व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३०

यहोवाच्या कुटुंबात असल्याचा अभिमान बाळगा!

यहोवाच्या कुटुंबात असल्याचा अभिमान बाळगा!

“तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस; तू त्याला गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट घातलास.”—स्तो. ८:५.

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

सारांश *

१. यहोवाने इतकं मोठं विश्‍व निर्माण केलं तरी मानवांबद्दल त्याला कसं वाटतं?

यहोवाने निर्माण केलेलं हे विश्‍व इतकं मोठं आहे, की ते पाहून आपल्यालाही स्तोत्र लिहिणाऱ्‍या दावीदप्रमाणे वाटू शकतं. त्याने म्हटलं, “तू आपल्या हातांनी निर्माण केलेलं आकाश आणि तू घडवलेले चंद्र-तारे जेव्हा मी पाहतो, तेव्हा माझ्या मनात विचार येतो, नाशवंत माणूस काय आहे, की तू त्याला आठवणीत ठेवावं आणि मानव काय आहे, की तू त्याची काळजी घ्यावी?” (स्तो. ८:३, ४) दावीदप्रमाणेच आपल्यालाही असं वाटू शकतं, की या विश्‍वाच्या तुलनेत आपण अगदीच लहान आहोत. पण तरीसुद्धा यहोवा आपली खूप काळजी घेतो. आदाम आणि हव्वाच्या बाबतीतही त्याने हेच केलं. पण त्याने त्यांची फक्‍त काळजीच घेतली नाही, तर त्यांना आपल्या कुटुंबाचा भागही बनवलं. ते कसं, ते आता आपण पाहू या.

२. आदाम आणि हव्वाने काय करावं अशी यहोवाची इच्छा होती?

यहोवाचं आपल्या मुलांवर, म्हणजे आदाम आणि हव्वावर खूप प्रेम होतं. त्यांनी मुलांना जन्म द्यावा आणि पृथ्वीची काळजी घ्यावी अशी यहोवाची इच्छा होती. तो त्यांना म्हणाला: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका आणि तिच्यावर अधिकार चालवा.” (उत्प. १:२८) आदाम आणि हव्वाने देवाचं ऐकलं असतं आणि त्याच्या उद्देशाप्रमाणे काम केलं असतं, तर ते आणि त्यांची मुलं कायम यहोवाच्या कुटुंबात राहिले असते.

३. आदाम आणि हव्वा यहोवाच्या कुटुंबातले महत्त्वाचे सदस्य होते असं का म्हणता येईल?

यहोवाने बनवलेल्या पहिल्या मानवाबद्दल दावीदने स्तोत्र ८:५ मध्ये असं म्हटलं, “तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस; तू त्याला गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट घातलास.” हे खरं आहे, की मानवांना स्वर्गदूतांसारखी शक्‍ती, बुद्धी आणि क्षमता दिलेली नाही. (स्तो. १०३:२०) पण मानवांमध्ये आणि स्वर्गदूतांमध्ये फारसा फरक नाही. यहोवाने मानवांना स्वर्गदूतांपेक्षा फक्‍त ‘काहीसं कमी बनवलं आहे.’ हा खरंच किती मोठा सन्मान आहे! यावरून आपल्याला समजतं, की आदाम आणि हव्वा यहोवाच्या कुटुंबातले महत्त्वाचे सदस्य होते. आणि त्याने त्यांना एका सुंदर आयुष्याची सुरुवात करून दिली होती!

४. आदाम आणि हव्वाने यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे काय झालं, आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

 दुःखाची गोष्ट म्हणजे, आदाम आणि हव्वाने यहोवाचं ऐकलं नाही. आणि त्यामुळे ते त्याच्या कुटुंबात राहू शकले नाहीत. आणि याचे भयंकर परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागले. पण मानवांसाठी असलेला यहोवाचा उद्देश बदललेला नाही. मानवांनी त्याचं ऐकावं आणि कायमसाठी त्याची मुलं व्हावं असं त्याला वाटतं. या लेखात आपण हे पाहणार आहोत, की (१) यहोवासाठी आपण खूप महत्त्वाचे आहोत हे त्याने कसं दाखवलं? (२) यहोवाच्या कुटुंबात कायम राहण्यासाठी आपण आता काय केलं पाहिजे? आणि (३) यहोवाच्या कुटुंबातल्या लोकांना भविष्यात कोणकोणते आशीर्वाद मिळतील?

यहोवासाठी आपण महत्त्वाचे आहोत हे कसं दिसून येतं?

यहोवासाठी मानव महत्त्वाचे आहेत हे त्याने कसं दाखवलं? (परिच्छेद ५-११ पाहा) *

५. यहोवाने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवल्यामुळे आपण काय करू शकतो?

यहोवाने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवलं आहे.  (उत्प. १:२६, २७) याचा अर्थ, आपण यहोवासारखे गुण दाखवू शकतो. जसं की, प्रेम, करुणा, विश्‍वासूपणा आणि नीती. (स्तो. ८६:१५; १४५:१७) आपण स्वतःमध्ये हे गुण वाढवतो तेव्हा आपण यहोवाचा गौरव करत असतो आणि त्याचे आभारी आहोत हे दाखवत असतो. (१ पेत्र १:१४-१६) त्यामुळे यहोवाला आनंद होतो आणि आपणही आनंदी राहतो. शिवाय, आपल्यामध्ये यहोवासारखे गुण असल्यामुळे आपण त्याच्या कुटुंबात राहू शकतो.

६. यहोवाने कसं दाखवून दिलं की मानव त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत?

यहोवाने आपल्यासाठी ही सुंदर पृथ्वी बनवली.  मानवांना बनवण्याच्या खूप आधीच यहोवाने त्यांना राहण्यासाठी पृथ्वी बनवली होती. (ईयो. ३८:४-६; यिर्म. १०:१२) त्यांना आनंद मिळावा म्हणून त्याने अनेक चांगल्या गोष्टी बनवल्या. यावरून दिसून येतं, की तो प्रेमळ आणि उदार आहे. (स्तो. १०४:१४, १५, २४) त्यानंतर, आपण बनवलेलं “सर्वकाही खूप चांगलं आहे” असं यहोवाने पाहिलं. (उत्प. १:१०, १२, ३१) आणि मग, या सगळ्या सुंदर गोष्टींवर मानवांना “अधिकार” देऊन त्याने दाखवून दिलं, की ते त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. (स्तो. ८:६) परिपूर्ण मानवांनी या सुंदर सृष्टीची काळजी घ्यावी आणि कायम त्यातून आनंद मिळवावा असं त्याला वाटतं. यासाठी तुम्ही नेहमी त्याचे आभार मानता का?

७. यहोशवा २४:१५ या वचनातून काय दिसून येतं?

यहोवाने आपल्याला स्वतःचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं आहे.  त्यामुळे आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा, हे आपण स्वतः ठरवू शकतो. (यहोशवा २४:१५ वाचा.) आपण जेव्हा यहोवाची उपासना करायची निवड करतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. (स्तो. ८४:११; नीति. २७:११) इतर गोष्टींच्या बाबतीतही चांगले निर्णय घेण्यासाठी आपण यहोवाने दिलेल्या या स्वातंत्र्याचा उपयोग करू शकतो. या बाबतीत येशूने एक चांगलं उदाहरण कसं मांडलं ते आता आपण पाहू.

८. निवड करण्याच्या स्वातंत्र्याचा येशूने कसा उपयोग केला हे उदाहरण देऊन सांगा.

येशूने नेहमी दुसऱ्‍यांचा विचार केला. एकदा तो आणि त्याचे प्रेषित खूप थकले होते. म्हणून थोडा आराम करण्यासाठी ते एका एकांत ठिकाणी गेले. पण त्यांना काही आराम मिळाला नाही. कारण येशूकडून शिकण्यासाठी लोक त्यांच्या आधीच तिथे जाऊन पोचले होते. पण त्यामुळे येशू वैतागला नाही. उलट, त्याला त्या लोकांची खूप दया आली. म्हणून “तो त्यांना बऱ्‍याच  गोष्टी शिकवू लागला.” (मार्क ६:३०-३४) आपणसुद्धा येशूसारखंच इतरांना शिकवण्यासाठी आपला वेळ देतो आणि आपली शक्‍ती खर्च करतो तेव्हा आपण यहोवाचा गौरव करत असतो. (मत्त. ५:१४-१६) आणि आपण दाखवून देतो, की आपल्याला त्याच्या कुटुंबाचा भाग व्हायची इच्छा आहे.

९. यहोवाने मानवांना कोणती खास भेट दिली आहे?

यहोवाने मानवांना, मुलांना जन्म द्यायची क्षमता दिली आहे. तसंच, मुलांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला शिकवायची जबाबदारीही त्याने त्यांना दिली आहे.  हे खरं आहे, की यहोवाने स्वर्गदूतांना अद्‌भुत क्षमता दिल्या आहेत. पण त्यांना, मुलांना जन्म द्यायची क्षमता दिली नाही, ती फक्‍त मानवांना दिली आहे. त्यामुळे आईवडिलांनो, यहोवाकडून मिळालेल्या या खास भेटीची तुम्ही मनापासून कदर करता का? त्यासोबतच, आईवडिलांना एक महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली आहे. ती म्हणजे, मुलांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” वाढवण्याची जबाबदारी. (इफिस. ६:४; अनु. ६:५-७; स्तो. १२७:३) ती पार पाडण्यासाठी, आपल्या संघटनेने आईवडिलांना बायबलवर आधारित बऱ्‍याच गोष्टी दिल्या आहेत. जसं की, प्रकाशनं, व्हिडिओ, संगीत आणि वेबसाईटवरचे लेख. यावरून कळतं, की यहोवाचं आणि येशूचं लहान मुलांवर खूप प्रेम आहे. (लूक १८:१५-१७) मुलांना चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आईवडील यहोवाकडे मदत मागतात तेव्हा त्याला खूप आनंद होतो. अशा प्रकारे आईवडील आपल्या मुलांना यहोवाच्या कुटुंबाचा भाग व्हायला मदत करत असतात.

१०-११. खंडणी बलिदानामुळे मानवांना काय फायदा झाला?

१० मानवांना परत यहोवाच्या कुटुंबात येता यावं, म्हणून त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान दिलं.   परिच्छेद ४ मध्ये आपण पाहिलं होतं, की आदाम आणि हव्वा यहोवाच्या कुटुंबात राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही त्या कुटुंबाचा भाग बनता आलं नाही. (रोम. ५:१२) आदाम आणि हव्वाने जाणूनबुजून पाप केलं होतं. त्यामुळे यहोवाने त्यांना त्याच्या कुटुंबातून काढून टाकलं. पण मग, त्यांच्या मुलांबद्दल काय? यहोवाचं मानवांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे आदाम आणि हव्वाची जी मुलं यहोवाचं ऐकतात त्यांना आपल्या कुटुंबात परत आणण्याची व्यवस्था त्याने केली आहे. त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाचं, येशूचं बलिदान दिलं. (योहा. ३:१६; रोम. ५:१९) या बलिदानामुळेच यहोवा १,४४,००० विश्‍वासू मानवांना आपली मुलं म्हणून दत्तक घेऊ शकला.—रोम. ८:१५-१७; प्रकटी. १४:१.

११ या विश्‍वासू मानवांशिवाय, आज लाखो लोक यहोवाचं ऐकतात आणि विश्‍वासूपणे त्याची सेवा करतात. हजार वर्षांच्या शेवटी, म्हणजे शेवटची परीक्षा झाल्यानंतर ते खऱ्‍या अर्थाने यहोवाच्या कुटुंबाचे सदस्य बनतील. (स्तो. २५:१४; रोम. ८:२०, २१) त्यामुळे ते आजसुद्धा यहोवाला ‘पिता’ म्हणून हाक मारतात. (मत्त. ६:९) तसंच, ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल शिकायची संधी मिळेल. त्यांच्यापैकी जे त्याचं ऐकतील, तेसुद्धा त्याच्या कुटुंबाचे सदस्य बनतील.

१२. आता आपण कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहोत?

१२ आतापर्यंत आपण पाहिलं, की यहोवासाठी मानव किती महत्त्वाचे आहेत हे त्याने अनेक मार्गांनी दाखवलं. त्याने अभिषिक्‍त जनांना त्याची मुलं म्हणून दत्तक घेतलं, आणि ‘मोठ्या लोकसमुदायातल्या’ लोकांना नवीन जगात खऱ्‍या अर्थाने त्याची मुलं होण्याची संधी दिली आहे. (प्रकटी. ७:९) पण आपल्याला कायम यहोवाच्या कुटुंबात राहायचं असेल, तर आता आपण काय केलं पाहिजे? या प्रश्‍नाचं उत्तर आपण पुढे पाहू या.

यहोवाच्या कुटुंबात कायम राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१३. आपल्याला यहोवाच्या कुटुंबात कायम राहायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? (मार्क १२:३०)

१३ पूर्ण मनाने यहोवाची सेवा करून त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवा.  (मार्क १२:३० वाचा.) यहोवाने आपल्याला बऱ्‍याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. त्यांपैकी सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, आपण त्याची उपासना करू शकतो, त्याच्यावर प्रेम करू शकतो. आपण त्याच्या आज्ञांचं पालन करतो तेव्हा आपण दाखवतो, की आपलं त्याच्यावर प्रेम आहे. (१ योहा. ५:३) त्याने दिलेल्या आज्ञांपैकी एक आज्ञा म्हणजे, आपण लोकांना शिष्य बनवावं आणि त्यांना बाप्तिस्मा द्यावा. (मत्त. २८:१९) आणखी एक आज्ञा अशी आहे, की आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. (योहा. १३:३५) जे लोक त्याच्या आज्ञांचं पालन करतात, त्यांना तो आपल्या कुटुंबात राहू देतो.—स्तो. १५:१, २.

१४. आपण इतरांवर कशा प्रकारे प्रेम करू शकतो? (मत्तय ९:३६-३८; रोमकर १२:१०)

१४ इतरांवर प्रेम करा.  प्रेम हा यहोवाचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. (१ योहा. ४:८) आपण त्याला ओळखतसुद्धा नव्हतो तेव्हापासून तो आपल्यावर प्रेम करतो. (१ योहा. ४:९, १०) त्याच्यासारखंच आपणसुद्धा इतरांवर प्रेम केलं पाहिजे. (इफिस. ५:१) याचा एक सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, वेळ आहे तोपर्यंत आपण लोकांना यहोवाबद्दल शिकून घ्यायला मदत केली पाहिजे. (मत्तय ९:३६-३८ वाचा.) त्यामुळे यहोवाच्या कुटुंबाचे सदस्य बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे त्यांना समजेल. आणि त्यांचा बाप्तिस्मा झाल्यानंतरही आपण त्यांच्यावर प्रेम करत राहिलं पाहिजे, त्यांच्याशी आदराने वागलं पाहिजे. (१ योहा. ४:२०, २१) हे आपण कसं करू शकतो? समजा एखाद्या भावाने काहीतरी केलं आणि त्यामुळे आपल्याला वाईट वाटलं. पण त्याने ते का केलं हे आपल्याला समजत नसेल, तर आपण त्याच्यावर शंका घेणार नाही. त्यामागे त्याचे हेतू वाईट होते किंवा त्याचा काही स्वार्थ होता असा आपण विचार करणार नाही. उलट, आपण त्याच्यावर भरवसा ठेवू आणि त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा आदर करू.—रोमकर १२:१० वाचा; फिलिप्पै. २:३.

१५. आपण कुणाशी दयाळूपणे वागलं पाहिजे?

१५ सगळ्यांशी दयाळूपणे वागा.  आपल्याला कायम यहोवाच्या कुटुंबात राहायचं असेल, तर आपण बायबलमध्ये दिलेल्या गोष्टींप्रमाणे वागलं पाहिजे. उदाहरणार्थ, येशूने सांगितलं की आपण सगळ्यांशी, अगदी आपल्या शत्रूंशीसुद्धा दयाळूपणे वागलं पाहिजे. (लूक ६:३२-३६) पण असं करणं काही वेळा आपल्याला अवघड वाटू शकतं. तसं असेल, तर आपण येशूप्रमाणे विचार करायला आणि वागायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण यहोवाच्या आज्ञा पाळायचा आणि येशूप्रमाणे वागायचा पुरेपूर प्रयत्न करतो तेव्हा आपण दाखवून देतो, की आपल्याला यहोवाच्या कुटुंबात कायम राहायचं आहे.

१६. यहोवाच्या कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून आपण काय टाळलं पाहिजे?

१६ यहोवाच्या कुटुंबाची बदनामी होऊ देऊ नका.  सहसा कुटुंबात लहान भाऊ मोठ्या भावासारखा वागायचा प्रयत्न करत असतो. मोठा भाऊ जर बायबलप्रमाणे जीवन जगत असेल, तर सहसा लहान भाऊसुद्धा तेच करतो. पण मोठा भाऊ जर चुकीचं काम करू लागला, तर लहान भाऊही कदाचित तेच करेल. यहोवाच्या कुटुंबातही असंच आहे. एखादा ख्रिस्ती जर धर्मत्यागी बनला, अनैतिक किंवा चुकीची कामं करू लागला, तर त्याला पाहून कदाचित इतर जणही तेच करू लागतील. आणि यामुळे यहोवाच्या कुटुंबाची बदनामी होऊ शकते. (१ थेस्सलनी. ४:३-८) म्हणून आपण चुकीची कामं करणाऱ्‍यांचं अनुकरण करू नये. आणि अशी कुठलीही गोष्ट करू नये ज्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येईल.

१७. आपण कसा विचार करणार नाही, आणि का?

१७ धनसंपत्तीवर नाही, तर यहोवावर भरवसा ठेवा.  आपण जर देवाच्या राज्याला आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान दिलं आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे वागलो, तर यहोवा आपल्याला वचन देतो, की तो आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करेल. (मत्त. ६:३३; स्तो. ५५:२२) देवाच्या या अभिवचनावर आपला भरवसा असेल, तर आपण असा कधीच विचार करणार नाही, की धनसंपत्तीमुळे आपण सुरक्षित आणि आनंदी राहू. कारण आपल्याला माहीत आहे, की खरा आनंद आणि मनाची शांती यहोवाची इच्छा पूर्ण केल्यामुळेच मिळते. (फिलिप्पै. ४:६, ७) आपली बऱ्‍याच गोष्टी घेण्याची ऐपत जरी असली, तरी त्या वापरण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी आपल्याकडे खरंच पुरेसा वेळ आणि ताकद असेल का; किंवा मग, त्या वस्तूंमध्ये आपला जीव तर अडकणार नाही ना, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवाच्या सेवेत आपल्याला भरपूर काम आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमुळे आपण आपलं लक्ष भरकटू देऊ नये. बायबलमधल्या त्या तरुण माणसाचा वृत्तान्त आठवा, ज्याला यहोवाची सेवा करायची संधी होती. इतकंच नाही, तर त्याला स्वर्गातल्या जीवनाची आशाही मिळाली असती. पण तो ती संधी गमावून बसला. कारण त्याचा सगळा जीव त्याच्या धनसंपत्तीत अडकला होता. आपल्याला या माणसासारखं नक्कीच व्हायचं नाही.—मार्क १०:१७-२२.

भविष्यात यहोवाच्या कुटुंबातल्या लोकांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१८. भविष्यात मानवांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१८ यहोवाचं ऐकणाऱ्‍या मानवांना एक खास आशीर्वाद मिळेल. तो म्हणजे, कायम त्याच्यावर प्रेम करायचा आणि त्याची उपासना करायचा आशीर्वाद! तसंच, त्यांना पृथ्वीची काळजी घेण्यातही आनंद मिळेल. लवकरच देवाचं राज्य पुन्हा एकदा या पृथ्वीला सुंदर बनवेल. आदाम आणि हव्वाच्या चुकीच्या निर्णयामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या त्या सगळ्या येशू काढून टाकेल. तसंच, यहोवा लाखो लोकांना जिवंत करेल आणि त्यांना बागेसारख्या सुंदर पृथ्वीवर कायम जगण्याची संधी देईल. (लूक २३:४२, ४३) यहोवाची सेवा करणारे परिपूर्ण होतील तेव्हा दावीदने म्हटल्याप्रमाणे ते जणू काय “गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट” घालतील.—स्तो. ८:५.

१९. आपण नेहमी काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१९ तुम्ही जर ‘मोठ्या लोकसमुदायातले’ असाल तर तुम्ही नेहमी काय लक्षात ठेवलं पाहिजे? हेच, की तुम्हाला एक सुंदर आशा आहे. यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही त्याच्या कुटुंबाचे सदस्य व्हावं असं त्याला वाटतं. त्यामुळे त्याला आवडतील अशा गोष्टी करायचा प्रयत्न करा. नेहमी त्याची अभिवचनं लक्षात ठेवा. आणि त्याची उपासना करायचा आणि गौरव करायचा जो बहुमान तुम्हाला मिळाला आहे त्याची कदर करा.

गीत ५० देवाच्या प्रीतीचा आदर्श

^ परि. 5 कुटुंबातल्या प्रत्येकाला आपली जबाबदारी माहीत असते आणि ते सर्व एकमेकांना मदत करतात, तेव्हा त्या कुटुंबातला आनंद टिकून राहतो. जसं की, वडील प्रेमळपणे घर चालवतात, आई त्यांना साथ देते आणि मुलं आईवडिलांचं ऐकतात तेव्हा ते कुटुंब आनंदी राहतं. यहोवाचं कुटुंबही तसंच आहे. यहोवाचा आपल्यासाठी एक उद्देश आहे. आणि त्या उद्देशाप्रमाणे जर आपण काम केलं, तर आपण कायम त्याच्या कुटुंबात राहू.

^ परि. 55 चित्राचं वर्णन: यहोवाने मानवांना आपल्या स्वरूपात बनवलं आहे. त्यामुळे एक जोडपं एकमेकांशी आणि आपल्या दोन्ही मुलांशी प्रेमाने वागतं. त्या जोडप्याचं यहोवावर प्रेम आहे आणि त्याने, मुलांना जन्म द्यायची जी क्षमता दिली त्याबद्दल त्यांना कदर आहे. म्हणून ते आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची उपासना करायला शिकवत आहेत. यहोवाने येशूचं बलिदान का दिलं हे ते आपल्या मुलांना एका व्हिडिओतून दाखवत आहेत. तसंच, भविष्यात आपण कायम बागेसारख्या सुंदर पृथ्वीची आणि प्राण्यांची काळजी घेऊ हेसुद्धा ते त्यांना सांगत आहेत.