व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २३

तुम्ही एकटे नाही, यहोवा नेहमी तुमच्यासोबत आहे

तुम्ही एकटे नाही, यहोवा नेहमी तुमच्यासोबत आहे

“यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे.” —स्तो. १४५:१८.

गीत २७ यहोवाला इमानी राहा!

सारांश *

१. यहोवाच्या सेवकांना कधीकधी एकटेपणा का वाटू शकतो?

आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी एकटेपणा जाणवतो. काही जण लवकर यातून बाहेर पडतात, तर काहींना वेळ लागतो. माणसांच्या गर्दीतही आपल्याला एकाकी वाटू शकतं. काहींना एका नवीन मंडळीत गेल्यावर इतरांशी मैत्री करायला कठीण जातं. तर काही जण अशा कुटुंबातून आलेले असतात जिथे त्यांचं एकमेकांसोबत खूप जवळचं नातं होतं. त्यामुळे कुटुंबापासून दूर गेल्यावर त्यांना फार एकटं-एकटं वाटतं. आणि असेही काही जण आहेत ज्यांच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यामुळे ते अगदीच एकटे पडतात. आणि असे काही जण आहेत ज्यांचं कुटुंब किंवा मित्र त्यांचा विरोध करतात किंवा त्यांच्यासोबतचं नातं तोडून टाकतात. आणि त्यामुळे त्यांना खूप एकटं-एकटं वाटतं.

२. आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं पाहणार आहोत?

यहोवाला आपल्याबद्दल सगळं काही माहीत आहे. आपल्याला एकटं वाटतं तेव्हा त्याला ते कळतं. आणि त्यातून बाहेर पडायला त्याला आपल्याला मदत करायची असते. यहोवा आपल्याला कशा प्रकारे मदत करतो? आपण स्वतः काय करू शकतो? आणि ज्या भाऊबहिणींना एकटं वाटतं त्यांना आपण कशी मदत करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आता आपण पाहू या.

यहोवाला आपली काळजी आहे

यहोवाने आपल्या स्वर्गदूताला पाठवून एलीयाला याचं आश्‍वासन दिलं की तो एकटा नाही (परिच्छेद ३ पाहा)

३. यहोवाने एलीयाची काळजी घेतली हे कसं दिसून येतं?

आपल्या सगळ्या सेवकांनी आनंदी असावं असं यहोवाला वाटतं. तो आपल्यापैकी प्रत्येकाच्या जवळ असतो आणि जेव्हा आपण दुःखी असतो, निराश असतो तेव्हा त्याला ते कळतं. (स्तो. १४५:१८, १९) यहोवाने एलीया संदेष्ट्याच्या भावना कशा समजून घेतल्या आणि त्याला कशी मदत केली याकडे लक्ष द्या. एलीया हा अतिशय कठीण काळात जगत होता. अहाब राजा आणि ईजबेल राणी यहोवाच्या उपासकांचा खूप छळ करत होते. आणि खासकरून ते एलीयाच्या जिवावर टपले होते. (१ राजे १९:१, २) तसंच, यहोवाच्या सगळ्या संदेष्ट्यांना मारून टाकण्यात आलं आहे आणि आता आपण एकटेच उरलो आहोत असं एलीयाला वाटलं आणि त्यामुळे तो आणखीनच निराश झाला असेल. (१ राजे १९:१०) एलीयाच्या या भावना यहोवाने समजून घेतल्या आणि त्याला लगेच मदत केली. त्याने आपल्या स्वर्गदूताला पाठवून एलीयाला याचं आश्‍वासन दिलं, की तो एकटा नाही, तर इस्राएलमध्ये असे कितीतरी लोक आहेत जे अजूनही विश्‍वासूपणे उपासना करत आहेत.—१ राजे १९:५, १८.

४. ज्यांना जवळच्या लोकांनी सोडून दिलं आहे अशांची यहोवाला काळजी आहे, हे मार्क १०:२९, ३० या वचनांमधून कसं समजतं?

आपण यहोवाचे सेवक बनतो तेव्हा आपल्याला अनेक त्याग करावे लागतात हे त्याला माहीत आहे. जसं की, सत्यात नसलेले आपले घरचे लोक आणि मित्र कदाचित आपल्याला सोडून देतील. प्रेषित पेत्रलासुद्धा कदाचित हीच चिंता असावी आणि म्हणून त्याने येशूला विचारलं, की “आम्ही सगळं काही सोडून तुझ्यामागे आलो आहोत. मग आम्हाला काय मिळेल?” (मत्त. १९:२७) तेव्हा येशूने शिष्यांना आश्‍वासन दिलं, की त्यांना एक खूप मोठं कुटुंब मिळेल. कारण मंडळीतले भाऊबहीण त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसारखे बनतील. (मार्क १०:२९, ३० वाचा.) आपल्या या आध्यात्मिक कुटुंबाचा प्रमुख, यहोवा आपल्या उपासकांना असं वचन देतो, की तो त्यांना कधीही सोडून देणार नाही. तो नेहमी आपल्याला मदत करेल. (स्तो. ९:१०) पण ही मदत मिळण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो ते आता आपण पाहू या.

एकटेपणा वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता?

५. यहोवा ज्या प्रकारे आपल्याला सांभाळतो याचा आपण विचार का केला पाहिजे?

यहोवा कशा प्रकारे तुम्हाला सांभाळतो याचा विचार करा.  (स्तो. ५५:२२) त्यामुळे तुम्ही एकटे आहात असं कधीच तुम्हाला वाटणार नाही. कविता * नावाची एक अविवाहित बहीण एकटीच सत्यात आहे. ती म्हणते: “माझ्या जीवनात संकटं आली तेव्हा यहोवाने कशा प्रकारे मला सांभाळलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला जाणवतं, की मी कधीच एकटी नव्हते. यहोवा नेहमी माझ्यासोबत होता. त्यामुळे मला खातरी आहे, की पुढेही तो नेहमी माझ्यासोबत असेल.”

६. ज्यांना एकटेपणा वाटतो त्यांना १ पेत्र ५:९, १० या वचनांमुळे कसं प्रोत्साहन मिळतं?

ज्या भाऊबहिणींना समस्या आहेत त्यांना यहोवा कशी मदत करतो याचा विचार करा.  (१ पेत्र ५:९, १० वाचा.) हरीश नावाचा एक भाऊ बऱ्‍याच वर्षांपासून एकटाच सत्यात आहे. तो म्हणतो, “मंडळीत प्रत्येकाला काही ना काही समस्या आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक जण यहोवाची होईल तितकी सेवा करतो हे पाहून आमच्यासारख्यांना, जे एकटेच सत्यात आहेत खूप प्रोत्साहन मिळतं.”

७. प्रार्थनेमुळे तुम्हाला कशी मदत होते?

नियमितपणे प्रार्थना करा, बायबल वाचा आणि सभांना उपस्थित राहा.  तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे प्रार्थनेत यहोवाला सांगा. (१ पेत्र ५:७) मर्सी नावाची एक तरुण बहीण सत्य शिकत होती तेव्हा तिच्या कुटुंबातल्या लोकांनी तिचा खूप विरोध केला. त्यामुळे तिला खूप एकटं वाटायचं. पण ती म्हणते, “एकटेपणाच्या भावनेशी लढण्यासाठी प्रार्थनेमुळे मला खूप मदत झाली. माझ्यासाठी यहोवा एका वडिलांसारखा होता. मी दररोज कळकळून त्याला प्रार्थना करायचे. दिवसातून कितीतरी वेळा मी त्याला प्रार्थना करायचे आणि मला नेमकं कसं वाटतं हे त्याला सांगायचे.”

बायबलचं आणि आपल्या इतर प्रकाशनांचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आपला एकटेपणा दूर होऊ शकतो (परिच्छेद ८ पाहा) *

८. बायबल वाचल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होते?

नियमितपणे बायबल वाचा आणि खासकरून अशा वृत्तान्तांवर मनन करा ज्यांतून दिसून येतं, की यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. बिना नावाची एक बहीण एकटीच सत्यात आहे. तिच्या कुटुंबातले लोक तिला सतत वाईटसाईट बोलत राहतात. ती म्हणते, “बायबलमधले वृत्तान्त वाचल्यामुळे, तसंच यहोवाच्या ज्या सेवकांना माझ्यासारख्याच समस्या होत्या त्यांच्या जीवन कथा वाचल्यामुळे आणि त्यांवर मनन केल्यामुळे मला खरंच खूप मदत होते.” काही भाऊबहीण दिलासा देणारी शास्त्रवचनं तोंडपाठ करतात. जसं की, स्तोत्र २७:१० आणि यशया ४१:१०. तर इतर काही जण सभांची तयारी करण्यासाठी किंवा बायबल वाचण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंगचा वापर करतात. त्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवत नाही.

९. सभांना आल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होतो?

शक्यतो एकही सभा चुकवू नका. कारण तिथे तुम्हाला जे काही शिकायला मिळेल त्यामुळे तुम्हाला खूप बरं वाटेल. शिवाय, भाऊबहिणींसोबतची तुमची ओळखही आणखी वाढेल. (इब्री १०:२४, २५) आपण मर्सी नावाच्या ज्या बहिणीबद्दल आधी पाहिलं होतं ती म्हणते, “मी खूप लाजाळू स्वभावाची होते. पण तरीसुद्धा मी ठरवलं होतं, की मी प्रत्येक सभेला जाईन आणि निदान एकतरी उत्तर देईन. त्यामुळे मंडळीत मला खूप आपलेपणा वाटू लागला.”

१०. मंडळीतल्या भाऊबहिणींशी आपण मैत्री का केली पाहिजे?

१० भाऊबहिणींशी मैत्री करा.  मंडळीत ज्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळेल त्यांच्याशी मैत्री करा. मग ते कोणत्याही संस्कृतीचे किंवा वयाचे असले तरीही. कारण बायबल म्हणतं, “म्हाताऱ्‍या माणसांजवळ बुद्धी” असते. (ईयो. १२:१२) तसंच, वयस्कर लोकसुद्धा तरुण भाऊबहिणींकडून खूप काही शिकू शकतात. दावीद आणि योनाथानचाच विचार करा. दावीद योनाथानपेक्षा खूप लहान होता. पण तरीसुद्धा ते खूप चांगले मित्र बनले. (१ शमु. १८:१) त्यांच्या जीवनात अनेक समस्या आल्या, तरी त्यांनी एकमेकांना यहोवाची सेवा करायला मदत केली. (१ शमु. २३:१६-१८) आयरिन नावाची बहीण सध्या एकटीच सत्यात आहे. ती म्हणते, “आपल्या आईवडीलांची आणि भावंडांची कमी भरून काढण्यासाठी यहोवा मंडळीतल्या भाऊबहिणींचा उपयोग करू शकतो.”

११. भाऊबहिणींशी मैत्री करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

११ नवीन मित्र बनवणं सोपं नसतं, खासकरून तुम्ही लाजाळू स्वभावाचे असाल तर. रत्ना नावाच्या एका बहिणीचा स्वभावसुद्धा असाच होता. पण कुटुंबातून बराच विरोध होत असूनही ती सत्य शिकली. ती म्हणते, “मला मंडळीतल्या भाऊबहिणींच्या मदतीची आणि आधाराची खूप गरज आहे हे मला जाणवलं.” कुणाकडे मन मोकळं करणं सोपं नसतं. पण जवळची मैत्री करण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. तुमचे मित्र तुम्हाला धीर द्यायला आणि मदत करायला नेहमी तयार आहेत. पण त्यासाठी तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगितली पाहिजे. तरच ते तुम्हाला मदत करू शकतील.

१२. मित्र बनवण्याची सगळ्यात चांगली संधी कोणती आहे, आणि का?

१२ आपण भाऊबहिणींसोबत प्रचारकार्य करतो तेव्हा त्यांच्यासोबत मैत्री करण्याची सगळ्यात चांगली संधी आपल्याला मिळते. कविता नावाच्या ज्या बहिणीबद्दल आपण आधी पाहिलं होतं ती म्हणते, “मंडळीतल्या बहिणींसोबत प्रचार केल्यामुळे आणि यहोवाच्या सेवेतली इतर कामं एकत्र मिळून केल्यामुळे त्यांच्यासोबत माझी खूप चांगली मैत्री झाली आहे. अशा मित्रांद्वारेच यहोवाने नेहमी माझी मदत केली आहे.” यावरून दिसून येतं, की भाऊबहिणींशी मैत्री करणं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपण निराश असतो, आपल्याला एकटेपणा वाटतो तेव्हा याच मित्रांचा उपयोग करून यहोवा आपल्याला मदत करतो.—नीति. १७:१७.

आपण एकाच कुटुंबातले आहोत असं इतरांना वाटू द्या

१३. मंडळीतल्या प्रत्येकाने काय केलं पाहिजे?

१३ मंडळीतलं प्रेमाचं आणि शांतीचं वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे कुणालाही एकटं वाटणार नाही. (योहा. १३:३५) त्यासाठी आपण जे काही करतो आणि बोलतो त्यामुळे खरंच खूप फरक पडतो. एक बहीण काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते, “मी सत्यात आले तेव्हा मंडळीने माझ्यावर कुटुंबातल्या लोकांसारखं प्रेम केलं. भाऊबहिणींच्या मदतीशिवाय मी साक्षीदार बनलेच नसते.” तर मग, जे लोक सत्यात एकटे आहेत त्यांना मंडळीत आपलेपणा वाटावा म्हणून तुम्ही काय करू शकता?

१४. नवीन लोकांशी मैत्री करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१४ नवीन लोकांशी स्वतःहून मैत्री करा.  नवीन लोक जेव्हा मंडळीत येतात तेव्हा प्रेमाने त्यांचं स्वागत करा. (रोम. १५:७) पण त्यांच्याशी चांगली मैत्री करण्यासाठी फक्‍त ‘नमस्ते,’ ‘आपलं नाव काय?’ इतकंच म्हणणं पुरेसं नाही. तर हळूहळू आपुलकीने त्यांची विचारपूस करा आणि त्यांना जाणून घ्या. पण असं करताना त्यांना अवघडल्यासारखं वाटेल असे प्रश्‍न विचारू नका. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कसं वाटतं हे सांगणं काहींना कठीण जातं. त्यामुळे त्यांना खूपसारे प्रश्‍न विचारून बोलायला लावू नका. तर विचार करून प्रश्‍न विचारा. जसं की, ‘तुम्हाला सत्याबद्दल कसं कळलं?’ आणि ते बोलत असताना लक्ष देऊन त्यांचं ऐका.

१५. मंडळीतले अनुभवी भाऊबहीण इतरांना कशी मदत करू शकतात?

१५ अनुभवी भाऊबहीण आणि खासकरून ख्रिस्ती वडील सगळ्यांची काळजी घेतात तेव्हा मंडळीतल्या सगळ्यांचाच विश्‍वास मजबूत होतो. मेलिसा नावाच्या बहिणीला तिच्या आईने सत्यात वाढवलं. ती म्हणते: “मंडळीतल्या ज्या भावांनी माझ्यावर वडिलांसारखं प्रेम केलं, माझ्यासाठी वेळ दिला, मला आपुलकी दाखवली त्यांचे मी खूप आभार मानते. आत्तासुद्धा मला काही बोलायचं असेल तर मी त्यांच्यापैकी कुणाशीही बोलू शकते.” मार्टिन नावाच्या तरुण भावाचाही विचार करा. ज्या भावाने त्याच्यासोबत बायबल अभ्यास केला होता, तो जेव्हा सत्य सोडून गेला तेव्हा मार्टिन खूप दुःखी झाला. त्याला खूप एकटं-एकटं वाटू लागलं. तो म्हणतो, “पण मंडळीतल्या वडिलांनी मला खूप मदत केली. ते वेळोवेळी माझ्याशी बोलायचे. आणि त्यामुळे त्यांना माझी किती काळजी आहे हे मला जाणवायचं. ते माझ्यासोबत प्रचार करायचे आणि बायबलमधून शिकलेला एखादा मुद्दा मला सांगायचे. इतकंच नाही, तर आम्ही सोबत मिळून खेळायचोसुद्धा.” आज मेलिसा आणि मार्टिन पूर्णवेळची सेवा करत आहेत.

तुमच्या मंडळीत कुणाला एकटेपणा जाणवत असेल तर त्याच्यासोबत वेळ घालवा. त्यामुळे त्याला खूप बरं वाटेल (परिच्छेद १६-१९ पाहा) *

१६-१७. कोणत्या छोट्याछोट्या मार्गांनी आपण इतरांना मदत करू शकतो?

१६ छोट्याछोट्या गोष्टींतून मदत करा.  (गलती. ६:१०) लिओ नावाचा एक भाऊ आपल्या कुटुंबापासून दूर, एका दुसऱ्‍या देशात मिशनरी म्हणून सेवा करतो. तो म्हणतो, “एखाद्याला मदत करण्यासाठी आपल्याला मोठमोठ्या गोष्टी करायची गरज नसते. नेमक्या वेळी केलेली एक छोटीशी मदतसुद्धा खूप मोलाची असते. मला आठवतं, एकदा माझ्या कारचा ॲक्सिडेन्ट झाला होता. त्या दिवशी मी घरी आलो तेव्हा मी खूप थकलो होतो आणि खूप टेन्शनमध्ये होतो. पण त्याच वेळी एका जोडप्याने मला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. त्या दिवशी आम्ही काय जेवलो ते मला आठवत नाही. पण त्यांनी माझं किती शांतपणे ऐकून घेतलं ते मला चांगलं आठवतं. मला खरंच खूप बरं वाटलं.”

१७ आपल्या सगळ्यांनाच संमेलनांना आणि अधिवेशनांना जायला आवडतं. कारण तिथे आपण आपल्या भाऊबहिणींना भेटतो आणि शिकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलतो. पण कविता नावाच्या ज्या बहिणीबद्दल आपण आधी पाहिलं होतं, ती म्हणते: “संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये माझ्या आजूबाजूला इतके सगळे भाऊबहीण असतानासुद्धा मला खूप एकटं-एकटं वाटतं. कारण तिथे सगळे आपापल्या कुटुंबांसोबत असतात. ते पाहून मला आणखीनच एकटेपणा जाणवतो.” काहींच्या बाबतीत असं होतं, की जोडीदाराच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा अधिवेशनाला आणि संमेलनाला जाणं त्यांना खूप कठीण जातं. एकटेपणाशी लढणारे असे भाऊबहीण तुम्हाला माहीत आहेत का? मग त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? येणाऱ्‍या अधिवेशनात किंवा संमेलनात तुम्ही त्यांना आपल्या कुटुंबासोबत बसवू शकता.

१८. पाहुणचार दाखवण्याच्या बाबतीत आपण २ करिंथकर ६:११-१३ हे वचन कसं लागू करू शकतो?

१८ एकत्र वेळ घालवा.  वेगवेगळ्या भाऊबहिणींसोबत आणि खासकरून अशांसोबत वेळ घालवा ज्यांना एकटेपणा वाटतो. आपण त्यांच्यासाठी आपलं “मन मोठं केलं” पाहिजे असं बायबल म्हणतं. (२ करिंथकर ६:११-१३ वाचा.) मेलिसा म्हणते, “मंडळीतले भाऊबहीण मला आणि आईला त्यांच्या घरी बोलवायचे किंवा त्यांच्यासोबत ट्रिपला घेऊन जायचे तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा.” तुमच्या मंडळीत असं कुणी आहे का ज्यांना एकटेपणा जाणवतो? मग तुम्ही त्यांचा पाहुणचार कराल का?

१९. भाऊबहिणींसोबत आपण खासकरून केव्हा वेळ घालवला पाहिजे?

१९ असे काही प्रसंग असतात जेव्हा भाऊबहिणींना आपली खूप गरज असते. जसं की, सत्यात नसलेले कुटुंबाचे सदस्य सणवार साजरे करतात तेव्हा आपल्या काही भाऊबहिणींना एकटं वाटू शकतं. तर काहींसाठी वर्षातले काही ठरावीक दिवस खूप कठीण जाऊ शकतात. जसं की, जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला तो दिवस. अशा वेळी भाऊबहिणींसोबत आपण जर वेळ घालवला तर आपण दाखवून देऊ, की आपल्याला अगदी मनापासून त्यांची काळजी आहे.—फिलिप्पै. २:२०.

२०. आपल्याला एकटेपणा वाटतो तेव्हा मत्तय १२:४८-५० या वचनांतले शब्द आपल्याला कशी मदत करू शकतात?

२० आपल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या कारणांमुळे एकटेपणा जाणवू शकतो. पण आपल्याला कसं वाटतं हे यहोवाला कळतं. आणि सहसा आपल्या भाऊबहिणींद्वारे तो आपल्याला मदत करतो. (मत्तय १२:४८-५० वाचा.) त्याबद्दल यहोवाचे आभार मानण्यासाठी आपणही मंडळीतल्या भाऊबहिणींना मदत केली पाहिजे. आपण स्वतःला कधीच एकटं समजू नये. कारण यहोवा नेहमी आपल्यासोबत आहे.

गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो

^ परि. 5 तुम्हाला कधीकधी एकटेपणा जाणवतो का? असेल तर याची खातरी बाळगा, की तुम्हाला कसं वाटतं हे यहोवाला कळतं आणि तुम्हाला मदत करायची त्याची मनापासून इच्छा आहे. एकटेपणाच्या भावनेशी लढण्यासाठी तुम्ही काय करू शकता याची चर्चा या लेखात केली जाईल. तसंच, ज्या भाऊबहिणींना एकटं वाटतं त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकता हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत.

^ परि. 5 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: एका भावाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पण बायबलचं आणि इतर प्रकाशनांचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे त्याला मदत होते.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: एक भाऊ आणि त्यांची मुलगी मंडळीतल्या एका वयस्कर भावाला भेटायला आले आहेत. आणि त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी आणलं आहे.