व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३२

निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास मजबूत करत राहा

निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास मजबूत करत राहा

“विश्‍वास . . . हा न पाहिलेल्या खऱ्‍या गोष्टींचा खातरीलायक पुरावा आहे.”—इब्री ११:१.

गीत १५ सृष्टी यहोवाची स्तुती गाते

सारांश *

१. लहानपणापासून तुम्ही यहोवाबद्दल काय शिकत आला आहात?

तुम्ही साक्षीदार कुटुंबात लहानाचे मोठे झाले असाल, तर तुम्ही लहानपणापासूनच यहोवाबद्दल शिकला असाल. जसं की, यहोवानेच सगळं काही निर्माण केलं आहे, त्याच्यामध्ये अनेक चांगले गुण आहेत आणि लवकरच तो पृथ्वीला एका सुंदर बागेसारखं बनवणार आहे.—उत्प. १:१; प्रे. कार्यं १७:२४-२७.

२. निर्माणकर्त्याला मानणाऱ्‍या लोकांबद्दल काही जणांना काय वाटतं?

पण आज अनेक लोक हे मानत नाहीत, की देव आहे किंवा त्याने सगळं काही बनवलं आहे. उलट ते असं मानतात, की सगळं काही आपोआप आलं आहे, आणि साध्या जिवांपासून हळूहळू जटिल जीव उत्पन्‍न झाले. असं म्हणणारे काही जण तर खूप शिकलेले आहेत. ते असा दावा करतात, की विज्ञानाने बायबलला चुकीचं ठरवलं आहे. तसंच ते असंही म्हणतात, की निर्माणकर्त्याला मानणारे लोक कमी शिकलेले असतात आणि ते विचार न करता कोणत्याही गोष्टीवर विश्‍वास ठेवतात.

३. आपण आपला विश्‍वास वाढवत राहणं का गरजेचं आहे?

जगातले काही ज्ञानी लोक जे काही म्हणतात त्यामुळे यहोवा आपला निर्माणकर्ता आहे याबद्दल आपल्या मनात शंका निर्माण होऊ शकते का? हो, होऊ शकते. कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून  जर आपण मानलं, की यहोवा आपला निर्माणकर्ता आहे तर असं होऊ शकतं. पण तेच जर आपण स्वतः त्याचे पुरावे तपासून पाहिले, तर आपल्या बाबतीत तसं होणार नाही. (१ करिंथ. ३:१२-१५) आपण कितीही वर्षांपासून सत्यात असलो, तरी आपण आपला विश्‍वास सतत वाढवत राहिला पाहिजे. मग, मानवी “तत्त्वज्ञान आणि निरर्थक” गोष्टींमुळे आपली फसवणूक होणार नाही. (कलस्सै. २:८; इब्री ११:६) या लेखात आपण पाहणार आहोत, की (१) आज अनेक लोक निर्माणकर्त्याला का मानत नाहीत? (२) तुम्ही यहोवावरचा, तुमच्या निर्माणकर्त्यावरचा तुमचा विश्‍वास कसा वाढवू शकता? आणि (३) तो विश्‍वास तुम्ही कसा टिकवून ठेवू शकता?

आज अनेक लोक निर्माणकर्त्याला का मानत नाहीत?

४. इब्री लोकांना ११:१ या वचनात विश्‍वासाबद्दल काय म्हटलं आहे?

काही लोक असा विचार करतात, की विश्‍वास म्हणजे एखाद्या गोष्टीचा काहीही पुरावा नसताना ती गोष्ट मानणं. पण बायबल सांगतं, की खरा विश्‍वास असा नसतो. (इब्री लोकांना ११:१ वाचा.) तो खातरीलायक पुराव्यावर  आधारित असतो. त्यामुळे आपण जरी यहोवाला, त्याच्या राज्याला आणि येशूला पाहू शकत नसलो, तरी ते खरे असल्याचा पुरावा आपल्याकडे आहे. (इब्री ११:३) एक भाऊ, जो वैज्ञानिक आहे तो असं म्हणतो, “यहोवाचे साक्षीदार जे काही मानतात त्यासाठी त्यांच्याकडे पुरावे असतात. विज्ञानाने दिलेले पुरावेसुद्धा ते मानतात.”

५. देवाने सगळं काही बनवलं आहे असं बहुतेक लोक का मानत नाहीत?

आपल्याला कदाचित प्रश्‍न पडेल, की निर्माणकर्ता असल्याचा खातरीलायक पुरावा असूनसुद्धा, देवाने सगळं काही बनवलं आहे असं बहुतेक लोक का मानत नाहीत? कारण काही जणांनी तो पुरावा स्वतःहून कधीच तपासून पाहिलेला नसतो. रॉबर्ट जे आज यहोवाचे साक्षीदार आहेत ते असं म्हणतात, “शाळेत आम्हाला हे कधीच शिकवलं नव्हतं, की सृष्टीला कोणीतरी बनवलं आहे. त्यामुळे या गोष्टीवर माझा मुळीच विश्‍वास नव्हता. पण मी २२ वर्षांचा असताना माझी भेट यहोवाच्या साक्षीदारांशी झाली. त्यांच्याकडून मी शिकलो, की देवाने सगळं काही निर्माण केलं आहे. याची कितीतरी कारणं बायबलमध्ये दिली आहेत, आणि ती खरंच पटण्यासारखी आहेत.” *—“ आईवडिलांसाठी एक महत्त्वाचा संदेश,” ही चौकट पाहा.

६. काही लोक असं का म्हणतात की “देव नाहीए”?

काही जण निर्माणकर्त्याला मानत नाहीत. कारण ‘ज्या गोष्टी दिसत नाहीत, त्यांवर विश्‍वास कसा ठेवायचा?’ असं त्यांचं म्हणणं आहे. पण खरंतर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या दिसत नसल्या तरी त्यांवर ते विश्‍वास ठेवतात. जसं की, गुरुत्वाकर्षणाची शक्‍ती आणि हवा. कारण या गोष्टी खऱ्‍या असल्याचा पुरावा आहे. बायबलसुद्धा सांगतं, की आपण “न पाहिलेल्या खऱ्‍या गोष्टींवर”  विश्‍वास ठेवू शकतो, कारण त्यांचा पुरावा आहे. (इब्री ११:१) तो पुरावा तपासून पाहण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. पण बरेच लोक तसं करत नाहीत. त्यामुळे ते म्हणतात, की “देव नाहीए.”

७. सगळेच शिकलेले लोक निर्माणकर्त्याला मानत नाहीत, हे खरं आहे का? स्पष्ट करा.

पुरावे तपासून पाहिल्यानंतर काही वैज्ञानिकांना याची खातरी पटली आहे, की देवाने अख्खं विश्‍व निर्माण केलं आहे. * पाचव्या परिच्छेदात सांगितलेल्या रॉबर्टसारखं काहींना वाटयचं, की कोणीही निर्माणकर्ता नाही. कारण त्याच्याबद्दल शाळेत त्यांना कधीच शिकवलं नव्हतं. पण अनेक वैज्ञानिकांनी यहोवाबद्दल शिकून घेतलं आणि ते त्याच्यावर विश्‍वास ठेवू लागले. त्यांच्यासारखं आपणसुद्धा देवावरचा आपला विश्‍वास वाढवत राहिला पाहिजे; मग आपलं शिक्षण कमी असलं तरीही. आणि आपण स्वतःच ते केलं पाहिजे, दुसरं कोणीही आपल्यासाठी ते करू शकत नाही.

निर्माणकर्त्यावरचा तुमचा विश्‍वास तुम्ही कसा वाढवू शकता?

८-९. (क) आता आपण कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहोत? (ख) सृष्टीचं निरीक्षण केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?

तुम्ही निर्माणकर्त्यावरचा तुमचा  विश्‍वास कसा वाढवू शकता? याचे चार मार्ग आता आपण पाहू या.

सृष्टीचं निरीक्षण करा आणि त्यातून शिका.  निर्माणकर्त्यावरचा विश्‍वास वाढवण्यासाठी तुम्ही प्राण्यांचं, झाडाझुडपांचं आणि ताऱ्‍यांचं निरीक्षण करू शकता. (स्तो. १९:१; यश. ४०:२६) या गोष्टींचं तुम्ही जितकं जास्त निरीक्षण कराल  तितकी जास्त तुम्हाला खातरी पटेल, की यहोवा आपला निर्माणकर्ता आहे. आपल्या प्रकाशनांमध्येसुद्धा असे खूपसारे लेख आहेत, ज्यांमध्ये सृष्टीतल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बरीच माहिती दिली आहे. असे लेख समजायला कठीण वाटत असले, तरी ते वाचायचं सोडून देऊ नका. त्यांतून जमेल तितकं शिका. तसंच, अलीकडच्या अधिवेशनांमध्ये सृष्टीबद्दल अनेक व्हिडिओ दाखवले होते. ते व्हिडिओ आता आपल्या वेबसाईटवर दिले आहेत. तेसुद्धा तुम्ही अधूनमधून पाहू शकता.

१०. एक निर्माणकर्ता आहे हे सृष्टीतून कसं दिसून येतं, याचं एक उदाहरण द्या. (रोमकर १:२०)

१० सृष्टीचं निरीक्षण करताना निर्माणकर्त्याबद्दल काय शिकायला मिळतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. (रोमकर १:२० वाचा.) उदाहरणार्थ, सूर्याच्या प्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे पृथ्वी आपल्यासाठी राहण्यालायक बनते. पण त्याच वेळी सूर्यातून अशी काही किरणं निघतात जी आपल्यासाठी हानीकारक असतात. मग त्या किरणांपासून आपलं संरक्षण कसं होतं? पृथ्वीच्या भोवती ओझोनचा एक थर आहे. यामुळे त्या हानीकारक किरणांपासून आपलं संरक्षण होतं. सूर्यातून निघणारी ही हानीकारक किरणं जितकी तीव्र होतात, ओझोनचा थरसुद्धा तितकाच दाट होतो. यावरून हेच दिसून येत नाही का, की यामागे एक प्रेमळ आणि बुद्धिमान निर्माणकर्ता आहे?

११. निर्माणकर्त्यावरचा विश्‍वास वाढवणारी माहिती तुम्हाला कुठे मिळेल? (“ निर्माणकर्त्यावरचा विश्‍वास वाढवणारी माहिती,” ही चौकट पाहा.)

११ निर्माणकर्त्यावर तुमचा विश्‍वास वाढेल अशी माहिती यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  यात आणि jw.org या वेबसाईटवर दिली आहे. सुरुवातीला तुम्ही, “उत्क्रांती की निर्मिती?” याबद्दल असलेले लेख वाचू शकता किंवा व्हिडिओ पाहू शकता. ते सहसा लहान असतात आणि त्यांत प्राण्यांबद्दल आणि झाडाझुडपांबद्दल चकित करणारी माहिती असते. इतकंच नाही, तर वैज्ञानिकांनी सृष्टीतल्या गोष्टींची नक्कल करून कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या हेसुद्धा त्यांत सांगितलं आहे.

१२. बायबलचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे?

१२ बायबलचा अभ्यास करा.  चौथ्या परिच्छेदामध्ये ज्या वैज्ञानिकाबद्दल आपण पाहिलं होतं त्याला निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवायला वेळ लागला. तो म्हणतो, “पण फक्‍त विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे नाही, तर बायबलचा मन लावून अभ्यास केल्यामुळेसुद्धा मी निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवू लागलो.” तुम्हाला कदाचित आधीपासूनच बायबलचं चांगलं ज्ञान असेल. पण निर्माणकर्त्यावरचा तुमचा विश्‍वास वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी बायबलचा अभ्यास केला पाहिजे. (यहो. १:८; स्तो. ११९:९७) असं करताना पूर्वी होऊन गेलेल्या घटनांबद्दल बायबलमध्ये किती अचूक माहिती दिली आहे याचा विचार करा. तसंच, बायबलमधल्या भविष्यवाण्या कशा प्रकारे खऱ्‍या ठरल्या आणि त्यांबद्दल वेगवेगळ्या लेखकांनी दिलेली माहिती एकमेकांशी कशी जुळते याकडेही लक्ष द्या. त्यामुळे, एका प्रेमळ आणि बुद्धिमान देवाने आपल्याला निर्माण केलं आहे आणि त्यानेच आपल्या काही सेवकांना बायबल लिहायची प्रेरणा दिली यावरचा तुमचा विश्‍वास आणखी वाढेल. *२ तीम. ३:१४; २ पेत्र १:२१.

१३. बायबलचे सल्ले उपयोगी आहेत असं का म्हणता येईल, याचं एक उदाहरण द्या.

१३ बायबलचा अभ्यास करताना त्यात दिलेले सल्ले किती उपयोगी आहेत त्याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, बायबलमध्ये फार आधीच सांगितलं होतं, की पैशाचं प्रेम वाईट असतं आणि त्यामुळे पुष्कळ दुःख वाट्याला येतं. (१ तीम. ६:९, १०; नीति. २८:२०; मत्त. ६:२४) आजही असंच होतं का? आजच्या काळातल्या लोकांच्या मनोवृत्तीबद्दल सांगणारं एक पुस्तक म्हणतं: “पैसाच सगळं काही आहे असा विचार करणारे लोक सहसा दुःखी आणि निराश असतात. आणि ज्यांना पैशांची हाव असते तेसुद्धा तणावाखाली असतात आणि याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.” त्यामुळे बायबलमध्ये जो सल्ला दिला आहे, की आपण पैशांवर प्रेम करू नये तो किती योग्य आहे! बायबलमधल्या आणखी कोणत्या सल्ल्यामुळे तुम्हाला फायदा झाला आहे याचा विचार करा. बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांचा आपण जितका विचार करतो तितकं आपल्या लक्षात येईल, की आपला निर्माणकर्ता खूप प्रेमळ आहे आणि तो नेहमी आपल्या भल्याचा विचार करतो. म्हणूनच त्याच्या सल्ल्यांवर आपण भरवसा ठेवू शकतो. (याको. १:५) आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहतो.—यश. ४८:१७, १८.

१४. बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला यहोवाबद्दल काय शिकायला मिळेल?

१४ यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्यायच्या उद्देशाने बायबलचा अभ्यास करा.  (योहा. १७:३) यामुळे यहोवा कशा प्रकारची व्यक्‍ती आहे आणि त्याच्यामध्ये किती चांगले गुण आहेत हे तुम्हाला शिकायला मिळेल. हे तेच गुण आहेत जे तुम्हाला सृष्टीचं निरीक्षण करताना पाहायला मिळाले. त्याच्या या गुणांबद्दल शिकल्यामुळे तुम्हाला खातरी पटेल, की यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे. (निर्ग. ३४:६; स्तो. १४५:८, ९) तुम्ही जितकं जास्त यहोवाला जाणून घ्याल, तितकाच त्याच्यावरचा तुमचा विश्‍वास मजबूत होईल, त्याच्यावरचं तुमचं प्रेम वाढेल आणि त्याच्यासोबतची तुमची मैत्री घट्ट होईल.

१५. इतरांना शिकत असलेल्या गोष्टी सांगितल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?

१५ यहोवाबद्दल शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगा.  त्यामुळे तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल. पण, ‘देव आहे का?’ असा प्रश्‍न जर कोणी तुम्हाला विचारला आणि त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं नाही, तर तुम्ही काय करू शकता? त्याबद्दल तुम्ही आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करू शकता आणि मग त्या व्यक्‍तीला उत्तर देऊ शकता. (१ पेत्र ३:१५) तसंच, तुम्ही इतर अनुभवी भाऊबहिणींची मदतसुद्धा घेऊ शकता. तुम्ही दिलेलं उत्तर समोरच्या व्यक्‍तीला पटलं नाही, तरी संशोधन केल्यामुळे तुम्हालाच फायदा होईल. तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल. त्यामुळे, “निर्माणकर्ता नाही” असं भरपूर शिकलेले आणि बुद्धिमान लोक जरी म्हणत असले, तरी त्यांच्यावर तुम्ही विश्‍वास ठेवणार नाही.

तुमचा विश्‍वास टिकवून ठेवा

१६. आपण आपला विश्‍वास मजबूत ठेवला नाही तर काय होऊ शकतं?

१६ आपण कितीही वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी आपण आपला विश्‍वास मजबूत करत राहिला पाहिजे आणि तो टिकवून ठेवला पाहिजे. नाहीतर, तो कमजोर होऊ शकतो. आपण आधी पाहिलं होतं त्याप्रमाणे विश्‍वास हा न पाहिलेल्या  गोष्टींच्या पुराव्यांवर आधारित असतो. पण आपण जे पाहू शकत नाही ते आपण सहज विसरू शकतो. त्यामुळे आपला विश्‍वास मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे. पौलनेसुद्धा असं म्हटलं, की कमजोर विश्‍वास असं पाप आहे जे सहज आपल्याला अडकवतं. (इब्री १२:१) तर मग, आपण आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी काय करू शकतो?—२ थेस्सलनी. १:३.

१७. आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१७ पहिली गोष्ट म्हणजे, पवित्र शक्‍तीसाठी यहोवाकडे वारंवार विनंती करा.  कारण विश्‍वास असा गुण आहे जो पवित्र शक्‍ती आपल्याला वाढवायला मदत करते. (गलती. ५:२२, २३) आणि पवित्र शक्‍तीच्या मदतीशिवाय आपण निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास वाढवू शकत नाही आणि तो टिकवूनही ठेवू शकत नाही. म्हणून नेहमी यहोवाकडे पवित्र शक्‍ती मागा. तो ती तुम्हाला नक्की देईल. (लूक ११:१३) आपण यहोवाकडे अशीसुद्धा विनंती करू शकतो, की “आमचा विश्‍वास वाढव.”—लूक १७:५.

१८. स्तोत्र १:२, ३ या वचनांप्रमाणे आपल्याला कोणती सुंदर भेट मिळाली आहे?

१८ दुसरी गोष्ट म्हणजे, बायबलचा नियमित अभ्यास करा.  (स्तोत्र १:२, ३ वाचा.) हे स्तोत्र रचण्यात आलं तेव्हा फार कमी इस्राएली लोकांकडे देवाच्या नियमशास्त्राच्या गुंडाळ्या होत्या. पण राजांकडे आणि याजकांकडे त्या नेहमी असायच्या. आणि दर सात वर्षांनंतर “सर्व लोकांना म्हणजे पुरुषांना, स्त्रियांना, लहान मुलांना” आणि त्यांच्यामध्ये असलेल्या विदेश्‍यांना, देवाचं हे नियमशास्त्र वाचून दाखवलं जायचं. (अनु. ३१:१०-१२) येशूच्या दिवसांमध्येसुद्धा फक्‍त काही लोकांकडेच आणि सभास्थानांमध्येच नियमशास्त्राच्या गुंडाळ्या असायच्या. पण आज तसं नाही. आज बहुतेक लोकांकडे संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग आहेत. खरंच, देवाकडून मिळालेली ही किती छान भेट आहे! मग या भेटीची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१९. आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१९ देवाने दिलेल्या खास भेटीची, म्हणजे बायबलची आपल्याला कदर आहे हे दाखवण्यासाठी आपण फक्‍त वेळ मिळेल तेव्हाच नाही, तर नियमितपणे ते वाचलं पाहिजे. ते वाचण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण विशिष्ट वेळ ठरवली पाहिजे. अशा प्रकारे न चुकता आपण बायबलचा अभ्यास करत राहिलो, तर आपला विश्‍वास मजबूत होईल.

२०. आपण काय करायचा निश्‍चय करू या?

२० आपण जगातल्या ‘ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांसारखे’ नाहीत. आपला विश्‍वास बायबलमध्ये दिलेल्या पुराव्यांवर आधारित आहे. (मत्त. ११:२५, २६) बायबलच्या अभ्यासातून आपल्याला समजलं, की जगाची परिस्थिती इतकी वाईट का आहे आणि यहोवा लवकरच याबद्दल काय करणार आहे. म्हणून आपण आपला विश्‍वास मजबूत करण्याचा आणि होता होईल तितक्या लोकांना निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवायला मदत करण्याचा निश्‍चय करू या. (१ तीम. २:३, ४) आणि त्या दिवसाची वाट पाहू या जेव्हा पृथ्वीवरचे सगळे लोक यहोवाची स्तुती करतील आणि असं म्हणतील, “यहोवा आमच्या देवा, गौरव . . . मिळण्यासाठी तूच योग्य आहेस. कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.”—प्रकटी. ४:११.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 बायबल स्पष्टपणे सांगतं, की यहोवा देवाने सगळं काही निर्माण केलं आहे. पण बहुतेक लोक म्हणतात, की “कोणीही निर्माणकर्ता नाहीए. सगळं काही आपोआप आलंय.” पण यहोवावर आणि बायबलवर आपला मजबूत विश्‍वास असेल, तर त्यांच्या विचारांचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणून आपण निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास कसा मजबूत करत राहू शकतो, याबद्दल या लेखात चर्चा केली जाईल.

^ परि. 5 देवाने सगळं काही बनवलं असेल, असं बऱ्‍याच शाळांमध्ये शिकवलं जात नाही. कारण शिक्षकांना असं वाटतं, की त्यांनी जर मुलांना हे शिकवलं, तर एका अर्थाने ते मुलांना देवावर विश्‍वास ठेवायला जबरदस्ती करत असतील.

^ परि. 7 वॉच टॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स  यामध्ये भरपूर शिकलेल्या जवळपास अशा ६० लोकांचे आणि वैज्ञानिकांचे अनुभव दिले आहेत, जे निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवू लागले. यांतले काही अनुभव यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  यातसुद्धा दिले आहेत. “विज्ञान आणि तंत्रज्ञान” या विषयाखाली “‘अनुभव’ (सावध राहा!  मालिका)” असा विषय आहे, त्यात ते वाचायला मिळतील.

^ परि. 12 त्यासाठी तुम्ही, जुलै-सप्टेंबर २०११ च्या सजग होईए!  यातला “क्या बायबल और विज्ञान में कोई तालमेल है” हा लेख, आणि १ जानेवारी २००८ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “यहोवा जे भाकीत करतो ते खरे ठरते,” हा लेख पाहू शकता.