व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २४

आपण सैतानाच्या पाशांतून सुटू शकतो!

आपण सैतानाच्या पाशांतून सुटू शकतो!

सैतानाच्या “पाशातून” सुटा.—२ तीम. २:२६.

गीत ५२ मनाचे रक्षण करा

सारांश *

१. सैतान एका शिकाऱ्‍यासारखा आहे असं का म्हणता येईल?

शिकाऱ्‍याचा उद्देश एकच असतो. प्राण्याला पकडायचं किंवा त्याला मारून टाकायचं. यासाठी तो वेगवेगळ्या पाशांचा उपयोग करतो. त्यांबद्दल बायबलमध्येसुद्धा सांगितलं आहे. (ईयो. १८:८-१०) शिकारी एका प्राण्याला आपल्या पाशात कसं अडकवतो? त्यासाठी तो त्याच्याबद्दल सगळं काही जाणून घेतो. जसं की, तो कुठे जातो, त्याला काय आवडतं, त्याला अचानक कसं पकडता येईल, या सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास करतो. सैतानसुद्धा एका शिकाऱ्‍यासारखाच आहे. तो आपला बारकाईने अभ्यास करतो. आपण कुठे जातो, आपल्याला काय आवडतं हे तो पाहतो, आणि आपल्याला अचानक पकडण्यासाठी तो पाश टाकतो. आपण जरी त्यात अडकलो तरी आपण त्यातून सुटू शकतो असं बायबल आपल्याला सांगतं. पण मुळात अशा पाशांमध्ये आपण अडकूच नये म्हणून आपण काय करू शकतो हेसुद्धा बायबल आपल्याला शिकवतं.

सैतानाने अनेकांना गर्वाच्या आणि लोभाच्या पाशांत अडकवलं आहे (परिच्छेद २ पाहा) *

२. सैतान कोणत्या दोन पाशांचा उपयोग करून लोकांना फसवतो?

गर्व  आणि लोभ  * या दोन पाशांचा उपयोग करून सैतान अनेकांना फसवतो. हजारो वर्षांपासून तो यांचा उपयोग करत आला आहे. पक्ष्यांना पकडण्यासाठी शिकारी जसा सापळा लावतो किंवा जाळं पसरवतो, तसंच सैतानसुद्धा करतो. (स्तो. ९१:३) पण आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण आपल्याला पकडण्यासाठी सैतान कोणते पाश किंवा युक्त्या वापरतो हे यहोवाने आपल्याला आधीच सांगितलं आहे.—२ करिंथ. २:११.

बायबलमध्ये दिलेल्या उदाहरणांतून आपल्याला शिकायला मिळतं, की आपण कशा प्रकारे सैतानाच्या पाशांपासून दूर राहू शकतो किंवा त्यांतून स्वतःची सुटका करू शकतो (परिच्छेद ३ पाहा) *

३. बायबलमध्ये सैतानाच्या पाशांत अडकलेल्या लोकांची उदाहरणं का दिली आहेत?

बायबलमध्ये अशा काही लोकांची उदाहरणं दिली आहेत जे गर्वाच्या आणि लोभाच्या पाशांत अडकले होते. त्यांच्यापैकी काही जण तर अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत होते. मग याचा अर्थ असा होतो का की सैतानाच्या या पाशांपासून स्वतःला वाचवणं अशक्य आहे? नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. तर “आपल्याला इशारा देण्यासाठी” यहोवाने ही उदाहरणं बायबलमध्ये दिली आहेत. (१ करिंथ. १०:११) कारण यहोवाला माहीत आहे, की या उदाहरणांतून आपण बरेच धडे घेऊ शकतो आणि स्वतःला सैतानाच्या पाशांपासून वाचवू शकतो.

सैतानाचा एक पाश—गर्व

परिच्छेद ४ पाहा

४. गर्वामुळे काय होऊ शकतं?

आपण गर्विष्ठ असावं असं सैतानाला वाटतं. कारण त्याला माहीत आहे, की आपण गर्विष्ठ झालो तर आपण त्याच्यासारखे होऊ आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा गमावून बसू. (नीति. १६:१८) म्हणूनच प्रेषित पौलने म्हटलं, की जो गर्वाने फुगतो तो “सैतानाला देण्यात आलेला न्यायदंड स्वतःवर ओढवून” घेतो. (१ तीम. ३:६, ७) आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत असं होऊ शकतं. मग आपण सत्यात नवीन असो किंवा बऱ्‍याच वर्षांपासून.

५. समस्या येते तेव्हा एक गर्विष्ठ व्यक्‍ती काय करते? (उपदेशक ७:१६, २०)

गर्विष्ठ लोक स्वार्थी असतात. सैतानाला वाटतं, की आपणसुद्धा स्वार्थी बनावं, म्हणजे यहोवापेक्षा जास्त स्वतःचा विचार करावा; खासकरून आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा. जसं की, आपल्यावर खोटा आरोप लावला जातो किंवा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण यहोवाला किंवा त्याच्या संघटनेला दोष द्यावा असं सैतानाला वाटतं. तसंच, आपली समस्या सोडवण्यासाठी आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचा नाही, तर स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा असंही त्याला वाटतं.—उपदेशक ७:१६, २० वाचा.

६. एका बहिणीच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळालं?

नेदरलँड्‌समध्ये राहणाऱ्‍या एका बहिणीचा अनुभव आपण पाहू या. तिच्या मंडळीतल्या काही भाऊबहिणींच्या चुकांमुळे तिला खूप राग यायचा. आपण हे आणखी सहन करू शकत नाही असं तिला वाटायचं. ती म्हणते, “त्यांना माफ करणं मला कठीण जात होतं. त्यामुळे मला खूप एकटं वाटत होतं. मी माझ्या पतीला सांगितलं, की ‘आपण दुसऱ्‍या मंडळीत जाऊ.’” पण मग त्या बहिणीने मार्च २०१६ चं ब्रॉडकास्ट पाहिलं. इतर जण चुका करतात तेव्हा आपण त्यांच्यांशी कसं वागलं पाहिजे याबद्दल त्यात काही चांगले सल्ले दिले होते. ती म्हणते, “माझ्या लक्षात आलं, की इतरांनी बदलावं अशी अपेक्षा करण्याऐवजी आपण नम्र होऊन स्वतःच्या चुकांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या ब्रॉडकास्टमुळे मला यहोवासारखा विचार करायला, आणि योग्य काय, अयोग्य काय हे सांगायचा अधिकार त्याला आहे हे ओळखायला मदत झाली.” या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळालं? हेच की, समस्या येतात तेव्हा त्या सोडवण्यासाठी आपण यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं पाहिजे आणि इतरांकडे यहोवाच्या नजरेतून पाहिलं पाहिजे. यहोवाला त्यांच्या चुका दिसतात, तरी तो त्यांना मोठ्या मनाने माफ करतो. आपणसुद्धा तेच करावं असं त्याला वाटतं.—१ योहा. ४:२०.

परिच्छेद ७ पाहा

७. उज्जीया राजाच्या बाबतीत काय घडलं?

यहूदाचा राजा उज्जीया याने बऱ्‍याच चांगल्या गोष्टी केल्या होत्या. त्याने अनेक युद्धं जिंकली, मोठमोठी शहरं बांधली, आणि शेतीच्या कामांत बरेच बदल घडवून आणले. आणि “खऱ्‍या देवाच्या आशीर्वादाने त्याची भरभराट झाली.” (२ इति. २६:३-७, १०) पण बायबल म्हणतं की, “शक्‍तिशाली झाल्यावर त्याचं मन गर्वाने फुगलं आणि हेच त्याच्या नाशाचं कारण ठरलं.” मंदिरात फक्‍त याजक धूप जाळू शकतात हे आधीच यहोवाने सांगितलं होतं. पण उज्जीया राजा अधिकार नसताना मंदिरात धूप जाळण्यासाठी गेला. याजकांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याने काही त्यांचं ऐकलं नाही. ही गोष्ट यहोवाला आवडली नाही आणि त्याने त्याला शिक्षा दिली. तो कुष्ठरोगी झाला आणि मरेपर्यंत तसाच राहिला.—२ इति. २६:१६-२१.

८. १ करिंथकर ४:६, ७ ही वचनं आपल्याला गर्विष्ठपणा टाळायला कशी मदत करतात?

उज्जीया राजाप्रमाणे आपल्यामध्येही गर्व येऊ शकतो का? आणि त्याच्याप्रमाणेच आपल्याकडूनही चुकीच्या गोष्टी होऊ शकतात का? होसे नावाच्या भावाच्या बाबतीत काय घडलं त्याकडे लक्ष द्या. त्याचा खूप मोठा बिझनेस होता. आणि मंडळीत तो वडीलसुद्धा होता. तो संमेलनांमध्ये, अधिवेशनांमध्ये भाषणं द्यायचा. आणि बरेच विभागीय पर्यवेक्षक त्याचा सल्ला घ्यायचे. पण नंतर त्याने एक गंभीर पाप केलं आणि मंडळीतून त्याला बहिष्कृत करण्यात आलं. आता मंडळीत पुन्हा येऊन त्याला बरीच वर्षं झाली. तो म्हणतो, “त्या वेळी मी यहोवाऐवजी स्वतःच्या अनुभवावर आणि क्षमतांवर अवलंबून होतो. मी विश्‍वासात खूप मजबूत आहे असं मला वाटायचं. त्यामुळे मी यहोवाकडून मिळणाऱ्‍या इशाऱ्‍यांकडे आणि कडक सल्ल्यांकडे लक्ष दिलं नाही. पण यहोवाने मला एक मोलाचा धडा शिकवला. ती म्हणजे, मंडळीत मानाचं स्थान असणं महत्त्वाचं नाही, तर यहोवा जे सांगतो ते करणं जास्त महत्त्वाचं आहे.” या अनुभवातून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपल्याकडे ज्या क्षमता आहेत आणि मंडळीत ज्या जबाबदाऱ्‍या आपल्याला मिळतात त्या यहोवानेच दिलेल्या आहेत. (१ करिंथकर ४:६, ७ वाचा.) आपण गर्विष्ठ बनलो तर यहोवा त्याच्या कामात आपला कधीच उपयोग करणार नाही.

सैतानाचा दुसरा पाश—लोभ

परिच्छेद ९ पाहा

९. सैतानाने आणि हव्वाने लोभामुळे काय केलं?

लोभ हा शब्द ऐकताच सहसा सैतानाचं वाईट उदाहरण आपल्या लक्षात येतं. सुरुवातीला तो यहोवाचा एक स्वर्गदूत होता आणि त्याच्याकडे बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या होत्या. पण त्यात तो समाधानी नव्हता. सगळ्यांनी यहोवाची उपासना करण्याऐवजी आपली उपासना करावी असं सैतानाला वाटत होतं. आपणसुद्धा त्याच्यासारखंच व्हावं, म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी असू नये असं त्याला वाटतं. ही गोष्ट त्याने सर्वात आधी हव्वाच्या बाबतीत केली. यहोवाने आदाम आणि हव्वाला सगळं काही दिलं होतं. त्यांना खाण्यापिण्याची कसलीच कमी नव्हती. फक्‍त एका झाडाचं फळ सोडून, ते ‘बागेतल्या सगळ्या झाडांची फळं पोटभर खाऊ शकत होते.’ (उत्प. २:१६) पण तरी मना केलेल्या झाडाचं फळ खाल्ल्यामुळे हव्वाला आणखी बरेच फायदे मिळतील असा सैतानाने तिला विचार करायला लावला. आपल्याकडे आहे त्यात हव्वा समाधानी नव्हती. तिला आणखी जास्त पाहिजे होतं. पुढे तिने काय केलं ते आपल्याला माहीतच आहे. तिने पाप केलं आणि शेवटी तिचा मृत्यू झाला.—उत्प. ३:६, १९.

परिच्छेद १० पाहा

१०. दावीद राजा लोभाच्या पाशात कसा अडकला?

१० यहोवाने दावीद राजाला भरपूर धनसंपत्ती दिली होती, मानाचं पद दिलं होतं आणि त्याच्या अनेक शत्रूंवर विजय मिळवून दिला होता. त्याबद्दल दावीद म्हणाला, की यहोवाने त्याला इतके आशीर्वाद दिले, की तो त्यांचं वर्णनसुद्धा करू शकत नाही. (स्तो. ४०:५) पण अशी एक वेळ आली की यहोवाने आपल्याला काय-काय दिलं आहे हे सगळं तो विसरून गेला. तो आहे त्यात समाधानी नव्हता, त्याला आणखी पाहिजे होतं. त्याला अनेक बायका होत्या. पण तरीसुद्धा त्याने दुसऱ्‍या माणसाच्या बायकोबद्दल मनात चुकीच्या इच्छा आणल्या. ती स्त्री उरीया हित्तीची बायको बथशेबा होती. त्याने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने उरीयाला मारून टाकण्याचा कटही रचला. (२ शमु. ११:२-१५) दावीद बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत होता. पण तरीसुद्धा त्याने लोभीपणा दाखवला आणि स्वतःवर बरीच दुःखं ओढवून घेतली. नंतर दावीदने आपली चूक कबूल केली आणि पश्‍चात्ताप केला. आणि यहोवाने त्याला माफ केलं. याबद्दल त्याने त्याचे खूप आभार मानले.—२ शमु. १२:७-१३.

११. इफिसकर ५:३, ४ हे वचन आपल्याला लोभापासून दूर राहायला कसं मदत करतं?

११ दावीदच्या उदाहरणातून आपण कोणता धडा घेऊ शकतो? हाच की, यहोवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल आपण नेहमी त्याचे आभार मानले पाहिजेत आणि आहे त्यात समाधानी असलं पाहिजे. तरच आपण लोभापासून दूर राहू शकतो. (इफिसकर ५:३, ४ वाचा.) एका नवीन बायबल विद्यार्थ्याला असं प्रोत्साहन दिलं जातं, की त्याने दररोज एका गोष्टीसाठी यहोवाचे आभार मानावेत. असं केल्यामुळे तो आठवड्याभरात सात वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याचे आभार मानतो. (१ थेस्सलनी. ५:१८) तुम्हीसुद्धा हे करता का? यहोवाने जे काही तुमच्यासाठी केलं आहे त्यावर तुम्ही मनन केलं, तर तुम्ही नेहमी त्याचे आभार मानाल. तुम्ही त्याचे आभार मानले, तर तुम्ही आहे त्यात समाधानी राहाल. आणि समाधानी राहिलात, तर तुम्ही लोभापासून दूर राहाल.

परिच्छेद १२ पाहा

१२. लोभामुळे यहूदा इस्कर्योतने काय केलं?

१२ यहूदा इस्कर्योतसुद्धा लोभी बनला. त्यामुळे त्याने एक खूप वाईट गोष्ट केली. त्याने येशूचा विश्‍वासघात केला. पण तो सुरुवातीपासूनच वाईट होता असं नाही. (लूक ६:१३, १६) येशूने त्याला आपला प्रेषित म्हणून निवडलं होतं. तो हुशार आणि भरवशालायक होता. म्हणूनच येशूने त्याच्याकडे पैशांचा डबा सांभाळायला दिला होता. येशू आणि त्याचे शिष्य या पैशांचा वापर प्रचारकार्यासाठी करायचे. आज जसं आपण जगभरात केल्या जाणाऱ्‍या कामासाठी दान देतो त्याच्यासारखंच ते होतं. पण काही काळानंतर यहूदा त्या डब्यातले पैसे चोरू लागला. लोभापासून दूर राहायला येशू वारंवार लोकांना सांगायचा. हे यहूदाने ऐकलं होतं, पण तरीसुद्धा त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं.—मार्क ७:२२, २३; लूक ११:३९; १२:१५.

१३. यहूदाची लोभी वृत्ती कधी दिसून आली?

१३ एकदा येशू आणि त्याचे शिष्य शिमोनच्या घरी जेवायला गेले होते. शिमोन हा आधी एक कुष्ठरोगी होता. त्या दिवशी शिमोनच्या घरी मरीया आणि मार्था या दोन बहिणीसुद्धा होत्या. सगळे जेवत असताना मरीया उठली आणि तिने येशूच्या डोक्यावर सुंगधी तेल ओतलं. ते तेल खूप मौल्यवान आणि महाग होतं. मरीयाने जे केलं ते पाहून यहूदाला आणि इतर शिष्यांना खूप राग आला. इतर शिष्यांना कदाचित असं वाटलं असेल, की ते तेल विकून जे पैसे मिळाले असते त्यांचा उपयोग प्रचाराच्या कामासाठी केला जाऊ शकला असता. पण यहूदाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. खरंतर “तो चोर होता.” आणि पैशांच्या डब्यातून त्याला ते पैसे चोरायचे होते. पुढे या लोभामुळे यहूदाने फक्‍त काही पैशांसाठी येशूचा विश्‍वासघात केला.—योहा. १२:२-६; मत्त. २६:६-१६; लूक २२:३-६.

१४. एका जोडप्याने लूक १६:१३ यात दिलेला सल्ला कसा लागू केला?

१४ येशूने आपल्या शिष्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” (लूक १६:१३ वाचा.) हे किती खरं आहे! रुमानियामध्ये राहणाऱ्‍या एका जोडप्याने येशूने दिलेला हा सल्ला कसा लागू केला याकडे लक्ष द्या. त्यांना एका श्रीमंत देशात, काही काळासाठी नोकरी करण्याची संधी चालून आली होती. ते म्हणतात, “आमच्यावर खूप मोठं कर्ज होतं. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं, की ही नोकरी यहोवाकडूनच आहे.” पण एक समस्या होती. त्यांनी जर ही नोकरी घेतली असती तर त्यांना यहोवाच्या सेवेसाठी वेळ देता आला नसता. त्यांना १५ ऑगस्ट २००८ च्या टेहळणी बुरूज अंकात एक लेख सापडला. त्या लेखाचं शीर्षक होतं, “एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्‍ती करत राहा.” तो लेख वाचल्यानंतर त्यांनी ठरवलं, की ते ती नोकरी घेणार नाहीत. ते म्हणतात, “जर आम्ही फक्‍त जास्त पैसे कमवण्यासाठी दुसऱ्‍या देशात गेलो असतो, तर यहोवासोबतच्या आमच्या नात्याला आम्ही सगळ्यात जास्त महत्त्व देऊ शकलो नसतो. यहोवाची सेवा करणं आम्हाला खूप कठीण गेलं असतं हे आम्हाला माहीत होतं.” मग पुढे काय झालं? त्या पतीला त्याच्याच देशात अशी एक नोकरी मिळाली, ज्यामुळे तो आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकला आणि कर्जही फेडू शकला. याबद्दल त्याच्या पत्नीने म्हटलं, “यहोवा नेहमी आपल्या सेवकांना मदत करतो.” त्या जोडप्याला याचा आनंद आहे की त्यांनी पैशाला नाही, तर यहोवाला आपला ‘मालक’ मानलं.

सैतानाच्या पाशांपासून दूर राहा

१५. सैतानाच्या पाशातून स्वतःची सुटका करणं शक्य आहे असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

१५ आपण कधी गर्वाच्या किंवा लोभाच्या पाशात अडकलो तर काय? आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण त्यातून आपण सुटू शकतो. पौलने म्हटलं, की सैतानाने ज्यांना “जिवंत धरलं आहे” तेसुद्धा त्याच्या पाशातून सुटू शकतात. (२ तीम. २:२६) दावीदने काय केलं त्याचा विचार करा. नाथानने दिलेला कडक सल्ला त्याने ऐकला आणि पुन्हा यहोवासोबत चांगलं नातं जोडलं. हे कधीही विसरू नका, की यहोवा सैतानापेक्षा खूप शक्‍तिशाली आहे. त्यामुळे यहोवाने दिलेली मदत आपण स्वीकारली, तर सैतानाच्या कोणत्याही पाशातून आपण स्वतःची सुटका करू शकतो.

१६. सैतानाच्या पाशांपासून दूर राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१६ हे खरं आहे की सैतानाच्या पाशांतून आपण स्वतःची सुटका करू शकतो. पण त्यात न अडकलेलच बरं. आणि हे यहोवाच्या मदतीनेच शक्य आहे. पण आपण असा कधीच विचार करू नये की, ‘मी आध्यात्मिक रितीने खूप मजबूत आहे. माझ्यात गर्वाची किंवा लोभाची भावना कधीच येणार नाही.’ ही भावना, अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या लोकांमध्येसुद्धा आली आहे. त्यामुळे दररोज यहोवाला प्रार्थना करा. आणि असे वाईट गुण आपल्यात आले तर नाही ना, हे ओळखण्यासाठी त्याला मदत मागा. (स्तो. १३९:२३, २४) सैतानाच्या या पाशांपासून दूर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.

१७. लवकरच सैतानाचं काय होईल?

१७ हजारो वर्षांपासून सैतान एका शिकाऱ्‍याप्रमाणे लोकांना आपल्या पाशांत अडकवत आहे. पण लवकरच त्याला बांधलं जाईल आणि शेवटी त्याचा नाश केला जाईल. (प्रकटी. २०:१-३, १०) त्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. तोपर्यंत सैतानाच्या पाशांपासून दूर राहा. गर्वाची आणि लोभाची भावना आपल्यात येऊ देऊ नका. सैतानाचा विरोध करायचा पक्का निश्‍चय करा, म्हणजे “तो तुमच्यापासून दूर पळेल.”—याको. ४:७.

गीत २९ खरेपणाने चालणे

^ परि. 5 सैतान हा एका चलाख शिकाऱ्‍यासारखा आहे. आपण कितीही वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी तो आपल्याला पाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो. देवासोबतचं आपलं नातं तोडण्यासाठी सैतान गर्वाचा आणि लोभाचा कसा वापर करतो हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, या पाशांत अडकलेल्या काही लोकांची उदाहरणंही आपण पाहू या. आणि आपण त्या पाशांत अडकू नये म्हणून आपण काय करू शकतो याचीसुद्धा आपण चर्चा करू या.

^ परि. 2 शब्दांचा अर्थ: या लेखात गर्व हा शब्द स्वतःला इतरांपेक्षा जास्त महत्त्व देणं या अर्थाने वापरला आहे. आणि लोभ हा शब्द पैशांची, सत्तेची, लैंगिक संबंधांची किंवा अशा इतर गोष्टींची खूप जास्त हाव असणं या अर्थाने वापरला आहे.

^ परि. 53 चित्रांचं वर्णन: दोन भाऊ एका भावाला चांगला सल्ला देत आहेत. पण गर्वामुळे तो त्यांचा सल्ला स्वीकारत नाही. एका बहिणीने बरीच खरेदी केली आहे, पण तरीसुद्धा तिचं मन भरलेलं नाही.

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: देवाचा एक स्वर्गदूत आणि उज्जीया राजा गर्विष्ठ बनले. मनात लोभ असल्यामुळे हव्वाने मना केलेलं फळ खाल्लं, दावीदने बथशेबासोबत व्यभिचार केला आणि यहूदा पैसे चोरू लागला.