व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १०

विद्यार्थ्याला प्रगती करायला सगळेच मदत करू शकतात

विद्यार्थ्याला प्रगती करायला सगळेच मदत करू शकतात

“प्रत्येक अवयव योग्य प्रकारे कार्य करतो, तेव्हा शरीराची वाढ होते.”—इफिस. ४:१६.

गीत २१ जे दयाळू ते धन्य!

सारांश *

१-२. बायबल विद्यार्थ्याला प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला कोणकोण मदत करू शकतं?

फीजी देशात राहणारी एमी म्हणते: “मला बायबल अभ्यास करायला खूप आवडायचं. हेच सत्य आहे, याची मला खातरी होती. पण जेव्हा मी मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवू लागले तेव्हा मला माझ्या जीवनात बदल करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला मदत झाली.” एमीच्या या अनुभवातून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. ती ही की मंडळीतले भाऊबहीण एखाद्याला प्रगती करायला मदत करतात तेव्हा त्याला बाप्तिस्मा घ्यायला मदत होते.

तर मग, प्रत्येक प्रचारक नवीन लोकांना मंडळीचा भाग बनायला कशी मदत करू शकतो? (इफिस. ४:१६) वेनूॲतू या ठिकाणी राहणारी लिया नावाची पायनियर बहीण म्हणते: “असं म्हणतात, की एका मुलाला वाढवण्यासाठी संपूर्ण गावाचा हातभार लागतो. शिष्य बनवण्याच्या बाबतीतही तेच म्हटलं जाऊ शकतं. एखाद्याला सत्यात आणण्यासाठी संपूर्ण मंडळीचा हातभार लागतो.” एखाद्या मुलाला जबाबदार व्यक्‍ती बनवण्यासाठी त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांची, मित्रांची आणि शिक्षकांची एक मोलाची भूमिका असते. ते मुलाला सतत प्रोत्साहन देतात आणि जीवनातले महत्त्वाचे धडे शिकवतात. अगदी त्याच प्रकारे, मंडळीतले प्रचारकसुद्धा विद्यार्थ्यांना प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करू शकतात. ते त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात, सल्ले देऊ शकतात किंवा आपल्या स्वतःच्या चांगल्या उदाहरणातून त्याला शिकवू शकतात.—नीति. १५:२२.

३. ॲना, डॅनिएल आणि लिया यांनी जे म्हटलं यातून तुम्ही काय शिकता?

मंडळीतले इतर भाऊबहीण बायबल विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी पुढे येतात, तेव्हा तो अभ्यास चालवणाऱ्‍या प्रचारकाने काय केलं पाहिजे? त्याने ती मदत आनंदाने स्वीकारली पाहिजे. मॉल्डोवा देशात राहणारी ॲना नावाची एक खास पायनियर बहीण म्हणते: “जेव्हा बायबल विद्यार्थी प्रगती करू लागतो, तेव्हा त्याला मदतीची खूप गरज असते. आणि ती मदत एकट्याने पुरवणं फार कठीण असू शकतं.” त्याच देशात खास पायनियर म्हणून सेवा करणारा डॅनिएल * म्हणतो: “बऱ्‍याचदा इतर प्रचारक असं काहीतरी म्हणतात जे विद्यार्थ्याच्या मनाला भिडतं. कदाचित ती गोष्ट मला कधीच सुचली नसती.” आणि इतरांची मदत स्वीकारण्याच्या बाबतीत लिया म्हणते: “भाऊबहिणीचं प्रेम आणि आपुलकी अनुभवल्यामुळे विद्यार्थ्याला याची जाणीव होते, की आपण खरंच यहोवाचे लोक आहोत.”—योहा. १३:३५.

४. या लेखामध्ये आपण कशावर चर्चा करणार आहोत?

पण तुम्ही कदाचित विचार कराल, तो अभ्यास तर मी चालवत नाही, मग मी कशी काय त्याला मदत करू शकतो? त्यामुळे आता आपण या गोष्टीवर चर्चा करू, की जेव्हा आपल्याला बायबल अभ्यासासाठी बोलवलं जातं आणि जेव्हा बायबल विद्यार्थी सभांना येऊ लागतो, तेव्हा आपण काय करू शकतो? तसंच, मंडळीतले वडील बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला कशी मदत करू शकतात?

तुम्हाला बायबल अभ्यासासाठी बोलवलं जातं तेव्हा . . .

तुम्ही जर एखाद्या प्रचारकासोबत त्याच्या बायबल अभ्यासाला जाणार असाल, तर अभ्यासाची चांगली तयारी करून जा (परिच्छेद ५-७ पाहा)

५. जेव्हा तुम्हाला एखाद्या बायबल अभ्यासाला बोलवलं जातं तेव्हा तुमची जबाबदारी काय असते?

बायबल अभ्यास चालवताना विद्यार्थ्याला देवाचं वचन समजावून सांगण्याची मुख्य जबाबदारी, अभ्यास चालवणाऱ्‍या भावाची किंवा बहिणीची असते. जर त्याने तुम्हाला बायबल अभ्यासासाठी बोलवलं, तर तुमची जबाबदारी त्यांना साथ देण्याची आणि मदत करण्याची आहे. (उप. ४:९, १०) ती मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

६. जर कोणी तुम्हाला त्यांच्या बायबल अभ्यासासाठी बोलवलं तर नीतिवचनं २०:१८ यातलं तत्त्व तुम्ही कसं लागू करू शकता?

बायबल अभ्यासासाठी तयारी करा.  सर्वातआधी शिक्षकाला विद्यार्थ्याबद्दल थोडी माहिती विचारा. (नीतिवचनं २०:१८ वाचा.) जसं की: “त्याच्या कुटुंबामध्ये कोणकोण आहेत? त्याचे धार्मिक विश्‍वास काय आहेत? कोणत्या अध्यायातून तुम्ही अभ्यास करणार आहात? या अध्यायातून विद्यार्थ्याला नेमकं काय शिकवायचंय? बायबल अभ्यासाच्या वेळेस अशा काही गोष्टी आहेत का ज्या मी बोलल्या पाहिजेत किंवा नाही बोलल्या पाहिजेत? विद्यार्थ्याला प्रगती करण्यासाठी मी कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?” हे खरं आहे, की शिक्षक विद्यार्थ्याची खासगी माहिती देणार नाही. पण तो जी काही माहिती देईल, त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्याला मदत करू शकाल. जॉय नावाची एक मिशनरी बहीण, जेव्हा आपल्या बायबल अभ्यासासाठी इतरांना बोलवते तेव्हा ती त्यांना या गोष्टींची माहिती देते. ती म्हणते: “या माहितीमुळे माझ्यासोबत येणारा प्रचारक विद्यार्थ्याला समजून घेऊ शकतो आणि त्याला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल याचा विचार करू शकतो.”

७. तुम्ही जर कोणासोबत बायबल अभ्यासासाठी जाणार असाल तर चांगली तयारी करणं का गरजेचं आहे?

जेव्हा तुम्हाला एखाद्या बायबल अभ्यासासाठी बोलवलं जातं, तेव्हा तुम्ही बायबल अभ्यासाची चांगली तयारी करून जाऊ शकता. (एज्रा ७:१०) आधी उल्लेख केलेला डॅनिएल म्हणतो: “जेव्हा माझ्यासोबत येणारा प्रचारक चांगली तयारी करून येतो तेव्हा मला खूप छान वाटतं. कारण त्यामुळे त्याला चर्चेत चांगला सहभाग घेता येतो. याशिवाय, तुम्ही दोघांनी अभ्यासाची चांगली तयारी केली आहे हे तुमच्या विद्यार्थ्याच्या लक्षात येईल आणि त्यालाही तसंच करायचं प्रोत्साहन मिळेल.” तुम्हाला जर बायबल अभ्यासाची चांगली तयारी करून जाणं शक्य नसेल, तर निदान मुख्य मुद्दे लक्षात घेण्यासाठी थोडा वेळ द्या.

८. बायबल अभ्यासात जर तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता?

बायबल अभ्यासाचा महत्त्वाचा भाग म्हणजे, प्रार्थना. त्यामुळे शिक्षकाने जर तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली तर प्रार्थनेत काय बोलायचं याचा आधीच विचार करा. त्यामुळे विद्यार्थ्याची गरज लक्षात ठेवून तुम्ही प्रार्थना करू शकाल. (स्तो. १४१:२) जपानमध्ये राहणारी हॅना, बायबल अभ्यास करत होती, तेव्हा तिच्या शिक्षिकेसोबत येणाऱ्‍या बहिणीने केलेल्या प्रार्थना तिला अजूनही आठवतात. हॅना म्हणते: “तिची यहोवासोबत किती जवळची मैत्री आहे हे मला तिच्या प्रार्थनांवरून समजायचं. तिच्यासारखंच मलासुद्धा यहोवासोबत जवळची मैत्री करायची होती. प्रार्थनेत ती माझ्या नावाचा उल्लेख करायची तेव्हा तर मला खूप छान वाटायचं.”

९. याकोब १:१९ या वचनानुसार तुम्ही शिक्षकाला कशी मदत करू शकता?

अभ्यासाच्या वेळी शिक्षकाला मदत करा.  नायजीरियामध्ये खास पायनियर म्हणून सेवा करणारी ओमामयोबी नावाची बहीण म्हणते: “तुमच्यासोबत असलेला प्रचारक तुमची चर्चा लक्ष देऊन ऐकतो, चर्चेत सहभाग घेतो तेव्हा नक्कीच खूप मदत होते. पण असं करताना तो हे लक्षात ठेवतो, की शिकवण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकाची आहे.” तर मग अभ्यासाच्या वेळी केव्हा आणि काय बोलायचं हे तुम्हाला कसं कळेल? (नीति. २५:११) त्यासाठी शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं बोलणं लक्ष देऊन ऐका. (याकोब १:१९ वाचा.) तेव्हाच तुम्हाला कळेल, की कधी आणि काय बोलायचं. मग बोलण्याआधी विचार करा आणि जास्त बोलू नका. तसंच, शिक्षक जर एखादा मुद्दा स्पष्ट करून सांगत असेल तर मधेच बालू नका किंवा वेगळ्याच विषयावर चर्चा सुरू करू नका. तर ज्या विषयावर चर्चा सुरू आहे तो मुद्दा स्पष्ट करण्यासाठी थोडक्यात बोला किंवा एक छोटंसं उदाहरण द्या किंवा प्रश्‍न विचारा. काही वेळा तुम्हाला वाटेल, की आपल्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. पण तुम्ही नुसतीच विद्यार्थ्याची प्रशंसा जरी केली आणि त्याच्याबद्दल आपुलकी जरी दाखवली, तरी प्रगती करायला त्याला खूप मदत होईल.

१०. तुमच्या अनुभवामुळे विद्यार्थ्याला कशी मदत होऊ शकते?

१० आपले अनुभव सांगा.  विद्यार्थ्याला मदत होणार असेल तर तुम्ही सत्यात कसे आलात, एखाद्या समस्येचा तुम्ही कसा सामना केला किंवा यहोवाची मदत तुम्ही कशी अनुभवली, हे थोडक्यात विद्यार्थ्याला सांगा. (स्तो. ७८:४, ७) विद्यार्थ्याला आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी तुमच्या अनुभवामुळे खूप प्रोत्साहन मिळू शकतं. तसंच, एखाद्या समस्येचा सामना कसा करायचा हेसुद्धा तुमच्या अनुभवातून त्याला शिकायला मिळेल. (१ पेत्र ५:९) ब्राझीलमध्ये राहणाऱ्‍या गेब्रीएल नावाच्या एका पायनियरला आठवतं, की बायबलचा अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टीमुळे त्याला मदत झाली. तो म्हणतो: “भाऊबहिणींच्या अनुभवांमुळे मला समजलं, की आपण ज्या समस्यांचा सामना करतो त्या यहोवाला माहीत आहेत. जर ते भाऊबहीण त्यांचा सामना करू शकले, तर मीसुद्धा नक्कीच करू शकतो.”

बायबल विद्यार्थी सभांना येऊ लागतो तेव्हा . . .

आपण सगळेच विद्यार्थ्याला सभांना येत राहण्याचं प्रोत्साहन देऊ शकतो (परिच्छेद ११ पाहा)

११-१२. सभांमध्ये येणाऱ्‍या विद्यार्थ्याचं आपण मनापासून स्वागत का केलं पाहिजे?

११ एखाद्या बायबल विद्यार्थ्याला बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करायची असेल, तर त्याने नियमितपणे सभांना येणं गरजेचं आहे. (इब्री १०:२४, २५) हे खरं आहे, की शिक्षक विद्यार्थ्याला सभांना यायचं आमंत्रण देतो. पण तो सभांना येतो तेव्हा आपण सगळेच त्याचं स्वागत करू शकतो आणि सभांना येत राहण्याचं त्याला प्रोत्साहन देऊ शकतो. आपल्याला हे कसं करता येईल?

१२ विद्यार्थ्याचं मनापासून स्वागत करा.  (रोम. १५:७) विद्यार्थ्याला सभांमध्ये आपलेपणा जाणवला तर त्याला नेहमी सभांना येत राहावंसं वाटेल. त्यामुळे तो सभेला येतो तेव्हा त्याचं प्रेमाने स्वागत करा आणि त्याची इतरांशी ओळख करून द्या. त्याचा शिक्षक त्याची काळजी घेईल असा विचार करू नका. तुम्ही स्वतः जाऊन त्याच्याशी बोला. कारण त्याचा शिक्षक कदाचित अजून आला नसेल किंवा मंडळीच्या इतर कामांमध्ये तो व्यस्त असेल. विद्यार्थी तुमच्याशी बोलत असतो तेव्हा त्याचं लक्ष देऊन ऐका आणि आपुलकी दाखवा. यामुळे काय होऊ शकतं? दिमित्री नावाच्या भावाचा अनुभव लक्षात घ्या. काही वर्षांपूर्वी त्याचा बाप्तिस्मा झाला आणि आता तो मंडळीमध्ये सहायक सेवक आहे. तो पहिल्यांदा सभेला आला त्या दिवसाबद्दल आठवून तो असं म्हणतो: “सभागृहात जायला मला भीती वाटत होती. त्यामुळे मी बाहेरच उभा होतो. तेव्हा एका भावाने मला पाहिलं आणि तो मला आत घेऊन गेला. तिथे अनेक जण मला येऊन भेटले. मला खूप आश्‍चर्य वाटलं. हे सगळं मला इतकं आवडलं, की रोज सभा असावी असं मला वाटलं. असं काही मी कुठेच अनुभवलं नव्हतं.”

१३. तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे विद्यार्थ्याला कशी मदत होऊ शकते?

१३ एक चांगलं उदाहरण मांडा.  तुमचं चांगलं वागणं पाहून विद्यार्थ्याला खातरी पटेल, की हेच खरे ख्रिस्ती आहेत. (मत्त. ५:१६) मॉल्डोवामध्ये पायनियर म्हणून सेवा करणारा विटाली म्हणतो: “मंडळीतले भाऊबहीण कसं जीवन जगतात, कसा विचार करतात आणि वागतात हे मी स्वतः पाहिलंय. यामुळे मला पूर्णपणे खातरी पटली, की यहोवाचे साक्षीदार हेच देवाचे लोक आहेत.”

१४. तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे एखाद्याला प्रगती करायला कशी मदत होऊ शकते?

१४ बाप्तिस्मा घेण्याआधी विद्यार्थ्याने शिकलेल्या गोष्टी लागू करणं खूप महत्त्वाचं आहे. हे इतकं सोपं नसतं. पण बायबलची तत्त्वं जीवनात लागू केल्यामुळे तुम्हाला किती फायदा होत आहे हे जेव्हा विद्यार्थी पाहतो, तेव्हा त्यालासुद्धा बायबलची तत्त्वं लागू करायची प्रेरणा मिळेल. (१ करिंथ. ११:१) आधी उल्लेख केलेली हॅना काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “आपण एकमेकांना धीर दिला पाहिजे, मोठ्या मनाने क्षमा केली पाहिजे आणि मनापासून एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे या गोष्टी मी शिकत होते. आणि याची जिवंत उदाहरणं माझ्या डोळ्यांसमोर होती. कारण मी शिकत असलेल्या या गोष्टी भाऊबहीण आधीपासूनच करत होते. ते नेहमी इतरांबद्दल चांगलं बोलायचे. आणि मलापण त्यांच्यासारखंच व्हायचं होतं.”

१५. नीतिवचनं २७:१७ या वचनाप्रमाणे विद्यार्थ्यासोबत मैत्री करणं का गरजेचं आहे?

१५ विद्यार्थ्यासोबत मैत्री करा.  विद्यार्थी सभांना येऊ लागतो तेव्हा त्याच्याशी आपुलकीने वागा. (फिलिप्पै. २:४) त्यासाठी त्याला आणखी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्याने आपल्या जीवनात बरेच बदल केले आहेत हे पाहून तुम्हाला किती आनंद होत आहे हे त्याला तुम्ही सांगू शकता. त्याचा बायबल अभ्यास कसा चालला आहे, त्याचे घरचे लोक कसे आहेत किंवा त्याचं काम कसं चाललं आहे, अशा गोष्टी तुम्ही त्याला विचारू शकता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा; ती म्हणजे, त्याला असे प्रश्‍न विचारू नका ज्यांमुळे त्याला अवघडल्यासारखं वाटेल. अशा प्रकारे त्याची विचारपूस करून तुम्ही त्याच्याशी मैत्री करू शकता. यामुळे त्याला प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत होईल. (नीतिवचनं २७:१७ वाचा.) हॅना आज नियमित पायनियर आहे. पण ती सभांना येऊ लागली ते दिवस आठवून ती म्हणते: “मंडळीतल्या भाऊबहिणींची माझी मैत्री झाली तेव्हापासून सभांना जायला मला खूप आवडू लागलं. कधीकधी मी खूप थकलेली असायचे, तरीपण मी सभांना जायचे. भाऊबहिणींच्या संगतीमुळे मी खूप आनंदी असायचे. त्यामुळे यहोवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांसोबतची मैत्री तोडण्यासाठी मला मदत झाली. मला यहोवासोबत आणि भाऊबहिणींसोबत माझी मैत्री घट्ट करायची होती. म्हणून मी बाप्तिस्मा घ्यायचा निर्णय घेतला.”

१६. आपण आणखी काय करू शकतो ज्यामुळे विद्यार्थ्याला याची जाणीव होईल की तोसुद्धा मंडळीचा एक भाग आहे?

१६ विद्यार्थी जेव्हा प्रगती करू लागतो आणि आपल्या जीवनात बदल करू लागतो, तेव्हा त्याला याची जाणीव होऊ द्या, की तो आता मंडळीचा एक भाग आहे.  त्यासाठी तुम्ही त्याचा पाहुणचार करू शकता. (इब्री १३:२) मोल्डोवामध्ये राहणाऱ्‍या डेनिसचा बायबल अभ्यास सुरू होता ते दिवस आठवून तो म्हणतो: “बऱ्‍याच वेळा मला आणि माझ्या पत्नीला भाऊबहीण त्यांच्या घरी बोलवायचे. ते आम्हाला सांगायचे, की यहोवाने त्यांना कशी मदत केली. त्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळायचं. अशा प्रकारे भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्यामुळे यहोवाची सेवा करायची इच्छा आमच्याही मनात निर्माण झाली. आणि त्याची सेवा केल्यानेच पुढे आम्हाला एक सुंदर जीवन मिळेल याची आम्हाला खातरी पटली.” तसंच, जेव्हा एखादा बायबल विद्यार्थी प्रचारक बनतो तेव्हा तुम्ही त्याला आपल्यासोबत सेवाकार्यासाठी बोलवू शकता. ब्राझील देशात राहणारा जीएगो नावाचा एक प्रचारक म्हणतो: “बऱ्‍याच भावांनी मला त्यांच्यासोबत सेवाकार्य करायला बोलवलं. यामुळे मी त्यांना आणखी चांगल्या प्रकारे ओळखू शकलो. आणि मला खूप काही शिकायला मिळालं. शिवाय, माझी यहोवा आणि येशूसोबतची मैत्री आणखी घट्ट झाली.”

मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात?

वडिलांनो, तुम्ही विद्यार्थ्याशी आपुलकीने बोलता तेव्हा प्रगती करायला त्याला मदत होते (परिच्छेद १७ पाहा)

१७. मंडळीतले वडील बायबल विद्यार्थ्यांना कशी मदत करू शकतात?

१७ बायबल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वेळ दया.  वडिलांनो, तुम्ही बायबल विद्यार्थ्यांना प्रेम आणि काळजी दाखवता तेव्हा त्यांना बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करायला मदत होते. त्यामुळे सभांमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांशी नेहमी बोलू शकत का? त्यांच्याशी बोलताना आणि खासकरून ते सभेत उत्तरं द्यायला सुरू करतात तेव्हा तुम्ही जर त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलवलं, तर त्यांना ते नक्कीच आवडेल. तसंच, त्यांच्या शिक्षकासोबत त्यांच्या अभ्यासाला जाण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता का? यामुळे विद्यार्थ्याला किती मदत होईल याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. नाइजीरियामध्ये राहणारी जॅकलीन नावाची एका पायनियर बहीण म्हणते: “माझ्या अनेक विद्यार्थ्यांना याचं आश्‍चर्य वाटतं, की जो भाऊ माझ्यासोबत बायबल अभ्यासाला आला आहे, तो खरंतर मंडळीत एक वडील आहे.” एका विद्यार्थ्याने तर असंही म्हटलं: “आमचे पाळक आमच्या घरी कधीच येणार नाहीत. ते फक्‍त श्रीमंत लोकांच्या घरी जातात, आणि तेपण त्यांनी पैसे दिले तरच.” आज तो विद्यार्थी नियमितपणे सभांना येतो.

१८. प्रेषितांची कार्यं २०:२८ या वचनात सांगितलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी वडील काय करू शकतात?

१८ शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन द्या.  प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात कुशल बनण्यासाठी प्रचारकांना प्रशिक्षणाची गरज असते. वडिलांनो, प्रचारकांना हे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे. (प्रेषितांची कार्यं २०:२८ वाचा.) जर एखाद्याला तुमच्यासमोर बायबल अभ्यास घ्यायला भीती वाटत असेल, तर तुम्ही तो अभ्यास घेऊ शकता. आधी उल्लेख केलेली जॅकलीन म्हणते: “मंडळीतले वडील नेहमी माझ्या बायबल विद्यार्थ्यांबद्दल विचारपूस करतात. बायबल अभ्यास चालवण्यात मला काही समस्या असेल, तर ते मला मोलाचा सल्ला देतात.” खरंच, शिक्षकाला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळीतले वडील खूप काही करू शकतात. (१ थेस्सलनी. ५:११) जॅकलीन पुढे म्हणते: “मंडळीतले वडील जेव्हा मला प्रोत्साहन देतात आणि मी घेत असलेल्या मेहनतीची कदर करतात, तेव्हा मला खूप बरं वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसांत थंड पाणी प्यायल्यावर जसा तजेला मिळतो, तसा वडिलांच्या शब्दांमुळे मला तजेला मिळतो. यामुळे बायबल अभ्यास चालवण्यातला माझा आत्मविश्‍वास आणि आनंद वाढतो.”—नीति. २५:२५.

१९. कोणत्या गोष्टीमुळे सगळ्यांनाच आनंद मिळू शकतो?

१९ सध्या आपल्याकडे एकही बायबल अभ्यास नसला, तरी एखाद्याला प्रगती करायला आपण नक्कीच मदत करू शकतो. एखाद्या प्रचारकासोबत त्याच्या बायबल अभ्यासाला जाण्याआधी आपण अभ्यासाची चांगली तयारी करून जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अधूनमधून काही मुद्दे सांगता येतील. पण त्याच वेळी आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे, की शिकवण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकाची आहे. आपण फक्‍त त्याला मदत करत आहोत किंवा साथ देत आहोत. तसंच, बायबल विद्यार्थी जेव्हा सभांना येऊ लागतो तेव्हा आपण त्याच्याशी मैत्री करू शकतो. आणि आपल्या चांगल्या वागण्यातून त्याला शिकवू शकतो. याशिवाय, मंडळीतले वडील विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ काढू शकतात. तसंच, ते शिक्षकाला प्रशिक्षण देऊ शकतात आणि त्याच्या कामाची आपल्या शब्दांतून कदर व्यक्‍त करू शकतात. खरंच, एखाद्याला यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला मदत करण्यात आपलाही हातभार लागला या जाणिवेमुळे आपल्या सगळ्यांनाच खूप आनंद मिळतो.

गीत ७ ख्रिस्ती समर्पण

^ परि. 5 सध्या कदाचित आपल्याकडे एकही बायबल अभ्यास नसेल. पण आपण सगळेच एखाद्याला प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करू शकतो. आपल्याला हे कसं करता येईल, ते या लेखात आपण पाहू या.

^ परि. 3 काही नावं बदलण्यात आली आहेत.