व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १७

यहोवाचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे!

यहोवाचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे!

“यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.”—स्तो. १४९:४.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

सारांश *

आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवाला “प्रिय” आहे (परिच्छेद १ पाहा)

१. यहोवा आपल्यामध्ये काय पाहतो?

बायबल म्हणतं, की “यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.” (स्तो. १४९:४) हे जाणून खरंच आपल्याला किती आनंद होतो! यहोवा आपल्यातले चांगले गुण पाहतो. आपण स्वतःमध्ये बदल करून एक चांगली व्यक्‍ती बनू शकतो हे तो पाहतो आणि आपल्याला त्याच्याशी जवळची मैत्री करायला मदत करतो. आपण जर त्याला विश्‍वासू राहिलो तर तो नेहमी आपल्यासोबत राहील.—योहा. ६:४४.

२. यहोवा आपल्यावर प्रेम करतो ही गोष्ट मान्य करणं काहींना कठीण का जातं?

काही जण कदाचित असं म्हणतील, ‘यहोवा आपल्या लोकांवर प्रेम करतो हे तर मला माहीतए, पण तो माझ्यावर प्रेम करतो हे कशावरून?’ असा प्रश्‍न एखाद्याच्या मनात का येऊ शकतो? जुलिएट * काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. तिचं बालपण खूप वाईट होतं. ती म्हणते: “माझा बाप्तिस्मा झाला त्या वेळी मी खूप खूश होते. मग मी लगेच पायनियरिंग सुरू केली. पण १५ वर्षांनंतर बालपणातल्या वाईट आठवणी मला छळू लागल्या. मला असं वाटू लागलं, की मी यहोवाच्या नजरेतून पडले, मी त्याच्या प्रेमाच्या लायकिची नाहीए.” युवी नावाच्या पायनियर बहिणीचं बालपणसुद्धा काहीसं असंच होतं. ती म्हणते: “मला यहोवाला खूश करायचं होतं, म्हणून मी बाप्तिस्मा घेतला. पण मनात कुठेतरी वाटत होतं, की तो कधीच माझ्यावर प्रेम करणार नाही.”

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं पाहणार आहोत?

या दोन विश्‍वासू बहिणींसारखंच तुमचंही यहोवावर खूप प्रेम असेल. पण त्याचं तुमच्यावर प्रेम आहे का अशी शंका कदाचित तुमच्या मनात असेल. यहोवाचं खरंच आपल्यावर खूप प्रेम आहे, त्याला आपली काळजी आहे याची खातरी असणं का महत्त्वाचं आहे? आणि यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे की नाही अशी शंका मनात येते, तेव्हा कोणती गोष्ट ती दूर करायला आपल्याला मदत करू शकते? या प्रश्‍नांची उत्तरं आता आपण पाहू या.

यहोवाच्या प्रेमावर शंका घेणं धोकादायक आहे

४. यहोवाच्या प्रेमावर शंका घेणं धोकादायक का आहे?

प्रेमामध्ये प्रेरणा देण्याची जबरदस्त ताकद असते. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे याची जर आपल्याला खातरी असेल, तर जीवनात कितीही चढउतार आले तरी मनापासून त्याची सेवा करायची प्रेरणा आपल्याला मिळेल. पण देवाच्या प्रेमावर जर आपण शंका घेतली तर ‘आपली शक्‍ती कमी होईल.’ (नीति. २४:१०) दुसऱ्‍या शब्दांत, निराश होऊन आपण जर असा विचार करू लागलो, की यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही, तर सैतान सहज आपल्यावर हल्ला करेल.—इफिस. ६:१६.

५. यहोवाच्या प्रेमावर शंका घेतल्यामुळे काहींच्या बाबतीत काय घडलं आहे?

यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही, त्याला आपली काळजी नाही, असा विचार केल्यामुळे काही भाऊबहिणींचा विश्‍वास कमजोर झाला आहे. जेम्स नावाचे मंडळीतले एक वडील म्हणतात: “मी बेथेलमध्ये सेवा करत होतो. इतकंच नाही, तर दुसऱ्‍या भाषेच्या मंडळीसोबत मिळून प्रचारकार्य करत होतो. पण यहोवासाठी मी जे काही करतोय त्यामुळे त्याला खरंच आनंद होत असेल का, असा प्रश्‍न मला पडायचा. एक वेळ तर अशीही शंका माझ्या मनात आली, की यहोवा माझ्या प्रार्थना तरी ऐकत असेल का?” तसंच, इवा नावाची एक पायनियर बहीण काय म्हणते त्याकडेही लक्ष द्या. ती म्हणते: “यहोवाच्या प्रेमावर शंका घेणं खूप धोकादायक आहे. कारण त्यामुळे आपल्या सेवेवर परिणाम होतो, आध्यात्मिक गोष्टींवरून आपलं मन उडतं आणि यहोवाच्या सेवेतला आपला आनंद नाहीसा होतो.” एक पायनियर आणि वडील म्हणून सेवा करणारे मायकलसुद्धा म्हणतात: “यहोवाला आपली काळजी आहे यावर जर आपला भरवसा नसेल तर हळूहळू आपण त्याच्यापासून दूर जाऊ.”

६. देवाच्या प्रेमाबद्दल मनात शंका येतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे?

या अनुभवांवरून दिसून येतं, की देवाच्या प्रेमावर शंका घेतल्यामुळे किती वाईट परिणाम होतात. त्यामुळे अशा शंका मनात येतात तेव्हा आपण लगेच त्या झटकून टाकल्या पाहिजेत. अस्वस्थ करणारे विचार मनातून काढून टाकण्यासाठी आपण यहोवाला मदत मागितली पाहिजे. आणि आपल्या बुद्धीचं आणि मनाचं रक्षण करणारी त्याची शांती त्याने आपल्याला द्यावी अशी त्याला विनंती केली पाहिजे. (स्तो. १३९:२३, तळटीप; फिलिप्पै. ४:६, ७) शिवाय, आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की असे नकारार्थी विचार आपल्याच मनात येतात असं नाही; तर आपल्या अनेक विश्‍वासू भाऊबहिणींनासुद्धा अशा विचारांशी संघर्ष करावा लागतो. बायबल काळातल्या यहोवाच्या अनेक सेवकांनाही अशा विचारांचा आणि भावनांचा सामना करावा लागला. प्रेषित पौलचंच उदाहरण विचारात घ्या.

पौलच्या अनुभवातून आपण काय शिकतो?

७. पौलला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

तुम्हाला कधी असं वाटलं का, की आपल्यावर खूप जबाबदाऱ्‍या आहेत आणि त्या पूर्ण करणं कठीण आहे? मग पौलच्या परिस्थितीचा विचार करा. त्याला फक्‍त एका मंडळीची नाही, तर “सगळ्या मंडळ्यांची” चिंता होती. (२ करिंथ. ११:२३-२८) आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्ही निराश होता का? असाल, तर पुन्हा पौलचाच विचार करा. त्याच्या “शरीरात एक काटा” होता. ही कदाचित आरोग्याची एखादी समस्या असावी. त्यामुळे त्याला इतका त्रास व्हायचा, की त्यातून त्याला कायमची सुटका हवी होती. (२ करिंथ. १२:७-१०) तुम्ही स्वतःच्याच कमतरतांमुळे निराश होता का? पौलसुद्धा कधीकधी निराश व्हायचा. योग्य ते करण्यासाठी त्याला सतत लढावं लागायचं. आणि म्हणूनच तो म्हणाला: “माझी किती दयनीय अवस्था आहे!”—रोम. ७:२१-२४.

८. आपल्या समस्यांचा सामना करायला पौलला कशामुळे मदत झाली?

पौलला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला, पण तरी तो यहोवाची सेवा करत राहिला. खंडणी बलिदानावर अढळ विश्‍वास असल्यामुळेच तो हे करू शकला. तसंच, ‘जो कोणी  येशूवर विश्‍वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल,’ हे येशूचं अभिवचनसुद्धा त्याला माहीत होतं. (योहा. ३:१६; रोम. ६:२३) याशिवाय, ज्यांनी गंभीर पाप केलं आहे त्यांनी जर पश्‍चात्ताप केला, तर यहोवा मोठ्या मनाने त्यांना क्षमा करतो, याची त्याला पूर्ण खातरी होती.—स्तो. ८६:५.

९. गलतीकर २:२० मध्ये दिलेल्या पौलच्या शब्दांवरून आपल्याला काय समजतं?

देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे याची पौलला आणखी एका गोष्टीमुळे खातरी पटली. ती म्हणजे, देवाने आपल्यासाठी त्याच्या मुलाचं बलिदान दिलं हे त्याला माहीत होतं. (गलतीकर २:२० वाचा.) गलतीकर २:२० या वचनाच्या शेवटी दिलेल्या दिलासादायक शब्दांकडे लक्ष द्या. तिथे पौल म्हणतो, की देवाच्या मुलाने “माझ्यावर  प्रेम केलं आणि माझ्यासाठी  स्वतःला अर्पण केलं.” पौलने असा विचार केला नाही की आपण फार वाईट आहोत, त्यामुळे आपण देवाच्या प्रेमाच्या लायक नाही. किंवा त्याने असाही विचार केला नाही, की ‘यहोवाचं माझ्या भाऊबहिणींवर प्रेम आहे, पण माझ्यावर नाही.’ उलट, रोमकरांना त्याने याची आठवण करून दिली, की “आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी  मरण पावला.” (रोम. ५:८) यावरून दिसून येतं, की यहोवाचं आपल्यावर अपार प्रेम आहे!

१०. रोमकर ८:३८, ३९ या वचनांमधून आपण काय शिकू शकतो?

१० रोमकर ८:३८, ३९ वाचा. देवाच्या प्रेमात किती ताकद आहे हे पौलला माहीत होतं. म्हणून त्याने असं म्हटलं: “कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळं” करू शकत नाही. तसंच, यहोवा इस्राएल राष्ट्राशी किती धीराने वागला होता, हेसुद्धा पौलला माहीत होतं. इतकंच नाही, तर यहोवाने आपल्यालाही किती दया दाखवली हे पौलने स्वतः अनुभवलं होतं. दुसऱ्‍या शब्दांत पौलला हेच म्हणायचं होतं, की “देवाने जर माझ्यासाठी  त्याच्या मुलाचं बलिदान दिलं, तर देवाचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, यावर मी शंका कशी घेऊ शकतो?”—रोम. ८:३२.

आपण पूर्वी  कोणत्या चुका केल्या हे यहोवासाठी महत्त्वाचं नाही, तर आपण आता  काय करतो आणि पुढे  काय करू हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे (परिच्छेद ११ पाहा) *

११. १ तीमथ्य १:१२-१५ यात सांगितल्याप्रमाणे पौलने अनेक चुकीची कामं केली असली, तरीही देव आपल्यावर प्रेम करतो याची त्याला पक्की खातरी का होती?

११ १ तीमथ्य १:१२-१५ वाचा. ख्रिस्ती बनण्याआधी पौलने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, त्या आठवून कधीकधी त्याला खूप त्रास झाला असेल. म्हणूनच “मी सर्वात मोठा पापी आहे” असा तो म्हणाला. पूर्वी त्याने एकापाठोपाठ एका शहरात जाऊन ख्रिश्‍चनांचा छळ केला होता. त्याने काहींना तुरुंगात टाकलं होतं, तर इतरांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जात असताना पाठिंबा दिला होता. (प्रे. कार्यं २६:१०, ११) समजा पौलला मंडळीत असा एखादा तरुण भेटला असेल ज्याच्या आईवडिलांना पौलमुळे मृत्यूची शिक्षा मिळाली असेल, तर त्याला किती वाईट वाटलं असेल याचा जरा विचार करा. केलेल्या चुकांबद्दल पौलला नक्कीच खूप पस्तावा होत असेल. पण जे होऊन गेलं ते आपण बदलू शकत नाही, हे त्याला माहीत होतं. पण मग ख्रिस्ताने आपल्यासाठी बलिदान दिलं हे त्याने मान्य केलं आणि असं लिहिलं: “आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे.” (१ करिंथ १५:३, १०) यातून आपण काय शिकतो? आपल्यापैकी प्रत्येकाला याची पूर्ण खातरी असली पाहिजे, की ख्रिस्ताने माझ्यासाठी  बलिदान दिला आहे आणि त्याच्यामुळेच देवासोबत जवळची मैत्री करणं मला शक्य झालं आहे. (प्रे. कार्यं ३:१९) सत्यात येण्याआधी किंवा सत्यात आल्यानंतर पूर्वी  आपण ज्या चुका केल्या होत्या त्या यहोवासाठी महत्त्वाच्या नाहीत; तर आपण आता  काय करतो आणि पुढे  काय करणार आहोत हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.—यश. १:१८.

१२. यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही असं जर आपल्याला वाटत असेल, तर १ योहान ३:१९, २० या वचनांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

१२ येशूने आपल्या पापांसाठी स्वतःचं जीवन बलिदान केलं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कदाचित आपल्याला असं वाटेल, ‘मी मुळीच या मौल्यवान भेटीच्या लायकीचा नाही.’ पण आपल्याला असं का वाटू शकतं? कारण आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपलं मन आपल्याला हे सांगत असेल, की ‘देवाने माझ्यावर प्रेम करावं इतकी माझी लायकी नाही.’ (१ योहान ३:१९, २० वाचा.) पण अशा वेळी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की “देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे.” आपल्या मनाने आपल्याला कितीही सांगितलं, की यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही, तो आपल्याला कधीच माफ करणार नाही, तरी ते खरं नाही. उलट, यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो मोठ्या मनाने आपल्याला माफ करतो. याची आपण सतत स्वतःला खातरी पटवून दिली पाहिजे. त्यासाठी आपण नेहमी बायबलचा अभ्यास केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवला पाहिजे. हे इतकं महत्त्वाचं का आहे?

बायबलचा अभ्यास, प्रार्थना आणि भाऊबहीण कशी मदत करू शकतात?

१३. बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (“ बायबलमुळे त्यांना कशी मदत होते?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१३ बायबलचा रोज अभ्यास करा.  त्यामुळे आपल्याला यहोवाच्या अनेक सुंदर गुणांबद्दल शिकायला मिळेल. तसंच, त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हेसुद्धा आपल्याला समजेल. वाचलेल्या गोष्टींवर दररोज मनन केल्यामुळे आपल्याला स्पष्टपणे विचार करायला आणि मनात येणाऱ्‍या चुकीचे विचार ‘सुधारायला मदत’ होईल. (२ तीम. ३:१६) केविन नावाचे ख्रिस्ती वडील काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या. त्यांना स्वतःबद्दल खूप कमीपणा वाटायचा. ते म्हणतात: “स्तोत्र १०३ वाचल्यावर आणि त्यावर मनन केल्यावर मला माझे विचार सुधारायला, आणि यहोवाला माझ्याबद्दल नेमकं कसं वाटतं हे समजून घ्यायला मदत झाली.” आधी उल्लेख केलेली इवा म्हणते: “यहोवासाठी काय महत्त्वाचं आहे यावर दिवसाच्या शेवटी मी मनन करते. त्यामुळे माझ्या मनाला खूप शांती मिळते आणि यहोवावरचा माझा विश्‍वास आणखी मजबूत होतो.”

१४. प्रार्थनेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

१४ नेहमी प्रार्थना करा.  (१ थेस्सलनी. ५:१७) एखाद्याशी मैत्री करण्यासाठी त्याच्यासोबत नेहमी बोलणं आणि आपल्याला कसं वाटतं हे त्याला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तरच ती मैत्री घट्ट होऊ शकते. यहोवासोबतची आपली मैत्री घट्ट करण्यासाठी आपण हेच केलं पाहिजे. प्रार्थनेत आपण जेव्हा यहोवाला आपल्या भावना, आपले विचार आणि आपले चिंता सांगतो, तेव्हा आपण हेच दाखवतो की त्याच्यावर आपला भरवसा आहे आणि आपल्यावर त्याचं प्रेम आहे याची आपल्याला जाणीव आहे. (स्तो. ९४:१७-१९; १ योहा. ५:१४, १५) आधी उल्लेख केलेली युवी म्हणते: “मी यहोवाला प्रार्थना करते तेव्हा दिवसभरात कायकाय घडलं इतकंच मी त्याला सांगत नाही; तर मी त्याच्याजवळ माझं मन मोकळ करते आणि मला नेमकं कसं वाटतं हे मी त्याला सांगते. त्यामुळे यहोवा माझ्यासाठी एका बॉससारखा नाही, तर आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम करणाऱ्‍या वडिलांसारखा आहे.”—“ तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का?” ही चौकट पाहा.

१५. आज यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाला कशी मदत करतो?

१५ भाऊबहिणींसोबत वेळ घालवा.  आपले भाऊबहीण हे यहोवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. (याको. १:१७) यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाला मंडळीतल्या भाऊबहिणींद्वारे मदत करतो. हे भाऊबहीण आपल्यावर “नेहमी प्रेम” करतात. (नीति. १७:१७) पौलने कलस्सैकरांना जे पत्र लिहिलं होतं त्यात त्याने अशा काही भाऊबहिणींचा उल्लेख केला ज्यांनी त्याला खूप मदत केली. त्यांच्याबद्दल तो म्हणतो, की “त्यांनी मला खूप सांत्वन दिलं.” (कलस्सै. ४:१०, ११) यहोवाने येशूलासुद्धा त्याच्या काही मित्रांद्वारे आणि स्वर्गदूतांद्वारे मदत केली, आणि त्यासाठी येशूने यहोवाचे खूप आभार मानले.—लूक २२:२८, ४३.

१६. मंडळीच्या मित्रांद्वारे यहोवा त्याच्या प्रेमाची जाणीव कशी करून देतो?

१६ गरज असते तेव्हा तुम्ही भाऊबहिणींकडे मदत मागता का? किंवा ते देत असलेली मदत तुम्ही स्वीकारता का? मंडळीतल्या एखाद्या प्रौढ भावाशी किंवा बहिणीशी आपण आपल्या समस्यांबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की आपला विश्‍वास कमजोर आहे. उलट त्यामुळे आपलं संरक्षणच होतं. आधी उल्लेख केलेले जेम्स काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या. ते म्हणतात: “मंडळीतल्या प्रौढ भाऊबहिणींशी मैत्री केल्यामुळे मला खूप मदत झाली आहे. नकारात्मक विचार माझ्या मनात येतात तेव्हा हेच मित्र माझं शांतपणे ऐकून घेतात आणि त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे याची मला जाणीव करून देतात. सगळ्यात मुख्य म्हणजे, यहोवाचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि त्याला माझी किती काळजी आहे, हे या मित्रांमुळे मला जाणवतं.” म्हणूनच, भाऊबहिणींसोबत जवळची मैत्री करणं खूप गरजेचं आहे.

यहोवाच्या प्रेमात टिकून राहा!

१७-१८. आपण कोणाचं ऐकलं पाहिजे आणि का?

१७ यहोवाच्या सेवकांनी योग्य ते करण्यासाठी संघर्ष करू नये, असं सैतानाला वाटतं. तसंच, तो आपल्याला असा विचार करायला लावतो की यहोवाचं आपल्यावर मुळीच प्रेम नाही आणि येणाऱ्‍या संकटातून तो आपल्याला वाचवणार नाही. पण आपण पाहिलं, की हे साफ खोटं आहे.

१८ उलट, यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपण त्याच्यासाठी फार महत्त्वाचे आहोत. त्यामुळे आपण जर त्याचं ऐकलं तर येशूप्रमाणेच आपण कायम त्याच्या प्रेमात टिकून राहू. (योहा. १५:१०) आपण सैतानाचं किंवा दोष देणाऱ्‍या आपल्या मनाचं नाही, तर यहोवाचं ऐकलं पाहिजे. कारण यहोवा प्रत्येकामध्ये चांगले गुण पाहतो आणि त्याला प्रत्येक व्यक्‍ती “प्रिय” आहे.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 यहोवा आपल्यावर प्रेम करतो ही गोष्ट मान्य करायला काही भाऊबहिणींना कठीण जातं. पण आपल्यापैकी प्रत्येकावर यहोवा खूप प्रेम करतो असं आपण खातरीने का म्हणू शकतो, याची चर्चा या लेखात केली जाईल. तसंच, यहोवाच्या प्रेमाबद्दल आपल्या मनात काही शंका असतील, तर त्या कशा दूर करता येतील हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत.

^ परि. 2 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 67 चित्रांचं वर्णन: ख्रिस्ती बनण्याआधी पौलने ख्रिश्‍चनांचा छळ केला होता आणि अनेकांना तुरुंगात टाकलं होतं. पण खंडणी बलिदानावर मनन केल्यामुळे तो आपली विचारसरणी बदलू शकला आणि भाऊबहिणींना प्रोत्साहन देऊ शकला. त्यांच्यापैकी काहींच्या नातेवाइकांचा त्याने पूर्वी छळ केला असावा.