदर करतात. अमेरिकेत राहणाऱ्‍या मर्लीन * नावाच्या बहिणीला जसं वाटलं तसंच अनेक बहिणींनासुद्धा वाटतं. मर्लीन म्हणते: “एक पत्नी आणि मंडळीत एक बहीण म्हणून माझी जी काही भूमिका आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा मी मनापासून प्रयत्न करते. यहोवाने माझ्या पतीला आणि ख्रिस्ती वडिलांना जो अधिकार दिला आहे, त्याच्या अधीन राहण्याचा मला सतत प्रयत्न करावा लागतो. पण माझे पती आणि मंडळीतले वडील माझा आदर करतात आणि माझ्या कामाची मनापासून कदर करतात. त्यामुळे त्यांच्या अधीन राहणं मला सोपं जातं.”

१६ तसंच, मंडळीतले भाऊ ख्रिस्ती बहिणींचा आदर करतात तेव्हा ते दाखवतात, की यहोवाने त्यांना जो अधिकार दिला आहे त्याचा ते चांगल्या प्रकारे वापर करतात. इंग्लंडमध्ये राहणारा बेंजामिन नावाचा एक भाऊ म्हणतो: “सभांमध्ये बहिणींच्या उत्तरांमधून मला खूप काही शिकायला मिळतं. तसंच, वैयक्‍तिक अभ्यास कसा करायचा आणि चांगल्या प्रकारे सेवाकार्य कसं करायचं याबद्दल ते जे काही मला सांगतात, त्यामुळेही मला बरंच काही शिकायला मिळतं. खरंच, ख्रिस्ती मंडळीमध्ये बहिणी खूप मोलाचं काम करतात.”

१७. यहोवाने इतरांना आपल्यावर जो अधिकार दिला आहे त्याचा आपण आदर का केला पाहिजे?

१७ यहोवाने इतरांना आपल्यावर अधिकार दिला आहे, ही गोष्ट जेव्हा मंडळीतले सगळेच जण, म्हणजे स्त्री, पुरुष, कुटुंबप्रमुख आणि ख्रिस्ती वडील समजून घेतात आणि त्या व्यवस्थेचा आदर करतात, तेव्हा मंडळीतली शांती टिकून राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळे आपल्या स्वर्गातल्या पित्याचा, यहोवाचा गौरव होतो.—स्तो. १५०:६.

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

^ परि. 5 मंडळीत बहिणींची काय भूमिका आहे? मंडळीतला प्रत्येक भाऊ प्रत्येक बहिणीचं मस्तक आहे का? मंडळीतल्या वडिलांना आणि कुटुंबप्रमुखांना एकसारखाच अधिकार आहे का? बायबल या प्रश्‍नांची काय उत्तरं देतं, ते या लेखात आपण पाहू.

^ परि. 5 सप्टेंबर २०२० च्या टेहळणी बुरूज  अंकात, “आपल्या ख्रिस्ती बहिणींची काळजी घ्या आणि त्यांना मदत करा,” हा लेख दिला आहे. त्या लेखातला परिच्छेद ६ पाहा.

^ परि. 13 ऑगस्ट २०२० च्या टेहळणी बुरूज  अंकात, “यहोवाच्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्‍तीचा आदर करा,” हा लेख दिला आहे. आपल्या कुटुंबाने कोणत्या मंडळीत गेलं पाहिजे हे कोणी ठरवायचं याबद्दल त्या लेखाच्या १७-१९ परिच्छेदांमध्ये जास्त माहिती दिली आहे.

^ परि. 15 नाव बदलण्यात आलं आहे.

^ परि. 65 नियमन मंडळाची जबाबदारी काय आहे याबद्दल जास्त माहितीसाठी १५ जुलै २०१३ च्या टेहळणी बुरूज  अंकातली पृष्ठं २०-२५ पाहा.