व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

प्रेषित पौलने जेव्हा असं म्हटलं, की “नियमशास्त्राद्वारे मी नियमशास्त्राकरता मरण पावलो,” तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं?—गलती. २:१९.

पौलने लिहिलं, “नियमशास्त्राद्वारे मी नियमशास्त्राकरता मरण पावलो. हे यासाठी, की मी देवासाठी जिवंत व्हावं.” —गलती. २:१९.

पौलने हे शब्द गलतीया या रोमी प्रांतातल्या मंडळ्यांना पत्रात लिहिले. ख्रिश्‍चनांना आता मोशेचं नियमशास्त्र पाळायची गरज नाही हा महत्त्वाचा मुद्दा सांगताना त्याने हे शब्द लिहिले. कारण काही खोटे शिक्षक या मंडळ्यांमध्ये शिरले होते; आणि ते असं शिकवत होते, की तारण मिळवायचं असेल तर मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करणं खूप गरजेचं आहे, खासकरून सुंतेविषयीचा नियम. आणि त्यांचं ऐकून मंडळीतले काही जणसुद्धा तेच म्हणत होते. पण आता कुणालाही सुंता करायची गरज नाही हे पौलला माहीत होतं. त्यामुळे पौलने भाऊबहिणींना पटेल अशा प्रकारे तर्क करून हे दाखवून दिलं, की या शिकवणी खोट्या आहेत. आणि येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावरचा त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत केला.—गलती. २:४; ५:२.

बायबल स्पष्टपणे सांगतं, की एक व्यक्‍ती मरते तेव्हा तिला काहीच माहीत नसतं. आणि आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीचा तिच्यावर काहीच परिणाम होत नसतो. (उप. ९:५) त्यामुळे पौलने जेव्हा असं म्हटलं की, “मी नियमशास्त्राकरता मरण पावलो,” तेव्हा त्याला हेच म्हणायचं होतं की नियमशास्त्राचा आता त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नव्हता. त्याऐवजी पौलला याची खातरी होती, की खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे, तो “देवासाठी जिवंत” झाला होता.

हा बदल ‘नियमशास्त्राद्वारेच’ झाला. असं का म्हणता येईल? कारण याआधीच पौलने असं समजावून सांगितलं होतं, की “कोणताही माणूस, नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे नाही, तर फक्‍त येशू ख्रिस्तावर असलेल्या विश्‍वासाद्वारे नीतिमान ठरवला जातो.” (गलती. २:१६) हे खरं आहे, की नियमशास्त्राने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट साध्य केली होती. त्याबद्दल पौलने असं म्हटलं, “जिला अभिवचन देण्यात आलं होतं, ती संतती येईपर्यंत अपराध प्रकट करण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं होतं.” (गलती. ३:१९) आणि खरंच नियमशास्त्राने हे दाखवून दिलं, की अपरिपूर्ण पापी मानव नियमशास्त्राचं तंतोतंतपणे पालन करू शकत नाही, आणि त्यांना एका परिपूर्ण बलिदानाची गरज आहे. नियमशास्त्राने लोकांना हे समजायला मदत केली, की ज्या ‘संततीबद्दल’ अभिवचन दिलं होतं ती संतती येशू आहे. आणि येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यावरच देव एका व्यक्‍तीला नीतिमान ठरवू शकतो. (गलती. ३:२४) पौलला नीतिमान ठरवण्यात आलं होतं. कारण त्याने नियमशास्त्राद्वारे येशूवर विश्‍वास ठेवला होता. आणि त्याच अर्थाने तो ‘नियमशास्त्राकरता मरण पावला होता’ आणि ‘देवासाठी जिवंत झाला’ होता. त्यामुळे नियमशास्त्राचा आता त्याच्यावर कोणताही अधिकार नव्हता, तर देवाचा होता.

हीच गोष्ट त्याने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात सांगितली. त्याने म्हटलं, “माझ्या बांधवांनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राच्या बाबतीत मेलेले असे झाला. . . . पण आता आपण नियमशास्त्रातून मुक्‍त झालो आहोत. कारण आपल्यावर जे बंधन घालत होतं, त्या नियमशास्त्राच्या बाबतीत आपण मेलो आहोत.” (रोम. ७:४, ६) हे वचन आणि गलतीकर २:१९ हे वचन दाखवून देतं, की पौल खरोखरच्या मरणाबद्दल बोलत नव्हता; तर तो नियमशास्त्राच्या बंधनातून मुक्‍त होण्याबद्दल बोलत होता. नियमशास्त्राचा आता पौलवर आणि इतर ख्रिश्‍चनांवरही कोणताच अधिकार नव्हता. कारण ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे ते नियमशास्त्राच्या बंधनातून मुक्‍त झाले होते.