व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २९:

स्वतःच्या प्रगतीत आनंद माना!

स्वतःच्या प्रगतीत आनंद माना!

प्रत्येकाला दुसऱ्‍या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या कामांमुळे आनंद मिळेल.—गलती. ६:४.

गीत २९ खरेपणाने चालणे

सारांश *

१. यहोवा एकमेकांसोबत आपली तुलना का करत नाही?

यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये सगळं काही एकसारखं नाही. जसं की, त्याने वेगवेगळ्या प्रकारची झाडं-झुडपं बनवली, प्राणी बनवले. इतकंच काय, तर आपण मानवसुद्धा एकमेकांपासून फार वेगळे आहोत. आणि म्हणूनच तो कोणासोबतही आपली तुलना करत नाही. तो आपलं मन पाहतो. आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे तो पाहतो. (१ शमु. १६:७) आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, आणि आपण कोणत्या परिस्थितीत वाढलो हे सगळं त्याला माहीत आहे. त्यामुळे आपण जे करू शकत नाही ते तो आपल्याला करायला सांगत नाही. यहोवा जसं आपल्याला पाहतो तसंच आपण स्वतःला पाहिलं पाहिजे. मग आपण स्वतःबद्दल योग्य विचार करू; म्हणजे आपण स्वतःला खूप जास्तही समजणार नाही आणि खूप कमीही समजणार नाही.—रोम. १२:३.

२. इतरांसोबत स्वतःची तुलना करणं चांगलं का नाही?

आपण इतरांकडून बरंच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, एखादा भाऊ किंवा बहीण खूप चांगलं प्रचारकार्य करत असेल, तर त्यांच्याकडे पाहून आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. (इब्री १३:७; फिलिप्पै. ३:१७) पण एखाद्याचं अनुकरण करणं आणि त्याच्यासोबत स्वतःची तुलना करणं यात खूप फरक आहे. तुलना केल्यामुळे आपल्या मनामध्ये ईर्ष्येची भावना येऊ शकते, आपण निराश होऊ शकतो किंवा मग स्वतःला खूप कमी समजू शकतो. इतकंच नाही, तर आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा केल्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच, यहोवा प्रेमाने आपल्याला म्हणतो, “प्रत्येकाने आपापल्या कामाचं परीक्षण करावं, म्हणजे मग दुसऱ्‍या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या कामांमुळे त्याला आनंदी होता होईल.”—गलती. ६:४.

३. तुम्ही अशी कोणती प्रगती केली आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो?

यहोवाच्या सेवेत आपण स्वतः जी प्रगती केली आहे त्यात आपण आनंद मानावा असं यहोवाला वाटतं. जसं की, तुमचा जर बाप्तिस्मा झाला असेल, तर तुम्ही ते ध्येय गाठलं याचा तुम्हाला आनंद झाला पाहिजे. तो तुमचा स्वतःचा निर्णय होता. यहोवावर तुमचं  प्रेम असल्यामुळे तुम्ही तो घेतला. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही किती प्रगती केली याचा विचार करा. बायबल वाचनाची आणि अभ्यासाची तुमची गोडी आणखी वाढली आहे का? तुमच्या प्रार्थना आधीपेक्षा जास्त चांगल्या झाल्या आहेत का? (स्तो. १४१:२) प्रचार करताना लोकांशी बोलण्यात आणि सेवेची साधनं वापरण्यात तुम्ही आणखी कुशल झाला आहात का? तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला मुलंबाळं असतील तर यहोवाच्या मदतीने तुम्ही पहिल्यापेक्षा चांगले पती, पत्नी किंवा आईवडील बनला आहात का? या सगळ्या बाबतींत तुम्ही प्रगती केली असेल, तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.

४. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

आपण इतरांनाही स्वतःच्या प्रगतीत आनंद मानायला मदत करू शकतो. तसंच, इतरांसोबत स्वतःची तुलना करणं चांगलं का नाही हे समजायलाही आपण त्यांना मदत करू शकतो. या बाबतीत आईवडील आपल्या मुलांना, पती-पत्नी एकमेकांना आणि मंडळीतले वडील आणि इतर जण आपल्या भाऊबहिणींना कशी मदत करू शकतात हे या लेखात आपण पाहणार आहोत. शेवटी, आपण बायबलमधली अशी काही वचनं पाहू ज्यांमुळे प्रत्येकाला आपल्या क्षमतेप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवायला मदत होईल.

आईवडील आणि पती-पत्नी कशी मदत करू शकतात?

आईवडिलांनो, आपल्या प्रत्येक मुलाच्या मेहनतीचं कौतुक करा (परिच्छेद ५-६ पाहा) *

५. इफिसकर ६:४ यात सांगितल्याप्रमाणे आईवडिलांनी कोणती गोष्ट करू नये?

आईवडिलांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. किंवा आपलं मूल जितकं करू शकतं त्यापेक्षा जास्त त्याच्याकडून अपेक्षा करू नये. कारण अशाने मुलं निराश होऊ शकतात. (इफिसकर ६:४ वाचा.) संचिता * नावाची एक बहीण म्हणते, “माझ्या शिक्षकांची अशी अपेक्षा होती, की मी शाळेतल्या इतर मुलांपेक्षा अभ्यासात नेहमी पुढं असलं पाहिजे. आणि माझ्या आईचीसुद्धा तीच अपेक्षा होती. कारण तिला असं वाटत होतं, की यामुळे माझ्या शिक्षकांना आणि सत्यात नसलेल्या माझ्या बाबांना चांगली साक्ष मिळेल. तिला तर असंही वाटायचं, की परीक्षेत मी १०० टक्के मिळवले पाहिजेत. पण माझ्यासाठी ते अशक्य होतं. आता शाळा सोडून बरीच वर्षं झाली आहेत. पण तरीसुद्धा, यहोवासाठी मी जी काही मेहनत घेते त्यामुळे तो खूश होत असेल का, असा प्रश्‍न काही वेळा मला पडतो.”

६. स्तोत्र १३१:१, २ या वचनांतून आईवडील काय शिकू शकतात?

स्तोत्र १३१:१, २ वाचा. या वचनांतून आईवडील एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतात. त्यांत दावीद म्हणतो, “मोठमोठ्या गोष्टी करण्याची; किंवा माझ्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी करण्याची, मी इच्छा बाळगत नाही.” दावीद नम्र होता. आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही याची त्याला जाणीव होती. या जाणिवेमुळे त्याचं मन शांत आणि स्थिर झालं. दावीदच्या या शब्दांतून आईवडील काय शिकू शकतात? हेच, की त्यांनी नम्र असलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःकडून आणि आपल्या मुलांकडूनसुद्धा जास्तीची अपेक्षा ठेवू नये. आपली मुलं काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत, हे लक्षात घेऊन आईवडिलांनी त्यांना ध्येयं ठेवायला मदत केली पाहिजे. त्यामुळे मुलं ती ध्येयं गाठू शकतील आणि त्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटणार नाही. मरीना नावाची एक बहीण म्हणते, “आईने कधीच माझी तुलना माझ्या भावंडांशी किंवा इतर मुलांशी केली नाही. तिने मला शिकवलं, की प्रत्येकामध्ये काही ना काही करण्याची क्षमता असते आणि प्रत्येक जण यहोवासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी सहसा इतरांसोबत स्वतःची तुलना करत नाही.”

७-८. एक पती आपल्या पत्नीला मान कसा देतो?

एका ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीला मान दिला पाहिजे. (१ पेत्र ३:७) तिला वेळ देऊन, तिची काळजी घेऊन आणि तिचा आदर करून तो हे करू शकतो. ती जे करू शकत नाही ते तिने करावं अशी अपेक्षा तो ठेवत नाही. इतर स्त्रियांसोबत तो तिची तुलना करत नाही. नाहीतर काय होऊ शकतं यासाठी रोझा नावाच्या एका बहिणीच्या अनुभवाकडे लक्ष द्या. तिचा पती सत्यात नाही आणि तो सारखा इतर स्त्रियांसोबत तिची तुलना करतो. तो तिला इतकं घालूनपाडून बोलतो, की आपण काहीच कामाचे नाही असं रोझाला वाटतं. “त्यामुळे मला सतत स्वतःला याची आठवण करून द्यावी लागते, की यहोवाचं माझ्यावर खूप प्रेम आहे,” असं ती म्हणते. पण एक ख्रिस्ती पती कधीच असा वागत नाही. तो आपल्या पत्नीला मान देतो. कारण यामुळे तिच्यासोबतचं आणि यहोवासोबतचं आपलं नातं आणखी चांगलं होईल हे त्याला माहीत असतं. *

एक ख्रिस्ती पती नेहमी आपल्या पत्नीबद्दल चांगलं बोलतो. तसंच, त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि त्याच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे हे तो तिला सांगतो. (नीति. ३१:२८) कॅथी नावाच्या ज्या बहिणीबद्दल आपण आधीच्या लेखात पाहिलं होतं, तिचा पतीसुद्धा हेच करतो. त्यामुळे तिच्यातली कमीपणाची भावना दूर करायला तिला मदत झाली. ती लहान असताना तिची आई सतत तिच्या चुका काढायची आणि इतर मुलींसोबत, अगदी तिच्या स्वतःच्या मैत्रिणींसोबतसुद्धा तिची तुलना करायची. त्यामुळे सत्यात आल्यावरही ती इतरांबरोबर स्वतःची तुलना करायची. पण असं करणं किती चुकीचं आहे हे तिच्या पतीने तिच्या लक्षात आणून दिलं. आणि स्वतःबद्दल चांगला विचार करायला त्याने तिला मदत केली. ती म्हणते, “ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मी काही चांगलं केलं तर माझं कौतुक करतात. आणि माझ्यासाठी प्रार्थना करतात. इतकंच नाही, तर यहोवाच्या चांगल्या गुणांबद्दल सांगून ते माझे चुकीचे विचार बदलायला मला मदत करतात.”

मंडळीतले वडील आणि इतर जण कशी मदत करू शकतात?

९-१०. (क) हेमाक्षीला स्वतःबद्दल कसं वाटायचं? (ख) मंडळीतल्या वडिलांनी तिला कशी मदत केली?

जे भाऊबहीण इतरांसोबत स्वतःची तुलना करतात अशांना मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात? हेमाक्षी नावाच्या बहिणीचा विचार करा. ती लहान असताना कधीच कुणी तिचं कौतुक केलं नाही. ती म्हणते, “मी खूप लाजाळू होते. आणि इतर मुलं माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत असं मला वाटायचं. त्यामुळे लहानपणापासूनच मी इतरांसोबत स्वतःची तुलना करू लागले.” पुढे सत्यात आल्यानंतरसुद्धा ती असंच करायची. त्यामुळे मंडळीत आपल्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही असं तिला वाटायचं. पण आज मात्र ती आनंदाने पायनियरिंग करत आहे. तिच्यात हा मोठा बदल कसा घडून आला?

१० मंडळीतल्या वडिलांनी प्रेमळपणे तिची मदत केली. ती करत असलेल्या सेवेबद्दल त्यांनी तिचं कौतुक केलं. आणि मंडळीसाठी ती किती महत्त्वाची आहे हे त्यांनी तिला सांगितलं. हेमाक्षी म्हणते, “कधीकधी ते मला काही बहिणींना प्रोत्साहन द्यायलाही सांगायचे. त्यामुळे मंडळीसाठी आपणसुद्धा काहीतरी करू शकतो, असं मला वाटलं. एकदा मी काही तरुण बहिणींना प्रोत्साहन दिलं तेव्हा मंडळीतल्या वडिलांनी माझे किती आभार मानले होते हे मला आठवतं. त्यांनी माझ्यासोबत १ थेस्सलनीकाकर १:२, ३ हे वचन वाचलं. त्यामुळे मला खूप आनंद झाला. अशा प्रेमळ वडिलांमुळेच मंडळीसाठी मी किती महत्त्वाची आहे याची मला जाणीव झाली.”

११. यशया ५७:१५ मध्ये सांगितलेल्या “दुःखी आणि खचून” गेलेल्यांना आपण कशी मदत करू शकतो?

११ यशया ५७:१५ वाचा. यहोवा “दुःखी आणि खचून” गेलेल्यांची खूप काळजी घेतो. अशा भाऊबहिणींना फक्‍त मंडळीतल्या वडिलांनीच नाही, तर आपण सगळ्यांनी धीर दिला पाहिजे. त्यासाठी आपल्या वागण्याबोलण्यातून आपण हे दाखवलं पाहिजे, की आपल्याला त्यांची खूप काळजी आहे. यहोवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची आपण त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. (नीति. १९:१७) तसंच, आपण नेहमी नम्र असलं पाहिजे. आपण स्वतःच्या क्षमतांची बढाई मारू नये, इतरांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करू नये. नाहीतर आपण त्यांच्यामध्ये ईर्ष्येची भावना निर्माण करू. उलट आपण आपल्या क्षमतांचा आणि ज्ञानाचा उपयोग एकमेकांना धीर देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी केला पाहिजे.—१ पेत्र ४:१०, ११.

येशूच्या शिष्यांना त्याच्याकडे यायला कधीच संकोच वाटला नाही. कारण त्याने कधीच असं दाखवलं नाही, की आपण इतरांपेक्षा चांगले आहोत. उलट, त्यांच्यासोबत वेळ घालवायला त्याला आवडायचं (परिच्छेद १२ पाहा)

१२. सामान्य लोक येशूकडे का यायचे? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१२ येशू ज्याप्रमाणे आपल्या शिष्यांशी वागला त्यावरून इतरांशी कसं वागायचं हे आपण शिकतो. येशू हा पृथ्वीवर होऊन गेलेला सगळ्यात महान पुरुष होता. पण तरी तो “प्रेमळ आणि नम्र” होता. (मत्त. ११:२८-३०) आपण किती बुद्धिमान आहोत आणि आपल्याकडे किती ज्ञान आहे हे त्याने कधीच दाखवलं नाही. उलट त्याने सोपी भाषा आणि रोजच्या जीवनातली उदाहरणं वापरून लोकांना शिकवलं. त्यामुळे तो जे शिकवायचा ते सामान्य लोकांना लगेच कळायचं. (लूक १०:२१) येशूच्या काळातले धर्मगुरू खूप घमेंडी होते. ते लोकांना मुळीच किंमत देत नव्हते. पण येशू त्यांच्यासारखा नव्हता. त्याने लोकांना नेहमी याची जाणीव करून दिली, की यहोवाच्या नजरेत ते खूप मोलाचे आहेत.—योहा. ६:३७.

१३. येशू आपल्या शिष्यांशी कसा वागला?

१३ येशू आपल्या शिष्यांशी नेहमी प्रेमाने आणि समजुतीने वागला. प्रत्येकाची क्षमता आणि परिस्थिती वेगवेगळी आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे ते सगळे एकसारख्या जबाबदाऱ्‍या हाताळू शकत नाहीत किंवा सेवेत एकसारखं काम करू शकत नाहीत याची त्याला जाणीव होती. पण प्रत्येक जण मनापासून जे काही करत होता त्याची त्याने कदर केली. ही गोष्ट त्याने सांगितलेल्या एका उदाहरणातून दिसून येते. त्या उदाहरणातल्या मालकाने आपल्या प्रत्येक दासाला “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” काम सोपवलं. एका दासाने दुसऱ्‍या दासापेक्षा जास्त व्यापार केला. पण मालकाने दोघांच्या मेहनतीची प्रशंसा केली. तो दोघांना, “शाब्बास, चांगल्या आणि विश्‍वासू दासा!” असं म्हणाला.—मत्त. २५:१४-२३.

१४. आपण इतरांशी येशूसारखं कसं वागू शकतो?

१४ येशू आपल्याशीसुद्धा तितक्याच प्रेमाने आणि समजुतीने वागतो. आपल्या प्रत्येकाची क्षमता आणि परिस्थिती वेगळी आहे हे त्याला माहीत आहे. आणि त्यामुळे आपण  मनापासून जे काही करतो त्याची तो खूप कदर करतो. आपणसुद्धा इतरांशी असंच वागलं पाहिजे. एखादा भाऊ किंवा बहीण कदाचित दुसऱ्‍यांइतकी सेवा करत नसेल. पण आपण कधीच त्यांच्याशी असं वागू नये ज्यामुळे त्यांना लाज वाटेल किंवा आपण काहीच करत नाही असं त्यांना वाटेल. उलट यहोवाची सेवा करण्यासाठी ते मनापासून जी काही मेहनत घेतात त्याची आपण प्रशंसा केली पाहिजे.

पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा

पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा. मग तुम्हाला आनंद होईल (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५-१६. पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवल्यामुळे एका बहिणीला कसा फायदा झाला?

१५ यहोवाच्या सेवेत आपण ध्येयं ठेवली तर आपल्या जीवनाला दिशा मिळेल आणि आपण आनंदी राहू. पण त्यासाठी आपल्याला  गाठता येतील अशीच ध्येयं आपण ठेवली पाहिजेत. इतरांनी जी ध्येयं ठेवली तीच ध्येयं ठेवायची गरज नाही. नाहीतर आपली निराशा होऊ शकते. (लूक १४:२८) या बाबतीत मिताली नावाच्या एका पायनियर बहिणीच्या उदाहरणाकडे आपण लक्ष देऊ या.

१६ मितालीचे वडील सत्यात नाहीत. ती लहान असताना ते नेहमी असं म्हणायचे, की तिची भावंडं आणि तिच्या वर्गातली इतर मुलं तिच्यापेक्षा खूप चांगली आहेत. “त्यामुळे मला खूप कमीपणा वाटायचा,” असं मिताली म्हणते. पण ती मोठी होत गेली तसतसा ती स्वतःबद्दल चांगला विचार करू लागली. हे कशामुळे शक्य झालं? ती म्हणते, “मी रोज बायबल वाचते. त्यामुळे माझं मन शांत राहतं आणि यहोवाचं माझ्यावर प्रेम आहे याची मला जाणीव होते.” याशिवाय, पूर्ण करता येतील अशी ध्येयं तिने ठेवली आहेत. आणि ती गाठण्यासाठी यहोवाने तिला मदत करावी अशी प्रार्थना ती करते. त्यामुळे यहोवाच्या सेवेत ती जे काही करू शकते त्यात ती आनंदी आहे.

यहोवासाठी तुम्ही  जे करू शकता ते करत राहा

१७. कमीपणाची भावना दूर करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

१७ मनातून कमीपणाची भावना जाण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणून यहोवा म्हणतो, “तुमच्या मनोवृत्तीत सतत  बदल करत राहा, म्हणजे तुमच्यात एक नवीन मनोवृत्ती उत्पन्‍न होईल.” (इफिस. ४:२३, २४) त्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्याची, बायबलचा अभ्यास करण्याची आणि त्यावर मनन करण्याची गरज आहे. म्हणून या गोष्टी करत राहा. यहोवा नक्की तुम्हाला बळ देईल. इतरांसोबत स्वतःची तुलना न करण्यासाठी लागणारी मदत तो त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे तुम्हाला देईल. इतकंच नाही, तर तुमच्या मनात ईर्ष्येची किंवा गर्वाची भावना येत असेल तर ती ओळखायला आणि लगेच काढून टाकायलाही यहोवा तुम्हाला मदत करेल.

१८. २ इतिहास ६:२९, ३० या वचनांतल्या शब्दांमुळे तुम्हाला कसं सांत्वन मिळतं?

१८ २ इतिहास ६:२९, ३० वाचा. यहोवा आपल्या मनातले विचार आणि भावना जाणतो. जगातल्या वाईट प्रभावांचा विरोध करण्यासाठी आणि स्वतःच्या कमतरतांशी लढण्यासाठी आपल्याला किती संघर्ष करावा लागतो हेसुद्धा यहोवाला माहीत आहे. हे पाहून आपल्यावरचं त्याचं प्रेम आणखी वाढतं.

१९. यहोवाला आपल्याबद्दल कसं वाटतं हे उदाहरण देऊन सांगा.

१९ एका आईला आपल्या बाळाबद्दल जसं वाटतं तसंच यहोवाला आपल्याबद्दल वाटतं. (यश. ४९:१५) रेचल नावाची आई काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते, “माझी मुलगी स्टेफनी नऊ महिन्यांच्या आधीच जन्माला आली. मी पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा ती खूपच छोटी आणि नाजूक होती. त्यामुळे महिनाभर तिला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं. पण त्या काळात डॉक्टरांनी मला दररोज तिला जवळ घ्यायची, कुशीत घ्यायची परवानगी दिली होती. त्यामुळे आम्हा मायलेकीमध्ये खूप जवळचं नातं जुळलं. आता ती सहा वर्षांची आहे आणि तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा ती लहानच दिसते. पण तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. कारण जगण्यासाठी ती किती लढली हे मी पाहिलंय. आज तिच्यामुळे मी खूप आनंदी आहे.” अगदी तसंच, यहोवाची मनापासून सेवा करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, किती संघर्ष करतो हे जेव्हा यहोवा पाहतो तेव्हा आपल्यावरही तो या आईइतकंच प्रेम करतो. ही गोष्ट खरंच किती दिलासा देणारी आहे!

२०. कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो?

२० आपण सगळे यहोवाच्या कुटुंबातले सदस्य आहोत. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे असलो तरी आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्यासाठी खूप मोलाचा आहे. आपण इतर लोकांपेक्षा चांगले होतो म्हणून यहोवाने आपल्याला त्याच्याकडे आणलं नाही, तर त्याने आपलं मन पाहिलं. त्याने पाहिलं की आपण नम्र आहोत, त्याच्याकडून शिकायला आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार आहोत, म्हणून त्याने आपल्याला त्याच्याकडे आणलं. (स्तो. २५:९) तुम्ही मनापासून त्याची सेवा करता तेव्हा त्याला खूप आनंद होतो याची तुम्ही खातरी बाळगू शकता. तुम्ही आतापर्यंत जो धीर आणि विश्‍वास दाखवला त्यावरून दिसून येतं, की तुमचं मन चांगलं आणि प्रामाणिक आहे. (लूक ८:१५) त्यामुळे यहोवासाठी तुम्ही  जे काही करू शकता ते करत राहा. मग तुम्हाला “स्वतःच्या कामांमुळे” आनंद मिळेल.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

^ परि. 5 यहोवा कधीच एकमेकांसोबत आपली तुलना करत नाही. पण कधीकधी आपण ती करतो. आणि इतर जण आपल्यापेक्षा किती चांगलं करतात हे पाहून आपल्याला वाईट वाटतं. अशा प्रकारे इतरांसोबत स्वतःची तुलना करणं चांगलं का नाही याची चर्चा या लेखात आपण करू. त्यासोबतच, यहोवा जसा आपल्याला पाहतो तसंच स्वतःकडे पाहायला आपण कुटुंबातल्या आणि मंडळीतल्या लोकांना कशी मदत करू शकतो हेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 5 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 7 हे मुद्दे पतीला लक्षात घेऊन दिलेले असले तरी यांतले बरेच मुद्दे पत्नीलाही लागू होतात.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: कौटुंबिक उपासनेत एक कुटुंब नोहाचं जहाज तयार करत आहे. त्यासाठी प्रत्येक मुलाने जे काही केलं आहे ते पाहून आईवडिलांना खूप आनंद होतो.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: आपल्या लहान मुलाचं एकट्याने संगोपन करणारी एक आई सहायक पायनियरिंग करता येईल का याचा विचार करते. तिला ते शक्य होतं तेव्हा तिला खूप आनंद होतो.